याद ‘जगजीत’ (सिंग) की आये...
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • ग़ज़लगायक गायक जगजित सिंग
  • Sat , 18 February 2017
  • गाता रहे मेरा दिल आफताब परभनवी जगजित सिंग Jagjit Singh चित्रा सिंग Chitra Singh

प्रसंग फारच हृदयद्रावक आहे. ग़ज़लगायक जगजीत सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईत त्यांच्या मृत्यूनंतर मोठा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात रामपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक राशीद खान यांना गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. राशीद यांनी जेव्हा ‘याद पिया की आये’ ही ठुमरी सुरू केली, तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमाचं चित्रीकरण चालू होतं. ठुमरीच्या शेवटी कॅमेरा जगजीत यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्यावर स्थिरावला. त्यांचे डोळे भरून आले होते. त्यांनी नजर झुकवली होती.  

या गायक जोडप्याचा एकुलता एक मुलगा, विवेक कार अपघातात मृत्यू पावला. त्यांच्या मुलीने आत्महत्या केली. आता जगजीतही निघून गेले. चित्रा यांच्या आसवांमध्ये या सगळ्या दु:खाची तीव्रता ठासून भरली असावी. ही ठुमरी खरं तर बडे गुलाम अली खाँ यांच्यासारख्यांनी लोकप्रिय केली, पण राशीद खानचा आवाज, चित्रा सिंग यांचे डबडबलेले डोळे आणि त्या कार्यक्रमाचा संदर्भ यामुळे ती ठुमरी मनात ठसून राहते. ८ फेब्रुवारी हा जगजीत सिंग यांचा जन्मदिवस. त्यांच्या आठवणीत ही राशीद खान यांची ठुमरी. असं वाटतं होतं की, राशीद खान म्हणत आहेत ‘याद जगजीत की आये’!

हिंदी चित्रपटात जगजीत यांचा आवाज पहिल्यांदा उमटला तो १९७४ मध्ये बासु भट्टाचार्य यांच्या ‘आविष्कार’मध्ये. या चित्रपटाला कनु रॉय यांचं संगीत आहे. त्यांचे सूर बासुंशी चांगले जुळले होते. ‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय’ ही सुप्रसिद्ध ठुमरी जगजीत-चित्रा सिंग यांच्या आवाजात कनु रॉय यांनी वापरली आहे. कलकत्ता हॅण्डलूमच्या साध्या साडीतील शर्मिला आणि तोवर सुपरस्टारपद डोक्यात न गेलेला राजेश खन्ना यांच्यावर हे गाणं चित्रित केलं आहे. या गाण्यात कुठलंही वाद्य न वापरता केवळ जगजीत-चित्रा यांचा आवाज वापरण्याची कल्पना परिणामाच्या दृष्टीनं कमालीची यशस्वी ठरली आहे.

१९८१मध्ये जगजीत यांचंच संगीत असलेला ‘प्रेमगीत’ हा राज बब्बर- अनिता राज यांचा चित्रपट पडद्यावर आला. यातील सदाबहार ‘होठों से छू लो तूम, मेरे गीत अमर कर दो’ या गीतानं जगजीत सिंग यांना खूप लोकप्रियता मिळाली. ग़ज़ल शौकिनांच्या वर्तुळातून जगजीत यांचं नाव सर्वांच्या ‘कानात’ साठलं गेलं. हे गाणं ग़ज़ल नसून ‘गीत’ आहे, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. तलत, जगजीत, भूपेंद्र, गुलाम अली जे जे गातात, त्याला अनेकदा ग़ज़लच म्हटलं जातं. जगजीत-चित्रा यांचं दुसरं द्वंद्व गीत ‘आओ मिल जाये हम सुगंध और सुमन की तर्‍हा’ यालाही चांगली लोकप्रियता मिळाली. आजही हे गाणं रसिकांच्या मनात आहे. आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांचीही गाणी या चित्रपटात आहेत, पण ती फारशी लक्षात राहत नाहीत. जगजीत हे गायकीसोबत संगीतकार म्हणूनही ठळकपणे यातून पुढे आले. अर्थात हिंदी चित्रपटात ते फारसे रमले नाहीत ही बाब अलहिदा.

लगेच आलेल्या ‘साथ साथ’ (१९८३)ने अजून मोठी लोकप्रियता जगजीत यांना मिळवून दिली. याला संगीत मात्र जगजीत यांचं नव्हे तर कुलदीप सिंग यांचं होतं. यातील जावेद यांची ‘तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप तूम घना साया’ ही ग़ज़ल सदाबहार आहे. यात जगजीत यांच्या आवाजाला चित्रा सिंग यांची साथीला केवळ आलापी वापरली आहे. घरची कामं करणारी कमरेला साडी खोचलेली दीप्ती नवल आणि मध्यमवर्गीय चेहर्‍याचा फारूख शेख यांच्यावरचं ‘ये तेरा घर ये मेरा घर’ हेही गाणं फार छान आहे. यातील काव्यही दर्जेदार आहे. ही सगळी गीतं जावेद यांची होती.

एचएमव्हीने ‘साथ साथ’ आणि त्याच्या पाठीमागे ‘अर्थ’ अशी रेकॉर्ड बाजारात आणली होती. तिने खपाचे उच्चांक मोडले. ‘अर्थ’ (१९८३) ला जगजीत आणि कुलदीप सिंग या दोघांचंही संगीत आहे. यातील कैफ़ी आज़मी यांची दोन्ही गीतं गाजली. ‘तुम इतना जो मुस्कुरा रही हो’ हे तर आजही नंबर वनला आहे. बोलक्या डोळ्यांची शबाना आणि राजकिरण यांच्यावरचं हे गाणं परत परत ऐकायला\पाहायला रसिकांना आवडतं. याला जगजीत यांचंच संगीत होतं. दुसरं सुंदर गाणं कुलदीप सिंग यांच्या संगीतातील आहे. आवाज अर्थातच जगजीत यांचा- 

झुकी झुकी सी नजर, बेकरार है के नहीं

दबा दबा सा सही दिल में प्यार है के नहीं

वो पल की जिसमें मुहोब्बत जवां होती है

उस एक पल का तुझे इंतज़ार है के नहीं

कैफ़ी आज़मी यांची प्रतिमा डाव्या चळवळीतील झुंझार कार्यकर्त्याची आहे, पण त्यांनी प्रेमाची अतिशय सुंदर प्रेमकविता लिहिली आहे. हेमंतकुमार यांच्या गोड संगीतातील ‘अनुपमा’ (१९६६)ची गाणी ऐकली तर लता-आशा यांच्या आवाजाइतकीच नज़ाकत कैफ़ी आज़मी यांच्या शब्दांतही आहे, हे उमगतं.

यानंतर मात्र संपूर्ण चित्रपटभर जगजीत यांचा आवाज आहे किंवा संगीत आहे असं घडलं नाही. त्यांची एखाद-दुसरी ग़ज़ल/नज्म चित्रपटात घेतली आहे. त्यांच्या संगीताची जातकुळी तशीही हिंदी चित्रपटांशी जुळणारी नव्हती. कुमार गौरव, स्मिता पाटील यांच्या भूमिका असलेल्या ‘आज’ (१९९०) चित्रपटात जगजीत यांचं ‘ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, बारीश का पानी’ हे गाणं आहे. पण गाण्याचा नेमका भाव दु:ख असण्यापेक्षा निसटून गेलेल्या बालपणाच्या हुरहुरीत आहे हे लक्षात घेतलं नाही. परिणामी चित्रपटात गाणं दु:खी करून टाकलं आहे. हेच गाणं जगजीत-चित्रा यांच्या द्वंद्व स्वरात त्यांच्या अल्बममध्ये आहे. ते जास्त सुरेख, नेमकं आणि परिणामकारक आहे. 

नंतरच्या काळात जगजीत यांचं एकच गाणं अतिशय गाजलं. आमीर खानच्या ‘सरफ़रोश’  (१९९९) मधील निदा फ़ाज़ली यांची ग़ज़ल ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’. शब्द, संगीत, कॅमेरा, अभिनय यांचा सुरेख संगम. असं फार थोड्या वेळा हिंदी चित्रपटात जुळून आलं आहे. जतिन-ललित यांचं संगीत तर जगजीत यांच्या आवाजाला अतिशय पोषक आहे. आमीर खान-सोनाली बेंद्रे यांचा अभिनय आणि मुख्य म्हणजे या गाण्याचं चित्रीकरण.

‘मम्मो’ (१९९४), ‘दुष्मन’ (१९९८), ‘तरकिब’ (२०००), ‘तुमबीन’ (२००२), ‘जॉगर्स पार्क’ (२००३) या चित्रपटांमध्ये जगजीत यांचा आवाज एखाद्या गाण्यापुरता वापरला आहे, पण एकूणच त्यांचा प्रभाव जाणवत नाही. ‘मिर्झा ग़ालिब’ मालिका बनवत असताना गुलज़ार यांनी संगीताची सर्व जबाबदारी जगजीत सिंग यांच्यावर टाकली. त्यांनी ती समर्थपणे निभावलीही. ग़ज़लेचा ते किती बारीक विचार करत होते, याचा तो सगळ्यात मोठा पुरावा आहे. 

हिंदी चित्रपटांत यापूर्वीही ग़ालिब यांच्या ग़ज़ला वापरल्या आहेत. एका ग़ज़लेचं उदाहरण तर मोठं मासलेवाईक ठरेल. ‘ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता’ ही ग़ालिब यांची गाजलेली ग़ज़ल. पहिल्यांदा ‘मिर्झा ग़ालिब’ (१९५४) या चित्रपटात गुलाम मोहम्मद यांनी सुरैय्याच्या आवाजात ही ग़ज़ल गाऊन घेतली. ही चाल धावती आहे. पुढे शंकर जयकिशनने ‘मैं नशे में हू’ (१९५९) मध्ये या ग़ज़लेसाठी उषा मंगेशकरांचा उडता आवाज वापरला. कोठ्यावर मुजर्‍यासारखी ही ग़ज़ल या चित्रपटात आहे. अख्तरीबाई (बेगम अख्तर) यांनीही आपल्या धीम्या लयीत या ग़ज़लेला चार चांद लावले. इतकंच काय मोहम्मद रफीच्या आवाजात हीच ग़ज़ल खय्याम यांनीही गाऊन घेतली आहे... जी कुठल्याही चित्रपटात नाही. पण इतकं सगळं असतानाही ‘मिर्झा ग़ालिब’ मालिकेसाठी जगजीत यांनी चित्रा सिंग यांच्या आवाजात जेव्हा ही ग़ज़ल रसिकांसमोर सादर केली, तेव्हा ती सगळ्यांपेक्षा सरस ठरली.

हिंदी चित्रपटांत एकेकाळी नौशाद, मदनमोहन, रोशन, खय्याम, जयदेव यांनी ग़ज़लेचा फार सुंदर वापर करून घेतला होता. तसा तो नंतरच्या संगीतकारांना करून घेता आला नाही. जगजीत यांची आठवण त्यांच्या ग़ज़लांसाठी तर येत राहिलच, पण मोजक्याच चित्रपटांतील त्यांच्या प्रभावशाली ठरलेल्या संस्मरणीय गाण्यांसाठीही येत राहिल.     

a.parbhanvi@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख