अजूनकाही
जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक २०२१ या स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सरस कामगिरी केली, त्यासाठी या ऑलिम्पिकची नेहमीच आठवण काढली जाईल. अजून एका कारणासाठी या ऑलिम्पिकची आठवण काढली जाईल, ती म्हणजे कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची गूगलवर जात शोधली गेली. आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात शोधली गेली की, तो सर्च ‘गूगल ट्रेण्ड’ होता. त्यात पुरोगामी महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. लवलिना बोर्गोहेनचा धर्मही गूगलवर ‘टॉप ट्रेण्ड’मध्ये होता. साक्षी मलिकची जात ‘टॉप ट्रेण्ड’मध्ये होती. तीच गत हिमा दासची होती. वंदना कटारियाला जातीवरून हिणवलं गेलं. क्रिकेटर संजू सॅमसनची ‘जात’ शोधली गेली. काही दिवसांपूर्वी सुरेश रैनाने ‘मी ब्राह्मण आहे’, असं ट्विट केलं आहे.
अशा अनेकांची ‘जात’ शोधली गेली, कारण त्यांच्या नावावरून त्यांची ‘जात’ कळत नव्हती. अशी कित्येक नावं आहेत, ज्यांच्या नावावरून त्यांची जात समजते, म्हणून ती शोधली गेली नाही… नाहीतर त्यांची जातही गूगलवर ‘टॉप ट्रेण्ड’ झाली असती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
भारतीय समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कमी सोयी-सुविधेत खेळाडू जीवाचा आटापिटा करून खेळ खेळतात. जेव्हा ऑलिम्पिकपर्यंत मजल मरतात, पदक जिंकण्याची कामगिरी करतात, तेव्हा भारतातील लोक काय करतात? तर त्यांची ‘जात’ शोधतात! लोकांना खेळाडूच्या कामगिरीत, त्याने घेतलेल्या मेहनतीत, केलेल्या संघर्षात काहीही रस नसतो… देशाचे क्रीडा धोरण, त्याचे बजेट हे जाणून घेण्याचीही इच्छा नसते.
भारतीय समाजाला खेळाडूंच्या ‘जाती’मध्ये अधिक रस का असतो, हे समजून घेण्याची गरज आहे. पहिलं म्हणजे सर्वच खेळाडूंची जात शोधली जात नाही. जे खेळाडू जिंकलेले आहेत व ज्यांच्या आडनावावरून समजत नाही, त्यांचीच ‘जात’ शोधली जाते. जे खेळाडू हरलेले आहेत, त्यांची ‘जात’ शोधायला कोणी जात नाही.
याचे कारण जातीव्यवस्थेत दडलेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू जिंकणे, ही बाब देशासाठी, समाजासाठी खूप अभिमानाची असते. संपूर्ण देश अशा खेळाडूकडे अभिमानाने पाहत असतो. ‘जातीं’ना हेच हवं असतं, हीच जातीसाठी उत्तम संधी असते. जातींचा झेंडा उंच करण्यासाठी, आपली जात किती श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी. आपली श्रेष्ठता, अभिमान हा त्या खेळाडूच्या माध्यमातून सिद्ध करायचा असतो!
‘जाती’ला आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी नेहमीच कर्तृत्ववान लोकांची गरज भासते. त्यामुळे सर्वच जातींनी आप-आपले महापुरुष वाटून घेतले. या महापुरुषांच्या विचारांशी जसं जातींना देणंघेणं नसतं, तसंच खेळाडूंच्या कामगिरीशीही. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की, ते आपल्या जातीत जन्माला आले की नाही! जातीत जन्मणे सर्वांत महत्त्वाचं असतं. त्यावरून जातीचा शिक्का लावता येतो. जातीत जन्माला येणे सर्वांत महत्त्वाचे असल्याने बाकी गोष्टी दुय्यम होतात. त्यामुळे खेळाडूची कामगिरी, त्याचे कर्तृत्व हे सर्व दुय्यम होते. त्याचे टोक मग इथपर्यंत जाते की, या जातीत जन्माला आला म्हणून त्या स्तरापर्यंत पोहचू शकला, कामगिरी बजावू शकला... नाहीतर तो तिथपर्यंत पोहचूच शकला नसता. त्यामुळे आमची जात महान आहे, आमच्या जातीमध्येच असे खेळाडू जन्म घेतात, अशी धारणा तयार करण्यात येते.
जात ही श्रेय घेण्यास सर्वांत पुढे असते, मात्र व्यक्तीच्या संघर्षात कुठेच नसते. असते ती व्यक्तीच्या, त्याच्या स्वप्नांच्या, त्याच्या कार्याच्या विरोधात. जवळपास प्रत्येक महापुरुषाला, कर्तृत्ववान महिलेला स्वजातीयांसोबत, जातीविरोधात संघर्ष करावा लागलेला आहे. असे कुठलेही उदाहरण पाहण्यास मिळत नाही की, स्वजातीतील लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या जातीतील खेळाडूंना सहकार्य केले, मदत केली. जातींनी खेळाडू घडवले अशीही उदाहरणे दिसत नाहीत. उलट याच जाती खेळाडूंच्या आड येतात. मुला-मुलींनी इतर जातीतल्या मुला-मुलींशी संबंध ठेवू नयेत, हे सांगणारी ‘जात’च असते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
खेळ ‘जात’ मानत नाही. तो सर्वच जातीतल्या खेळाडूंसोबत खेळावा लागतो. मुलींनी लवकर लग्न करावे, अशी शिकवण ‘जाती’चीच असते. जर ती शिरसावंद्य मानून पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, लवलिना बोर्गोहेन, वंदना कटारिया इत्यादींनी लवकर लग्न केले असते, तर आज त्या खेळाडू म्हणून जिथे पोहचल्या आहेत, तिथे पोहचल्या असत्या का?
सर्व खेळाडूंनी एकप्रकारे जातीची बंधने तोडलेली आहेत. त्याशिवाय ते तिथपर्यंत पोहचूच शकले नसते. समजा उद्या या खेळाडूंनी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह केला, तर आज त्यांचा उदोउदो करणाऱ्या याच जाती त्यांच्या विरोधात बोलायला, घोषणाबाजी करायला मागेपुढे पाहणार नाहीत.
एकाबाजूला श्रेय घेणाऱ्या या जातींनी खेळाडूंना काहीही सहकार्य, मदत केलेली नसते; तर दुसऱ्या बाजूला सरकारने खेळाडूंच्या सोयी-सुविधांसाठी, मैदानासाठी, खेळाचे बजेट वाढवण्यासाठी या जातीयवादी संघटनांनी कधी मोर्चा काढलेला नसतो, धरणे धरलेले नसते, साधा आवाजही उठवलेला नसतो की, कधी मागणीही केलेली नसते. खेळाडूच्या संघर्षाशी ‘जात’ पूर्णपणे अनभिज्ञ असते. जेव्हा खेळाडू जिंकतो, मोठे यश मिळवतो, तेव्हा याच जाती पुढे येतात अन् त्यांना आपल्या जातीत सामावून घेऊन त्यांची कामगिरी ‘दुय्यम’ करून टाकतात. ज्या जातीने काही केले नाही, उलट खेळाडूसाठी अडथळाच बनली, तीच जात श्रेय घेण्यास सर्वांत पुढे असते. याला ढोंगीपणाचा कळस म्हणतात आणि हाच ढोंगीपणा ‘जात’ सर्वांत खालच्या पातळीवर जाऊन आनंदाने करते.
जातीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतिहास, संस्कृती, नायक, कर्तृत्ववान व्यक्ती यांचा आधार नेहमीच घ्यावा लागतो. जाती हे काम शेकडो वर्षे करत आहेत. एकविसाव्या शतकात त्यात भर पडली आहे, ती खेळाडूंची. जिंकलेल्या खेळाडूंना प्रचंड मान-सन्मान मिळतो. त्यामुळे त्याचा वापर जात स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी करून घेणारच.
मुळात श्रेष्ठ-कनिष्ठ यांच्या आधारावरच जातीव्यवस्था टिकलेली आहे. जातिव्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य उतरंड आहे. समजा जर सर्व जाती इतर जातींना आपल्या समान समजू लागल्या, बरोबरीचा व्यवहार करू लागल्या, तर जातींची अन् जातीव्यवस्थेची गरजच पडणार नाही. उतरंडच संपून जाईल. सर्व जातीतील माणसे समान होऊन जातील, त्यांच्यात कसलेही भेद राहणार नाहीत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
जातीला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी श्रेष्ठ-कनिष्ठ या उतरंडीची गरज आहे. आजही ‘जात’ सर्वत्र आहे. जशी बाहेरच्या विश्वात आहे, तशी आपल्या आतही आहे. त्यामुळेच स्वतःला भारतीय म्हणवून घेणाऱ्यांना तुझी जात श्रेष्ठ की माझी, हे दाखवण्यासाठी खेळाडूंचीही गरज आहे.
‘आम्ही भारताचे लोक’ हे आपल्याला अभिमानाने, मनापासून म्हणायचे असेल, खऱ्या अर्थाने माणूस व्हायचे असेल तर ‘जात’ मुळापासून उखडून भिरकावून द्यावी लागेल. नाहीतर ऑलिम्पिक स्पर्धा येत राहतील अन् आपले ‘मागील पानावर पुढे’ चालूच राहील…
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
ऑलिम्पिक स्पर्धा, चिमुकले देश आणि आपला बलाढ्य भारत… एक चमत्कारिक वास्तवसत्य!
२०२१चे टोकियो ऑलिम्पिक झाले; महाराष्ट्रासाठी पुढे काय?
..................................................................................................................................................................
लेखक कुंडलिक विमल वाघंबर लोकायत संघटना (पुणे)चे कार्यकर्ता आहेत.
kundalik.dhok@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment