‘स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा’ हा सूचीकोश ज्येष्ठ ख्रिस्ती-मराठी लेखक अनिल दहिवाडकर यांनी तयार केली आहे. उद्या त्याचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने या सूचीकोशाला संपादकांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
भारतात आलेले पहिले इंग्रज जेजुइट मिशनरी फादर थॉमस स्टीफन्स यांच्या १६१६ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ख्रिस्तपुराण’ या १०,९६२ ओव्या असलेल्या मराठी ओवीबद्ध प्रासादिक महाकाव्याने आधुनिक मराठी वाङ्मयाचा, तसेच मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचा इतिहास सुरू होतो.
या महाकाव्यापूर्वी १२९० (शके १२१२) ज्ञानेश्वर महाराजांनी अठरा अध्याय आणि नऊ हजार तेहतीस ओव्या असलेली, जीवनाचे तत्त्वज्ञान रसाळ भाषेत मांडणारी ‘ज्ञानेश्वरी’ मराठीत सिद्ध केली होती. ‘अमृतातेही पैजा जिंके’ असा त्यांनी मराठीचा गौरव केला. असाच मराठी भाषेचा गौरव फादर थॉमस स्टीफन्स यांनी ‘ख्रिस्तपुराणा’त शब्दबद्ध केला आहे. ते लिहितात-
जैसे हरळांमाजि रत्नकिळा |
कि रत्नांमाजि हिरा निळा ॥
तैसी भाषांमाजि चोखळा |
भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी |
कि परिमळांमाजि कस्तुरि ॥
तैसी भाषांमाजि साजरी |
मराठिया ॥
पक्षिआंमध्ये मयोरू |
वृक्षिआंमध्ये कल्पतरू ॥
भाषांमध्ये थोरू |
मराठियेसि ॥
तारांमध्ये बारा राशी |
सप्त वारांमाजि रवी शशी ॥
यां दीपिचेआं भाषांमधें तैसी |
बोली मराठिया ॥ (अध्याय १ : १२२ ते १२५)
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
१६१६ ते १० जुलै २०२१ पर्यंतच्या ४०५ वर्षांच्या कालखंडात जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे लेखन ख्रिस्ती साहित्यिकांनी केले आहे. धर्मप्रचारार्थ तर त्यांनी लिहिलेच, पण धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, खगोलविद्या, पदार्थविज्ञान, तर्कशास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्य, पंचांग, गणित, पशुशास्त्र, भूगोल, बखर, इतिहास, ज्योतिषशास्त्र, नीतिकथा, कुटुंबनियोजन, व्यसनाधीनता, स्त्रीशिक्षण, क्रमिक पुस्तके, न्याय व्यवस्था, बालसाहित्य, शिशुसंगोपन, उपदेशपर साहित्य, विधवाविवाह, संस्कृती, कौटुंबिक स्वास्थ्य, निबंध, काव्य, कादंबरी, नाटक, प्रहसन, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, प्रवासवर्णन, कामगार चळवळ, सामाजिक सुधारणा, देशभक्ती आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात काळानुरूप विषयांवर वैचारिक आणि ललित लेखनही केले.
या ख्रिस्ती लेखकांत शंभरहून अधिक पुस्तके लिहिणारे तीन शतकवीरसुद्धा आहेत. आचार्य स. ना. सूर्यवंशी यांनी २५०पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. लिहीत राहणे ही त्यांची जीवनसाधना होती; त्यांनी देवाशी तसा केलेला करार होता. बाबा पदमनजींच्या नावे १०३ मराठी आणि २ इंग्रजी पुस्तके आहेत. भा. कृ. उजगरे आणि कृ. भि. कुलकर्णी बाबांनी ११० पुस्तके लिहिली असे म्हणतात. बाबा पदमनजी ‘मराठी वाङ्मयाचे जनक’ वा ‘भीष्माचार्य’ आहेत असे रेव्ह.भा. कृ. उजगरे म्हणतात, तर गं. बा. सरदार म्हणतात, ‘‘त्यांच्याइतकी ग्रंथरचना त्या काळच्या दुसर्या कोणत्याही लेखकाच्या हातून झाली नाही.’ बोरीवलीचे जोसेफ तुस्कानो यांनी पुस्तकांची शंभरी पार करून अजूनही ते लिहीत आहेत. ते व्यवसायाने शास्त्रज्ञ असून वृत्तीने लेखक आहेत.
मराठी साहित्यातील अनेक वाङ्मयप्रकारांत प्रथम निर्मितीचा मान ख्रिस्ती लेखकांकडे जातो. याबाबत प्रसिद्ध संशोधक अ. का. प्रियोळकर म्हणतात, ‘‘एकोणिसाव्या शतकात मराठी गद्याच्या बाबतीत मात्र युरोपियन लोकांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. मोल्सवर्थ याने मराठी-इंग्रजी कोशाची १८३१मध्ये रचना करून मराठी भाषेचा पायाच रचला आहे असे म्हणावयास हरकत नाही. अशासारखा कोश कोणत्याही इतर देशी भाषेत त्या काळी झाला नाही. अद्यापि या कोशाचे महत्त्व कमी झालेले नाही. कँडीचा १८४७मधील इंग्रजी-मराठी शब्दकोशही उपयुक्त आहेच, परंतु कँडीने मराठी भाषेला नियमबद्धता व एकरूपता आणून दिली ही त्याची मोठीच कामगिरी होय. जांभेकर, दादोबा पांडुरंग यांच्यासारख्यांच्याही मराठी लिखाणातील चुका दाखवून त्यांना कँडीने एकेकाळी सळो की पळो करून सोडले होते.’’
कोशवाङ्मयाचा तसाच व्याकरणाचा पाया या ख्रिस्ती लोकांनी घातला. मराठीच काय, पण भारतातील बहुतेक प्रत्येक भाषेची आरंभीची व्याकरणे व कोश यांची निर्मिती विदेशी लेखकांकडून झालेली दिसते.
ललित वाङ्मयात पहिल्या मराठी निबंधाचे ‘कुटुंबप्रवर्तननीति’ (१८३५)चे कर्तृत्व मिसेस फरार यांच्याकडे जाते. मराठीतील पहिल्या कादंबरीचा मान बाबा पदमनजींच्या ‘यमुना पर्यटन’ या १८५७ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीला जातो.
या सूचीत गेल्या ४०५ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या ख्रिस्ती मराठी लेखकांचा आणि त्यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. तथापि फादर थॉमस स्टीफन्स यांच्या ‘ख्रिस्तपुराण’नंतर मधल्या जवळ जवळ १८९ वर्षांच्या कालखंडात ख्रिस्ती साहित्यनिर्मिती मंदावलेली दिसते. रेव्ह. विल्यम केरी यांनी १८०५मध्ये बायबलच्या नव्या करारातील ‘मॅथ्यूचे शुभवर्तमान’ मराठीत भाषांतरित करून सेरामपूर (कोलकाता) येथे प्रसिद्ध केले. मराठीत प्रसिद्ध होणारे तसेच महाराष्ट्राबाहेर प्रसिद्ध होणारे हे पहिले मराठी पुस्तक. त्यानंतर ख्रिस्ती लेखकांची ग्रंथनिर्मिती बहरली. अनेक वाङ्मयप्रकार प्रथम प्रकाशित करण्याचे श्रेयही या लेखकांना जाते. त्यामुळे आजच्या मराठी सारस्वताचा पाया ख्रिस्ती लेखकांनी घातला असे विधान केले, तर ते धाडसाचे वा विपर्यस्त ठरणार नाही. नंतर १८१७मध्ये अमेरिकन मराठी मिशनने रेव्ह. गॉर्डन हॉलचे ‘स्क्रीप्चर ट्रॅक्ट’ (Scripture Tract) मराठीत लिहून प्रसिद्ध केले. महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारे हे पहिले मराठी पुस्तक.
ख्रिस्ती साहित्याच्या या प्रवासात ‘बायबल’च्या भाषांतराचा विशेष उल्लेख करावा लागतो. बायबल सोसायटी ऑफ इंडिया - बंगळुरू, वर्ल्ड बायबल ट्रान्सलेटर सेंटर - बंगळुरू, इंडिया बायबल लिटरेचर सेंटर - चेन्नई, जीवनदर्शन केंद्र - वसई, जीवनी वचन प्रकाशन - पुणे, ख्रिस्ती साहित्य प्रसारक - पुणे, लाईफ पब्लिशर्स - यु.एस.ए. या संस्थांनी ‘मराठी बायबल’ प्रकाशित केले आहे. ही संस्थात्मक पातळीवरची बायबल प्रकाशने आहेत.
तथापि काही व्यक्तींनी स्वतंत्ररीत्या बायबलची भाषांतरे केली आहेत. पंडिता रमाबाई (पवित्र शास्त्र : जुना व नवा करार, १९२४); रावबहादूर बा. ना. आठवले (नवा करार : पूर्वार्ध १९२९, संपूर्ण नवा करार, १९३१); रेव्ह. विल्यम मिचेल (संत मत्तय, १८३०); येशूदास, विन्यास आणि बारांको (सुवार्ता आणि प्रेषितांची कृत्ये, १९५९); येशूदास (प्रेषितांची पत्रे आणि प्रकटीकरण, १९६७, संत मत्तय शुभवर्तमान, संत मार्कलिखित शुभवर्तमान, संत लुखलिखित शुभवर्तमान); विन्यास आणि बारांको (संत योहानलिखित शुभवर्तमान); फादर फ्रान्सिस दिब्रिटो (सुबोध बायबल, २०१०); अनिल दहिवाडकर (बायबल : देवाचा पवित्र शब्द, १० जुलै २०१२).
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मराठीत लिहिणारे हे स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती साहित्यिक समाजातील विविध थरांतून आले आहेत. या साहित्यिकांनी मराठी भाषेवर उदंड प्रेम केले आहे, तसेच मराठी मातीवरही प्रेम केले आहे. ज्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे असे बरेच काही मराठी ख्रिस्ती साहित्यात घडले आहे. रेव्ह. गॉर्डन हॉल यांच्या ‘लेकरांची पहिली पोथी’ या १८१८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या ५० आवृत्त्या निघाल्या आणि दहा लाखांहून अधिक प्रती छापल्या गेल्या.
फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ‘नाही मी एकला’ हे आत्मचरित्र १७ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रकाशित झाले आणि पहिली आवृत्ती त्याच दिवशी संपली आणि अवघ्या पाच दिवसांत म्हणजे २२ फेब्रुवारी २०१९ रोजी दुसरी आवृत्ती निघाली.
प्रकाशनपूर्व सवलत ही आज नवीन गोष्ट नाही; पण १८५४ साली बाबा पदमनजी यांनी ‘व्यभिचार निषेधक बोध’ या पुस्तकाला प्रकाशनपूर्व सवलत दिल्याची नोंद आढळते. त्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व किंमत ५ आणे, तर प्रकाशनोत्तर किंमत ६ आणे ठेवली होती.
‘बायबल’च्या मराठी भाषांतराची सुरुवात विल्यम केरी यांच्या ‘मॅथ्यूचे शुभवर्तमान’ (Matthew’s Gospel in Mahratta)ने झाली. तथापि मराठी भाषेत संपूर्ण बायबल १ मार्च १८४७ साली रेव्ह. डेव्हिड ओ. अॅलन यांनी प्रसिद्ध केले.
त्यानंतर मराठीत बायबलच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, पण अनिल दहिवाडकर यांचे ‘बायबल : देवाचा पवित्र शब्द’ हे मराठीतील सगळ्यात मोठे (२ खंड, २००८ पृष्ठे), सर्वांत वजनदार (वजन सहा किलो) आणि सगळ्यांत महाग (किंमत रु. २७००) बायबल आहे.
स्थानिक भाषेत बायबलचे मुळाबरहुकूम भाषांतर करता यावे यासाठी ग्रीक आणि हिब्रू ही भाषा शिकणार्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव व्यक्ती आहेत.
‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य रेव्ह. ना. वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक आणि देवदत्त टिळक या पिता, माता आणि पुत्र यांनी लिहिलेले जगातील एकमेव महाकाव्य आहे.
ख्रिस्ती साहित्याचा आणि ख्रिस्ती लेखकांच्या साहित्यिक कामगिरीचा समग्र आणि एवढा अगदी तपशीलवार इतिहास मराठी वाङ्मयाच्या इतिहास ग्रंथात येणे शक्य नाही, म्हणून प्रस्तुत ग्रंथाचा प्रपंच.
या कालावधीत बाराशेपेक्षा अधिक स्वदेशी-विदेशी ख्रिस्ती लेखकांनी जवळपास पाच हजार ग्रंथ लिहिले आहेत. तपशीलवार सांगायचे तर या सूचीत १२२८ ख्रिस्ती लेखकांच्या ४७९५ ग्रंथांचा समावेश आहे. यात ग्रंथकर्त्याचा नामनिर्देश नसलेली ७९९ पुस्तके आहेत, तर ५४७ विदेशी ख्रिस्ती लेखकांनी लिहिलेल्या १२७९ आणि स्वदेशी ख्रिस्ती लेखकांनी लिहिलेल्या २७१७ पुस्तकांचा समावेश आहे. या सूचीत ख्रिस्ती मराठी नियतकालिकांतून लेखन करणार्या पण ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा ख्रिस्ती लेखकांचा समावेश करता आला नाही. कारण ख्रिस्ती नियतकालिके प्रसिद्ध व्हायला लागून (‘ज्ञानोदय’, १८४२) १७९ वर्षे होत आहेत. या नियतकालिकांची संख्याही शतकाहून अधिक आहे आणि त्यातही काही नियतकालिके शतकाहून अधिक वर्षे प्रकाशित होत आहेत. त्यामुळे यातून लेखन करणार्या ख्रिस्ती लेखकांची संख्या शेकड्यांत मोजावी लागेल. आम्ही १९९२ साली ख्रिस्ती साहित्य प्रसारक, पुणेच्या वतीने ‘बृहन्महाराष्ट्र ख्रिस्ती नामसूची आणि दैनंदिनी’ प्रकाशित केली होती. त्यात २०० लेखकांची नावे आणि पत्ते आहेत.
१९६१ साली साहित्य अकादमीने ‘‘Who’s Who of Indian Writers’’ हा भारतीय लेखकांचा परिचय कोश प्रसिद्ध केला होता. मराठीतही श्री. गं.दे. खानोलकर यांनी ‘आधुनिक मराठी वाङ्मय सेवक’ या नावाने सात खंड (आठ पुस्तके) प्रकाशित केले. या पुस्तकांत ब्रिटिश अंमल सुरू झाल्यापासून मराठी वाङ्मयाची ज्यांनी संस्मरणीय सेवा केली, अशा दिवंगत आणि विद्यमान वाङ्मय सेवकांचा विस्तृत परिचय करून दिला आहे.
१९८६मध्ये श्री. अनंत लक्ष्मण जोशी यांनी विद्यमान लेखकांचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय करून देणारा ‘मराठी सारस्वत’ हा ग्रंथ अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केला. या ग्रंथाचा पहिला खंड १९८६ साली व दुसरा खंड १९९२ साली प्रकाशित झाला.
प्रस्तुत ग्रंथामध्ये ज्यांची कुणी दखल घेतली नाही वा घेणारही नाही अशा ख्रिस्ती लेखकांची नोंद घेतली आहे. यासाठी माहिती संकलित करण्याचे कार्य आम्ही १९७६पासून आरंभिले होते.
मिरज येथे बायसिंगर मेमोरियल लायब्ररीचे संचालक म्हणून (डिसेंबर १९७० ते मार्च १९८१) कार्यरत असताना आम्ही मिरज येथे ख्रिस्ती साहित्य संघाची स्थापना केली. या संघाच्या वतीने १९७६ साली आम्ही विद्यमान साहित्यिकांचा परिचय कोश तयार करण्याचे कार्य हाती घेतले. त्यासाठी एक फॉर्म/अर्ज तयार करून लेखकांकडून त्या फॉर्ममध्ये माहिती मागविली. त्या वेळी आम्हाला ४४ लेखकांनी त्यांची माहिती पाठविली. ती माहिती ग्रंथसूचीत घेतली आहे. यातील काही लेखक आज हयात नाहीत, तर काही लेखकांनी मराठी साहित्यविश्वात फार मोठे नाव कमावले आहे. नावच घ्यायचे झाले तर फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा. डॉ. सुभाष पाटील आणि डॉ. अनुपमा उजगरे यांचे घ्यावे लागेल. या तिघांनी मराठी साहित्यात ख्रिस्ती लेखकांचा जो झेंडा रोवला, त्याचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. फादर दिब्रिटो उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी २०२०मध्ये भरलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले आणि प्रा. डॉ. सुभाष पाटील आणि डॉ. अनुपमा उजगरे एक व्यासंगी साहित्यिक म्हणून ज्ञात आहेत.
त्यानंतर १९७७ साली जयसिंगपूरचे प्रा. डॉ.आर. टी. अक्कोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘अमेरिकन मराठी मिशनने केलेली मराठीची सेवा’ या विषयात पीएच.डी.साठी संशोधन सुरू केले. त्यानिमित्ताने अमेरिकन मराठी मिशनच्या केंद्रांना आणि लेखकांना भेटी देऊन पुस्तकांची माहिती गोळा करू लागलो. या ग्रंथसंशोधन यात्रेत २०० लेखकांच्या हजारभर पुस्तकांची माहिती माझ्या हाती लागली. ती माहिती या ग्रंथसूचीत घेतली आहे.
तथापि एप्रिल १९८१ साली आम्ही मिरज सोडून पुण्याला ख्रिस्ती साहित्य प्रसारकचे संचालक आणि कार्यकारी विश्वस्त म्हणून रुजू झालो आणि कामाच्या धबडग्यामुळे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होऊन मधली ४० वर्षे हा प्रकल्प थंड बासनात पडून राहिला. त्यानंतर सप्टेंबर २०१९मध्ये ख्रिस्ती लेखकांचा परिचय कोश आणि ग्रंथसंपदा हाती असलेल्या माहितीत भर टाकून प्रसिद्ध करावी या कल्पनेने उचल खाल्ली आणि लेखकांना व प्रकाशकांना त्यांची आणि त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची माहिती पाठवण्याची विनंती केली.
ही माहिती गोळा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की, काही लेखकांकडे आणि प्रकाशकांकडेही त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची माहिती उपलब्ध नाही. माहिती गोळा करण्याच्या या स्रोताशिवाय नियतकालिकांत प्रसिद्ध होणार्या पुस्तकांच्या जाहिराती, ग्रंथ परीक्षणे, ग्रंथ परिचय, पुस्तकांच्या मलपृष्ठांवर दिलेला लेखकाचा परिचय, ग्रंथांची यादी इत्यादी साधनांतूनही माहिती मधमाशीने मध गोळा करावा तशी गोळा केली आहे.
याशिवाय ज्या कोणाकडे पुस्तकांचा संग्रह आहे, अशा ग्रंथप्रेमींनाही विनंती करून त्यांच्याकडून ख्रिस्ती लेखकांच्या प्रकाशित ग्रंथांची माहिती घेतली. त्यांचेही चांगले सहकार्य मिळाले.
एकही ख्रिस्ती लेखक वा ख्रिस्ती लेखकाचे एकही पुस्तक या सूचीतून गळू नये, असा आदर्श ही सूची संकलित करताना डोळ्यांसमोर ठेवला होता. तथापि आदर्श हे आदर्शच असतात आणि वास्तव व आदर्श यांत तफावत असते, तशी ती याही सूचीत आहे.
१८०५ ते १८५३ या अर्धशतकाच्या काळात विदेशी ख्रिस्ती लेखकांनीच मराठीत लेखन केलेले दिसते. १८५३पासून एतद्देशीय ख्रिस्ती लेखक लिहू लागले. १८५३ साली बाबा पदमनजी यांचे ‘हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध’ हे पुस्तक एतद्देशीय ख्रिस्ती लेखकाचे पहिले पुस्तक आहे. रेव्ह. रामकृष्ण मोडक, शाहू दाजी कुकडे, नारायण शेषाद्री हे आद्य एतद्देशीय ख्रिस्ती लेखक आहेत.
ही सूची खालील तीन विभागात विभागली आहे.
विभाग एक - लेखक, संपादक वा अनुवादक यांपैकी कोणाचेही नाव पुस्तकावर नसलेले ग्रंथ.
विभाग दोन - विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा.
विभाग तीन - स्वदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा.
या सूचीची मांडणी अकारविल्हेनुसार केली आहे.
काही लेखक टोपण नावाने लिहितात. अशा लेखकांच्या बाबतीत लेखकाचे खरे नाव लिहून त्याच्यापुढे कंसात टोपणनाव दिले आहे. काही लेखक स्वत:च्या खर्या नावापेक्षा इतर नावाने परिचित असतात. त्यांचा उल्लेख परिचित नावाने केलेला आहे.
या माहितीनंतर लेखकाचा परिचय दिला आहे. त्याला मिळालेले पुरस्कार आणि मान-सन्मान याचीही माहिती दिली आहे. त्यामुळे त्याच्या साहित्यासोबतच त्याचे व्यक्तिमत्त्वही कळेल. या माहितीसोबतच लेखकाचा पत्ता, मोबाईल नं. आणि ईमेल आयडी दिला आहे.
याच्या खाली त्याने लिहिलेल्या पुस्तकांची सूची दिली आहे. एकाच वाङ्मयप्रकारची एखाद्या लेखकाने अनेक पुस्तके लिहिली असल्यास त्या वाङ्मयप्रकाराचे नाव देऊन त्याच्याखाली पुस्तकांची यादी दिली आहे.
पुस्तकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, वर्ष, आवृत्ती, पृष्ठसंख्या, किंमत आणि त्या खाली ग्रंथपरिचय या क्रमाने माहिती दिली आहे. प्रथमावृत्तीच्या बाबतीत आवृत्तीचा उल्लेख केलेला नाही. काही वेळेस प्रथम आवृत्ती एका प्रकाशकाने तर नंतरची आवृत्ती वा आवृत्त्या अन्य प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या असतात. त्याचा तसा स्पष्ट उल्लेख केला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
चार शतकांतल्या स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती मराठी लेखकांचा परिचय आणि त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा, यांची एकत्रित माहिती देणारा हा पहिलाच ग्रंथ आहे.
अभ्यासकांना या ग्रंथाच्या आधारे मराठी वाङ्मयाच्या वाटचालीचा आणि त्यात ख्रिस्ती लेखकांच्या वाट्याचा वेध घेता येईल. मराठी साहित्याचा विकास आणि वैभव तसेच मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे स्वरूप व कार्य आणि त्यांचे योगदान याचेही मूल्यमापन करता येईल.
लेखकांना, प्रकाशकांना, साहित्योपासकांना आणि वाचकांना एक उपयुक्त संदर्भग्रंथ देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आम्ही केले आहेत. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन शिंपल्यात ख्रिस्ती लेखकांनी आपले ओंजळभर मोती टाकले आहेत आणि ही ओंजळ प्रवाही आहे.
‘स्वदेशी आणि विदेशी ख्रिस्ती लेखकांची मराठी ग्रंथसंपदा’ - अनिल दहिवाडकर
मूल्य - ७५० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sam P
Sun , 22 August 2021
श्री अनिल दहिवाडकरजी, नमस्कार. अथक परिश्रमाने आणि अनेक वर्षांची प्रचंड मेहनत करून, माहिती संकलित करून आपण हा संदर्भग्रंथ लिहिलात ही केवळ ख्रिस्ती मराठी साहित्यावरच नाही, तर समग्र मराठी साहित्यप्रेमी, समीक्षक, अभ्यासक ह्याच्यावर तुम्ही अनंत उपकार केले आहेत. हे एक अमूल्य योगदान आहे. त्याबद्दल धन्यवाद आणि मनःपूर्वक अभिनंदन! हा संदर्भग्रंथ ऑनलाईन खरेदसाठी उपलब्ध आहे का? धन्यवाद!