विचक्षण नाटककार, विचारवंत गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा पुनर्मुद्रित लेख. २००९ साली देशपांडे यांना महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा साहित्यातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानिमित्त ‘साधना’ साप्ताहिकाचा ६ फेब्रुवारी २०१०चा अंक महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार विशेषांक होता. त्यात हा लेख प्रकाशित झाला होता....
..................................................................................................................................................................
‘पांडे’ या करवसुलीच्या अधिकारपदापासून सुरू होणारी घाटपांडे, काळपांडे, पांढरीपांडे, वऱ्हाडपांडे, सरदेशपांडे ही व अशी खूप आडनावे मराठीत रुळली. मात्र महाराष्ट्रातच नव्हे, तर जगात कुठेही मराठी भाषिक समूह राहत असेल तिथे, हमखास आढळणारे आडनाव ‘देशपांडे’. या विशाल वृक्षाची एक शाखा सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरची. त्या शाखेने अनेक रत्ने महाराष्ट्राला दिली, त्यातील देशविदेशात गाजले गोविंद पुरुषोत्तम देशपांडे. महाराष्ट्रात त्यांचा उल्लेख ‘गोपु’ असा होतो, तर महाराष्ट्राबाहेर ‘जीपीडी’ असा.
गोपुंचे आजोबा टिळकपंथाचे. वडील-आई स्वातंत्र्य आंदोलनातले. विचाराने घर लोकशाही समाजवादी. घरात साने गुरुजी ते यशवंतराव चव्हाण- त्यात एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे होतेच- यांचा अधूनमधून वावर. त्यामुळे राजकारण व त्यातल्या वैचारिक भूमिका लहानपणापासून कानावर पडत. शिक्षण दहावी, तत्कालीन मॅट्रिकपर्यंत रहिमतपूर येथे. पुढे बी.ए.पर्यंत बडोदा (वडोदरा) व एम.ए. पुणे विद्यापीठ. विषय प्राचीन भारताचा इतिहास. वाचनाची आवड लहानपणापासून, अर्थात रहिमतपूरसारख्या लहान गावात हाती लागले ते! त्या काळी कीर्तन-प्रवचन हा लोकजीवनाचा भाग होता. त्यामुळे पंतकवी व संतकवी यांची रचना आपोआप कानी पडे, जोडीला संस्कृतमध्ये विशेष गोडी निर्माण झाली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपण बहुश्रुत झालो, असे गोपु मिश्किलपणे म्हणतात. त्यांच्या स्वभावशैलीतला तो अंगभूत मिश्किलपणा क्षणभर नजरेआड केला, तर त्यांच्या पुढच्या प्रवासाला हा बहुश्रुतपणा खूपच उपयोगी ठरला, असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
प्राचीन भारताचा इतिहास हा विषय गोपुंनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘निवडला’, तो त्यांचे काका भारतीय पुरातत्त्वाशी निगडित होते म्हणून. एम.ए. झाल्यावर तत्कालीन मध्यमवर्गीय रचनेनुसार नोकरी शोधणे भाग होते. विषयावर उत्तम पकड होती, पण तत्कालीन वाडिया कॉलेजातल्या ‘हाय-ब्रो’ विद्यार्थीजगताच्या वर्गात या ‘रहिमतपुरी’ उच्चारांच्या तरुणाचा निभाव बहुधा लागणार नाही, असे ठरल्याने दुसरा प्रयत्न नागपूरला. तिथे मुलाखत घ्यायला होते प्रकांडपंडित महामहोपाध्याय वा.वि. मिराशी. सर्व प्रश्नांची उत्तरे ज्ञात असूनही बोबडी वळली; नव्हे, तर तोंडातून शब्दच फुटेना.
यानंतर मात्र अचानक संधी आली ती विद्यापीठीय, पण निराळ्याच क्षेत्रात. भारताच्या राजधानीत ‘School of International Studies’ ही संस्था कार्यरत होती. यात अभ्यासक घेत. त्यांची निवड राज्यवार ‘कोटा’ ठरवून होई. त्यात निवड झाली व लक्षात आले की, या क्षेत्रात आपल्याला रुची आहे. प्राचीन भारतीय इतिहास हे आपले क्षेत्र नव्हे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रांचे आपापसातले संबंध, त्यातील हितसंबंध-तणाव याचा अभ्यास करणारी ही संस्था पुढे चालून (१९६८) दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा भाग झाली. रहिमतपूरकर देशपांडे दिल्लीकर झाले, ते थेट २००३ साली निवृत्त होईपर्यंत. आंतरराष्ट्रीय राजकारण हा अफाट विस्तार असलेला विषय. त्यामुळे विशाल पटाचे भान ठेवत एकेका भागावर खास ‘नजर’ ठेवणारे अभ्यासक, ही गरज असते. गोपुंचा तज्ज्ञतेचा भाग ‘चीन’. हे सर्व १९६२चे भारत-चीन सीमा युद्धानंतर घडले, हे लक्षात घेता भारत सरकारला चीनविषयक अनेक गोष्टींवर गोपुंचा सल्ला, त्यांच्याशी विचारविनिमय यांचे अगत्य का वाटे, हे सहज ध्यानी येते. या अभ्यासात त्यांची चीनवारी किती वेळा झाली, हे त्यांना तरी आठवते का, कुणास ठाऊक!
संस्कृतमध्ये गोडी होती, पण तज्ज्ञता नव्हे. जर्मन व संस्कृत या भाषांमध्ये काही बाबतीत साम्य आहे. तेव्हा जर्मन भाषेसोबत नातेसंबंध हवा, म्हणून गोपु चार महिन्यांच्या शिष्यवृत्तीवर जर्मनीला गेले. या मुक्कामात बऱ्यापैकी जर्मन अवगत झाले. ‘हेगेल’ संपूर्ण नव्हे, पण महत्त्वाचे भाग मूळ जर्मन भाषेत वाचता-समजता येऊ लागले. १९३० ते १९४५ हा हिटलर-नाझी पक्ष यांच्या उदयास्ताचा काळ सोडला तर जर्मनी हे युरोपीय संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान, शास्त्रविचार, तत्त्वज्ञान यांचे एक भव्य कारंजे म्हणून ख्यातकीर्त आहे. गोपुंच्या मांडणीत, लिखाणात, अगदी खाजगी गप्पा-चर्चांमध्येसुद्धा फ्रेंच, जर्मन संदर्भ संस्कृत, पंत-संत कवी यांच्यासोबत ज्या सहजतेने येतात, त्याचे मूळ तिथे आहे. लहानपणी मनावर ठसा श्रीधर-महिपती-नरेंद्र या पंतकवींचा होता; पण एकदा ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथ, तुकाराम या चतुष्ट्याची ओळख पटल्यावर पंतकाव्य मागे पडणे सहजपणे झाले. आजही त्यांच्या दिनचर्येत या संतरचनांना एक राखीव स्थान आहे.
गोपुंची वैचारिक पठडी कार्ल-मार्क्स-लेनिन यांना वाट पुसत चालणारी. रहिमतपूरचे घर लोकशाही समाजवादी म्हणजे डाव्या विचारांचे होतेच. मात्र भारतीय पटावरील समाजवादी व मार्क्सवादी यांचे ‘मैत्र’ लक्षात घेतले, तर हा सांधेबदल कसा व का झाला याचे कुतूहल वाटत राहते. याबद्दल त्यांची मते स्पष्ट आहेत. भारतीय समाजवादी मंडळींमध्ये वैचारिक काटेकोरपणाचा अभाव दिसतो. आचार्य शंकरराव जावडेकर, आचार्य भागवत व आचार्य नरेंद्र देव असे तुरळक पण महत्त्वाचे अपवाद वगळता ‘अॅकॅडेमिक’ शिस्त आढळत नाही. युरोपीय तत्त्वज्ञान-तत्त्वचर्चा परंपरा व्यक्तिपूजक नाही.
एखादा विचारवंत लेनिन वा मार्क्स यांचे अमूक विधान, निष्कर्ष पटत नाही, असे कारणे देत नोंदवतो. त्याने नोंदवलेल्या मुद्द्यावर चर्चा होते, पण स्वत: तोही मार्क्स वा लेनिन यांना मोडीत काढत नाही. हा वैचारिक काटेकोरपणा, शिस्त दैवतीकरणाची कास धरणाऱ्या प्रवाहांमध्ये कुठून आढळणार? या अॅकॅडेमिक रेखीवपणाचे आकर्षण असलेली, डाव्या विचाराच्या परिघात वाढलेली व जागतिक पटाचे भान असलेली व्यक्ती ‘शास्त्रीय’ समाजवादाकडे आकर्षित होणे; पण सोबत पक्षीय बंधनात स्वत:ला अडकवून न घेणे, हे साहजिकपणे घडणारच.
बाळपणापासून असलेले वाचनवेड आजतागायत टिकून आहे. दिल्लीला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ इतर अनेक गोष्टींसोबत अत्यंत समृद्ध ग्रंथालयासाठी प्रसिद्ध आहे. विद्यापीठ आवारात असलेले प्रशस्त घर, आवड यामुळे खूप मोठा ग्रंथसंग्रह गोपुंनी केला. दिल्ली सोडताना बरेचसे ग्रंथ आपल्या विद्यार्थ्यांना ‘ठेव’ म्हणून दिले. मराठी खजिना रहिमतपूरच्या वाचनालयाकडे सुपूर्द झाला. पुण्याचा ‘फ्लॅट’ तुलनेने लहान; पण तिथेही ग्रंथघरासाठी जागा आहेच.
गोपुंच्या लिखाणात भारतीय परंपरेतल्या अनेकानेक घटकांचा उल्लेख सहजगत्या येतो. गेली कित्येक वर्षे वैचारिक प्रवाहावर चालू राजकारणाचा जो प्रभाव दिसतो, त्यात या परंपरेला हेटाळणी, तुच्छता, दुर्लक्ष इत्यादी मार्गांनी कचराकुंडीत फेकणे हा धागा खूप जोमदार आहे. तात्कालिक राजकारणाच्या गरजा, सवंगपणा हे त्यात आहेच. गोपुंचा यासंबंधी विचार पुन्हा त्यांच्या वैचारिक शिस्तीची ओळख देतो. कुठलीही परंपरा रुळली, वाढली व टिकली असेल, तर तिथे काही अंगभूत ताकद असली पाहिजे. याचा अर्थ ती मोडायचीच नाही असा नव्हे; मात्र मोडण्यासाठीसुद्धा, ती ताकद कुठे व कशी आहे, हे ओळखणे, आकलन होणे आवश्यक आहे. असे आकलन न करता पुकारलेले युद्ध म्हणजे डॉन क्विक्झोटच्या पवनचक्क्यांवर तलवार घेऊन तुटून पडण्यासारखे, अतएव अयशस्वी.
अध्ययन, अध्यापन हा प्रवास लिखाणाकडे वळला नसता तरच नवल वर्तले असते. हा लिखाणप्रवास मार्क्सच्या विलेषणपद्धतीवर आधारून होणार, हे तर उघडच होते. गंभीरपणे अभ्यास करणाऱ्या क्षेत्रात ‘Economic and Political Weekly’ (EPW) या नियतकालिकाला एक महत्त्वाचे स्थान आहे. फापटपसारा नव्हे, पण विचार सांगोपांग मांडण्यासाठी इथे ‘शब्दमर्यादा’ या घटकाला गौण स्थान आहे. अनेक वर्षे या प्रतिष्ठेच्या साप्ताहिकात गोपुचा स्तंभ (कॉलम) हा एक अविभाज्य भाग होता.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘कविता’ हा गोपुच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग. मात्र या प्रकाराकडे ते विपुलपणे वळले नाहीत. ‘इत्यादी इत्यादी’ हा एकच काव्यसंग्रह त्यांच्या प्रकाशित ग्रंथमालेत आहे. गोपु हे नाव मराठी साहित्यविश्वाला जाणवले, आदराने घेतले जाऊ लागले ते अर्थातच नाटककार म्हणून. एकूण नऊ नाटके त्यांनी लिहिली. ती अशी... ‘उदध्वस्त धर्मशाळा’, ‘चाणक्य विष्णुगुप्त’, ‘एक वाजून गेला आहे’, ‘अंधारयात्रा’, ‘अस्सा नवरा सुरेख बाई’, ‘अखेरचा रस्ता’, ‘शेवटचा दिस’...
सर्व साहित्यप्रकार आपापल्या जागी महत्त्वाचे, हा वादविषय नाही. मात्र ‘नाटक’ हा अवघड विषय. हा साहित्यप्रकार हाताळणे भल्याभल्यांना का जमले नाही, प्रकार पेच असलेला का, याची चर्चा इथे प्रस्तुत नाही. प्रश्न असा, की गोपु कथा-कादंबरी टाळून (यशस्वीपणे म्हणावे का?) नाटकाकडेच का वळले?
पन्नाशीच्या दशकात (दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच) विजयी राष्ट्रांत अमेरिका आपला कम्युनिझम विरोध तीव्रतेने समोर ठेवत आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्ता म्हणून वावरू लागली. आंतरराष्ट्रीय अवकाशात जॉन फॉस्टर डलास, तर राष्ट्रांतर्गत सिनेटर मॅकार्थी ही नावे या प्रवाहाचे प्रतिनिधी म्हणून सहज आठवावीत. नाझी जर्मनीत ‘ज्यू’ म्हटल्यावर जे पिशाच्च थैमान घालत असे, त्याच चालीवर (धर्तीवर नव्हे) मॅकार्थीझमने सीआयए व एफबीआयच्या ताकदीच्या आधारे ‘कम्युनिस्ट’ शोधण्यासाठी निर्दय मोहीम उघडली. या कालखंडात काय काय प्रकार झाले, त्याची गुप्त कागदपत्रे पुढे उघड झाली. ती वाचनात आल्यावर गोपुंच्या संवेदनशील, विचारी मनाला कादंबरी लिखाणाची स्फूर्ती झाली, पण सुरुवातीचे लिखाण स्वत:च पुन्हा वाचल्यावर हा साहित्य ‘फॉर्म’ आपला नव्हे, हे जाणवले. परिणामत: ‘उदध्वस्त धर्मशाळा’ हे मराठी विश्वात खळबळ उडवणारे नाटक!
तसे नाटक लिहिण्याआधी सई जोगळेकराच्या हिंदी नाटकात (उत्तर भारतात ऐंशीवर प्रयोग) विनोदी बाण्याची भूमिका गोपुंनी केली होती. मराठी नाट्यसृष्टीने नीटपणे लक्ष न दिल्याने पुन्हा तसे आमंत्रण आले नाही व महाराष्ट्र एका विख्यात विनोदी नटाला मुकला, ही गोपुंची मिश्किली आहे खरी; पण सोबतच आपण ‘नाटककार’ झालो, याचे निविर्वाद श्रेय ते विख्यात दिग्दर्शक सत्यदेव दुबे व ‘नटसम्राट’ डॉ.श्रीराम लागू यांना देतात.
गोपुंचे नाटविश्व ‘चर्चानाटक’ या स्वरूपातले. त्यामुळे सवंग नाट्य, मेलोड्रामा वगैरेंपासून ते लांब राहणे स्वाभाविक होय. मात्र जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या नाट्यसंहितांप्रमाणे गोपुंच्या नाट्यसंहितांसोबत विस्तृत प्रस्तावना घेऊन येतात. ही गरज त्यांना ‘धर्मशाळा’पासूनच जाणवली. त्या ‘मॅकार्थी’ प्रकरणातला गाभा त्यांनी महाराष्ट्रातल्या परिघात शोधला. नाटक बसवणाऱ्या दिग्दर्शकाला सर्व पार्श्वभूमी, राजकीय प्रवाह, त्यामागील तत्त्वज्ञानातील खाचाखोचा यांची ओळख, जाण असेल वा नसेल. त्यामुळे प्रस्तावना त्यांना आवश्यक वाटल्या. नाटक हे ‘प्रयोगक्षम’ असले पाहिजे, ही पूर्वअट मान्यच आहे, पण प्रत्यक्ष प्रयोग न पाहताही नाटकाची संहिता एक साहित्यप्रकार म्हणून एकीकडे, तर दुसरीकडे राजकीय विधान म्हणूनही पहावी लागते. त्यामुळे प्रस्तावना लिहून गोपुंनी वाचक-प्रेक्षकांनाही ती कलाकृती आकलन होण्यासाठीचा मार्ग सुकर केला, हे जाणवते.
एक कवितासंग्रह व नऊ नाटके यांखेरीज खास गोपु शैली विचारांतून आलेले लिखाण म्हणजे दोनखंडी निबंधसंग्रह. ‘निबंध’ हा महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे, अलीकडे तो तुलनेने दुर्लक्षित आहे. मात्र या प्रकारावर गोपुंचे मनापासून प्रेम आहे. नाटकाच्या प्रस्तावना, EPWमधील लिखाण, हे तसे निबंधलेखनच आहे. विष्णुशास्त्री चिपळोणकर ऊर्फ धाकटे शास्त्रीबुवा यांनी मराठीत ‘निबंधमाला’ हा शब्द रूळवला. गोपुंची नाळ आजही त्याच्या मूळ गावाशी जुळलेली असल्याने एका वैचारिक सूत्रात बांधलेल्या या दोन खंडी मंथनाला ‘रहिमतपूरकरांची निबंधमाला’ हे नाव येणे स्वाभाविक वाटते; तसेच ते आपल्या विचारशक्तीवरच्या आत्मभानाचे प्रतीकही आहे.
गोपुंच्या विचारविश्वाची चिकित्सा करण्याचे हे स्थळ नाही. मात्र हा सर्व प्रवास कालिंदी वहिनींच्या साथीशिवाय होणे कसे शक्य होते? ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक समर्थ स्त्री उभी असते’ हे ‘घिसेपिटे’ वाक्य इथे अभिप्रेत नाही. मूळत्या सातारा जिल्ह्यातील वाईच्या कालिंदीवहिनी ‘जनवादी महिला संघटने’च्या अखिल भारतीय नेतृत्वाच्या पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्या. या संघटनेचा परिघ खूप मोठा व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून चळवळीचा. गोविंद व कालिंदी (म्हणजे यमुना) हे नाते जसे भारतीय परंपरेत अविभाज्य आहे, तसेच गोपुंच्या आयुष्यप्रवासात कालिंदीवहिनींचे स्थान आज त्या आपल्यात नसल्या, तरी अविभाज्यच आहे. मुलगा सुधन्वा हा आज दिल्लीस्थित ‘Leftword’ ही प्रकाशनसंस्था चालवतो. संस्थेच्या नावातच दिशा स्पष्ट आहे. कन्या अश्विनी अध्यापनक्षेत्रात आहे. गोपुंचा गोतावळा, स्नेही, ओळखीचे हा व्याप मोठा, देशविदेशांत पसरलेला. मात्र ‘जिवाचा मैतर’ म्हणजे प्रा.राम बापट.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञान, विचारपरंपरेची पुरेशी ओळख असलेला, मार्क्सच्या विलेषणपद्धतीवर डोळस पकड असलेला, जागतिक प्रवाहाचे पुरेसे अभ्यासपूर्ण भान असलेला, ‘चर्चानाट्य’ हा नाटकप्रकार ताकदीने मराठीत आणणारा, विचाराने ‘शास्त्रीय’ असल्याने परंपरांची ताकद एका टप्प्यावर उपयोगी असल्यानेच परंपरा टिकल्या, हे भान असलेला हा ज्ञानभोगी मित्र या प्रवासात ‘कूढ तबियतका’ झाला नाही. सुभाषिणी अलींबद्दल लिहिलेले असे मार्मिक वाक्य वाचल्याचे स्मरते, की ‘She is equally at home at a Kanpur factory gate demonstration as also a cocktail party at a Dehli five star hotel.’
गोपु कारखान्यासमोरच्या गेट मिटिंगमध्ये दिसणार नाहीत; पण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरत्या दिग्गजांमध्ये व आमच्यासारख्या मित्रांमध्ये त्याच सहजतेने वावरतात; आपल्या मिश्कील टिपण्यांमधून सायंकाळच्या ‘मैफिली’ही रंगवतात. ही जीवनमैफल अशीच दीर्घकाळ वाहती राहो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment