आगरकरांच्या आयुष्यातील पूर्वार्ध माहीत नसल्याने त्यांचा उत्तरार्ध समजून घेण्यामध्ये अडथळे येतात. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चांगली चरित्रात्मक कादंबरी आली तर त्याचे स्वागत करायला हरकत नाही
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विनोद शिरसाठ
  • ‘इष्ट तेच बोलणार’ या चरित्रात्मक कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Wed , 28 July 2021
  • ग्रंथनामा शिफारस इष्ट तेच बोलणार Ishta Te Bolnar प्रकाश पाठक Prakash Pathak लोकमान्य टिळक Lokmanya Tilak सुधारक Sudharak

प्रकाश पाठक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर लिहिलेल्या ‘इष्ट तेच बोलणार’ या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन १४ जुलै २०२१ रोजी पुणे येथील देशमुख आणि कंपनी प्रकाशन संस्थेच्या सभागृहात झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनय हर्डीकर होते, तर प्रमुख पाहुणे इतिहासाचे अभ्यास-संशोधक डॉ. राजा दीक्षित होते. याच कार्यक्रमात एक वक्ता या नात्याने केलेले हे भाषण आहे. प्रत्यक्षात झालेल्या भाषणात अंशत: भर टाकली आहे.  

..................................................................................................................................................................

‘इष्ट तेच बोलणार’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते डॉ. राजा दीक्षित, विनय हर्डीकरसर, देशमुख आणि कंपनीच्या प्रकाशक माणिकताई व मुक्ता, पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत सहभागी असलेले मुखपृष्ठकार शेखर गोडबोले व अन्य आणि उपस्थित मित्रहो...

आत्ताच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं मी स्वागत करतो, लेखक आणि प्रकाशक यांचे अभिनंदन करतो. मात्र आता भाषण करताना माझ्यासमोर दोन अडचणी आहेत. पहिली अडचण अशी की, हे पूर्ण पुस्तक मी वाचून येऊ शकलो नाही. दोन आठवड्यांपूर्वी हर्डीकरसरांनी मला विचारलं, ‘१४ जुलैला पुण्यात आहेस का? देशमुख कंपनीत सकाळी दहा वाजता ये. एका पुस्तकाचे प्रकाशन आहे. राजा दीक्षित आणि तू वक्ते आहात. आगरकरांच्यावर कादंबरी आहे, लेखक आहेत प्रकाश पाठक.’

हर्डीकरसरांनी आमंत्रण दिलेय आणि आगरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन, त्यामुळे विचार न करता ‘हो’ म्हणालो. पण गेल्या आठवड्यात मी पुण्यात नव्हतो आणि नेमकी त्याच काळात या पुस्तकाची डमी प्रत मला ऑफिसमध्ये पाठवण्यात आली. परवा मी पुण्यात आलो तेव्हा टेबलवर पाहिले, डबल क्राऊन आकारातील साडेचारशे पानांचे हे पुस्तक, डेमी आकारात केले असते तर साडेसहाशे पाने झाली असती. दीड दिवसांमध्ये हे पुस्तक वाचून होणे शक्यच नव्हते. त्यामुळे प्रत्येकी एक-दीड तासांच्या तीन बैठकांमध्ये मी हे नजरेखालून तेवढे घालू शकलो. त्यामुळे या पुस्तकावर आज मी कितपत अधिकारवाणीने बोलावे, हे तुम्ही समजू शकता. पण ही अडचण तुलनेने छोटी आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दुसरी अडचण मोठी आहे. ती अशी की, मी स्वतः एकोणिसाव्या शतकाचा बराच अभ्यास पूर्वी केलेला असला, तो माझा विशेष जिव्हाळ्याचा विषय असला आणि त्या काळातील अनेक चरित्रे वाचली असली तरी, त्या काळातील एकही चरित्रात्मक कादंबरी मी कधीही वाचलेली नाही. केवळ एकोणिसाव्याच नाही तर विसाव्या शतकातील कोणत्याही लहान-थोर व्यक्तींवरील चरित्रात्मक कादंबरी मी वाचलेली नाही. एवढेच नाही तर, पंधरा वर्षांपूर्वी (२००६ मध्ये), ‘साधना’ साप्ताहिकात युवा अतिथी संपादक या नात्याने एक संपादकीय लेख मी लिहिला, त्याचे शीर्षक आहे- ‘चरित्रात्मक कादंबऱ्यांपासून दूर रहा!’ तिथे मला चरित्रात्मक म्हणताना ‘ऐतिहासिक कादंबऱ्या’सुद्धा अभिप्रेत आहेत. अर्थात जसजसे मागच्या काळात जावे, तसतसे ऐतिहासिक व चरित्रात्मक कादंबऱ्यांबाबत माझा आक्षेप सौम्य होत जातो आणि जसजसे अलीकडे यावे, तसतसा हा आक्षेप तीव्र होत जातो. कारण मागच्या काळातील इतिहास व व्यक्तिरेखा यांच्यासंदर्भात लेखन करण्यासाठी साधने खूप कमी असतात.

तर त्या संपादकीय लेखाचा समारोप करताना मी असं म्हटलं होतं की, ‘चरित्रात्मक कादंबरी ही सामान्य वाचकांची फसवणूक करीत असते आणि लेखकाने केलेला तो वैचारिक भ्रष्टाचार असतो.’ ही विधाने जरा जास्त कठोर वाटतील, पण ती मी केली आहेत खरी. याचे कारण, चरित्रात्मक कादंबरी म्हटलं की, त्यामध्ये मूळ तपशील कोणते, मूळ घटना कोणत्या आणि लेखकाने स्वतःच्या मनाने टाकलेले तपशील व रचलेल्या घटना कोणत्या, हे कळायला मार्ग नसतो. चरित्रनायकाची किंवा त्याच्या संदर्भातील मूळ विधाने कोणती आणि लेखकाने स्वतः जोडलेली कोणती, हेही कळायला मार्ग नसतो. एवढेच नाही तर मुळातील व्यक्तिरेखा कोणत्या व कशा आणि कादंबरीत रंगवलेल्या व्यक्तिरेखांमध्ये नव्याने टाकलेल्या कोणत्या, हेही कळायला मार्ग नसतो. इतर लहान-मोठ्या अनेक अडचणी येतात त्या वेगळ्याच.

चरित्र लिहिणाऱ्या लेखकाला काही तपशील, घटना, विधाने टाकायची असतील तर त्याला आधार द्यावा लागतो, पुरावे सादर करावे लागतात. चरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला तसे विचारण्याची सोय नसते. त्यामुळे वास्तव काय आणि कल्पित काय, हे गुलदस्त्यातच राहते. का तर ती कादंबरी आहे, स्वतंत्र व सर्जनशील साहित्यकृती आहे. त्यात लेखकाने आपल्या प्रतिभेने किंवा कल्पनेने आवश्यक ती भर टाकून तो संपूर्ण कालखंड व ते वातावरण यांच्यासह चरित्रनायक उभा केलेला असतो. त्यातून अडचण अशी निर्माण होते की, चरित्रात्मक कादंबऱ्या वाचणारा वाचक त्यालाच इतिहास समजून चालतो. एवढेच नाही तर, ज्यांनी कोणी इतिहास व चरित्र वाचलेले असते, त्यांच्याशी हे चरित्रात्मक कादंबऱ्या वाचणारे वाचक मोठ्या आवेशाने भांडत असतात. चरित्रात्मक कादंबऱ्या अधिक रोमांचक, अधिक नाट्यपूर्ण, अधिक उत्कंठावर्धक आणि अधिक रहस्यमय अशा केलेल्या असतील तर त्या लोकप्रिय होतात, सर्वसामान्य माणसांपर्यंत जातात आणि तो वाचक मूळ चरित्र व इतिहास वाचण्यासाठी उत्सुक राहत नाही. परिणामी होणारे नुकसान बरेच जास्त असते.

त्यामुळे, चरित्रात्मक कादंबऱ्यांबद्दल माझे ते मत अलीकडच्या काळात थोडेसे सॉफ्ट झाले असले तरी, मूळ भूमिका कायम आहे. आणि म्हणूनच अगदी अलीकडे मराठीतील एक मोठे साहित्यिक जेव्हा म्हणाले की, ‘हमीद दलवाई यांच्यावर चरित्रात्मक कादंबरी लिहायची त्यांना इच्छा आहे’; तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘दलवाई यांच्यावर उत्तम दर्जाची चरित्रात्मक कादंबरी लिहिण्यापेक्षा दुय्यम दर्जाचे चरित्र लिहिणे जास्त योग्य ठरेल. कारण दलवाई यांच्यावर अद्याप एकही चरित्र प्रसिद्ध झालेले नाही. ज्या व्यक्तींवर काही चांगली चरित्रं येऊन गेलेली असतात, तिच्यावर चरित्रात्मक कादंबरी आली तर फार बिघडत नाही.’

चरित्रात्मक कादंबरीबद्दलचे माझे हे आकलन साहित्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे, हे मला माहीत नाही. मी साहित्याचा विद्यार्थी नाही. पण मराठीतील अनेक चांगल्या कादंबऱ्या वाचल्या आहेत. इतिहास हा माझ्या आवडीचा विषय राहिला आहे. अनेक प्रकारची चरित्रे वाचली आहेत. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र हा तर माझा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. आपणा सर्वांना हे मान्य आहे की, एकोणिसावे शतक हे महाराष्ट्रासाठी प्रबोधनाचे शतक ठरले. आज आपण ज्याला ‘आधुनिक’ म्हणतो, त्या सर्वांचा प्रारंभ व विकास एकोणीसाव्या शतकात झाला आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात एकोणिसावे शतक म्हणताना १८१८ ते १९२० म्हणजे पेशवाईची अखेर ते टिळकपर्वाचा अस्त असा कालखंड समोर ठेवायला हवा. या शतकाला ‘मोस्ट रोमँटिक’ कालखंड असेही म्हणता येईल. त्या शतकामध्ये राजकारण, समाजकारण यांच्या सोबतच साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, आरोग्य इत्यादी सर्व क्षेत्रांत मोठी पायाभरणी झालेली आहे. आणि त्यामुळे मला असे वाटत आलेय की, आजचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर एकोणिसावे शतक फार उपयोगी पडते. आजच्या सर्व बऱ्या-वाईटाची किंवा समस्यांची व झालेल्या प्रगतीची चिकित्सा करायची असेल तर, त्यांची बीजे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रात सापडतात. प्राचीन आणि आधुनिक यांच्यातील संधिकाल आहे तो!

त्याच काळात आजचे बहुतांश राजकीय प्रवाह उगम पावले, सर्व सामाजिक सुधारणांचा उगमही त्याच काळात झाला आहे. त्या काळातील घटना आणि प्रसंग, व्यक्तिरेखा आणि विचारप्रवाह, हे सारेच आजच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर रोमहर्षक आणि चित्तथरारक आहे, कथा-कादंबऱ्यांना लाजवेल इतकी नाट्यपूर्णता त्यात आहे. आणि म्हणूनच, चरित्रात्मक कादंबऱ्यांसाठी तो कालखंड आकर्षक व आव्हानात्मक आहे. परिणामी अनेक चांगल्या लेखकांना तो खुणावत असणे साहजिक आहे.

तर ‘इष्ट तेच बोलणार’ या कादंबरीचा विषय आहे गोपाळ गणेश आगरकर. मी संपादक होण्यासाठी जे तीन प्रमुख घटक कारणीभूत म्हणता येतील, त्यातील पहिला आहे आगरकर. आगरकरांवर स.मा. गर्गे, य.दि. फडके आणि माधवराव आळतेकर यांनी लिहिलेली चरित्रे मी वाचली आहेत. आताची ही कादंबरी हातात घेतली, तेव्हा माझ्या मनात ती तिन्ही चरित्रं कमी-अधिक प्रमाणात आहेत. (अर्थात ती चरित्रं वाचून झाली, त्याला आता दीडेक दशकांचा कालखंड उलटला आहे.) त्यामुळे ही कादंबरी हातात घेतल्यावर सर्वप्रथम शेवटची काही पाने वाचली, नंतर मध्याकडे आलो आणि त्यानंतर प्रारंभाकडे आलो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अर्थात, सर्वांत आधी शेवटच्या पानावर असलेल्या संदर्भग्रंथांची यादी वाचली. त्या यादीवर नजर टाकताना माझ्या मनात असा विचार होता की, आपण वाचलेले आहेत किंवा आपल्याला माहीत आहेत अशी- विशेष महत्त्वाची- दोन-चार पुस्तकं तरी यात नसतील. उदाहरणार्थ, पु.ग. सहस्रबुद्धे यांचे ‘केसरीची त्रिमूर्ती’ हे पुस्तक यात नसेल असं मला वाटत होतं. परंतु यादीवर पूर्ण नजर टाकली आणि असं लक्षात आलं की, आपल्या मनातलं वा माहीत असलेलं असं एकही पुस्तक नाही, जे या यादीत नाही. त्यामुळे काही वाचायला प्रारंभ करण्याआधीच या पुस्तकाबद्दल माझे मत जरा अनुकूल झाले. एक छोटासा अपवाद कदाचित सांगता येईल, प्रभाकर पाध्ये यांचे ‘तीन तपस्वी’ हे पुस्तक या यादीत नाही. ते छोटे पुस्तक आगरकर, वामन मल्हार जोशी व साने गुरुजी या तिघांवर आहे. आगरकरांचे चरित्र लिहिण्यासाठी म्हणून ते पुस्तक फार उपयुक्त ठरणार नाही कदाचित, पण चरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला त्यातून काही तरी वेगळे मिळू शकते, सुचू शकते. अर्थात हा एक किरकोळ अपवाद आहे, अन्य लोकही असे छोटे-मोठे अपवाद सांगतील, पण त्याला अंत नसतो.

तर माझे चरित्रात्मक कादंबऱ्यांविषयीचे मत अलीकडच्या काळात थोडेसे सॉफ्ट झाले असे मी म्हणालो, त्याचे कारण सांगितले पाहिजे. ते असे की, मी जसजशी चरित्रे वाचत गेलो, इतिहास वाचत गेलो तसतसे लक्षात येत गेले की, त्यामध्ये अनेक ठिकाणी लहान-मोठ्या रिकाम्या जागा आहेत आणि त्या भरून काढता येणे, कोणत्याही वाचकाला अवघड असते. जेवढे जास्त संदर्भ माहीत, तेवढे ते समजून घेणे सोपे होत जाते. त्यातही अडचण अशी की, काही चरित्रनायकांच्या विशिष्ट कालखंडाबद्दल काहीच उपलब्ध नसते. उदा. आता लेखक प्रकाश पाठक यांनी मनोगतात सांगितले की, आगरकर यांच्या बालपणाबद्दल आणि शाळा-कॉलेजमधील दिवसांबद्दल फार थोडे तपशील उपलब्ध आहेत. खरेच आहे ते. म्हणजे वयाच्या विशीपर्यंतचे आगरकरांचे तपशील फारसे मिळत नाहीत. त्यांनी आत्मचरित्र लिहिले नाही, आठवणी लिहिलेल्या नाहीत, पत्रव्यवहार उपलब्ध नाही. अन्य लोकांनी सांगितलेल्या आठवणी त्या काळातल्या नाहीत. अशा वेळी आगरकर समजून घ्यायचे असतील तर काय करायचे ही मोठी अडचण आहे. आणि आगरकरांची पहिली २० वर्षं जर नीट कळले नाहीत तर पुढील १९ वर्षांतील आगरकर खऱ्या अर्थाने कळणे अवघड जाणार. त्यामुळे त्यांच्या चरित्राला मर्यादा राहणार.

दुसरे असे की, प्रत्येक लेखक आपला चरित्रनायक आपल्या आपल्या दृष्टिकोनातून रेखाटताना सोयीचे वाटले ते पुरावे/तपशील वापरतो आणि गैरसोयीचे वाटतील ते बाजूला ठेवतो. काही तपशील आणि पुरावे त्यांच्यापर्यंत आलेलेच नसतात, हा भाग आणखी वेगळा. शिवाय, पुरावे व तपशील यांचा योग्य-अयोग्य अर्थ लावणे किंवा विपर्यास करणे यामुळेही खूप कमी चरित्रे विश्वासार्ह ठरतात. चरित्रनायकाचे आत्मकथन उपलब्ध असेल, अन्य लेखन उपलब्ध असेल, इतरांनी सांगितलेल्या विविध प्रकारच्या विपुल आठवणी असतील, पत्रव्यवहार/रोजनिशी किंवा तत्सम दस्तऐवज असतील तर ते चरित्र लिहिणे तुलनेने सोपे असते. परंतु जसजसे मागे जावे, तसतसे या प्रकारची साधने कमी कमी होत जातात आणि मग चरित्रामध्ये रिकाम्या जागांची संख्याही वाढत जाते. चरित्रं कमी का वाचली जातात, त्याचे एक कारण हेही आहे. वाचकांकडे त्या काळाच्या संदर्भात व त्या व्यक्तीच्या संदर्भात जेवढे जास्त तपशील, तेवढी चरित्र वाचनातील गंमत जास्त आणि जेवढे कमी तपशील माहीत, तेवढे अडथळे जास्त. काही महनीय व्यक्तींची चरित्रं जास्त वाचली जातात, त्याचे मुख्य कारण हेच की, त्यांच्याविषयी वाचकांना अन्य माध्यमांतून बऱ्यापैकी माहिती झालेली असते. आणि काही चरित्रनायकांविषयी लोकांना अजिबात माहीत नसते, तरीही ती भरपूर वाचली जातात, याचे कारण ती चरित्रं परिपूर्ण वाटावीत अशी लिहिलेली असतात.

आणि म्हणूनच ज्या व्यक्तींची चांगली आत्मचरित्रं, चरित्रं उपलब्ध आहेत आणि त्यांचे अन्य लेखनही उपलब्ध आहे, त्यांच्यावर तरी चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या जाऊ नयेत असे मला वाटते. अर्थात त्यांच्यावर चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या जातात, तेव्हा त्यांचा दुरुपयोग कमी होतो. मात्र ज्या-ज्या व्यक्तींविषयी चांगली चरित्रं उपलब्ध नाहीत, त्यांच्यावर चरित्रात्मक कादंबरी लिहिणे हे जास्त धोकादायक असते. कारण त्यालाच ‘इतिहास’ समजून आपला समाज पुढे जात असतो. आगरकरांबद्दल मी म्हणालो तशी तीन चांगली चरित्रं उपलब्ध आहेत. मात्र ३९व्या वर्षी आगरकर गेले आणि त्यांच्या आयुष्यातील पूर्वार्ध माहीत नसल्याने त्यांचा उत्तरार्ध समजून घेण्यामध्ये अडथळे येतात. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चांगली चरित्रात्मक कादंबरी आली तर त्याचे स्वागत करायला हरकत नाही.

या पुस्तकाचा मी आधी समारोप वाचला. सामान्यतः कादंबरीत आकर्षक शेवट करताना काही वेळा घटना-प्रसंग काल्पनिक पद्धतीने रचले जातात, त्यामुळे इतिहास किंवा चरित्र वाचलेली नाहीत, अशांच्या मनात चुकीचे चित्र जाऊ शकते. यासंदर्भात एक उदाहरण देतो : विश्राम बेडेकर यांचे ‘टिळक-आगरकर’ हे एक चांगले नाटक. त्या नाटकाचा समारोप कसा आहे? आगरकर मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत आहेत, टिळकांना निरोप जातो, ते घोडागाडीने धावपळ करत येतात. दोघांची भेट होते आणि मग आगरकर प्राण सोडतात. आगरकरांचे प्राण जातात त्याच क्षणी, एका मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. टिळक शेजारच्या माणसाला विचारतात, ‘कोण रडतंय तिकडे?’ तेव्हा तो माणूस सांगतो, ‘शेजारच्या घरात एक मुलगी जन्माला आलीय.’ आणि मग करारी मुद्रेने, कणखर आवाजात टिळक हात उंचावून सांगतात, ‘त्या मुलीला कोणी तरी सांगा रे! आता रडण्याचं काहीएक कारण नाही, या देशात आगरकर होऊन गेले आहेत.’ त्या उद्‌गारानंतर पडदा पडतो.

हे नाटक मी पाहिले, तेव्हा बारावीनंतर मी नुकताच पुण्यात आलो होतो. साहजिकच फिक्शन आणि नॉन्फिक्शन यातला फरक मला तितकासा स्पष्ट झालेला नव्हता. त्यामुळे माझ्या मनात तीन प्रश्न आले. आगरकरांच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी टिळक तिथे उपस्थित होते का? आगरकरांचा मृत्यू झाला त्याच क्षणी शेजारच्या घरातून एक मुलगी जन्माला आली का? आणि टिळकांनी ‘ते’ विधान त्या क्षणी केले का? त्यानंतर मी आगरकरांची चरित्रं वाचली आणि असे लक्षात आले की, त्या तीनही बाबी वस्तुस्थिती म्हणून खऱ्या नाहीत. आगरकरांना शेवटच्या दोन-तीन दिवसांत टिळक भेटून गेले याच्याबद्दल वेगवेगळ्या चरित्रकारांनी लिहिले आहे. मात्र आगरकरांचा मृत्यू झाला, तेव्हा टिळक तिथे उपस्थित नव्हते. त्या क्षणी टिळकांनी उच्चारलेले ते विधान नाटककार विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले आहे. आणि शेजारच्या घरात मुलगी जन्माला येणे हा पूर्णतः काल्पनिक प्रसंग आहे. आता प्रश्न असा की, हे ऐतिहासिक नाटक किंवा चरित्रात्मक नाटक पाहिलं तर त्याच्यामध्ये वास्तवातले प्रसंग घटना आणि उद्‌गार खूप जास्त प्रमाणात आहेत आणि काल्पनिक असेही काही पेरलेले आहेत. त्यामुळे वाचक श्रोत्यांचा गोंधळ होऊ शकतो.

‘इष्ट तेच बोलणार’ या कादंबरीचा समारोप नाट्यपूर्ण नाही, किंबहुना तो जास्तच सरळ आहे. या कादंबरीतील मधला काही भाग वाचला, तेव्हा ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू झाले त्याबद्दलचे (मला माहीत नाहीत असे) काही  तपशील मिळतात का, किंवा कल्पनेने भरलेले आहेत का, हे मला पहायचे होते. पण तिथे फारसं नवं काही सापडलं नाही, म्हणजे लेखकाच्या समोरची ती अडचण कायम आहे. कारण ‘सुधारक’चे अंक आता कुठेही उपलब्ध नाहीत. आणि त्या संदर्भातील तपशीलही चरित्रकारांनी किंवा इतर काही लोकांनी आठवणीत लिहिलेत ते त्रोटक आहेत.

‘इष्ट तेच बोलणार’ या कादंबरीच्या प्रारंभाचा भाग वाचण्यास आधी मी उत्सुक नव्हतो. खूपच काल्पनिक आणि नाट्यपूर्ण असे काही तरी त्यात असेल, म्हणून या कादंबरीचा प्रारंभ मी सर्वांत शेवटी वाचला आणि माझी निराशा कमी झाली. आगरकरांचा सुरुवातीचा कालखंड कल्पनेनेच रेखाटावा लागणार, हे उघड आहे, पण तो या कादंबरीत बऱ्यापैकी वास्तवाच्या जवळ जाणारा वाटतो आहे. याची दोन कारणे असावीत. पहिले प्रकाश पाठक यांनी त्या काळातील खूप जास्त पुस्तके वाचलेली आहेत, त्यामुळे त्यांना संदर्भ पक्के ठाऊक आहेत. गेल्या पाच वर्षांत ते ‘आगरकरमय’ झाले आहेत, हे त्यांनी मघाशी सांगितलेच. त्यामुळे ते वस्तुस्थितीच्या जास्त जवळ जाऊ शकले. आणि दुसरे कारण ते सातारा-कराड याच परिसरातून आलेले आहेत, त्यामुळे तो परिसर आणि तो प्रदेश त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. या दोन्ही कारणांमुळे या कादंबरीतील आगरकरांचा सुरुवातीचा कालखंड चांगल्या प्रकारे रेखाटला गेला आहे, असे माझे प्राथमिक निरीक्षण आहे.

पण त्यातही एका प्रसंगाबद्दल माझ्या मनात प्रश्न निर्माण झालाय. तो असा की, कुमारवयातील गोपाळ आणि त्याचे काही मित्र एका चिंचेच्या झाडावरील चिंचा काढण्यासाठी जातात, तेव्हा त्या झाडावर वानरे असतात. हा कुमार वयातला गोपाळ (त्याचे मित्र नको-नको म्हणत असतानाही) चिंचा काढण्यासाठी झाडावर चढतो. आणि मग एका वानराशी त्याची झटापट होते. ती कशी होते, तर एक वानर त्याच्या शेंडीला पकडते आणि गोपाळ मात्र त्याच्याशी झटापट करून सामना जिंकूनच खाली येतो. गोपाळच्या या कर्तबगारीचे त्याच्या मित्रांना खूप कौतुक वाटते.

आता हा प्रसंग काल्पनिक आहे की, आगरकरांच्या वरील कोणाच्या आठवणीतून आलेला आहे, हे कळायला मार्ग नाही. परंतु हा प्रसंग काल्पनिक असेल तर तो भविष्यकाळात आगरकरांच्या जीवनातला खराखुरा प्रसंग म्हणून सर्वसामान्य वाचकांच्याकडून रंगवला जाण्याची शक्यता जास्त आहे. नेमका हाच प्रसंग असलेला उतारा पुढे कधी तरी शालेय पाठ्यपुस्तकात लावला गेला, तर तो इतिहासाचा भाग मानला जाणार. अर्थात टिळक आणि आगरकर यांची बाजू घेऊन वादविवाद करणारांना त्याचा एक चांगला फायदा होऊ शकेल. शालेय वयातील टिळकांच्या संदर्भात शेंगा आणि टरफलं हा प्रसंग रंगवून सांगितला जातो. तसाच आगरकरांच्या चाहत्यांनाही कुमारवयातील गोपाळचा हा प्रसंग सांगता येईल. म्हणजे ‘टिळकांच्या शेंगा’ आणि ‘आगरकरांच्या चिंचा’.

असो. पण या कादंबरीत काल्पनिक प्रसंग एकूणच कमी असावेत असे वाटते. खूप जास्त संदर्भ घेऊन रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला दिसतो. त्यामुळे या कादंबरीचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र यासंदर्भात एक सूचना करावीशी वाटते. साहित्याच्या क्षेत्रांतील लोकांना ही सूचना कितपत आवडेल, याबद्दल माझ्या मनात जबरदस्त शंका आहे, पण तरीही सांगतो. इतिहासाबद्दल असे म्हटले जाते की, सर्वच इतिहास ‘समकालीन’ असतो आणि प्रत्येक नवी पिढी आपला इतिहास लिहीत असते, आपापल्या दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहात असते. आणि चरित्रांबद्दल असं म्हटलं जातं की, कोणत्याही व्यक्तीची एकाहून अधिक चरित्रं असतील, तर ती व्यक्ती समजून घेण्यासाठी ते जास्त उपयुक्त ठरते.

आणि म्हणूनच मला असं वाटतं की, या चरित्रात्मक कादंबरीची आता पहिली आवृत्ती आली, पण हिच्या सुधारित आवृत्त्या आणायला हव्यात. म्हणजे मागील पाच वर्षे लेखक प्रकाश पाठक ‘आगरमय’ झाले होते तर, आता हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर, विविध प्रतिक्रिया समजल्यावर, काही नवे पुरावे/तपशील हाती लागल्यावर किंवा त्यांच्या मनात वेगळे विश्लेषण आकाराला आल्यावर, त्यांनी दुसरी आवृत्ती काढताना या कादंबरीत आवश्यक ते फेरफार केले तर ते योग्य ठरेल. तिसऱ्या आवृत्तीमध्ये आणखी काही भर टाकता येऊ शकेल. म्हणजे जसे नॉनफिक्शन प्रकारातील पुस्तकांच्या सुधारित आवृत्त्या येत राहतात, तसेच या प्रकारच्या चरित्रात्मक कादंबरीच्याही सुधारित आवृत्त्या आल्या, तर ते वावगं ठरणार नाही..

आता शेवटचा एक गंमतीदार मुद्दा मांडतो आणि थांबतो. चरित्रात्मक कादंबऱ्यांविषयी माझे हे आकलन आकाराला आले, त्यात अभ्यास आणि आणि अनुभव यांचा वाटा मोठा आहे. मात्र त्या आकलनाला वैचारिक आधार देण्याचे काम अरुण टिकेकर यांनी केले. (मला संपादक व्हावे असे वाटले त्याचे दुसरे कारण हे टिकेकर आहेत) ते ‘लोकसत्ता’चे संपादक होते हे सर्वांना माहीत आहे, पण एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांनी त्यावर विपुल लेखन केले आहे. चरित्रात्मक कादंबऱ्यांविषयीची त्यांची भूमिकाही जवळपास अशीच होती. पण काव्यात्मके न्याय असा की, त्यांनी शेवटच्या काळात संपादकपदावरून निवृत्त झाल्यावर एका चरित्रात्मक कादंबरीवर ‘ललित’ मासिकात ‘मानाचे पान’ या सदरात दीर्घ लेख लिहिला. जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘प्रारंभ’ या कादंबरीवर. टिकेकर यांनी त्या लेखात असे म्हटले की, एके दिवशी सकाळी त्यांनी ती कादंबरी वाचायला घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती वाचून पूर्ण झाली. म्हणजे २४ तासांत पाचशे-सहाशे पानांची कादंबरी त्यांनी वाचली. त्यांनी त्या कादंबरीविषयी कौतुकाने लिहिले आहे. अर्थातच जगन्नाथ नाना शंकर शेठ यांचा कालखंड एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभाचा. त्यांच्याविषयाचे तपशील तर आणखीच कमी मिळतात, पण त्या रिकाम्या जागा गंगाधर गाडगीळ यांनी चांगल्या भरून काढल्या असाव्यात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

गाडगीळ यांनी त्याआधी ‘दुर्दम्य’ ही टिळकांच्या जीवनावरील कादंबरी लिहिली. तिच्यावर टीकाही बरीच झाली होती. त्यामुळेही असेल कदाचित, ‘प्रारंभ’मध्ये गाडगीळांनी अधिक काळजी घेतली असावी. तर काय काव्यात्म न्याय आहे पहा, चरित्रात्मक कादंबरी या प्रकारविषयी सातत्याने टीका केली त्या टिकेकरांनी, प्रारंभ या चरित्रात्मक कादंबरीवर मानाचे पान लिहिले. अशाच प्रकारचा काव्यात्मक न्याय विनय हर्डीकर यांच्यामुळे आज येथे झालेला दिसतोय. ‘चरित्रात्मक कादंबऱ्यांपासून दूर राहा’, या शीर्षकाचा लेख १५ वर्षांपूर्वी लिहिणाऱ्या ‘साधना’च्या युवा संपादकाला तो संपादक झाल्यावर एका चरित्रात्मक कादंबरीवर भाषण करण्यासाठी बोलावले गेले आहे आणि ती कादंबरी कोणावर तर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर!

अर्थात, निवृत्त झाल्यामुळे ‘प्रारंभ’ वाचायला टिकेकरांना एक दिवस पुरला. मी अजून संपादक म्हणून काम करत असल्याने तसा वेळ मला ‘इष्ट तेच बोलणार’ वाचण्यासाठी मिळाला नाही. एवढेच नाही तर, मी स्वतःला आगरकर स्कूलचा मानतो. परंतु गेल्या वर्षी आगरकरांचा सव्वाशेवा स्मृतिदिवस आणि टिळकांचा शंभरावा स्मृतिदिवस येऊन गेला तेव्हा, मी ‘साधना’त आगरकरांवर संपादकीय लेख तेवढा लिहिला आणि टिळकांच्यावर मात्र विशेषांक काढला. म्हणजे आगरकरांचे चाहतेसुद्धा त्यांचा वारसा पुढे आणण्यासाठी या ना त्या कारणाने कमी पडताहेत. अशा पार्श्वभूमीवर, आगरकरांवर चरित्रात्मक कादंबरी लिहून मराठी साहित्यामध्ये एक महत्त्वाचे पुस्तक प्रकाश पाठक यांनी आणले आहे, म्हणून त्यांना, प्रकाशकांना आणि त्यांच्या संपादकांना धन्यवाद.

‘इष्ट तेच बोलणार...’ : प्रकाश पाठक

प्रकाशक: देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि., पुणे

पाने : ४८०, मूल्य : ६५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.

vinod.shirsath@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......