‘किंग ऑफ द रॉक’ एल्विस अरोन प्रिस्लेशिवाय विसाव्या शतकातल्या संगीताला नवीन दिशा देणाऱ्या महान संगीतकारांची यादी पूर्ण होऊ शकत नाही!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
सतीश बेंडीगिरी
  • ‘किंग ऑफ द रॉक’ एल्विस अरोन प्रिस्ले यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 16 August 2021
  • कला-संस्कृती सतार ते रॉक किंग ऑफ द रॉक King of the Rock एल्विस अरोन प्रिस्ले Elvis Aaron Presley

‘किंग ऑफ द रॉक’ एल्विस अरोन प्रिस्ले यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीचा हा लेख...

..................................................................................................................................................................

अलीकडेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘रॉक स्टार एल्विस प्रिस्ले’ या नावानं संबोधलं होतं. अभिनेते शम्मी कपूर यांना ‘हिंदी सिनेमासृष्टीचे एल्विस प्रिस्ले’ म्हटलं जायचं. स्कॉट मूरहेड या अमेरिकन संगीतकारानं ‘ही इज माय एल्विस (प्रिस्ले)’ असा सुप्रसिद्ध ग़ज़लगायक उस्ताद नुसरत फतेह अली खान यांचा गौरव केला आहे.

‘एल्विस द पेल्विस’ या जगद्विख्यात नावानं ओळखला जाणारा ‘किंग ऑफ द रॉक’ एल्विस अरोन प्रिस्ले अमेरिकेत जन्माला आला नसता तर हिंदी सिनेमातील अभिनेता शम्मी कपूर त्याचा पुतण्या राजीव कपूरप्रमाणे केव्हाच विस्मृतीत गेला असता!

शम्मी कपूरचे सुरुवातीचे चित्रपट आपटले आणि त्याला कळून चुकलं की, राज कपूर, देव आनंद आणि दिलीपकुमार या त्रिकुत्राच्या राज्यात आपलं स्थान टिकवायचं असेल तर आपल्याला काही तरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग एल्विस त्याचा स्फूर्तिदाता झाला. त्याच्या हालचाली, नृत्य करण्याची शैली, त्याची गाणं सादर करण्याची पद्धत शम्मी कपूरने सही सही उचलली आणि बॉलीवुडचा ‘किंग ऑफ रॉक’ जन्माला आला. शम्मी कपूरची लोकप्रियता वाढू लागली आणि कालांतरानं तो एक ‘सेलेबल स्टार’ झाला. फरक एवढाच की, एल्विस स्वतः गायचा, तर शम्मी कपूरसाठी रफीसाहेब गायचे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

५ जून १९५६ रोजी एल्विस प्रिस्लेनं स्टेजवर ‘हाऊंड डॉग’ सादर करताना जो अंगविक्षेप केला, त्यानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्याच वेळी त्याला ‘एल्विस द पेल्विस’ ही उपाधी मिळाली. मायकेल अँजेलो किंवा रोदँने घडवलेलं एखाद्या देखण्या पुरुषाचं कोरीव शिल्प असावं, असा सहा फुटी एल्विस तरुण-तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. त्याचा स्टेजवरचा सहज वावर, मोठ्या कॉलरचे शर्टस्, पांढऱ्या रंगाचा जम्प सूट, मोठ्या आकाराचा बेल्ट, हातात गिटार धरण्याची शैली, त्याचे कटाक्ष, मिठ्ठास बोलणं, हजरजबाबी व्यक्तिमत्त्व याची जादू अमेरिकन जनतेवर एवढी पडली की, पाहता पाहता एल्विस ‘आयकॉनिक’ गायक बनला. पुढे त्याने कुशल संगीतकार आणि उत्तम अभिनेता अशीही ख्याती मिळवली.

एल्विसनं आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात जगातलं संगीतविश्व ढवळून टाकलं, अनेक मानदंड प्रस्थापित केले आणि ‘न भूतो न भविष्यति’ अशी कामगिरी केली. विसाव्या शतकातील संगीताला नवीन दिशा देणाऱ्या महान संगीतकारांची यादी एल्विसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ‘रॉक अँड रोल’ जगभरात नेणारा एल्विस विसाव्या शतकातील सर्वांत लोकप्रिय गायक मानला जातो. त्याची जादू अजूनही संपलेली नाही. अमेरिकेतील नव्वद टक्के जनता एल्विस शब्द उच्चारला की, अजूनही भावनिक होते.

मिसिसिपी राज्यातल्या टपेलो इथं अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या एल्विसला त्या वेळच्या जागतिक मंदी(ग्रेट डिप्रेशन)मुळे आर्थिक विवंचना भेडसावत असे. दर रविवारी त्याचे आई-वडील त्याला घेऊन चर्चमध्ये जात. तिथं गायल्या जाणाऱ्या गॉस्पेल संगीताशी त्याची ओळख झाली. आठ वर्षांच्या एल्विसला आईनं गिटार आणून दिली. ती मग त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनली.

१३ वर्षांचा असताना एल्विस आणि त्याचे आई-वडील टपेलो सोडून मेम्फिसला स्थलांतरित झाले. तिथं शिक्षण पूर्ण झाल्यावर एल्विस ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. त्याच्या येण्या-जाण्याच्या वाटेवरच ‘मेम्फिस रेकॉर्डिंग कंपनी’चा स्टुडिओ होता. एके दिवशी एल्विसनं आपला ट्रक या स्टुडिओ जवळ थांबवला. सोबत गिटार होतीच. त्याला आपल्या आईच्या वाढदिवसाला स्वत:च्या आवाजात दोन गाणी गाऊन, ती रेकॉर्ड करून तिला भेट द्यायची होती. तो स्टुडिओत शिरला. गाणी रेकॉर्ड झाल्यावर एल्विस घरी गेला.

ज्या माणसानं त्याची गाणी रेकॉर्ड केली, त्याने ती ‘सन् रेकॉर्डस कंपनी’चा मालक सॅम फिलिप्सला ऐकवली. आठच दिवसांत फिलिप्सने एल्विसला स्टुडिओत बोलावून ‘दॅट्स ऑल राईट ममा’ हे त्याचं गाणं परत रेकॉर्ड केलं. दोन दिवसानंतर ते तिथल्या रेडिओवर प्रसारित झालं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांनी रेडिओ स्टेशनला फोन करून करून ते पुन्हा पुन्हा लावायला सांगितलं. काही जणांनी हा गायक कृष्णवर्णीय आहे का, असाही प्रश्न विचारला. त्या रात्री एल्विसची पहिली मुलाखत घेण्यात आली. गाण्याची रेकॉर्ड बाजारात येण्यापूर्वीच ५ हजार रेकॉर्डची आगाऊ मागणी नोंदवली गेली. ती बाजारात आल्यावर २० हजार रेकॉर्ड्स् बघता बघता संपल्या. हा प्रचंड प्रतिसाद बघून ‘सन् रेकॉर्डिंग कंपनी’नं त्याच्याबरोबर तीन वर्षांचा करार केला.

एल्विस आता ‘नॅशनल फिगर’ झाला होता. लवकरच त्याला हॉलिवुडचे दरवाजे खुले झाले. १९५७ साली त्याचा ‘जेलहाऊस रॉक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातलं शीर्षकगीत ‘जेलहाऊस रॉक’ तुफान गाजलं. पुढे ‘The 500 Greatest Songs of All Time’ यादीत या गाण्याचा समावेश करण्यात आला.

अमेरिकेत त्या काळी २१ ते ३६ या वयोगटातील पुरुषांना लष्करी सेवा सक्तीची होती. एल्विसने १९५८ ते १९६० अशी लष्करी सेवा केली. परतल्यावर १९६१मध्ये त्याचा ‘ब्लू हवाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि त्यानंतर २७ चित्रपट, अनेक अल्बम, लाइव्ह शो, म्युझिकल टुर्स यांत तो बुडून गेला. १९७३ या वर्षात त्याने जवळ जवळ दोन दिवसाला एक असे १६८ लाईव्ह शो केले.

१६ ऑगस्ट १९७७ पर्यंत एल्विसने ६०० गाणी म्हटली. त्यात रॉक, पॉप, कंट्री, ब्लूज, गॉस्पेल, रिदम अँड ब्लू अशी अनेक प्रकारची गाणी होती. त्याची गाणी, चित्रपट आणि व्यक्तिमत्त्व यांची जादू जगभर पसरली. ‘मिस्टरी ट्रेन’, ‘कान्ट हेल्प फॉलिंग इन लव’, ‘आर यू लोनसम टु नाइट’, ‘आय नीड युवर लव टू नाइट’, ‘केंटकी रेन’,  ‘अ लिट्ल लेस कॉन्व्हर्सेशन’, ‘कान्ट हेल्प फॉलिंग इन लव’, ‘हार्टब्रेक हॉटेल’, ‘आय वॉन्ट यू, आय नीड यू, आय लव यू’, ‘से इट्स नॉट यू’, ‘डोंट बी क्रुएल’, ‘हाउंड डॉग’, ‘लव मी टेंडर, ‘टू मच’, ‘ऑल शुक अप’, ‘टेडी बिअर’, ‘जेलहाउस रॉक’, ‘हार्ड हेडेड वूमन’, ‘स्टक ऑन यू’, ‘सस्पिशिअस माइंड्स’, ‘मूडी ब्ल्यू’ या त्याच्या गाण्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एल्विसने अमेरिकन संगीताचा बाजच बदलून टाकला. त्याचा प्रभाव नंतर आलेल्या मॅडोना, जॉर्ज मायकेल, एमिनेम, जस्टीन टिंबरलेक अशा अनेक गायकांवर पडला. ब्लूज संगीत एल्विसच्या प्रभावातून बाहेर पडू शकत नाही. ते कृष्णवर्णीयांचं, पण या गोऱ्या एल्विसने ते आपलंसं केलं. म्हणून तो कृष्णवर्णीयांनाही आपलासा वाटतो. काळ्या-गोऱ्यांमधील दरी मिटवणारी व्यक्ती म्हणून एल्विसकडे पाहिलं जातं. १९५०च्या दशकात ‘रिदम अँड ब्लूज’ गाणारे सर्व कृष्णवर्णीय अफ्रो-अमेरिकन होते. गोरा एकमेव फ्रँक सिनात्रा होता. पण एल्विसने या संगीताचा ताबा घेतला आणि संगीतविश्व ढवळून काढून त्यात आमूलाग्र परिवर्तन केलं.

१६ ऑगस्ट १९७७ रोजी एल्विसने जगाचा निरोप घेतला. त्याच्या पोस्ट मोर्टेममध्ये ड्रग्ज सापडलं. त्याला निरोप देण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याच्या अल्बम्सची विक्री दर वर्षी होते. आजवर त्याच्या अल्बम्सची विक्री दीडशे कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. त्याच्यावर दीड-दोनशे पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 

एल्विसच्या संगीताचा बॉलिवुडवरही प्रभाव आहे. ‘झुक गया आसमान’ हा हिंदी सिनेमा त्यातील ‘कौन हैं जो सपनों में आया’ या राजेंद्र कुमार यांच्यावर चित्रीत केलेल्या आणि रफीसाहेब यांनी म्हटलेल्या गाण्यासाठीच आठवतो. हे गाणं एल्विसच्या ‘फन इन अकापुल्को’ या चित्रपटातील ‘मार्गारिटा’ या गाण्याची सही सही नक्कल आहे. 

२०१८ साली अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एल्विसचा ‘प्रेसिडेन्सीअल मेडल ऑफ फ्रीडम’ हा किताब मरणोत्तर देऊन गौरव केला. एल्विसचं ग्रेसलँड इथलं घर त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्यटनस्थळ बनलं आहे. दरवर्षी जगभरातून सात-आठ लाख लोक हे स्थळ बघण्यासाठी येतात. एल्विस केवळ ‘किंग ऑफ रॉक’ नव्हता, तर लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारा ‘सम्राट’ होता. असा सम्राट एकदाच जन्माला येतो...

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख