शब्दांचे वेध : पुष्प त्रेचाळिसावे
आजचे शब्द : पॉपुरी, डेरिएर, कॅलिपायगस, नितंबिनी, मॅमोथ्रेप्ट, टिटीनोप आणि नेफेलीबाटा
आज मी तुम्हाला देतो आहे काही मजेशीर शब्दांची पॉटपुरी. तुम्ही भेळपुरी किंवा पाणीपुरी नक्कीच खाल्ली असेल. ती स्वादिष्ट असते. ही पॉटपुरी मुळात सडलेली होती. तिला नंतर चविष्ट रूप देण्यात आलं. पण ही पुरी भांड्यात म्हणजे पॉटमध्ये ठेवलेली आपली मराठी पुरी (खाद्यपदार्थ) नाही, तर पॉटपुरी म्हणजे अनेक वस्तूंचा, गोष्टींचा संग्रह.
खरं तर Potpourri या शब्दाचा उच्चार पॉटपुरी असा होतच नाही. या शब्दाचं मूळ फ्रेंच असल्यानं Pot मधला ‘T’ सायलंट असतो. त्यामुळे त्याला ‘पो’ किंवा ‘पॉ’ असं म्हणायचं. Pourri पुरी म्हणजे सडकं, वास येणारं असं काही तरी.
थोडक्यात, पॉपुरी याचा अर्थ सडकं भांडं. Putrescent हा इंग्रजी शब्द putrescere या लॅटिन शब्दापासून तयार झाला. त्यातूनच फ्रेंचमध्ये pourri हा शब्द बनला. अर्थ तोच- Becoming putrid, In an advanced state of decomposition and having a foul odour, सडणं, कुजणं, नासणं, इत्यादी.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
वेगवेगळ्या प्रकारचं मांस आणि भाज्या एखाद्या भांड्यात एकत्र शिजवल्या (स्ट्यू stew केल्या) की, त्याला फ्रेंच लोक ‘पॉपुरी’ असं म्हणायचे. फ्रेंचांनी हा शब्द स्पॅनिश लोकांच्या olla podrida या शब्दातून उसना घेतला. आता या दोन्ही भाषांत खायच्या पदार्थाला ‘प्युट्रिड’ म्हणजे सडकं का म्हणायचं, हे एक रहस्यच आहे. ज्या पद्धतीनं स्पॅनिश लोक ही डिश तयार करायचे, तिच्यावरून हा शब्दप्रयोग तयार झाला, असा एक तर्क आहे. मंद आचेवर खूप वेळ मांस आणि भाज्या असलेलं भांडं तापवलं की, हवेत जो (दुर्) गंध दरवळतो, त्यामुळे या डिशचं नाव olla podrida असं ठेवण्यात आलं. Olla म्हणजे एक प्रकारचा stew. फ्रेंचांनी त्याचं ‘पॉपुरी’ केलं.
हा शब्द इंग्रजीत याच अर्थानं १६११मध्ये पहिल्यांदा वापरला गेला असल्याची नोंद आहे. मात्र अठराव्या शतकात अर्थबदल होऊन ‘पॉपुरी’ हा शब्द चक्क सुगंधी वनस्पतींचा किंवा फुलांचा संग्रह (गुलदस्ता) अशा अर्थानं वापरला जाऊ लागला. आता फुलं ताजी असतात, तोवरच त्यांचा सुगंध टिकतो. शिळी फुलंदेखील काही वेळानं कुजतात आणि मग त्या फुलदानातून चांगल्या वासासोबत खराब वासही येऊ लागतो. ती किंवा तो झाला पॉपुरी.
आज मात्र हा शब्द वेगवेगळ्या वस्तूंचं मिश्रण, संग्रह, साठा या अर्थानं जास्त वापरला जातो. दहा-वीस वेगवेगळ्या मूडची किंवा प्रकारची गाणी एकत्र करून जी सांगितिक ‘मेडली’ तयार होते, तिलाही ‘म्युझिकल पॉपुरी’ म्हणतात!
आज आपण अनुभवणार आहोत शब्दांची ‘पॉपुरी’. सुरुवात पॉपुरीपासूनच झाली.
आता नितंब. मी जेव्हा बालपण संपल्यावर पौगंडावस्थेत शिरलो तेव्हा ‘अप्सरा’, ‘रंभा’, ‘अपलम चपलम’, ‘चंद्रकांत’ अशासारख्या बऱ्याच मराठी (चावट) मासिकांची चलती होती. शिवाय ‘मोहिनी’मध्ये रमेश मंत्रींच्या जनू बांडेचे खोडकर कारनामे येत असत. सुभाष शहा यांच्या अश्लीलतेकडे झुकणाऱ्या रहस्यकथा दरमहा प्रकाशित होत असत. काकोडकरांची तर एक वेगळीच दुनिया होती. या लिखाणात येणारे उन्नत उरोज, स्तन, डौलदार नितंब, पुष्ट मांड्या अशासारखे शब्द वाचून त्या वेळी वेगळीच मजा यायची. यातलं बहुतेक वाचन हे चोरून केलं असल्यानं त्यात एक थ्रिलही असायचं.
वयानुसार पुढे वाचनही वाढलं. मराठीसोबतच आता इंग्रजी साहित्याचीही दुनिया खुली झाली होती. टेड मार्क, हॅरल्ड रॉबिन्स यांच्या लिखाणातले चावट उल्लेख भावू लागले होते. (हॅरल्ड रॉबिन्सच्या ‘कार्पेट बॅगर्स’ या कादंबरीवर नरहर कुरुंदकरांनी लिहिलेला लेखही तेव्हाच वाचण्यात आला होता.) या सर्व स्त्री-देहविषयक शब्दांत मला ‘नितंब’ हा शब्द खूप मजेशीर वाटला. डौलदार नितंब असलेली स्त्री ही जास्त सुंदर (आणि कामुक) असते, असं उगीचच वाटत होतं. खूप वर्षांनी मोल्सवर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात ‘नितंबिनी’ हा शब्द दिसला. त्याचा अर्थ त्यानं A woman with large and handsome posteriors असा दिला आहे. एकूण, मोल्सवर्थलाही तसंच वाटत होतं तर!
कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र हा विषय शिकवताना आमच्या सरांनी ‘अॅडिपोझ’ (adipose) या नावाचा एक टिश्यू (मराठीत- ऊती) असतो आणि त्यामुळे मनुष्य आणि मनुष्येतर सजीवांमध्ये फॅट म्हणजे चरबी निर्माण होते, असं सांगितलं होतं, हे त्या वेळी आठवलं. ही चरबी कुल्ल्यांवर म्हणजेच नितंबांवर जमा झाली की, त्यांना भरीव आकार येतो. प्रमाणात असेल तोवर हरकत नाही, पण या एकदा का या चरबीचा साठा वाढला की, आपण लठ्ठ होऊ लागतो आणि मग नितंबच काय, पण सारं शरीरही बेढब होतं, हे पण आम्हाला सरांनी सांगितलं होतं.
नितंबांसाठी इंग्रजीतले काही पर्यायी शब्द- Derriere किंवा derrière, Buttocks, Rump, Hips, Bum, Butt, Ass, Arse, इत्यादी. यापैकी derrière हा फ्रेंच भाषेतला अनौपचारिक शब्द असून त्याचा अर्थ पार्श्वभाग (backside) असा होतो. तो लॅटिनमधल्या deretroपासून तयार झाला आहे. (de म्हणजे ‘from’ आणि retro म्हणजे ‘back’, मागचा. यातला retro हा शब्द आज आपण वेगळ्या कारणासाठी वापरतो.) एखादी चांगली स्लॅंग डिक्शनरी चाळली तर आणखी पाच-पन्नास समानार्थी शब्द सापडतील.
त्याच काळात मी पी. जी. वुडहाऊसची ‘अंकल डायनामाईट’ ही १९४८ची कादंबरी वाचली. त्यातल्या एक शब्दानं माझी विकेट घेतली होती. तो शब्द होता- ‘कॅलिपायगस’. शब्दकोशात त्याचा अर्थ असा दिला होता- Pertaining to or having finely developed buttocks. मग माझ्या लक्षात आलं की, मराठीत ज्याला ‘डौलदार नितंब’ म्हणतात, त्यालाच इंग्रजीत ‘कॅलिपायगस’ (callipygous) असं म्हटलं जातं. आजच्या स्लॅंग भाषेत सांगायचं तर nice ass किंवा nice arse. सामान्यपणे हे विशेषण स्त्रियांच्या बाबतीत वापरलं जातं. मात्र वुडहाऊसनं हे विशेषण चक्क एका माणसाला उद्देशून वापरलं होतं. हा परिच्छेद असा आहे-
Sir Aylmer appeared not to have heard these eulogies.
He was still wrestling with what might be called the
Plank angle of the situation.
“Plank?” he said. “You can't be Plank.”
“Why not?”
“The Plank who was at school with me?”
“That very Plank.”
“But he was a fellow with an enormous trouser seat.”
“Ah, I see what is on your mind. Yes, yes. As a boy,
quite true, I was bountifully endowed with billowy curves
in the part you have indicated. But since those days I
have been using Slimmo, the sovereign remedy for
obesity. The results you see before you. You ought to try it
yoursell, Mugsy. You've put on weight.”
Sir Aylmer grunted. There was dissatisfaction in his grunt. Plainly,
he was unwilling to relinquish his memories of a callipygous Plank.
“Well, I’m damned if I would have recognized you.”
(‘Uncle Dynamite’)
वुडहाऊसचा प्लॅंक enormous trouser seat म्हणजेच प्रचंड विस्ताराचं बूड असलेला माणूस आहे. (अशी आणखीही काही पात्रं वुडहाऊसनं रंगवली आहेत, पण तो callipygous बायकांविषयी कधीच बोलत नाही, हे विशेष. ते काम हॅरॉल्ड रॉबिन्स आणि रोअल्ड डॉअलसारख्या लेखकांचं होतं!) सुडौल कुल्ले किंवा नितंब हे फक्त स्त्रियांचंच वैशिष्ट्य असतं असं नाही, तर पुरुषांनाही हे विशेषण लागू पडतं, हे मला त्या दिवशी कळलं.
Callipygian, callipygean, callipygous हे समानार्थी शब्द इंग्रजीत अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात वापरले जाऊ लागले. ग्रीक भाषेतल्या kallipūgos या मूळ शब्दाचा अर्थ आहे- सुंदर नितंब. (Kallos म्हणजे ‘beauty’ आणि pūgē म्हणजे ‘buttocks’). व्हीनस या रोमन देवीलाच प्राचीन ग्रीसमध्ये ‘अफ्रोडिटी’ (Aphrodite) या नावानं ओळखायचे. ‘सिरॅक्युझ’ (Syracuse) या प्राचीन शहरात असलेल्या तिच्या एका पुतळ्याचं वर्णन करताना हा शब्द ग्रीकमध्ये पहिल्यांदा वापरला गेला होता. याच पुतळ्याची एक प्राचीन प्रतिकृती The Venus Callipyge किंवा the Aphrodite Kallipygos या नावानं ओळखली जाते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
(बऱ्याच) मराठी लेखकांना सुंदर नितंबांचं जसं आकर्षण आहे, तसंच पाश्चात्य लेखकांनाही आहेच. वुडहाऊसनं callipygous हा शब्द एकदाच वापरला. पण व्लाडिमिर नॅबॉकॉव्ह, अॅल्डस हक्स्ली, अँथनी बर्जीस, ज्युलिअन बार्न्स या लेखकांनी तर तो अनेकदा वापरला आहे. एका ब्रिटिश वृत्तपत्राच्या मते Gwyneth Paltrow या अमेरिकन अभिनेत्रीला आधुनिक काळातली Venus Callipyge असं म्हणता येऊ शकतं.
स्त्रियांच्या देहाचं वर्णन करावं की नाही, केलं तरी त्यातून पुरुषांची कामभावना जागी होईल, असं ते असावं का, हे सारे आपल्या आधुनिक आणि तार्किक विचार करणाऱ्या मनाला पडणारे प्रश्न आहेत. कट्टर स्त्रीवादी दृष्टीकोनातून हे गैरच आहे. पण त्याच वेळी, शृंगार रस हाही सामान्य माणसाच्या जीवनाचा एक भाग आहे, हेदेखील विसरता येत नाही. लेखक, चित्रकार, शिल्पकार असे नानाविध कलाकार आपल्या कृतीतून स्त्री किंवा पुरुषाच्या नग्न देहाचं जे दर्शन घडवतात, त्याला निखळ सौंदर्यवादी नजरेतून बघितल्यास असा आक्षेप घेता येईल का? प्राचीन काळापासून ग्रीक, लॅटिन, संस्कृत, अशा अनेक भाषांतून भरपूर शृंगारिक लिखाण केलं गेलं आहे. आणि त्यासाठी योग्य अशा आशयघन, अर्थपूर्ण शब्दांचा वापर हा करावाच लागतो. ‘नितंबिनी’ किंवा ‘कॅलिपायगस’ हे शब्द याच प्रकारचे आहेत. या लेखमालेचा उद्देश शब्दांचा अभ्यास करण्याचा असल्यामुळे निदान आपल्याला तरी ते वर्ज्य नाहीत.
आता इतर काही अपरिचित शब्दांची ओळख थोडक्यात करून घेऊ या-
Mammothrept : आजीच्या अती लाडानं वाया गेलेल्या कार्ट्याला किंवा कार्टीला ‘मॅमोथ्रेप्ट’ (mammothrept) असं म्हणतात. (कोणती आजी- आईची आई की वडिलांची आई, हे माहीत नाही!) बेन जॉनसन या लेखकानं सतराव्या शतकात हा शब्द इंग्रजीत पहिल्यांदा वापरला होता. ग्रीक भाषेतून हा शब्द लॅटिनमध्ये आला आणि तिथून इंग्रजीत. त्याचा खरा अर्थ, ज्यानं खूप वर्षं स्तनपान केलं आहे, असं मूल. ‘वाया गेलेलं मूल’ हा अर्थ त्यात कधी शिरला, हे गूढच आहे. बालिश विचार करणाऱ्या प्रौढ माणसालासुद्धा ‘mammothrept’ म्हणतात.
Sialoquent : बोलताना थुंकी उडवणारी व्यक्ती. शाहरुख खानच्या ‘मै हूं ना’ या चित्रपटात सतीश शहानं बोलताना समोरच्या माणसावर आपल्या थुंकीचा शॉवर उडवणाऱ्या प्रोफेसरची भूमिका केली आहे, ती आठवा. या शब्दातला loquent म्हणजे बोलणं. हा लॅटिन शब्द आहे. याला ग्रीकमधला sialon म्हणजे लाळ, थुंकी यातला sia हा तुकडा जोडून sialoquent शब्द बनवला गेला आहे.
Ort (ऑर्ट) आणि Tittynope (टिटीनोप) या दोन्ही शब्दांचा अर्थ जेवणानंतर ताटात शिल्लक उरलेले अन्नाचे कण, चहा पिऊन झाल्यावर कपात उरणारा छोटासा थेंब, बिअर पिऊन झाल्यावर ग्लासात तळाशी राहिलेला किंचित गाळ, इत्यादी, असा होतो. मराठीत त्याला ‘उच्छिष्ट’ असं म्हणतात.
आणि आता आजचा पस्तुरी (lagniappe) शब्द -
‘नेफेलीबाटा’ (Nefelibata) म्हणजे ढगात चालणारा माणूस. हा सुंदर शब्द मूळचा पोर्च्युगीज आहे. यातला nephele म्हणजे ढग आणि batha म्हणजे जिथे तुम्ही चालू शकता अशी जागा. परंपरांना न जुमानणारा, ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ असं न मानणारा, रूढी झुगारणारा, स्वयंप्रज्ञेनं वागणारा, maverick प्रकारात येणारा इसम. याला प्रस्थापित सामाजिक अथवा साहित्यिक अथवा कलात्मक परंपरांची उत्तम माहिती असते, पण तो हे चाकोरीबद्ध जीवन नाकारतो. तो स्वतःचा मार्ग स्वतः शोधतो, स्वतःचा वेगळा विचार करतो, स्वतःच्या आयुष्याला स्वयंप्रकाशानं उजळवतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती, गायक पंडित कुमार गंधर्व किंवा वसंतराव देशपांडे, प्री-राफेलाईट चळवळीचे प्रणेते असलेले विल्यम हंट, जॉन मिले, डांटे गॅब्रिएल रोझेटी, विल्यम रोझेटी, जेम्स कॉलिन्सन, फ्रेडरिक स्टिफन्स आणि टॉमस वुलनर हे सात चित्रकार - कवी - कला समीक्षक, यांना ‘नेफेलीबाटा’ म्हणता येईल.
अभिजात कलावंतांच्या बंडखोरीची अशी बरीच उदाहरणं देता येतील. Out of the box विचार करून काही तरी नवीन तयार करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, अशी माणसं या शब्दानुसार ‘ढगात चालतात’. म्हणजे ते अहंकारी असतात, गर्विष्ट असतात, असं अजिबात नाही - तर ते समाजात स्वकर्तृत्वानं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करून नावारुपाला येतात, सन्मान प्राप्त करतात. त्यांचं मोठेपण त्यांच्या या वेगळेपणात असतं.
आज एवढंच पुरे!
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment