अजूनकाही
१. पाकिस्तानमध्ये सुफी दर्ग्यावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना टिपण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून तेथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या दूतांना बोलावून ७६ दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. लाल शहबाज कलंदर दर्ग्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ८८जणांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तानने हे धाडसी पाऊल उचललं.
पक्का कॉपीकॅट आहे पाकिस्तान. भारताची नक्कल करण्यासाठी तो चक्क आपणच पोसालेल्या दहशतवाद्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारू शकतो, पाहा. अफगाणिस्तान मात्र फारच बिच्चारा आहे. आपल्याकडच्या दहशतवादाला प्रोत्साहन आणि आश्रय देणाऱ्या पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची ताकदच नाही त्याच्याकडे; मग आपला सत्यानाश करणाऱ्या रशिया आणि अमेरिका या देशांचा समाचार घेणं तर दूरच राहिलं.
…………………………….
२. नागपूर शहराचा विकास होत आहे. मोठे उद्योग येत असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. काँग्रेसने गेल्या ४० वर्षांत उद्योग उभारले नाहीत आणि रोजगार निर्माण करून दिले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा राहुल गांधी जरी आमच्याकडे आले तरी त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ. : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
ज्या 'मिहान'ने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या आधारावर गडकरी हे बोलत होते, त्या मिहानच्या संकल्पनेपासून, स्थापनेपर्यंत आणि विस्तारापर्यंतच्या गेल्या १५ वर्षांच्या काळात पहिली १३ वर्षं तर राज्यात आघाडीचं सरकार होतं आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. वयोमानपरत्वे विस्मरण होतंय की, निव्वळ व्यवसायाचा भाग म्हणून अंगीकारलेली कृतघ्नता?
…………………………….
३. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या लोकांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिल्या शब्दाला जागण्याची भारतीय जनता पक्षाची परंपरा लक्षात घेऊन मुख्यमंत्री खरोखरच तलवार घेऊन येतील, या भयाने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांच्या सभेकडे लोकांबरोबरच पक्षाच्या उमेदवारांनीही पाठ फिरवली बहुतेक. त्यामुळे ती रद्द करण्याची पाळी आली. भाजपामध्ये काहीही रेटून (कंपोझिटर… रे टू न… रेकून नव्हे!) बोलायची पद्धत असते, हे बहुतेक उमेदवारांना माहिती नसावं… आत्ताच आलेत ना राष्ट्रवादीतून ते.
…………………………….
४. राज्य सरकार पडल्यास मी कोणालाही पाठिंबा देणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार आहे. त्याची एक प्रत मी राज्यपालांनाही देईन. मग उद्धव ठाकरे यांनीदेखील आमचा राज्य सरकारला पाठिंबा नाही, असे लेखी स्वरूपात राज्यपालांना द्यावे. : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार
उद्धव असं काही करणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरही तसं काही करण्याची वेळ येणार नाही, हे पवारांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ते 'लिखित'मध्ये वचनं द्यायला तयार झाले आहेत. शेवटी अमित शाहच बरोबर ठरणार म्हणायचं तर.
…………………………….
५. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याची दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत (एटीए) नोंदणी केली आहे. त्यामुळे तो एक दहशतवादी आहे याची कबुलीच पंजाब सरकारने म्हणजेच पर्यायाने पाकिस्तानने दिली आहे. हाफिज सईद आणि त्याचा सहयोगी काजी काशिफ यांच्या दोघांची नावे एटीएच्या यादीमध्ये चौथ्या परिशिष्टात टाकण्यात आली आहेत.
या यादीची एक प्रत कृपया माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडे पाठवून द्या. मात्र, सईद दहशतवादी आहे, ही माहिती मुशर्रफ यांच्या कोमल मनावर आघात करणार नाही, अशा पद्धतीने, सौम्यपणेच त्यांना सांगितली जावी. नाहीतर त्यांच्या एकदम धक्का बसायचा आणि डोक्यावर काही परिणाम वगैरे व्हायचा.
…………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment