अजूनकाही
कुठलीही व्यक्ती समाजाशिवाय राहू शकत नाही. वेगवेगळी माणसे आपल्या आयुष्यात येतात. ती सर्वच आनंद देणारी असतात असे नाही. पण त्यांच्या जगण्यात महत्त्वाकांक्षा आणि उर्मी दडलेली असते. एका मोठ्या लेखकाला कुणीतरी फार सुरेख प्रश्न विचारला होता- ‘सर्वसाधारणपणे आपल्या पत्नीपेक्षा आपली मैत्रीण किंवा आपल्या पतीपेक्षा आपला मित्र आपली समस्या व्यवस्थित समजून घेतो, असे का वाटते?’ याचे उत्तर त्यांनी फार मार्मिकपणे दिले होते. ते म्हणाले होते- ‘त्याचं कारण म्हणजे मैत्रीण किंवा मित्र त्या समस्येशी संबंधित नसतात. फक्त समजून घेणे एवढेच त्यांचे काम असते.’
याचा अर्थ संबंध आला की, संघर्ष येतोच. तरीही अशी संबंध आलेली माणसं आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतात. अशा सर्वच व्यक्तींचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख प्रत्येकालाच शब्दरूप करता येतो असे नाही, पण एखादा मोठा कलावंत किंवा लेखक त्याच्या आयुष्यात आलेली माणसं, विशेषतः त्याला ‘भावलेली माणसं’ लालित्यपूर्ण रीतीनं उभी करण्याचा प्रयत्न करतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांचा ‘भावलेली माणसं’ हा लेखसंग्रह त्यापैकीच एक म्हणावा लागेल. डॉ. मुलाटे मराठी साहित्यविश्वाला नवीन नाहीत. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रं, ललितगद्य, एकांकिका व समीक्षा अशा विविध लेखनप्रकारांत विपुल लेखन केलं आहे. ‘विषवृक्षाच्या मुळ्या’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी. नुकतंच त्यांचं ‘झाकोळलेल्या वाटा’ हे आत्मकथनही प्रकाशित झालं आहे. वयाच्या पंचाहत्तरीतही ते लेखनमग्न आहेत.
या संग्रहात डॉ. मुलाटे यांनी त्यांना भावलेल्या तेरा व्यक्तिरेखांचा आलेख मांडलेला आहे. यात डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ.द.भि. कुलकर्णी, मनोहर तल्हार, पंडित नाथराव नेरळकर, लोकनेते केशवराव धोंडगे... अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वच त्यांच्या क्षेत्रांत नावाजलेल्या आहेत. त्यांची ओळख करून देताना डॉ. मुलाटे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, जीवनविषयक दृष्टिकोनाचा, त्यांनी केलेल्या कार्याचा आगळावेगळा परिचय आपल्या समोर ठेवतात.
डॉ. मुलाटे आपल्या मनोगतात म्हणतात, “ही आहेत मला ज्यांच्याविषयी नेहमीच पूज्यभाव, आदर आणि स्नेह जाणवत आला अशी काही माणसं. माणूस जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो, असं म्हणतात, ते खरंच आहे. परंतु माणूस या जगात येण्यापासून ते त्याने या जगाचा निरोप घेईपर्यंत त्याच्या काळात तो एकटा नसतो, हे सत्यही नाकारता येणार नाही.”
डॉ. मुलाटे यांना ही माणसं का भावली, याचा शोध घेताना लक्षात येतं की, ही माणसं सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, लातूरचे पहिले नगराध्यक्ष व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्याविषयी लिहिताना त्यांनी एका कार्यक्रमात मांडलेली भूमिका डॉ. मुलाटे आपल्यासमोर ठेवतात. डॉ. वाघमारे आपल्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात म्हणाले होते, “माझ्या जीवनात तीन उत्कट आसक्ती आहेत. ज्ञानार्जन, दु:खितांविषयीची अनुकंपा आणि समाजपरिवर्तन. समाज परिवर्तनाशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. प्रत्येक माणसाला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळायला हवी. त्याचा धर्म, त्याची जात, त्याचे जन्मस्थान, लिंग, भाषा, रंग अशा कोणत्याही गोष्टीचा अडथळा त्याच्या मार्गात येता कामा नये.”
यावर भाष्य करताना डॉ. मुलाटे म्हणतात, “त्यांच्या कार्याचे, जीवनदृष्टीचे, एकूण व्यक्तिमत्त्वाचे सार या त्यांच्या विधानात साठवलेले आहे.”
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाद्वारे मराठी दलित साहित्यात मौलिक योगदान देणारे डॉ. गंगाधर पानतावणे तसे सर्वांना परिचित आहेत. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे लेखन, त्यांचे विचार अनेकांच्या मनात घर करून आहेत. उपेक्षित लेखकांना व्यासपीठ तयार करून देण्याचं काम डॉ. गंगाधर पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकातून अनेक वर्षं केलं. या नियतकालिकानं मराठी साहित्याला खूप लेखक दिले. आज मराठी साहित्यात नावाजलेल्या अनेक लेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात या नियतकालिकातून केलेली आहे.
डॉ. पानतावणे यांच्याविषयी डॉ. मुलाटे म्हणतात, “माझ्या लक्षात आले की, दलित साहित्याची सैद्धान्तिक मांडणी सुरुवातीच्या काळात ज्या महनीय व्यक्ती करीत होत्या, त्यात पानतावणे सर आघाडीवर होते. बोलताना किंवा चर्चा करताना त्यांच्या विचारात कडवेपणा जाणवत नसे. दलितांच्या वाट्याला आलेले क्लेशदायी जीवन हे धार्मिक आणि वर्णव्यवस्था यातून आलेले आहे. त्यामुळे त्यांचा संघर्ष कोणा व्यक्तीच्या विरुद्धचा नाही, तो आहे त्याला कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध.”
या मांडणीतून पानतावणे सर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. विद्रोह, नकार, बंड ही दलित साहित्याची लक्षणं जरी असली तरी आक्रोश किंवा कडवेपणा येऊ न देता सम्यकपणे मानवतावादी विचारसरणी मांडण्याचं महत्त्वाचे काम पानतावणे सर करत होते.
प्रसिद्ध समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्याविषयीचा लेख तर मुळातून वाचण्यासारखा आहे. मृत्यूच्या दोन दिवस अगोदर लेखकासोबत साहित्याविषयी त्यांनी केलेली चर्चा अंतर्मुख करणारी आहे.
पंडित नाथराव नेरळकर हे संगीतातील मोठं नाव. त्यांच्याविषयी लिहिताना लेखक म्हणतात, “नाथरावांना जेवढी संगीताची आवड आहे, तेवढीच माणसांची आवड आहे. त्यांचा मित्रपरिवार त्यामुळे विशाल आहे. त्यांना मैत्रीसाठी जात-पात, प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक स्तर, वय काही आडवे येत नाही. गाण्याइतकाच गोष्टीवेल्हाळपणा आणि निरिच्छ प्रेम यामुळे त्यांच्याभोवती सतत माणसांचा गराडा असतो. मला तर ते जगतमित्रच वाटतात.”
कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर मानधनाची फारशी पर्वा न करणारं, परंतु आपल्या सदाबहार संगीतानं रसिकांची मनं जिंकणारं असं हे लोभस व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याविषयी अनेक प्रसंग लेखकाने नोंदवले आहेत.
यासोबतच मनोहर तल्हार आणि केशवराव धोंडगे यांचे लेख त्यांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
थोडक्यात उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणारा हा छोटेखानी चरित्रग्रंथच आहे. अर्थात या व्यक्तिमत्त्वांचा आलेख मांडताना लेखकाला काही मर्यादाही पडलेल्या आहेत, पण तरीही हे लेख दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहेत, हे नक्की.
‘भावलेली माणसं’ - डॉ. वासुदेव मुलाटे,
स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद,
मूल्य - २५० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.
shankarnvibhute@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment