गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसारमाध्यमांत झळकत असतात. त्या म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. अमेरिका ‘सुपरपॉवर’ असल्याने त्या देशाचे प्रमुख नेहमीच जगातल्या प्रसारमाध्यमांत झळकत राहणार, हे साहजिकच आहे. इंग्लंडच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसायचा तेव्हापासूनच या साम्राज्याची वारसदार असलेली आणि आता वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारी राणी एलिझाबेथ दुसरी ही सत्तर वर्षांपासून आपला मुकुट कायम राखून आहे. या दीर्घ कालखंडात शुभ्र हातमोजे घालून त्यांनी जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी, विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींशी हस्तांदोलन करण्याचा जो विक्रम केला आहे, तो इतर कुणीही राष्ट्रप्रमुख भविष्यात कधीही मोडू शकेल असे दिसत नाही.
पोप यांच्यासंबंधीच्याही बातम्या जगातील अनेक प्रमुख नियतकालिकांत आणि बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये आठवड्यातून निदान एकदा तरी झळकत असतात. त्याशिवाय नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर व इतर सणानिमित्त आणि त्यांच्या परदेशदौऱ्यानिमित्त पोप यांच्या कार्यक्रमांना आणि प्रवचनांना संपूर्ण जगभर व प्रादेशिक प्रसारमाध्यमांतही हमखास प्रसिद्धी मिळते. यातूनही पोपपदाचे जागतिक महत्त्व अधोरेखित होत असते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप यांच्याकडे खरे तर स्वतःचे सैन्य वा खास पोलीस यंत्रणाही नाही, तरी त्यांना संपूर्ण जगभर आदर आणि मान आहे. याचे कारण जगात सर्वाधिक संख्येने असलेल्या रोमन कॅथोलिक पंथाचे ते आचार्य आहेत. त्यामुळेच २७ वर्षे पोपपदावर असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांना राष्ट्रप्रमुख या नात्याने जगातील अनेक राष्ट्रांना भेटी देण्याचा, सर्वाधिक राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या देशांत किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये भेटण्याचा मान मिळाला. सध्याचे पोप फ्रान्सिस पोप जॉन पॉल दुसरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जुने अनेक संकेत आणि पुरातन भिंती मोडीत काढत विविध राष्ट्रांत जाऊन परधर्मियांच्या नेत्यांना भेटून सुसंवाद साधत आहेत.
पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, एका अर्थाने येशू ख्रिस्ताचे या भूतलावरील प्रतिनिधी. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांमध्ये एक असलेला सेंट पिटर किंवा संत पेत्र हा पहिला पोप. ख्रिस्ती धर्माच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २६० पोप होऊन गेले आहेत. रोममध्ये मी असताना सेंट पिटर्स बॅसिलिकामध्ये या सर्व पोपमहाशयांच्या नावांची, कालखंडांची यादीच संगमरवरी दगडावर कोरलेली पाहिली, तेव्हा पटकन त्या यादीचं छायाचित्र काढलं.
‘बायबल’मध्ये येशू ख्रिस्ताने पहिला पोप असलेल्या सेंट पिटरला स्वर्गाच्या चाव्या दिल्या, असा उल्लेख आहे. सेंट पिटरच्या कुठल्याही पुतळ्यात स्वर्गाच्या चाव्या असतातच. सेट पिटरचा पुतळा ओळखण्याची ती एक खूणच. व्हॅटिकन सिटीतल्या भव्य सेंट पिटर्स स्वेअरमध्ये सेंट पिटर आणि सेंट पॉल यांचे दोन भव्य पुतळे आहेत. त्यात सेंट पिटरच्या हातात स्वर्गाच्या या चाव्या आहेत, तर ख्रिस्ती धर्माला तत्त्वज्ञानाचा आणि धर्मसिद्धान्ताचा पाया उभारणाऱ्या सेंट पॉलच्या हातात ‘बायबल’ आहे.
पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना होण्याआधीच ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (पीएलओ)चे नेते यासर अराफत यांना या अस्तित्व नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून भारताने आणि इतर काही देशांनी मान्यता दिली होती. त्यांना राष्ट्रप्रमुख म्हणून शिष्टाचारानुसार वागवले जायचे. तीच गोष्ट तिबेटी बौद्धांचे नेते असलेल्या दलाई लामांची. राष्ट्रप्रमुख म्हणून पोप यांचे स्थान मात्र यासर अराफत किंवा दलाई लामा यांच्याहून आगळेवेगळे असे आहे.
खरे पाहिले तर व्हॅटिकन सिटी हे सार्वभौम राष्ट्र म्हणजे एक गंमतीची बाब आहे. तिथे सातशेआठशे नागरिकही असतात, ते म्हणजे तिथले राहणारे कार्डिनल आणि पोपमहाशयांच्या कार्यालयातील अधिकारीवर्ग. या राष्ट्राची चतुःसीमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याएवढीही नाही. तरीही मध्ययुगीन काळापासूनचा युरोपच्या इतिहासाचा परिपाक आणि पोपमहाशयांचे जागतिक स्तरावरचे धार्मिक, राजकीय आणि नैतिक पातळीवरचे स्थान लक्षात घेऊन बहुसंख्य राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र दलानेसुद्धा त्यांना राष्ट्रप्रमुखाचा दर्जा दिला आहे. याच नात्याने ते संयुक्त राष्ट्र दलाच्या सभेला संबोधित करत असतात. भारतानेही व्हॅटिकन सिटीला सार्वभौम राष्ट्र म्हणून आणि पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिली आहे.
लौकिकार्थाने भौगोलिक सीमा, लष्कर, नागरिकत्व, चलनी नोटा वा पासपोर्ट नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप हे सर्वार्थाने आगळेवेगळे राष्ट्रप्रमुख ठरतात. या राष्ट्राची संकल्पनाच केवळ प्रतीकात्मक असल्याने कुठल्याही राष्ट्रात जन्मलेली आणि कुठल्याही राष्ट्राचे नागरीकत्व असलेली व्यक्ती अगदी एका क्षणात म्हणजे पोपपदी निवड झाल्याक्षणी या व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख बनते. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भारतात २००४ साली सत्ता मिळवल्यावर कळीचा मुद्दा ठरलेला परकीय नागरिकत्वाचा विषय येथे अगदीच गैरलागू ठरतो. पोपपदावर आलेली व्यक्ती वैश्विक असते, त्यांचे अनुयायी संपूर्ण जगभर अगदी धर्मावर आणि कॅथोलिक पंथावर अधिकृत बंदी असलेल्या चीनसारख्या देशांतही असतात.
चर्चच्या कॅनन लॉनुसार जगभरातील बिशप वयाच्या ७५व्या वर्षी आणि कार्डिनल वयाच्या ८०व्या वर्षी निवृत्त होतात. नवीन पोपची निवड करण्याच्या प्रक्रियेत केवळ ८० वर्षे वयाखालील कार्डिनल सहभागी होतात आणि त्यांच्यापैकी कुणाचीही पोप म्हणून निवड होऊ शकते. अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ २००८ साली पोपपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी एक ब्रिफकेस घेऊन, विमानाचे परतीचे तिकिट घेऊन व्हॅटिकनला आले आणि त्यांचीच पोपपदी निवड झाल्याने आणि पोप फ्रान्सिस असे नाव घेतलेल्या त्यांनी गेली तेरा वर्षे आजपर्यंत मायदेशी पाऊलही ठेवलेले नाही.
पोप जॉन पॉल दुसरे यांच्या आधीचे पोप म्हणजे जॉन पॉल पहिले यांची कारकिर्द केवळ ३३ दिवसांची होती. पोप पॉल सहावे यांचे निधन झाल्यानंतर २६ ऑगस्ट १९७८ रोजी जॉन पॉल पहिले पोपपदावर आले. त्यानंतर एक महिन्याभरातच झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जगाला बसलेला धक्का मला आजही आठवतो. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक कमी काळ जॉन पॉल पहिले पोपपदावर होते.
सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य स्वीकारल्यानंतर अचानक बदल झाला आणि रोमन सम्राटानेच ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे रोमन साम्राज्याचा हा अधिकृत धर्म बनला. जेरुसलेम व इस्राएल या येशू ख्रिस्ताच्या कर्मभूमीपेक्षा रोमला अधिक महत्त्व आले. रोम शहर ख्रिस्ती धर्माचे प्रमुख पीठ आणि पवित्र भूमी बनले.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
रोमविषयी ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन ए सिंगल डे’ अशी एक म्हण आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १६०४ साली मराठीतील महाकाव्य ‘क्रिस्तपुराण’ गोव्यात रचणाऱ्या ब्रिटिश धर्मगुरू थॉमस स्टिफन्स यांनी या म्हणीचे ‘एके दिवशी रोमनगरी I उभविली नाही I’ असे मराठमोळे भाषांतर केले आहे!
गेले काही शतके ख्रिस्ती धर्माचे प्रमुख आचार्य म्हणून आणि विशेषतः मध्ययुगीन काळात पोप यांच्या हातात अमर्याद सत्ता होती. युरोपातील अनेक देशांतील राजसत्ता त्यांच्या ओजळीने पाणी पित होती, हे इतिहासातील अनेक घटनांवरून दिसते. मध्ययुगीन काळात तर पोप अलेक्झांडर सहावा याने तर वसाहतीसाठी नव्या जगाची पोर्तुगाल आणि स्पेन या दर्यावर्दी राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करून दिली होती! त्या काळातला चर्चचा आणि चर्चच्या पोपसारख्या धर्माधिकाऱ्यांचाही इतिहास फारसा अभिमानास्पद नाही.
आपल्या घटस्फोटास कॅथोलिक चर्च मान्यता देत नाही, असे पाहिल्यावर इंग्लंडच्या राजा आठवा हेन्रीने पोप आणि कॅथोलिक चर्चपासूनच घटस्फोट घेत सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले आणि इंग्लंडच्या राजास (किंवा राणीस) त्या चर्चचे प्रमुख म्हणजे एका अर्थाने पोपच बनवले. ही व्यवस्था आजतागायत चालू आहे. सर्व जगातील लोकशाहीप्रधान व्यवस्थेचे मूळ असलेल्या इंग्लंड हा देश धर्माधिष्ठित असून इंग्लंडची राणी (अथवा राजा) चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख आहे, हे अनेकांना ठाऊकही नसेल.
त्यानंतर जर्मनीत धर्मगुरू मार्टिन ल्युथर किंगने धार्मिक बंड केल्यानंतर विविध प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाले आणि पोपच्या अमर्याद सत्तेला अंकुश बसला. रेनॉयस्सन्सच्या काळात चर्च आणि धर्मसत्ता यांची फारकत होत गेली आणि पोप हे पद केवळ सन्माननीय पद राहिले, मात्र याच काळात नैतिक प्रश्नांवर म्हणजे अबॉर्शन, समलिंगी संबंध आणि लग्न, फाशीची सजा, युद्ध, मानवी हक्क, पर्यावरण वगैरे प्रश्नांवर देशसीमांच्या पलीकडे भूमिका घेणारी नैतिक सत्ता यादृष्टीने चर्च आणि पोप यांच्याकडे पहिले गेले आहे. युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत आजही कागदोपत्री बहुसंख्य ख्रिस्ती लोकसंख्या असल्याने पोप यांचे याबाबतीतील स्थान तसे अबाधित राहिले आहे.
जगात विमानसेवा सुरू झाल्यानंतर जगभरातील कॅथोलिक पंथियांचे आचार्य असलेल्या पोप यांची भ्रमंती सुरू झाली. पोप पॉल सहावे यांनी १९६४ साली रोमहून इस्राएलकडे विमानाने प्रयाण केले, तेव्हा त्यांनी चर्चच्या इतिहासातील अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. विमानाने प्रवास करणारे ते पहिले पोप, त्याशिवाय त्यापूर्वी दीडशे वर्षे आधी कुठल्याही पोपने इटलीबाहेर पाऊल ठेवले नव्हते. इस्राएल ही येशू ख्रिस्ताची जन्मभूमी, ख्रिस्ती धर्माचे तीर्थक्षेत्र, पवित्र भूमी. मात्र पोप पॉल सहावे यांच्याआधी कुठल्याही पोपने या पवित्र भूमीवर प्रवेश केला नव्हता.
पोप पॉल हे विमानातून इस्राएलच्या भूमीवर उतरले, तेव्हा या पवित्र भूमीचे चुंबन केले, ख्रिस्ताच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या धरतीला त्यांनी वंदन केले. (पोप पॉल सहावे भारताच्या भेटीवर १९६४ साली आले, तेव्हासुद्धा मुंबई विमानतळावर जमिनीचे चुंबन घेऊन त्यांनी आपला दौरा सुरू केला होता.) पोप जॉन पॉल दुसरे यांच्याप्रमाणेच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी म्हणजे पोप बेनेडिक्ट आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनीही होली लँड इस्त्रायलला भेट दिली आहे.
ज्यु आणि ख्रिस्ती धर्मांसाठी तसेच इस्लाम धर्मांसाठी येरुशलेम आणि इस्राएलचे किती महत्त्वाचे स्थान आहे ते सांगायलाच नको. ज्यु लोकांसाठी इस्राएल म्हणजे देवाने वचन दिलेली भूमी - किंवा ‘प्रॉमिस्ड लँड’. येशू ख्रिस्त या प्रदेशात जन्मला आणि फिरला. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मियांचा देव (खरे पाहता मुस्लिमांचाही) एकच आहे असेही मानले जाते. या तिन्ही धर्मियांसाठी प्रेषित असलेल्या अब्राहाम याचे वर्णन या तिन्ही श्रद्धावंतांचा ‘फादर इन फेथ’ म्हणजे श्रद्धेमध्ये पिता असे केले जाते.
रोम हे ख्रिस्ती धर्मियांची नवी पवित्र भूमी बनलेली असली तरी येरुशलेम आणि इस्राएलचे महत्त्व अबाधित राहतेच. हे महत्त्व अधोरेखित करणारा हा गंमतीदार किस्सा आहे.
ज्यु धर्मियांचे येरुशलेम येथील प्रमुख धर्मगुरु ‘रब्बी’ एकदा रोमला पोपला भेटले. या भेटीदरम्यान पोप यांनी रब्बी यांना ‘देवाशी टेलिफोनवर बोलायचे आहे का?’ असे विचारले. त्यानंतर पोप यांच्या लॅण्डलाइन फोनवरून रब्बी काही काळ देवाशी बोलले. नंतर त्यांनी पोप यांना झालेल्या कॉलच्या फीची रक्कम विचारली आणि चारशे डॉलर्स ही रक्कमही त्यांनी पोप यांना दिली. पोप स्वतः इस्त्रायलला येरुशलेम येथे आल्यानंतर त्यांनाही तेथून रब्बी यांच्या लॅण्डलाइनवरून देवाशी संभाषण करण्याची संधी मिळाली. ‘कॉलचे चार्जेस किती?’ असे त्यांनी विचारल्यावर रब्बी म्हणाले, ‘हा लोकल कॉल होता, नो चार्जेस!’
पोलिश पोप जॉन पॉल दुसरेयांच्यामुळे पोलंडमधील हुकूमशाही कम्युनिस्ट राजवट उलथवून कामगार नेते लेक वालेसा यांची लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होण्यात मदत झाली. इतकेच नव्हे तर पोप जॉन पॉल यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे पूर्व युरोपातील सर्व राष्ट्रांत कम्युनिस्ट हुकूमशाहीचा डोलारा कोसळून लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झाली, हे आज इतिहासकारांनी मान्य केले आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पोप जॉन पॉल दुसरे हे पोपपदावर आल्यानंतर काही वर्षांतच १९८१ साली सेंट पिटर्स चौकात पोपमोबाइलमधून फिरत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि ते खाली कोसळले. पोटात गोळ्या लागूनही पोप यातून आश्चर्यकारिकरीत्या बचावले आणि त्यांनी २७ वर्षे या सर्वोच्च पदावर राहण्याचा विक्रम केला.
पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच याच काळात म्हणजे १९८१ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेनाल्ड रीगन यांच्यावर गोळीबार होऊन त्यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या. यशस्वीरीत्या उपचार होऊन रीगन बचावले. पोप जॉन पॉल दुसरे आणि राष्ट्राध्यक्ष रीगन यांच्याप्रमाणे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही १९८४ साली असाच भीषण गोळीबार झाला, मात्र त्यांच्या शरीररक्षकाने त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण केल्याने इंदिराजी यातून बचावल्या नाहीत.
पोलंडचे नागरिक असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांच्या रूपाने इटलीबाहेरचे कार्डिनल पोपपदावर आले आणि याबाबत इटलीची तीनशे वर्षांची मक्तेदारी मोडली, त्यांनतर जर्मनीचे कार्डिनल पोप बेनेडिक्ट बनले आणि आताचे पोप फ्रान्सिस तर युरोप खंडाबाहेरचे पहिलेच पोप असून थेट लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनाचे आहेत.
राजीव गांधी पंतप्रधान असताना पोप जॉन पॉल दुसरे हे १९८६ साली भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांच्या मिरामार बीचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर झालेल्या मिस्साविधीला ‘नवहिंद टाईम्स’चा बातमीदार म्हणून मी हजर होतो. शाही विधी काय असतो, याचा तो समारंभ उत्तम नमुना होता. पोप यांच्यांसाठी खास मंडप उंचावर उभारलेला होता. त्यांच्यापासून कितीतरी दूर अंतरावर मात्र उंचावरील दुसऱ्या मंडपात पत्रकार कक्ष होता. भारतासह आशिया खंडातील आणि जगभरातील करड्या पोशाखातील, लाल हॅटमधील अनेक कार्डिनल, शंभराहूनही अधिक बिशप आणि हजारभर धर्मगुरू पुढच्या रांगेत आणि त्यामागे भाविकांची अलोट गर्दी, असे ते दृश्य आजही माझ्या नजरेसमोर आहे.
त्या काळात या ‘पोपमोबाइल’विषयी बरीच चर्चा झाली. या दहा दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दोन खास डिझाईन केलेल्या ‘पोपमोबाईल’ होत्या. पोप यांच्या आगमनाआधी प्रत्येक समारंभाच्या ठिकाणी दोनपैकी एक बुलेटप्रुफ पोपमोबाईल विमानाने आधीच आणून ठेवली जायची. भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या त्या प्रसिद्ध रथयात्रेआधीचा हा प्रसंग आहे. त्यामुळे या खास डिझाईन केलेल्या पोपमोबाईलचे विशेष अप्रूप होते. आजही जगभर पोप अशाच पद्धतीच्या पोपमोबाईलमधून भाविकांना दर्शन देतात,
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली पोप जॉन पॉल दुसऱ्यांदा भारत भेटीवर आले. पोप यांना वाजपेयी भेटले होते. आधीच्या भेटीत पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी पोप जॉन पॉल यांची भेट घेतली होती.
इटली येथील वास्तव्यात मला रोम आणि व्हॅटिकन सिटी येथे भरपूर फिरता आले. तेथील ती भव्य सेंट पिटर्स बॅसिलिका, तो जगप्रसिद्ध सेंट पिटर्स स्केअर, व्हॅटिकन म्युझियम, मायकल अँजेलो या चित्रकाराने रंगवलेले सिस्टाईन चॅपेल पाहताना डोळे अक्षरशः फिरतात आणि मती गुंग होते, इतके हे सर्व अगदी प्रेक्षणीय आहे. त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व माहीत असल्याने, त्याविषयी खूप वाचलेले असल्याने तर तिथे फिरताना काय पाहू आणि किती पाहू अशा संभ्रमात मी पडलो होतो. या सेंट पिटर्स चौकातच एका इमारतीच्या उंच मजल्यावरील बाल्कनीतून दर रविवारी आणि आठवड्यातून काही दिवस तसेच सणासुदीला पोपमहाशय तेथे जमलेल्या हजारो भाविकांशी संवाद साधत असतात.
कुटुंबासह मी रोमच्या सहलीवर असतानाची ही गोष्ट. जवळजवळ आठवडाभर आमचा मुक्काम रोममध्ये होता. बुधवारी सेंट पिटर्स चौकात पोप बेनेडिक्ट यांचे बाल्कनीतून दर्शन होईल, तेव्हा त्यादिवशी रोममध्येच थांबणार का? असे मला विचारण्यात आले, आमच्यापाशी दुसरा पर्याय होता तो सोमवारी व्हेनिसला जाऊन तिथे काही दिवस मुक्काम करण्याचा. मी ताबडतोब दुसऱ्या पर्यायाची निवड केली. जॅकलीन आणि मुलगी आदितीसह व्हेनिसला भरपूर हिंडलो. त्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या भेटीचा अनुभव पाहता मी पोप यांच्या दर्शनाऐवजी व्हेनिसभेटीची निवड केली याबद्दल आजही बिलकुल खंत वाटत नाही. त्याचे एक कारण म्हणजे पोप जॉन पॉल दुसरे यांचे गोव्यात मी अगदी जवळून दर्शन घेतले होतेच. सेंट पिटर्स चौकात पोप फार उंचावरच्या गॅलरीतून भाविकांशी संवाद साधत असल्याने त्यांचे जवळून असे दर्शन होतच नाही. पाहू या, इन्शाअल्ला परत कधी रोम भेटीचा योग आला तर सेंट पिटर्स स्केअरमध्ये पोपदर्शनाचा अनुभव नक्कीच घेईन.
व्हॅटिकनच्या खाजगी विभागाच्या प्रवेशद्वारातच खास पारंपरिक टोपी आणि रंगीबेरंगी पोशाखात हातात भाला घेऊन स्मार्टपणे उभे असलेले उंचपुरे गार्डस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पोपमहाशयांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारे हे स्विस गार्डस. गेली पाच शतके स्वित्झर्लंड या देशातील तिशीच्या आतील युवक पोपमहाशयांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थांत हे तसे ‘सेरेमोनियल गार्ड’ म्हणजे शोभेचे गार्ड म्हणता येईल.
सेंट पिटर बॅसिलिका हे सेंट पिटरच्या समाधीवर उभारलेले चर्च आहे. सेंट पिटर बॅसिलिकातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ऐतिहासिक सेंट सिस्टाईन चॅपेल. नव्या पोपची निवड करण्यासाठी येथे जगभरातील कार्डिनलांची बैठक होते. पोपपदाची गादी रीक्त झाल्यावर जगभरातील कार्डिनल सिस्टाईन चॅपेलमध्ये नवे पोप निवडण्यासाठी एकत्र येतात.
पोपपदाची निवडणूक हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. सिस्टाईन चॅपेलमध्ये होणारी ही निवडणूक आगळीवेगळी असते, येथे उमेदवार लॉबिंग वा स्वतःचा प्रचार करत नसतात. ही निवडणूक एक दिवसात संपू शकते किंवा मतैक्य होईपर्यंत काही आठवडेही चालू शकते. कार्डिनलांशिवाय इतर कोणालाही त्या आतून बंद असलेल्या सिस्टींन चॅपेलमध्ये कोणालाही प्रवेश नसतो. सिस्टाईन चॅपेलमध्ये पोपपदावर मतैक्य कसे झाले, कितीदा मतदान झाले, कोण उमेदवार होते, याची माहिती बाहेर कधीही येत नाही.
कार्डिनलची ही कॉन्क्लेव्ह (बैठक) चालू असताना सेंट पिटर बॅसिलिकाच्या चिमणीतून काळा धूर निघाला, म्हणजे नव्या पोपसंदर्भात अजून मतैक्य झालेले नाही. ही बैठक अनेक दिवस चालू शकते. चिमणीतून पांढरा धूर येऊ लागला, म्हणजे चौकात जमलेल्या हजारो लोकांना आणि संपूर्ण जगाला कळते की, नव्या पोपची निवड झाली आहे. आणि काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते आणि ते पोप म्हणून आपले नवे नाव सांगतात. पोपपदाची निवड कशी होती यावर ‘शूज ऑफ द फिशरमॅन’ हा एक अत्यंत गाजलेला चित्रपट आहे.
काही वर्षांपर्यंत या वेळी नूतन पोपमहाशयांच्या डोक्यावर वर क्रूस असलेला रत्नजडित मोठा मुकुट चढवून त्यांचा राज्याभिषेक केला जाई. अलीकडच्या काळात सरंजामपद्धतीचे प्रतीक असणारा हा मुकुट पोप घालत नाहीत. इंग्लंडची राणीसुद्धा हल्ली अगदी प्रतीकात्मक स्वरूपात एक छोटासा मुकुट केवळ शाही समारंभाला घालतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
इंग्लंडच्या गादीवर येणारा राजा अथवा राणी आपले नवे नाव धारण करतात, जसे आताची राणी एलिझाबेथ दुसरी, तसे पोपपदावर येणारे कार्डिनल आपली जुनी ओळख टाकून नवे नाव घेतात. याआधीचे निवृत्त पोप हे बेनेडिक्ट सोळावे तर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांनी पॉप झाल्यावर फ्रान्सिस नाव धारण केले, ते फ्रान्सिस नावाचे पहिलेच पोप आहेत. सोसायटी ऑफ जिझस (जेसुइटस) या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संघटनेचे पोपपदावर आलेले ते पहिलेच सदस्य आहेत.
सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट किंवा येशूसंघीय) या धर्मगुरूंच्या संघटनेचे जगभर शिक्षण, समाजकार्य वगैरे क्षेत्रांत मोठे योगदान आहे. दहशतवादाच्या आरोपात अलीकडेच तुरुंगात निधन झालेले फादर स्टॅन स्वामी हेसुद्धा जेसुईटच होते. जेसुईटांच्या जगभरच्या कार्याच्या मोठ्या जाळ्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले सुपिरियर जनरल यांना चर्चमध्ये पोप यांच्याखालोखाल महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शुभ्रवस्त्रधारी पोप यांच्यासमोर काळा झगा घालणाऱ्या जेसुईट फादर जनरल यांना ‘ब्लॅक पोप’ असेही म्हटले जायचे.
काही वर्षांपूर्वी अडॉल्फो निकोलस हे जेसुईट सुपिरियर जनरल (ब्लॅक पोप) असताना भारतदौऱ्यावर आले, तेव्हा पुण्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. चर्चच्या इतिहासात आता पहिल्यांदाच पोप आणि ब्लॅक पोप हे दोघेही जेसुईट आहेत!
पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिलेल्या राष्ट्रांत पोपमहाशयांचे त्या राष्ट्रातील प्रतिनिधी (प्रो- नन- शिओ) असलेले आर्चबिशप किंवा बिशप यांना अधिकृतरीत्या राजदूताचा दर्जा असतो. त्यामुळे सूत्रे हाती घेण्याआधी राजदूत म्हणून आपले अधिकारपत्र ते भारताच्या राष्ट्रपतींना किंवा इतर राष्ट्रप्रमुखांना सादर करत असतात. व्हॅटिकन सिटीची स्वतःची अशी राजप्रतिनिधिक स्तराची सेवा असते. त्यातील धर्मगुरू, बिशप किंवा आर्चबिशप यांना राजदूत म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातील देशांत पाठवले जाते. वसईचे सद्याचे बिशप फेलिक्स मच्याडो यांनीही पूर्वी व्हॅटिकन सिटीच्या एका शाखेत उपसचिवपदावर काम केले आहे. पोप बेनेडिक्ट यांच्याशी त्यांचा त्या काळी निकटचा संबंध असे.
पोपचे हे प्रतिनिधी-राजदूत त्या देशातील कॅथोलिक चर्च आणि पोप यांच्यांतील दुवा असतात. उदाहरणार्थ, भारतातील कार्डिनल आणि विविध राज्यातील बिशपपदांवरील नेमणुका, चर्चसंबंधी विविध विषय याबाबत पोपच्या या प्रतिनिधींचा सल्ला व मत निर्णायक ठरते.
येशू ख्रिस्ताचा शिष्य सेंट पिटर याचा पोप म्हणून वारसदार असलेले पोप कधीही चुका करू शकत नाही, असा एक नंतर वादग्रस्त ठरलेला धर्मसिद्धांत (डॉग्मा) दोन शतकापूर्वी चर्चमध्ये संमत झाला होता. दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर चर्चमध्ये झालेल्या वैचारिक सुधारणानंतर ‘पेपल इन्फालीबिलीटी’ या डॉग्मावर आता कुणी बोलतही नाही.
गॅलिलिओ आणि इतर वैज्ञानिकांविषयी चर्चची भूमिका, काही देशांत इन्क्विझिशनचा झालेला अतिरेक, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा झालेला संहार याबाबत चर्चची बोटचेपी भूमिका, तसेच गेल्या काही दशकांत युरोपात आणि अमेरिकेत धर्मगुरूंकडून मुलांवर झालेले लैगिक अत्याचार या प्रकरणांमुळे चर्चची मानहानी झाली. त्याबद्दल पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट आणि पोप फ्रान्सिस यांनी खंत आणि खेद व्यक्त करून संबंधित पीडित व्यक्तींची आणि त्यांच्या नातलगांची माफी मागितली आहे.
पोपमहाशय परदेशदौऱ्यावर निघतात, तेव्हा इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे त्यांच्याबरोबरसुद्धा पत्रकारांचा काफिला असतो. रोमकडे परतीच्या प्रवासात पोप जॉन पॉल पत्रकारांशी खुला संवाद साधत असत. पोप फ्रान्सिस यांनीही परंपरा चालू ठेवली आहे. आम्हा पत्रकारांसाठी अशा दीर्घकाळ चालणाऱ्या पत्रकार परिषदा म्हणजे मोठी पर्वणीच असते.
या पत्रकार परिषदेत चर्चच्या दृष्टीने कळीचे मुद्दे असणाऱ्या काही प्रश्नांची हमखास उजळणी होते. समलिंगी संबंध या प्रश्नावर ‘त्यांचा न्याय करणारा मी कोण?’ असा उलटपक्षी प्रश्न पत्रकारांना विचारून पोप फ्रान्सिस यांनी संबंधितांची सहानुभूती मिळवली आहे. मात्र गर्भपात, कॅथोलिक धर्मगुरूंचे अविवाहितपणाचे व्रत, स्त्रियांना धर्मगुरूपदाची दीक्षा, यांवर पोप फ्रान्सिस यांनी आपल्या पूर्वसूरींची कर्मठ भूमिका चालू ठेवली आहे.
व्हॅटिकन सिटीतील ड्रेस कोड विषयीही सांगितले पाहिजे. चर्चच्या सर्व धर्मगुरूंचा, बिशपांचा, कार्डिनल्सचा आणि नन्सचाही विशिष्ट झगा असतो. धर्मगुरू आणि बिशप सफेद किंवा करड्या रंगाचा झगा घालतात. कार्डिनलांचा करड्या रंगाचा झगा, कमरेला लाल पट्टा आणि डोक्यावर छोटीशी लाल गोल टोपी (स्कल कॅप) असते. पोप मात्र सदैव पूर्ण पांढऱ्या झग्यात असतात आणि त्यांच्यासमोर इतरांनी पांढरा पोशाख वा झगा घालू नये असा संकेत आहे. जगातील सर्व बिशप पाच वर्षातून एकदा आळीपाळीने पोप यांना व्हॅटिकन सिटीत भेटत असतात. त्या वेळी हे बिशप, कार्डिनल पोपसमोर नेहमी करड्या रंगाच्या झग्यांत असतात! पुण्याचे बिशप थॉमस डाबरे किंवा वसईचे बिशप फेलिक्स मच्याडो यांचे याआधीच्या आणि आताच्या पोपबरोबरचे फोटो पाहिले की, पोप यांच्याबाबतीतील या ड्रेस कोडविषयी कल्पना येईल.
गेले वर्षभर करोना साथीमुळे जगभरातील प्रार्थनास्थळे बंद राहिली आहेत. व्हॅटिकन सिटीमधले सर्व व्यवहार, प्रार्थना आणि उपासनाविधी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून पोपमहाशयांच्या तुरळक लोकांच्या हजेरीत सेंट पिटर्स बॅसिलिकात होणाऱ्या मिस्साविधीला मी उपस्थित राहत होतो. आता पोप फ्रान्सिस दर रविवारी आणि इतर काही दिवशी पुन्हा आपल्या गॅलरीत येऊन सेंट पिटर्स चौकात वाढत चाललेल्या भाविकांना संबोधित करत आहेत. मागच्या आठवड्यात त्यांच्यावर सर्जरी होऊन या रविवारी ते पुन्हा भाविकांना भेटले. तिथली लोकांची गर्दी, त्यांचा उत्साह आणि जल्लोष पोपविषयीच्या त्यांच्या भावनांबद्दल बरेच काही सांगून जातो.
गेली काही शतके फक्त इटलीच्या कार्डिनलचीच पोपपदावर निवड व्हायची, याचे कारण म्हणजे पोपपदाच्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये इटलीच्या कार्डिनलांचाच अधिक भरणा असायचा. आतापर्यंत केवळ युरोपियन आणि सध्याचे पोप फ्रान्सिस यांच्या रूपाने युरोपाबाहेरील लॅटिन अमेरिकेतील व्यक्तीला म्हणजे केवळ गौरवर्णीय पोपपद मिळालेले आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट सोळावे आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनी कॉलेज ऑफ कार्डिनलचा पारंपरिक चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी अशियाई आणि आफ्रिकन बिशपांची कार्डिनलपदी नेमणूक केल्याचे स्पष्ट दिसते. पोप फ्रान्सिस यांनी बांगलादेशी आर्चबिशप पॅट्रिक डी रोझारिओ यांची बांगलादेशचे पहिले कार्डिनल म्हणून २०१६ साली नेमणूक केली, २०२० साली कार्डिनलपदावर नेमणूक झालेले विल्टन डॅनियल ग्रेगरी हे अमेरिकेतील पहिलेच आफ्रिकन-अमेरिकन कार्डिनल ठरले आहेत. अर्थात आधी आफ्रिकेतील अनेक कृष्णवर्णियांची कार्डिनलपदावर नेमणूक झालेली आहे.
मुंबईचे पहिले भारतीय बिशप व्हॅलेरियन ग्रेशियस हे १९५३ साली भारताचे आणि आशिया खंडातलेही पहिले कार्डिनल बनले. मुंबईचे सायमन पिमेंटा हे पहिले मराठीभाषक कार्डिनल. भारताच्या कार्डिनलची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे. सद्याचे मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे तर पोप फ्रान्सिस यांच्या आठ-सदस्यीय सल्लागार मंडळात आहेत. २००८ला पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिल्यावर झालेल्या पोपपदाच्या निवडणुकीत कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशियस यांचे नाव चर्चेत होते.
कार्डिनलांच्या संख्येत आशियाई, आफ्रिकन किंवा कृष्णवर्णीय कार्डिनल अगदी नगण्य असले तरी मतपेटीतून आणि सेंट पिटर्स बॅसिलिकेच्या चिमणीतून येणाऱ्या पांढऱ्या धुरातून काही धक्कादायक निवडीचा संदेश येऊ शकतो, हे अलीकडच्या काही दशकांत दिसून आले आहे.
१९७०च्या दशकात पोलंड या तेव्हाच्या कम्युनिस्ट राजवटीतील क्रेकॉव येथील कार्डिनल कॅरोल जोसेफ वोझत्याला यांची पोप जॉन पॉल दुसरे म्हणून निवड करून या कॉलेज ऑफ कार्डिनल्सने जे धक्कातंत्र वापरले, ते त्यानंतर जर्मन कार्डीनल जोसेफ अलोशियस रॅतझिंगर (पोप बेनेडिक्ट सोळावे) आणि नंतर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ (पोप फ्रान्सिस) यांना निवडून आजतागायत चालू राहिले ठेवले आहे.
त्यामुळेच भारतातील, आशियातील, आफ्रिकेतील किंवा इतर बिगर-पाश्चात्य कार्डिनल पोपपदावर येऊ शकतात, ही आता अशक्यप्राय बाब राहिलेली नाही. एके दिवशी एखादा भारतीय म्हणजे अगदी मुंबईतील मराठीभाषक कार्डिनलसुद्धा व्हॅटिकन सिटीमध्ये पोप आणि या चिमुकल्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख होऊ शकतो. आणि हा दावा म्हणजे केवळ स्वप्नरंजन, सैद्धान्तिक किंवा तात्त्विक पातळीवर नाही, असे भविष्यात कधीही होऊ शकते. सोनियाचा तो दिवस लवकर यावा हीच अपेक्षा!
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment