भाजपचं पडद्याआडचं ‘कर्नाटक कनेक्शन’
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • बी. एल. संतोष, बसवराज बोम्मई आणि बी. एस. येडीयुरप्पा
  • Sat , 31 July 2021
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भाजप BJP योगी आदित्यनाथ Yogi Adityanath बी. एल. संतोष BL Santhosh बसवराज बोम्मई Basavaraj Bommai बी. एस. येडीयुरप्पा B. S. Yediyurappa

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या विषय पत्रिकेवर ‘ऑपरेशन कर्नाटक’ आणि ‘ऑपरेशन उत्तर प्रदेश’ होते. भाजपमध्ये अलीकडे घडलेल्या सर्व प्रमुख घटनांशी ‘कर्नाटक कनेक्शन’ आहे ते कसं, या मजकुराच्या नंतरच्या भागात येणारच आहे.

ठरल्याप्रमाणे कर्नाटकमधलं ऑपरेशन पार पडलं असून त्यात बी. एस. येडीयुरप्पा यांनी बाजी मारली की, पक्षश्रेष्ठींनी (पक्षी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष नड्डा), अशी चर्चा आणखी काही दिवस होत राहील. या वेळी म्हणजे, चौथ्या वेळी मुख्यमंत्री झालेल्या येडीयुरप्पा यांचे दिवस तसे भरतच आलेले होते. येडीयुरप्पा यांनी २००८पासून कर्नाटकात ‘भाजप म्हणजे येडीयुरप्पा’ असं समीकरण निर्माण केलेलं होतं. एकदा पक्षातून बाहेर पडावं लागल्यावर त्यांनी सरकारही कोसळवून पक्षाला बॅकफूटवर ढकलवून दाखवत सत्तेपासून वंचित ठेवलं होतं. २०१८च्या विधानसभा निवडणुकीनंतर खरं तर राज्यात जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपेतर पक्षांचं सरकार सत्तारूढ झालेलं होतं, कारण भाजप सभागृहातला मोठा पक्ष असला तरी बहुमतापासून लांब होता. पण, जनता दलात फूट पाडून, कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन करून दाखवण्याची ‘किमया’ येडीयुरप्पा यांनी साधली होती.

अत्यंत वादग्रस्त, गैरव्यवहाराचे अनेक आरोप होऊनही त्याला दाद न देण्याचा कोडगेपणा अंगी मुरलेले बी. एस. येडीयुरप्पा कर्नाटकातले ‘निष्णात’ राजकारणी समजले जातात. बहुमत कसं मिळवावं आणि सरकार कसं पाडावं यात ते माहीर आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कर्नाटकातलं राजकारण लिंगायत समाज तसंच मद्य व खाण मालकांची लॉबी याभोवती फिरतं. लिंगायत समाज आणि मद्य व खाण दोन्ही लॉबींवर येडीयुरप्पा यांची चांगली पकड आहे. बंगलुरूचा एक पत्रकार मित्र एकदा म्हणाला, ‘तुमच्या शरद पवारांसारखे दहा शरद पवार म्हणजे एक येडीयुरप्पा आहेत’. यातच सारं काही आलं. वयाची ७५ वर्षे पूर्ण केली म्हणजे, अठ्ठ्याहत्तर वर्षं पूर्ण केली म्हणून येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगितलं, असं कारण जरी जाहीरपणे  सांगितलं जात असलं तरी त्यात काही तथ्य नाही. कारण २६ जुलै २०१९ला चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तेव्हाच येडीयुरप्पा यांनी वयाची पंचाहत्तरी पार केलेली होती, पण तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या अटीवरच जनता दलाचे आमदार फोडून सत्ता मिळवण्यात येडीयुरप्पा यशस्वी झाले होते. त्यामुळे भाजपचे नेते गप्प होते.

आताही येडीयुरप्पा पायउतार झाले ते त्यांचे द्वितीय पुत्र विजयेंद्र यांच्यामुळे. येडीयुरप्पा जरी मुख्यमंत्री होते, तरी सर्व सत्ता विजयेंद्रच्या हाती केंद्रीत होती. पडद्याआडचे मुख्यमंत्री विजयेंद्रच होते. मंत्र्यांच्या परस्पर अधिकाऱ्यांना बोलावून विजयेंद्र कारभार हाकत असल्याच्या तक्रारी होत्या. अलीकडच्या काळात तर दर आठ-दहा दिवसांतून एकदा विजयेंद्रच्या वाढतच चाललेल्या हस्तक्षेपाबद्दलच्या तक्रारी दिल्लीश्वरांच्या कानी घालण्यासाठी भाजप आमदार आणि नेत्यांची रीघ लागलेली होती.

थोडक्यात प्रकरण ‘नाकापेक्षा मोती जड’ झाल्यानं येडीयुरप्पा यांना हटवणं आवश्यक बनलेलं होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शोभा करंजलांदे यांची वर्णी लागली, तेव्हाच येडीयुरप्पा जाणार हे निश्चित झालेलं होतं. अर्थात कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे येडीयुरप्पा यांचेच समर्थक आहेत आणि कर्नाटकात ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या लिंगायत समाजाचे ते आहेत. त्यामुळे एकीकडे केंद्रीय नेतृत्वानं सत्तेचा तोल नीट सांभाळला आहे, तर दुसरीकडे आपला समर्थक मुख्यमंत्री झाला असं समाधान येडीयुरप्पा यांना नक्कीच मिळालेलं आहे. थोडक्यात पक्षश्रेष्ठी आणि येडीयुरप्पा दोघेही जिंकले आणि दोघेही हरले अशी एकंदरीत परिस्थिती आहे.

भाजप हा ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ आणि आपल्या देशातल्या राजकारणाला साधनसूचितेशी काहीही देणं-घेण कसं नाही याचं चपखल उदाहरण बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी झालेली निवड आहे. बसवराज बोम्मई हे मूळचे जनता दलाचे आहेत आणि विधानपरिषद सदस्यत्व मिळते म्हणून ते भाजपमध्ये आले. बसवराज बोम्मई यांचे वडील एस. आर. बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री (ऑगस्ट १९८८ ते एप्रिल १९८९) होते. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून मुख्यमंत्री होणारे पिता-पुत्र म्हणून त्यांची देशाच्या राजकीय इतिहासात नोंद होईलच!

उत्तर प्रदेशात पक्षश्रेष्ठी विरुद्ध मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील संघर्षाबद्दल तीन आठवड्यांपूर्वी लिहिलं होतं. या सुप्त संघर्षाचा निकाल काय लागतो, त्यावर पक्षाचं येत्या विधानसभा निवडणुकीतील यश अवलंबून असेल असं त्या लेखात म्हटलेलं होतं. हा सुप्त संघर्ष आता संपुष्टात आला असून, ‘ऑपरेशन उत्तर प्रदेश’ यशस्वी करून घेण्यात भाजपच्या श्रेष्ठींना तूर्तास तरी यश आलेलं आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यास योगी आदित्यनाथ राजी झाले आहेत, अर्थात त्यासाठी संघाला बरेच रक्त आटवावे लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेश सरकारच्या अशांतील जाहिरातीतून नरेंद्र मोदी गायब होते. अशात प्रकाशित झालेल्या उत्तर प्रदेश सरकारच्या सर्व जाहिरातीत योगींसोबत नरेंद्र मोदी यांचेही छायाचित्र झळकले आहे. यातून हे संकेत मिळतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

उत्तर प्रदेशबाबत एक बाब आवर्जून नमूद करायला हवी आणि ती म्हणजे, अलीकडच्या सुमारे सव्वादोन दशकात विधानसभा निवडणुकीत या राज्यात सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल प्राप्त होऊ शकलेला नाही. भाजप सलग दुसऱ्यांदा असा कौल मिळवणार का, ही म्हणूनच उत्सुकतेची बाब आहे.   

कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या दोन्ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडणाऱ्यात ‘बी.एल.’ या आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या बोम्माराबेट्टू लक्ष्मीजनार्दन संतोष यांची भूमिका कळीची ठरलेली आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री शहा आणि पक्षाध्यक्ष नड्डा असा सार्वत्रिक समज आहे. प्रत्यक्षात मात्र या यादीत बी.एल. संतोष यांचंही नाव आहे आणि ते कायम पडद्याआडच असतात. सरकार आणि पक्ष तसंच संघ आणि सरकार यांच्यात संवाद साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून कुणाला वगळायचं आणि कुणाला घ्यायचं या संदर्भात झालेल्या सल्ला-मसलतीतही ज्यांचा सहभाग होता, त्यात संतोष होते, इतकं त्यांचं स्थान निर्णय प्रक्रियेत कळीचं आहे. मंत्रिमंडळातून वगळल्याचा निरोप संतोष यांनीच सर्वांना दिला, असं वगळलेल्या एका मंत्र्यानं सांगितलं. इतकं महत्त्व आहे म्हणूनच कर्नाटकात येडीयुरप्पा यांच्या जागी संतोष मुख्यमंत्री होण्याची शक्यता दिल्लीच्या माध्यमांतून व्यक्त झाली होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

बी. एल. संतोष हे मूळचे कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातले. ते सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या गेल्या निवडणुकीत मोर्चेबांधणी करण्यात संतोषच होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर काही काळ नोकरी केलेले संतोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केडरमधले आहेत. संघाच्या केडरमधूनच ते भाजपमध्ये आले. ‘निवडणुकीचे रणनीतीकार’ अशी त्यांची पक्षातली ओळख आहे. प्रत्येक बाबीचा शांतपणे आणि सूक्ष्मात जाऊन अभ्यास करून कोणताही गाजावाजा न करता काम करण्याची  त्यांची शैली आहे.

२००८च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपनं २२४ पैकी ११० जागा पटकावण्यामागे संतोष यांचीच रणनीती होती, असं सांगण्यात येतं. नव्या आणि जुन्यांचा समन्वय घडवून आणत पक्ष बळकट करण्यात त्यांचा हातखंडा आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचं आकस्मिक निधन झालं, तर त्या रिक्त झालेल्या जागेवर त्याच्या आप्ताला पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचा सर्वपक्षीय प्रघातच आता पडला आहे. मात्र भाजपचे एक नेते तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीऐवजी तेजस्वी सूर्या या तरुणाला निवडणुकीत उतरवण्याची खेळीही संतोष यांचीच होती आणि आता कर्नाटक तसंच उत्तर प्रदेशातील शस्त्रक्रिया कुशलपणे पार पाडण्यातही संतोष यांचाच हात आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या राजकीय मोहिमांचं पडद्याआडचं ‘कर्नाटक कनेक्शन’ हे असं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......