‘ह्युमन अ‍ॅक्टस’ : अमानवी क्रौर्याची करुण कहाणी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितीन जरंडीकर
  • ‘ह्युमन अ‍ॅक्टस’ची मुखपृष्ठं
  • Mon , 20 February 2017
  • ग्रंथनामा Booksnama ह्युमन अ‍ॅकट्स Human Acts हॅन कांग Han Kang

‘ह्युमन अ‍ॅक्टस’ ही हॅन कांग या कोरियन लेखिकेची कादंबरी. कोरिया म्हणजे अर्थातच दक्षिण कोरिया. कारण उत्तर कोरियातील काही वाचायला किंवा पाहायला मिळेल याची तूर्त तरी शक्यता नाही. द. कोरिया म्हटलं की, सर्वप्रथम आठवतात ते सॅमसंग, ह्युंदाई आणि एल् जी हे जगप्रसिद्ध ब्रँड्स. गेल्या काही दशकांतील द. कोरियाने केलेली प्रगती विस्मयकारक म्हणावी अशी आहे. ‘एशियन टायगर इकॉनॉमी’मध्ये द. कोरियाचा नंबर अव्वल आहे. उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये द. कोरियाची कामगिरी नेत्रदीपक आहे. परंतु दक्षिण कोरियाच्या या वैभवसंपन्नतेला शोषण आणि दडपशाहीची एक गडद किनार आहे, ज्याबद्दलची अतिशय क्षीण चर्चा प्रसारमाध्यमांतून क्वचित घडताना दिसते.  

२०१२मध्ये पार्क गुन-हेया द. कोरियाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि समस्त कोरियनवासीयांच्या जखमेवरची खपली निघाली. कारण पार्क गुन-हेया पार्क चुंग-ही या कोरियाचा एकेकाळचा सर्वेसर्वा आणि सशस्त्र उठाव करून आलेल्या हुकूमशहाची कन्या होत. १९६१ ते १९७९ दरम्यान एकीकडे द. कोरियाची धडाक्यात प्रगती सुरू झाली, तर दुसऱ्या बाजूने लोकशाही मूल्यांची परवड आणि पायमल्ली सुरू झाली. १९७९मध्ये पार्क चुंग-ही यांनी लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी मार्शल लॉ पुकारला आणि याच वर्षी त्यांची हत्या होऊन त्यांची जागा चून दु-वान या आर्मी जनरलने घेतली.

अर्थात हे सत्तांतर म्हणजे लोकशाही मूल्यांचा विजय नक्कीच नव्हता. कारण चून दु-वान यांनी पार्क चुंग-ही यांचीच री ओढली. चून दु-वान यांचा कालखंड हा दक्षिण कोरियातील कमालीचा असंतोषाचा आणि अस्वस्थतेचा कालखंड आहे. या दरम्यान लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना होण्यासाठी जे अनेक उठाव दक्षिण कोरियात झाले, त्यापैकी ५/१८ चा उठाव महत्त्वपूर्ण आहे.

१८ मे १९८० रोजी ग्वांगजू या शहरात महाविद्यालयीन युवक-युवती आणि महिला यांनी मार्शल लॉ रद्द व्हावा, स्त्रियांना किमान वेतन मिळावं, पत्रकारिता भयमुक्त व्हावी अशी भूमिका घेत चून दु-वान यांचा तीव्र निषेध निदर्शनांतून व्यक्त केला. परिणामी आर्मी आणि सामान्य नागरिक यांच्यात धुमश्चक्री झाली. अनेक निरपराध लोक मारले गेले. १८ मे ते २७ मे दरम्यान ही अमानुष कत्तल सुरू राहिली. सरकारी आकडेवारीनुसार मृतांची संख्या ६०० इतकी आहे, तर प्रत्यक्षातली ही संख्या २०००च्या घरात आहे. १९९७मध्ये कोरियन सरकारने लोकशाही मूल्यांसाठी बलिदान दिलेल्यांचा सन्मान राखण्यासाठी १८ मे हा संस्मरण दिन म्हणून जाहीर केला आणि मृतांच्या दफनभूमीचं राष्ट्रीय स्मारक बनवलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा सर्व इतिहास तपशिलानं मांडण्याचं कारण म्हणजे ५/१८चा उठाव हा ‘ह्युमन अ‍ॅक्टस’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. पण हॅन कांग यांना कादंबरीच्या अवकाशाचं यथायोग्य आकलन आहे. त्यामुळे कादंबरीचा केवळ ऐतिहासिक दस्तवेज होणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे.

डॉन्ग हो या १५ वर्षं वयाच्या शाळकरी मुलाच्या निवेदनानं कादंबरीला सुरुवात होते. ग्वांगजू शहराच्या एका जिम्नॅशिअम हॉलमध्ये आपल्या शाळकरी मित्राला (जिऑंन्ग डे) शोधण्याच्या निमित्ताने तो येतो. ५/१८च्या नरसंहारानंतर शहरातल्या चौकात पडलेल्या मृतदेहांची विटंबना होऊ नये, त्यावर योग्य ते संस्कार व्हावेत या हेतूनं नागरिकांनी मृतदेहांना जिम्नॅशिअम हॉलमध्ये आणलं आहे. मृतदेहांना स्वच्छ करणं, कफनात गुंडाळणे व शवपेटीत ठेवणं या कामात १८ वर्षांच्या दोन तरुणी (युन सूक व सिऑन ज्यू) गुंतलेल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी एक १९ वर्षांचा तरुण (जिन सू) तत्परतेनं काम करतो आहे. अशा मदतकार्यात माणसांची कमतरता भासणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्या दोन तरुणी डॉन्ग होला मदत करण्याची विनंती करतात.

मृतदेहांच्या तपशीलाचं वर्णन रजिस्टरमध्ये नोंदवण्याची जबाबदारी डॉन्ग होवर सोपवण्यात येते. जिम्नॅशिअम हॉलमधली ही भयाण अवस्था वाचत असतानाच डॉन्ग होच्या निवेदनातून अजून काही गोष्टी स्पष्ट होत जातात. डॉन्ग हो ज्या मित्राच्या शोधात आला आहे, त्याची थोरली बहीण काही दिवसापासून बेपत्ता आहे. बहिणीचा शोध घेण्यासाठी म्हणून डॉन्ग हो व त्याचा मित्र बाहेर पडतात आणि ५/१८च्या उठावात सैनिकांनी केलेल्या गोळीबारात डॉन्ग होचा मित्र मरण पावतो. जिम्नॅशिअम हॉलमध्ये मित्राला शोधण्यासाठी म्हणून आलेल्या डॉन्ग होला आपला मित्र या जगात नाही हे पक्कं ठाऊक आहे. तरीही खोटं बोलून तो इतर तरुण सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून तिथं थांबतो.

१९८० सालामध्ये कादंबरीला सुरुवात होते आणि २०१३मध्ये कादंबरीचा शेवट होतो. कालखंडाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरून ५/१८ची घटना आणि त्यानंतर उमटलेले पडसाद याकडे कादंबरीमध्ये पाहिलं गेलं आहे. कालखंडाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरून बहुआवाजी निवेदनातून आपणाला डॉन्ग होचा मित्र, त्याची बहीण, जिम्नॅशिअम हॉलमध्ये काम करणारे तिघे आणि स्वतः डॉन्ग हो, या सर्वांचं पुढे नेमकं काय झालं हे अलगदपणे उलगडत जातं.

१८ मे नंतरचे ८-१० दिवस ग्वांगजू शहरात मृत्यूनं थैमान घातलेलं असतं. तरीही नागरिक निदर्शनं करण्याचं थांबवत नाहीत. सैनिकांकडून सापडलेल्या तुटपुंज्या शस्त्रांच्या आधारे नागरिक आर्मीशी दोन हात करण्याची मनीषा बाळगून असतात. पण आर्मीच्या अजस्त्र ताकदीपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे एकदा उमगल्यानंतर शरणागती पत्करतात. जिम्नॅशिअम हॉलमध्ये काम करणाऱ्या तिघांनाही इतर असंख्य तरुण-तरुणींप्रमाणे तुरुंगात डांबण्यात आलं आहे. इथं पुन्हा सुरुवात होते ती अमानुष आणि अनन्वित अत्याचारांना. तब्बल दोन-तीन महिने सातत्यानं सामोरं गेलेल्या भयानक अनुभवांनी ही तरुणाई पार कोलमडून गेली आहे. निद्रानाश, नैराश्य आणि मानसिक असंतुलन यांनी त्यांना ग्रासलं आहे. परिणामी असहाय आणि अगतिक अवस्थेत आत्महत्या करून ते मृत्यूला जवळ करत आहेत. या साऱ्या घटनांचं भयचकित वर्णन कादंबरीत वाचायला मिळतं.

डॉन्ग होदेखील त्याच्या मित्राप्रमाणे मारला गेला आहे, हाही तपशील आपणाला अशा एका निवेदकाकडून कळतो. कादंबरीच्या शेवटी एक निवेदक डॉन्ग होचे ग्वांगजू शहरात जिथं दफन करण्यात आलं आहे, त्या जागेच्या शोधात त्याच्या शाळेत जातो. तिथल्या रजिस्टरमध्ये त्याचा फोटो पाहतो आणि डॉन्ग होच्या थोरल्या भावाला भेटतो. या भावाकडून निवेदकाला डॉन्ग होला दफन केलेली जागा, अंतिम संस्कारावेळचे तपशील आदी गोष्टी कळतात. निवेदक डॉन्ग होला दफन केलेल्या जागेजवळ येतो, तिथं मेणबत्ती लावतो. ‘पक्षाच्या फडफडणाऱ्या पंखाप्रमाणे’ दिसणाऱ्या मेणबत्तीच्या नारिंगी ज्योतीकडे एकटक पाहत राहतो. इथं कादंबरी संपते.

स्मारकं उभी करून, स्मृतिदिन साजरे करून सरकार आपल्या उत्तरदायित्वातून मुक्त होऊ शकतं का, याबाबतचा मूलभूत प्रश्न ही कादंबरी जसा उपस्थित करते, तसंच सरकारी आकडेवारीव्यतिरिक्त मृत झालेल्या नागरिकांचं काय आणि उठावानंतर झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे मानसिक व भावनिक विश्व कोलमडलेल्या, जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या पिढीचं काय, हे नुकसान कसं भरून काढायचं, हेही प्रश्न ही कादंबरी उपस्थित करते.

कादंबरीत एका प्रकरणात डॉन्ग होचा मृत शाळकरी मित्र हा निवेदक आहे. त्याचा आत्मा पाहतोय की, ट्रकमधून सैनिकांनी मृतदेह रचून आणले आहेत, ते दरीत फेकून दिले आहेत, मृतदेह आता सडू लागले आहेत, सगळीकडे दुर्गंधी पसरू लागली आहे. परिणामी सैनिक पेट्रोलचे कॅनच्या कॅन ओतून सारे मृतदेह जाळून टाकतात. या मृतदेहांची कागदोपत्री कुठेही नोंद नाही.

ज्या प्रकरणात डॉन्ग होची आई निवेदक आहे, ते प्रकरण तर खूपच प्रत्ययकारी आहे. जिम्नॅशिअम हॉलमध्ये डॉन्ग हो आहे हे समजल्यानंतर त्याची आई त्याला घरी बोलावण्यासाठी जाते. तिथलं भयावह वातावरण पाहून आई त्याला विचारते, “या मृतदेहांची तुला भीती नाही वाटत?” त्यावर डॉन्ग हो उत्तर देतो, “मेलेल्यांची काय भीती? खरी भीती वाटते ती सैनिकांची.” संध्याकाळी जेवायला घरी परत येईन असं आश्वासन घेऊन डॉन्ग होची आई घरी परतते.

दुसऱ्या दिवशी तिला मिळतो तो डॉन्ग होचा मृतदेह. मग तिचं मानसिक संतुलन ढळतं. तिच्या कथनातून तिची मनोवस्था कळत राहते. कोणताही आक्रोश न करणारी आई डॉन्ग होचं दफन झाल्यानंतर मटकन खाली बसते आणि गवत तोडून खायला सुरुवात करते. नुकत्याच केलेल्या डांबरी रस्त्यावर पाय भाजत असूनही अनवाणीपणे उभी राहते. रस्त्याच्या कडेला तासन तास तिष्ठत उभी राहते. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चून दु-वानचा फोटो पायात काचा घुसूनही बेभान होऊन तुडवत राहते.

डॉन्ग होच्या आईप्रमाणे शहरात असंख्य स्त्रिया आहेत, ज्यांनी आपली मुलं या उठावात गमावली आहेत. या सर्व स्त्रिया संघटित होऊन आपल्या मुलांच्या बलिदानाचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी पुढे कितीतरी वर्षं आंदोलन करत राहिल्याचं आपल्याला डॉन्ग होच्या आईच्या कथनातून कळतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

५/१८च्या उठावानंतरही दडपशाहीचा वरवंटा कसा फिरत होता, हे सांगणारा एक प्रसंग कादंबरीत वाचावयास मिळतो. जिम्नॅशिअम हॉलमध्ये मृतदेहाचं नियोजन करणाऱ्या तरुणीनं १९८५ मध्ये ५/१८चा उठाव आणि डॉन्ग होचा मृत्यू यावर आधारित एक नाटक लिहिलं आहे, पण सेन्सॉर बोर्डानं यातील बहुतांश संवादांना कात्री लावली आहे. तरीही हे नाटक सादर केलं जातं. नाटकात पात्रं कोणतेही संवाद बोलत नाहीत, केवळ ओठांच्या हालचाली करत राहतात. तरीही ५/१८चा उठाव आणि डॉन्ग होचा मृत्यू प्रेक्षकांच्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचतो.

अशा अनेक प्रसंगातून लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी म्हणून कोरियन जनतेचा चाललेला प्रदीर्घ संघर्ष आपणापर्यंत पोहोचतो.

अशी ही कादंबरी कोरियात वादग्रस्त ठरली यात विशेष काही नाही. कादंबरीच्या लेखिका हॅन कांग या मूळच्या ग्वांगजू शहरातल्या आहेत. या कादंबरीतील शेवटचा निवेदक म्हणजे खुद्द लेखिकाच असू शकते. त्यामुळे २०१२मध्ये पार्क गुन-हे या राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भूतकाळातील दुखऱ्या जखमा भळभळणं सहज स्वाभाविक आहे. परिणामी ‘ह्युमन अ‍ॅक्टस’ ही कादंबरी हॅन कांग यांची ५/१८चा उठाव आणि त्यानंतरची जुलूमशाही व दडपशाही या साऱ्या ‘इनह्युमन अ‍ॅकट्स’बद्दलची एका सृजनशील कलाकाराची आणि संवेदनशील मनाची एक वैयक्तिक आणि राजकीय अशी उमटलेली स्वयंस्फूर्त प्रतिक्रिया आहे हे नक्कीच.

हॅन कांग यांची पहिली कादंबरी २०००मध्ये प्रकाशित झाली. २००७मध्ये प्रकाशित झालेली त्यांची ‘द व्हेजिटेरियन’ ही कादंबरी सुप्रसिद्ध असून तिच्या इंग्रजी अनुवादाला २०१६चा प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. ‘ह्युमन अ‍ॅक्टस’ही हॅन कांग यांची २०१४मध्ये कोरियन भाषेत प्रकाशित झालेली कादंबरी असून तिचा इंग्रजी अनुवाद २०१६मध्ये प्रकाशित झाला आहे. ‘द व्हेजिटेरियन’चा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या डेबोरा स्मिथ यांनीच ‘ह्युमन अ‍ॅक्टस’चाही अनुवाद केला आहे.

‘ह्युमन अ‍ॅक्टस’ - हॅन कांग,

इंग्रजी अनुवाद- डेबोरा स्मिथ

पोर्टोबेलो बुक्स, लंडन, २०१६ | पाने : २२४ | मूल्य : ५९९ रुपये.   

.................................................................................................................................................................

लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......