उद्या, ७ ऑगस्ट, गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांची पुण्यतिथी. त्यानिमित्त ‘गीतांजली’ हे त्यांचे भावकाव्य उलगडण्याचा हा एक प्रयत्न.
..................................................................................................................................................................
रवींद्रनाथांना ‘गीतांजली’साठी १९१३मध्ये साहित्यातले ‘नोबेल’ पारितोषिक मिळाले. अल्फ्रेड नोबेल या स्वीडिश व्यावसायिकाने हे पारितोषिक सुरू केले, त्यामागील कथा रंजक आहे. एकदा वर्तमानपत्रामध्ये बातमी आली- ‘द मर्चंट ऑफ डेथ इज नो मोअर’. खरे तर, अल्फ्रेड नोबेल या ‘डायनामाईट’च्या संशोधकासोबत नाव साधर्म्य असलेला त्याचा चुलतभाऊ मेला होता. पण ही बातमी वाचून व्यावसायिक अल्फ्रेडला वाटले- ‘अरे, संशोधनातून आपण खूप पैसा मिळवला, पण त्यामुळे खाणींमध्ये कधी अपघातात माणसं मरतात, तेच डोक्यात ठेवून, लोक मृत्यूनंतर आपली अशी ओळख ठेवणार, हे बरे नाही.’ म्हणून त्याने आपल्या संपत्तीचा विनियोग करून ‘नोबेल’ पारितोषिकांची सुरुवात केली. आज स्टॉकहोममध्ये ‘गमला स्तान’ भागात त्याच्या नावाने मोठे संग्रहालय आहे.
भारत आणि बांग्लादेश या दोन देशांच्या राष्ट्रगीतांचे रचयिता रवींद्रनाथ आहेत, तसेच श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावरदेखील त्यांच्या रचनेचा प्रभाव दिसून येतो. ‘गीतांजली’ हा टागोरांच्या निवडक कवितांचा संग्रह मूळ बांग्ला भाषेतला, पण इंग्लिश लेखक आणि चित्रकार विल्यम रोथेनस्टाईन यांच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या कवितांचा इंग्रजी भावानुवाद केला, त्यामुळे त्यांच्या कविता सर्वत्र पोचल्या.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
ओठांवर कायम तरळणाऱ्या त्यांच्या मूळ रचना बांग्ला भाषकांचे ‘पाथेय’ आहेत, ‘रवींद्र संगीत’ श्रमिकांचा विसावा आहे. ‘गीतांजली’च्या इंग्रजी भावानुवादाला डब्ल्यू. बी. यीट्स या आयरीश कवीची प्रस्तावना आहे. ते लिहितात- “But though these prose translations from Rabindranath Tagore have stirred my blood as nothing has for years, I shall not know anything of his life, and of the movements of thoughts that have made them possible, if some Indian traveller will not tell me... For all I know, so abundant and simple is this poetry, the new Renaissance has been born in your country and I shall never know of it except by hearsay… We have other poets, but none that are his equal; we call this the epoch of Rabindranath. No poet seems to me as famous in Europe as he is among us.”
आपण बांग्ला भाषेशिवाय टागोरांच्या कवितांचा प्रवास समजून घेऊ शकत नाही, त्यांच्या कवितेमागचे भावनिक पदर एखाद्या स्थानिकासारखे उलगडू शकत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
डॉ. अमिता गोसावी यांनी ‘गीतांजली’चा मराठी भावानुवाद केला आहे, तसेच ‘भयशून्य चित्त जेथ’ हा टागोरांच्या १५१ कवितांचा अनुवाद मराठीत डॉ. नरेंद्र जाधव यांनी केला आहे. त्याच्या प्रकाशन प्रसंगी त्यांनी सादर केलेली ‘शिवाजी उत्सव’ ही कविता आपण पुढील लिंक वर पाहू/ऐकू शकता. (खालील व्हिडिओमध्ये ही कविता सात मिनिटे ४९ सेकंदांनंतर सुरू होते.)
टागोरांना शब्द, संगीत आणि चित्र या तिन्ही कलांचं देणं लाभलं होतं. त्यामुळे त्यांच्या रचना त्रिमितीय आहेत. या तीन कलांची परस्पर संमिश्रता, तसेच त्यांना लाभलेले तत्त्वज्ञानाचे कोंदण हे त्यांच्या रचनांच्या परिपूर्णतेचं गमक आहे. म्हणून या रचना अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या झाल्या आहेत. इंग्रजी ‘गीतांजली’मध्ये १०३ गद्य-कविता आहेत, पोएटिक प्रोज. या काव्यसंग्रहातल्या कविता वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या आहेत उदा. प्रेम, पूजा, अनुराग, ईश्वर, निसर्ग, मृत्यू इत्यादी.
ही कविता केवळ निवृत्तीची नाही, तर कर्मप्रधानता दर्शवणारीदेखील आहे, म्हणजे परमेश्वराला तोच प्रिय होतो, जो हाती घेतला वसा टाकत नाही, तसेच पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करतो. थोडक्यात, कर्मात परमेश्वर पाहणारी (४), “And it shall be my endeavour to reveal thee in my actions, knowing it is thy power gives me strength to act.”
परमेश्वराने आपला उद्धार करावा, आपली सेवा स्वीकारावी म्हणून प्रार्थना करणारी (६), ‘‘Pluck this little flower and take it, delay not! I fear lest it droops and drop into the dust.” तुझ्या चरणांपाशी माझे निर्माल्य होऊ दे. माझे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध तुला भावले तर आनंद आहे, आणि भावले नाही तरी त्याचा विषाद नाही, कारण तुझी सेवा घडली यातच मला आनंद आहे. अशा अमन भक्तीची कविता आहे.
स्वतःला केवळ वेळूची बासरी आणि परमेश्वराला त्यातलं मधुर संगीत मानणारा उदात्त भाव प्रकट करणारी कविता आहे (७). ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ या तुझ्या गीता वाचनावर विसंबून मी माझा भार तुझ्यावर सोपवतो आहे, (९) म्हणणारी.
“मी शोधत बसलो तुजला, आकाशी-काननापाशीं, तू वाट पाहिली माझी, दिनदुबळ्या खोप्यामाजीं”, याचा प्रत्यय देणारी कविता (११) आहे. “…to reach the innermost shrine at the end.” (१२) ‘तदन्तरस्य सर्वस्य’, तो सर्वांच्या अंतर्यामी आहे, याची जाणीव देणारी आहे. १६, १७, १८, २३ आणि इतर काही कविता ‘प्रेमा’च्या आहेत, पण या कवितेतले प्रेम चिरंतनावरचे आहे. “मनांस मात्र गमली, ओढ चिरंतनाची, काळोख नित्य भवती, जगीं वा सुषुप्ति, तो दूर सारुनी पुढे, नित माग आहे, तुला दिल्या वचनाचा, मज जाग आहे!” या आशयाशी जवळीक साधणारे हे प्रेम आहे.
संत साहित्यातदेखील ‘भक्त तोचि देव देव भक्त’ किंवा ‘तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती’, ही अद्वैत अवस्था भक्ताला नकोशी होते, असे क्वचित म्हटले आहे. तो उलट म्हणतो- ‘मी भक्त आणि तू देव असेच राहू दे, द्वैतच असू दे, नाही तर माझे निजधाम कोणी आहे, ही जाणीवही विरून जाईल’. तशीच भावावस्था पुढील ओळीत व्यक्त होते (३४)- “Let only that little be left of me whereby I may never hide thee.”
“जिथे, कारणमीमांसेचा निखळ प्रवाह मृत सवयींच्या वाळवंटात लुप्त झाला नाही; जिथे, मनाला तू तुझ्या प्रगल्भ विचार आणि आचाराने मार्ग दाखवतोस, त्या मुक्तीच्या स्वर्गात माझ्या जन्मदात्या, माझ्या देशाला जागे होऊ दे...” हा डॉ. अमिता गोसावींचा भावानुवाद ३५व्या कवितेचा आहे, ते एका अर्थाने टागोरांचे भारताबद्दलचे स्वप्न आहे- “Into that heaven of freedom, my Father, let my country awake.”
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
काही कवितांतून ‘केकावली’सारखा आर्त स्वर व्यक्त होतो, उदा. (३८, ४०)- “I want thee, only thee.”
‘Illusion’ किंवा ‘माया’ मान्य करणाऱ्या काही कविता आहेत, (उदा. ३९, ७१, ७२), “He it is who weaves the web of this maya in evanescent hues of gold and silver, blue and green, and lets peep out through the folds his feet, at whose touch I forget myself.”
‘अनंत हस्ते कमला वराने देता, किती घेशील दो कराने’, याची अनुभूती देणारी कविता आहे (५०). ‘सृजनाच्या तळाशी वेदना असते’, हे सांगणारी (८४)- “It is this overspreading pain that deepens into loves and desires, into sufferings and joys in human homes; and this it is that ever melts and flows in songs through my poet’s heart.” संचिताचे किंवा कर्मफळाचे महत्त्व सांगणारी (८५)- “They had dropped the sword and dropped the bow and the arrow; peace was on their forehead, and they had left the fruits of their life behind on the day they marched back again to their master’s hall.”
९०व्या कवितेत ते पुन्हा म्हणतात- “मृत्यो येशील सांगून मजला दारी माझ्या जरी, उघडून ठेवीन जीवनपट मी धाडीन ना माघारी. कडू गोड त्या आठवणींचा समताप तुझ्या सामोरी, उघडून ठेवीन जीवनपट मी धाडीन ना माघारी.”
९५व्या कवितेत तर त्यांनी ‘केवल-अद्वैता’चे जणू उच्चरण केले आहे- “Even so, in death the same unknown will appear as ever known to me. And because I love this life, I know I shall love death as well. The child cries out when from the right breast the mother takes it away, in the very next moment to find in the left one its consolation.”
काही कविता (३०, ३१, १०२) “परमेश्वर चराचरांत भरून राहिला आहे, तो रचनांतून अविरत डोकावत राहतो, मला त्याची अनुभूती येते, पण मी इतरांना ते शब्दांत सांगू शकत नाही. त्यामुळे ते माझ्यावर नाराज होतात, आणि तू मात्र मंद सुस्मित करत राहतोस”, अशी लडिवाळ तक्रार करणाऱ्या आहेत. ‘तदन्तरस्य सर्वस्य’ या ‘ईशा’ मंत्राची किंवा ‘अङ्गुष्ठमात्रः पुरुषोऽन्तरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः’, या ‘श्वेताश्वतर’ वा ‘कठ’ मंत्राची साक्ष देणाऱ्या आहेत. किंवा “I dive down into the depth of the ocean of forms, hoping to gain the perfect pearl of the formless”, (१००), “लाटांवरती हिंदकळता संघर्ष वाहता पोटी, सगुणातून तरून जाता निर्गुण लागे हाती”, या आशयाच्या.
‘गीतांजली’मधील कविता मला मृत्यूचा गौरव करणाऱ्यादेखील वाटतात. भारतीय संस्कृतीत संपन्न आयुष्यानंतर येणाऱ्या मृत्यूचा सोहळा साजरा होतो. तो पण एक उत्सव आहे, जीवाला शिवाच्या सन्निध पोचवणारा, या अर्थाने, निजधामी नेणाऱ्या ‘मृत्यो’चे स्वागत करणाऱ्या या कविता आहेत. नचिकेता आणि यम यांच्या संवादातून ‘कठो’पनिषदात स्रवणाऱ्या तत्त्वज्ञानाचे या कवितांना अस्तर आहे. शेवटच्या (१०३) कवितेत या अंतर्नादाची समाप्ती आहे- “Like a flock of homesick cranes flying night and day back to their mountain nests let all my life take its voyage to its eternal home in one salutation to thee.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
असे सांगतात की, एकदा अमेरिकेत स्थायिक झालेला रवींद्रनाथांचा एक मित्र त्यांना कोलकाता येथे भेटला. म्हणाला- “आपण इंग्रजीत बोलू, कारण एवढी वर्षे अमेरिकेत राहून मी बांग्ला विसरलो आहे.” त्यांचा संवाद झाल्यानंतर रवींद्रनाथ त्याला म्हणाले- “मित्रा, तू आपली मातृभाषा विसरलास याचे मोठे दुःख आहेच, पण इंग्रजीदेखील धड शिकू शकला नाहीस. त्याचे काय?”
हे एक प्रातिनिधिक उदाहरण समजावे. कारण टागोरांच्या भावकविता समजून घेण्यासाठी या दोन्ही भाषा चांगल्या अवगत असणे नितांत आवश्यक आहे. बांग्ला भाषा अवगत नसल्याने या काव्याचे आंतरिक पदर मी उलगडू शकणार नाही, याची जाणीव आहे, पण इंग्रजी कवितादेखील कैक वेळा वाचल्याशिवाय समजतील या भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्यांची कविता समजून घेणे हा एक दीर्घ प्रवास ठरतो, त्याची सुरुवात झाली आहे, इतकेच.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
रवीन्द्रनाथ टागोरांची समकालीन समयोचितता - संजॉय मुखर्जी
भारतीय राष्ट्रवाद आणि रवींद्रनाथ टागोर - किशोर बेडकीहाळ
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment