‘प्रिय व्हाडला... तू जिथे कुठे असशील तिथे सुखरूप असशील, तुझ्यासोबत तुझी पिल्लंही मोठी होत असतील आणि थंडीचा ऋतू सुरू झाला की, आम्ही पुन्हा एकदा भारतात तुझं स्वागत करू.’ गुजरातमधून कझाकिस्तानच्या दिशेने उड्डाण केलेल्या व्हाडलाला फेसबुकवरून हा मेसेज मिळाला असेल की नाही, माहीत नाही, पण ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे पक्षीतज्ज्ञ डॉ. आर. सुरेशकुमार, त्यांचे सहकारी आणि गुजरात वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी या पक्षिणीच्या परतीच्या प्रवासाकडे डोळे लावून बसले आहेत.
ही ‘व्हाडला’ कॉमनक्रेन म्हणजेच क्रौंच पक्ष्याची मादी आहे. गुजरातमधल्या नळसरोवर अभयारण्याजवळ व्हाडला गावामध्ये या पक्षिणीच्या पायाला सॅटेलाइट कॉलर बसवण्यात आली होती. महिना होता मार्च २०२०. ज्या गावात तिला कॉलरिंग करण्यात आलं, त्या गावावरूनच तिचं नाव ठेवलं – ‘व्हाडला’. त्यानंतर ती कझाकिस्तानमध्ये तिच्या विणीच्या ठिकाणी गेली आणि १० ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा एकदा त्याच गावात, त्याच ठिकाणी आली! या दिवशी जागतिक स्थलांतर दिनही असतो. हे तिला माहीत नव्हतं, पण तिने भारतात पोहोचण्यासाठी हाच दिवस निवडला.
प्रवासातले कसोटीचे देश
कझाकिस्तानमधला कडाक्याचा हिवाळा जिवावर बेतेल म्हणून व्हाडलासारखे अनेक क्रौंच पक्षी दर वर्षी हिवाळ्यात कझाकिस्तानमधून स्थलांतर करून तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशा मार्गाने भारतात येतात.
गुजरातमधल्या कच्छमधले सपाट गवताळ प्रदेश हे त्यांच्या कझाकिस्तानमधल्या अधिवासासारखेच आहेत. डॉ. आर. सुरेशकुमार यांनी कच्छमध्ये या क्रौंचांचे थवेच्या थवे पाहिले आहेत. या वेगवेगळ्या ठिकाणच्या थव्यांमधल्या काही क्रौंचांना सॅटेलाइट कॉलर लावायची आणि त्यांच्या स्थलांतराचा मार्ग शोधायचा, हा या प्रकल्पाचा उद्देश.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
याच उद्देशाने व्हाडलाच्या पायाला सॅटेलाइट कॉलर लावण्यात आली आणि ती जिथे जिथे प्रवास करेल, तिथून तिथून या कॉलरने सिग्नल दिले. आता मात्र २ एप्रिल २०२१पासून व्हाडलाच्या कॉलरने एकदाही सिग्नल दिलेला नाही. तिचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. तिने शेवटचा सिग्नल दिला, तेव्हा ती पाकिस्तानमधून प्रवास करत होती. बलुचिस्तानमधल्या मियानी होर या पाणथळ भागाच्या परिसरात असताना तिचा सिग्नल अचानक गायब झाला. मियानी होर हा जागतिकदृष्ट्या नावाजलेला असा पाणथळ अधिवास आहे. हा इतका दूरवरचा प्रदेश असूनही उपग्रहाद्वारे ‘व्हाडला’चा सिग्नल मिळत होता...
व्हाडलाच्या पायाला लावलेल्या हलक्याशा सॅटेलाइट कॉलरचा सिग्नल थेट उपग्रहाकडे जातो आणि ती जिथे कुठे असेल, तिथे हा उपग्रह तिला ट्रॅक करू शकतो. मग नेमकं काय झालं असेल बरं?... डॉ. सुरेशकुमार यांना चिंता जरूर आहे, पण त्यांनी आशा सोडलेली नाही. कदाचित तिच्या सॅटेलाइट कॉलरचं उपकरण बंद पडलं असेल, कदाचित गळून पडलं असेल किंवा कदाचित व्हाडलाची शिकार झाली असेल. काहीही झालं, तरी सिग्नल यायलाच हवा.
‘व्हाडला’ पुन्हा येईल का?
पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यंत जिकिरीचे आहेत. या मार्गात त्यांची बंदुकीने शिकार होते किंवा त्यांचा पाठलाग करून, त्यांना जाळ्यात अडकवून त्यांना पकडलं जातं. ‘व्हाडला’चा सिग्नलही बलुचिस्तानमध्येच बंद पडला. पक्ष्यांची शिकार झाली, तरी काही काळ त्यांची सॅटेलाइट कॉलर सिग्नल देत राहते. म्हणूनच ‘तिची हिवाळ्यापर्यंत वाट पाहायला हवी’ असं सुरेशकुमार यांना वाटतं आहे. व्हाडला कझाकिस्तानमधून पुन्हा आली, तर नक्की काय झालं होतं, ते कळू शकेल.
गुजरातमध्ये येणारे कॉमनक्रेन म्हणजेच क्रौंच पक्षी
हो. ‘आणि ती सुखरूप परत आली तर पिल्लांनाही घेऊन येईल तिच्या... मागच्या वेळी आली, तेव्हा पिल्लं होती का तिच्यासोबत?’ माझा अधीर प्रश्न.
नामकरण केलेल्या या पक्ष्यांबद्दल आर. सुरेशकुमार संवेदनशील जरूर आहेत, पण अचूक माहिती देण्याकडे त्यांचा कल असतो– “हो. व्हाडला मागच्या वेळी कझाकिस्तानमधून आली, तेव्हा तिच्यासोबत काही पिल्लं होती. ती तिच्या कुटुंबातलीच वाटत होती, पण ती तिचीच पिल्लं होती का, याबद्दल आम्हाला कळू शकलं नाही. कझाकिस्तानमध्ये जन्म झाल्यानंतर स्थलांतर करून इकडे येईपर्यंत पिल्लंही बरीच मोठी झाली होती...”
“म्हणजे तुम्ही मुद्दाम क्रौंच पक्ष्याच्या मादीला सॅटेलाइट कॉलर बसवलीत का? तिची पिल्लं, त्यांच्या विणीच्या सवयी तुम्हाला तपासायच्या होत्या का?’’
“नाही. या क्रौंचांमध्ये नर आणि मादी सारखेच दिसतात. त्यामुळे पक्ष्याला पकडताना असं काही ओळखू येत नाही, पण जेव्हा आम्ही तिला पकडलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की, ती मादी होती. क्रौंच वीण कुठे करतात, कुठून कुठे येतात याबद्दल आधी अभ्यास झाला आहे, पण त्यांच्या स्थलांतराच्या मार्गात ते नेमके कुठेकुठे थांबतात, कुठला मार्ग घेतात याचा अभ्यास झालेला नाही.
“या प्रकल्पाचा आमचा उद्देश वेगळाच आहे. या पक्ष्यांसारखेच बरेच मोठे पक्षी विजेच्या तारांवर आपटून मृत्युमुखी पडतात. त्यांच्या उडण्याच्या मार्गात हे अपघात होतात. २००२मध्ये महाराष्ट्रात वरोरामध्ये एक माळढोक असाच विजेच्या तारांवर अडकून मृत्युमुखी पडला आणि नामशेष होऊ घातलेल्या एका पक्ष्याला आपण गमावून बसलो.
“गुजरातमध्ये या क्रौंच पक्ष्यांच्या बाबतीतही अशाच घटना घडल्या. हे अपघात टाळावेत यासाठी कॉमन क्रेन पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग आम्ही तपासतो आहोत. ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने आम्हाला यात सहकार्य केलं आहे. आत्ता आम्ही एकाच पक्षिणीला सॅटेलाइट कॉलर लावली आहे, पण एकूण नऊ पक्ष्यांना आम्हाला ही कॉलर लावायची आहे. करोनाच्या लॉकडाऊनमुळे आमचा हा प्रकल्प मध्येच थांबला, पण आता लवकरच सुरू होईल...” सुरेशकुमार सांगतात.
अशी लावतात सॅटेलाइट कॉलर
“सर, जेव्हा वाघ, बिबट्या अशा मोठ्या प्राण्यांना सॅटेलाइट कॉलर लावली जाते, तेव्हा त्यांना बेशुद्ध केलं जातं, पण पक्ष्यांच्या बाबतीत असं करता येत नाही...”
“हो, पक्ष्यांना अशा पद्धतीची रेडिओ कॉलर लावणं फार कठीण आहे. एकतर त्यांना पकडायला गेलं, तर ते भुरकन उडून जातात. जाळं लावून ठेवलं, तरी त्यातून निसटून जाण्याची चतुराई त्यांच्याकडे असते. क्रौंच पक्ष्यांची तर वर्षानुवर्षं मोठ्या प्रमाणात शिकार होत आली आहे. त्यामुळे हे पक्षी अत्यंत सावध असतात.
पक्षीतज्ज्ञ गिरीश जठार क्रौंच पक्ष्याला सॅटेलाइट कॉलर बसवताना
“आम्ही त्यांना लूज ट्रॅप पद्धतीने पकडतो. ज्या ठिकाणी पक्षी खाद्य टिपण्यासाठी हमखास येईल, अशा जागी ही जाळी लावली जातात. एकदा पक्षी त्यात अडकला की, लगेचच त्याच्या पायाला किंवा मानेला आम्ही हे सॅटेलाइट कॉलरचं उपकरण लावतो आणि पाच-दहा मिनिटांत त्याला सोडूनही देतो. या सगळ्या प्रक्रियेत पक्षी धक्क्याने मरू नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. असे पक्षी पुन्हा ओळखू यावेत म्हणून त्यांच्या पायात एक हलकंसं कडं अडकवलं जातं किंवा अलीकडे या पक्ष्यांच्या पायांना रंगीत पट्टे बांधले जातात, जेणेकरून पक्षी उडताना दुरूनही ओळखू येतो.
“या रिंगवर एक मेसेज लिहिलेला असतो. ‘हा पक्षी तुम्हाला आढळला, तर आमच्याशी संपर्क साधा’ असं सांगून आमचं नाव, पत्ता अशा गोष्टी दिलेल्या असतात. असं केल्याने, ‘हे पक्षी एका महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग आहेत, त्यांची काळजी घ्यायला हवी’ हा संदेशही दूरदूर जातो.”
पक्षी स्थलांतर कसं करतात?
क्रौंचसारखे पक्षी दिवसा स्थलांतर करतात. स्थलांतराच्या मार्गात ‘पाणी कुठे आहे?’, ‘खाद्य कुठे मिळेल?’, ‘आपल्याला हवेसे अधिवास कोणते?’ यांचा माग घेत पक्षी त्यांच्या मुक्कामाच्या जागा आणि मार्ग निवडतात. डॉ. सुरेशकुमार सांगतात, “त्यांना त्यांच्या स्थलांतराचा अचूक मार्ग कसा कळतो, हे एक कोडंच आहे. पण आतापर्यंत झालेल्या संशोधनातून पक्षीतज्ज्ञांनी काही गृहितकं मांडली आहेत. वातावरणात विद्युत चुंबकीय लहरी काम करत असतात. या अतिसूक्ष्म लहरी आपल्याला जाणवत नाहीत, पण पक्ष्यांचा मेंदू याची नोंद घेत असतो. या लहरींच्या आधारे त्यांना स्थलांतराची दिशा सापडते. कॉमन क्रेनसारखे दिवसा स्थलांतर करणारे पक्षी सूर्याच्या दिशेवरून त्यांचा पुढचा मार्ग आखतात. काही पक्षी रात्रीही स्थलांतर करतात. असे पक्षी ताऱ्यांच्या आधारे दिशा ठरवतात, असाही शास्त्रज्ञांचा कयास आहे. या पक्ष्यांच्या मेंदूमध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्रांचं डिकोडिंग करण्याची क्षमता असते.”
कॉमनक्रेन म्हणजेच क्रौंच पक्षी
पुढे डॉ. सुरेशकुमार सांगतात, “स्थलांतराच्या काळात या पक्ष्यांच्या सुप्त क्षमता जाग्या होतात. जोराने वाहणारे वारे, गरम वाऱ्यांची दिशा यांवर स्वार होत ‘लांब पल्ल्याचं अंतर कसं गाठायचं’ याचं कौशल्य त्यांना ज्ञात असतं. याच वाऱ्याच्या जोरावर स्थलांतर करणारे पक्षी एका दिवसात ३०० किमीचं अंतरही सहज कापू शकतात! म्हणूनच ज्यांच्याकडे अशी सुपर (अद्भुत?) कौशल्यं असतात, त्यांना आम्ही ‘बर्डब्रेन’ असं म्हणतो! अख्ख्या पृथ्वीतलावर सगळ्यात हुश्शार प्रजाती कोणती असेल, तर ती स्थलांतरित पक्ष्यांची, असं मला वाटतं.”
डॉ. सुरेशकुमार यांच्याकडे आता या क्रौंच पक्ष्यांच्या प्रवासाची मोठी कादंबरीच तयार झाली आहे. त्यांचे काही थवे कझाकिस्तानमधून भारतात येतात, तर काही मंगोलियामधून. या दोन्ही देशांमध्ये मोठे गवताळ प्रदेश आहेत. तिथेच हे पक्षी राहतात आणि त्यांची वीणही होते.
३० ते ४० हजार क्रौंच
क्रौंचांवर पीएच.डी. करणारे हरिंद्र बरैया सांगतात - “गुजरातमध्ये कच्छच्या सपाट गवताळ प्रदेशात हे पक्षी शेतीच्या आसपास त्यांचं खाद्य टिपत असतात. हे क्रौंच पक्षी कीटकही खातात. दिवाळीच्या सुमाराला जेव्हा गुजरातमध्ये पिकांची कापणी सुरू असते, सुगीचा हंगाम असतो, तेव्हा हे पक्षी थव्याथव्यांनी शेतात फिरतात, पण जेव्हा रात्रीच्या थाऱ्यासाठी सगळे पक्षी एकाच तलावात जमा होतात, तेव्हाचं दृश्य पाहण्यासारखं असतं!” अशा वेळी त्यांच्या संख्येचा अंदाज लावता येतो. नळसरोवरात एकाच वेळी ३० ते ४० हजारांच्या संख्येने हे पक्षी त्यांनी पाहिले आहेत.
हे क्रौंच त्यांच्या विणीच्या मूळ जागी, म्हणजे कझाकिस्तानमध्ये विस्तीर्ण परिसरात पांगलेले असतात, पण जेव्हा स्थलांतरासाठी ते एकाच जागी येतात, तेव्हा त्यांचा अगदी जवळून अभ्यास करता येतो, हाही त्यांचा अनुभव आहे. “स्थलांतराच्या काही दिवस आधी, म्हणजे मार्च महिन्याच्या सुमाराला हजारो क्रौंच आभाळात घिरट्या घालताना मी पाहिले आहेत” असं ते सांगतात. या क्रौंचांची उडण्याची क्षमता विलक्षण असते.
कच्छ, सौराष्ट्र या गवताळ प्रदेशातल्या सपाट भागांचा धावपट्टीसारखा उपयोग करून ते छोट्याछोट्या थव्यांनी कझाकिस्तानकडे भरारी घेताना दिसणारं दृश्य विलोभनीय असतं. ते इथून निघतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत या सगळ्या मार्गांची नोंद होत असावी. कारण परतीच्या प्रवासात ते पुन्हा त्याच ठिकाणी येऊन अवतरतात. येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पिल्लंही एवढा मोठा प्रवास करून येतात. पक्ष्यांचं स्थलांतराचं हे ज्ञान त्यांच्या पिल्लांकडे नैसर्गिकरित्याच असतं. शिवाय अगदी लहान वयात ही पिल्लं आपल्या पालकांसोबत स्थलांतराचं मैलोनमैल अंतर पार करून येतात.
हे क्रौंच पक्षी भारतात त्यांची वीण करत नाहीत, पण इथं येऊन चांगलंचुंगलं खाऊन धष्टपुष्ट होऊन हे पक्षी विणीसाठी मे महिन्यापर्यंत कझाकिस्तानला जातात. ते १५ ते २० वर्षं जगतात आणि त्यांची पिल्लं चार वर्षांची झाली की, पुढच्या पिढीला जन्म देण्याची क्षमता त्यांच्यात येते. भारतात या क्रौंचांचा एकत्रित समुदाय पाहायला मिळतो. इथं त्यांच्या जोड्याही ठरत नाहीत, पण कझाकिस्तानच्या मूळ अधिवासात ते गेले की, विणीसाठी जोड्या बनवतात. आपल्याकडच्या सारस क्रौंचांसारखंच या क्रौंचांचा नर मादीला भुलवण्यासाठी नृत्य करतो. कझाकिस्तानचा हा गवताळ प्रदेश उन्हाळ्यातल्या सोनरी किरणांमध्ये क्रौंचांच्या या प्रजनन नाट्यानं गजबजून जातो. तिथं त्यांची वीण जेवढी यशस्वी होईल, तेवढी आपल्याकडे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढते.
स्थलांतराचा आशियाई महामार्ग
भारतीय उपखंडाच्या नकाशावर नजर टाकली, तर डावीकडे वरच्या बाजूला कझाकिस्तान आहे आणि उजवीकडे वरच्या बाजूला मंगोलिया आहे. इथून हे स्थलांतरित पक्षी मध्य भारतात येतात. या स्थलांतराच्या त्रिकोणी प्रदेशातल्या मार्गांना ‘सेंट्रल एशियन फ्लाय वे’ असं म्हटलं जातं. पक्ष्यांच्या स्थलांतराचा ‘एक्सप्रेस वे’च म्हणा ना! भारतात दर वर्षी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही ३००हून जास्त पक्षी स्थलांतर करतात. हे पक्षी कझाकिस्तान, किरगिझस्तान, इराण, युरोपीय देश, रशिया, चीन, मंगोलिया अशा वेगवेगळ्या देशांतून येतात.
पक्ष्यांच्या इतक्या मोठ्या स्थलांतराचं कारण आहे, भारतातली जैवविविधता! या पक्ष्यांच्या मूळ अधिवासांसारखेच वेगवेगळे अधिवास भारतात आहेत. जंगलं आहेत, गवताळ प्रदेश आहेत, किनारपट्टीचे प्रदेश आहेत आणि मोठमोठ्या नद्या, तलावही आहेत. त्याचबरोबर भारताच्या तिन्ही बाजूंना समुद्र आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्षी भारतातलेच अधिवास निवडून इथं हिवाळा घालवणं पसंत करतात.
सैबेरियन क्रौंचांचं स्थलांतर
एके काळी अशाच प्रकारे कडाक्याच्या थंडीच्या सैबेरियामधून राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये सैबेरियन क्रेन येत असत. सैबेरियाच्या विस्तीर्ण दलदलीत हिवाळ्यात तापमान उणे २५पर्यंत जाऊ शकतं. हा प्रदेश गोठण्याच्या आधीच हे सैबेरियन क्रौंच प्रवासाला निघत आणि हजारो मैलांचा प्रवास करून भरतपूरच्या केवलादेव अभयारण्यात येत. हे पक्षी इथं आले की, त्यांना पाहण्यासाठी भरतपूरमध्ये पक्षीप्रेमींचा मेळा भरत असे, पण २००२नंतर हे पक्षी आलेच नाहीत. भरतपूरच्या पक्ष्यांच्या जत्रेतून ते दिसेनासे झाले, ते कायमचेच!
“या क्रौंचांची वसाहत दुर्दैवानं अस्तंगत झाली आहे” पक्षीतज्ज्ञ डॉ. असद रहमानी सांगतात. १९७३मध्ये त्यांनी भरतपूरमध्ये ७३ सैबेरियन क्रौंच पाहिले होते. एवढंच नाही, तर १९६० साली २०० सैबेरियन क्रौंच स्थलांतर करून आल्याची नोंद आहे.
सैबेरियन क्रेन
जोपर्यंत ही वसाहत पुन्हा वसवली जात नाही आणि त्यांना स्थलांतराचे मार्ग शिकवले जात नाहीत, तोपर्यंत आपण त्यांना भारतात आणूच शकणार नाही, असं रहमानी यांचं म्हणणं आहे. ‘पण या सैबेरियन क्रौंचांनी भारताकडे पाठ का फिरवली असेल बरं...?’ यावर पक्षीतज्ज्ञ गांभीर्यानं विचार करू लागले – ‘भरतपूरच्या पाणथळ अधिवासात काही समस्या आहेत का?’, ‘त्यांना इथं पाण्याची चणचण भासत असावी का?’ या सगळ्या प्रश्नांवर काथ्याकूट करून झाला. पण सैबेरियन क्रौंच न येण्याचं कारण वेगळंच होतं आणि ते त्यांच्या स्थलांतराच्या मार्गात दडलेलं होतं.
अफगाणिस्तानमध्ये होते शिकार
सैबेरियन क्रेन या पक्ष्यांना स्थलांतरासाठी रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश पार करावे लागतात. या मार्गामध्ये हे पक्षी अबि-ए-इस्तदा या तलावामध्ये वसती करतात. नेमक्या याच वेळी अफगाणिस्तानमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होते. तिथं पिढ्यानपिढ्या या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या पारंपरिक शिकारी टोळ्या आहेत. या टोळ्यांनीच या पक्ष्यांना संपवलं असल्याची आठवण डॉ. असद रहमानी करून देतात. १९९६मध्ये अफगाणिस्तानच्या पक्षीबाजारात एक सैबेरियन क्रौंच टांगलेला दिसला आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ माजली!
या पक्ष्यांची शिकार होऊ नये म्हणून ‘इंटरनॅशनल क्रेन फाउंडेशन’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही प्रयत्न केले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गेली २० वर्षं तर सततचे हवाई हल्ले आणि तालिबान्यांचा हिंसाचार यांमुळे अफगाणिस्तान धगधगतो आहे. त्यामुळे स्थलांतराच्या मार्गात पक्ष्यांना जिवंत ठेवणं जिकिरीचं झालं आहे.
कृष्ण करकोच्याची शिकार
जी कहाणी कॉमन क्रेन, सायबेरियन क्रेन या पक्ष्यांची, तीच कहाणी ब्लॅक स्टॉर्क म्हणजे कृष्ण करकोच्याची! हे काळे करकोचे युरोपमधून भारतात छोट्याछोट्या थव्यांनी स्थलांतर करतात. या करकोच्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर बसवण्याचा एक प्रकल्प बीएनएचएस म्हणजेच ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने हाती घेतला होता. तिचे पक्षीतज्ज्ञ गिरीश जठार हे झेक रिपब्लिकच्या पाच शास्त्रज्ञांसोबत हा प्रकल्प राबवत होते. २००८च्या डिसेंबरमध्ये गिरीश जठार यांनी दोन काळ्या करकोच्यांना रेडिओ कॉलर लावली होती. विदर्भातल्या अकोलेमधील बोरगाव मंजू गावातल्या एका तलावात या करकोच्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना कॉलर बसवण्यात आली. यातला एक करकोचा मोठा होता आणि एक छोटा होता.
ब्लॅक स्टॉर्क म्हणजे कृष्ण करकोचा
पाठीवर सॅक लावावी, त्या पद्धतीने या पक्ष्यांच्या पाठीवर हे उपकरण लावण्यात आलं आणि पाठीवरच्या सॅकमध्ये बीएनएचएसचा मेसेज घेऊन या पक्ष्यांनी अकोल्याहून उड्डाण केलं.
गिरीश जठार सांगतात, “२००८पासून तीन वर्षं आम्ही या दोन पक्ष्यांचा माग घेत होतो, पण यात एका पक्ष्याला मात्र आम्ही गमावून बसलो. २००९च्या मार्च महिन्यात मोठ्या करकोच्याचा सिग्नल त्याच्या स्थलांतराच्या मार्गातूनच येत होता, पण छोट्या करकोच्याचा सिग्नल वेगळ्याच ठिकाणाहून येऊ लागला. आमच्या जीपीआरएस नकाशावर नीट पाहिलं, तर लक्षात आलं की, हा सिग्नल एका घरातून येत होता आणि हे घर काबुलच्या उत्तरेला ५० किमी अंतरावर होतं. आमचा कॉलरवाला करकोचा अफगाणिस्तानमधल्या शिकाऱ्यांच्या तावडीत सापडला होता!
ब्लॅक स्टॉर्क म्हणजे कृष्ण करकोचा
“अकोलेहून निघाल्यानंतर लातूर, नागपूर, होशिंगाबाद, नंदुरबारमार्गे नर्मदा नदी पार करून ते नांदूर माधमेश्वर, कल्याण, जायकवाडी, आग्रा, दिल्ली, जम्मू, पाकिस्तान असे मुक्काम करत अफगाणिस्तानमध्ये काबुलजवळ पोहोचले होते. पुढे त्यांना मध्य युरोपचा टप्पा गाठायचा होता, पण लहान करकोच्याचा प्रवास काबुलमध्येच संपला! मोठा काळा करकोचा मात्र त्याच्या विणीच्या अधिवासात पोहोचला. तसा सिग्नलही त्याने आम्हाला दिला, पण एक वयात आलेला, तरणाबांड पक्षी आम्ही अफगाणिस्तानातल्या शिकाऱ्यांमुळे गमावून बसलो...!”
अराजकाचा फटका
गिरीश जठार सांगतात, “पक्ष्यांच्या स्थलांतराच्या हंगामात त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक देशानं त्यांची काळजी घ्यायला हवी. यासाठीच बीएनएचएसने ‘सेंट्रल एशियन फ्लायवे’मध्ये येणाऱ्या सगळ्या देशांच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं. देशोदेशीचे पक्षीप्रेमी, पक्षीतज्ज्ञ यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला, पण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांतून एकही प्रतिनिधी येऊ शकला नाही.”
बीएनएचएसचे माजी संचालक डॉ. असद रहमानी यांच्या मते, “कोणताही देश युद्धग्रस्त स्थितीमध्ये असला, तर माणसांना त्याची झळ पोहोचतेच, पण सगळ्यात आधी याचा फटका तिथल्या निसर्ग जीवनाला बसतो. ‘सेंट्रल एशियन फ्लायवे’ने येणारे बहुतांश स्थलांतरित पक्षी अफगाणिस्तानच्या मार्गाने भारतात येतात. या मार्गात हिंदकुश, हिमालय, काराकोरम अशा उंचच उंच आणि विस्तीर्ण पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांमधल्या घळींमधून मार्ग काढत ते अफगाणिस्तान, पाकिस्तान इथं उतरतात खरे, पण तिथं त्यांच्या जिवंत राहण्याचीच खात्री नसते. त्यामुळेच भारतात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
या शिकारीला आळा घालण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान इथले पक्षीतज्ज्ञ काम करत आहेत, पण या देशातली अस्थिरता आणि अराजक असंच कायम राहिलं, तर त्यांच्याही प्रयत्नांना मर्यादा येणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये काबुलसारख्या मोठ्या शहरांत अजूनही खुलेआम पक्ष्यांचे बाजार भरतात. क्रौंच, माळढोक, गरुड यांसारखे मोठे पक्षीही इथं सर्रास विक्रीसाठी ठेवलेले असतात, तर छोट्या पक्ष्यांची काय कथा! अफगाणिस्तानमध्ये गरिबीचं प्रमाणही चिंताजनक आहे. असे लोक आपल्या गुजराणीसाठी पक्ष्यांची शिकार करतात. त्यामुळे ही शिकार थांबवायची असेल, तर अशा पारंपरिक शिकारी टोळ्यांना पर्यायी रोजगार देणं गरजेचं आहे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये याबद्दल जागृती करणंही आवश्यक आहे. शिवाय या पक्ष्यांच्या ठिकठिकाणच्या अधिवासांना जागतिक पातळीवर संरक्षण देण्याची गरज आहे.”
स्थलांतराच्या मार्गामध्ये एवढी आव्हानं असली, तरी पक्षी वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या ठरलेल्या त्यांच्या मार्गाने येतच राहणार आहेत आणि त्यांच्या प्रवासाची कोडी उलगडण्यासाठी पक्षीतज्ज्ञ झटतच राहणार आहेत, हाही विश्वास देशोदेशीच्या पक्षीतज्ज्ञांना आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ‘व्हाडला’ आली, तर तिचं हर्षभरानं स्वागत होईल, पण ती आली नाही, तरी तिच्यासारख्या हजारो क्रौंच पक्ष्यांनी गुजरातमधलं नळसरोवर भरून जाणार आहे आणि त्यातल्याच काही पक्ष्यांसोबत सुरेशकुमार आणि त्यांचे सहकारी त्यांच्या स्थलांतराची कोडी उलगडणार आहेत!
जावेद अख्तर एका गाण्यात म्हणतात ना, ‘पंछी, नदियाँ, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके...’ खरं आहे अगदी! देशांच्या, प्रांतांच्या सीमा, युद्धं, आणीबाणी, लॉकडाऊन हे सगळे शब्द आपल्यासाठी! पक्ष्यांना अशा कोणत्याच हद्दी माहीत नाहीत आणि म्हणून त्यांच्यामुळेच तर सगळं जग जोडलेलं राहणार आहे!
..................................................................................................................................................................
लेखिका आरती कुलकर्णी पर्यावरण-निसर्ग पत्रकार आहेत.
artikulkarni262020@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment