अजूनकाही
१. सीआयए या अमेरिकी गुप्तचर संघटनेच्या इस्लामाबादमधील एका माजी अधिकाऱ्याने पाकिस्तान हा जगासाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे, असा इशारा दिला आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेला दहशतवाद आणि अण्विक शस्त्रास्त्रे यामुळे पाकिस्तान हा जगासाठी धोकादायक ठरू शकते, असेही या माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पाकिस्तानची ही अवस्था करण्यात आपल्या थोर मायदेशाचा बराच हात आहे आणि आता तो हात झटकायची आणि पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या मौतीने मरू देण्याची वेळ आता आलेली आहे, हे मात्र तो सोयीस्करपणे सांगायचं विसरलेला दिसतोय.
………………………………………
२. गुजरातमध्ये माझा जन्म झाला असला तरी, उत्तर प्रदेशाने मला दत्तक घेतले आहे. हा दत्तक घेतलेला मुलगाच राज्याचा विकास करील. : नरेंद्र मोदी
जाईल तिथे काल्पनिक नाती जोडून खेटू पाहणाऱ्या माणसांकडे भारतीय समाजमन फारच संशयाने पाहतं, हे मोदींना माहिती नाही का? शिवाय या बोलघेवड्या पुत्राने आपल्या खऱ्याखुऱ्या मातृभूमीचा कसा निव्वळ फोटोशॉप विकास केलाय, ते या दत्तक भूमीला माहिती नसेल का?
………………………………………
३. जमात उद दावाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा ठपका भारताने ज्याच्यावर ठेवला आहे तो हाफिज सईद हा लोककल्याणकारी उपक्रम चालवणारा निष्पाप माणूस आहे. हाफिज सईद हा एक उत्तम गैरसरकारी संस्था चालवणारा इसम आहे. तो निर्दोष आहे. त्याला नजरकैदेत ठेवणे चुकीचे आहे. भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्याने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. तो समाजसेवा करणारी संस्था चालवतो. फलाह-ए-इंसानियत फाउंडेशन या संस्थेच्या अनेक रुग्णवाहिका आहेत. सईदची संस्था ही धर्मार्थ आहे. सईद हा स्वतः दहशतवादविरोधी आहे. तो कसा दहशतवादी असू शकतो. : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ
पाकिस्तानी सैन्य हे निव्वळ एक आध्यात्मिक भजनी मंडळ असून ते फक्त दुपारी आणि संध्याकाळी प्रार्थना म्हणण्यापुरतं एकत्र येणारं संघटन आहे. पाकिस्तानने अण्वस्त्रांची निर्मिती ही क्रिकेटची मॅच जिंकल्यावर आकाशात रोषणाई करण्यासाठीच करून ठेवली आहे. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिक शीरखुर्मा वाटायला घुसले होते, भारतीय सैन्याने गैरसमजातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या… हे अजून बोललेले नाहीत का ह.भ.प. मुशर्रफमियाँ???
………………………………………
४. कर्जबुडव्यांना अद्दल घडवण्यासाठी चीनच्या सुप्रिम कोर्टाने त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आदेश दिले आहेत. कर्ज बुडवणाऱ्यांना या आदेशानुसार विमान किंवा बुलेट ट्रेनने प्रवास करता येणार नाही. त्यांच्या मुलांना यापुढे खासगी शाळांत प्रवेश दिला जाणार नाही. कर्जबुडव्यांना काही काम करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या कर्जदारांचे पर्सनल आयडी नंबर ब्लॉक करण्यात आले असून हे लोक आता घर भाड्याने देखील घेऊ शकणार नाहीत.
अरे बापरे, आपल्या सुप्रीम कोर्टाने असला काही आदेश दिला तर विमानं, ट्रेन, शाळा आणि इमारती तर ओस पडतीलच; शिवाय अनेक कार्यालयांपासून सरकारांपर्यंत सर्व ठिकाणी माणसांची वानवा भासेल. कर्जबुडव्यांना रस्तेप्रवासाला बंदी घातली तर देशभरात शुकशुकाट पसरेल आणि आधीच रिकाम्या पडलेल्या पोलिस दलाला (त्यातलेही कर्जबुडवे हुसकावले जाणार ना?) फारसं काम उरणार नाही, हा एक त्यातल्या त्यात दिलासा.
………………………………………
५. रेल्वेतून लहान बाळांना बरोबर घेऊन प्रवास करणाऱ्या पालकांना आता बाळासाठी केवळ एका क्लिकवर गरम दूध उपलब्ध होणार आहे. रेलयात्री अॅप्लिकेशनच्या माध्यमातून न सांडणाऱ्या पॅकेट्समधून दूध उपलब्ध करून दिले जाणार आहे. तान्ह्या बाळांना घेऊन दूरचा प्रवास करणाऱ्या आईबापांना त्यांच्यासाठी आरोग्यदायी आणि गरम दूध मिळवताना फार अडचणी येतात. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ‘रेलयात्री.इन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मनीष राठी यांनी सांगितलं.
खरं तर या चांगल्या योजनेचं मनापासून स्वागतच केलं पाहिजे. पण, आपल्याकडे कागदावर अतिशय चांगल्या असलेल्या योजनांची अंमलबजावणीत काय माती होते, हे लक्षात घेतलं तर लहान बाळांऐवजी जादा पैसे मोजायला तयार असणाऱ्या निगरगट्ट प्रौढांच्याच घशात हे दूध जाण्याची शक्यता अधिक दिसते. शिवाय भेसळीमुळे बिचारी बाळं आजारी पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या तरी आश्चर्य वाटणार नाही.
………………………………………
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment