जगण्यासाठी असीम शांततेचा, विश्‍वासाचा, प्रगाढ श्रद्धेचा एक सूर लागावा लागतो, हे नर्मदामैय्याच्या अंगाखांद्यावरून खेळलो नसतो, तर कळलं नसतं!
पडघम - सांस्कृतिक
गजानन कापरे
  • लेखक गजानन कापरे पत्नी व बहिणीसह नर्मदा परिक्रमेदरम्यान
  • Sat , 24 July 2021
  • पडघम सांस्कृतिक नर्मदा परिक्रमा

माझी बँकेतली नोकरी. दर तीन वर्षांनी व शेवटी शेवटी तर महिन्यानं बदल्या झालेल्या. ३९ वर्षांच्या नोकरीत भारतभरातील इतकी गावं हिंडलो… अगदी जपानपर्यंत गेलो… तरी कुटुंबाचा गोतावळा गोळा करून कुठंतरी फिरून येण्याचा उत्साह कधीच घटला नाही.

खूप जणांकडून नर्मदा परिक्रमेविषयी ऐकत होतो. त्यातून उत्सुकता निर्माण झाली. त्यातून ‘नर्मदा पुराण’ वाचून काढलं. जून २०१९पासून परिक्रमा करून आलेल्यांचे अनुभव आणि त्यांनी सांगितलेले प्रवासातले तपशील, यामुळे इच्छेला धुमारे फुटायला लागले. अखेर १३ डिसेंबर २०१९ रोजी पत्नी रोहिणी आणि बहीण सौ.साधना यांच्यासह परिक्रमेला सुरुवात केली.

सुमारे ३००० किलोमीटरच्या पायी प्रवासात, जगण्याचा आम्हा तिघांच्या गाठी जो काही तोकडा पूर्वानुभव होता, तो पाहता, ‘जे’ मिळालं त्याची कधी कल्पना आम्ही केली नव्हती. जगण्यासाठी अशा वेगळ्याच असीम शांततेचा, विश्‍वासाचा, प्रगाढ श्रद्धेचा एक सूर लागावा लागतो, हे नर्मदामैय्याच्या अंगाखांद्यावरून खेळलो नसतो, तर कळलं नसतं! बरेच अनुभव शब्दातीत असतात, ते फक्त आत जाणवतात! हे मैय्याचं ‘देणं’ समजून घेण्यासाठी प्रत्येकानं आपापला अनुभव घ्यावा, हे उत्तम!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पायी प्रवासाचा अनुभव आम्हा कुणालाच नव्हता. तिघांनीही साठी ओलांडलेली. हे धाडसच होतं. एरवी आपण प्रवासाचं केवढं नियोजन करतो. राहणं, खाणं, इप्सित ठिकाणी काय करायचं, याची सगळी आखणी तयार असते. मात्र नर्मदा परिक्रमेला निघताना मार्ग कसा घ्यावा, राहण्या-खाण्याची व्यवस्था काय, कुठल्या अडचणी येऊ शकतात, पैशांची व्यवस्था कशी लावायची, सामानसुमान काय हवं, अशा असंख्य गोष्टींबद्दल कसलीच माहिती घेतली नव्हती. कदाचित मैय्याची तशी इच्छा असावी.

आज वाटतं, सगळ्या खडतरतेचा विचार करत राहिलो असतो, तर घरीच बसलो असतो किंवा निर्धोक नियोजनबद्ध प्रवास करत राहिलो असतो! जाण्यासाठीचं साहसच करू शकलो नसतो. तिच्यावर दृढ विश्‍वास ठेवला. तो डळमळला असता, तर कदाचित निम्म्या वाटेतून परतलो असतो. विश्‍वास नि श्रद्धेचं हे ‘देणं’ दुसरं कोण देऊ शकलं असतं?

संकल्प करण्याची व तो निभावण्याची शक्ती अनेकदा जगताना बोथट होते. ते कर्तव्यासारखं घडून जातं. संकल्प हा परिक्रमेचा महत्त्वाचा भाग. ती कशी व्हावी, आपण ती का करतो आहोत, हे सगळं सुरुवात करताना मैय्याला सांगणं खूप आवश्यक. आमच्या संकल्पात आम्ही विनाकष्ट, आनंददायी, कुठल्याही कठोर परीक्षेशिवाय परिक्रमा पूर्ण व्हावी, अशी मागणी केली आणि शांतपणे चालणं सुरू ठेवलं. मैय्याने आमची परिक्रमा सहा महिन्यांत पूर्ण करवून घेतली.

परिक्रमेदरम्यान तुमची वृत्ती, वागणं, राहणं, दिसणं हे सगळंच रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळं असतं. तुमचे आग्रह गळून जातात. वानप्रस्थात अपेक्षित असणारी वृत्ती आपोआप तुमच्यामध्ये निर्माण होते. सकाळच्या थंड पाण्याच्या स्नानापासून संध्याकाळी विश्रांतीसाठी मिळालेल्या आडोशापर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्हाला आनंद देतात. पंचपक्वानांनी तुमची इंद्रियं जशी सुखावतात, त्याच तोडीचं सुख साध्या खिचडीच्या प्रसादानं मिळतं. वेगळ्या, नियोजित नसणार्‍या, तरी बिनबोभाट चालणार्‍या जीवनशैलीमुळे मनाला इतका शांतपणा येतो की, मनापासून स्वागत करणार्‍या मैय्याच्या भक्तांच्या अनुभवानं तुम्ही जसे स्थिर राहता, तसे खेकसणार्‍या भगव्या कपड्यातील तथाकथित साधू किंवा लांबूनच हात हलवत तुम्हाला हाकलणारे सामान्य नागरिक, या अनुभवांनीही तुमच्या मनात विषाद उत्पन्न होत नाही. स्थिरच वाटतं.

लेखक गजानन कापरे पत्नीसह नर्मदा परिक्रमेदरम्यान

कुठंतरी अडतंय असं वाटल्यावर ‘नर्मदे हर’चा पुकारा केला की, भर जंगलातही मार्गदर्शनासाठी अकस्मात येणारे माणसाच्या रूपातील मैयाचे दूत किंवा कुत्र्यासारखे प्राणी, भारद्वाजासारखे पक्षी उपस्थित होतात. काहीतरी संकेत मिळाल्यासारखं वाटतं. असं वाटायला लागतं, कुठलाही प्रश्‍न उपस्थित होवो, ती मैय्या निर्मित योजना आहे, पण त्याच्या पार तुम्हाला नेणं हीही योजना सोबत असते. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’चा अनुभव परिक्रमेत हमखास मिळतो. त्यासाठी प्रचंड मोठी उपासना करण्याची जरुरी नाही, हे अनुष्ठान तुम्हाला सहज सापडून जातं.

परमेश्‍वराची शक्ती पंचमहाभूतांच्या रूपानं आपल्या भवताली असते आणि तिचा आपण पदोपदी अनुभवही घेत असतो. आपलं शरीरही त्याचं एक रूप. अग्नी, वरुण, पृथ्वी, वायू, सूर्य अशा पंचमहाभूतांकडून आपल्या जीवनात जे वरदान लाभलेलं आहे, त्याप्रती आपण किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो? - नव्हे, रोजच्या धबडग्यात या ऋणाची आपल्याला जाणीव तरी उरते काय? परिक्रमा या ‘लेण्या’ची जाणीव आपल्याला करून देते. या सगळ्यांसहित आपण आहोत, ही समरसता साधण्यानं जगण्याच्या दर्जात किती फरक पडतो, हे आपल्याला तेव्हा कळतं. निसर्गाच्या या अपार स्पर्शाची अनुभूती मैय्या देते.

डोंगरदर्‍या, घनदाट जंगले, खळाळणारे पाण्याचे प्रवाह, गुढघ्यापर्यंत भरेल इतका चिखल, पायाला टोचणारे-जखमा करणारे अणकुचीदार दगड, वार्‍यावर डोलणारी गव्हाची शेतं, केळी, पपयांनी लगडलेल्या बागा, राजगिर्‍याची मोहक शेतं, हे सगळं परिक्रमेत तुमच्या जगण्याचा भाग बनतं. ४५ अंश सेल्सियस डिग्रीच्या रणरणत्या उन्हात चालताना वायुदेवांना साद घालणं, अमरकंटकच्या नियमित पडणार्‍या वादळी पावसात वरुणदेवतेला प्रार्थना करून सुटका करून घेणं, हे त्यादरम्यान घडलं. निसर्गाच्या शक्तींशी संवाद साधण्याचा हा अनुभव विलक्षण वाटत राहिला.

सहा महिन्यांच्या परिक्रमेत निसर्गाचं अचानक बदललेलं रूप, अगदी शेवटच्या टप्प्यात देशभर करोनाचा झालेल्या उद्रेकामुळे परिक्रमेचा वेग कमी-जास्त झाला, पण ती खंडित झाली नाही. हा मला चमत्कार वाटतो! चूल पेटवताना अग्नी देवतेला स्मरल्यावर ती क्षणात प्रज्जवलित होते, हा अनुभव परिक्रमेशिवाय अन्य कुठे? सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रवासाशी, विश्‍वासाशी, त्या तालाशी एकरूपत्व आलं की, तुमच्या रोजच्या गरजा, सुरक्षितता या सगळ्याचे मापदंड बदलून जातात.

रोज काटेकोर सुरक्षिततेत, स्वत:च्या खोलीत विशिष्ट मापाच्या पलंगावर घातलेल्या मऊ गादीवर लोळणारे तुम्ही रस्त्याच्या कडेला कुठल्याही कठड्यावर, झाडाखाली गाढ झोपी जाता. कसलंही भय तुमच्या मनाला शिवत नाही. काहीही टोचत नाही. कधी कुठल्या हातपंपावरचं, कधी कुठल्या डोहातलं, कधी नदीतलं, असं दर कोसावर बदलणारं पाणी कितीही जड असलं तरी सहज पचतं. बिनतेलाचा, शिजवलेला कुठलाही पदार्थ मैय्याच्या प्रसादरूपानं जठराग्नी तृप्त करतो.

लेखक गजानन कापरे यांच्या पत्नी व भगिनी नर्मदा परिक्रमेदरम्यान

‘आजकालचं’ असं म्हणताना मला सतत ‘ज्येष्ठ’ भूमिकेत जाऊन नावं ठेवायची नाहीत, पण तरी आधुनिक जीवनानं तुमच्या मनावर, सवयींवर प्रभाव टाकलेला असतो. काही मर्यादांमुळे तुम्ही थोडे कोरडे आणि ‘कॅल्क्युलेटेड’ झालेले असता. हा भाग आपल्यात आपल्याही नकळत येतो. त्यातून कुणाच्या घरात आपण पाहुणे म्हणून जातो किंवा आपल्याकडे कुणी येतात, त्या वेळी आपलं आचरण ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीच्या गुणांबरहुकूम असतं काय? याचा विचार नि अनुभव परिक्रमेतील व परिक्रमेपश्‍चातच्या जगण्याला एक नवी दिशा देऊन जातात.

मैय्याच्या किनार्‍यावर वसलेले लोक मात्र संस्कृतीनं दिलेल्या या गुणावर दृढ श्रद्धा ठेवून त्याचं प्रेमानं आचरण करतात. आपल्या ताटातील भाकरी दाराशी आलेल्या अतिथींसोबत वाटून खाण्याचं सुख त्यांनी मुळीच ढळू दिलेलं नाही. ओमवती साहू, गार्सिया भगत, लमूसिंग, सभारसिंग, रामेश्‍वरसिंग असे सामान्य झोपडीत राहणारे महात्मे किंवा जयस्वाल, चोक्सी पटेलसारखी सधन कुटुंबं परिक्रमा करणार्‍यांचा आदर सत्कार करून मैय्याच्या दूताची भूमिका निभावत राहतात. ज्योतीबेन पटेल, चितळे मैय्या यांचे परिक्रमेदरम्यान भेटणारे आश्रम सेवाव्रतीच. काठोकाठ समाधान हीच त्यांची अपेक्षा. पैसा हा विषयच तिथं नाही. काहींच्या चार-चार पिढ्या या कामात समरसून गेलेल्या. औदार्य म्हणजे काय, सेवाधर्म कसा आचरायचा, याचं यथार्थ ज्ञान परिक्रमेत मिळतं.

परिक्रमेत खूप तर्‍हेची माणसं भेटत राहतात. यात स्वाभाविक आकर्षण वाटतं, मैय्याच्या किनार्‍यावर राहणार्‍या सेवाधारी व्रतस्थांचं. शंभरी ओलांडलेले सियारामबाबा, ‘खिडकीवाले बाबा’ म्हणून ओळखले जाणारे तेज:पूंज पूर्णानंद महाराज, महामंडलेश्‍वर अभिराम महाराज, जगदिशा मठाचे जगदीश महाराज, मौनीबाबा, शशीबेन, चितळेबाबा, अशा कितीतरी विभूतीसमान माणसांना पाहण्याचं भाग्य परिक्रमेत लाभतं.

स्वामी चिन्मय आणि नर्मदेश्‍वर महाराजांसारखे तंत्रसाधना करणारे महात्मे हा एक वेगळा अनुभव. बलरामसिंग ठाकूर, अमरकंटकचे द्विवेदीजी, शंकरमहाराज व बम भोले बाबा, राजीव जयस्वाल, तेलवाले पंजाबी बाबा, अशी किती नावं सेवेच्या आनंदनिधानात डुंबून गेलेली. शिवाय पुण्याचे नाईक किंवा कोल्हापूरचे पेंडसे, अशी मंडळी सातत्यानं परिक्रमेत राहिलेली परिक्रमाप्रेमी माणसं; ती तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभतात... परिक्रमेच्या निमित्तानं असा वेगळाच गोतावळा तयार होत जातो. मैय्याच्या परिवारात तुम्ही कधी गुंगून जाता कळतदेखील नाही.

आपल्याला जगण्यासाठी खरंच किती गोष्टींची आवश्यकता असते आणि आपण त्यापायी केवढा पसारा मांडतो, याचा विचार परिक्रमेत होतो. कळत जातं की, जीवनावश्यक गोष्टींची यादी खूप लहान आहे. दोन वेळा जेवण, निवार्‍यासाठी कुठलाही अडोसा, प्यायचं पाणी, अशा गोष्टींची पूर्तता झाली की, कुठलाही दिवस आनंदातच जातो. परिक्रमेहून परतल्यावर रोजचं जगणं एका वेगळ्या कोनातून बघण्याची सुरुवात होते. आपली इयत्ता कळून नव्याचा प्रयत्न सुरू होतो. हे ‘अध्यात्म’ गवसणं कठीण असतं.

लेखक गजानन कापरे पत्नी व बहिणीसह नर्मदा परिक्रमेदरम्यान

आणखी एक असाध्य वाटावी अशी गोष्ट परिक्रमा साध्याच्या पातळीवर आणते, ती म्हणजे मैय्याच्या अमूर्त अस्तित्वाची तुम्हाला चुणूक मिळत राहते. तिच्या शक्तीची जाणीव होत राहते. भाबड्या मनाला वाटणारा चमत्कार म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवादातून काही वेगळं नाव द्या, योगायोग संबोधा - अशा निराळ्या गोष्टी परिक्रमेदरम्यान सतत अनुभवास येतात.

शेवटी आपण साधं लौकिक जगणारी माणसं आहोत, मोहाचा कितीही त्याग केला तरी कुठल्या तरी पदार्थांची आठवण कधीतरी येते. परिक्रमेदरम्यान मुलीशी फोन झाला, तेव्हा अशाच एका पदार्थाबद्दल तिनं सांगितलं. म्हणाली, ‘तुमची आठवण होतेय खाताना.’ आम्हीही हसत तिला म्हणालो, ‘परत आलो की आमच्यासाठी हेच कर.’ आश्‍चर्य असं की, परिक्रमेदरम्यान एका छोट्या गावात, जिथं साधंसुधं अन्न मिळालं तरी मोठी गोष्ट, त्या ठिकाणी आम्हाला यजमानांनी नेमका तोच पदार्थ खिलवला.

जंगलात रस्ता चुकलो, तेव्हा रस्ता सांगणारा कुणीतरी अचानक उगवला. निर्मनुष्य ठिकाणी एखाद्या प्राण्यानं सोबत केली, तहानेनं व्याकूळ झाल्यावर अगदी ओसाड ठिकाणी पाण्याची सोय झाली! आपल्या विचारांवर, हालचालींवर कुणाचं तरी बारीक लक्ष आहे, मायेची छाया आहे, असं कळून तुम्ही अगदी नि:शंक निर्धास्त होऊन जाता. हा अनुभव कळत नसताना आपण आईच्या कुशीत घेतलेला असतो. वय वाढल्यावर तो अधिक कळू लागतो. मैय्या, हे करते. ती सतत असते. परिक्रमेच्या मार्गावर मैय्याची जागृत मातृशक्ती कळते. मुलाची इच्छा पूर्ण करणं हा आईचा स्थायीभाव. तो अनुभव येतो.

मैय्यानं माझी विश्‍वासाची, श्रद्धेची, चांगुलपणावरची खात्री वाढवली. पंचमहाभूतांच्या सहवासात स्वत:शी संवाद करायला शिकवलं. भेटणार्‍या प्रत्येक चांगल्या-वाईट माणसांतून सकारात्मकता वाढीस ठेवली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

थोर तत्त्वचिंतक हेन्री डेव्हिड थोरो वॉल्डनकाठी एकटा राहत असतो, तेव्हा तो निसर्गातल्या तत्त्वाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. परिक्रमा तसंच तर करते. कुठल्याही सामाजिक बंधनाशिवाय, हेव्यादाव्यापासून मुक्त स्वावलंबी जीवन शिकवते. कमीत कमी साधनांत व श्रमात सुंदर जगत उरलेल्या वेळेत भरपूर चिंतन-मनन, वाचन करत मनाच्या व मानवी समूहाच्या कल्याणाकडं कसं पाहता येईल, याचा मार्ग देते.

‘नर्मदे हर’चा गजर आजही उच्चार न करना कानावर ऐकू येतो आणि एक ऊर्जा संचारते. ती ऊर्जा माणूस म्हणून जगायला बळ पुरवते.

शब्दांकन : सोनाली नवांगुळ

..................................................................................................................................................................

गजानन कापरे

gajanan.kapre@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......