अजूनकाही
मध्यंतरी एक वेगळी थिअरी वाचनात आली. चित्रपटातले आणि कॉमिक्समधले नायक बहुतेक वेळेस स्थिती स्थापकवादी असतात. त्यांना सध्या जी व्यवस्था चालू आहे, तशीच चालू ठेवण्यात रस असतो. कारण ती व्यवस्था तशीच चालू राहण्यात त्यांचे हितसंबंध दडलेले असतात. याउलट खलनायकांचं असतं. त्यांना सध्याची अन्यायकारी व्यवस्था बदलायची असते. त्यांच्याकडे जगासाठी एक 'व्हिजन' असते. त्या अर्थानं ते क्रांतिकारी असतात आणि क्रांतिकारी कुठल्याही व्यवस्थेचे शत्रूच असतात. मात्र अनेकदा नायक कोण आणि खलनायक कोण हे इतिहास किंवा कलाकृती कोण लिहीत आहे यावर ठरत असतं. "जोपर्यंत सिंह इतिहास लिहायला लागणार नाहीत, तोपर्यंत प्रत्येक कथा शिकाऱ्यांचंच उदात्तीकरण करत राहील," या अर्थाची एक म्हण आहे.
भारतासारख्या गुंतागुंतीच्या देशात तर प्रत्यक्ष आयुष्यात किंवा पौराणिक कथांमध्ये किंवा सिनेमात नायक कोण आणि खलनायक कोण हे अनेकदा सापेक्ष असतं. म्हणजे उत्तर भारतात रावण वधाचा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि दक्षिण भारताच्या अनेक भागात रावणाला नायक समजलं जातं. औरंगजेबाला आपल्याकडे खलनायक समजलं जातं, पण काही लोकांना तो संतपुरुष वाटतो!
चित्रपटातले खलनायक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय का आहेत, याचं रहस्य याचं कारणमीमांसेत दडलं आहे. कारण आपल्या देशातला एक समूह स्वतःला खलनायकामध्ये बघत असतो. बहुतेक वेळा या खलनायकाला शेवटी नायिका मिळत नाही. नायक हिरोगिरी करून खलनायकाची धुलाई करून नायिकेला घेऊन जातो. देशातल्या बहुसंख्य लोकांना आपण ज्याच्यावर प्रेम करतो असा तो /ती मिळत नाही. आपल्या चित्रपटातला नायक गोरा गोमटा आणि सर्वगुणसंपन्न असतो. उलट खलनायक बऱ्याचदा बुटका, जाड आणि शारीरिक व्यंग असणारा असतो. थोडक्यात, नायकापेक्षा खलनायकच अनेकदा पडद्यावर प्रेक्षकांना 'आपल्यातला' वाटत असतो.
अगदी आता आतापर्यंत खलनायक भारतीय सिनेमाचा अविभाज्य भाग होते. खलनायकाशिवाय भारतीय सिनेमाचा विचार करणं अशक्य होतं. म्हणजे भारतीय प्रेक्षक 'गब्बर'शिवाय ‘शोले’चा विचार करू शकत नाहीत. ‘मिस्टर इंडिया’मध्ये मोगॅम्बो आणि त्याच्या 'मोगॅम्बो, खुश हुआ’सारखे तकिया कलाम वगळले तर काय उरतं?
आपल्याकडे पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांचा प्रेक्षकांवर कसा परिणाम होतो, याचं मापक म्हणजे खलनायक रंगवणाऱ्या नटांना येणारे अनुभव. गुलशन ग्रोवरने त्याचा एक अनुभव सांगितला होता. एकदा विमान प्रवासात त्याच्या बाजूला बसलेल्या प्रवाशानं सीट बदलून देण्याची विनंती एअर हॉस्टेसला केली होती. प्राणने एकदा खंत व्यक्त केली होती की, त्याच्या पडद्यावरच्या भूमिकांमुळे देशातल्या पालकांनी आपल्या मुलाचं नामकरण ‘प्राण’ असं करणंच सोडून दिलं आहे. आताही मी ‘श्रद्धा कपूर एवढी निष्पाप आणि निरागस दिसते, तर ती शक्ती कपूरसारख्या माणसाची मुलगी कशी होऊ शकते?’ अशा अर्थाचा एक मॅसेज वाचत आहे.
भारतीय जनमानसावर एवढा प्रभाव टाकून असणारे खलनायक हळूहळू अस्तंगत होत नाहीत, पण बहुतेक सिनेमांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुपस्थित दिसत आहेत. 'सिंघम'मधला प्रकाशराजचा अपवाद वगळता कुठला हार्डकोअर खलनायक तुम्हाला आठवतो, असा प्रश्न विचारला तर बहुतेक प्रेक्षकांकडे त्याचं उत्तर सापडणार नाही. मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचे हिट सिनेमे बघितले तर तुम्हाला हाताच्या बोटावर सापडतील इतके खलनायक दिसतील. काय कारणं असतील खलनायकाचा टक्का कमी होण्याची?
याचं मुख्य कारण म्हणजे एकूणच सिनेमा क्षेत्रातली प्रगल्भता वाढत चालली आहे. कोणताही माणूस पांढरा किंवा काळ्या रंगात नसतो, तर प्रत्येक जण 'ग्रे' शेडमध्ये असतो, ही जाणीव नवीन लेखक आणि दिग्दर्शकांमध्ये वाढत चालली आहे. संपूर्ण माणूस कधीच चांगला किंवा वाईट असा नसतो, तर तो चांगल्या-वाईट गुणांचं संमिश्रण असतं हे कळून घेण्याइतपत प्रेक्षकही प्रगल्भ झाला आहे. त्यामुळे पूर्णपणे काळ्याकुट्ट रंगात रंगवलेले खलनायक आजकाल पटकथेच्या पायरीवरच लिहिले जात नाहीत.
सामान्यपणे लेखक -दिग्दर्शक खलनायकाचा उपयोग कथानकात कॉन्फ्लिक्ट (Conflict) निर्माण करण्यासाठी करतात. पण तुम्ही सध्याचे चित्रपट पाहिले तर असं दिसून येईल की, अनेकदा आपलं ज्याच्यावर नियंत्रण नाही अशी परिस्थितीच कथानकात खलनायक बनून समोर येते. ‘मसान’चं उदाहरण घेण्यासारखं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला देवी एका लॉजमध्ये पोलिसांच्या रेडमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडली जाते आणि शालूचं अपघातात मरण ही नियती आहे आणि तीच ‘मसान’मध्ये खलनायक आहे. इथं वेगळ्या खलनायकाची गरजच उरत नाही.
सध्या नायकच 'अँटी हिरो' रंगवण्यात स्वारस्य दाखवत आहेत. नुकताच येऊन गेलेला शाहरुखचा ‘रईस’ हे याचं एक उदाहरण. शाहरुख खानने यापूर्वीही ‘डर’ आणि ‘बाजीगर’सारख्या चित्रपटांमधून असा अँटी हिरो रंगवला आहे. सैफ अली खान, आमीर खान, अजय देवगण, जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आजच्या जवळपास सर्व नटांनी अँटी हिरो रंगवला आहे. त्यांच्या अँटी हिरोला प्रेक्षकांनी पसंतीची दादही दिली आहे. त्यामुळे कथानकातला खलनायकाचा वावर कमी झाला आहे.
सध्याच्या चित्रपटांचं अर्थकारणही खलनायकाचा टक्का कमी होण्याला कारणीभूत आहे. सध्या मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघणारा उच्चभ्रू वर्ग सिनेमाच्या अर्थकारणाच्या केंद्रभागी आला आहे. त्याची आर्थिक क्षमता खूप आहे ही त्या वर्गाची जमेची बाजू. या शहरी जाणिवा असणाऱ्या लोकांना भडक, उथळ, एक कुठलातरी तकिया कलाम बोलणारे खलनायक आवडत नाहीत. हे लोक 'ए दिल है मुश्किल' किंवा 'कपूर अँड सन्स'सारखे चित्रपट बघणं पसंद करतात. त्यांना कंफ्युजड पात्र असणाऱ्या चॉकलेटी प्रेमकथा आवडतात. अर्थात हे वाईट नाहीये. प्रत्येकाची आपली आवडनिवड असते. पण या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून पटकथा लिहिल्या जात असल्यामुळे खलनायक कथानकांमधून हद्दपार होत चालले आहेत.
नोलानच्या ‘बॅटमॅन’ त्रयीमधल्या ‘द डार्क नाईट’ चित्रपटात जोकर हा खलनायकच केंद्रस्थानी आहे. तो एका प्रसंगात बॅटमॅनला 'मी माझ्याशिवाय अपूर्ण आहे' असं म्हणतो. ‘मेगामाइंड' नावाचा एक अफलातून अॅनिमेटेड पिक्चर आहे. तो पूर्ण चित्रपट एका दुष्ट अतिबुद्धिमान खलनायकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूमधून घडतो. त्या खलनायकाचा एक सुपरहिरो प्रतिस्पर्धी असतो. काही कारणांनी तो सुपरहिरो नाहीसा होतो. तेव्हा सगळ्यात खिन्न होतो, तो हा खलनायक. त्याचा एक युक्तिवाद असतो की, माझा तोलामोलाचा प्रतिस्पर्धी गेला. आता मी यापुढे कुणाशी लढू? आता माझ्या आयुष्याचा हेतू काय?
खलनायक नाहीसे होत असल्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या प्रेक्षकांना आवडणारा ‘लार्जर दॅन लाईफ’ नायक सध्या तरी पोरका आणि हताश झाल्यासारखा वाटत आहे हे खरं. 'जब किसी गाव में बच्चा रोता है, तो माँ कहती है, बेटा सो जा वरना गब्बर आ जायेगा." किंवा 'मोगॅम्बो खुश हुआ'सारखे जबरदस्त खलनायकी संवाद पडद्यावर ऐकू येण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे.
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment