अजूनकाही
‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा’ हे रवि आमले लिखित आणि मनोविकास प्रकाशन प्रकाशित पुस्तक. त्याची अकरावी आवृत्ती मे २०२१मध्ये प्रकाशित झाली आहे. हे पुस्तक काही काल्पनिक हेरकथांचं नाही, तरीदेखील त्याने गेल्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत दहा आवृत्त्यांचा टप्पा ओलांडला. हे पुस्तक भारतीय गुप्तचर संस्थेची अस्सल कहाणी तर सांगतंच, पण त्या पलीकडे जात भारताच्या आजवरच्या जडणघडणीचे आणि देशाच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचं दर्शनही घडवतं. या पुस्तकाचे लेखक-पत्रकार रवि आमले यांच्याशी साधलेला हा संवाद...
..................................................................................................................................................................
‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाची अकरावी आवृत्ती आता बाजारात आली आहे. एकंदर हे पुस्तक ‘बेस्ट सेलर’ ठरले आहे. अलीकडच्या काळात ही एक मोठीच गोष्ट मानली पाहिजे. कारण कोविड महासाथीच्या काळात यातील दोन-तीन आवृत्त्या खपलेल्या आहेत. काय वाटतं या बद्दल?
रवि आमले : लेखक म्हणून छानच वाटतं. पण याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही. या पुस्तकाच्या विषयाबद्दल अनेकांच्या मनात अपार उत्सुकता होती आणि तिचं शमन व्हावं अशी साधनं फारशी उपलब्ध नव्हती. ते काम ‘रॉ’ने केलं. वाचकांनाही ते भावलं. त्यांच्यामुळेच तर ‘रॉ’ बेस्टसेलर झालं. शिवाय ‘मनोविकास’ची वितरणयंत्रणा. मराठी वाचक जिथं जिथं आहे, तिथं त्यांनी हे पुस्तक नेलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
या निमित्ताने एक बाब मात्र पुन्हा अधोरेखित झाली आहे. आमची पिढी, आमच्या पिढीतली बरीचशी लेखकमंडळी नेहमी रडत असतात की, लोक वाचत नाहीत. मराठी पत्रकार तर या रुदनउत्सवात अगदी आघाडीवर. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, लोक वाचतात. भरपूर वाचतात. फक्त त्यांना वाचण्यासाठी चांगलं काही मिळालं पाहिजे. लोक वाचत नाहीत असं जे म्हणतात, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच असतो की, लोक त्यांनी लिहिलेलं वाचत नसतात! मुळात असं आहे की, पूर्वी लोक फार वाचत असत आणि हल्ली वाचत नाहीत, असं काहीही नाही. हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘रॉ’च्या वाचकांमध्ये पाहा, फार मोठ्या प्रमाणावर तरुण मुलं आहेत. त्यातील अनेक जण स्पर्धा परीक्षा देणारे आहेत. ‘रॉ’ बेस्टसेलर करण्यात त्यांचा वाटा मोठा. मोठ्या प्रमाणावर मौखिक प्रसिद्धी केली त्यांनी ‘रॉ’ची. अनेकांनी फेसबुकवरून, ब्लॉगमधून ‘रॉ’चा पुस्तकपरिचय करून दिला.
याचं एक कारण मला असं वाटतं की, या पुस्तकातून त्यांना केवळ गुप्तचरांच्या थरारक कारवायाच नव्हे, तर त्यामागील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारणाचे धागेदोरेही दिसतात. इतिहासातील घटनांचे वेगळे पैलू दिसतात. हे त्यांना भावत असावं. त्यांच्या अभ्यासासाठीही ते उपयुक्त ठरत असावं.
एक खरं, की ‘रॉ’ या संस्थेबद्दल लोकांच्या मनात अपार उत्सुकता होती आणि अपार गैरसमजही. ते दूर होण्यास या पुस्तकाने नक्कीच मदत होईल. काय सांगाल?
रवि आमले : माहितीचा एक नियम आहे- तुम्ही माहिती लपवली की, अपमाहिती पसरते. खरं दडवलं की, खोटं पसरतं. ‘रॉ’बाबत हेच घडलेलं आहे. या संस्थेचा, तिच्या मोहिमा, कारवाया यांचा अधिकृत इतिहास आजवर लोकांपर्यंत आलेलाच नाही. ‘रॉ’चा १९८४-८५ पर्यंतचा अधिकृत इतिहास लिहिला गेलेला आहे. पण तो बाहेरच आलेला नाही. याचा परिणाम गैरसमज पसरण्यात होणारच.
हे गैरसमज दोन प्रकारचे होते. आपल्याकडं आणीबाणीचा कालखंड पाहिलेला एक वर्ग असा होता, की त्यांच्यादृष्टीने ‘रॉ’ म्हणजे ‘गेस्टापो’च. तेव्हाची खासकरून समाजवादी आणि काही प्रमाणात हिंदुत्ववादी मंडळी - ज्यांनी नंतर जनता पक्ष स्थापन केला - त्यांचा ‘रॉ’कडे पाहण्याचा दृष्टीकोन फार विकृत होता. त्याचा परिणाम लोकांवर झालाच. दुसरीकडं आपल्याकडील काही लोकांना इस्त्रायलचं, मोसादचं फार कौतुक. त्यांना असं वाटतं की, आपली ‘रॉ’ म्हणजे अगदीच फालतू. या अशा गैरसमजामागे अर्थातच राजकीय-वैचारिक कारणं आहेत. त्याला कोण काय करणार?
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७
..................................................................................................................................................................
दुसऱ्या प्रकारचा गैरसमज आहे तो एकंदरच हेरसंस्थांविषयीचा. तो पसरवण्यात हातभार लावत आहेत आताचे डिजिटल प्लॅटफॉर्म. म्हणजे ते यू-ट्यूब चॅनेल आणि ब्लॉग आणि वेबपत्रिका यांवरचे तथाकथित पत्रकार. यांच्या ‘क्लिकबेट’ पत्रकारितेने ‘रॉ’विषयीच्या अर्धवट माहिती, अतिशयोक्ती, अपमाहिती यांचा सुळसुळाट केला. त्यात भर घालण्यास पुन्हा चित्रपट आहेतच. एकंदरच हेर म्हणजे जेम्स बॉण्ड असा समज हॉलिवुडने निर्माण केला आहे. तोच आपल्या बॉलिवुडने उचलून धरलेला आहे. परिणामी ‘एक था टायगर’ नामक तद्दन मसालापट एका ‘रॉ’ एजंटवर आधारलेला आहे, असा लोकभ्रम निर्माण झालेला आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. ‘रॉ’विषयीच्या या पुस्तकाने असे अनेक गैरसमज दूर होण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
तुम्ही आता म्हणालात, की ‘रॉ’चा अधिकृत इतिहास लिहिला गेलेला आहे. ही एक मोठीच गोष्ट आहे. हा इतिहास कोणी लिहिला? कुठं आहे तो?
रवि आमले : पाश्चात्य देशांमध्ये गुप्तचर संस्थांचा इतिहास नोंदवून ठेवण्याची पद्धत आहे. कीथ जेफ्री हे एमआय-सिक्स या ब्रिटिश गुप्तचरसंस्थेचे अधिकृत इतिहासकार आहेत. तो इतिहास सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहे. ‘रॉ’चे संस्थापक रामनाथ काव हेही हे दस्तावेजीकरणाचे - डॉक्युमेन्टेशनचे महत्त्व जाणून होते. त्यांनी ‘रॉ’चा इतिहास लिहिण्याची जबाबदारी निवृत्त कर्नल व्ही. लोंगर यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या चमूने साधारणतः १९८४-८५पर्यंतच्या ‘रॉ’च्या कारवायांचे दस्तावेजीकरण केलेले आहे. त्या फायली सीलबंद करून काव यांच्याकडे सोपवण्यात आल्या होत्या. त्या वेळी असा निर्णय घेण्यात आला, की, त्या फायली ‘रॉ’च्या चीफ स्टाफ ऑफिसर यांच्या ताब्यात राहतील. तेव्हापासून त्या फायली तिजोरीबंदच आहेत. तो इतिहास लोकांसमोर यावा, अशी मागणी मध्यंतरी ‘रॉ’चे चीफ स्टाफ ऑफिसर राहिलेले ज्येष्ठ अधिकारी व्ही. बालचंद्रन यांच्यासारख्यांनी केली होती. पण तसे काहीही झालेले नाही. आता तर असं सांगण्यात येतं की, त्या फायलीच ‘रॉ’मधून गहाळ झाल्या आहेत. हे खरं की खोटं माहीत नाही, पण ही आपली इतिहासाबाबतची आस्था.
आता हा इतिहास कशाला फोडायचा, ते देशहिताचं ठरणार नाही, असं म्हणणारी काही निरागस माणसं आपल्याकडं आहेत. पण किमान काही वर्षांनी गुप्तचर संस्थांच्या कारवाया बाहेर यायलाच हव्यात. लोक सार्वभौम असतात, हे त्या राज्यव्यवस्थेत गृहितच असते. याला अपवाद अर्थातच देशहितास बाधक वा अतिसंवेदनशील माहितीचा. पण ते तारतम्य तर ठेवले जातेच. ‘रॉ’चा हा अधिकृत इतिहास प्रसिद्ध झाला तर ती मोठीच गोष्ट ठरेल. मोदी सरकारने सुभाषबाबूंविषयीच्या तथाकथित संवेदनशील फायली खुल्या केल्या. त्याचप्रमाणे या फायलीही खुल्या केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
एक वेगळा प्रश्न. तुमच्या पुस्तकातून इंदिरा गांधींचं फार कौतुक दिसतं, असा आक्षेप कानावर आला होता. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असावं की, हे गुप्तचर संस्थेबाबतचं पुस्तक आहे, तर त्यात राजकारण कशाला? तुम्ही याबाबत काय सांगाल?
रवि आमले : कौटिल्यांचं अर्थशास्त्र, सुन त्सू यांचं ‘आर्ट ऑफ वॉर’ यांत हेर हे राज्याचं प्रमुख अंग असल्याचं म्हटलेलं आहे. हेरांच्या कारवाया या काही पोकळीत चालत नसतात. त्या राजकारणाचाच एक भाग असतात. तेव्हा राजकारणाची पार्श्वभूमी नसेल, तर त्यांच्या कथा केवळ फिल्मी थरारकथा ठरतील, अर्धवट राहतील.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
राहता राहिला इंदिरा गांधी यांचा प्रश्न. यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ‘रॉ’ ही इंदिरा गांधी यांची निर्मिती आहे. हा इतिहास काही बदलता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी की, ‘रॉ’च्या सनदेनुसार ही संस्था येते कॅबिनेट सचिवालयाच्या अंतर्गत आणि ती उत्तरदायी असते पंतप्रधानांना. तेव्हा इंदिरा गांधी यांना टाळून ‘रॉ’बद्दल लिहिताच येणार नाही. त्यांचं कौतुक कुणास खटकत असेल, तर त्यांना हे सांगावं लागेल की, इंदिरा गांधी यांच्या कणखर आणि नीडर नेतृत्वाचा ‘रॉ’च्या यशात मोठा हात आहे. जेव्हा जेव्हा नेतृत्वाने कच खाल्लेली आहे, तेव्हा तेव्हा ‘रॉ’ला हाताची घडी घालून बसावं लागलेलं आहे. हे सारं नाकारायचं असेल, तर मग इतिहासाचं पुनर्लेखन करून ‘फेक-कथा’च रचाव्या लागतील.
यापुढे काय? म्हणजे नवे लेखन वगैरे?
रवि आमले : ‘रॉ’ या पुस्तकाचा दुसरा भाग लिहिण्याचा संकल्प आहे. या पुस्तकात ‘रॉ’च्या विविध महत्त्वाच्या मोहिमा आणि कारवायांबद्दलची माहिती येते. मात्र भारतातील हेरगिरीचा इतिहास म्हणजे केवळ तेवढाच नाही. एक मोठा व्यापक पट आहे त्याचा. तेव्हा तो मांडावा आणि त्यातून भारतातील हेरगिरीचं, आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेलं एक मोठं विश्व वाचकांसमोर आणावं असा प्रयत्न आहे. लवकरच हेही पुस्तक मनोविकासतर्फे प्रकाशित होईल. याच बरोबर अमेरिकेतील मॅकार्थीझमच्या काळ्या इतिहासावरील पुस्तकही मनोविकासमार्फतच येत आहे. अतिशय रोचक आणि तितकाच गंभीर असा तो विषय आहे. भारतातील सद्यराजकीय स्थितीशी बराचसा मेळ खाणारा असल्याने वाचकांना तो नक्कीच पसंत पडेल, असा विश्वास वाटतो.
(‘मनोविकास वर्ड्स’च्या जुलै २०२१च्या अंकातून साभार)
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा -
‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक
..................................................................................................................................................................
‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment