दीनदुबळ्या-पीडित बहुजन समाजाला बरोबर घेऊन लढा उभारणारा आणि कोणत्याही संचयात न अडकणारा, असा कॉम्रेडसारखा माणूस आताच्या काळात तरी दुर्मीळच!
संकीर्ण - श्रद्धांजली
सुशील धसकटे
  • कॉम्रेड विलास सोनवणे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Thu , 05 August 2021
  • ग्रंथनामा झलक कॉम्रेड विलास सोनवणे लढता लढता केलेल्या चिंतनातील काही मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत बहुजन स्त्रीवादाच्या दिशेने

कॉ. विलास सोनवणे यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्याविषयीचा हा लेख...

‘लढता लढता केलेल्या चिंतनातील काही’ या कॉ. विलास सोनवणे यांच्या पुस्तकाला प्रकाशक सुशील धसकटे यांनी लिहिलेल्या ‘प्रकाशकीय मनोगता’चा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

प्रिय विलास,

 : तू कधी काळी पेरलेलंस विचारांचं बी

 उगवेल आज ना उद्या म्हणून...

 पेरलेलं वाया जात नाही, हा तुझा आत्मिवश्वास...

 

: काढलास गत किती तरी पिढ्यांचा

 बुद्धीवर जमलेला सनातन प्रस्थापित राब

 केलीस शिर न शिर रंध्रे न् रंध्रे मोकळी मेंदूची...

 अन् घुसवलास डोक्यात शरद् पाटील नावाचा

 ऐंशी वर्षांचा तरुण... त्याच्या हजारो वर्षांच्या

 सांस्कृतिक उत्खननाच्या जगङ्व्याळ पसाऱ्यासह

 आणि म्हणालास, खरवडून काढ जाणीवनेणीव,

 खोट्या इतिहासाच्या आणि भ्रामक मोनोलिथ्सच्या पुटांसकट...

 जाणून घे जाणीवनेणिवान्वेषी-तर्कशास्त्र...

 त्याशिवाय कळणार नाहीत त्यात दफन झालेल्या

 समतावादी सामाजिक बहुप्रवाही विचारवाटा...

 

: काढलंस बाहेर भाषा, इतिहास, जात, पाठांतरवादी आणि

 पोथिनिष्ठतेच्या अभिजन न्यूनगंडांतून 

 म्हणालास, कर कडेलोट वर्णवर्गजातीस्त्रीदास्यान्ताचा...

 लाथाड सर्व विषमता, भेद आणि तद्दन दांभिक अस्मितावादीही

 हीच तर प्रस्थापित, भांडवलदारी व्यवस्थेची हुकमी शस्त्रे,

 जी आडवी येतात माणसांच्या, माणुसकीच्या, मजहबच्या, आणि

 जलजंगलनिसर्गपर्यावरणाच्याही...

 सामान्यातल्या सामान्य गरिबाला जिथं बिनिदक्कत स्वत:च्या

 हक्कांबद्दल मान वर करून बोलता येतं, ते खरं स्वातंत्र्य रे...

 त्यासाठी भांडत राहा, हस्तक्षेप करत राहा...

 तुझ्या परीनं, असशील तिथं, जमेल तसं...

 तुझा एकेक शब्द त्या गरिबासाठी येऊ दे...

 

 - विलास, ‘जोहार’ निर्विवादपणे रसरसून आली ती तुझ्यामुळेच!

 ...बाकी ही छोटीशी भेट तुला अंत:करणापासून समर्पित...

 : जे आहे ते :

 (अर्पणपत्रिका, ‘जे आहे ते’ (लेखसंग्रह) : सुशील धसकटे)

१.

‘‘हा देश हा समाज माझा आहे आणि तो शांत व समृद्ध राहावा म्हणून या समाजातील-देशातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध, चुकीच्या धोरणांविरुद्ध मला कायम लढत राहिले पाहिजे. कारण ती माझी आंतरिक व प्रामाणिक गरज आहे. आणि ही गरजच मला जगवते आहे. त्यामुळे परिवर्तनाची लढाई लढताना व परिवर्तनशील विचार पुढे घेऊन जाताना त्या त्या टप्प्यावर मला जे स्वाभाविकपणे दिसलं, जाणवलं आणि माझ्या अभ्यासाच्या व चिंतनाच्या पातळीवर जे पटलं तेच मी स्पष्टपणे मांडत गेलो, लिहीत गेलो. काम करत गेलो. इतरांना पटेल की नाही, त्यांना काय वाटेल, वाचून वा ऐकून कोणी नाराज होईल, कोणी टीका करेल असल्या गोष्टींची मला चिंता नाही. रूढार्थानं मी काही लेखकबिखक नव्हे, जीवनदानी कार्यकर्ता आहे.’’

अशी रोखठोक व विनयशील भूमिका कॉम्रेड विलास सोनवणे यांनी एकदा मांडली होती व ती मांडत असताना त्यांच्या शब्दाशब्दांतून-देहबोलींतून प्रचंड तळमळ, पोटतिडिक व्यक्त होत होती. त्यातून दृढ निश्चय-निर्धारही व्यक्त होत होता. नैतिकदृष्ट्या स्वच्छ व प्रामाणिक असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती अशी परखड भूमिका घेऊ शकत नाही. ही भूमिका काही एकाएकी आलेली नाही, तर त्यामागे पन्नास वर्षे सहन केलेल्या यातना आहेत, दु:ख आहे, पराकोटीचा संघर्ष आहे. भिकाऱ्यापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक जातकुळींची माणसं अनुभवलेली आहेत. माणसं उभी राहताना जशी पाहिली, तशी ती कोसळतानाही पाहिलेली आहेत. देशभराची भ्रमंती आहे. इत्यादी इत्यादी बऱ्या-वाईट अनुभवांतून कॉम्रेड सोनवणे हे रसायन घडलेले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पोटाचं ऑपरेशन झाल्याला आठ-दहा दिवसही उलटत नाहीत, तोच हा माणूस अंथरुणातून उठून चळवळीच्या आगामी उपक्रमांसंदर्भात कार्यकर्त्यांची चक्क बैठक घेतो. डॉक्टरनं सांगितलेल्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला धुडकावून लावून ‘जणू काही झालंच नाही’ या आविर्भावात चक्क घराबाहेर पडून नव्या उत्साहानं कामाला लागतो. का? तर ‘‘मला पडून राहून चालणार नाही. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन जवळ येऊन ठेपलंय आणि कामं तर खूप उरकायची राहिलीत.’’ ही बांधीलकी!

कॉम्रेड प्रचंड आशावादी आहेत. एकदा मी त्यांना विचारलं, ‘‘कॉम्रेड, तुम्ही हे सगळं कशासाठी करता आहात?’’

ते म्हणाले, ‘‘ही माझी गरज आहे. हे करायचं नाही असा विचार जरी मनात डोकावला तरी प्रचंड अस्वस्थ होतो.’’

‘‘हे खरं आहे, पण ज्यांच्यासाठी तुम्ही हे करता आहात त्या समाजाला याची कुठं चाड आहे?’’

‘‘मी आशावादी माणूस आहे. मला वाटतं माझा रोल फक्त प्रामाणिकपणे काम करत राहण्याचा आहे आणि मला खात्री आहे की, एक ना एक दिवस मी काय हस्तक्षेप करू पाहतो आहे, हे लोकांच्या लक्षात येईल. जिवाला जीव देणारी शेकडो माणसं देशभर मी उभी करू शकलो, हे काहीच नाही का?’’

२.

व्यक्तिगत आयुष्यातील सर्व भौतिक सुखांवर पाणी टाकून पूर्णवेळ चळवळीत उतरलेला, त्यातून येणारे बरे-वाईटपण स्वीकारत जाणारा, दीनदुबळ्या-पीडित बहुजन समाजाला बरोबर घेऊन लढा उभारणारा, आपल्याकडे आहे ते देऊन टाकणारा व कोणत्याही संचयात न अडकणारा, असा कॉम्रेडसारखा माणूस आताच्या काळात तरी दुर्मीळच! कसलंच भरीव काम न करता स्वत:च्या नावाचा गवगवा करणारे, आयुष्यभर पैशांच्या मागे धावून उत्तरायुष्यात ‘समाजकार्य’ करू पाहणारे, समाजात आपला मानपान व प्रतिष्ठा वाढावी यासाठी ‘समाजकार्य’ करणारे, समाजकार्याच्या नावानं जमीनजुमला-गाडी असा लवाजमा करणाऱ्या समाजसेवकांची आज चलती आहे. पण हे सगळे चमकणारे विजेचे दिवे आहेत. वीज गेली की बंद पडणारे. कॉम्रेड सोनवणेंसारखे दिवे हे कुणाच्या विजेवर चालणारे नाहीत. ते स्वयंप्रकाशी आहेत. ‘स्वयंप्रकाशी’ म्हणण्यात एक मथितार्थ दडलेला आहे. तो म्हणजे ते कुणा भांडवलदाराच्या, शासनाच्या अनुदानावर ही चळवळ-संघटना चालवत नाहीत. म्हणूनच ते रोखठोक-स्पष्ट-परखड भूमिका घेऊ शकतात. जिवाला जीव देणारा सर्वसामान्य कार्यकर्ता हे त्यांचं खरं बळ आहे. पण अशी माणसं जोडणंही साधीसोपी गोष्ट नव्हे. आज अशा कार्यकर्त्यांचं, तरुणांचं त्यांनी ‘युवा भारत’ या नावानं एक संघटन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभर उभं केलं आहे.

तरुणपणात चळवळीत प्रवेश केलेला. खिशात पैसे नसत. त्यामुळे सकाळचा चहा-नाश्ता, जेवणही कधी मिळत नसे. उपाशीपोटी पक्षनिष्ठेपायी पायीच काम करत फिरावं लागे. पण नेतृत्वानं कधी माणुसकीच्या दृष्टिकोनातून ‘तू जेवलास का? काही खाल्लंस का? तुझ्याकडे पैसे आहेत का?’ म्हणून तर कधीच विचारलं नाही, उलट कार्यालयात गेलं की पहिलं झापाझापी सुरू. हा कटू अनुभव गाठीशी असल्यानं आज त्यांच्या घरी गेलेला कार्यकर्ता वा तरुण उपाशीपोटी सहसा परतत नाही. गेल्यावर आधी घरात असेल ते खायला देणार आणि मगच पुढचं बोलणार, हा तिथला रिवाज आहे.

शिवाय प्रत्येक कार्यकर्त्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. ‘विलास सोनवणे हे कोणीतरी आपले मोठे नेते आहेत, मग त्यांच्यासमोर असं बोलावं, तसं बोलू नये’ अशी अवघडलेपणाची वा संकोचाची स्थिती त्यांच्या सहवासात कधी होत नाही. उलट ‘विलास, तुझा हा मुद्दा नीट कळला नाही, पुन्हा नीट समजावून सांग.’ किंवा ‘विलास, मला वाटतं हे तुझं चुकतंय, आपण असं असं करू.’ अशा अरेतुरेच्या संबोधनानं व मित्रत्वाच्या भाषेत एखादा कार्यकर्ता त्यांच्याशी बोलताना पाहून काहीसं आश्चर्यही वाटतं. नेतृत्व व सामान्य कायर्कर्ता यातलं हे अंतर काढून टाकल्यानं लहान-मोठेपणाची भावना संपुष्टात येते. शिवाय निखळ व मैत्रीपूर्ण संवाद साधला जातो. त्यामुळे कॉम्रेडशी कुठल्याही विषयावर बोलताना कसल्याही प्रकारचं दडपण येत नाही किंवा हा माणूस रागावेल किंवा कटुता बाळगेल, ही भीतीही उरत नाही. या गोष्टी कोणाला अतिशय साध्या वाटतील व तशा त्या आहेतसुद्धा, पण चळवळ उभी करताना-माणसं जोडताना अशा किरकोळ गोष्टीचंही भान नेतृत्वाला ठेवावं लागतं. त्याशिवाय ‘माणूस जोडला जाणं व चळवळीचं पाऊल पुढं पडणं’ ही प्रक्रिया होत नाही.

कार्यकर्त्यांच्या मनात शिरून त्याचं मन जाणण्याची, त्याच्या सुख-दु:खाशी-भावभावनांशी एकरूप होण्याची, त्याची बलस्थानं हेरून त्याला आस्ते आस्ते फुलवण्याची आणि एकूणच या सगळ्यांचा संघटना वा चळवळ उभारणीसाठी यथायोग्य उपयोग करून घेण्याचं संघटन कौशल्य कॉम्रेडकडे आहे. त्याशिवाय बहुश्रुतपणा व बहुभाषिकताही त्यांच्याकडे आहे. जोडीला तरल निरीक्षणशक्ती व सूक्ष्म अभ्यास आहे. त्यामुळे हा माणूस अगदी गावपातळीपासून ते जागितक पातळीपर्यंत- समाजकारण, राजकारण, साहित्य, भाषा, संस्कृती, कला, संगीत आदी कुठल्याही विषयांवर समरसून बोलू शकतो.

आपल्याकडे गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांच्या काळात कम्युनिस्ट किंवा मार्क्सवादी असण्याची एक टिपिकल चौकट तयार झालेली आहे. ती म्हणजे दाढी वाढवणं, नेहमी गंभीर असणं, साहित्य-कला-संगीत आदींचं वावडं असणं, भयंकर (अवास्तव?) शिस्तिप्रय, एखाद्याचं खुल्या मनानं जाहीर कौतुक न करणं इत्यादी इत्यादी कम्युनिस्ट वा मार्क्सवादी म्हटलं की, ही एक रुक्ष चौकट पटकन नजरेपुढे उभी राहते. कॉम्रेड सोनवणे यांनी ही रुक्ष चौकट मोडीत काढून टिपिकल डावं असण्याला छेद दिला, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. त्यांची म्हणून एक शिस्त आहे, पण संबंधित व्यक्तीला काचणारी नसते. स्वत:ची चूक अगदी सहजपणे ते ‘सॉरी यार, चुकलं माझं’ म्हणून मान्य करतात. दुसऱ्यानं वा एखाद्या तरुणानं चांगला मुद्दा मांडला तर ते भरभरून व जाहीरपणे दादही देतात. त्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. संगीत या विषयावर वा गुरुदत्त या अभिनेत्यावर हा माणूस तासन्तास बोलू शकतो. मध्येच मूड लागला की, गाणंही गुणगुणतो. ही सर्वलक्षणं ‘टिपिकल कॉम्रेड’ची मुळीच नाहीत. दीर्घकाळ डाव्या चळवळीत राहून स्वत:ला कुठल्याही चौकटीत अडकवू न देणं, रिजिड होऊ न देणं यातून कॉम्रेड सोनवणे यांनी खऱ्या अर्थानं मार्क्सचा विचार आत्मसात केल्याचं दिसतं.

३.

दुसऱ्याला सतत प्रोत्साहित करत राहणं हा एक त्यांच्या स्वभावातला महत्त्वाचा गुण. एखाद्याला ते लिहिण्यासाठी प्रोत्साहित करतील, हे पुस्तक वाच - ते पुस्तक वाच, ‘गुड, हे तू छान करतोयस. एवढ्यावरच थांबू नकोस’ अशा एक ना दोन अनेक गोष्टी सांगता येतील. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष भेटीत किंवा फोन करूनही त्यासंबंधीचा ‘पुढं काय झालं? केलंस की नाही?’ असा पाठपुरावाही करतील. नाउमेद होणं हा त्यांचा स्वभावच नाही. ‘युवाभारत’चे कार्यकर्ते काय किंवा त्यांच्याशी संबंधित चळवळीतील कार्यकर्तेकाय त्यांच्यासाठी कॉम्रेड सातत्याने अभ्यासवर्ग घेत असतात. या अभ्यासवर्गातून ते कितीतरी विषयांच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतात. कॉम्रेडची कथनशैली अतिशय साधीसरळ व ओघवती आहे. ते मार्क्सवादावर बोलतील, जातिव्यवस्थेवर बोलतील, पण अतिशय ओघवत्या भाषेत. केवळ थिअरॉटिकल नव्हे, रुक्ष नव्हे. त्यामुळे ज्यांचा मार्क्सशी किंवा एकूण या विश्वाशी काहीएक संबंध नाही, अशा माणसालाही हा विषय सहज कळतो, लक्षात राहतो. मार्क्सचा एखादा सिद्धान्त वा विचार सांगता सांगता ते समोरच्या व्यक्तीच्या विचारिवश्वाशी, त्याच्या जगण्याशी, त्याच्या पर्यावरणाशी मार्क्सची नाळ कधी व कशी जोडतात हे त्या व्यक्तीलाही समजत नाही आणि ती व्यक्ती मनातल्या मनात सहज म्हणून जाते की, ‘‘आयला, मार्क्स असा आहे तर!’’ याचं कारण त्याला कालपर्यंत कार्ल मार्क्स फक्त पोथिनिष्ठ पद्धतीनंच सांगितला गेला होता. त्यामुळे मार्क्स हे काहीतरी भयंकर प्रकरण आहे, अवघड आहे, परकीय आहे, डावं-कम्युनिस्ट आहे, म्हणून आपण त्यापासून दूरच राहिलं पाहिजे, अशी जर इथल्या बहुसंख्याकांची मनोभूमिका झाली असेल तर नवल नाही! म्हणूनच खऱ्या अर्थानं मार्क्सबद्दलचं प्रबोधन कॉम्रेड सातत्यानं करताना दिसतात.

या संदर्भात एकदा त्यांना विचारलं तर कॉम्रेड म्हणाले, ‘‘अशा प्रकारे अभ्यासवर्ग कायम चालवणं कुठल्याही चळवळ वा संघटनेसाठी आवश्यकच असतं. त्याशिवाय ‘आपण नेमकं कशासाठी व का लढत आहोत? त्यामागची कारणमीमांसा काय? विचारधारा कोणकोणत्या आहेत?’ इत्यादी इत्यादी नीट कळल्याशिवाय चांगला कार्यकर्ता तयार होणार नाही... कार्यकर्त्याला या सगळ्या प्रवाहांचा-अंत:प्रवाहांचा अर्थवा अन्वयार्थ लावता आला पाहिजे. कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या डोळस व प्रगल्भ झाला, तरच चळवळही डोळस व प्रगल्भ होईल. साहिजकच कार्यकर्त्याचा बौद्धिक स्तर उंचावला तर चळवळीचाही उंचावणार. म्हणून अभ्यासवर्ग, शिबिरं यावर माझा अधिक भर असतो. या उपक्रमांचं खणखणीत यश म्हणजे ‘युवाभारत’चे असे कितीतरी कार्यकर्ते आज तयार झाले आहेत, की जे एखाद्या विषयाची उत्तम वैचारिक मांडणी करू शकतात. त्यामुळे मी उपलब्ध असो नसो ही मंडळी परस्पर विविध विषयांवर वर्ग चालवतात. त्यात्या विषयाची उत्तम तयारी करतात. वाचतात, चर्चा करतात. एखाद्या विषयावर आपण स्वत: अभ्यासवर्ग घेऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात आला, हे यश फार मोठे आहे. ‘‘नेतृत्वानंच फक्त वाचायचं, त्यानंच विचार मांडायचे, त्यानंच निर्णय घ्यायचे आणि सामान्य कार्यकर्त्यानं फक्त कार्यकर्ताच राहायचं, हे जे मी अनुभवलं ते इथं मी जाणीवपूर्वक खंडित केलंय. असा संकुचित दृष्टिकोन माझा नाही, ‘युवा भारत’चा किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा नाही, हे सांगायला मला खूप बरं वाटतं.’’

४.

‘लढता लढता केलेल्या चिंतनातील काही’ या पुस्तकात कॉम्रेड विलास सोनवणे यांनी गेल्या काही वर्षांत प्रसंगानुरूप केलेल्या चिंतनातील काही निवडक लेखन एकित्रत केलं आहे. साहित्य-भाषा-समाज-संस्कृती-राजकारण-जातिव्यवस्था-धर्म-भांडवलशाही-जागितकीकरण आदी इथल्या समाजाला व्यापून राहिलेल्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे. गेल्या अर्धशतकभर सामाजिक चळवळीत व आंदोलनात पूर्णवेळ कार्यरत असलेल्या कॉम्रेड विलास सोनवणे यांच्यासारख्या एका चिंतनशील व अभ्यासू कार्यकर्त्याच्या दीर्घअनुभवाचा आणि चौफेर अभ्यासाचा पाया असलेल्या या लेखनाला एक वेगळंच महत्त्व आहे.

कॉम्रेड विलास सोनवणे कर्ते विचारवंत आहेत, चार भिंतींमध्ये बसून विचार पाडणाऱ्यांमधले ते नव्हेत. चळवळीच्या, आंदोलनाच्या निमित्तानं त्यांचा तरुणांशी, खेड्यापाड्यांशी, बहुजन समाजाशी, शासनव्यवस्थेशी नित्य संबंध असतो. प्रत्यक्षात ग्राऊंड रिअलिटी काय आहे, तिथं काय काय नि कसं कसं घडतं, काय केलं म्हणजे काय होईल याच्याशी ते चांगलेच परिचित आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वास्तव आणि ते शब्दबद्ध करणारे विद्वान वा अभ्यासक यांच्यात त्यांना जी एक स्पेस दिसतेय (जी कोणी मांडत नाही व दाखवत नाही) ती स्पेस सोनवणे आपल्याला या चिंतनातून दाखवत आहेत. विविधांगी वाचनाची व व्यासंगाची बैठक या चिंतनाला आहे. म्हणूनच ते विचारांची जी एक मांडणी करतायत, त्याकडे आपल्याला नीटपणे बघितलं पाहिजे. केवळ कार्यकर्ता म्हणून सोनवणेंकडे दुर्लक्ष करू, तर एकूणच विचारविश्वाशी ती प्रतारणा ठरेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कॉम्रेड विलास सोनवणे यांचा मूळ पिंड मार्क्सवादी विचारांचा आहे व ते स्वत:ला मार्क्सवादीच म्हणवतात. परंतु ते पोथिनिष्ठ मार्क्सवादी नाहीत, हे आवर्जून सांगितलं पाहिजे. त्यांच्या चळवळीच्या आयुष्याची सुरुवातच मुळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यत्वापासून झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘एसएफआय’ या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे ते संस्थापक सचिव होते. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे ते सरचिटणीसही होते. तो काळ दलित पँथरनं पेटवलेल्या वणव्याचा होता. तेव्हा ‘जातीच्या प्रश्नाचं काय?’ या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही चळवळीला हात घालणं शक्य नव्हतं. हाच प्रश्न पक्षात उपस्थित केल्यामुळे पुढे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली. त्यांच्या हकालपट्टीची पक्षानं दिलेली कारणंही त्या काळातल्या हाकलून दिलेल्या इतर कार्यकर्त्यांप्रमाणेच होती. म्हणजे व्यसनी, चारित्र्यहीन, बेशिस्त वगैरे वगैरे. कार्यकर्त्याने खाली मान घालून निमूटपणे फक्त ‘कार्य’च केलं पाहिजे, त्यानं प्रश्न विचारता कामा नयेत असा एक अलिखित, पण ‘कडक’ नियम आहे. म्हणजे विद्यार्थ्यानं शिक्षकाला कोंडीत टाकणारे प्रश्न विचारू नयेत, नाही तर त्याला वर्गातून हाकलून दिलं जाण्याची शिक्षा होते, असाच काहीसा हा प्रकार. पण या कटू अनुभवाचा काडीचाही बाऊ न करता किंवा त्याची जाहीर वाच्यता न करता समतावादी परिवर्तनशील विचारांशी आपलं नातं सांगत अन्य चळवळींच्या माध्यमातून ते काम करत राहिले.

या उलट आपण पक्षातून बाहेर पडलो हे त्यांना योग्यच वाटतं. असं असलं तरी प्रसंगोपात कम्युनिस्ट चळवळीची ते कठोर समीक्षाही करतात. एका लेखात ते लिहितात, ‘‘आपले सर्व ब्राह्मो-कम्युनिस्ट, ब्राह्मो-समाजवादीसुद्धा पाठांतर परंपरेतून आलेले होते. त्यांनी मार्क्स फक्त पाठांतर केलेला आहे. त्यामुळे गेल्या ८० वर्षांमध्ये मार्क्सवादी चळवळीला किंवा समाजवादी विचारांना पुढे नेईल असे एकही दर्जेदार पुस्तक वा तत्त्वज्ञान म्हणून ब्राह्मो-कम्युनिस्ट व ब्राह्मो-समाजवाद्यांकडून लिहिले गेलेले नाही. व्हर्च्युअल रिअलिटी ही जी भांडवलशाहीने नवीन गोष्ट आणली, ती पोथ्यांमध्ये नसल्याने त्यांना समजली नाही.’’ थोडक्यात, कम्युनिस्ट व समाजवादी चळवळीच्या पिछेहाटीची व अपयशाची कारणमीमांसा करताना नेमकं कुठं व काय काय चुकलं याकडे ते प्रसंगानुरूप तटस्थपणे व टीकात्मक दृष्टीनं पाहतात. तद्वतच ते त्यांच्या मर्यादाही दाखवून देतात.

५.

‘जात’ हे भारतीय समाजाचं असं ढळढळीत वास्तव आहे, की ज्याची मुळं शतकानुशतके इथल्या समाजव्यवस्थेत खूप खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळे या ना त्या दृष्टीनं ‘जात’ ही इथल्या प्रत्येक चलनवलनांवर, हालचालींवर, क्रिया-प्रतिक्रियांवर सूक्ष्माती सूक्ष्म परिणाम करतेच करते. त्यामुळे कोणाची इच्छा असो वा नसो ‘जात’ वगळून इथल्या कोणत्याही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक आदी अंगांचा विचार करता येत नाही आणि तसा तो केल्यास अपूर्णच ठरेल.

या पार्श्वभूमीवर ‘ब्राह्मो-कम्युनिस्ट, ब्राह्मो-समाजवादी’ ही सोनवणे यांनी वापरलेली विशेषणं आपल्याला त्यांच्या एकूण जीवनानुभवाच्या, वैचारिक विश्लेषणाच्या व महत्त्वाचं म्हणजे भारतातील आजवरच्या कम्युनिस्ट चळवळीच्या वाटचालीच्या संदर्भात नीट समजून घ्यावी लागतात. तसे ते नीट समजून घेतले म्हणजे सोनवणेंची मांडणी एकांगी किंवा केवळ ‘जाती’पुरती उरत नाही, तर तिला सामाजिकदृष्ट्या असलेले इथल्या जातिसंदर्भांचे काळे-पांढरे कोंदण अधोरेखित करत ती अनेक पदर उलगडते. जे कधी उलगडलेलेच नव्हते. पण इथल्या समाजाला व पर्यायाने सामाजिक चळवळींना व्यापून राहिले होते. इथं एक गोष्ट स्पष्ट करणं जरुरीचं आहे ते म्हणजे ‘ब्राह्मो-कम्युनिस्ट, ब्राह्मो-समाजवादी’ ही विशेषणे सोनवणे विशिष्ट जात म्हणून वापरत नाही तर ‘ब्राह्मण्य’ या अर्थानं वापरतात.

या पुस्तकाच्या माध्यमातून कॉम्रेड विलास सोनवणे जातिव्यवस्थेच्या संदर्भात एक महत्त्वाचा विचार मांडतात. तो म्हणजे ‘जात ही उत्पादन पद्धती आहे’ (mode of production) हा. प्रचिलत हिंदू धर्माचा एक भाग वा उतरंडीची एक बंदिस्त व्यवस्था हा जातीकडे पाहण्याचा आपला एक सर्वसाधारण व रूढ दृष्टिकोन राहिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या समाजात जातीकडे ‘अस्मिता’ म्हणूनही पाहिलं जातं. यामुळे आपल्याकडचे एकूणच समाजजीवन व विचारिवश्व पुष्कळ गोंधळाचं आणि गुंतागुंतीचं होऊन बसलं आहे.

या पार्श्वभूमीवर सोनवणे यांची मांडणी मूलभूत व विचाराला चालना देणारी ठरते. जातीकडे ‘उत्पादक जाती’ म्हणून पाहताना ते लिहितात, ‘‘वसाहतवादाच्या आक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात ब्राह्मणांपासून ते महारांपर्यंत सर्व सेवेकरी जाती, तर कुणब्यांपासून ते विणकरांपर्यंत प्रत्यक्ष शेती करणारे व त्या शेतात निर्माण झालेल्या उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या विविध जाती बेदखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली. भांडवलशाही विकासाच्या पुढील टप्प्यांत ही प्रक्रिया अधिक गतिमान होत गेली.’’

या संबंधीचं विचारसूत्र त्यांच्या एकूणच वैचारिक मांडणीमध्ये दिसतं. याच व्यूहातून ते पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पाहताना लिहितात, ‘‘भारतामध्ये नैसिर्गक साधनसंपत्ती, सामाजिक समूह आणि उत्पादनव्यवस्था या तिन्ही गोष्टी परस्परसंबंधित आहेत. त्यामुळे जात ही एक उत्पादनव्यवस्था म्हणून भारतात अस्तित्वात होती. त्या काळापर्यंत इथे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालेला दिसत नाही. कारण जातिआधारित उत्पादन- व्यवस्थेमध्ये समाज आपल्या गरजेनुरूप निसर्गापासून संसाधन घ्यायचा व त्याप्रमाणात परतही करायचा. गरजेपेक्षा अधिक संचय करणे आणि त्याकरता निसर्गाचे अनियंत्रित शोषण करणे, याकरता या समाजव्यवस्थेत किंचितही जागा नव्हती. भांडवलशाहीने सर्वप्रथम या गोष्टीची मोडतोड करून सामाजिक गरजेऐवजी बाजाराला केंद्रस्थानी आणले.’’

उत्पादनव्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यातून पाहताना असे कितीतरी मूलगामी मुद्दे इथल्या सामाजिक स्थितीगतीच्या संदर्भात सोनवणे उपस्थित करतात.

भारतीय मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या युरोपियन वा रशियन ‘साचेबंदी चौकटी’ मोडीत काढत ते मार्क्सच्या विचारांना इथल्या संपूर्ण भारतीय चौकटीत प्रस्थापित करतात. त्यामुळेच ही विचारचिकित्सा वा मांडणी करताना त्यांच्या विवेचनात पुष्कळदा भारतीय संतपरंपरा व सुधारकी परंपरा, तसेच फुले-गांधीविचारांचा आढळ अनिवार्यपणे होताना दिसतो.

तसेच ‘बहुजन गांधी’ ही काल-परवापर्यंत कुणीही न केलेली नवी वेगळी मांडणीही ते पहिल्यांदा समोर ठेवतात. फुले-मार्क्स-गांधी यांच्या विचारांचा एक उत्तम समन्वय त्यांच्या मांडणीतून दिसून येतो. वास्तविक आपल्याकडे कम्युनिस्ट चळवळींनी या गोष्टींची उपेक्षाच केलेली दिसते. हे लक्षात घेता एक मार्क्सवादी विचारक म्हणून सोनवणे खऱ्या अर्थानं इथल्या संदर्भात मार्क्स विचाराला साजेशी - किंबहुना मार्क्सवादी विचारांना पुढे घेऊन जाणारी मांडणी करतायत, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. हे त्यांचं योगदान मला खूप महत्त्वाचं वाटतं.

‘आजच्या काळात मार्क्सच्या विचारांचं काही प्रयोजन उरलं नाही’ असं बोललं जात आहे, पण सोनवणेंचं हे पुस्तक वाचताना मार्क्स आजही किती प्रस्तुत आहे, हे लक्षात येतं.

६.

कॉम्रेड सोनवणे यांच्या आणखी एका महत्त्वाच्या कार्याची नोंद घेतल्याशिवाय हे मनोगत पूर्ण करता येणार नाही. ते म्हणजे त्यांनी मुस्लीम प्रश्नांवर केलेलं काम. गेली अनेक वर्षे ते मुस्लिमांच्या विविध प्रश्नांवर काम करत आहेत. मुस्लीम मानसिकता व जाणिवा जाणून घेत घेत ते महाराष्ट्र व भारतभर फिरले आहेत. या सर्वांचं फलित म्हणजे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन व मुस्लिमांमधील ११८ जाती-पोटजातींचा शोध. त्यांच्या कार्यामुळे जगभर चाललेलं ‘धर्माचं मोनोलिथ’ करण्याच्या राजकारणाला छेद बसला आहे. हे काम अख्ख्या भारतभर व त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर जगभरात कोणीही केलं नाही. ही अतिशयोक्ती नव्हे, वास्तव आहे. त्यामुळे त्यांना भारत व जगभर या मुस्लीम प्रश्नांवर मार्गदर्शनासाठी बोलावणे येत असतात. हे कॉम्रेड सोनवणे यांचं सबंध भारतीय समाजकारणातील मोठं योगदान आहे.

दुर्दैवानं अशा प्रकारची माणसं व त्यांचं कार्ययापासून आमची सर्वप्रसारमाध्यमं शेकडो मैल दूर आहेत. त्यांच्या गावीही याची खबर नसते. मात्र अपवाद करावा लागतो तो, प्रफुल्ल बिडवाई (टाइम्स ऑफ इंडिया), कुमार केतकर (महाराष्ट्र टाइम्स), भालचंद्र मुणगेकर (महानगर) आणि असगर अली इंजिनिअर (हिंदू) यांचा. या मंडळींनी कॉम्रेडच्या या कार्याची दखल घेतली, त्याची नोंद केली.

‘मुस्लिमांमध्ये विविध जाती-पोटजाती नाहीत’ असं वरचेवर बोललं जात असलं तरी कॉम्रेडने त्यांच्यातील ११८ जातींचा शोध लावला आहे, हे धक्कादायक वास्तव आपल्याला स्वीकारावं लागतं. हे काम वाटतं तितकं सोपं मुळीच नाही. त्यासाठी त्यांना कट्टर मुस्लिमांच्या विरोधाला व रोषालाही सामोरं जावं लागलं. प्रसंगी जिवावरही बेतलं. नंतर मात्र स्थिती हळूहळू बदलत जाऊन मुस्लिमांमधील सुशिक्षितांसह अनेकांनी कॉम्रेडच्या या धडपडीला-प्रयत्नांना भक्कम पाठिंबा दिला.

इथल्या जातिवादी प्रवृत्तींनी मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज देशभर पसरवले आहेत. मुस्लीम हे वाईट, देशद्रोही, अतिरेकी ही जनभावना आज वाढीस लागलेली आहे. तशात होणाऱ्या बॉम्बस्फोटांनी तर ही भावना आणखीच गडद केली आहे.

या पार्श्वभूमीवर कॉम्रेड विविधांगी मुस्लीम प्रश्न हाताळत आहेत. मुस्लिमांना समजून घेत घेत त्यांच्यातील गैरसमज दूर करत, त्यांना इथल्या अवघडलेल्या वातावरणातून सैल करीत आहेत. त्यांना खरं वास्तव सांगत आहेत. ‘इथला मुसलमान हा मराठी आहे, भारतीय आहे’ हे सत्य त्यांनी समाजासमोर ठेवलं आहे. खरं तर मुस्लीम स्वत: फार उघडपणे-मोकळेपणाने लिहीत वा बोलत नाहीत. एक प्रकारच्या मानिसक दहशतीत ते जगतात, याचं समग्र भान ठेवत ते भारतीय मुस्लीम मनाचा वेध घेतात.

यातूनच मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचा उपक्रम पुढे आला. आजवर ९ संमेलनं झाली आहेत. त्या विचारमंचावरून ‘धर्मानं मुसलमान असलो तरी आम्ही मराठी-भारतीय मुसलमान आहोत’ हा विचार अतिशय आत्मविश्वासानं शिक्षित व बुद्धिवादी मुस्लीम व्यक्ती मांडू लागल्या आहेत. ही भावना, ही जाण त्यांच्यात निर्माण करणं, त्यांना एका मंचावर आणून बोलतं-लिहितं करणं, धार्मिक विद्वेष व अभिनिवेशाची पातळी कमी करून माणूस म्हणून जगणं, हे सगळं सगळं कॉम्रेड सोनवणे यांच्यामुळे शक्य झालं. कॉम्रेडचं हे काम ऐतिहासिक आहे. मानदंड आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

याच बरोबर आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो, तो म्हणजे सोनवणे यांनी खूप परिश्रम घेऊन भरवलेल्या सर्वधर्मीय व सर्वपंथीय सामाजिक परिषदेचा. ‘जंगल-जमीन-जल’ या मुद्द्यांवर त्यांनी सर्वधर्माच्या पंडितांना एका विचारमंचावर आणून धार्मिक सलोख्याचं एक उदाहरण देशासमोर ठेवलं आहे. वास्तविक ‘सर्वधर्माचे लोक एकत्र येणं शक्य नाही, तेव्हा तुम्ही या भानगडीत पडू नका’ असा सल्ला त्यांना अनेकांनी दिला होता. पण ही परिषद यशस्वीपणे भरली. इतकेच नव्हे तर हजारो लोक त्यासाठी एकत्र आले.

७.

आजचं भ्रमित करणारं वास्तव कसं समजून घ्यायचं, त्याला सामोरं कसं जायचं, हा संभ्रम व एक विचित्र अस्वस्थता आजच्या तरुणांसमोर आहे. प्रस्थापित राजकारणानं स्वार्थीपणाचा व भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. विविध जातींचे गट आपापल्या ‘अस्मिता’ घेऊन मेळावे भरवत आहेत. महागाई सामान्यांचे हाल हाल करत आहे. जागतिकीकरणामुळे पोटार्थी उद्योग-धंदे करणारी माणसं हळूहळू कोलमडत आहेत; तर ‘विकास होतोय’ असं भासवत मूळ प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याची प्रिक्रया भांडवलशाही व भांडवलशाहीचे ‘हस्तक’ राबवत आहेत. शेतकऱ्यांचे हाल तर आता कुत्राही खायला तयार नाही. पाण्याचा प्रश्न ग्रामीण महाराष्ट्रात भेडसावत असताना, दुसरीकडे मात्र फक्त ‘दहा-बारा कुटुंबांच्याच’ शेतांत-कारखान्यांत पाणी बारमाही सुखेनैव खेळत आहे. असे एक ना दोन अनेक प्रश्न आणि फक्त प्रश्नच उभे आहेत.

अशा स्थितीत उदारमतवादामुळे आणि फक्त भांडवलशाहीमुळेच विकास होऊ शकतो, असे सांगत सामान्य माणसांची व तरुणांची दिशाभूल केली जात आहे. या सगळ्यांतून गोंधळलेला तरुण आणखीच ठेचकाळत आहे. या सबंध पार्श्वभूमीवर कॉम्रेड सोनवणे यांचं हे पुस्तक मला अतिशय महत्त्वपूर्ण व औचित्यपूर्ण वाटतं. यामुळे तरुणांच्या मनातील गुंता काही प्रमाणात का असेना सुटायला मदत होईल व आजचं संभ्रिमत वास्तव समजून घ्यायलाही त्यांना हे ‘चिंतन’ उद्बोधक ठरेल, अशी आशा वाटते आणि तसे ते उद्बोधक ठरो म्हणजे आमची ही धडपड कारणी लागली, असे समाधानाने म्हणता येईल!

‘लढता लढता केलेल्या चिंतनातील काही’ : कॉम्रेड विलास सोनवणे

हर्मिस प्रकाशन, पुणे

पहिली आवृत्ती - २२ डिसेंबर २०१२

मूल्य – १५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......