काही दिवसांपूर्वी हेमांगी कवी या मराठी अभिनेत्रीने ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही फेसबुक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. त्यावर तरुण-तरुणींच्या व इतरांच्याही असंख्य प्रतिक्रिया आल्या. उलटसुलट मतमतांतरांचा धुरळा उडाला. एका तरुण, ग्लॅमरस अभिनेत्रीने एका महत्त्वाच्या, परंतु नाजुक विषयावर व्यक्त केलेले हे मत, त्यामुळे हे होणारच होते. खरे तर तिचा मुद्दा अगदीच स्वीकारार्ह होता. छाती आवळणाऱ्या ब्रेसिअर्सचा स्त्रियांना त्रास होतो. मोकळा श्वास घेता येत नाही. म्हणून त्यांच्यावर सतत ब्रेसिअर घालण्याचे बंधन नसावे. त्या तशा राहिल्या आणि कपड्यांमधून स्तनाग्रे दिसली, किंवा स्तनांच्या हलचाली दिसल्या, तर त्याचे कुणीच – पुरुषांनीही - काही वावगे वाटून घेऊ नये. तो शरीराचा एक भाग आहे, कपड्यांमधून दिसला तर दिसला. पुरुषांचे अवयव नाही का दिसत? त्याचे आपण कुठे काय वाटून घेतो?, असे ती म्हणते. “मी तर घरी व कधीकधी बाहेरही अशी राहते. घरचे कुणीच त्याबद्दल वाटून घेत नाहीत. आमच्या नात्याबद्दल त्यांच्या मनातल्या कल्पना स्पष्ट आहेत,” हेही ती आवर्जून नोंदवते.
हेमांगीने अगदी साध्या सरळ, तरुणाईच्या नेहमीच्या भाषेत भाष्य केले आहे. आपले शरीर आहे, ते निसर्गाने दिलेले आहे, ते तशाच स्वाभाविकपणे वापरले पाहिजे, असे तिचे म्हणणे. तिचे फोटोंमधील गेश्चर्सही शरीराचे अकारण प्रदर्शन करताना वा त्याची अकारण लज्जा बाळगताना दिसत नाहीत. हा सहजभाव आजच्या युवा पिढीचे वैशिष्ट्य आहे. तो तिने जपला, एवढेच नव्हे तर पोस्टमधून तो मुखर केला याबद्दल अभिनंदन!
दुसरे म्हणजे हेमांगीच्या पोस्टला अनेक मुलींनी आणि मुलग्यांनीसुद्धा जो प्रतिसाद दिला आहे, तोही उत्साहवर्धक आहे. “आम्हाला स्त्रीच्या या दुःखाबद्दल नव्यानेच कळले. ताई, तू बरोबर सांगितलेस. तू मनाला योग्य वाटते ते बोलत रहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,” असे अनेकांनी म्हटले आहे. मागच्या (आमच्या) पिढीतील पुरुषांप्रमाणे त्यांनी “तो बायकांचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय करायचेय?” असे वरकरणी म्हणून चोरून स्त्रियांच्या छातीकडे पाहण्याचा दुटप्पीपणा केला नाही, याबद्दल त्यांचेही अभिनंदन. हे सारे वाचत असताना मला जाणवले की, आधीच्या काही पिढ्या व आमची पिढी मात्र स्वतःच्याच शरीराचा भार घेत जगली. कुठून आला हा बोजा?
पितृसत्ता
आपल्या देशावर आणि जगावर पितृसत्तेचा अंमल अनेक शतकांपूर्वीच सुरू झाला. शिकार आणि वस्तू गोळा करण्याच्या युगातून शेतीकडे वाटचाल सुरू झाली, तेव्हा माणूस भटकेपण सोडून एका जागी स्थिरावला. त्याला जमीन कायम आपल्याकडे राहावी अशी गरज वाटू लागली. त्यातून खाजगी मालकीची कल्पना साकारली. शिकारीसाठी घराबाहेर पडणारा पुरुष जमिनीच्या मालकाच्या रूपात स्वतःला बघू लागला. स्त्रीला होणारे मूल हे पुरुषापासून होते, हा शोधही तेव्हा लागलेला होता. त्यापूर्वी स्त्रीकडे असलेल्या काही दैवी शक्तींमधून ती प्रजनन करते असा समज होता आणि स्त्रीला देवी मानण्यातही येत होते. मात्र पुरुषांच्या सहभागाशिवाय बाईला मूल होत नाही, हे लक्षात आल्यावर मग आपल्या जमिनीची मालकी आपल्याच अपत्यांना (त्यातूनही मुलग्यांनाच) जावी हा विचार पुढे आला. आपल्यासोबत राहणाऱ्या महिलेला झालेले मूल हे आपलेच असले पाहिजे, असे त्याला वाटू लागले.
अशा रीतीने एका अत्यंत निर्घृण व विनाशकारी प्रथेचा जन्म झाला, जिचे नाव पितृसत्ता. स्त्री म्हणजे फक्त तिचे शरीर आणि त्यावर मालकी पुरुषाची हे समीकरण म्हणजे पितृसत्तेची देणगी होय. आपल्या शरीरावर अनेकांनी हक्क दाखवून आपला छळ करू नये म्हणून स्त्रीने एकालाच जाहीरपणे, वाजतगाजत मालकी बहाल करणे (विवाहसंस्था), विवाहानंतर स्त्रीने पुरुषाच्या घरी जाणे, मुलांना वडिलांचे नाव देणे यांसारख्या स्वामित्वनिदर्शक प्रथांची सुरुवात झाली.
भाषाही तशीच तयार झाली, कारण भाषा हे संस्कृतीचेच पदचिन्ह. नवऱ्यासाठी मालक व स्वामी, विवाह न करता पुरुषासोबत राहणाऱ्या स्त्रियांना ‘पतिता’, ‘कुलटा’ आणि विवाहाशिवाय झालेल्या अपत्याला ‘अक्करमाशा’ हे शब्दही त्यातूनच उद्भवले. ज्याच्या वर्षाला बारा नसून फक्त अकरा मास आहेत, अशा अर्थाचा हा न्यूनत्वसूचक शब्द आहे. पितृसत्तेचा उदयापासूनचा इतिहास पाहिला, तर फार कमी स्त्रियांना आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेऊन मोकळेपणाने जगता आलेले आहे. ज्यांना ते शक्य झाले, त्या एकतर फार प्रतिभावान, बंडखोर होत्या किंवा त्यांना चांगले बाप-भाऊ-नवरे लाभले होते.
स्त्रीचे शरीर हे पुरुषाच्या मालकीचे समजण्याच्या पद्धतीने अनेक कुप्रथांना जन्म दिला. पुरुष हा वृत्तीनेच मुक्त (मोकाट) आहे, हे मिथक तिने रुजवले आणि त्याला स्वतःकडे आकर्षून घेण्याची, स्वतःला बांधून ठेवण्याची जबाबदारी स्त्रीवर सोपवली. शरीराची साजसज्जा करायची, पण ती फक्त आपल्या मालकासाठी, अन्य (गैर) पुरुषांनी आपल्याकडे बघायला नको, ही जी विचित्र जबाबदारी स्त्रीवर टाकण्यात आली, तिने तिची अत्यंत कुचंबणा केली. लखलखीत तांबडेलाल कुंकू कपाळावर लावणे, भांगात भरणे, मंगळसूत्र वा नथ घालणे या प्रथाही पितृसत्तेतूनच आल्या, कारण त्या स्त्रीची सौंदर्यवृद्धी करण्याच्या नावाखाली सौभाग्याची संकल्पना पुष्ट करतात. ही सारी सौभाग्यचिन्हे तिची मालकी एकाच पुरुषाकडे असल्याचे दाखवतात, तिचे क्रयवस्तू रूप ठळक करतात.
पितृसत्तेचे विविध निदर्शक
जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींनी पितृसत्तेला आपापल्या आवडीप्रमाणे पेहराव व खतपाणी घातले. अरब देशांमध्ये स्त्रीचा केशसंभार हा तिचे सर्वोच्च सौंदर्यलक्षण मानला गेला आणि तिने बाहेर पडताना, इतकेच काय तर घरातही इतर पुरुषांसमोर केस झाकूनच आले पाहिजे असा नियम बनला. आता कपाळावरचे केस, अजिबात दिसू द्यायचे नाहीत म्हणजे ते घट्ट, कपाळापर्यंत बांधणे आलेच. पुढे सारा चेहराच झाकण्याची पद्धत आली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अरबस्तानात इस्लामचा उदय झाला आणि ही प्रथा इस्लामबरोबरच इतर ठिकाणीही पसरत गेली. चीन हा खरे तर आपल्यासारखा कृषिप्रधान देश होता. शेतीत स्त्रियांना बरोबरीचे स्थान असते. परंतु सामंतशाहीच्या काळात तेथे स्त्रियांना गौणत्व देण्यात आले. सामंतांच्या स्त्रिया निव्वळ पुरुषांचे ‘स्टेटस सिम्बॉल’ बनून घरात अडकून पडल्या. तेव्हाच एक दुष्ट प्रथा सुरू झाली – स्त्रियांची पावले जेवढी कोमल, लहान असतील तेवढ्या त्या सुंदर – असे मानण्याची. त्यातून लहान मुलींचे पाय रात्रंदिवस लाकडी बुटांमध्ये बांधून ठेवले जाऊ लागले, जेणे करून मुली वयात आल्यावर ते सुकुमार दिसावेत. अशा पावलांमुळे त्यांना चालणेही अवघड व्हायचे, पण पुरुषी नजरांना सुंदर दिसणे इतके महत्त्वाचे होते की, त्यापुढे त्यांच्या कमजोरीला कोण विचारतो?
मग हळूहळू स्त्रियांचे कष्टकरी स्त्रिया आणि ‘खास वरच्या वर्गासाठी’ घडवलेल्या स्त्रिया असे वर्गीकरण झाले. ‘द गुड अर्थ’ (The Good Earth) ही या पार्श्वभूमीवरील जगप्रसिद्ध कादंबरी आहे. पर्ल बक यांना तिच्यासाठी १९३८ सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. कादंबरीची नायिका ओ लान ही मूर्तिमंत स्त्री-शक्ती आहे. एका साधारण स्थितीतील शेतकऱ्याची बायको म्हणून ती आयुष्यभरात ८- १० बाळंतपणे झेलून कुटुंबाला मनुष्यबळ पुरवते, अनेक संकटांमधून पराकोटीच्या हिंमतीने व मेहनतीने मार्ग काढते, भातशेतीत पावसापाण्यात राबून सर्वांचे पोषण करते आणि कुटुंब ऊर्जितावस्थेला नेऊन ठेवते. तिचा पती वांग हा मात्र सधन शेतकरी झाल्यावर ज्या बाईला ‘ठेवतो’, तिचे वर्णन कादंबरीत ‘ती मेण्यातून आली आणि उतरल्यावर इतरांच्या आधाराने तिच्या महालाकडे गेली’ असे केले आहे.
खुद्द ओ लानसुद्धा आपल्या मुलींचे पाय बांधते, कारण तिला आता त्यांना मोठ्या घरात देण्यासाठी तयार करायचे आहे. त्या संपूर्ण कुटुंबाची गरीबीकडून सधनतेकडे होणारी वाटचाल स्त्रियांसाठी कशी विनाशकारक आहे, याचे प्रत्ययकारक चित्रण कादंबरीत केलेले आहे.
आपल्या देशावर १५० वर्षे राज्य करणारा आणि आपल्यापैकी अनेकांच्या मनातील छुपा आकर्षणबिंदू असलेला इंग्लंड हा देशही पूर्वीपासून पितृसत्ताक आहे. व्हिक्टोरियन काळात स्त्रियांचे पाय हे पुरुषांना विचलित करण्याचे स्त्रियांचे बलस्थान मानले गेले. त्यामुळे पायांवर अनेक आवरणे चढवण्याची पद्धत पडली. व्हिक्टोरिया राणी तिच्या घरच्या नाताळ उत्सवासाठी कशी तयारी करते याचा १८४८ सालचा एक व्हिडिओ सध्या यू-ट्यूबवर आहे. तो किती विश्वसनीय आहे माहीत नाही, परंतु त्यामध्ये ती पाच-सहा प्रकारचे पायजमे व परकर एकावरून एक असे चढवते. शिवाय मोजे व बूट. हे सारे थंडीसाठी आहे म्हणावे तर वक्षप्रदेश बराचसा उघडा! त्या काळात टेबलांचे पायही सरळधोट न करता गोलाकृती, कमनीय करण्याची चाल होती व मग ते झाकण्यासाठी टेबलक्लॉथ!
‘टायटॅनिक’ या हॉलीवुड चित्रपटात नायिकेची छाती उठून दिसावी म्हणून तिची आई, तिचे ब्लाउज दोऱ्यांनी करकचून बांधून देताना दाखवली आहे. पुढे ती नायिका या बंधनांना वैतागून समुद्रात जीव द्यायला निघते. स्त्रीच्या कोणत्याही अवयवाला कामुकतेचे प्रतीक समजून त्यांना लपवण्याची आणि काही खास विशेषाधिकारी लोकांना ते दाखवण्याची बाब कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते, याची ही काही उदाहरणे. आधी पुरुष असल्या अपेक्षा करतात व नंतर स्त्रियाही तेच चालू ठेवतात. अनेकदा तर पुरुषांच्या वरताण होतात त्या. कारण तोपर्यंत त्या स्वतःचे डोके बंद करून पितृसत्तेच्या भारवाहक बनलेल्या असतात. वडील मुलीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यास उत्तेजन देताना आई मात्र विरोध करताना दिसते, हे त्यामुळेच.
हेमांगीने केलेले काही मुलींचे वर्णन की, त्या दोन-दोन ब्रा घालतात, स्तनाग्रांना चिकटपट्ट्या लावतात, हा त्याचाच प्रकार आहे आणि तो सगळा वेडेपणा आहे.
बाजारसत्ता
स्त्रीच्या शरीरावर कब्जा करून तिने काय घालावे – काय घालू नये किंवा तिच्या कपड्यांमधून काय दिसावे - काय दिसू नये, याची सूत्रे आपल्या हातात घेणारी आणखी एक सत्ता सध्याच्या काळात आहे, तिचे नाव बाजार. ती पितृसत्तेइतकी प्राचीन नसली तरी बरीच जुनी आहे. पण गेल्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षांत जागतिकीकरण व खाउजा धोरणाने तिने आपल्या साऱ्यांच्या आयुष्याचे नियंत्रण करण्यास सुरुवात केली आहे. स्त्रियांच्या वस्त्रांबाबत तर बाजारप्रणीत विचारांनी आपल्या मनात असा काही जम बसवला, की ज्याचे नाव ते! आपण आपल्या शरीरानुसार कपडे न शिवता/ शिवून घेता तयार कपडे विकत घेऊन अंगात घालायचे असतात आणि ३६-२४-४०च्या मापामध्ये आपण स्वतःला (कोंबून) बसवायचे असते, हा समज बाजाराने रुजवला.
पितृसत्तेच्या अंतर्गत स्त्रियांच्या मानसिक गुलामगिरीचाही बाजाराने फार चातुर्याने उपयोग करून घेतला. ‘तुम्हाला सुंदर दिसायचे नाही? मग काय तुम्हाला ह्या रुबाबदार पुरुषांच्या मनावर अधिराज्य करायचे नाही म्हणता?’ अशा प्रकारचे भंपक युक्तिवाद हा बाजार करतो. भरमसाठ उत्पादन करायचे, गरज नसणाऱ्यांना विकायचे आणि गबर नफा कमवायचा हाच त्यांचा उद्देश असतो. नसती गरज निर्माण करण्याच्या कलेला जाहिरात म्हणायचे आणि बाजारसत्तेला ‘जाहिरातीचे युग’ असे गोंडस नाव द्यायचे. ही जाहिरात म्हणजे बाजाराची मुखवाणी आहे. जाहिरात हाही एक नवीन उद्योग सुरू झाला.
ब्रा बनवणाऱ्या कंपन्या पाव मीटर कापड, वीतभर इलास्टिक आणि हुक-लुपादि काही सामग्रीपासून बनवलेल्या आणि गरीब महिलांना कमी मोबदला देऊन शिवून घेतलेल्या ब्रा शेकडो रुपये किमतीने विकू लागल्या. शिवाय बसक्या ब्रेस्टला उभार आणण्यासाठी ब्रा, स्तनाग्रे लपवण्यासाठी पॅडेड ब्रा, खेळताना घालण्यासाठी स्पोर्ट्स् ब्रा, कामुक दिसण्यासाठी रंगीबेरंगी ब्रा काय अन् काय!
गरजा निर्माण करण्यासाठी जाहिराती होत्याच. त्यांची कॉपी लिहिणे, संकल्पना मांडणे, छायाचित्रे काढणे आणि मॉडेलिंग करणे यातून अनेकांना रोजगार मिळू लागला. कंपन्यांना, त्यांच्या नफ्याचा काही भाग गरजा निर्माण करणाऱ्या (आणि खप वाढवणाऱ्या) या लोकांना देणे काहीच कठीण नव्हते. अगोदर सतराव्या वर्षी ब्रा घालू लागणाऱ्या मुलीची लहान बहीण सोळाव्या किंवा पंधराव्या वर्षीच ती घालू लागली. घालणाऱ्या मुलींना किमान दोन-तीन ब्रा लागतातच. अशा रीतीने कंपन्यांनी ब्राची विक्री बेसुमार वाढवली. पण ही वस्तू बाजारात आली, ती कंपन्यांच्या नफ्यासाठी. स्त्रियांच्या आरोग्यासाठी नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
स्तन हे स्नायूंचे बनलेले असतात. ते शिथिल असतात. त्यांना आधाराची गरज असते, हे सर्व खरे. पण ब्राचा आधार किती आणि काच किती, हे घालणाऱ्या महिलांना चांगले ठाऊक आहे. मला नेहमीच प्रश्न पडतो की, या कंपन्या ब्रा बनवताना मापे कुठून मिळवतात? त्यांचे प्रमाणीकरण कसे करतात? भारतातील ९५ टक्के स्त्रिया चुकीच्या नंबरच्या ब्रा घालतात, हा कुठल्या, कोणी केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष आहे? त्यासाठी नमुने कुठून गोळा करण्यात आले? ते संशोधन कुठे प्रकाशित झाले? बरे त्या स्त्रिया तरी असे का करतात? त्यांना घुसमटून घेण्याची हौस आहे का? आधीचे त्रास कमी आहेत का बिचाऱ्यांचे? त्यांना त्यांच्या मापाच्या ब्रा का मिळत नाहीत? डॉक्टरांच्या सल्ल्याने व शरीरमापनशास्त्राची (anthropometry) मदत घेऊन नीटनेटक्या, आरामदायी ब्रा तयार करणे एकविसाव्या शतकातही एवढे कठीण का व्हावे? ज्या स्त्रिया स्वतःसाठी खरेदी करायला जातात त्यांना तरी विक्रेत्यांकडून, कंपन्याकडून त्याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळते का? आजकाल ‘वस्तू व सेवा’ हा परवलीचा शब्द झाला आहे. मग कंपन्यांनी ही सेवा का देऊ नये?
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
फक्त कपडेच नाही, तर काही वेळा स्तनांचा आकार कसा असावा, तो कसा जपावा, हेदेखील कंपन्या आणि बाजार मिळून ठरवतात. आता हेच पहा, ऐंशी-नव्वदच्या दशकात कंपन्यांनी गाई-म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करून ‘बेबी फूड’ म्हणून विकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी स्त्रियांची ‘फिगर’ जास्त महत्त्वाची आहे, ती टिकली पाहिजे म्हणून त्यांनी अंगावर दूध पाजू नये, असा प्रचार केला. म्हणजे आपल्याच अपत्यांना पोषण देण्यापेक्षा (पुरुषाला) सेक्सी दिसणे महत्त्वाचे. आपले उत्पादन विकण्यासाठी त्यांनी पुरुषसत्तेचा उपयोग करून घेतला आणि दुर्दैवाने लोक – म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघेही त्याला बळी पडले. मानव हा सस्तन प्राणी आहे, याचाच विसर पडला की हो त्यांना! नंतर मात्र काही ध्येयनिष्ठ डॉक्टरांनी हा मूल्यविपर्यास हाणून पाडला.
डॉ. आनंद ह्यांनी नेस्लेसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीशी लढा देऊन त्यांना त्यांच्या सर्व उत्पादनांवर ‘Mother’s milk is best for the child’ अशी ओळ टाकायला लावली. आजच्या काळात या विषयात आणखी प्रगती होऊन, स्तनांचा आकार लहान असावा की, मोठा हेदेखील बाजार ठरवू लागला आहे. वास्तविक भारतात प्राचीन काळापासून मोठे स्तन हे सुदृढतेचे व सौंदर्याचे लक्षण मानले गेले आहे. परंतु गेल्या २०-२५ वर्षांत युरोप- अमेरिकेत लहान आकाराच्या स्तनांची फॅशन फोफावली व भारतातही त्याचे लचांड आले. ज्यांचे मोठे स्तन होते, त्यांनी स्वतःची उपासमार करून घेऊन व अन्य कृत्रिम मार्गांनी ते लहान केले. काहींनी तर त्यासाठी सर्जरीही केली. या सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया हा आणखी एक प्रकार सध्या बाजारात आला आहे. स्तन लहान किंवा मोठे करण्याच्या - दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया आता करता येतात. त्या अत्यंत कठीण व जोखमीच्या असतात. शरीरांतर्गत अवयवांची फेररचना करताना भलतेच काही उद्भवू शकते.
खर्चाबद्दल वेगळे काही बोलायलाच नको. बाजार म्हटले की ते सारे आलेच. तर, त्यावेळी जाहिरात उद्योगात लहान स्तनांचा बोलबाला होता, आणि बॉलीवुडमध्ये मोठ्या. मॉडेल म्हणून काम करताना आपल्या स्तनांचा आकार लहान केलेली नटी जेव्हा चित्रपटात काम करायला गेली, तेव्हा तिला तो आकार मोठा करून घेण्यास सांगण्यात आले. बाजाराचा नफेखोरीचा उद्देश लक्षात घेऊन आता स्त्रियांनी स्वतःच आपल्या सोयीचा, आरोग्याचा विचार करावा. आपण सुंदर आहोतच. कोणाच्या आपल्या स्तनाच्या आकार किंवा आकारमानाबद्दल कोणतेही गंड बाळगू नयेत, कोणाच्या फॅण्टसीच्या परिपूर्तीसाठी आपल्या शरीराचे हाल करून घेऊ नयेत, असे त्यांनी स्वतःला सांगायला हवे. स्तनांच्या जपणुकीसाठी सोपे मार्ग त्यांनी स्वतःच हुडकून काढावे. जाहिरातबाजीच्या मागे आपली फरफट करून घेऊ नये. हुक-बटनांपेक्षा गाठीची चोळी बरी वाटते? मग वापरावी की अधूनमधून! करून तर पहा.
स्तनांना आवरण - गरज की फॅशन?
काही आदिवासी जमातींचा अपवाद वगळला तर भारतातील व जगातील बहुतांश स्त्रिया कापडाने आपले वरचे अंग झाकतात. कपडे शिवले जात नव्हते, तेव्हाही त्या ‘शकुंतले’सारखे कापड छातीला बांधून किंवा पदर वा ओढणी अंगावरून लपेटून घेत असत. लोकांच्या नजरांपासूनच नव्हे तर थंडीवाऱ्यापासून स्तनांचे संरक्षण करणे हा महिलांचा हक्क आहे. भारतात शिवलेल्या चोळ्या घालण्यास सातव्या शतकात सुरुवात झाली, असे इतिहास सांगतो. तरीही ते प्रचलित झाले नव्हते.
राणी व्हिक्टोरिया जेव्हा १८७७मध्ये भारतात आली, तेव्हा तिने बंगालमधील स्त्रियांना चोळ्या घालण्यास सांगितले. जाकीट, कुडती किंवा शिवलेले झंपर घालण्याची प्रथा तेथून सुरू झाली. हा तथाकथित रानटी लोकांना सभ्य बनवण्याचा प्रकार होता. या स्त्रिया निव्वळ पदर घेत होत्या, तेव्हा जास्त अत्याचारांना बळी पडत होत्या आणि त्या शिवलेल्या चोळ्या घालू लागल्यानंतर ते कमी झाले, अशातला काही भाग नाही.
छत्तीसगडमधील आदिवासी भागांमध्ये आजही चोळीशिवाय निव्वळ साडी नेसून शेतात काम करणाऱ्या महिला दिसतात. याला ‘गातीमार पद्धत’ असे म्हणतात. पण त्यांच्या अंगावर पदर असतो. या बाबतीतील सर्वांत क्रूर प्रथा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला केरळ राज्यात होती. तेथील नादन, नायर व एळ्ळवा या शूद्र जातींच्या महिलांना कमरेच्या वर कोणतेही वस्त्र घेण्यास मनाई होती. ही मनाई राजसत्तेने लादलेली होती. त्रावणकोरच्या राजाने या लोकांवर अनेक प्रकारचे कर बसवले होते. त्यामुळे ते आयुष्यभर कर्जात बुडालेले असत. शिवाय त्यांच्या स्त्रियांनी कमरेच्या वर कोणतेही वस्त्र परिधान केले, तर त्यासाठी त्यांना कर द्यावा लागत असे. हा करही राजाचे सेवक त्यांच्याकडे जाऊन सक्तीने व घृणास्पद रीतीने वसूल करत. असा कर देणे दारिद्रयामुळे त्यांना शक्य होत नसे. बरे, घराच्या आत बसून भागतही नसे. सवर्णांच्या घरी जाऊन तेथील साफसफाई, गोवऱ्या थापणे, जमीन सारवणे, यासोबतच शेतात कामे करणे व मासे पकडणे हे सर्व त्यांना अशाच अवस्थेत करावे लागे. त्या घरांतील पुरुष यांना काय करत असतील त्याची कल्पनाही करवत नाही.
हिंदुधर्मातील कुप्रथांना कंटाळून तेथील अनेक अस्पृश्य लोक चहामळ्यांमध्ये काम शोधत श्रीलंकेत निघून गेले. अनेकांनी तेथे नव्याने आलेला ख्रिस्ती धर्म स्वीकारला. धर्मांतरितांना या प्रथेतून सूट मिळाली. हिंदूंना मात्र आपल्याच प्रदेशात, आपल्या स्त्रियांची अब्रू वाचवताच आली नाही. तसे निर्बंध तर सवर्ण स्त्रियांवरही होते, पण कमी. ब्राह्मण नंबुद्री आणि क्षत्रिय नायर असलेल्या जातींच्या महिलांना घराच्या आतमध्ये वक्षःस्थळ उघडे ठेवावे लागत असे. बाहेर असताना जरी त्या वस्त्र घेऊ शकत असल्या, तरी मंदिरात जाताना त्यांना ते उतरवून ठेवावे लागे. म्हणजे ही प्रथा ब्राह्मणशाहीचीच नाही, तर स्त्रीदास्याचीही निदर्शक होती.
या प्रथेच्या विरोधात आवाज उठतही होते, लहान-मोठे विद्रोह होत होते, परंतु राजा किंवा सवर्ण लोक अजिबात दाद देत नव्हते. शेवटी या प्रथेचा बीमोड एका भीषण घटनेने झाला. मध्य केरळात राहणारी नंगेली चेरथाल ही एळ्ळवा जातीची महिला होती. त्या भाषेत ‘नंगेली’चा अर्थ होतो ‘सुंदरी’. ती सार्वजनिक स्थानांवर जाताना अंग झाकून जाऊ लागली. राजाचे अधिकारी तिच्या घरी कर घेण्यासाठी आले, तेव्हा तिने दारिद्रयामुळे आपण ते देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतरही ते जबरदस्ती करू लागले, तेव्हा नंगेलीने एक विलक्षण गोष्ट केली. तिने आपले दोन्ही स्तन कापून काढले व केळीच्या पानावरून ते अधिकाऱ्यांच्या समोर ठेवले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नंगेलीने थोड्याच वेळात अखेरचा श्वास घेतला. तिचा पती चिरकुंडनने पत्नीच्या चितेत उडी घेऊन आपलेही जीवन या लढ्यास समर्पित केले.
ही बातमी केरळमध्ये जंगलातील आगीसारखी पसरली. विद्रोहाची आगही त्यामध्ये मिसळली आणि लोकांनी हा कर देण्यास सपशेल नकार दिला. ही घटना १८०३ची. त्यानंतर वेगवेगळी वळणे घेत हा संघर्ष सुरूच राहिला. शेवटी मद्रासचे गव्हर्नर चार्ल्स ड्रेविलियन यांनी दबाव टाकल्यामुळे त्रावणकोरच्या राजाने २६ जुलै १८५९ रोजी आदेश काढला, ज्याच्या अन्वये सर्व जातीच्या महिलांना अंगात कपडे घालण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला. शूर नंगेलीच्या बलिदानाची कथा इथे सांगण्याचे एक कारण म्हणजे ती माहीत व्हावी आणि दुसरे असे की, स्त्रीवर केलेली चोळी न घालण्याची सक्ती आणि ब्राच्या काचातून तिची मुक्ती यांतील फरक निदान महिलांनी तरी समजून घ्यावा, म्हणून.
हे झाले सुडौल शरीराचे चोचले. याशिवाय इतरही महिलांचा स्वानुभूतीने (empathy) विचार आपण केला पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांचेच पाहा. कॅन्सरची खूप वाढ झाली असेल तर स्तन कापून काढावा लागतो. ही शस्त्रक्रिया स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी करण्यात येते खरी. पण परिणाम तर भोगावेच लागतात ना? नंतर त्यांना स्तनाशिवाय रहावे लागते. आपल्या स्त्रीत्वाला धक्का लावणाऱ्या या गोष्टी स्त्रिया कशा काय सहन करीत असतील? अनेकदा एक स्तन ठेवून दुसरा कॅन्सर पसरल्यामुळे काढावा लागतो. अशा वेळी शरीर किती असंतुलित वाटत असेल! पण आपण म्हणजे निव्वळ शरीर नव्हे, आणि आपण मुळातच सुंदर आहोत, एखाद्या अवयवावर आपले सौंदर्य अवलंबून नाही, असे यांतील कितीतरी स्त्रियांना वाटते व त्या डौलाने आयुष्य जगतात. अनेक समंजस पुरुषही त्या भावनेशी एकरूप होऊन त्यांना साथ देतात. त्या साऱ्यांना सलाम!
कपडे घालण्याच्या पुरातन इतिहासावर नजर टाकली, तर कळेल की, पुरुषाकडे अगदी एकच वस्त्र होते, तेव्हा त्याने ते लंगोटीसारखे वापरले. का, तर प्रजननाचे अंग सुरक्षित रहावे म्हणून. आपले हात- पाय, पाठ यांना क्षती पोहोचली तरी चालेल, परंतु आपला वंश होता होईतो पुढे नेता आला पाहिजे. त्यात अडथळा येता कामा नये. स्त्रीने तिच्या किमान वस्त्रांचा वापर कटिप्रदेश आणि वक्षस्थल सुरक्षित ठेवण्यासाठी केला. का, तर नवीन पिढीला जन्म देऊन तिचे पालन पोषण करत राहता यावे म्हणून. त्यामध्ये लज्जेचा भाव नंतर आला. आता मात्र लज्जाभाव दूर करून आपण त्याकडे सहजतेने पाहू लागले पाहिजे.
कूर्ग हा सुदूर कर्नाटकामध्ये वसलेला आदिवासी प्रदेश आहे. तेथील लोक शौर्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याबद्दलच्या एका लेखात मी फार पूर्वी वाचले होते की, हे लोक स्त्रियांच्या वक्षःस्थळाकडे लैंगिक दृष्टीने चुकूनही बघत नाहीत. लहान मुलांसाठी ती वस्तू देवाने तयार केली एवढेच ते समजतात. असे आपल्याला नाही का समजता येणार? स्त्रियांनीही उपभोग्य वस्तूच्या सोनेरी पिंजऱ्यातून कधीतरी बाहेर पडावे ना! त्यांनीही लहान आकाराचा न्यूनगंड व मोठ्या आकाराचा अभिमान बाळगणे सोडून द्यावे. लैंगिक आकर्षणात स्तनांची भूमिका आहे, हे मान्य. पण त्याला देण्यात येणारे अवास्तव महत्त्व नाकारून स्त्री-पुरुष सर्वांनीच त्याकडे ‘आपला पोषणकर्ता’ म्हणून कृतज्ञतेने पाहावे, त्याला सहजतेने स्वीकारावे… स्त्रियांनी त्याचे संरक्षण करताना सोय व आरोग्य यांना महत्त्व द्यावे. म्हणजे पितृसत्ता आणि बाजारसत्ता या दोहोंना दूर करून प्रश्नाचा समतोल गाठता येईल.
..................................................................................................................................................................
अनुराधा मोहनी
anumohoni@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment