१९व्या शतकाच्या शेवटच्या दशकात रवीन्द्रनाथ टागोरांचा ‘काबुलीवाला’ भारतात अवतरला, तेव्हा तो ‘जमिनी’वरचा होता.
२१व्या शतकाच्या दुसर्या दशकात भारतात खंडोगणती का‘बुली’(bully)वाले अवतरले, ते समाज-माध्यमांमध्ये!
तो ‘काबुलीवाला’ कोलकात्यात (त्या वेळचा कलकत्ता) दारोदारी फिरून सुकामेवा विकत असे. अफगाणिस्तानातून बाहेर पडून देशोदेशी असे असंख्य काबुलीवाले तेव्हा फिरत असतील. बरीचशी चालणारी देवघेव आणि कधीमधी होणारी दणकादणकी, पण तरीही सर्वव्यापी विद्वेष आणि दहशतीचे सार्वत्रिक राजकारण नसलेले.
आत्ताचे का‘बुली’वाले हे भारतभरात, तसेच जगभरात आभासी दुनियेतील ‘भिंती-भिंतीं’वर, निवडणुकांपासून न्यायालयांपर्यंत आणि गल्लीपासून संसदांपर्यंत सर्वत्र ‘फुकामेवा’ गळ्यात मारत – आणि अधेमधे गळे कापत - फिरणारे! इथून तिथून इस्लामसह सर्वच धर्मांतील आत्ताचे का‘बुली’वाले, हे गेली काही दशके इंडोनेशियापासून पश्चिम आशियातून पार युरोप-अमेरिकेपर्यंत पृथ्वीला वळसा मारून जगभर निखळ आणि निरर्गल ‘धर्म’निरपेक्षपणे ‘फुकामेवा’ वाटत आणि फोडत फिरणारे! धार्मिक-सांस्कृतिक दहशतवादाचे देशोदेशी पीक घेणारे!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तेव्हाही हिंदू-मुस्लीम तणाव होते, भारत असो वा अफगाणिस्तान - तेव्हाही दोन्हीकडे आपापल्या धर्मातील सकारात्मक गोष्टींचा आधार घेऊन देशप्रेम आणि माणुसकी जागवणारे प्रवाह होते, आणि तेव्हाच दोन्हीकडे धर्मद्वेषावर आधारित आधुनिक राजकारण आकार घेऊ लागले होते! पण तेव्हा ते एवढे पेटले नव्हते.
तो काबुलीवाला कोलकत्यातील एका छोट्या मुलीत आपल्या स्वत:च्या तेवढ्याच लहान मुलीला पाहत होता. त्यात आपला देश, आपले वतन याविषयी अतूट ओढ होती, पण ते ‘देशप्रेम’ मानवी प्रेमाचा सत्यानाश करणारे नव्हते. त्या प्रेमातच गुंफलेले होते देश आणि धर्माच्या पलीकडे जाणार्या बाप-लेकीचे प्रेम, एका परप्रदेशातील मुलीविषयीचे सहज-स्वाभाविक पित्याचे प्रेम आणि एकंदर मानवी प्रेम.
आज अशा सर्वच प्रेमांमध्ये आणि मैत्रभावामध्ये उभ्या केल्या जाणार्या भिंती– केवळ आभासी नव्हे, तर प्रत्यक्षातही – हाच मोठा प्रश्न आहे! मग ते पाकिस्तानमधील मलालावरचे हल्ले असोत किंवा अरब देशातील स्त्रियांची अवस्था असो. ते भारतातील ‘लव-जिहाद’ असो वा ‘तेजाब’वापर किंवा ‘मुस्लीम’ देशातील बुरखा-हिजाब न वापरल्याबद्दलचे देहान्त शासन असो!
स्वातंत्र्यपूर्व काळात अफगाणिस्तान आणि भारत दोघेही ‘छेद’रेषेच्या एकाच बाजूला होते. एक ब्रिटिश साम्राज्यवादी भूसामरिक व्यूहरचनेत कळीचा, तर दुसरा ब्रिटिश साम्राज्याचा मुकुटमणी! ब्रिटिश वसाहतवाद-साम्राज्यवादाच्या विरोधात दीड-दोन शतके दोघेही लढले. प्रागैतिहासिक काळ, महाभारत काळ आणि मध्ययुगीन काळ असे अविरत देवघेव करणारे हे प्रदेश. स्वातंत्र्यासाठी एकमेकांना मदत करत राहिले. अफगाण जनतेने भारतीय क्रांतिकारक, सुभाषबाबू अशा कितीकांना रशिया आणि युरोपकडे जाण्यासाठी मार्ग काढून देण्यात मदत केली, हे तर भारतातील लहान मुलेमुलीही जाणतात. दोनही देश मग परकीय सत्तेविरुद्ध लढून स्वतंत्र झाले.
मग दोघांचेही मार्ग ‘स्वतंत्र’ होत गेले. तरी नाममात्र नव्हे, तर ‘NAM’मध्येही दोघे एकत्र राहिले. मात्र जागतिकीकरणात जग ‘एकत्र’ येत गेले, तसे ‘NAM’ नाममात्र होत गेले. प्रेमळ मानवीपण आणि देशांचे व धर्मांचे सहअस्तित्व मानणारे काबुलीवाले कथेत उरले किंवा मागे ढकलले गेले, दडपले जाऊ लागले आणि का‘बुली’वाले मात्र वाढत गेले...
मधले एखादे छोटे ‘डावे’ वळण वगळता अफगाणिस्तान आणि भारत दोघेही ‘उजवी’कडे वळले. वरवर पाहता दोघांचे हे उजवे वळण दोघांना दोन दिशांनी घेऊन गेले. धर्मनिरपेक्ष विरुद्ध धर्मवादी, हिंदू विरुद्ध मुस्लीम, उदयोन्मुख विरुद्ध विकसनशील अर्थव्यवस्था, महासत्ता विरुद्ध परकीय सैन्य उरावर घेऊन बसलेला, शांततावादी विरुद्ध हिंसक, वगैरे. पण खरंच हे दोन देश ‘इतके’ वेगळे झाले का?
त्या मूळ काबुलीवाल्याचा तो देश - अफगाणिस्तान, आता ब्रिटिश नव्हे तर अमेरिकी साम्राज्यवादाच्या भूसामरिक सत्तालालसेच्या आणि लष्करी उच्छादाच्या पायदळी तुडवला गेला. मग असे भासू लागले आणि भासवले जाऊ लागले की, जणू तालिबानी हे राष्ट्राचे ‘मुक्तिदाते’ आहेत. तर तालिबानींचा आत्ताचा विजय म्हणजे काहींना ‘काडतुसशून्य क्रांती’ही भासू लागली आहे. मुजाहिदीन, अल-कायदा आणि तालिबानी हे अहिंसक सत्ताकारण करूच शकत नाहीत, ते फक्त हिंसा करत आणि जोपासत राहतात; ते फक्त सत्ताप्राप्ती करू शकतात, राष्ट्रमुक्ती नव्हे; ते फक्त ‘प्रतिक्रांती’ करू शकतात, ‘क्रांती’ नव्हे!
त्यांनी पश्चिमी सत्ता आणि अमेरिकी साम्राज्यवाद याविरुद्ध कितीही शड्डू ठोकले तरी ती त्यांची ‘नूरा कुस्ती’ असते. अर्थात ही कुस्ती ‘नूरा’ असते, ती दोन्हीकडच्या सत्ताधारी मंडळींच्या दृष्टीने, आम जनतेसाठी नव्हे! गेले शतकभर ही धर्मवादी राजकारणी मंडळे पश्चिमी सत्ता, पैसा, पाठबळ आणि प्रोत्साहन या जोरावर तर जन्म घेत आणि उड्या मारत आली आहेत. मात्र यात आम जनतेची ससेहोलपट आणि हत्याकांडे, दमन आणि अत्याचार, विस्थापन आणि विध्वंस हे कधीच ‘नूरा’ नसते, ते असते जीवघेणे भीषण सत्य.
ज्या युद्धात २ लाख जीव, २००० अब्ज डॉलर्स, २० वर्षे यांची हत्या केली गेली आणि ज्याला अमेरिकेने उभे केले, ज्याच्याविरुद्ध लढण्याची सबब सांगून हे युद्ध छेडले, त्या तालिबानलाच अमेरिकेने खुले मैदान सोडून दिले आहे. अमेरिका, तालिबान आणि अफगाणी उच्च वर्ग यांच्यात आधी काही खलबते झाली, सामंजस्य तयार झाले, म्हणूनच तालिबानला खुले मैदान मिळाले असणार. यात लोण्यातून सुरी फिरावी, तसा झालेला तालिबानचा ‘विजय’ पाहून भांबावणारे किंवा अमेरिकेचे नाक कापले म्हणून नाचणारे, हे सारेच ‘बेगानी शादी में दिवाने अब्दुल्ले’ आहेत. जागतिक भांडवली-साम्राज्यवादी राजकारण आणि त्याचे विविध अवतार हे हिंदू विरुद्ध मुस्लीम, दहशतवाद विरुद्ध लोकशाही अशा सोप्प्या द्विभागण्यांमध्ये बसवावे एवढे बाळबोध, प्रकरण नक्कीच नसते हे न कळणारे!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या सार्यात आम अफगाणींचे जीवन आगीतून फुफाट्यात होते आहे, होणार आहे.
काही लोक विचारतात की, कोरिया, व्हिएतनाम, आखात, इराक, आता अफगाणिस्तान अशा प्रत्येक युद्धात तोंडावर आपटल्यानंतरदेखील अमेरिका धडा का शिकत नाही? काही जण विचारतात की, अमेरिकेने अशी युद्धे सुरू करताना जी महान उद्दिष्टे, उदा., दहशतवाद-मुक्ती, आधुनिक मूल्यांची प्रतिष्ठापना, लोकशाही, स्वातंत्र्य, मानवता, वगैरे वगैरे जाहीर केली, त्यांचे काय झाले?
आतापर्यंत खरे तर हे पुरेसे उघड झालेले आहे की, अमेरिकी साम्राज्यवादी सत्तावर्तुळांना (अमेरिकी आम जनता यात थेट येत नाही) अशा घोषित मूल्यांशी काहीही देणे-घेणे नाही. उलट ती चावून चोथ्याप्रमाणे पायदळी तुडवणे हीच त्यांची रीती आणि नीती आहे. युद्ध हा त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायासाठी युद्ध (‘व्यवसाय- स्वातंत्र्य’ व ‘व्यापार-स्वातंत्र्य’ यांचे रक्षण वगैरे!) हेच त्यांचे जगातील सर्व प्रश्नांना उत्तर आहे. युद्धखोरीतून नफा व नफेखोरीसाठी युद्ध हीच त्यांची अर्थगती आहे.
अमेरिका आज ७० देशात ८००हून अधिक लष्करी तळ ठेवून आहे. दुसर्या महायुद्धानंतर ‘शीतयुद्ध’ हा शब्द क्रूर फसवा ठरावा, अशी सुमारे २०० छोटी-मोठी भीषण स्थानिक युद्धे जगात लढली गेली. त्यातील बहुतेक युद्धांत अमेरिकेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे. अमेरिकेचा वार्षिक लष्करी खर्च (यावर्षी सुमारे ७८० अब्ज) हा पुढच्या ११ देशांच्या एकत्रित वार्षिक लष्करी खर्चापेक्षा (बेरजेपेक्षा) अधिक आहे. तिच्या देशांतर्गत रोजगाराच्या २५ टक्के रोजगार हा लष्कर उद्योगात आहे.
त्यामुळे अमेरिकेला हरलेल्या युद्धातून तरी धडा वगैरे शिकता येतो, का हा प्रश्नच फजूल आहे. कारण पुन्हा नव्या दमाने पाताळयंत्री पद्धतीने युद्धे रेटणे ही तिची ‘गरज’च आहे. तो भांडवली व्यवस्थेचा व तिच्या साम्राज्यवादी संस्कृतीचा ‘स्वभावधर्म’ आहे. स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठीची या व्यवस्थेची ती आत्मप्रेरणा आहे. या जागतिक भांडवल व्यवस्थेचे नेतृत्व सध्या शस्त्रसज्ज अमेरिका करते आहे!
तालिबान सत्तेवर येण्यातूनही काहीतरी चांगले घडेल, ही अशीच एक अंधश्रद्धा आहे. तशी आशा काही जण लावून बसले आहेत. ते व्हिएतनाम वगैरेच्या आठवणी काढताहेत आणि अमेरिकेला परतवून क्रांतीनंतर व्हिएतनामने जशी प्रचंड प्रगती केली, तशी तालिबानीही करतील, असे ही मंडळी म्हणताहेत. पण असे मानणे म्हणजे विकासाचा ऐतिहासिक टप्पा आणि संदर्भ, सामाजिक व्यवस्था आणि राजकीय अवस्था यांचे भान हे सारे गमावणे आहे.
दोन्हीकडे अमेरिकेने २० वर्षे युद्ध लादले आणि अमाप विध्वंस केला, हे वगळले तर यात साम्य तरी काय आहे? कष्टकऱ्यांची सत्ता स्थापणारी आणि स्त्री-पुरुषांना समता देणारी, जमिनी फेरवाटपासह सारी संसाधने जनतेच्या व देशाच्या मालकीची करणारी, सर्वांना शिक्षण, रोजगार, निवारा आणि आरोग्य देणारी समाजवादी/साम्यवादी व्यवस्था कुठे आणि नेमकी याच्या उलट पावले टाकत बुश-बिन लादेन भागीदारी छाप साटेलोटे स्थापणाऱ्या व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून हप्ते आणि वाटे घेत भांडवल सत्ता बळकट करणाऱ्या टोळ्या कुठे? तरीही अशा शेख महंमदी स्वप्नात रमायचेच तर एकतर अफगाणी अफू चढवली पाहिजे, नाहीतर वेदकालीन सोमरसपान तरी केले पाहिजे!
अशा टोळ्या ना कथेतल्या ‘काबुलीवाल्या’च्या असतात, ना त्या प्रत्यक्षातल्या अफगाणी वा भारतीय आम जनता असतात.
याच काळात दुसरा, त्या काबुलीवाल्याचा यजमान देश भारत, अशा तालिबानी आडवळणाने नव्हे तर थेट ‘नमस्ते ट्रम्प’ करू लागला. अमेरिकेच्या पंखाखाली जात महासत्ता बनण्याची वल्गना करू लागला. अशा या भारतातल्या संख्येने वरचे २५-३० टक्के असलेल्या वर्गांची संपन्नता वगळता दोन्ही देशातील आम जनता कमी-जास्त एकाच पातळीवर पोहोचली. आफ्रिकेतील सहाराखालील देशांचा समुदाय वगळता जगात सर्वाधिक विपन्न अवस्था अनुभवणारा प्रदेश आहे दक्षिण आशिया – जिथे भारत स्वत:ला महासत्ता म्हणवू पाहतो आहे! पण भारताचे कित्येक मानवी विकास निर्देशांक हे श्रीलंका, बांगला देशापेक्षा मागे आहेत आणि पाक-अफगाणच्या ‘जवळ’ जाणारे आहेत!
भारत हिंदुत्ववादी वर्चस्वाखाली घुसमटू लागलेला, तर अफगाणिस्तान तालिबानी टाचांखाली रगडला जाऊ लागलेला, असे हे दोन देश. एक खरे की, भारतातील आम जनतेने आणि इथल्या जनवादी संस्कृतीने – मग ती हिंदू असो वा मुस्लीम – अजूनही तालिबानी संस्कृती इथे रुजू दिलेली नाही. अर्थात हाही फरक दूर व्हावा आणि आपण स्वत:ला तालिबानी साच्यात व ढाच्यात घालावे, असे स्वप्न पाहणारा एक कट्टर पंथ इथेही मौजूद आहे! आता काही जण म्हणताहेत की, ‘हे’ बदलताहेत – बघा ना मोहन भागवत म्हणाले- ‘हिंदू-मुस्लीम दोघांचा डीएनए एकच आहे!’ बहोत खूब! हे आत्ता कळले? की याही मुखवट्यामागचे राजकारणही नंतर उघड होणार? अहो तालिबानीदेखील याच सुरात गाताहेत. बघा ना म्हणताहेत- ‘महिलांनी सरकारात सहभागी व्हावे!’ ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ दुसरे काय?
एकीकडे सांस्कृतिक दहशतवादी, तर दुसरीकडे बंदुकी दहशतवादी. यात त्या ‘काबुलीवाल्या’चे काय होणार आणि त्या छोट्या मुलीचे?
मधल्या मोदी काळात भारताने अफगाणिस्तानपासूनही दुरावा निर्माण केला आणि तेथील स्वत:चे वजन कमी केले. असल्या खुळचट व निरर्थक धर्मद्वेषी राजकारणात न अडकता, अमेरिकी मुखवट्याला न भुलता व पोकळ दमबाजी न करता आणि चीनी-पाकिस्तानी डावपेचांचा बाऊ न करता व रडगाणे न गाता अफगाणिस्तानबाबत स्वत:चा मार्ग शोधला पाहिजे. यासाठी ठोस आणि पूर्वग्रहविरहित पावले टाकायला हवीत आणि त्यांची दिशा केवळ तात्कालिक वेळ मारून नेण्याची नव्हे, तर मूलभूत शहाणपणाची हवी. त्यासाठी स्वतंत्र भारताचे नेहरू-इंदिराकालीन परराष्ट्र धोरण आणि अमेरिकी या गटात सामील न होता नव्या पद्धतीने अलिप्तता व शांतता यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जगभरच्या विकसनशील आणि अन्य विकसित देशांना या भूमिकेवर आणण्याची दूरदृष्टी ठेवून व्यूहरचनेची आखणी केली पाहिजे. त्यासोबतच आम जनतेतील सहिष्णुतेचे शहाणपण वर्तमान सरकारने अंगी बिंबवले पाहिजे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
दोन्ही देशातील बहुसंख्य जनता – त्यातील काही विभाग हे धार्मिक पूर्वग्रहात अडकलेले असले तरी – आजही खरे देश प्रेम आणि माणुसकी मानणारी आहे. सत्ताधारी वर्तुळांना आणि मुत्सद्द्यांना, तालिबान्यांना आणि हिंदुत्ववाद्यांना जी निरागसता आणि जो बंधू-भगिनीभाव, जी नाती आणि जी संस्कृती ‘खुळचटपणा, षंढपणा’ वाटते, तोच आपला खरा चिरंतन आधार असू शकतो. त्याकडे जाण्याचा मार्ग वळणावळणाचा, कष्टाचा आणि वेदनादायी असला तरी त्याला पर्याय नाही.
खरा मार्ग आणि खरे देशप्रेम हे दोन्ही रविन्द्रनाथांच्या ‘काबुलीवाल्या’चेच असू शकते, आत्ताच्या का‘बुली’(bully)वाल्यांचे नव्हे!
..................................................................................................................................................................
लेखक दत्ता देसाई सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.
dattakdesai@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment