लोकांना जवळ आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया’ने आपल्यातील नकारात्मक भावनाच चेतवल्या व वाढवल्या आहेत...
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 21 July 2021
  • पडघम तंत्रनामा सोशल मीडिया Social Media फेसबुक Facebook गुगल Google ट्विटर Twitter व्हॉटसअ‍ॅप Whatsapp द्वेष Hate प्रेम Love सोशल मीडिया Social Media

“We must choose each day, each moment, whether we will give in to “our demons” or rise above them.”  - Supreme Sorcerer, Doctor Strange

“Do not pity the dead, Harry. Pity the living, and, above all those who live without love.” ― J.K. Rowling, Harry Potter and the Deathly Hallows.

“Darkness cannot drive out darkness; only light can do that. Hate cannot drive out hate; only love can do that.”  - Martin Luther King, Jr. (इथे ‘प्रेम’ म्हणजे ‘लाल/निळं/पांढरं/काळं हृदय’ असा अर्थ कृपया काढू नये)

‘हॅरी पॉटर’ या सिनेमात लॉर्ड वोल्डमोर्ट हा खलनायक एका भावनेसोबत वावरताना दिसतो. ती भावना म्हणजे द्वेष. ही भावना सूडातून जन्म घेते. बहुतेक सगळ्या कथा, कादंबर्‍या, नाटके व सिनेमा यांमध्ये बदला घेणे, हिशोब चुकता करणे, यासाठी द्वेषाने पेटलेले एक पात्र ‘आपल्या प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व कसे संपवता येईल’ यासाठी उर फुटेस्तोवर प्रयत्न करत असते. पूर्वी ‘द्वेष’ ही भावना साहित्यातून व माध्यमांतून अधिक व्यक्त होत असे, पण गेल्या काही वर्षांत या भावनेने बहुतेकांच्या मेंदूचा ताबा घेतला आहे.

आनंद, दुःख, भीती, घृणा, राग आणि आश्चर्य या सहा मूलभूत मानवी भावनांच्या वेगवेगळ्या मिश्रणांतून आणि वेगवेगळ्या तीव्रतेतून अनेक भावना निर्माण होतात. ‘राग’ ही भावना साध्या कुरबुरीपासून सुडापर्यंत अनेक रूपे धारण करते. एखादी गोष्ट आवडत नाही, एखाद्याचे मत पटत नाही, इथपासून त्या गोष्टीचे वा त्या व्यक्तीचे अस्तित्व राहू नये, इथवर होणारा प्रवास वास्तविक अजिबात सोपा नाही, पण गेल्या काही वर्षांत अनेकांनी तो प्रवास खूप लवकर पूर्ण केला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दिवसभरात आपण एखाद्या जातीला, धर्माला किंवा राजकीय पक्षाला वा नेत्याला किती दूषणे देतो, याचा विचार करा. ‘आपल्या विचारांची दिशा एखाद्याला टार्गेट तर करत नाही ना’, हा प्रश्न स्वत:ला विचारून पहा. त्याचे उत्तर जर ‘हो’ असेल, तर ‘द्वेष’ या भावनेने तुमच्या मेंदूत बस्तान बसवले आहे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे.

हे सर्व कस घडले? त्यासाठी ‘द्वेष’ ही भावना समजून घेणे गरजेचे आहे.

एखादी व्यक्ती आवडत नसेल, तर तिच्यापासून दूर गेल्याने किंवा तिचे विचार मनातून काढल्याने ती भावना त्रास देत नाही. याउलट द्वेष केल्या गेलेल्या व्यक्तीचे प्रत्येक पाऊल कसे पडतेय आणि ते रोखायचे कसे, हाच एकमेव विचार द्वेषी व्यक्ती/समूह करतात. लहान मुलांना द्वेष शिकवणे हेसुद्धा मानसशास्त्रज्ञांच्या मते त्या व्यक्तीच्या मानसिक अस्वच्छतेचे लक्षण आहे. आपली संस्कृती चांगली दाखवण्यासाठी दुसर्‍याला वाईट ठरवणाऱ्या द्वेषातूर व्यक्ती व समूह हे त्यांच्या अंतर्मनातील अनेक द्वंद्वे जगापुढे उघडी करत असतात.

कार्ल युंग (Carl Jung) या मानसशास्त्रज्ञाच्या एका संकल्पनेनुसार प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात ‘shadow’ असते, ती आपल्या मनात दबलेले विचार, भावना यांचे घर असते (सिग्मंड फ्राईडच्या मतानुसार ‘सुप्त मन’). या ‘shadow’मध्ये आपल्यातील द्वेषाची पाळेमुळे सापडतात. त्यामध्ये फक्त वाईट गोष्टीच असतील असे नाही, तर एखादी कला, अचाट गणिती संकल्पना, न अनुभवलेल्या भावना, न पूर्ण झालेल्या इच्छा वा असा कोणताही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग जो आपण नाकारलेला असतो किंवा जगाच्या स्वीकृतीसाठी नाकारलेला जातो, अशा गोष्टींचाही त्यात समावेश असतो.

थेरपिस्ट आणि लेखक जॉन ब्रॅडशॉ (John Bradshaw) यांच्या मते ‘चीड’ ही सगळ्यात मोठी म्हणजे प्रेम व रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी ओढ आहे. चीड व द्वेष असणारी व्यक्ती/समूह हे ज्या व्यक्तीचा/समूहाचा द्वेष करतात, त्यांच्या रंगात नाहून निघालेले असतात. पण त्यांना हे कळत नाही की, ज्याचा द्वेष ते करतात, त्यातून त्यांच्याच ‘shadow’चा काही भाग ते जगत असतात. या भावनिक ओकाऱ्या द्वेषी व्यक्तीला कमालीचं सुख देतात.

जे आपल्याला करायची इच्छा आहे, जसे आपण दिसण्याचा प्रयत्न करतो, ते जर दुसरे कुणी करत असेल तर द्वेषातूर व्यक्तीच्या मनातील कळत-नकळत दबलेल्या ऊर्मी द्वेषाच्या रूपात वर येतात. मी स्वत: अनेक वेळा द्वेषाची शिकार झाली आहे. रक्ताची नाती, मित्र-मैत्रिणी किंवा अगदी ऑफिसातील सहकारी यांच्याकडून टार्गेट झाल्यावर कसे वाटते, हे मी अनुभवलेले आहे. त्यामुळे द्वेष करणारे लोक स्वत:चा शोध घेण्याऐवजी आपल्या टार्गेटवर लक्ष ठेवून स्वत:ची प्रगती कशी खुंटवून घेतात, याचा अनुभव घेतला आहे.

आई-वडिलाचे आंतरजातीय लग्न असल्याने मी जन्मल्यापासून समाजाचा द्वेष अनुभवला आहे. मा‍झ्यासारखे मूल समाजाच्या रूढींवर प्रश्नचिन्ह उभे करते, म्हणून ते नकोसे असते. लहानपणी दहावीत ८० टक्क्यांच्या वर गुण मिळाल्याने काही नाती बिघडली, ती कायमचीच. ती बिघडवण्यात त्यांच्या आई-वडिलांचाही तितकाच वाटा होता.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७

..................................................................................................................................................................

एखादी व्यक्ती जेव्हा इतरांचा द्वेष करते, तेव्हा स्वत:च्या मनातील काही भावनांचे Projection करत असते. म्हणजे मा‍झ्यात जे नाही किंवा असावे, ते दुसर्‍या व्यक्तीत असल्याने माझ्यातील कमीपणाची भावना म्हणून मी त्या व्यक्ती/समूहाचा द्वेष project करते. लेखिका जे. के. रोलिंग यांनी ‘हॅरी पॉटर’मध्ये Projection हे defense mechanism असते, हे खूप परिणामकारक पद्धतीने समजावून सांगितले आहे.

‘हॅरी पॉटर’मधील खलनायक लॉर्ड वोल्डमोर्ट ‘half-blood’ असतो. त्याची आई जादूगार असते, तर वडील सर्वसाधारण व्यक्ती असतात. जादूगार आईच्या मृत्यूसाठी जादू येत नसलेल्या वडिलांना जबाबदार ठरवत लॉर्ड वोल्डमोर्ट ‘pure-blood’ होण्याचा अट्टाहास करतो आणि सामान्य आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या पण जादूची विद्या अवगत असलेल्या मुलांचा टोकाचा द्वेष करतो. ती नष्ट करण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहतो.

लोकांना जवळ आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया’ने आपल्यातील नकारात्मक भावना चेतवल्या व वाढवल्या आहेत. माझे आयुष्य व त्यातील नाती ‘सोशल मीडिया’च्या आधी व नंतर कमालीची बदलली आहेत. मा‍झ्यासारखेच अनुभव इतरही अनेकांचे आहेत. द्वेष ही भावना एकटी नसून त्यात असूया, मत्सर, ईर्ष्या, चीड अशा भावनांचे मिश्रण येते. त्यातून द्वेषाचा जोर वाढतो.

‘projection’ या सिग्मंड फ्राईडच्या संकल्पनेनुसार आपल्याला आपल्याविषयी जे आवडत नाही, ते आपण नाकारत असतो. द्वेष ही भावना हावी झाली की, सहसंवेदना व करुणा या भावना दबून जातात. त्यामुळे ज्या व्यक्तीला आपले मत पटत नाही, ती व्यक्ती आपली शत्रू आहे, तिचा-तिच्या विचारांचा नाश करायला हवा, अशा मताला द्वेषातूर व्यक्ती/समूह येतात. आणि हेच सध्या भारतात व जगात काही ठिकाणी दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते द्वेष शिकवला जातो, तो आपोपाप येत नाही. कोणत्याही धर्माच्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘brainwashing’ हाच प्रकार प्रमुख असल्याचे दिसते. तिथे लहान मुले आणि तरुणांच्या मेंदूत द्वेष भरवला जातो. ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेचे लोक सिरिया या देशात लहान मुलांना बंदूक, रणगाडे व गोळ्या यांचं प्रशिक्षण देतात. ‘brainwashing’ केल्या गेलेल्या मुलांचे व तरुणांचे मेंदू ‘cult’ म्हणजे पंथ जो विचार करेल तोच विचार करतात. थोडक्यात, ते पंथाच्या प्रोग्रामवर चालणारे ‘यंत्रमानव’ बनतात.‘Blood Diamond’ या इंग्रजी चित्रपटात हे फार प्रभावीपणे दाखवले आहे. हा ‘brainwashing’चा प्रकार ‘सोशल मीडिया’ गेली काही वर्षं भारतात अधिकृतरीत्या करत आहे.

ट्रोलर करणारे व ट्रोल होणारे या दोन्ही गटांना द्वेष ही भावना जोडते.

सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने अनुयायी असणारी मंडळी इतक्या किळसवाण्या पद्धतीने ट्रोल करतात की, मोठ्या पदावर काम करणारे, अत्यंत चांगली कलानिर्मिती करणारे हेच का ते, असा प्रश्न पडतो. गेल्या दोन वर्षांत ट्रॉलिंगने विकृतीचा कळस गाठला आहे. २०१४च्या आधी निवडणूक जिंकण्यासाठी सुरू झालेले हे अस्त्र आता ‘ब्रह्मास्त्र’ बनले आहे. त्याने भारताची मन:शांती, सामाजिक सलोखा, सौहार्द, सहिष्णूता, उदारता उदध्वस्त केली आहे. हे द्वेषाचे लोण इतके पसरले आहे की, आपल्यासारखी न दिसणारी व बोलणारी व्यक्ती शत्रू, ही संकल्पना साधारण भारतीयांमध्ये रुजली आहे.

लग्न, प्रेम हेसुद्धा राजकीय मत जुळवूनच लोक करत असावेत असे जाणवते. कारण ‘एकसारखे’ असणे फार गरजेचे झालेय. ‘शांततापूर्ण सहजीवन’ (Peaceful co-existence) हा प्रकार कालबाह्य झाला आहे. स्त्री-पुरुष एकमेकांना ‘पूरक’ होण्यापेक्षा एकमेकांना ‘सारखे’ होण्याचा प्रयत्न करून नाती एकतर नीट जोडू शकत नाहीयेत किंवा जोडली तर टिकवू शकत नाहीयेत, हे प्रकर्षाने जाणवत आहे.

एखाद्या व्यक्तीशी आपला प्रत्यक्ष संबंध आला असेल, तिचा वाईट अनुभव आला असेल तर त्या व्यक्तीचा द्वेष करणे एक वेळ समजण्यासारखे आहे, पण सोशल मीडियावरील एखादी व्यक्ती कधीही तुम्हाला भेटलेली नाही, पण केवळ तुमच्या सामाजिक/वैचारिक मताची नाही, यावरून तिचा द्वेष करणे, हे मानसिकदृष्ट्या अयोग्य आहे.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर राजकीय विषयांवर व्यक्त होणारी तरुण मंडळी बघितली की, ‘Projection’ हे ‘defense mechanism’ म्हणून वापरले जातेय, याची खात्रीच पटायला लागते. म्हणजे घरात कुणी समजून घेत नाही, लक्ष देत नाही, ही सल सोशल मीडियावर एखाद्या पक्षाचा पुरस्कर्ता बनून दुसर्‍या पक्षाच्या व्यक्तीचा/समूहाचा द्वेष करत काढली जाते. यात १८ ते २८ या वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बहुतेक लोक सोशल मीडियावर आपली निष्ठा कुणाच्या बाजूला आहेत, हे ठासून सांगतात... बहुतेक थेटपणे व काही सूक्ष्मपणे करतात. राजकीय मत असावे, पण ते आपल्या मानवी मूल्यांवर वरचढ होत असेल तर तुमचे ‘brainwash’ झालेले आहे, हे नक्की.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सगळ्या प्रकारचे लढवय्ये होते. सगळेच आपल्या विचारधारेशी प्रामाणिक होते. विचार वेगळे असले तरी स्नेह ठेवणे आणि राजकीय/सामाजिक मताला सर्वस्व मानता नात्यांतली गोडी टिकवणे, त्यांना जमायचे. आता मात्र तो स्नेह इतिहासजमा होऊन ‘एकाच माळेचे मणी’ सोशल मीडियाच्या अल्गोरिदमने जोडले जातात आणि आभासी जगात ‘तुझ्या गळ्या मा‍झ्या गळ्या गुंफू मोत्यांच्या माळा’सारखी गाणी गातात…

२०१४पासून सोशल मीडियावर प्रत्येकाची राजकीय ओळख तयार झाली आहे. त्याला कारण अल्गोरिदमसुद्धा आहे. जो वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक मतांच्या लोकांना एकत्र आणण्याऐवजी दूर नेतो आहे. त्यातून संवाद वाढण्याऐवजी विसंवाद वाढतो आहे.

आपल्यामध्ये ‘काळे व पांढरे’ असे दोन्ही असते. नकारात्मक भावना या आपल्यातील काळा भाग दर्शवतात. आपण सगळेच त्याच्याशी संघर्ष करत जगत असतो. जेव्हा नकारात्मक भावना वरचढ ठरतात, त्या वेळी आपल्यातील काळी बाजू जिंकते.

भारतात जाती-धर्मावरून आधीही तिढे होतेच, मात्र आता त्यांनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. वेगवेगळे सूर जोडले की, सुरेल गाणे तयार होते. हे नात्यालासुद्धा लागू आहे. मा‍झ्या एका पूर्वीच्या कंपनीतले मॅनेजर महत्त्वाच्या लोकांची एक मानसशास्त्रीय चाचणी करून घ्यायचे. त्यात त्या व्यक्तीची सगळ्यात चांगली पाच बलस्थाने कळून यायची. त्याबद्दल मी एकदा त्यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले- ‘मला मा‍झ्यासारखे लोक नकोत. जे मला येत नाही, ते जर मा‍झ्या टीममधील इतर कुणाला येत असेल तर अंतिम विजय माझाच राहील.’

याच्या अगदी उलट चित्र सध्याच्या राजकारणात दिसते. खरे तर त्याला राजकारण म्हणणेच चूक आहे, कारण त्यातील नियम ‘गॅंगवॉर’ वा ‘गुन्हेगारी जगता’सारखेच झालेले आहेत.

असे म्हणतात की, प्रेम व द्वेष यातील सीमारेषा धूसर आहे, पण वैज्ञानिक शोधातून हे सिद्ध झाले आहे की, प्रेमात असलेली व्यक्ती विवेकी विचार करू शकत नाही. याउलट द्वेष हा थंड काळजाचा व हेतुपुरस्सर काम करणारा (cold and calculated) असतो. सेमीर झेकी (University College London, UK) आणि त्यांचे सहकारी जॉन रोमाय (John Romaya) यांनी केलेल्या एका प्रयोगात असे आढळून आले की, मानवी मेंदूत ‘hate circuit’ व ‘love circuit’ यांच्यात असे काही भाग आहेत, जे प्रेमात व द्वेषात वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. त्यांच्या निरीक्षणानुसार प्रेमात असलेली व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करते, त्यातील त्रुटी बघू शकत नाही; मात्र द्वेषात असलेली व्यक्ती अत्यंत हुशारीने दुसर्‍या व्यक्तीबद्दल सगळ्या गोष्टींचा विचार करते.

या टोकाच्या द्वेषाचे मूळ त्या व्यक्तीच्या बालपणात दडलेले असते. लहानपणी प्रेम न मिळणे, आई वडिलांकडून दुर्लक्ष होणे, शोषण होणे, अशा वाईट अनुभवांमुळे त्या व्यक्तीला आपल्याला न मिळालेल्या गोष्टी दुसर्‍याला मिळालेल्या बघवत नाहीत. त्यातून पुढचे भयंकर प्रकार घडतात. आपल्या आजूबाजूला हल्ली हे रोज बघायला मिळते.

ही द्वेषाची भावना सोशल मीडियावर एकमेकांना मिळणारे likes, followers व comments वरूनसुद्धा भडकते आणि चांगले मित्र-मैत्रिणीसुद्धा एकमेकांविषयी असूया बाळगत एकमेकांपासून दुरावतात. सोशल मीडियामुळे नाती दुरावत चालली आहेत. एकटेपणा वाढल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे ‘फार्मा उद्योगा’चा जोरदार फायदा होत आहे.

जाती, धर्म व भाषा यात आधीच विभागला गेलेला भारतीय समाज गेल्या दहा वर्षांत आणखीच तुटला आहे. तो परत जोडला जाणे ही नितांत गरजेची गोष्ट आहे. लहानपणी पुरेसे प्रेम, सुरक्षितता व काळजी न मिळालेली व्यक्ती स्वत:त कमीपणाची भावना घेऊन मोठी होते. ती भावना सतत त्रास देत असल्याने सोशल मीडिया (विशेषकरून फेसबुक व इंस्टाग्राम)वर पोस्ट टाकत like-followers मिळवले जातात. हा प्रकार ‘self-validation’साठी केला जातो.

मा‍झ्या माहितीतील एक व्यक्ती तर सतत प्रसिद्ध व्यक्तींसोबतची छायाचित्रे टाकत असते. प्रत्यक्ष तिच्याशी बोलल्यावर व काम केल्यावर लक्षात येते की, ‘रितेपण’ इतके आहे की, ते भरायला सोशल मीडियावर टाकलेली २००० छायाचित्रेसुद्धा कामी येत नाहीत. ही व्यक्ती लग्न झालेली असून चांगल्या पदावर काम करते. अशा व्यक्तीच्या स्वत:च्याच मानसिक गरजा पूर्ण झालेल्या नसतात, ती दुसर्‍याच्या मानसिक गरजा कशा पूर्ण करणार?

या सगळ्यातून एक लक्षात येते की, प्रेम करणे सोपे नाही. प्रेम म्हणजे फक्त प्रणय नाही. जोडीदार, आई-वडील, कुटुंब, नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी, शिक्षक, शेजारीपाजारी, ऑफिसमधले सहकारी, अशा सर्वांकडून मिळालेले प्रेम सुरक्षितता व शांती देते. पितृसत्ताक पद्धतीत प्रेम, जिव्हाळा, माया या कोमल भावनांना बहुतेक पुरुष नाकारतात. द्वेष, भांडण, मारामार्‍या, सत्ता, अहंकार या समाजमान्य गोष्टीत स्वत:ला शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.

प्रेमात अहंकार बाजूला ठेवून झुकावे लागते. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीची सेवा करावी लागते, त्याचे ऐकून घ्यावे लागते, आपल्या मनाविरुद्ध वागावे लागते, जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या चुका माफ कराव्या लागतात, वेळप्रसंगी माफीही मागावी लागते. समोरची व्यक्ती आपली असते, आपला एक भाग असते, म्हणून आनंदही दोघांचा असतो. व्यक्ती आनंदी असतील तर, तो समूहसुद्धा शांतता व प्रगती अनुभवतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

द्वेषाला विनाशर्त प्रेम हेच उत्तर आहे. द्वेष हे शरीरावर चुकीचा परिणाम करते. याउलट प्रेमात असणार्‍या व्यक्तीला ताण जाणवत नाही, ती जास्त आनंदी राहते. प्रेमात असणार्‍या व्यक्तींमध्ये डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन ही आनंदाची रसायने जास्त स्रवतात. त्यामुळे शरीर व मन आनंदी राहते. ज्या ज्या नात्यात प्रेमाचा व सुरक्षिततेचा अनुभव येतो, त्या त्या वेळी ही रसायने स्रवतात. मनाच्या बागेत तुम्ही द्वेषाची वेल लावता का, प्रेमाची रोपटी जपता, यावर तुमचे शारीरिक, भावनिक व सामाजिक आरोग्य अवलंबून आहे.

मुन्नाभाईच्या ‘जादूची झप्पी’ची सगळ्यांनाच गरज आहे, मात्र जास्त गरज ट्रोलर व ट्रोल होणाऱ्यांना आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......