अजूनकाही
जगप्रसिद्ध कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान (जन्म – १३ ऑक्टोबर १९४८, मृत्यू - १६ ऑगस्ट १९९७) यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने हा लेख...
..................................................................................................................................................................
जगप्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांचं संगीत क्षेत्रातलं योगदान अचंबित करणारं आहे. ‘ही इज माय एल्विस (प्रिस्ले)’ असा त्यांचा गौरव स्कॉट मूरहेड या अमेरिकन संगीतकारानं केला आहे. केवळ एवढंच नव्हे तर त्यांना लॉस एंजेलिसमध्ये ‘Voice Of Paradise’, पॅरिसमध्ये ‘Pavarroti Of The East’, ट्युनिसमध्ये ‘Quintessence of the Human Voice’, लाहोरमध्ये ‘Emperor of Quawwali’ आणि जगभरात ‘शहेशहा-ए-कव्वाल’ अशा विविध बिरुदावल्यांनी नावाजलं गेलं आहे. ‘टाईम’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकानं मागील ६० वर्षांतील सर्वोत्तम अशा पहिल्या १२ कलाकारांत त्यांचा समावेश केला आहे. १९९५मध्ये युनेस्को म्युझिक प्राईज, १९९६मध्ये Grand Prix des Ameriques for exceptional contribution to art of cinema, १९९६मध्ये जपानचा Fukuoka Asian Culture Prize, १९९७मध्ये Best traditional folk album (अल्बम - Intoxicated Spirit) आणि Best world music album (अल्बम - Night Song) अशी दोन ग्रॅमी अवार्ड… असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. २००५मध्ये ‘Legend's award at UK Asian music award या प्रतिष्ठित पुरस्कारानं त्यांना मरणोत्तर गौरवण्यात आलं आहे. २०१६मध्ये ‘Weekly’ या साप्ताहिकानं आतापर्यंतच्या इतिहासातील चौथा सर्वोत्तम गायक म्हणून त्यांचा गौरव केला.
नुसरत फतेह अली खान यांचे सर्वांत जास्त म्हणजे १२५ कव्वाली अल्बम प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंदवलं गेलंय. आणि त्यांचं हे रेकॉर्ड आजही अबाधित आहे. गुगलनं १३ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांच्या ६७व्या वाढदिवशी त्यांच्या होमपेजला सहा देशांत दिसेल असं ‘डुडल’ बनवलं होतं.
एल्विस प्रिस्ले आणि नुसरत फतेह अली खान या दोन गायकांना जगभर अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे या दोघांची पुण्यतिथी १६ ऑगस्ट या एकाच दिवशी असते… हा योगायोगही विलक्षण म्हणावा असाच आहे.
असं काय विशेष होतं नुसरत फतेह अली खान यांच्या गळ्यात?
एकाच गाण्याचं वेगवेगळ्या पट्टीत गायन, अगदी वरच्या पट्टीत जाऊन सलग गाणं, त्याच पट्टीत हरकती घेणं आणि त्यातही आलाप घेताना श्वास न घेणं, कव्वालीची विशिष्ट लकब, हावभाव करताना हातांच्या हालचाली, डोळे बंद करून देहभान विसरणं, त्याच वेळी चेहऱ्यावर येणारी चमक व प्रसन्नता आणि सुरुवातीला मंद गतीतून हळूहळू द्रुत लयीत गाणं… ही नुसरत फतेह अली खान यांच्या गायकीची काही वैशिष्ट्यं सांगता येतील. त्यांच्या या शैलीमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात. संगीतकार पीटर ग्रॅब्रिअल यांनी त्यांच्याविषयी एकदा म्हटलं होतं की, ‘मी जेव्हा नुसरतना ते एखादा आलाप गाताना रेकॉर्ड करायचो, तेव्हा त्यांच्या आवाजाची गती माझा रेकार्डेर पकडू शकायचा नाही.’
नुसरत यांच्या अशा अफाट गायनाची अनेक उदाहरणं देता येतील.
“साँसो की माला पे सिमरूं मैं, पी का नाम
अपने मन की मैं जानू, और पी के मन की राम”
हे संत मीराबाईंनी १६व्या शतकात रचलेलं भजन. यातली कृष्णाची भक्ती, अपार प्रेम, कृष्णाला भेटण्याची तळमळ एकेका शब्दांतून प्रकट करताना नुसरत असं अफलातून गातात की, प्रत्येक शब्द ‘दैवी’ अनुभूती देतो. ‘राम’ या शब्दाचा नुसरत जेव्हा उच्चार करतात, तेव्हा अंगावर अक्षरक्ष: रोमांच उभे राहतात! हे भजन ऐकताना रसिक श्रोते २.३८ ते २.४८, ७.५० ते ८.४०, ८.५६ ते ९.३, १४.३२ ते १४.५२ आणि १६.०८ ते २०.१० अशा अनेक ठिकाणी त्यांना ‘स्टँडिंग ओवेशन’ दिल्याशिवाय राहू शकत नाहीत!
‘बनाई मुझ बेनवा की बिगड़ी, नसीब मेरा जगा दिया मेरे ख्वाजा मोइनुद्दी’ ही कव्वाली नुसरत यांनी पॅरिसमध्ये गायली, तेव्हा उर्दू न समजणाऱ्या समोरच्या श्रोतृवर्गाने तब्बल चार मिनिटं टाळ्यांचा गजर केला होता. या कव्वालीत दीड मिनिटानंतर हार्मोनियमवर फारुक यांनी ‘शाह-इ-मर्दाने अली’ वाजवल्यानंतरचा नुसरत यांचा धमाका ऐकावा.
‘ओ सानु इक पल चैन नए आवे राँझना तेरे बिनामाहिया तेरे बिना’ ही कव्वाली नुसरत यांनी एकदा खालच्या पट्टीत आणि एकदा अतिशय वरच्या पट्टीत गायली आहे. ही कव्वाली नुसरत यांच्यासारखी वरच्या पट्टीत कुणीही गाऊ शकणार नाही.
नुसरत यांचा जन्म तब्बल सहा शतकं राजदरबारारात गायन करणाऱ्या घराण्यांत १९४८ साली झाला. जन्मस्थळ फैसलाबाद. त्यांचे वडील फतेह अली आणि काका रहमत अली हे प्रसिद्ध सुफी गायक होते. लहानपणी नुसरत यांना ‘परवेझ’ म्हणत. फतेह अली यांच्या पाच मुलांत परवेज सर्वांत लहान व एकमेव मुलगा. घरात गायकीची परंपरा असली तरी त्यांना मोठं होऊन डॉक्टर वा इंजिनीअर व्हावं असं वाटे. वडिलांच्या तालमीत मात्र त्यांनी कसूर केली नाही. त्यांच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा नुसरत अवघ्या १६ वर्षांचे होते. वडिलांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात ते पहिल्यांदा गायले. त्यानंतर काही वर्षांतच त्यांच्या काकांचंही निधन झालं. आणि त्यांच्या सुफी गायन मंडळाची जबाबदारी नुसरत यांच्यावर आली.
सुफी गायन पद्धतीला ‘कव्वाली’ म्हणतात आणि ती मुस्लीम समाजाच्या आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित आहे. नुसरत व त्यांच्या वंशजांना ‘सुफी गायनाचे उद्गाते’ समजलं जातं. नुसरत यांच्या आधी सुफी गायन केवळ भारत, पाकिस्तान आणि काही मुस्लीम देश वगळता फारसं माहीत नव्हतं. नुसरत यांनी ते जगभर नेलं. त्यांनी कव्वालीला जगभरात ओळख निर्माण करून दिली. उर्दू, पंजाबी, ब्रज, हिंदी आणि पर्शियन भाषेत त्यांनी कव्वाली गायिल्या आहेत.
राज कपूरने नुसरत यांना पहिल्यांदा पाकिस्तानच्या बाहेर आणलं. ऋषी कपूर-नितू सिंग यांच्या लग्नात त्यांनी नुसरत यांना आमंत्रित केलं होतं. रात्रीच्या जेवणानंतर सुरू झालेली त्यांची मैफल पहाटेपर्यत चालू राहिली…‘साँसो की माला पे सिमरूं मैं, पी का नाम’ या मीराबाईच्या भजनांनी सुरुवात करून नंतर ‘ये जो हलका हलका सुरूर हैं’ हे सलग तीन तास आवाज न फाटता, सहजपणे व हरकती घेत नुसरत गायले, तेव्हा उपस्थित श्रोते आफरीन झाले होते.
१९८०मध्ये इंग्लंडमधील बरमिंगहॅम येथील ओरिएंटल स्टार एजन्सीनं नुसरत यांच्याशी करार केला. त्यांच्या माध्यमातून नुसरत यांनी ४०हून जास्त देशात मैफली केल्या. १९८५मध्ये लंडनच्या ‘वर्ल्ड ऑफ म्युझिक आर्ट अँड डान्स फेस्टिवल’, १९८५ व १९८८मध्ये पॅरिस, १९८७मध्ये जपान फौंडेशनच्या विनंतीवरून पाचव्या आशियन ट्रॅडिशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिव्हलमध्ये (जपानी लोकांनी मंत्रमुग्ध होऊन त्यांना ‘सिंगिंग बुद्धा’ असं नाव दिलं.), १९८९मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन अकॅडमी ऑफ म्युझिक, १९९२-९३मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या इथनोम्युझिकॉलॉजी विभागात व्हिजिटिंग आर्टिस्ट, १९९३मध्ये शिकागो विंटर फेस्टिवल, कॅनडाच्या मायकल ब्रूक सोबत रिअल वर्ल्ड, अशा प्रकारे जागतिक पातळीवरील नुसरत अनेकदा नावाजले गेले.
१९८८मध्ये पीटर ग्रॅब्रियल यांनी त्यांच्या ‘रिअल वर्ल्ड’च्या माध्यमातून विदेशी संगीतात नुसरत यांच्या आवाजाचा वापर केला. त्यांचा ‘द लास्ट टेम्पटेशन ऑफ ख्रिस्त’ हा पहिला अल्बम बराच गाजला. नंतर दोघांनी मिळून पाच अल्बम केले.
भारतात सर्वप्रथम खय्याम यांनी नुसरत यांना गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर १९९६-९७मध्ये जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी केलेला ‘संगम’ हा अल्बम सुपरहिट झाला. त्यातलं ‘आफरिन आफरिन’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं.
ए. आर. रहमानच्या ‘वंदे मातरम’मध्ये नुसरत यांचा आवाज आहे. रहमान ज्या सुफी पद्धतीनं गातो किंवा संगीत देतो, त्यामागची प्रेरणा नुसरतच आहेत. त्यांना श्रद्धांजली म्हणून रहमाननं ‘गुरू’ या चित्रपटात ‘तेरे बिना’ हे गाणं स्वतः सुफी पद्धतीनं गायलं आहे.
याशिवाय राजेश रोशन, नदीम श्रवण, अन्नू मलिक या संगीतकारांनी नुसरतची गाणी ‘उचलली’. संगीतकार अन्नू मलिकच्या ‘आय लव यु, आय लव यु’ या ‘औजार’ चित्रपटातल्या गाण्याची धून नुसरत यांनी गायलेल्या ‘अल्ला हु अल्ला हु अल्ला हु’ या कव्वालीवर बेतलेली आहे.
नुसरत फतेह अली खान खुल्या मंचावर फक्त हार्मोनियम व तबला घेऊन जो गोडवा, जी जादू, नज़ाकत, दैवी भावना निर्माण करत त्याला तोड नाही.
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
bsatish17@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment