मी छायाचित्रं काढायला सुरुवात केली आणि वेताळ टेकडीवरील निसर्गाने त्याचे सौंदर्य उलगडून दाखवायला...
संकीर्ण - ललित
श्रीनिवास जोशी
  • सर्व छायाचित्रे - श्रीनिवास जोशी
  • Tue , 10 August 2021
  • संकीर्ण ललित व्हिन्सेन्ट व्हॉन गॉग भगवी टणटणी पांढरी टणटणी सुबाभूळ श्रावण आषाढ नासिर फराज मॉर्निंग फ्लॉवर टाकळा तांबा ब्रह्मकमळ.

“If you truly love nature, you will find beauty everywhere.” - Vincent van Gogh

(तुमचे निसर्गावर जर खरे प्रेम असेल तर तुम्हाला सौंदर्याचा प्रत्यय सर्व चराचरामध्ये येईल, सर्वत्र येईल - व्हिन्सेन्ट व्हॉन गॉग)

व्हॉन गॉग हा मोठा चित्रकार होता आणि देव म्हणा किंवा निसर्ग म्हणा हा तर आद्य चित्रकार आहे. या आद्य चित्रकाराने जे काही रंगवून ठेवले आहे आणि जे तो रोज अविरतपणे रंगवतो आहे, ते व्हॉन गॉगला जसे दिसले तसे आपल्यासारख्या सामान्य माणसाला दिसणे केवळ अशक्य आहे. मोठ्या चित्रकारासारखी रंगरूपाची संवेदना आपल्या सगळ्यांना कशी असेल?

पण तरीही आपण या आद्य चित्रकाराच्या काही चित्रांचा पाठलाग करायला काय हरकत आहे?

मी पुण्याच्या वेताळ टेकडीवर फिरायला जातो. एके दिवशी मी चालताना छायाचित्रं काढायला सुरुवात केली. आणि टेकडीवरील निसर्गाने त्याचे सौंदर्य उलगडून दाखवायला सुरुवात केली. विविध झाडे, त्यांची पाने, फुले. त्यांच्या पालवीचे रंग. फुलांचे विविध आकार आणि रंग. एक एक इंद्रगुंफा माझ्यासमोर उघडली गेली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पावसाळा आला आणि टेकडीवर झुडुपांवर फुलांची बरसात झाली. आता श्रावण आला आहे. आता टेकडीवर झुडुपांच्या फुलांबरोबरच गवतफुलेसुद्धा उगवून येतील. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे खरे गवतफुलांचे दिवस.

पाऊस आला की, सगळ्यात पहिल्यांदा फुलते टणटणी. काही लोक तिला ‘चुनडी’ म्हणतात, काही लोक तिला ‘रंगबावरी’सुद्धा म्हणतात. टणटणीच्या फुलांची मी मायक्रो लेन्सवर छायाचित्रं घेऊ लागलो आणि साध्यासुध्या टणटणीची फुले इतकी सुंदर आहेत, हे प्रथमच कळले.

हे भगव्या टणटणीचे फूल.

तिच्या रंगांचा फ्रेशनेस, त्यांची झळाळी, तिच्या पाकळ्यांवरचे व्हेलव्हेट सगळेच बघण्यासारखे. भगवा आणि पिवळा रंग एकत्र आले की, होणारी गंमत विस्मयचकित करणारी. या फुलाच्या कळ्या छोट्या असताना लाइट शेडच्या मरून रंगाकडे झुकणाऱ्या असतात. थोड्या मोठ्या झाल्या की, त्या डार्क मरून रंगाच्या होतात. यातून मग भगवी आणि पिवळी फुले उमलतात. पहिल्यांदा सर्वांत बाहेरचे कडे उमलते, मग आतले, मग त्याच्या आतले. फुलाच्या मागून पावसात भिजून ताजीतवानी झालेली डार्क हिरव्या रंगाची पाने डोकावत राहातात. हा हिरवा रंग आद्य चित्रकाराच्या या चित्राला पूर्णत्व देतो. 

अशीच गोष्ट पांढऱ्या टणटणीची.

शुभ्र वसना सुवर्ण हृदया. पाकळ्यांचा अफाट पांढरा आणि त्यांच्या हृदयाशी एक प्रसन्न पिवळा. तोसुद्धा मध्यभागी गडद आणि कडेला फिकटसर होत जाणारा. गुच्छाच्या मध्यभागी पिस्ता रंगाकडे झुकलेल्या पिवळ्या कळ्या आणि अगदी मध्यभागी अजून छोट्या हिरव्या कळ्या. बघत राहावे असे चित्र...

पुढे चालत जावे तर पुढे वनखात्याने लावलेली सुबाभूळ दृष्टीला पडते. तिच्यावर पांढऱ्या आणि पिंक रंगाचे गोंडे उमललेले दिसतात.

मध्यभागी हिरवट-गुलाबी गाभा. त्यावर शुभ्र दंडिका उगवून आलेल्या. एक सुंदर गोंडा तयार झालेला. या दांडिकांच्या टोकावर हस्तिदंती रंगाचे परागकोश. अगदी छोटे करंगळीच्या नखाएवढे गोंडे, पण सौंदर्य किती!

या फुलाच्या कळ्यासुद्धा नितांत सुंदर असतात.

मुगाच्या दाण्याएवढी कळी. पण नजाकतीने परिपूर्ण. गुलाबी, पांढऱ्या आणि हिरव्या छटा किती हलक्या हातांनी भरलेल्या. हा गुलाबी खरं तर वेगळाच गुलाबी आहे. गुलाबी रंगामध्ये हलका मरून रंग मिसळलेला. हिरवा पिस्त्याच्या रंगाकडे झुकलेला. आणि पांढरा रंग रुपेरी रंगाकडे कडे झुकलेला. आणि या सगळ्यात मोठी गंमत म्हणजे या सगळ्या छटांवर एक चमक विखुरली गेलेली! संपूर्ण नजरबंदीचा एक खेळ!

तसं बघायला गेलं तर मायक्रो लेन्सशिवाय हे सौंदर्य दिसणे केवळ अशक्य. मग मनात विचार येतो - कुणासाठी रचले गेले असेल हे सौंदर्य?

श्रावण महिना आला की, फुलेच नाही तर साधे गवतसुद्धा आश्चर्याचा धक्का देते.

हा गेल्या श्रावणातला फोटो.

आषाढात गवत उगवून घोट्यापर्यंत येते. श्रावणात ते चांगलेच तरारते.

या तरारलेल्या हिरव्या गवतावर पोपटी फुटवे येतात. हा पोपटी रंग इतका जिवंत असतो की, ऊन नसतानाही त्यावर ऊन पडले आहे, असे वाटत राहते. हे असे गवत बघितले की, मला नासिर फराज यांच्या गझलेतील दोन ओळी आठवत राहतात -

साँवन मास की धूप सा गोरी तेरा रूप सलोना ।

एक झलक में कर गया रोशन मन का कोना कोना।

मनातला कोपरा न् कोपरा रोशन करणारा श्रावणातल्या गवताचा स्वयंप्रकाशी पोपटी रंग! या स्वयंप्रकाशी गवतावरून आठवले. निसर्ग अनेकदा प्रकाश तयार केला गेल्याचा आभास विविध रंग वापरून तयार करतो.

मॉर्निंग फ्लॉवर!

हलक्या पिवळ्या रंगाचा गाभारा. त्यात परागकोश आणि स्त्रीकोश. पिवळा रंग संपतो, तिथे हलकासा पांढरा रंग. तो पांढरा रंग संपता संपता डार्क जांभळा हळूहळू सुरू होतो. या मधल्या पांढऱ्या रंगामुळे पिवळ्या दिव्यातून प्रकाश फाकतो आहे असे वाटत राहते. पांढऱ्यातून सुरू झालेल्या डार्क जांभळ्या रंगांच्या पाच त्रिकोणी पाकळ्यांचे चक्र तयार होते. ते पुढे फुलाच्या हलक्या पारव्या रंगामध्ये विरून जाते.

या अशा सुंदर मॉर्निंग फ्लॉवरचे पृथ्वीवर एक हजार प्रकार आहेत. त्या आद्य चित्रकाराच्या सृजनशीलतेला कुठलीही मर्यादा नाही.

टाकळा.

टाकळ्याचे फूल इतर फुलांसारखे आकाशाकडे तोंड करून उमलत नाही. बहुतेक वेळा ते फांदीशी काटकोन करून उमलते. त्यात ते फूल एवढेसे. अर्ध्या नखाएवढे. त्यामुळे त्याच्या आतला भाग वरच्या बाजूने अजिबात दिसत नाही.

खाली वाकून, कंबर मोडून याची छायाचित्रं काढावी लागतात. फुलाच्या बाहेरच्या बाजूला, ब्रिलियंट सोनेरी-पिवळा रंग आणि त्याला लाईट हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट अशी थीम असते. या सोनेरी पिवळ्या आणि मंद हिरव्या रंगांमध्ये पांढरा आणि रूपेरी रंग मिक्स केलेले असतात.

फुलाच्या आत कमी प्रकाशामुळे पाकळीचा सोन-पिवळा अजून डार्क होतो. स्त्री कोशाच्या सोन-पिवळ्यावर पराग कोशाचा अत्यंत लाइट पिस्ता रंगाचा कॉन्ट्रास्ट तयार केलेला असतो. परत त्या पिस्ता कलरमध्ये टोकाला परत थोडा ब्राइट सोन-पिवळा भरलेला असतो.

सोन-पिवळा, पिस्ता, हिरवा आणि रूपेरी या सगळ्या रंगांचा एक अप्रतिम खेळ म्हणजे सर्वत्र दिसणाऱ्या साध्यासुध्या टाकळ्याचे फूल.

गवताचा तुरा.

चतुःश्रृंगीच्या टेकडीवर एक विस्तीर्ण माळ आहे. गवताच्या कित्येक प्रजाती आहेत या माळावर. श्रावण सुरू होईपर्यंत बहुतेक गवते तुऱ्यावर येतात. तपकिरी, काळे, लाल, पांढरे, कित्येक प्रकारचे तुरे. यातील बहुतेक तुऱ्यांची बांधणी अत्यंत नाजुक, विरळ आणि सूक्ष्म असते. त्यांना कॅमेऱ्यात कसे आणायचे ते अजून मला कळलेले नाहिये.

हा वरील छायाचित्रामधला तुरा तर भन्नाटच. इतका नाजुक, इतका ग्रेसफुल! वाऱ्यावर हलताना त्याची लय काही भारीच होती. त्याच्या फांद्यांची वळणे. त्याचे वाऱ्याच्या प्रत्येक लहरीवर पोज देणे. सगळेच अवर्णनीय होते. मी खूप वेळ बघत राहिलो. हा हलत इतका होता की, छायाचित्र निघत नव्हते. मग मी व्यावसायिक छायाचित्रकार खाली जमिनीवर मांडी वगैरे घालून बसतात, तसा बसलो. मग थोड्या वेळाने दोन-तीन बऱ्यापैकी छायाचित्रं निघाली. वरचा त्यातलाच एक.

आद्य चित्रकाराने या गवताच्या तुऱ्यात अर्धनारीनटेश्वराचे नर्तन चित्रित केले आहे असे मला वाटत राहिले आहे.

तांबा.

पांढरे शुभ्र आणि अत्यंत नाजुक फूल. पोपटी रंगाच्या रोपावर अत्यंत पातळ पाकळी असलेले हे फूल. पांढऱ्याशिवाय दुसरा कुठला रंगच नाही. वरच्या भागात एक शुभ्र रेशमी तुरा. रोपटे वाढत जाते, तसे फुटणाऱ्या प्रत्येक पानाच्या कोनातून पोपटी कळ्या बाहेर पडतात. त्यातून या शुभ्र सौंदर्य-संहिता उमलून येतात.

संपूर्ण रोपावर पांढऱ्या फुलांचा एक सर गुंफला जातो. करंगळीच्या अर्ध्या नखाएवढी छोटी फुले. त्यात छोट्याश्या आकारात एवढी सगळी कलाकुसर. संध्याकाळच्या उन्हात या फुलांचा पांढरा रंग थोडा ब्राइट होतो. ढग आले की, मंद प्रकाशात फुलाच्या तिन्ही डायमेन्शन्स उठून दिसतात. आद्य चित्रकाराने केलेला हा एक भन्नाट प्रयोग!

कॉन्ट्रास्टसाठी कुठलाही रंग वापरलेला नाही. पाकळीवर नाजुक सुरकत्या असतात. त्यांच्या सावल्या पडतात. तोच कॉन्ट्रास्ट. आणि मागे पोपटी रंग असतोच की, कॉन्ट्रास्ट म्हणून.  मराठीत या फुलाला ‘तांबा’ म्हणतात, संस्कृतमध्ये ‘द्रोणपुष्पी’ आणि इंग्रजीत ‘ल्यूकस इंडिका’. या फुलाला सगळ्यात चांगले नाव हिंदीने दिलेले आहे – ‘छोटा हल्कुसा’.

ब्रह्मकमळ.

टेकडीवरून घरी यावे तर बाल्कनीत एक ब्रह्मकमळ उमलेले असते. सरस्वतीच्या वस्त्रासारखा शुभ्र रंग. प्रसन्नता घेऊन येणारा.

एखाद्या गुहेतून पाण्याच्या धारा याव्यात तशा फुलाच्या गाभाऱ्यातून परागकोशांच्या दंडिका उसळून आलेल्या. पारदर्शी पांढऱ्या रंगाच्या. प्रत्येक दंडिका शेवटी एक मोहक वळण घेते आणि एक हस्तिदंती परागकोश धारण करते. हस्तिदंती रंगाची एक लाट तयार होते.

या सगळ्याच्या खाली एक पारदर्शी रंगाचे स्त्री-कोशाचे चक्र. बारा पाकळ्यांचे. मनात येते की, फलधारणा तर करायची आहे. एक साधा परागकोश आणि एक साधा स्त्री-कोश एवढे पुरेसे नाही का? रूपाचा एवढा अवर्णीय सोहळा कशासाठी? सौंदर्याची एवढी झळाळी कशासाठी? सौंदर्य हे त्या निर्मात्याचे मूल लक्षण आहे म्हणून?

तो निर्माता किंवा तो चित्रकार हा सत्य आहे, शिव आहे आणि सुंदर आहे असे म्हटले गेले आहे. या तीन तत्त्वातले सौंदर्य हे तत्त्व आपल्या प्रत्ययाला सहजपणे येते. बाकीची दोन तत्त्वे प्रत्ययाला येणे, हे मोठे अवघड काम!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

या साऱ्या प्रवासाची सुरुवात करता यावी म्हणून या विश्वात ठिकठिकाणी ही सारी सौंदर्यद्वारे उघडली गेली असावीत काय? तुम्ही कितीही निरीश्वरवादी असा, सौंदर्य तुम्हाला आश्चर्यचकित करते. तुम्ही म्हणता - ज्या कोणी हे सारे केले आहे तो ग्रेट आहे. ही निर्मितीविषयीच्या आदराची सुरुवात असते. तुम्ही पुढे प्रवास सुरू करा न करा. सौंदर्य तुम्हाला क्षणभर तरी तुमच्या स्वतःमधून बाहेर काढते. जो कोणी तो निर्माता असेल, त्या निर्मात्याच्या पायापाशी तुम्हाला क्षणभर का होईना नेऊन उभे करते. कोण जाणे, जे कोणी लोक या निर्मात्याच्या शोधाच्या प्रवासात पुढे जात असतील त्यांच्यातील काहींच्या प्रवासाची सुरुवात अशाच एखाद्या सौंदर्यशाली चित्राच्या द्वारातून होतही असेल.

खरं तर हे छायाचित्र ब्रह्मकमळाचं नाही. ब्रह्मकमळ म्हणजे ‘सॉसुरिया ऑब्व्हॉलाटा’. छायाचित्रातलं फूल आहे- ‘एपिफायलम ऑक्झिपेटलम’. पण आपल्याकडे बोली भाषेत यालाच ‘ब्रह्मकमळ’ म्हणतात, म्हणून त्याचा उल्लेख तसाच केला आहे.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Umeshrao K

Wed , 11 August 2021

मुळात फुलं हा विषयच नाजुक आणी सुंदर आहे आणी निसर्गाची देणगी आहे, तुझ्या विक्रुत शब्दांच्या वर्णनाची गरजच नाही. लक्षात ठेव पुणेकरांना ज्ञान पाजळु नको.


Umeshrao K

Wed , 11 August 2021

हा लेखक इतका मुर्ख असेल असे वाटले नव्हते, म्हणे ह्याने छायाचित्रे काढली आणी निसर्गाचे सौदर्य उलगडले ...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......