Saturn V या रॉकेटद्वारे ‘अपोलो 11’ हे यान चंद्रावर पाठवला गेलं. १६ जुलै रोजी ते लॉन्च करण्यात आलं, २० जुलै रोजी चंद्रावर पोहोचलं आणि २१ जुलै रोजी पुन्हा चंद्रावरून रिलाँच करण्यात आलं. एकूण ८ दिवस, ३ तास, १८ मिनिट्स आणि ३५ सेकंद हे मिशन चाललं. त्यानिमित्ताने या रॉकेटचा आणि एकंदर अंतराळ प्रवास मोहिमेचा जनक वॉर्नर वोन ब्राऊन याच्याविषयीचा हा लेख...
..................................................................................................................................................................
जर्मन शास्त्रज्ञ वॉर्नर वोन ब्राउन (Wernher von Braun) हा अंतराळ प्रवास मोहिमेचा जनक. त्याने ‘सैटर्न V’ या सर्वांत शक्तिशाली रॉकेटची निर्मिती केली. १९६९ साली त्याने जगभरात मोठा मान मिळवला, तो हिरो झाला. ‘सैटर्न V’ने नील आर्मस्ट्राँग व अल्ड्रिन बझ यांना चंद्रावर नेले. तिथे पोहोचणारे ते पहिले व्यक्ती बनले. परंतु प्रसारमाध्यमांत हे कुठेही नमूद केले गेले नव्हते की, ब्राउन पूर्वी नाझी सैन्यअधिकारी होता. त्याने दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान लंडनवर रॉकेट्सद्वारे विस्फोटकांचा पाऊस पाडण्याची योजना आखली होती. तो हेनरिक हिमलरच्या खूप जवळचा होता. त्याने वाट्टेल तसे लोकांना गुलाम बनवून वापरले आणि मारले. तरीही अमेरिकेने त्याच्यासाठी आपली दारे उघडी केली. हा युद्ध गुन्हेगार पुढे अमेरिकेचा फार मोठा सेलिब्रिटी आणि ‘मॅन ऑन मून’ प्रकल्पाचा प्रमुख झाला.
वॉर्नर वोन ब्राऊन हा एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ, पण त्याने आपल्या प्रतिभेचा वापर निर्घृण कामांसाठी केला. मात्र त्याच्या पापांचा हिशोब कधीच ठेवला गेला नाही. उलट त्याचा मानसन्मानच केला गेला. त्याने स्वत:हून कधीही आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली नाही. त्याचा त्याला कधी पश्चात्तापही झाला नसावा बहुधा
१९१२मध्ये जर्मनीतल्या एका सधन जमीनदार घराण्यात ब्राऊनचा जन्म झाला. त्याच्या घराण्यातले अनेक लोक सरकारी सेवा किंवा सैन्यात होते. ब्राऊनच्या वडिलांना त्यानेही तसेच काहीतरी करण्याची अपेक्षा होती. राईट बंधूंनी पहिले हवाई यान बनवून उडवल्यापासून माणूस यानंतर कोणता टप्पा गाठेल, याची चर्चा होत होती. ब्राऊन लहान असताना अंतराळ प्रवास हा अनेक कॉमिक बुक लेखक आणि चित्रपट निर्मात्यांचा आवडता विषय होता. १९२० साली बर्लिन शहरातल्या जनमानसात रॉकेट विज्ञान आणि अंतरिक्ष प्रवास याविषयी मोठे कुतूहल होते. सर्वांकडे अंतराळ यानाचे चित्र असायचे. १३ वर्षांचा असताना ब्राऊनच्या पालकांनी त्याला टेलिस्कोप आणून दिला. हरमन ओबर्थ यांचे ‘रॉकेट इन इंटर प्लानेटरी स्पेस’ हे पुस्तक वाचल्यानंतर तो या क्षेत्राकडे वेगाने ओढला गेला. त्याच्या मनातही या विषयात संशोधन करण्याची इच्छा तयार झाली. त्याला ही फँटसी वास्तवात बदलायची होती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
बर्लिनमध्ये जेव्हा मॅक्स वालीयर यांनी त्यांच्या क्रांतिकारी रॉकेट-कारचे जाहीर प्रदर्शन केले, तेव्हा ब्राऊन १६ वर्षांचा होता. रॉकेट इंधनाचा भडका उडून रॉकेट कार २३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावली. १८व्या वर्षी ब्राऊनने ‘बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एअरनोटिकल इंजिनियर’ या शाखेत प्रवेश घेतला. त्या काळात रॉकेटविज्ञान नवा आणि अत्यंत क्लिष्ट असा विषय होता. ब्राऊनला काहीतरी करून दाखवायचे होते. फावल्या वेळेत तो ‘जर्मन सोसायटी फॉर स्पेस ट्रॅव्हल’ या संस्थेत जाऊ लागला. हा विज्ञान कथालेखक आणि काही हौशी विज्ञानप्रेमींचा गट होता. ते दारूगोळा वापरून छोटे-मोठे प्रयोग करायचे. सैन्य आयुधांचा वापर करून ब्राऊन व त्याच्या मित्रांनी अत्यंत कच्च्या स्वरूपातील अनेक रॉकेट्स बनवली, पण त्यातले कुठलेच उडाले नाही.
पण या अपयशामुळे ब्राऊनला लहानसहान बारकावे शिकता आले. तो आणि त्याच्या हौशी मित्रांसाठी सर्वांत मोठे आव्हान रॉकेटच्या चिंध्या न उडता त्याला जमिनीपासून वर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला नेणे हे होते. कधी कधी रॉकेट वर झेप घ्यायचेही, पण लगेच पडून नुकसान व्हायचे. तेव्हा त्यांना लपून बसावे लागायचे.
या गटातील बहुतांश लोक बेरोजगार होते. त्यातील काहींनाच यातले तांत्रिक ज्ञान होते. त्यांच्यात ब्राऊनकडे चुणूक होती. ते कोणीतरी आर्थिक पाठबळ द्यावे याची वाट पहात होते. १९३२च्या वसंत महिन्यात या चमूने ‘मिराक-2’ हे रॉकेट प्रक्षेपणासाठी तयार केले. ते बघायला जमलेल्या गर्दीत जर्मन सैन्य अधिकारी कॅप्टन वॉल्टरही होते. जे अशा हौशी विज्ञान गटांमधून नवीन प्रतिभा शोधत असायचे. बंदुकांचा मारा आणि त्यांची मर्यादा लक्षात आल्यावर सैन्याची नजर अधिक मारकक्षमता आणि दूरवर मारा करू शकणाऱ्या मिसाईल आणि रॉकेटवर होती.
पहिल्या महायुद्धात जर्मनीने ७०० टन वजनाची सुपर गन बनवली होती. ती १२९ किमी अंतरापर्यंत मारा करू शकत होती. पण जर रॉकेट उपयोगात आणले गेले, तर समुद्रापलीकडेसुद्धा बॉम्ब टाकता येईल, हे सर्वांच्या लक्षात आले होते. अत्यंत वेगाने मारा करू शकण्याच्या अद्वितीय क्षमतेमुळे लष्कराला रॉकेट्स हवे होते. याचा दुसरा फायदा असाही होता की, तोपर्यंत रॉकेट हल्ला ओळखण्याचे कोणतेही तंत्रज्ञान अस्तित्वात नसल्याने ते अजिंक्य होते. जगभरातल्या सर्व सैन्याच्या नजरा रॉकेटविज्ञानाकडे लागल्या होत्या.
२० वर्षीय ब्राऊनच्या काही रॉकेट-प्रयोगामुळे प्रभावित होऊन जर्मन अधिकाऱ्यांनी त्याला ‘सैन्य आयुध संशोधन विभागा’त नोकरी देऊ केली. ब्राऊनने ते मान्य केले. कारण रॉकेट बनवणे हे अत्यंत महागडे काम आहे आणि त्यात फायदा नसल्याने कुणी गुंतवणूकही करायला तयार होत नाही. ब्राऊन आता नाझी वर्दीतल्या कर्मचाऱ्यांमध्ये वावरू लागला. सैन्याने त्याला मदतनीस, पैसा, जागा, कार्यालय सर्व काही पुरवले.
अंतरिक्ष यानासाठी सुरू झालेले संशोधन आता लांबपर्यंत मारा करू शकणाऱ्या मिसाईल्सपर्यंत आले होते. हिटलर जर्मनीचा चान्सलर बनला होता आणि त्याला जग पदाक्रांत करायचे होते. हिटलरने जर्मन सैन्यावर बेहिशेबी खर्च करायला सुरुवात केली. त्या वेळी जर्मनी ब्रिटनच्या तुलनेत चार पट अधिक शस्त्र निर्मिती करत होता. त्यात आणि संशोधनात अमाप पैसा खर्च होत होता.
फक्त २२व्या वर्षी ब्राऊन एक महत्त्वाचा मिलिटरी शास्त्रज्ञ बनला. बर्लिनबाहेर कमर्सडोर्फ रेंज इथं त्याला प्रयोगांसाठी मोठी जागा देण्यात आली. अनेक रॉकेट्स चाचणी करतानाच ध्वस्त व्हायचे, म्हणून ही जागा बर्लिनजवळ असणे धोक्याचे होते. तो तंत्रनिर्देशक बनल्याने त्याचे महत्त्व वाढले होते. त्याच्या मागणीवरून बाल्टिक समुद्र किनाऱ्याजवळ पीनेमुंडे इथे २५ वर्ग किलोमीटर एवढी प्रशस्त जागा देण्यात आली. हे लहान खेडे औद्योगिक वसाहतीत बदलू लागले. तिथे विमानतळ आणि शेकडो गणितज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसाठी सरकारी घरे बांधण्यात आली. काही वर्षांतच पीनेमुंडे जर्मन सैन्याचे शस्त्रविकास केंद्र बनून गेले. हे नाझी तंत्रज्ञानाचे हे प्रदर्शन दालन असल्यासारखेच होते.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७
..................................................................................................................................................................
ब्राऊनचे रॉकेट डिझाईन १९२९मध्ये आलेल्या ‘वुमन ऑन द मून’ चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या रॉकेटसारखेच होते. त्यावर त्या चित्रपटाचा लोगोदेखील होता. पण हे रॉकेट जमिनीवरच किंवा थोड्या उंचीवर जाऊन कोसळत असे.
नोव्हेंबर १९३७मध्ये ब्राऊन नाझी पार्टीचा पूर्ण सदस्य बनला. त्याच्याकडे नाझी सरकारने ज्यू लोकांना लुटून जमवलेला पैसा आणि सैन्यातली माणसे होती. १९३९मध्ये युद्धाची शक्यता बळावत असताना त्याच्यावर महाशस्त्र तयार करण्याचा दबाव वाढत गेला. हिटलरने पीनेमुंडेचा दौरा केला आणि खुश झाला. परंतु त्याला प्रात्यक्षिक दाखवताना ब्राऊनचे रॉकेट जागच्या जागीच कोसळले. हिटलरने चिडून फंडिंग बंद करून टाकले आणि रणगाडे, बंदुका, दारूगोळ्यावर खर्च वाढण्याचे आदेश दिले. रॉकेटवरचा खर्च त्याला महाग वाटला.
ब्राऊनला त्याचे स्वप्न कोसल्यासारखे वाटले. त्याने एसएस प्रमुख हेनरिक हिमलरशी संपर्क साधला. त्याचा रॉकेटच्या ताकदीवर विश्वास होता. ते यशस्वी झाले तर हिमलर अधिक शक्तिशाली बनणार, याची त्याला जाणीव होती. ब्राऊनला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्याने एसएसचे अधिकारी पद देऊ केले. तोपर्यंत एसएसने हजारो ज्यू लोकांची कत्तल केली होती. युद्धाच्या सुरुवातीलाच एसएसने पोलंडमध्ये ६५ हजार निर्दोष ज्यूंची हत्या केली होती. जर्मनीमध्ये ते राजरोसपणे ज्यू स्त्री-पुरुष व मुलांना जीवे मारायचे. एसएस दमन, दहशत आणि जनसंहाराचे नाझी हत्यार होते.
१९४०मध्ये एसएसमध्ये ब्राऊन सेकंड लेफ्टनंट म्हणून सामील झाला, तेव्हा ती संघटना आणि त्याची महाशक्ती काय चीज आहे, याची त्याला पूर्ण कल्पना होती. एसएस म्हणजे खूप सारा पैसा आणि असीम ताकद याची ब्राऊनला खात्री होती. हिमलरच्या संपर्कामुळे आणि एसएसचा वरिष्ठ अधिकारी बनल्यामुळे ब्राऊनला पाहिजे ते मिळू लागले.
त्यापुढचे पहिले आव्हान रॉकेट साडेतीनशे किमीचा पल्ला गाठू शकेल यासाठी इंजिन सशक्त बनवणे हा होता. शेकडो टन विस्फोटके घेऊन जाण्यासाठी कमी जागेत जास्त वेळेपर्यंत चालेल, असे इंधन भरणे गरजेचे होते. त्याने अमेरिकन रॉकेट शास्त्रज्ञ रॉबर्ट गोडर्ड यांची द्रव इंधन भरण्याची शक्कल उपयोगात आणली. द्रव ऑक्सिजन आणि अल्कोहोलच्या संमिश्रणाने भरपूर ऊर्जा उत्पन्न करणारे इंजिन बनवण्यात यश मिळवले. हे इंजिन पुढे रॉकेटशास्त्राचे ब्ल्यू प्रिंट बनले. ही रचना पुढे अनेक दशकांपर्यंत उपयोगात आणली गेली. रॉकेटने हवेत उंच झेप घेतली तरी पण त्याची दिशा हवेत नियंत्रित कशी करता येईल, हे ब्राऊनला समजेना. या नव्या आव्हानाची त्याला तोपर्यंत कल्पना नव्हती. तेव्हा संगणकाचा विकास झाला नसल्याने ते आजच्या इतके सोपे नव्हते. त्याने पुन्हा त्याच अमेरिकन शास्त्रज्ञाची युक्ती वापरून जायरोस्कोपच्या मदतीने त्याला स्थिर केले. गोडर्डकडे संकल्पना होत्या आणि ब्राऊनकडे अमर्याद पैसा व फौजफाटा होता.
३ ऑक्टोबर १९४२ रोजी ब्राऊनच्या टीमने ए-4 रॉकेटची चाचणी घेतली. हे रॉकेट स्फोट न होता उंचच उंच उडालं. ८० किलोमीटरच्याही वर झेपावलं. इतक्या उंचीपर्यंत पोचलेलं ते पहिलं मानवनिर्मित यंत्र होतं. ब्राऊनने रॉकेटद्वारे अंतराळ भेदण्याची घोषणा केली. पण सर्वांना माहीत होतं की, हे अंतरिक्ष यान पाठवणारं रॉकेट नाही, तर विस्फोटकं पाठवणारं युद्ध मशीन आहे. ही बातमी हिमलरला कळाली. त्याने हिटलरला ही उत्साहवर्धक बातमी सांगितली. जर्मनी एक वर्षापासून रशियाशी करत असलेल्या युद्धात मोठे नुकसान भोगत होता. हिटलरला अशा चमत्कारिक शस्त्राची गरज होती. त्याने लवकरात लवकर १२००० रॉकेट्स तयार करण्याचा हुकूम सोडला. ब्राऊनच्या रॉकेटचे नामकरण ‘व्ही-2’ असे करण्यात आले. यातला ‘व्ही’ हा शब्द ‘वेंजेस’ (म्हणजे सूड) यातले पहिले अक्षर होते.
ब्रिटिशांना याची बातमी समजल्यावर त्यांना घाम फुटला. त्यांनी त्वरित जर्मन तळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला. १७ ऑगस्ट १९४३ रोजी पीनेमुंडेच्या तळावर हल्ला चढवण्यासाठी ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने ‘ऑपरेशन हायड्रा’ सुरू केले. मध्यरात्री पीनेमुंडेंवर १८०० टन बॉम्बस्फोटके पाडून तळाचे मोठे नुकसान करण्यात आले. वातावरण स्वच्छ नसल्याने तळाची जास्त हानी झाली नाही, पण शत्रूला जागेचा पत्ता लागल्याने तिथे राहणे आणि महत्त्वाची आयुधे ठेवणे जोखमीचे झाले. त्यामुळे शत्रूच्या नजरेत येऊ नये आणि गुप्तता बाळगता यावी, म्हणून हार्ज पर्वतांमध्ये जमिनीखाली ब्राऊनच्या नव्या रॉकेटचे केंद्र वसवण्यात आले. या कारखान्यांना ‘मिटलवर्क’ म्हटले जाते. ब्राऊनकडे याच्या निर्माण कार्याची जबाबदारी होती. हजारो रॉकेट्स, त्यांचे सुटे भाग आणि संयंत्र नेण्या-आणण्यासाठी भला मोठा बोगदा तयार करण्यात आला. हे एक विशाल बांधकाम होते. त्याची कहाणी अमानवीय आणि धक्कादायक आहे. या पर्वतरांगांमध्येच मिट्टलबाऊ-डोरा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बनवण्यात आले होते. ही छळछावणी ब्राऊनच्या कारखान्याला बेबंदपणे श्रमशक्तीचा पुरवठा करण्यासाठी बनवण्यात आली होती.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
ब्राऊनकडे हजारो बंदिवान ज्यूंचे मोफत मानवी श्रम उपलब्ध होते. त्यांना नरकात जेवण, झोप व स्वच्छतेविना मरेपर्यंत कामाला जुंपले जायचे. मेल्यानंतर त्यांचे शव बोगद्याखालीच पुरले जायचे. ब्राऊन व त्याच्या सोबतच्या सर्व रॉकेट वैज्ञानिकांना याची पूर्ण माहिती होती. पण त्याला या गोष्टीची काळजी नव्हती. त्याच्या महत्त्वाकांक्षा आणि हिटलरचे जगजेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असंख्य ज्यूंचे जीव क्रूरपणे घेण्यात आले.
पण १९४४मध्ये रशियाच्या लाल सैन्याने जर्मनीवर निर्णायक हल्ला चढवला, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. रशियन फौजा पोलंडपर्यंत घुसल्या. रशिया बर्लिनकडे कूच करत होती. आणि उत्तरेकडून इटलीच्या मार्गाने अमेरिकन-ब्रिटिश फौजांनी हल्ले चढवले.
सप्टेंबर १९४४पर्यंत ब्राऊनच्या स्वप्नाप्रमाणे महाशस्त्र रॉकेट तयार झाले. पहिले रॉकेट नेदरलँडमधून लंडनच्या दिशेने सोडले गेले. ते पश्चिम लंडनच्या स्टेवली रोडवर जाऊन फुटले. काही लोकांची हानी आणि बांधकाम ध्वस्त झाले असले तरी ब्रिटनला घाम फोडायला आणि हिटलरचा आनंद द्यायला ते पुरेसे होते. आता लंडन नष्ट होण्याच्या छायेत होते. ब्राऊनने जनसंहाराचे नवे शस्त्र बनवून इतिहास रचला होता.
पण त्याच्या अनेक चाचण्या करणे गरजेचे होते. बरेच व्ही-2 क्षेपणास्त्र लक्ष्य गाठण्यात असमर्थ ठरायचे किंवा फार कमी नुकसान करायचे. ६००० व्ही-2 क्षेपणास्त्रांनी केवळ ५००० ब्रिटिश नागरिकांची हत्या केली. या तुलनेत पारंपरिक हत्यार अधिक स्वस्त आणि प्रभावशाली होते. या शास्त्राच्या निर्मितीत त्याहून कितीतरी पट जास्त ज्यू लोक मारले गेले. ब्राऊनच्या रॉकेट मिशनसाठी जर्मनीचे अब्जावधी रुपये खर्च झाले. हे पैसे जर तेव्हा रणगाडे, बॉम्ब आणि इतर शस्त्रास्त्रांवर खर्च झाले असते, तर बर्लिनमध्ये घुसणाऱ्या सैन्याला अधिक कडवा संघर्ष करावा लागला असता.
१९४५च्या वसंत ऋतूत रशियन सैन्य पीनेमुंडेपासून फक्त अडीचशे किमीच्या अंतरावर होते. फौजा जवळ आल्या तशा सर्वांना बंदुका घेऊन लढायला सांगण्यात आले. ब्राऊनला हे अपेक्षित नव्हते. त्याने दुसरा निर्णय घेतला. त्याला बायको-मुले नसल्याने ते त्याला तुलनेने सोपे होते. त्याने आपल्या सहकाऱ्यांसह पळ काढला. तेव्हा त्यांनी उदध्वस्त झालेली जर्मनी पाहिली आणि आता सर्व काही बदलले आहे, या निष्कर्षापर्यंत ते आले. पहाडांमधून प्रवास करताना कार अपघातग्रस्त झाल्याने ब्राऊनच्या हातात फ्रॅक्चर झाले. तो ऑस्ट्रियन सीमेजवळच्या अल्पाईन रिसॉर्ट नावाच्या आलिशान हॉटेलमध्ये थांबला.
त्याला त्याचे स्वतः महत्त्व माहीत होते. अमेरिका त्याच्या शोधात आहेत, हे त्याला माहीत होते. आत्मसमर्पण करताना जगू देण्याच्या बदल्यात तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याच्या वाटाघाटीची त्याची योजना होती. व्यावहारिक जगातले ते शहाणपण होते.
११ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकन फौजांनी डोरा कॅम्पवर नियंत्रण मिळवले. या कॅम्पची परिस्थिती मानवतेला लाजवेल अशी भयानक होती. सगळीकडे मृतदेहांचा खच होता. कुजलेल्या, जाळलेल्या मृतदेहांच्या ढिगांमध्ये काही हजार मरणाला टेकलेले कुपोषित व रोगग्रस्त ज्यू जिवंत होते. जवळच ब्राऊनच्या संशोधन केंद्रात रेल्वेगाड्यांवर व्ही-2 आणि विविध टप्प्यांमध्ये असलेले त्याचे विशालकाय सुट्टे भाग पडलेले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांना जर्मनीकडे असलेल्या अमेरिकेच्याही मैलानमैल पुढे आणि प्रगत असलेल्या तंत्रज्ञानाचे दर्शन त्यातून होत होते. अमेरिकी सैन्याच्या ‘टी- फोर्स’ या गुप्तचर आणि विशेष युनिटने जर्मन वैज्ञानिकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या यादीत ब्राऊन सर्वांत वर होता. सोव्हिएत युनियनच्या सैन्याच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना तो हवा होता. सोव्हिएत सैन्य जर्मनीत ब्रिटिश व अमेरिकन सैन्यापेक्षा अधिक खोलवर घुसले होते, म्हणून अधिक वेगाने जर्मन वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांचा शोध घेण्याची गरज होती.
ब्राऊन अमेरिकन फौजांच्या हाती लागला, तेव्हा त्याच्या वागण्यात युद्ध गुन्हेगार असल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. तो हसत सिगारेट फुंकत होता. अमेरिकन सैन्य अधिकारीदेखील खुश होते. दोन्ही एकमेकांशी सौजन्याने वागत होते. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी वाटाघाटी करत होते. शेवटी त्यांच्यात ठरले की, ब्राऊन अमेरिकेला व्ही-2 तंत्रज्ञान पुरवणार आणि त्या बदल्यात अमेरिका त्याला शरण, संरक्षण देऊन त्याचे डोरा कॅम्प येथील दहशतवादी गुन्हे दुर्लक्षित करणार. ते नैतिकतेबद्दल कोणतेही प्रश्न विचारणार नाहीत. त्यांना ब्राऊनचे डोके हवे होते!
त्याच्या भूमिकेची चौकशी करण्यात आल्याचे कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाहीत. २० सप्टेंबर १९४५ रोजी नाझी सैन्याचे सर्वोच्च रॉकेट शास्त्रज्ञ ब्राऊनला त्याच्या चमूसह अमेरिकेत नेण्यात आले. न्यू मेक्सिको वाळवंटामध्ये वसलेल्या सैन्य तळावर त्याला गुप्तपणे ठेवण्यात आले. जर्मनीतून व्ही-2चे भाग आणले गेले आणि त्यावर काम सुरू झाले. जनरल इलेक्ट्रिकचे अभियंते अमेरिकन सैन्यासाठी क्षेपणास्त्र विकसित करत होते. ब्राऊन अमेरिकेला तंत्रज्ञान पुरवणारा असल्याने तो या अभियानात महत्त्वाचा होता.
पण ब्राऊन व त्याच्या सहकार्यांच्या रक्तरंजित आणि कुख्यात नाझी पार्श्वभूमीमुळे अनेकांना हे रुचले नाही. एलनर रुजवेल्ट आणि महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी नाझी सहभागाचा तीव्र निषेध केला. अमेरिकेच्या वैज्ञानिक संघानेदेखील यावर नापसंती दर्शवत विरोध केला. पण अमेरिकन सत्ताधाऱ्यांना आणि अनेक शास्त्रज्ञ व अभियंत्यांना नैतिकता, युद्ध अपराध आणि हत्या आदी वादाशी घेणे-देणे नव्हते.
अमेरिकन लष्कराकडे आपले सैन्य मजबूत करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांची खात्री होती की, कम्युनिस्टांकडेदेखील असे काही नाझी शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचादेखील स्वतःचा रॉकेट प्रकल्प आहे. कम्युनिस्टांनी वरचढ होणे अमेरिकेसाठी धोकादायक होते. शीतयुद्धाची हीच सुरुवात होती. ब्राऊनला अल्बमाच्या हंट्सविलेला पाठवण्यात आले. जिथे त्याने रेडस्टोन रॉकेट्सवर काम सुरू ठेवले. हे अणुबॉम्ब वाहण्याची क्षमता असलेले पहिले बॅलिस्टिक मिसाईल होते. ब्राऊन मिसाईल विकास कार्याचा निर्देशक बनला.
हिटलरचा मुख्य रॉकेट शास्त्रज्ञ आता अमेरिकेचा मुख्य रॉकेट शास्त्रज्ञ बनला होता!
ब्राऊनचे लग्न झाले. तो त्याच्या तीन मुलांसोबत राहू लागला. तो चर्चमध्ये जायचा आणि धार्मिक उद्धरणांचा वापर सार्वजनिक घोषणा आणि बोलण्यात करायचा. १९५५मध्ये त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळाले. तो अमेरिकन हिरो झाला. अमेरिकेने ब्राऊनला वैज्ञानिक अनुसंधानात गुंतवून घेतले. अंतराळयान बनवण्याचे कार्यक्रम वेगाने चालू होते. ब्राऊनने लहानपणी पाहिलेले अंतरिक्षयान बनवण्याचे स्वप्न पुन्हा नव्या उमेदीने जिवंत झाले. पण अमेरिकेत जर्मनीप्रमाणे सुरक्षितता, खर्च व मानवी श्रमाची चंगळ नव्हती. त्याला मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला महत्त्व द्यावे लागायचे.
अमेरिकेला रशियाच्या पुढे जायचे होते. १९५७ साली सोव्हित युनियनने ‘स्पुतनिक’ हा जगातला पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला. अमेरिकन जनमानसात तोपर्यंत आपण जगात सर्वांत श्रेष्ठ असल्याची भावना होती. तिला स्पुतनिकने मोठा तडा दिला. त्यामुळे अमेरिकन नागरिकांमध्ये ही भावनाही बळावली की, रशिया अशाच प्रकारे पृथ्वीच्या कक्षेतून अणुबॉम्बदेखील टाकू शकेल. स्पुतनिकने अमेरिकेत दहशत निर्माण केली. आपण त्याला जोरदार उत्तर दिले पाहिजे, असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अमेरिकेचा ब्राऊन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढला. स्पुटनिकनंतर चार महिन्यांनी ब्राऊनने ‘ज्युनो-1’ अंतराळात सोडले. हा पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आलेला पहिला कृत्रिम उपग्रह होता. पण अजूनही अमेरिकेचा अंतराळ कार्यक्रम अत्याधुनिक असूनदेखील सोव्हिएत रशियाच्या मागेच होता.
सोव्हिएत रशिया त्या वेळेस अंतराळ कार्यक्रमाच्या शर्यतीत पुढे असल्याने शीतयुद्धात भर पडली होती. १२ एप्रिल १९६१ रोजी पश्चिमी अहंकारावर मोठा आघात झाला. या दिवशी सोव्हिएत रशियाने युरी गागरीन यांना जगातला पहिला व्यक्ती म्हणून अंतराळात पाठवले. कम्युनिझमचा हा मोठा विजय म्हणून साजरा करण्यात आला. भांडवलशाहीचा सर्वोच्च पुरस्कर्ता असलेल्या अमेरिकेच्या सत्ताधार्यांवर भयंकर दबाव वाढला होता. अमेरिकेन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी दबावात येऊन माणसाला चंद्रापर्यंत नेऊन परत आणण्याचा निर्धार अमेरिकन लोकांसमोर केला.
ब्राऊन आता अमेरिकन अध्यक्षाच्या जवळची व्यक्ती बनला. त्याला मोठ्या प्रमाणात फंडिंग आणि स्रोत पुरवण्यास सुरुवात झाली. ब्राऊनसाठी हे स्वप्न पूर्ण करण्याची अभूतपूर्व संधी होती. आता हा मुद्दा फक्त रॉकेट बनवून अंतराळात पोचण्यापुरता मर्यादित राहिला नव्हता. तो दुसऱ्या जगापर्यंत पोचून परत येण्याचा झाला होता. दुसऱ्या महायुद्धातला नाझी युद्ध गुन्हेगार अमेरिकन आशास्थान आणि सेलिब्रिटी बनला. तो महत्त्वाकांक्षी ‘मॅन ऑन मून’ प्रोजेक्टच्या प्रमुखांपैकी एक झाला.
ब्राऊनच्या नेतृत्वाखाली ‘सॅटर्न V’ हे १९६७ ते १९७३ दरम्यान तयार करण्यात आलेले सुपर हेवी-लिफ्ट क्षेपणास्त्र होते. त्यात मानवांना वाहण्याची क्षमता होती. यात तीन चरण होते. प्रत्येक द्रव प्रोपेलेंटद्वारे इंधनयुक्त होते. हे माणसांना चांद्रमोहिमेला पाठवण्यासाठी आखलेल्या अपोलो कार्यक्रमास पाठबळ देण्यासाठी विकसित केले गेले होते. नंतर ते पहिले अमेरिकन अंतराळ केंद्र ‘स्कायलॅब’ सुरू करण्यासाठी वापरले गेले.
कोणत्याही मानवहानीशिवाय केनेडी स्पेस सेंटरवरून ‘सॅटर्न V’ १३ वेळा लाँच केले गेले. हे आतापर्यंतचे सर्वांत उंच, सर्वांत वजनदार आणि सर्वांत शक्तिशाली (सर्वाधिक एकूण आवेग) रॉकेट आहे. माल, प्रवासी, फ्लाइट क्रू, शस्त्रे, वैज्ञानिक उपकरणे वा प्रयोग किंवा इतर उपकरणे समाविष्ट असलेले १,४०,००० किलो वजनाचे ‘पेलोड’ घेऊन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) काम करणारे क्षेपणास्त्र आहे. या मोहिमेच्या तिसर्या टप्प्यात अपोलो यान चंद्रावर पाठवण्यात अमेरिकेला यश आले. १६ जुलै १९६९ रोजी ब्राऊनने ‘सॅटर्न V’ प्रक्षेपित केले. तो आजवरचे सर्वांत शक्तिशाली रॉकेट होते. त्यातून नील आर्मस्ट्राँग, बझ अल्ड्रिन आणि मायकल कॉलिन चंद्रावर गेले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
ब्राऊनच्या कारकिर्दीतील हा सर्वोच्च क्षण होता. मानवाच्या इतिहासात घडलेली ही सर्वांत महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. ब्राऊनला ‘नेशनल मेडल फॉर सायन्स’ देण्यात आले. अलबामा विद्यापीठातील एका संशोधन केंद्राला त्याचे नाव देण्यात आले. चंद्रावर असलेल्या एका विवरालादेखील त्याचे नाव देण्यात आले. ६५ व्या वर्षी पित्ताशयाच्या कॅन्सरने त्याचे निधन झाले आणि तो अमेरिकेत अमर होऊन गेला.
ब्राऊन वरिष्ठ क्रूर एसएस अधिकारी असल्याची माहिती कुठेही नमूद करण्यात आलेली नाही. त्याच्या कामासाठी जी छळछावणी चालवण्यात यायची, त्याचाही उल्लेख अमेरिकन माहिती स्त्रोतांतून गायब करण्यात आला. त्याचे हात रक्ताने माखलेले होते, पण चलाखपणा दाखवत त्याने त्या गोष्टीचा कधी उल्लेख केला नाही. त्याच्यावर कोणताही खटला चालला नाही. त्याला नाझी कृत्यांचे दुःख असल्याचे कधीही जाणवले नाही. त्याने कधीही जगाची माफी मागितली नाही. इतिहासात फार कमी व्यक्ती असतील ज्यांना ब्राऊनप्रमाणे संधी आणि माफी मिळाली असेल. अनेक कु-कृत्ये करूनही त्याला नायकत्व लाभले.
..................................................................................................................................................................
लेखिका कल्पना पांडे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सदस्य आहेत.
kalpanasfi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment