भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा सातवा लेख...
..................................................................................................................................................................
२०१२चा डिसेंबर महिना. बेंगळूरूला आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा ज्युरी म्हणून निमंत्रण होते. हॉटेलमध्ये पोहचलो तेव्हा लॉबीमधील एका कोपऱ्यात सोफ्यावर एक किरकोळ देहयष्टीचा गृहस्थ बसला होता. आयोजकाने माझी त्याच्याशी ओळख करून दिली- डॉ. बिजू दामोदरन. त्या वर्षीच्या महोत्सवात त्यांची ‘आकाशथिन्ते निरम’ (कलर ऑफ स्काय) ही फिल्म स्पर्धा विभागात होती. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटी दुनियेत वावर असूनही डॉ. बिजू यांचं साध सरळ वागणं, बोलणं मनाला भावून गेलं. महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांवर तसचं ‘समकालीन मराठी चित्रपटसृष्टी’ या विषयावर वैयक्तिक चर्चा झाल्या. त्यानंतर त्यांचे सिनेमे पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणाचा आणि सच्चेपणाचा अनुभव वारंवार येत राहिला.
२००५ सालापासून सातत्याने चित्रपट निर्मिती करणारे आणि आपलं काम सर्वदूर पोहचावं यासाठी आग्रहाने पुढाकार घेणारे, मुंबईतील ‘चित्रभारती’ महोत्सवासाठी स्वखर्चाने आपल्या फिल्मची प्रिंट पाठवून देणारे डॉ. बिजू हे व्यवसायाने होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. पण आता त्यांचा बराचसा वेळ आता चित्रपट निर्मितीमध्ये जातो. सध्या प्रादेशिक चित्रपटामध्ये मल्याळम चित्रपटाचा बोलबाला आहे. तिथले तरुण दिग्दर्शक व्यावसायिक चौकटीत राहून प्रयोगशील चित्रपट निर्मिती करत आहेत. मात्र डॉ. बिजू यांचा सिनेमा या चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. पृथ्वीराज, इंद्रजीत, रीमा काल्लीन्गल यासारखे स्टार कलावंत असूनही त्यांचा सिनेमा व्यावसायिक आराखड्यापासून हटके आहे. त्यात मनोरंजनापेक्षा प्रेक्षकांना समाजातील उपेक्षितांच्या जगण्याचं दर्शन घडवण्याची आच आहे. माणसाने पर्यावरणाचा जो ऱ्हास केला आहे, त्याचे दुष्परिणाम ठळकपणे दाखवून देण्याची क्षमता आहे. वैश्विक पातळीवर चाललेल्या कुटील राजकारणामुळे ससेहोलपट झालेल्या सामान्य माणसाची वेदना पोहचवण्याचं सामर्थ्य देखील या चित्रपटांमध्ये आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
डॉ. बिजू वेगवेगळे सामाजिक विषय अथकपणे आपल्या सिनेमातून मांडत आहेत. त्याची बीजं त्यांच्या बालपणात सापडतात. केरळमधील ग्रामीण भागात बालपण घालवलेल्या डॉ. बिजूंना ‘गांधी’ सिनेमा पाहिल्याचं आठवतय तेही पडद्यासमोर जमिनीवर बसून! त्या चित्रपटगृहात फक्त उच्चभ्रूंना खुर्चीवर बसून सिनेमा पाहण्याची मुभा होती. तत्कालीन गल्लाभरू मल्याळम सिनेमापेक्षा ‘गांधी’ चित्रपटाने डॉ. बिजूना प्रभावित केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेईपर्यंत सिनेमा पाहण्यापेक्षा त्यांचा जास्त भर वाचन करण्यावर होता. त्रिवेंद्रमला उच्चशिक्षणासाठी आल्यावर त्यांना फिल्म फेस्टिवलमध्ये जागतिक सिनेमा पाहायला मिळाला. इराणियन नववास्तववादी सिनेमाने ते भारावून गेले. सामाजिक वास्तव सिनेमातून इतक्या प्रभावीपणे मांडता येतं, याची जाणीव त्यांना माजीद माजिदीच्या चित्रपटांनी करून दिली. पोटापाण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नोकरी पुरेसी होती. डॉ. बिजूंनी आपली सामाजिक जाणीव तीव्र करण्यासाठी सिनेमा माध्यमाचा उपयोग करण्याचं ठरवलं. माहितीपटापासून सुरुवात करत त्यांनी आपला मोर्चा कथात्म चित्रपटाकडे वळवला.
२००५ साली ‘सायरा’ हा चित्रपट अत्यंत तुटपुंज्या बजेटमध्ये तयार केला आणि त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘सायरा’ला कान महोत्सवात मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांचा सिनेमा क्षेत्रात येण्याचा मार्ग सुकर झाला. या प्रवासात त्यांनी उपेक्षितांचे अंतरंग धुंडाळण्याचा प्रयत्न केला, जो आजही सुरू आहे.
सायरा ही एका गझल गायकाची मुलगी. पत्रकारितेमध्ये करिअर करताना तिला एका अतिरेक्याची मुलाखत घेण्याची संधी मिळते. दुर्दैवाने तिचं अपहरण करण्यात येतं आणि ती परतून आल्यानंतर तिच्यावर मुस्लीम अतिरेक्यांची साथीदार असल्याचा आरोप ठेवण्यात येतो आणि तिचं सगळं आयुष्याच ढवळून निघतं. केवळ मुस्लीम धर्मीय असल्यामुळे दहशतवादी असल्याचा आरोप लागणाऱ्या अनेक मुस्लीम बांधवांच प्रतिनिधित्व सायरा करते. एखाद्या निष्पाप माणसाच्या आयुष्याची यामुळे होणारी धूळधाण सायाराच्या रूपाने पहायला मिळते.
जगभरात चालेल्या अतिरेकी कारवाया, अमेरिकेने अफगाणिस्तान, इराक या देशांमध्ये सुरक्षेच्या नावाखाली तैनात केलेले सैन्य आणि या सैन्याच्या टाचेखाली आलेला सामान्य माणूस हा डॉ. बिजूच्या पुढच्या दोन चित्रपटांच्या केंद्रस्थानी आला. ‘सायरा’नंतर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रामन’ आणि ‘वित्तीलेक्कुल्ला वाझ्ही’ (द वे होम) या दहशतवादावरील त्यांच्या चित्रत्रयीमधील दोन चित्रपटात दहशतवादी कारवायांशी अनभिज्ञ असलेल्या, पण त्यामुळे वेठीस धरल्या गेलेल्या व्यक्तिरेखा आपल्याला पहायला मिळतात.
इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तिथे कामानिमित्त गेलेल्या केरळमधील मजुरांच्या कुटुंबियांना भोगावा लागणारा त्रास, त्यांची भुकेकंगाल अवस्था आणि एका पत्रकार बाईने या परिस्थितीचा मागोवा घेण्यासाठी माहितीपट निर्माण करण्याचा घेतलेला ध्यास ‘रामन’मध्ये पाहायला मिळतो. ‘वित्तीलेक्कुल्ला वाझ्ही’मध्ये दिल्लीमधील बॉम्बस्फोटात बायको, मुलगा गमावलेल्या डॉक्टरला (पृथ्वीराज) एका अतिरेकाच्या मुलाला त्याच्यापर्यंत पोहचवण्याची अवघड जबाबदारी पार पाडावी लागते. अतिरेक्यांबद्दल मनात असलेला तीव्र संताप आणि त्या निरागस मुलाबद्दल निर्माण झालेलं प्रेम या द्वंद्वात डॉक्टर सापडतो.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
डॉ. बिजू आपल्या या सगळ्या व्यक्तिरेखा अत्यंत संवेदनशीलपणे हाताळतात. त्यांच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात अनुकंपा निर्माण होईल असे प्रसंग रचतात. या व्यक्तिरेखांना भोगाव्या लागणाऱ्या पीडेची आच प्रेक्षकांपर्यंत पोहचते.
दहशतवादी चित्रत्रयी नंतर आलेल्या ‘आकाशथिन्ते निरम’ (कलर ऑफ स्काय)मध्ये डॉ. बिजूंनी एका चोराचे सद्वर्तनी माणसात होणारे परिवर्तन हा काहींसा परिचित विषय मांडला, परंतु या चित्रपटाची त्यांनी केलेली हाताळणी, प्रमुख कलावंतांचा अभिनय आणि प्रकाशचित्रणकार एम. जे. राधाकृष्णन यांनी केलेलं अंदमान बेटावरील नयनरम्य प्रकाशचित्रण यामुळे हा चित्रपट वेधक झाला.
बंदरावर नेहमी खरेदीला येणाऱ्या एका म्हाताऱ्याचे (नेदूमुडी वेणू) पाकीट एक भुरटा चोर (इंद्रजीत) मारतो. हा इरसाल म्हातारा त्या चोराला आपल्या बोटीतून बेटावर आणतो. बोट चालवू न शकणारा हा चोर मग त्या बेटावर म्हाताऱ्याच्या घरात अडकतो. म्हाताऱ्याची मुकबधीर नात (अमला), नातू (गोवर्धन) आणि नोकर (अनुप चंद्रन) याच्या कचाट्यात अडकलेल्या त्या चोराला हळूहळू या घराबद्दल कळू लागते. त्यांनी सुरू केलेल्या आजारी वृद्धांच्या केंद्राबद्दल त्याला कळते. तिथे नियमितपणे येणाऱ्या डॉक्टरबरोबर (पृथ्वीराज)कडून त्याला या आजारी माणसाबद्दल समजते आणि आयुष्य म्हणजे नेमका अर्थ काय याची जाणीव होते.
आकाशाचे वेगवेगळे रंग असतात. तुम्ही डोळे बंद करून जो रंग भराल तो आकाशाचा रंग, एकदा का मनातील रंग फिके पडले, तर आयुष्य देखील बेरंगी होऊन जाते, आयुष्य रंगीत करायचं असेल तर मनात रंग ठाशीव असले पाहिजेत, ‘आकाशथिन्ते निरम’ (कलर ऑफ स्काय) असा अर्थपूर्ण संदेश देऊन संपतो, पण आपल्या मनात रेंगाळत राहतो.
डॉ. बिजूंचे बहुतांशी चित्रपट माहितीपटाच्या वळणाने जातात. ‘आकाशथिन्ते निरम’ (कलर ऑफ स्काय) हा एक अपवाद. परंतु या चित्रपटात इंद्रजीत, पृथ्वीराज, अमला असे लोकप्रिय कलावंत असूनही डॉ. बिजू गाणी, रोमान्स, मेलोड्रामा असे परिचित घटक घालण्याचा मोह टाळतात. एक सुंदर कथा निसर्गरम्य स्थळाच्या पार्श्वभूमीवर चित्रित करतात. या चित्रपटातून मिळणारी सुखद जाणीव त्यांच्या नंतरच्या चित्रपटात मात्र कमी होत गेलेली दिसते.
समाजातील उपेक्षितांच जगणं तितक्याच भेदकपणे मांडणं हेच त्यांच्या पुढील सगळ्या चित्रपटांचे प्रमुख सूत्र बनलेलं दिसतं. त्यांच्या मध्यवर्ती पात्रांना नावं नसतात. तळागाळातील या माणसांच्या वेदनाच पृष्ठस्थळी येतात. ‘आकाशथिन्ते निरम’ (कलर ऑफ स्काय) नंतरच्या त्यांच्या चित्रपटाचं शीर्षकच आहे- ‘पेरीयाथवर’ (Names unknown). या चित्रपटाचा नायक (सुरज वेंजरमुडू) सफाई कामगार आहे. आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असणारा हा विधुर आपल्या मुलाच संगोपन करतो. त्याच्या रोजच्या आयुष्यात येणारे प्रसंग पाहताना आपण एका अपरिचित जगात जाऊन पोहचतो. दिवसभर आपण केलेला कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या या माणसांना स्वतःच हक्काचं घरसुद्धा मिळत नाही. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो.
डॉ. बिजूंच्या २०१९ला आलेल्या ‘वेयीलमरंगल’ (ट्री अंडर द सन)मध्येसुद्धा हेच सूत्र आहे. त्यातील दलित नायकाला (इन्द्रांस) कामाच्या शोधात केरळ सोडून कुटुंबासहित हिमाचल प्रदेशात जावं लागतं, पण तिथंही त्याच्या मागची संकट संपत नाहीत, तरीही त्याची जगण्याची आशा टिकून राहते. या चित्रपटात एक प्रसंग आहे. बसमधून प्रवास करताना एक सहप्रवासी त्याच्यावर पाकीट चोरीचा आळ घेऊन पोलीस चौकीत नेतो. पोलीस त्याला रात्रभर कोठडीत बंद करून ठेवतात. दुसऱ्या दिवशी त्याला निरपराध म्हणून सोडून देण्यात येतं, मात्र अशा पद्धतीनं अपमानित झालेला तो शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतो. हा प्रसंग पाहताना आपण किती सुरक्षित जीवन जगतो, याची जाणीव होऊन लाज वाटू लागते.
‘पेरीयाथवर’ (Names unknown)ला दोन राष्ट्रीय पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलं. सुरज या अभिनेत्याची ओळख विनोदी भूमिकांसाठी, मात्र त्याला या चित्रपटातील सफाई कामगाराच्या संवेदनशील भूमिकेसाठी अभिनयाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. आणि चित्रपटाला पर्यावरणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं. हाच पुरस्कार पुन्हा एकदा डॉ. बिजूच्या ‘वलिया चीरकाल्ल पक्षीकाल’ (बर्ड्स विथ लार्ज विंग्स) या चित्रपटालासुद्धा मिळाला.
काजूच्या लागवडीवर फवारणी केलेल्या इंडोसल्फोन या कीटकनाशकाच्या वापरामुळे १९७६ पासून २००० सालापर्यंत केरळमधील सुमारे ५००० खेड्यातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. कित्येक लोक मृत्युमुखी पडले, कित्येक लहान मुलांना व्यंगं निर्माण झाली. मधुराज या छायाचित्रकारानं काढलेल्या छायाचित्रांतून या सगळ्या प्रकाराला वाचा फुटली. सरकारला कासरागोड क्षेत्रातील लोकांचं पुनर्वसन करणं भाग पडलं. या सत्यघटनेवर आधारित चित्रपट निर्माण करताना डॉ. बिजूना सरकारी यंत्रणेशी लढा द्यावा लागला. मात्र हा चित्रपट पाहून मानवी हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यानी जातीनं या प्रकरणात लक्ष घातलं. चित्रपटाच्या माध्यमातून एक दिग्दर्शक सामाजिक हक्कासाठी लढू शकतो, हे या चित्रपटानं सिद्ध केलं.
अनेकदा चित्रपटातून एखादी समस्या मांडण्यापुरतं त्या कलावंताचं काम मर्यादित राहतं. मात्र डॉ. बिजू याच्या एक पाऊल पुढे जातात. आपण पैसे कमावण्यासाठी चित्रपट करत नाही, ते मला माझ्या नोकरीतून मिळतातच असं ते सांगतात. वंचित, उपेक्षित घटकांची बाजू मांडण्यासाठी मी चित्रपट करतो, ही त्यांची भूमिका आहे. ‘काडू पोक्कुंना नेरम’ (व्हेन द वूड ब्लूम) या चित्रपटातून त्यांनी माओवाद्यांची बाजू दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सरकार आणि सामान्य माणसाला या लोकांची मानसिकता आणि त्यांची जीवनशैली याबद्दल काहीच माहिती नसते. अनेकदा आपण अज्ञानातून त्यांच्याविषयी मत बनवून घेतो. या दृष्टीकोनाला छेद देणारा हा चित्रपट आहे.
जंगलातील माओवाद्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक जंगल विभागात जातं. तिथल्या शाळेवर कब्जा करून पोलीस पथक तिथं राहू लागतात. त्यापैकी एक पोलीस (इंद्रजीत) एका माओवादी स्त्रीचा माग काढत जंगलात जातो आणि तिच्या जाळ्यात अडकतो. त्याला या निमित्तानं या लोकांचं जगणं कळतं आणि त्याच्या विचारपरिवर्तनाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. या पात्राप्रमाणेच डॉ. बिजूचे चित्रपट ज्या बिंदूवर संपतात, तिथून प्रेक्षकांच्या विचारचक्राला सुरुवात होते.
डॉ. बिजूंनी आपल्या चित्रपटामध्ये केरळच्या देवभूमी बरोबरच हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम या ठिकाणाचा यथायोग्य उपयोग करून घेतलाय. ही ठिकाणं केवळ चित्रचौकट सजवण्यासाठी मर्यादित न राहता कथानकाचा हिस्सा बनून आली. चित्रपटांची भाषासुद्धा मल्याळमपुरती मर्यादित राहिली नाही.
‘साउंड ऑफ सायलेन्स’ या पहाडी भाषेतील चित्रपटात एका मूकबधिर मुलाचा (मास्टर गोवर्धन) बौद्ध भिक्कू होण्यापर्यंतचा प्रवास लडाखच्या शांत गंभीर वातावरणात अधिक प्रभावीपणे समोर येतो. आईचं छत्र हरवलेला आणि दारुड्या बापाचा मार खाणारा हा मुलगा निसर्गाला आपला स्नेही मानतो आणि बुद्धाला शरण जातो. निसर्गातील झाडंझुडपं, पशुपक्षी यांच्या ध्वनीचा पार्श्वभागी केलेला वापर हे ‘साउंड ऑफ सायलेन्स’चं वैशिष्ट्य!
‘पेंटेड लाईफ’ या इंग्लिश चित्रपटात डॉ. बिजू सिक्कीमच्या वनराजीच्या पार्श्वभूमीवर एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलेल्या चमूच्या अडचणींची गोष्ट सांगताना श्रीमंत नवऱ्याच्या दबावाखाली घुसमटलेल्या स्त्रीची व्यथा समांतरपणे दाखवतात आणि त्याच बरोबरीनं सिक्कीममधील धरणाच्या उभारणीमुळे स्थानिक लोकांच्या जीवनमानावर आलेल्या अरिष्टाचीसुद्धा दाखल घेतात. सिनेमाच्या चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या लोकांना नैसर्गिक आपत्तीमुळे हॉटेलमध्ये अडकून पडावं लागतं आणि मग त्यांना डोंगराळ भागातील लोकांना रोजच्या जीवनात कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव होते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
डॉ. बिजूंच्या या चित्रपट प्रवासात त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून सोबतीस असलेल्या नेदुमुडी वेणू, प्रकाश बारे, इन्द्रान्स, अनुप चंद्रन या कलाकार मंडळींचा आणि प्रकाशचित्रणकार एम.जे. राधाकृष्णन यांचा मोठा वाटा आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात अधोरेखित करताना, पर्यावरणाचे प्रश्न मांडताना डॉ. बिजूंच्या चित्रपटामधील आशय जितका सखोल असतो, तितक्याच त्यांच्या दृश्यप्रतिमा देखण्या असतात. या वर्षी त्यांचे येऊ घातलेले ‘हाउस ऑफ ऑरेंज ट्री’ आणि ‘पोट्रेट्स’ हे दोन्ही चित्रपट त्यांची चित्रपटांच्या आशयाशी नाते सांगणारे आहेत.
परदेशातून आलेल्या नातवाला गुपचूप आपल्याबरोबर संत्रांच्या बागा दाखवण्यासाठी नेणारा इरसाल म्हातारा आपल्याला ‘हाउस ऑफ ऑरेंज ट्री’मध्ये भेटतो आणि परिसंस्थेच्या संरक्षणासाठी लढणारी माणस ‘पोट्रेट्स’मधील विविध कथांमध्ये आपल्याला दिसतात.
डॉ. बिजू याचं नातं अशा या मनस्वी व्यक्तिरेखाबरोबर जोडलं गेलं आहे. आपण प्रेक्षकसुद्धा त्यांच्या मानसिकतेशी आपली नाळ जोडू पाहतो, हे त्यांच्या चित्रपटांचं यश आहे.
..................................................................................................................................................................
या सदरातील आधीचे लेख
वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक
कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!
राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक
नाग अश्विन : कला आणि व्यवसाय यांचा तोल सांभाळणारा दिग्दर्शक
..................................................................................................................................................................
लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत.
santosh_pathare1@yahoo.co.in
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment