पादाला म्हणजेच अपानवायूला ‘श्रद्धा’ असा पर्यायी शब्द आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 30 July 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध पर्दन श्रद्धा पादणे fart पादभ्यासक fartologist पादकलाकार podicinist flatulist

शब्दांचे वेध : पुष्प बेचाळिसावे

आजचे शब्द : पादणे, पर्दन, श्रद्धा, fart, fartologist, podicinist, flatulist

‘पादानं वांगी जिंकणं’ हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला आहे का? आमच्या विदर्भात तिचा जास्त वापर होतो. तिचा अर्थ वायफळ बडबड करणं, विनाकारण वितंडवाद घालणं, लंब्याचौड्या बाता मारणं, बढाया, फुशारकी मारणं, असा होतो. ‘पादणं’ या क्रियेवरून मराठीत आणखीही काही म्हणी/वाक्प्रचार तयार झाले आहेत. उदाहरणार्थ, ‘गांड पादरी, मिश्या डिवऱ्या’ (म्हणजे, लांब, ठळक मिशा ठेवून आपण पहेलवान असल्याचा पोकळ आवेश आणणारा, बढाया मारणारा, पण आतून घाबरट असणारा माणूस), ‘पादऱ्याला पावट्याचं निमित्त’, इत्यादी. मोलस्वर्थनं पावट्याचं निमित्त याऐवजी ‘पादऱ्यास वालाचें मीस’ असं रूप दिलं आहे.

खुदरापादरा म्हणजे बदफैली; कामुक; बीभत्स; घाणेरडा; अभद्र; किंवा निंदक; अर्वाच्य; शिवराळ (भाषण किंवा बोलणारा).

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पादणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येकच व्यक्ती पादते. (ज्याला पादवायू सरत नाही, तो निरोगी नाही, असं वैद्यकीयशास्त्रात मानलं जातं.) पण तरीही ‘पादणं’ या शब्दाचा चारचौघांत उल्लेख करणं अथवा उघडपणे जोरानं पादणं, हे आपण आजही सभ्यपणाचं लक्षण मानत नाही. दुसरा कोणी चुकून अगर मुद्दाम जोरानं पादला तर बहुतेकांना हसू येतं. पण ते दाबण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. माझ्या भावाकडे बादल नावाचा एक लॅब्रॉडॉर कुत्रा होता. चांगला गलेलठ्ठ होता तो. तोही बेटा अनेकदा पादायचा. आणि आवाज आला की, कुठून आला हे शोधायला तो स्वतःभोवतीच गोल गोल चकरा मारायचा. गायीसुद्धा पादतात आणि त्यांच्या पादानं हवेत मिथेन वायूची मोठ्या प्रमाणात वाढ होते, असं ऐकिवात आहे.

थोडक्यात, काय की मनुष्यांपासून प्राण्यांपर्यंत सगळेच पादतात. कोणी शिंक दिली किंवा कोणाला खोकला आला तर आपण हसत नाही, पण कोणी जोरानं पादला तर आपल्याला का हसू फुटतं, हे एक रहस्यच आहे. काहींच्या पादांना घाणेरडा वास येतो, म्हणून बहुधा आपल्याला ही क्रिया नापसंत असावी.

पादण्यावर मराठी-इंग्रजीत असंख्य विनोद आहेत. या विनोदांना फक्त लहान मुलंच हसतात असं नाही, तर मोठेही हसतात. पण हे कबूल करायला अनेक लोक तयार नसतात. मी तर हसतो बुवा! ‘थ्री इडियट्स’ या हिंदी सिनेमात अमीर खाननंही पादण्यावर विनोद केला होता. पादण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांवरून मराठीतही ‘पादानाम फुसुकली राणी’ अशी एक वात्रटिका प्रसिद्ध आहे.

पादानं वांगी कशी जिंकतात हे मला माहीत नाही, पण पादण्याच्या स्पर्धा होतात आणि जो जास्त वेळ पादेल तो ही स्पर्धा जिंकतो, हे मला माहीत आहे. एका माणसानं तर अशाच एका ब्रिटिश कार्यक्रमात ‘लाँग लिव्ह द क्वीन’ हे गीत गायच्याऐवजी यशस्वीरीत्या ‘पादून’ वाजवलं होतं. त्या वेळी तो इतक्या चमत्कारिक शारिरीक हालचाली करत होता आणि चेहरा वेडावाकडा करत होता की, स्टेजवर काही ‘अपघात’ होण्याची जास्त शक्यता होती. (पण त्यानं ‘डायपर’ घातलं असावं.) यू-ट्यूबवर अशा पादवीरांचे बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत.

पाश्चात्य जगात प्रेक्षकांसमोर स्टेजवर पादणं ही एक कॉमेडी अ‌ॅक्ट मानली जाते. असे अनेक व्यावसायिक पादरे कलाकार तिथे आहेत. त्यांच्या कलेचं काय गुपित आहे, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पोटाच्या स्नायूंवर कमालीचं नियंत्रण असल्याशिवाय हे शक्य नाही. ही कला नावारूपाला आणली जोसेफ प्युझोल (Joseph Pujol, १८५७ - १९४५) या फ्रेंच माणसानं. तो ल पेतोमैन (Le Pétomane) या टोपणनावानं प्रसिद्ध होता. फ्रेंचमध्ये péter म्हणजे पादणं. Mane या उपपदाचा अर्थ मॅनिअ‌ॅक किंवा पिसाट असा होतो. थोडक्यात पेतोमैन म्हणजे पादपिसाट. तो स्वतःला ‘flatulist’ किंवा ‘farteur’ किंवा ‘fartiste’ असं म्हणवून घ्यायचा. फार्ट आर्टिस्ट. इंग्रजीत फार्ट (fart) म्हणजे पादवायू. To fart म्हणजे पादणं. डॉक्टर लोक याला ‘फ्लॅट्युलन्स’ (flatulence) म्हणतात, तर सभ्य भाषेत (to) break the wind  (वायू सरणं) असं म्हटलं जातं. ल पेतोमैनला त्याच्या कलेसाठी खूप प्रसिद्धी मिळाली.

अर्थात तो खरंच केव्हाही आणि इतका जास्त पादू शकत होता का, हा कळीचा मुद्दा आहे. तोंडानं हवा आत घेतात त्याचसारखं तो त्याच्या गुदद्वारातून बाहेरची हवा आत ओढत असे आणि मग ती पादण्याच्या आवाजात बाहेर सोडत असे, असाही एक तर्क आहे. ते काहीही असो, त्याला लोकमान्यता मिळाली होती, हे नक्की.

मेल ब्रुक्स या प्रसिद्ध सिनेमा निर्माता/दिग्दर्शकानं त्याच्या ‘Blazing Saddles’ या विनोदी चित्रपटात आपल्या एका पात्राचं (चकण्या डोळ्यांचा, कामुक प्रवृत्तीचा गव्हर्नर) नाव ल पेतोमैन असंच ठेवलं आहे. हा खऱ्या ल पेतोमैनला केलेला मुजराच म्हणायला पाहिजे. याच चित्रपटात चिल्लर भूमिका करणारे काऊबॉईजसुद्धा खूप पादतात आणि त्यासाठी ते पावटे खातात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

ल पेतोमैनसारखाच एक व्यावसायिक पादकलाकार सध्याच्या काळातही कार्यरत आहे. त्याचं खरं नाव आहे पॉल ओल्डफिल्ड (Paul Oldfield). पण तो Mr Methane (मिस्टर मिथेन) या नावानं प्रसिद्ध आहे. स्टेजवर पादून लोकांचं मनोरंजन करणारा आजच्या जगात मी एकमेव कॉमेडिअन आहे, असा या ब्रिटिश माणसाचा दावा आहे. योगासनं करता करता मला या कलेत प्राविण्य मिळालं, असं तो म्हणतो. बाराव्या शतकात इंग्लंडच्या दुसऱ्या हेन्री या राजाच्या दरबारात Roland the Farter या नावाचा विदूषक होता. तोही या पादकलेत माहीर होता.

ब्रिटनचे हल्लीचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लिहिलेल्या ‘Johnson's Life of London’ या पुस्तकात या पादकलाकारांना ‘podicinists’ असं म्हणतात, हा उल्लेख आहे. मात्र या पॉडिसिनिस्ट शब्दाची व्युत्पत्ती त्यांनी दिलेली नाही. ते म्हणतात- Money encouraged thieves, prostitution and strange entertainments, like the podicinists, the professional farters whose skill Chaucer found so amusing ... याचा अर्थ, आंग्ल कवी चॉसर (१३४० - १४००) यालाही या podicinist लोकांच्या कलेतून आनंद मिळत होता.

सोफी ब्रायंट यांच्या ‘Liberty, order [and] law under native Irish rule : a study in the book of the ancient laws of Ireland’ या १९२३ सालच्या ग्रंथातही या कलाकारांचा उल्लेख सापडतो- “Musicians and sportmakers in general, viz. equestrians and chariot-drivers, pilots and conjurers and companies and scarifiers and jugglers and buffoons and podicinists, and all mean arts in like manner : it is on account of the person with whom they are, it is out of him they are paid ; there is no nobility for them severally at all.”

ऑक्स्फर्ड इंग्रजी शब्दकोशातही podicinist हा शब्द सापडत नाही.

ल पेतोमैन हा व्यवसायासाठी पादणारा होता. गंमतीसाठी पादणारेही अनेक लोक जगात आहेत. काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर ‘फार्ट फार्म’ या नावाची एक वेबसाईट होती. तिच्यात पादण्याच्या आवाजाचे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकायला मिळायचे. कोणीही आपल्या पादण्याचं रेकॉर्डिंग करून तिथे पाठवू शकत असे. त्यासाठी एक डॉलर मोबदला दिला जायचा. सध्या ही साईट बंद झालेली दिसते.

मागे एकदा मी एका केरळी लेखकाचा लेख वाचला होता. पुरुषप्रधान संस्कृतीचं उदाहरण म्हणून त्यानं त्यात त्याच्या आजोबांचीच आठवण सांगितली होती. जुन्या काळातले ते खूप बडे जमीनदार होते. रोज ते आपल्या इस्टेटीचा फेरफटका मारायला जायचे. घरी परत आल्यावर ते दिवाणखान्यात आपल्या गादीवर

बसायचे आणि मग डावी मांडी वर करून खूप जोरात पादायचे. तो आवाज म्हणजे एक प्रकारचा सिग्नल होता. तो ऐकल्याबरोबर त्यांची बायको, नोकरचाकर चहा-पाणी घेऊन धावत धावत बाहेर यायचे. वर्षानुवर्षं ही प्रथा तिथे सुरू होती म्हणे. ‘मी हाक मारली की बाहेर या’, ‘माझ्या वहाणांचा आवाज ऐकला की बाहेर या’, असं ते आजोबा म्हणू शकले असते. पण ‘माझ्या पादण्याचा आवाज ऐकल्यावरच (तत्क्षणी) बाहेर या’, हा त्यांचा हुकूम म्हणजे पुरुषी अहंकाराचं द्योतक होतं, असं त्या लेखकाला सांगायचं होतं.

आपल्या पोटात तयार होणारा पादवायू अन्नपचनाच्या प्रक्रियेतून तयार होत असतो. त्याचा निचरा झाला नाही, तर आपल्याला त्रास होतो. यालाच ‘गॅस्ट्रिक ट्रबल’ म्हणतात. पोटातल्या या गॅसला संस्कृतमध्ये ‘अपानवायू’ म्हणतात. तो बहुधा बिनावासाचा किंवा सौम्य वासाचा असतो. मात्र अत्यंत दुर्गंधीयुक्त अपानवायू सरत असेल तर पोट बिघडलं असं समजावं. कोणीही सामान्य माणूस या घाण वासाला घाणेरडाच समजेल. पण राजकारणी नेत्यांचे चमचे आपल्या साहेबांच्या पादण्याला सुगंधी समजतात. असं मी नाही म्हणत, कवी मंगेश पाडगावकर म्हणतात. ‘नेता जरी का पादला तरी होयबा सुगंधू म्हणे’ अशी त्यांची एक ओळ आहे. (बहुधा ‘उदासबोध’ या विडंबन काव्यात.)

जाऊ द्या, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. पादाला म्हणजेच अपानवायूला ‘श्रद्धा’ असा पर्यायी शब्द आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? दाते शब्दकोशात याच्या पुष्ट्यर्थ एकनाथी भागवतातलं हे उदाहरण दिलं आहेः

‘श्रद्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ।’ (२३.५५८.) मुळात हा शब्द ‘शर्धा’ असा आहे आणि तो संस्कृतमधल्या शृध् म्हणजे पादणं यापासून तयार झाला आहे. पादणं हा शब्द संस्कृतमधल्या ‘पर्दन’पासून बनला आहे, असंही दाते सांगतात. त्याचा अर्थ, गुदद्वारातून अपानवायू सोडणं.

इंग्रजीतल्या ‘fart’ या शब्दाचं मूळ जुन्या इंग्रजीतल्या ‘feortan’ या शब्दात आहे. प्रोटो इंडो युरोपियन या अतीप्राचीन भाषेतल्या ‘perd’ या धातूपासून हा शब्द तयार झाला आहे. याच धातूपासून संस्कृतमधला पर्द/पर्दन (पादणं) हाही शब्द तयार झाला आहे, असं मानतात. ओल्ड हाय जर्मन भाषेतल्या ferzan, ओल्ड नॉर्स भाषेमधल्या freta, डॅनिशमधल्या fjerte, ग्रीकमधल्या perdein, लिथुऍनिअनमधल्या perdžiu, आणि रशिअनमधला perdet या शब्दांचंही मूळ हाच धातू आहे. हे सारे फार्ट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. इंग्रजीत चौदाव्या शतकापासून फार्ट शब्दाचा उपयोग केला जातो आहे.

Flatulence या शब्दाचं मूळ मात्र फ्रेंच आहे.

पादणं हा वैद्यकीय शास्त्रेतर अभ्यासाचाही विषय असू शकतो. हा अभ्यास करणाऱ्या लोकांना ‘fartologist’ असं म्हणतात. ‘Who Cut the Cheese?’  या पुस्तकाचा लेखक जिम डॉसन हा असाच एक नामांकित फार्टॉलॉजिस्ट आहे. त्याच्या ‘BLAME IT ON THE DOG’ या पुस्तकात त्यानं पादणं आणि पादरे लोक याबद्दलच्या अनेक मनोरंजक कथा सांगितल्या आहेत. त्यातल्या काही गंमती अशा आहेत-

प्रसिद्ध लेखक जेम्स जॉयसला त्याच्या बायकोच्या पादाचा वास घ्यायला फार आवडायचं. काही विशिष्ट जातींचे मासे पादून एकमेकांशी संवाद साधतात. अमेरिकेचं पेंटॅगॉन हे संरक्षणखातं अत्यंत घाणेरड्या वासाचा पाद–बॉम्ब तयार करण्याच्या तयारीत आहे. याला त्यांनी ‘weapons of mass olfactory destruction’ (WMOD) असं नाव दिलं आहे.

ही एक नुसती झलक आहे. पूर्ण पुस्तक वाचून तुम्ही पोट धरधरून हसाल. ‘Who Cut the Cheese?’  या पुस्तकात याच लेखकानं पादण्याच्या सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश टाकला आहे. तेही जरूर वाचा.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

Fart आणि F.A.R.T. या नावाचे दोन इंग्रजी चित्रपटही निघाले आहेत. मी तरी ते अजूनपर्यंत पाहिलेले नाहीत.

जाता जाता - मानवी पोटातून बाहेर पडणाऱ्या अपान किंवा पादवायूवर चालणाऱ्या मोटरकारची निर्मिती करण्याचे प्रयोग इंग्लंडमध्ये केले जात आहेत. या कार जर रस्त्यावर धावू लागल्या तर पेट्रोल महाग झालं म्हणून काळजी करण्याचं कारणच उरणार नाही. खूप खा, खूप पादा, आणि मजेत खूप कार चालवा. हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला याची थोडी कल्पना येईल-

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......