श्याम देशपांडे नावाचा बुकमार्क...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
प्रवीण बर्दापूरकर  
  • ग्रंथप्रसारक श्याम देशपांडे
  • Sat , 21 August 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो श्याम देशपांडे Shyam Deshpande राजहंस प्रकाशन Rajhans Prakashan धनंजय चिंचोलीकर Dhananjay Chincholikar नरेंद्र चपळगावकर Narendra Chapalgaonkar सुधीर रसाळ Sudhir Rasal

प्रतिभावंत नाटककार आणि ललितलेखक महेश एलकुंचवार यांच्या ‘नेक्रोपोलीस’ या लेखात ‘to join the majority’ हा शब्दप्रयोग वाचनात आला. ‘मरणे’ असा त्याचा अर्थ. या विश्वात हयात  असणाऱ्यांपेक्षा मृतांची (मृतात्म्यांची म्हटलं तरी चालेल) संख्या जास्त असते, म्हणून मरणाऱ्याने जिथे  बहुसंख्य आहेत, त्या जगात प्रवेश केला, असं मानलं जातं.

याचा अर्थ ‘स्वामी’ श्याम देशपांडे खूप लोकांच्या सहवासात गेला असून तिथेही तो ग्रंथप्रसाराचं काम आजवरच्या उत्साह, निष्ठा आणि निरलसपणे चालू ठेवेल यात शंका नाही, अशी स्वत:च्या मनाची समजूत घातली म्हणून काही त्याच्या मृत्यूचं समर्थन होणार नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

माझ्या साडेसहापेक्षा जास्त दशकांच्या जगण्यात इतका सज्जन, तसंच निरपेक्ष वृत्तीचा माणूस पाहण्यात आलेला नाही आणि आयुष्याच्या सांजपर्वातही असा दुसरा ‘स्वामी’ श्याम देशपांडे भेटणार नाही, ही जाणीव अखेरचा श्वास घेईपर्यंत मन कुरतडत राहील.

हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा श्यामच्या निधनाला आठ दिवस झालेले असतील. श्याम कोण होता? तर तो काही ख्यातकीर्त लेखक, कलावंत, गायक, गेला बाजार काळे धन जमा करून दानशूर बनलेला धनवान किंवा बाजारू राजकीय नेताही नव्हता, तर तो एक मध्यमवर्गीय, सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी देऊन खाणारा; साधं, सरळ जीवन जगणारा, पण मनात कुणाच्याहीविषयी द्वेष, आकस, सूडबुद्धी नसणारा, कुणाशीही स्पर्धा नसणारा आणि सामाजिक जाणिवांच्या बाबतीत एक हळवा माणूस होता.

हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं म्हणजे, तो अव्यभिचारी ग्रंथप्रेमी होता. ग्रंथप्रसार हा त्याचा ध्यास आणि वाचनसंस्कृती वैपुल्याने फुलत जावी, हा त्याचा श्वास होता. वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी श्याम एक सळसळती चळवळ झालेला होता. त्यात तो आकंठ बुडालेला होता. सांगा, इतकी सारी गुणवैशिष्ट्ये असणारा दुसरा कुणी माणूस पाहण्यात आहे?

गेल्या चाळीसपेक्षा जास्त वर्षांचं आमचं मैत्र श्यामने १४ ऑगस्टला एकतर्फी संपुष्टात आणलं.

माझ्याइतकीच त्याची माझी बेगम मंगलाशी मैत्री होती आणि तिच्या मृत्यूशी सुरू असलेल्या प्रदीर्घ अशा प्रवासात आमच्या कुटुंबियांच्या पाठी श्याम मूकपणे व ठामपणे उभा होता.

त्याच्याशी माझं अजून एक नातं आहे ते लेखनाचं. मी पत्रकारितेत आलो १९७७ साली. राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आलो, ते माधवराव गडकरींमुळे १९८४ साली आणि मग राजकीय वृत्तसंकलनाच्या त्या अवाढव्य उलाढालीत आकंठ बुडालो. मी त्याबाहेर यावं म्हणजे, बातमीच्या बाहेर यावं आणि अन्य लिखाण करावं, यासाठी बेगम आणि श्याम यांनी (वैताग यावा इतकं) टुमणं लावलं. त्यासाठी क्वचित माझा त्रागाही सहन केला. या दोघांमुळे मी लिहिता झालो, त्यालाही आता सुमारे दोन दशकं होताहेत. माझ्या लेखनाच्या निर्मितीचे सूत्रधार असलेले बेगम मंगला आणि श्याम हे दोघंही आता या जगात नाहीत...

श्यामच्या अविश्वसनीय मृत्यूची बातमी आल्यावर साहजिकच मन सैरभैर झालं, अगदी नकळत अश्रू अनावर झाले. हे दोस्तयार डॉ. मिलिंद देशपांडे चांगलं ओळखून होता, म्हणूनच १४ ऑगस्टची संध्याकाळ आणि रात्र मी एकटं राहू नये, असा त्याचा स्वाभाविक आग्रह होता. मी त्याला म्हटलं, ‘अशात हा सांजवेळीचा एकांतही सवयीचा झाला आहे. कारण मी एकटा नसतो. बेगम असो वा श्याम त्यांच्यासह जगणाऱ्याची लय बिघडवणाऱ्या अनेकांच्या अनेक जीवाभावाच्या आठवणी सोबतीला असतात. कविवर्य ग्रेस यांच्या शैलीत सांगायचं तर ‘छिनाल संध्याकाळी गतकातर आठवणींचे पेटलेले मंद दिवे शोकांच्या उदासीवर मंद फुंकर घालतात.’

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

श्यामविषयी गेल्या वर्षी २० ऑक्टोबर २०१९ रोजी मी लिहिलं होतं. त्यात आमच्या मैत्री-पर्वाबद्दल आलेलं आहे. (ते सोबत जशाचं तसं देतच आहे.)

२० ऑक्टोबर २०१९ रोजी लिहिलेला मजकूर

“चांगली माणसं हृदयाच्या गाभाऱ्यात आणि चांगली पुस्तकं स्मरणात ठेवावीत असं माझं म्हणणं आणि वागणंही असतं. मात्र या दोन्ही ठिकाणी साठवून ठेवावी अशी माणसं कमी असतात. त्यात एक स्वामी उपाख्य श्याम उपाख्य श्यामराव देशपांडे, ‘राजहंस’वाले , औरंगाबादकर आहे. औरंगाबादला श्याम आणि प्राचीन दोस्त निशिकांत भालेराव यांनी एक अनौपचारिक अशा स्वरूपाचा संडे क्लब सुरू केलेला आहे. काही पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक रविवारी सकाळी भेटतात आणि कधी गंभीर तर कधी फुटकळ चर्चा करतात. कधी औरंगाबादच्या भेटीवर आलेल्याला पाहुण्याला बोलावलं जातं. दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाल्यावर मीही या क्लबचा कथित सदस्य झालो. संडे क्लबच्या जागेला मी ‘मठ’ म्हणतो. त्या मठाचे स्वामी म्हणून श्याम देशपांडे याचा उल्लेख करायला सुरुवात केली. आता या मठाचं श्यामराव देशपांडे यांचं ‘स्वामी’पद सर्वमान्य झालेलं आहे!

स्मरणांच्या झरोक्यातून डोकावत सांगायचं तर, उंचीला साजेसा शेलाटा बांधा आणि गौरवर्ण असलेल्या श्यामची माझी पहिली भेट अंबाजोगाईला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाली, म्हणजे त्याला आता साडेतीनवर दशकं उलटून गेली. याच संमेलनात कोलकात्याहून आलेल्या वीणा आलासे, पुण्याहूनआलेले  ह. मो. मराठे, नागपूरहून आलेले प्रकाश देशपांडे आणि मी असे चौघं, कानात वारं शिरल्यासारखं हुंदडलो. नंतर त्यात श्यामही सहभागी झाला. तेव्हा नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मी मुख्य वार्ताहर होतो आणि रविवार पुरवणीसाठी (पुढे माझी पत्नी झालेली) मंगला विंचुर्णे हिला साहाय्य करत असे. आमच्या ‘साकवि’ (साहित्य, कला, विज्ञान यांचं लघुरूप) पुरवणीसाठी तेव्हा विदर्भातले ज्येष्ठ कवी, यवतमाळ जिल्ह्यातील पोहंडूळचे नीलकंठ देशपांडे लेखन करत. ते श्यामचे मोठे भाऊ, हे कळल्यावर श्यामशी जवळीक निर्माण झाली आणि उत्तरोत्तर ती वाढतच गेली. श्याम माझ्यापेक्षा अडीच वर्षांनी मोठा, पण या जवळीकीमुळे आम्ही लगेच ‘अरे-तुरे’वर आलो.

पत्रकार, लेखक, ग्रंथ परिचयक, वाचक, संघटक आणि मित्र अशा विविध रूपांत वावरणाऱ्या, तसंच याही वयात देखणं हस्ताक्षर असलेल्या श्यामनं वाणिज्य शाखेत पदवी घेतली. ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम केला. औरंगाबादच्या सुरुवातीच्या काळात एका संस्थेत त्याला खरं तर ‘ग्रंथपाल-संशोधन सहायक’ अशी चांगली नोकरीही होती. पण श्याम म्हणजे पुस्तकं तन आणि मनात भिनलेला माणूस आहे. अतिशय चांगला वाचक असणाऱ्या या माणसाला पुस्तकांविषयी ममत्व आणि योग्य पुस्तक योग्य वाचकापर्यंत पोहोचवण्याची उर्मी (याला पर्यायी शब्द ‘खाज’ असाही असू शकतो!) होती. त्या उर्मीपोटी श्यामरावनं औरंगाबादला तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या विद्या बुक्समधे काम सुरू केलं. नंतर श्यामराव ‘राजहंस’च्या औरंगाबाद शाखेत रुजू झाले, त्याला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. वृत्तीनं लाघवी, भरपूर वाचन आणि पुस्तक व संदर्भ देण्यासाठी (अगदी झोपेतही) तत्पर असल्यानं मराठी साहित्य क्षेत्राच्या लेखन, मुद्रितशोधन, मुद्रण, वितरण आणि वाचक अशा अशा क्षेत्रात श्यामनं या काळात अगणित माणसं महाराष्ट्रभर जोडली. महाराष्ट्रभरातले हे लहान-थोर सर्व हीच श्यामरावांची स्थावर मालमत्ता आहे.

श्यामनं केवळ माणसं जोडली नाहीत, तर अनेकांची वाचनभूक (अनेकदा पदरमोड करून) भागवली. वाचक आणि पुस्तक यांच्यातला श्याम दुवा आहे त्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नाही, असा हा दुवा बळकट आहे. मराठीत कुणाचं नवीन कोणतं पुस्तकं आलंय, त्याची मांडणी कशी आहे, शैली आणि आशयाच्या बाबतीत ते किती दर्जेदार आहे आणि ते केवळ वाचलं पाहिजे की, विकत घेऊन वाचून संग्रहात ठेवलं पाहिजे, हेच विचार आमच्या श्याम मनात आणि बोलण्यातही कायम भुंगा घालत असतात. मराठी पुस्तकांच्या बाबतीत श्याम संदर्भाच्या शोधात नसतो, तर संदर्भ मागणाऱ्यांच्या शोधात असतो. वाङ्मयीन व्यवहाराच्या समीक्षकी थाटात सांगायचं तर, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचा ध्यास घेतलेलं झपाटलेलं झाडं म्हणजे ‘स्वामी’ श्याम देशपांडे नावाचा माणूस आहे. या झाडाला असलेली पानं, आलेली फुलं आणि लागलेली फळं शब्दांचीच आहेत!

श्यामबद्दल ‘माझी वाचनभूक भागवणारा’ असं म्हणणारे महाराष्ट्रात दोन-चार खंडीभर तर नक्कीच सापडतील! या आघाडीवर श्याम कायम दात्याच्या भूमिकेत आहे. हा श्याम देशपांडे नावाचा माणूस जर भेटला नसता, तर कदाचित माझीही वाचनभूक आणि तहानही भागली नसती. मी पडलो जन्मजात भटक्या माणूस. श्याम औरंगाबादेत तळ ठोकून, तर पत्रकारितेच्या निमित्तानं मी नागपूर, मुंबई, दिल्ली, औरंगाबाद असे पडाव टाकले. त्याआधी पणजी, कोल्हापूर, सातारा आणि चिपळूणच्या वेशीत मुक्काम झालेले होते ते वेगळे. पत्रकारिता आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्तानं मी सतत देश आणि परदेशात फिरत राहिलो, तरी श्याम नावाच्या झाडाच्या सावलीत माझं वाचन आणि पुस्तक खरेदी सुरूच राहिली.

व्याख्यान  किंवा लेखनासाठी मराठी साहित्यविषयक कोणताही संदर्भ अडला किंवा कोणतंही पुस्तक हवं असलं की, शोध घेण्याची जबाबदारी श्यामरावांच्या ओंजळीत टाकून मी पुढचा मुक्काम गाठायला  मोकळा होतो. नागपूर, दिल्ली, मुंबईत की, आता औरंगाबादेत असो, आमच्याकडच्या अनेक पुस्तकांचं आगमन श्यामरावांच्या करवी झालेलं आहे. या बाबतीत श्याम किती उदार असावा, तर त्यानं मला उधारीवर, हप्तेवारीवर आणि घरपोच पुस्तक पोहोचवली. अमेरिकेत सॅनहोजे  इथं झालेल्या पहिल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनातल्या एका कार्यक्रमात मी मुख्य वक्ता होतो. त्यादिवशी मला एक संदर्भ आठवेचना. मग मी श्यामरावला तिथूनच सेलफोनमधून शरण गेलो; संदर्भ लगेच मिळाला.

अशीच आणखी एक आठवण. त्या दिवशी मी व्हिएन्नाला होतो आणि तीन दिवसांनी परतल्यावर ताबडतोब रविवारसाठी एक लेख द्यायचा होता. मजकूर डोक्यात घोळत होता. त्या लेखात ‘कोट’ करण्यासाठी मला रॉय किणीकर यांच्या ‘उत्तररात्र’मधल्या काही ओळी हव्या होत्या आणि आमच्याकडचा तो संग्रह तर गहाळ झालेला होता. श्यामरावना हाक मारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी नागपूरला परतण्याच्या आत ‘उत्तररात्र’चं श्याममार्गे आमच्या घरी आगमन झालेलं होतं.  श्यामरावांशी संबंधित संदर्भ आणि पुस्तकांच्या अशा, माझ्याच नाही तर अनेकांच्या अनेक आठवणी आहेत.

राजकीय वृत्तसंकलनाच्या मोहमयी जगात गेलो आणि माझ्यातला कथालेखक कायमचा झोपी गेला. मी कथालेखन करायचो ही एक दंतकथा असल्याचं, माझं ते लेखन वाचलेले  दोस्तयार म्हणू लागलेले होते! सलग १८-२० वर्षं मी बातमी आणि राजकीय लेखनाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही लिहिलं नाही. यातून काहीशी उसंत मिळून मे १९९८ ते मार्च २००३ या काळात मी औरंगाबादला होतो आणि महत्त्वाचं म्हणजे निवांत होतो. निर्माण झालेला वाचनाचा अनुशेष भरून काढत होतो. या काळात ढूशा मारून माझ्यातला लेखक बेगम मंगला आणि श्याम या दोघांनी जागा केला. या दोघांनी या काळात लेखनासाठी माझा जीव ‘उभं पिसं आणि नांदू कसं’ केला नसता तर ‘डायरी’, ‘नोंदी डायरी नंतरच्या’, ‘दिवस असे की...’ या पुस्तकांतील मजकुराचं लेखन झालंच नसतं. नंतरच्याही माझ्या प्रत्येक लेखन प्रकल्पात या दोघांचा सहभाग आहेच.

लवकर ‘एक्साईट’ होणारा श्याम देशपांडे माणूस म्हणूनही खूप भला, साधा आणि कांहीसा भाबडा आहे. तो भला असणं हे महत्त्वाचं आहे आणि तसं असणं त्याला शोभतंही. कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणं ही त्याची कायम तेवती खासीयत आहे. माणूस म्हणूनही तो आमच्याशी भावनात्मक ओढीनं ‘रिलेट’ झालेला आहे. आमच्याकडच्या प्रत्येक कार्यक्रमाचा तो मूक आणि सक्रीय साक्षीदार असतो. बेगम मंगलाचं स्वास्थ्य बिघडल्यापासून मी ‘संडे क्लब’ला जाणं बंद केलंय. मग श्याम रविवारी संध्याकाळी येतो. कधी त्याच्यासोबत धनंजय चिंचोलीकर उपाख्य बब्रुवान असतो. हे दोघं आले की, बेगमच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. अधून-मधून आम्हाला एखादा न जुळलेला संदर्भ सांगत ती आमच्या मैफलीत सामील होते.

आणखी एक आज सांगूनच टाकतो. श्यामची पत्नी शुभांगी वहिनीचा हात चवदार आहे. शुभांगी वाहिनीच्या  हातचे खुमासदार चवीचे अनेक पदार्थ आमच्याकडे श्यामच्या हस्ते येतात… असं बरंच काही.

अर्थातच, श्याम माझ्या लेखनाचा कट्टर वाचक आहे आणि सौम्य समीक्षक आहे. ‘xxxx नाही आवडलं रे’ अशा शब्दांत तो त्याची नाराजी गंभीरपणे  व्यक्त करतो. मीही तेवढ्याच गंभीरपणे ऐकून घेतल्याचं दर्शवतो, मग श्यामला बरं वाटतं.

पुस्तकात वाचनाची खूण म्हणून एक बुकमार्क ठेवलेला असतो. स्वामी उपाख्य श्याम उपाख्य श्यामराव देशपांडे, ‘राजहंस’वाले, औरंगाबादकर हा एक दोस्त म्हणून बुकमार्क आहे!”

तो आणि हा मजकूर वाचल्यावर ‘स्वामी’ श्यामराव देशपांडे पुतळा होता, असं मी म्हणतोय असा गैरसमज कृपया कुणीही करून घेऊ नये. तो माणसासारखा माणूस होता. उतावीळ होणं, ओंजळीतला दिवा विझू नये इतक्या कटाक्षानं प्रकृतीची काळजी घेणं, हा त्याचा स्थायीभाव झालेला होता. त्याला समोरच्याचा अनेकदा राग येई. तो अनेकदा (नाहक) अस्वस्थही होत असे. पाच-साडेपाच वर्षांपूर्वी एका ओल्या गच्च संध्याकाळी गप्पा मारत असताना मित्र वर्तुळातील एकाने हेटाळणीयुक्त ‘पुस्तकविक्या’ अशा केलेल्या उल्लेखामुळे श्याम खूप व्यथित झाला होता. हे सांगताना त्याचे डोळे त्याच्या नकळत गद्दार झालेले होते. खरं तर, शब्दांवरच्या अकृत्रिम प्रेमामुळे त्यानं चांगली नोकरी सोडून जाणीवपूर्वक पुस्तक विक्रेत्याचा मार्ग निवडला होता. श्यामच्या डोळ्यांत आलेले अश्रू अंगावर शहारा उमटवणारे होते, पण दोन दिवसांनी त्याच मित्राला हवं ते पुस्तक मिळवून देण्यासाठी श्यामची धडपड पाहिली आणि श्याम किती, सज्जन, निरागस, अनाकस वृत्तीचा माणूस आहे, याची खात्री पटली, अशी माणसं दुर्मीळच!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

श्याम लोकशाहीवादी होता. सामाजिक समतेवर त्याची श्रद्धा होती, तरी त्याच्याभोवती विविध जाती-उपजाती-पोटजाती-पोटपोट जाती, धर्म आणि राजकीय विचाराचे लोक जमा झालेले होते. ही मांदियाळी हे श्यामच्या आजवरच्या ग्रंथअसोशीच्या व्रताला आलेलं फळं होतं. इतकं चांगल राहणं आपल्याला काही जमणार नाही. म्हणूनच कोणतीही औपचारिकता, विधी, अवडंबर, पदमोह नसलेला मित्रांच्या हृदयातला श्याम देशपांडे हा ‘स्वामी’ होता. त्याचं हे स्थान त्याच्या मित्रांच्या मनात अबाधित राहील.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......