अनेक प्रकारच्या शारीरिक पीडा, अंगावरचे मांस झडेस्तोवर उपवास, अशा अवस्थेत बुद्ध झाडाखाली समाधीसाठी बसले असताना झाडापलीकडे बसलेल्या बाप-लेकीचा संवाद त्यांना ऐकू आला. मुलगी एकतारीची तार नीट सुरात लावण्याचा प्रयत्न करत होती. तिला ते जमत नव्हते. कधी तार घट्ट बसून तुटायची, तर कधी सैल झाल्याने वाजत नव्हती. तार कशी बांधायची, हे समजून सांगताना बाप म्हणाला, ‘योग्य सुरात वाजवायचं असेल, तर तारेचा ताण योग्य असायला हवा. जर तारेतून संगीत निर्माण व्हायला हवं असेल, तर ताण जास्त-कमी नाही, तर मध्यम हवा.’ हा संवाद ऐकून बुद्धांच्या लक्षात आलं की, मन आणि शरीर यांचा तोल साधला गेला नाही, तर ज्ञानप्राप्ती होणार नाही. त्यांनी शरीराचे क्लेश थांबवले. उरूवेला प्रांताचा प्रवास करत करत ते निरंजना नदीच्या काठावर पोहचले. बोधी वृक्षाखाली पद्मासनात बसून समाधी लावताना निश्चय केला – ‘काहीही झालं, तरी ज्ञानप्राप्तीशिवाय इथून उठायचं नाही’. बोधीवृक्षाच्या सावलीत बुद्धांनी सर्वप्रथम अभिसंबोधी प्राप्त केली. तोच ‘प्रतीत्यसमुत्पादा’चा साक्षात्कार!
बुद्धकथांमधली ही कथा वेगवेगळ्या अंगाने आपणास माहीत असली, तरी एकूणच आपणा सर्वांना चरित्राच्या अंगाने बुद्ध जुजबी माहीत आहे, तर शिकवण किंवा तत्त्वज्ञानाच्या अंगाने अजिबात माहीत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खरं तर बुद्ध आणि त्याचा धम्म(धर्म) या मातीतला आहे, तो जगभर पसरलेला आहे, देशी व वैश्विक संशोधकांच्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय आहे. जितक्या वेळा आपण बुद्ध आणि त्याच्या तत्त्वज्ञानाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तितक्या वेळा त्याच्या आकलनाच्या कक्षा विस्तारत जातात, रुंदावत जातात. जाणीव-नेणीवेच्या पातळीवर काही समजूनही पुन्हा नव्याने काही ना काही समोर येत राहते आणि बुद्ध पुन्हा तसाच आकलनाच्या पल्याड खुणावत राहतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धान्त’ हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा, त्याच्या शिकवणीचा मूळ गाभा आहे. हा सिद्धान्त वस्तू, घटना यांचे मूळ स्वरूप समजून घेण्याचं सम्यक सूत्र आहे. मिळालेल्या मनुष्य जन्माचे काय करायला हवे, त्याचा विनियोग कसा करायला हवा, यासाठीची बुद्धांची धारणा म्हणजे हा सिद्धान्त.
या पार्श्वभूमीवर कवी, कादंबरीकार, समीक्षक नितीन भरत वाघ यांनी प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतन यांतून बुद्धाच्या या सिद्धान्ताचे विविध अंगाने विश्लेषण करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच जवळपास साडेचारशे पानांचा ‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धान्त’ हा ग्रंथ होय. या ग्रंथात एकूण एकोणीस प्रकरणं आहेत. बुद्धधम्म चिकित्सेची चौकट, साधारण प्रतीत्यसमुत्पाद, लोकोत्तर प्रतीत्यसमुत्पाद, प्रतीत्यसमुत्पादाच्या परिप्रेक्ष्यातून बुद्ध तत्त्वज्ञान, अरिय रूपे, बारा कड्या, काळ-अवकाश संकल्पना, विज्ञान व बुद्धधम्म... ते बुद्धधम्म आणि त्रिपिटक असा विषयाचा विस्तृत कॅनव्हास आलेला आहे.
‘या आकळलेल्या मुक्तीचं काय करायचं?’ या आत्मनिवेदनापासूनच बुद्धांबरोबरचा प्रवास सुरू होतो. एकोणीस प्रकरणांतून बुद्धांबरोबरचा हा प्रवास खरंच आनंददायी आहे, तसाच शेवटच्या दहा पानांच्या संदर्भसूचीने दडपून जाणाराही. खरं तर हा तत्त्वज्ञान/वैचारिक विषयक ग्रंथ आहे. प्रतीत्यसमुत्पादाला बुद्धांनी अत्यंत गंभीर व समजण्यास कठीण असल्याचे वारंवार सांगितले आहे. या विषयावर लिहिणं म्हणजे आगीत हात घालणं आहे, असं लेखकानेच पुस्तकाविषयीच्या निवेदनात म्हटलंय. या पुस्तकावर एक वाचक म्हणून लिहिण्याचं धाडस केलं, ते मित्रवर्य नितीनच्या जवळपास अकरा वर्षांच्या अफाट परिश्रमाला सलाम म्हणून. हा ग्रंथ आऱ्हान बुकस्मिथस् यांनी प्रकाशित केला आहे. त्याचं आकर्षक मुखपृष्ठ संतोष काळबांडे आणि गोपीनाथ पवार या जोडीनं केलं आहे.
माणसाला जगताना दु:ख, क्लेष, यातना त्रासदायक होतात. बुद्धाची शिकवण मानवाला दु:खमुक्त करण्यासाठी आहे. मनुष्य जन्म अत्यंत मौल्यवान असल्यामुळे तो व्यर्थ न घालवता त्याचा उपयोग नीटनेटकेपणाने करायला हवा, हा बुद्धांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश होता. आपल्या जगण्यात जे काही घडत असतं, त्याला निश्चित कारणं असतात. त्या कारणांचा शोध घेऊन, त्यांना बदलवून क्लेश, संकटं, दु:ख दूर करता येतं; जगणं अर्थपूर्ण करता येतं. मानवी जीवन हे कोणत्याही प्रकारे दैवाधारित किंवा नियतीने ठरवल्याप्रमाणे नसतं; तर ते वैयक्तिक, मानसिक, सामाजिक व राजकीय अशा बाह्य घटकांवर अवलंबून असतं. या घटकांच्या एकत्रित समुच्चयाने ते निर्धारित व नियंत्रित होत असतं. हे घटक संस्कारित असतात, परिवर्तनीय असतात. त्यांना बदलून आयुष्याला अर्थपूर्ण आयाम देता येतो, हेच बुद्धांना शिकवायचं होतं.
मानवी समाजाला अधिक स्वावलंबी, स्वतंत्र, मुक्त व आनंदी बनवण्यासाठी बुद्धांनी धम्म दिला. समतेसाठी, प्रज्ञेसाठी, करुणेसाठी बुद्धांनी धम्म सांगितला. साध्या सूत्रात कार्यप्रणाली, व्यवस्था दिली, क्षणांचं अमर्याद महत्त्व विशद केलं. एक ध्येय ठरवून समाजाच्या उपयोगी पडेल, अशी कर्मं करायला बुद्धांनी शिकवलं. बुद्ध समजून घेताना, त्या काळातील परिप्रेक्ष्यातून पाहणं नितान्त आवश्यक ठरतं. त्या काळाचं प्रतिपादन करताना लेखक दोन स्वतंत्र सभ्यतांचा उल्लेख करतो - श्रमण आणि वैदिक ब्राह्मणी. लेखकाचा असा दावा आहे की, त्या काळात जातिव्यवस्थाच अस्तित्वात नव्हती आणि म्हणूनच बुद्धांनी जातिव्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवायचा प्रश्न निर्माण झाला नाही. बुद्धांनी आत्मवाद, नित्यता, तसेच निसर्गवादाची निरर्थकता दाखवून दिली आणि माणसाच्या जगण्याला निसर्गातील विज्ञानाशी जोडून दिले. माणूस अधिकाधिक वास्तव, भैतिकवादी जगेल अशी व्यवस्था निर्माण केली. जगातील प्रत्येक वस्तू, घटना यांच्या अस्तित्वाचे मूळ शोधून, कार्यकारणभाव, परस्परावलंब सूत्रबद्ध स्वरूपात चिकित्सापद्धती म्हणून विकसित केली. माणसाचं जगणं दु:खाने वेढनंलं आहे. ते दूर करणं व माणसाला उत्तमरित्या जगता यावं यासाठी, त्याला तत्क्षणी दु:खमुक्त करण्याची आवश्यकता असल्याचं बुद्ध जाणून होता.
‘प्रतीत्यसमुत्पाद’ हा बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आणि मूळ आधार आहे. या तत्त्वज्ञानाला स्वत: बुद्धांनी ‘विसुद्धीमाग्ग’मध्ये (१७-२१ या श्लोकात) सत्य म्हणजेच निर्वाण, त्याचबरोबर पुरुष, पुनर्जन्म व प्रतीत्यसमुत्पाद हे चार धर्मविषय अत्यंत गंभीर व समजण्यास कठीण असल्याचं सांगितलेलं आहे. प्रतीत्यसमुत्पादाच्या परिप्रेक्ष्यात बुद्ध तत्त्वज्ञानाची ‘साधारण प्रतीत्य समुत्पाद’ व ‘लोकोत्तर प्रतीत्यसमुत्पाद’ या दोन भागांत विभागणी होते.
बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेताना असं लक्षात येतं की, ज्ञानप्राप्तीच्या अनुभवातली चार अरिय सत्ये आणि प्रतीत्यसमुत्पाद यांच्यात घनिष्ट संबंध आणि कारणतेचे तत्त्व-नियम, कृती आणि परिणाम समान आहे. ही चार अरिय सत्ये दोन भागांत विभागली गेलेली आहेत. पहिल्या भागात दु:ख आणि दु:खाचे कारण, तर दुसऱ्या भागात दु:खाचा निरोध आणि दु:ख-निरोधाचा मार्ग यांचा समावेश आहे.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७
..................................................................................................................................................................
आणि या दोन्ही भागांत कारण आणि परिणामाच्या नियमांचा संबंध आहे. प्रतीत्यसमुत्पादात बुद्ध कारणात्मक प्रक्रियेचे सोदाहरण सखोल विश्लेषण करतात. उदा. दिव्यात जळणारी ज्योत दिव्याच्या तेल आणि वातीवर आधारलेली असते. यांतला एक जरी भाग नसेल, तरी ज्योत जळायची थांबते. बुद्धांचे दृष्टान्त नित्यनैमित्तिक उदाहरणांवर आधारित आहेत. कोणत्याही कारणांची माहिती किंवा स्पष्टीकरण न देता, म्हणजे विश्वाची उत्पत्ती, उत्क्रांती या विषयीच्या चर्चेत वेळ न घालवता थेट ‘दु:ख जाणून घेणे’ आणि ‘दु:खापासून मुक्ती मिळवणे’ यांतल्या संबंधाची शिकवण प्रतीत्यसमुत्पाद देतो.
ज्या प्रश्नांच्या उत्तरांचा मानवी दु:ख दूर करण्यास उपयोग होत नाही, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात किंवा सांगण्यात बुद्धांना अजिबात रस नाही. त्यांना ‘आत्ता आणि हा क्षण’ यांतले दु:ख दूर करणे गरजेचे व अत्यावश्यक वाटतं. म्हणूनच त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मुख्य उद्देश लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
प्रतीत्य समुत्पादाच्या नियमात अविद्या, संस्कार, विज्ञान, नाम-रूप, षडायतन (सहा इंद्रिये), स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाति व जरा-मरण या बारा कड्या आहेत. त्या समजून घेण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग, तीन काळाच्या क्रमानुसार. यात अविद्या, संस्कार पूर्वायुष्यात, विज्ञान, नाम-रूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव वर्तमान जगण्याशी संबंधित आहेत. यामध्येच या जन्मातील आयुष्याच्या उत्क्रांतीची प्रक्रिया समाविष्ट आहे. जरा-मरण भविष्यातील दु:खाचं प्रतिनिधित्व करतात. याच बारा कड्यांच्या निदानाला - जे एकाच जन्मातल्या क्लेश, कर्म आणि दु:ख या तीन गटांत विभागलेलं आहे - ‘वर्तुळाकार चक्र’ म्हणतात. क्लेषाच्या गटातल्या अविद्या, सतृष्णा व आसक्ती यांत अविद्या मूलभूत आधार होते. जिच्यामुळे व्यक्ती अस्तित्व, इंद्रियोपभोग व अनासक्तीची तृष्णा बाळगतो, निरनिराळ्या आसक्तींना चिकटून राहतो; इंद्रियानुभव, कामोपभोग व आत्म्या यांसारख्या कल्पनांना चिकटून राहतो.
प्रतीत्य समुत्पाद मध्यममार्गाची अभिव्यक्ती आहे, असं निरीक्षण नोंदवताना लेखक म्हणतो की, कोणतीही टोकाची गोष्ट टाळणे, म्हणजे मध्यममार्ग. यामध्ये कामोपभोगात रत राहणे, कठोर दमन याबरोबरच अनंतवाद, शाश्वतवाद (eternalism), त्याचबरोबर उच्छेदवाद यांसारखी टोके टाळणे अपेक्षित आहे. ‘मध्यममार्ग’ हा संयम आणि संतुलन सूचित करणारा शब्द. या ठिकाणी मनुष्यजन्माचा अर्थ आहे - मनुष्यत्वाला अर्थ देणे. मध्यममार्गाच्या आचरणाने जगण्यात आनंद व शांतता प्राप्त करता येते. वाघीण ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांची काळजी घेते, त्यांना पकडताना संयम आणि संतुलन ठेवते, त्याप्रमाणे बुद्ध आपल्या विचारांची हळूवार मांडणी करतात, असं सांगताना भौतिकी आणि आधुनिक विज्ञानाच्या नियमांच्या माध्यमातून साधला जाणारा निसर्गाचा समतोल हा एक प्रकारचा मध्यममार्गच असल्याचं ते सूचित करतात.
‘ये धम्मा हेतुप्पभवा हेतू तेसं तथागतो आहे । तेसं चयो निरोधो एवंवादी महासमणो’ म्हणजे बुद्ध म्हणतात, धर्म तोच असतो, जो प्रतीत्य समुत्पन्न असतो. या ठिकाणी ‘धर्म’ म्हणताना ‘नियम’ किंवा ‘मार्ग’ अपेक्षित आहे. प्रतीत्यसमुत्पाद धर्म तथात व सारभूत आहे; बुद्धाचा समस्त उपदेश व दर्शन यांचा तो पाया आहे. ‘य: प्रतीत्यसमुत्पाद पश्यति स धर्म पश्यति। य: धर्म पश्यति, स बुध्द पश्यति।’ या ‘मज्झिमनिकाय’मधील सूत्रात प्रतीत्यसमुत्पादाचं महत्त्व आलेलं आहे.
घटना आणि घटितं यांच्या संदर्भात बुद्धांचा विचार खूप सखोल आहे. ते सांगतात की, केवळ एकच हेतू वा प्रत्यय यांतून पदार्थाची निर्मिती होत नाही. कोणतीही एक गोष्ट एखाद्या वस्तूच्या वा घटकाच्या निर्मितीला कारणीभूत असत नाही. त्यामागे कारणं असतात; असू शकतात. जग आणि जगातील पदार्थ आपापले हेतू व प्रत्यय यांवर अवलंबून असतात. कारण आणि परिणाम यांचे स्वरूप म्हणजे निर्मिती. जगात काहीच नित्य वा शाश्वत नाही. संसाराचे मूळ अविद्या आहे, ज्याच्यामुळे व्यक्ती कर्म करण्यास प्रवृत्त होतो, त्या कर्माचे फळ प्राप्त करतो वा भोगतो. हे सांगताना बुद्ध म्हणतात की, कर्म करणारा आणि फळ भोगणारा पाच स्कंदांनी बनलेला असतो; स्कंदाद्वारेच प्रज्ञा प्राप्त करत असतो.
प्रतीत्यसमुत्पादात ‘आत्मा’ आणि ‘पुनर्जन्म’ या संकल्पनांना स्थान नाही, किंबहुना ‘अनात्मता’ हाच बुद्धविचाराचा पाया आहे. बारा कड्यांमध्ये अनुलोम (संसार प्रवृत्तीची व्यवस्था) आणि प्रतिलोम (संसार निवृत्तीची व्यवस्था) या द्विविध प्रक्रिया आहेत. तथागतांनी म्हटलं आहे, ‘जोपर्यंत व्यवहारात अविद्या व अज्ञान असेल, तर मी सांगतो, दु:खाचा नाश केला जाऊ शकत नाही’.
‘व्यवहार आणि परमार्थ’ प्रतीत्यसमुत्पादाची नीती आहे, ज्यावर संपूर्ण जीव-जगत परिचालित आहे. आनंदला दिलेल्या एका उत्तरात बुद्ध म्हणतात की, प्रतीत्यसमुत्पादात कुशलता प्राप्त केल्याशिवाय कोणत्याही भिख्खूला संबुद्ध म्हणता येणार नाही.
प्रतीत्यसमुत्पादात एकीकडे जीव-जगतची व्याख्या आहे, तर दुसरीकडे विश्लेषणाद्वारे जीव-जगतच्या प्रपंचातून मुक्त होण्याचा मार्गदेखील आहे. यातूनच विपरीत-विकारयुक्त दृष्टीचा नाश होऊन सम्यक दृष्टी प्राप्त होते, मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. बुद्धांना झालेल्या प्रतीत्य समुत्पादाच्या साक्षात्काराकडे लेखक ‘एक अभूतपूर्व घटना’ म्हणून पाहतो. ज्या नागार्जुनाने आपल्या बौद्धदर्शनाची मांडणी प्रतीत्यसमुत्पादावर करून विचारजगताला नवी दृष्टी दिली असं मानलं जातं, त्याच्या मते प्रतीत्यसमुत्पाद कार्यकारण संबंधातल्या मिथ्या, गैरसमजुतीयुक्त धारणांचे खंडनमंडण करतो, प्रपंचातील उपशांत, शिवलक्षण व यथाभूतांचे प्रकटीकरण करतो.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे बुद्धांचं तत्त्वज्ञान गहन, अथांग आहे. सातिमोक्खशी त्यांच्या झालेल्या संवादातून निघणारे अर्थ एखाद्या कॅलिडोस्कोपसारखे विविध रूप व रंग यांनी दिपवणारे आहेत. विज्ञान विज्ञानमात्र आहे; जाणीव जाणीवमात्र आहे, ते कारणोद्भव म्हणून वेगवेगळ्या संज्ञा-जाणीवा निर्माण करणारं आहे. बुद्धांनी विज्ञानाला परिशुद्ध, उज्वल व सम्यक दृष्टी म्हटलं असलं, तरी ‘ते अनित्य आहे व त्याचा आग्रह, आसक्ती धरू नका’ असं सांगायला ते विसरत नाहीत.
प्रतीत्यसमुत्पाद एक होडी आहे. त्याचा वापर संसारातील दु:खे पार करून जाण्यासाठी करावा, असं ते सांगतात. प्रतीत्यसमुत्पादामागे बुद्धांची अनात्मता, अनित्यता आणि दु:खाची दृष्टी आहे. जे काही घडतं, ते कोणत्यातरी कारणांमुळे घडतं, असं सांगताना त्याचा लोप-निवारण करता येणं शक्य आहे, असं म्हणून ते साधक व सर्वसामान्य अशा दोन्ही घटकांना आश्वस्तही करतात.
बुद्ध सांगतात की, दु:खाला कारणीभूत असणारं सर्वांत महत्त्वाचं तत्त्व म्हणजे माणसाची तृष्णा आहे. या तृष्णेमुळेच अनात्मता, आत्मा आणि अनासक्ती त्याचप्रमाणे ते परस्परात एक-दुसऱ्याच्या अस्तित्वाचं कारण आहे. हे मनुष्य समजू शकत नाही. प्रतीत्यसमुत्पादाच्या माध्यमातून बुद्ध भूतकाळातील सर्व परिणामांची, त्यांच्या अस्तित्वाची मीमांसाच करायला सांगतात.
याचाच अर्थ असा की, आत्मा आणि नित्यता यांमुळे वस्तूचे नित्य अस्तित्व प्रस्थापित होते - भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, अध्यात्मिक वा भौतिक, स्थूल किंवा सूक्ष्म, हीन वा श्रेष्ठ, दूर किंवा जवळ यांतूनच आपली तृष्णा विस्तृत होत जाते.
प्रतीत्यसमुत्पादानुसार जगातील प्रत्येक घटना ‘कारण’ आणि ‘परिणाम’ यांच्या साखळीतून निर्माण झालेली असते. कारण आणि परिणाम ही सातत्याने सुरू असणारी प्रक्रिया आहे. बुद्धाच्या एका सूत्रानुसार, कुठल्याही गोष्टींच्या उगमापर्यंत जाता येते, एखाद्या गोष्टीतून कशाची निर्मिती झाली, याचा शोध घेता येतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, प्रतीत्यसमुत्पाद कारणांचा एकदम शोध घेत नाही वा त्याच्या मुळाशी जात नाही. कारण त्यांच्या मते मूळ कारणांचा शोध घेणे म्हणजे ज्ञानाच्या विकासाचा संकोच करणे आहे.
बुद्ध म्हणतात, ‘जीवन-मृत्यू चक्राचा आरंभ कल्पनातीत आहे. जीवमात्रांच्या अस्तित्वाची कोणतीही प्रारंभिक सुरुवात सांगणे शक्य नाही. जे जीव अविद्येने, अज्ञानाने वेढलेले आहेत, तृष्णेच्या सापळ्यात अडकलेले आहेत, ते जन्ममृत्यूच्या वर्तुळात गरगर फिरत राहतात’. बुद्धांच्या समोर सर्वसामान्य माणूस होता आणि म्हणून त्याला समजेल, रुचेल अशा भाषेत आणि अशी उदाहरणे देत ते तत्त्वज्ञान सांगतात. संबोधी प्राप्त झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम केलेला उपदेश हा संसारातील दु:ख व दु:खमुक्तीचा मार्ग सांगणारा मध्यममार्गच होता.
बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची उकल करताना लेखक प्रतीत्यसमुत्पादाचा तपशील अतिशय सोप्या व सहज समजेल अशा भाषेत सांगतात, तर कधी त्याला पाश्चात्त्य विचारवंतांशी, आधुनिक काळातल्या उदाहरणांशी तुलनात्मक पद्धतीने जोडतात. ते प्रतीत्यसमुत्पाद अॅरिस्टॉटलच्या किंवा आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञांपेक्षा वेगळा मानतात, याचं कारण त्यांनी ‘कारण’ आणि ‘परिणाम’ या दोन भिन्न घटना मानल्या आहेत, तर प्रतीत्यसमुत्पाद या दोन्ही घटना भिन्न मानत नाहीत. जगातील कोणतीही गोष्ट वा घटना एकल अस्तित्वात येत नसते आणि म्हणून कार्यकारणतेची प्रक्रिया ही न थांबणारी साखळी आहे. यासाठी लेखक कुंभार, माती, चाक, पाणी या घटकांचा आणि माठ बनवण्याच्या एकमेकाशी निगडीत असलेल्या प्रक्रियेचा दाखला दिला. कोणत्याही घटनेचे सर्वांत शास्त्रशुद्ध, वैज्ञानिक व तर्कयुक्त स्पष्टीकरण केवळ प्रतीत्यसमुत्पाद सिद्धान्ताद्वारेच मिळू शकते, असा दावा करतात. ‘कारण’ आणि ‘परिस्थिती’ यांतून दु:ख अस्तित्वात येते, हे दाखवून देण्यासाठी बुद्धांनी प्रतीत्यसमुत्पादाची शिकवण दिली. केवळ मूळ कारण जाणून घेऊनच दु:खाचा लोप करता येणे शक्य असते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
प्रतीत्यसमुत्पादात बुद्धांनी प्राधान्याने मृत्यूचा विचार केला. याचाच अर्थ, जरा (म्हातारपण) आणि माणसाला होणारे क्लेश, त्याचप्रमाणे मृत्यू हे त्यांच्या सखोल चिंतनाचा भाग होते. बुद्ध म्हणतात ‘उत्पत्ती, स्थिती व लय ही अंतिम वास्तवाची वैशिष्ट्ये आहेत. उत्पत्तीनंतर स्थिती व लय येतात. जन्म म्हणजेच उत्पत्ती, अस्तित्वात असणे, जरा आणि लय म्हणजे मृत्यू. जरा-मरण अटळपणे पुनर्जन्माच्या मागे जातात. त्यांच्यासोबत क्लेश, परीवेदना (शोक), दु:ख, दोमानस (अतिदु:ख) आणि उपायास (निराशा) ही पाच प्रकारची दु:खे उद्भवतात. ते जाति (पुनर्जन्म) भवावर (becoming) परिस्थितीनुसार व परिस्थिती नसतांनाही उद्भवतात. भव दोन प्रकारे अस्तित्वात येतात - कर्म प्रक्रिया आणि पुनर्जन्म प्रक्रिया.
बुद्धांनी दु:खे आयडेंटीफाय केली, हे खरं, पण त्यांनी घेतलेला दु:खाच्या मूळ कारणाचा शोध, हे दुसरं अरिय सत्य. वास्तविक, या कारणाच्या स्पष्टीकरणासाठीच प्रतीत्यसमुत्पादाची निर्मिती झाली. त्याच्या निवारणासाठी बुद्धांनी ‘अरिय अष्टांगिक मार्गां’चा उपाय सांगितला. बुद्ध वारंवार सांगतात, ‘सगळ्या दु:खाला अविद्या हीच कारणीभूत असते आणि अविद्येच्या नाशानेच दु:खाची साखळी खंडित करता येते’. दु:खमुक्तीचा मार्ग म्हणून प्रतिलोम व अनुलोम क्रम सांगितला, संस्कार म्हणजे पुनर्जन्मामुळे निर्माण होणार्या चेतना वा कर्मनिर्मिती. त्याचे तीन प्रकार सांगितले, विश्व नियमही कथन केले.
बुद्धांनी प्रतीत्यसमुत्पादाचे दोन प्रकार सांगितले आहेत. भौतिक (लौकिक किंवा साधारण) आणि मानसिक (लोकोत्तर किंवा असाधारण). पहिल्या भागात म्हणजे साधारणमध्ये अविद्येमुळे होणाऱ्या जन्माच्या अवस्था, तर लोकोत्तरमध्ये जन्म-मरण ते (दु:खाचा) पुनर्जन्म. या ठिकाणी बुद्धांची ‘पुनर्जन्म’ ही संकल्पना नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. पुनर्जन्म म्हणजे दु:खाचा आणि माणसांच्या तृष्णांचा पुनर्जन्म असं समजायचं आहे. दु:खाची निर्मिती तृष्णेमुळे होत असते, तर तृष्णा अविद्येमुळे निर्माण होते. जन्म-मृत्यू-पुनर्जन्म या चक्राला ‘संसार’ असे म्हटले आहे. ‘या सांसारिक चक्रातून मुक्ती’ हा बुद्धाच्या शिकवण्याचा, उपदेशाचा मुख्य हेतू आहे. लोकोत्तर प्रतीत्यसमुत्पादात संसारातून व त्यातील सर्व दु:खांपासून मुक्तीचा विचार दिलेला आहे. निदान संयुक्तातील उपानिससुक्तात लोकोत्तर प्रतीत्य समुत्पादाविषयी सांगितले आहे. यात विकारांचा नाश करण्याचे ज्ञान व मार्ग या दोन्ही गोष्टी विशद केल्या आहेत.
बुद्धांनी कठोर परिश्रम व तपश्चर्या यांद्वारे मानवी जगण्याचे मूळ आणि वास्तव प्रतीत्य समुत्पादाद्वारे जाणून घेतले; संबोधी प्राप्त केली. सर्वांत प्रथम त्यांना चार अरिय सत्याचे ज्ञान झाले. बुद्ध आणि त्याचा धम्म जाणण्यासाठी प्रत्येकाला अरिय सत्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अरिय सत्यात मानसशास्त्रीय विचार आहे.
‘प्रतीत्यसमुत्पाद’ बुद्धाच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. बुद्धांचं अरिय तत्त्व असो, अनुलोम-प्रतिलाम असो वा अनात्मता, बुद्ध कायम तुकारामासारखा मानवी पातळीवर रागलोभासाहित आपलासा वाटणारा आहे. वयाच्या ८४व्या वर्षी मनाने, शरीराने भौतिक जगापासून तुटत चाललेले असतानाही बुद्धांनी आनंदला, ‘कोणालाही आश्रयदाता बनवू नकोस, धम्माला तुझा आधार बनव, धम्माखेरीज तुझा कोणी आश्रयदाता असणार नाही’ अशी शिकवण देणं, यात पित्याचं ममत्व आहे. दागिने घेऊन पोबारा केलेल्या गणिकेच्या शोधात वेळ घालवणाऱ्या तरुणांना ते विचारतात, ‘तुमच्यासाठी काय योग्य आहे? स्त्रीचा शोध? की आत्मशोध?’ हे त्यांचं विचारणं मानवी पातळीवरचं वाटून बुद्ध आपल्यातलाच एक वाटतो.
बुद्ध कोणत्याही प्रकारच्या अज्ञानाला, कमकुवतपणाला, भीतीला आणि वासनांना थारा देत नाहीत. देव, आत्मा या संकल्पना त्यांच्या धम्म संकल्पनेत कुठेच बसत नाहीत. परंतु समाजात देव, आत्मा आदी संकल्पना लोकविचारात इतक्या खोलवर रुजल्या आहेत की, या संकल्पनांच्या विरोधात ते काहीही ऐकायला तयार नसतात. बुद्ध जाणून होते की, ‘आपण जे सांगतोय, ते प्रवाहाच्या विरुद्ध आहे. सखोल असलं, तरी दिसायला कठीण समजायला कठीण. जे वासनेने, तृष्णेने लिप्त आहेत, अंधाराच्या अज्ञानाने वेढले गेलेले आहेत, ते सत्य, वास्तव, ज्ञान पाहू शकणार नाहीत; समजू शकणार नाहीत’.
बुद्धाला वाटतं, ‘हे ज्ञान जगाला थेट देणे योग्य होणार नाही’ आणि ते म्हणतात : ‘किच्छेन मे अधिगतं, हलं दानि पकसितुं। रागदोसपरेतेहि, नायं धम्मोसुसम्बुधो’. त्यांना ठाऊक होतं की, प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे, निपुण, गंभीर, जाणण्यास कठीण, आसक्तीत मग्न लोक, अविद्येच्या अंधकारात रूतून बसलेले हे समजू शकत नाही. दीघनिकायमध्ये ते म्हणतात, ‘हे ब्रह्मे, अमरत्वाचे द्वार त्यांच्यासाठी उघडले गेलेले आहे, जे श्रद्धेने ऐकतील’. अध्यात्मिक व बौद्धिक विकासाच्या स्तरावर ज्ञान पूर्ण समजू शकणारे, काही निम्मे समजू शकणारे तर काही प्रयत्नपूर्वक समजू शकणार्यांसाठी बुद्धाने ज्ञान सांगण्याचं ठरवलं. हे ज्ञान सोप्यात सोपं करून कसं सांगता यावं, यासाठी त्यांनी अनेक मार्गांचा वापर केला. त्यातलाच एक आसक्तीचे पाच घटक असलेला ‘पंचस्कंध’.
लेखक बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला आधुनिक विज्ञानातील क्वांटम थिअरीशी जोडतात. त्यानुसार कोणत्याही वस्तू, घटना भौतिक घटकांनी बनलेल्या नसतात. त्या सतत प्रवाहित असणाऱ्या ऊर्जेच्या प्रवाहांनी बनलेल्या असतात. सर्व आयतन, संध, धातू यांच्यात सहसंबंध घडवून आणून त्यांच्यात परस्परसंबंध, समतोल घडवून आणणारी ऊर्जा म्हणजेच भौतिक ऊर्जा. कुणी याला ‘आत्मा’ म्हणतात. आत्मा केवळ भौतिक ऊर्जा आहे. या ऊर्जेच्या प्रवहनासाठी शरीर हे माध्यम आहे. या समन्वयी ऊर्जेला वाहून नेण्याची, धारण करण्याची शरीराची क्षमता संपल्यामुळे ती बाहेर पडू शकत नाही. ज्याला आपण मेला असं म्हणतो. ही बदलणारी अवस्था म्हणजे शून्यावस्था. सुत्तपिटकात बुद्ध अनात्मता समजावून सांगतात, त्याप्रमाणे ‘मज्झिमनिकाय’, ‘अंगुत्तरनिकाय’, ‘संयुक्तनिकाय’, ‘उपानिससुक्त’, ‘विसुद्धीमाग्ग’ आदींमधूनही धम्माची विविध तत्त्वं विशद करतात. ‘माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझे शब्द अंतिम नाहीत. आपणच आपले मार्गदर्शक व्हा; पथदर्शक व्हा,’ असा उपदेश ते लोकांना करतात.
बुद्धांचं तत्त्वज्ञान लेखकाने सोप्या, सहज समजेल अशा भाषेत आपल्यासमोर ठेवलं आहे, हे जरी खरं असलं, तरी जगण्याला आधार देणाऱ्या कोणत्याही माणसाच्या उपदेशावर जर आपल्याला पुढील आयुष्य काढायचं असेल, तर ती व्यक्ती आधी माणूस म्हणून कशी आहे? कुठून आली? कशी जगली? जगताना तिने किती परिश्रम घेतले? या व्यक्तीचा इतर माणसांशी व्यवहार कसा होता? या व्यक्तीचं स्वतःच्या जगण्याचं तत्त्वज्ञान काय आहे? हे समजून घेणं आवश्यक असतं. म्हणून केवळ अनुयायांनाच नाही, तर ज्यांना ज्यांना बुद्ध समजून घ्यायचा असेल, त्यांनी त्यांनी प्रतीत्यसमुत्पाद वाचणं, समजून-जाणून घेणं आवश्यक आहे.
लेखकाने खूप माहिती जिज्ञासूंसाठी साध्या-सोप्या भाषेत समोर ठेवलेली आहे. ते तेवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर अध्यात्म, धर्म, तत्त्वज्ञान, दर्शन हे सर्व एका बाजूला ठेवून ते ‘बुद्ध हा मानवी सभ्यतेच्या इतिहासातला क्वांटम लीप आहे’ असं सांगतात. त्याला आधुनिक विज्ञानाशी, भौतिकीशी जोडून घेतात, हे महत्त्वाचं! बुद्धांची ‘शून्य’ संकल्पना विशद करताना ते प्रतीत्यसमुत्पादातील काळ-अवकाश संकल्पनाही सांगतात, ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभवा’चं आणि नागार्जुनाच्या ‘मूलमध्यमकालिके’चं तौलनिक विश्लेषण करतात; साम्य सांगतात.
लेखक म्हणतो की, ‘अमृतानृभव’ हे नागार्जुनांच्या द्वैती तत्त्वज्ञानाचे नवीन आकलन आहे; अर्थनिर्णयन आहे. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात पूर्वपक्ष व उत्तरपक्ष अशी मांडणी करताना पूर्वपक्षात शंकराचा अद्वैती सिद्धान्त मांडला. म्हणजे शंकराचार्यांचा मायावाद निवृत्तीनाथांनी मांडला आणि ‘मोडोनि मायाकुंजरू’ म्हणजे तो निरर्थक कसा आहे, हे दाखवतांना त्याला खोडून काढण्यासाठी उत्तर पक्षाची मांडणी केली. अशी मांडणी करताना प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे चाचण्या, पडताळण्या आणि मग निष्कर्ष अशी शास्त्रीय पद्धत अवलंबतात. एखादी गोष्ट कशी अस्तित्वात नाही, हे सिद्ध करत करत ती कशी अस्तित्वात आहे, हे दाखवून देण्याची विलक्षण हातोटी ज्ञानेश्वरांनी वापरलेली आहे. अविद्या आणि अज्ञान कसे अस्तित्वात नाही, हे सांगता सांगता अविद्या व अज्ञान यांचं सखोल चिंतन ते मांडतात. त्यातूनच अविद्या व अज्ञान दूर करण्यासाठी अविद्या काय आहे, अज्ञान म्हणजे काय हे समजून घ्यावं लागतं.’
शंकराचार्यांचा मायावाद आणि नागार्जुनांचा शून्यवाद यावर विस्तृत व तुलनात्मक विवेचन लेखकाने केलं आहे. शून्यवाद आणि मायावाद या संपूर्ण विचारधारेत मुख्य फरक फक्त हेतूंचा आहे, असं ते म्हणतात. बौद्धांनी आपले तत्त्वज्ञान समानता निर्माण करण्यासाठी वापरले, तर वेदान्त तत्त्वज्ञान वर्णवर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी वापरले गेले किंवा ज्ञानेश्वर काश्मिरी शैव मतानुयायी होते, आणि तो शैववाद म्हणजे पूर्वीचा बौद्धांचा विज्ञानवाद किंवा यातल्या वादात पडणं हा या लेखाचा उद्देश नसला तरी लेखक यातून ज्ञानेश्वरांचे बुद्धाशी थेट नातं सूचित करतात. त्यांचं बुद्ध आणि धम्माशी जितकं जिव्हाळ्याचं नातं आहे, तितकंच ज्ञानेश्वरांशी आतड्याचं नातं असावं, असं वाटत राहतं.
याच प्रेमातून ज्ञानेश्वरांच्या लेखनाचं, साहित्याचं, त्यांच्या ‘अमृतानुभवा’चं निरुपण भौतिकी व क्वांटम भौतिकीच्या अंगाने होण्याची आवश्यकता प्रतिपादन करतात. लेखक बुद्धधम्म, नागार्जुन, क्वांटम भौतिकी आणि प्रतीत्यसमुत्पाद यांचा केवळ एकमेकांशी संबंध प्रस्थापित करत नाही, तर ज्या संकल्पना आज क्वांटम भौतिकीत व कॉग्निटीव्ह मानसशास्त्रात ‘आधुनिक’ म्हणून मांडल्या जात आहेत, त्याहून अधिक विकसित संकल्पना नागार्जुन आणि एकूण बौद्ध तत्त्ववेत्यांनी सिद्ध केल्याचा दावा लेखकाने केलेला आहे.
मूलमध्यमकारिकातील प्रत्यय परीक्षा, संस्कार परीक्षा, स्कंध परीक्षा, धातू परीक्षा, स्वभाव परीक्षा यांतल्या निवडक कारिकांचे अनुवाद लेखकाने उदाहरणादाखल दिले आहेत. संपूर्ण ग्रंथामध्ये लेखकाने बुद्ध आणि त्याच्या धम्माला विविध अंगांनी आइनस्टाईन, न्यूटन, श्रोडिंजर, गॅलिलियो अशा अनेक वैज्ञानिकांचे आधार देत, त्यांच्या सूत्रांनी सिद्ध केलेल्या कसोट्यांवर घासून घेत, प्रतीत्यसमुत्पाद व आधुनिक भौतिक विज्ञान या दोघांमधील तुलनात्मक वास्तव आणि आकलन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
काही वर्षांपूर्वी ‘शून्यता : काळ आणि अवकाश संकल्पना’ या विषयावर नितीन वाघ यांचा महत्त्वपूर्ण लेख एका अंकात प्रसिद्ध झाला होता. यात त्यांनी ‘काळ’ आणि ‘अवकाश’ या दोन्ही भौतिकी संज्ञा वास्तवाशी कशा जोडल्या गेल्यात, क्लिष्ट आणि जटील असणारं आणि मानवी आकलनाच्या पलीकडे असणारं वास्तव म्हणजे नेमकं आहे काय; स्वच्छ, इंद्रियगम्य वास्तव हे आभासी किंवा भ्रम कसं असू शकतं; सत्य, वास्तव सारं काही समोर दिसत असताना यातलं मायावी कोणतं आणि खरोखरीचं कोणतं, वास्तवाचा शोध घेण्याच्या पद्धती आणि व्यवस्था आहेत का? संकेत, प्रतीकं, चिन्ह यांनी होणारं आकलन म्हणजे वास्तव. वास्तवाच्या स्वरूपाच्या आपल्या मनातल्या धारणेलाच आपण माया म्हणतो तोच शंकराचार्यांचा मायावाद आणि नागार्जुनाचा शून्यवाद होय. सत्य, वास्वव, प्रत्यक्ष प्रमाण, माणसाची विश्वरूप समजून घेण्याच्या आकलनाची मर्यादा दाखवणं हे कार्य मायावाद करत असला तरी जगणं पराधीन आहे, असं म्हणण्यात मायाजालात गुरफटणं आहे.
या ठिकाणी लेखक सांगू पाहतो आहे की, भौतिकी विज्ञान एका बाजूला विश्वाचे नियम मांडत असताना मायावादामुळे सामान्य माणूस या नियमांपासून दूर जातो आहे. जगण्यासाठी वास्तवाचं स्वरूप, भान असणं माणसाला आणि किमान कलावंतासाठी आवश्यक असतं. कारण कोणताही कलावंत आपल्या कलेतून वास्तव उजागर करत असतो. My human faces are truer than real हा आत्मविश्वास देणारं विश्वाचं स्वरूप, वास्तव समजून घेण्यासाठी काळ-अवकाश काय आहे, त्यात आपलं स्थान कुठे आहे याची किमान कल्पना वास्तव समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रकरणात लेखक काळ आणि अवकाश याचा तपशिलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करतो. क्वांटम थिअरीनुसार, ‘वर्तमानकाळच नाही’ असं सिद्ध होणार असेल, तर आपण जगतो तो काळ कोणता? प्रत्येकाचा भूत, भविष्य, वर्तमान वेगळा असतो. मग समकाल कुणाचा? असे अनेक प्रश्न उपस्थित करतो. मितीची संकल्पना मांडतो. सापेक्षताच पाचवी मिती कशी आहे आणि प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र मिती कशी असते, याचं प्रतिपादन करतो.
या ठिकाणी काळ आणि अवकाश या संकल्पनेचा नुसता मागोवाच नाही, तर तिचा धागा नागार्जुनाच्या मूलमध्यमकारिकेपर्यंत तो नेतो. तो सांगतो की, काळ अनंत व शाश्वत नाही; मर्यादित आहे; क्षय होणारा आहे. काळाविषयीचं प्रदीर्घ चिंतन लेखकाने केलंय, ते कण स्वरूपापर्यंत. मग अवधी म्हणजे काय? मितीय काळ म्हणजे काय? आपण काळात जगतो की काळ आपल्यात जगतो? काळ नेमका कसा असतो? तो कसा काम करतो? अशा प्रश्नांमध्ये काळ हा प्रत्येक प्रतलांचं अनेक गुंतागुंतीच्या संरचनांचा समुच्चय असतो. ‘काळ’ हा अवकाशातल्या प्रत्येक बिंदूंसाठी स्वतंत्र, वेगळा असतो. काळाच्या महाजाळात प्रत्येक घटनेची वेगळी वेळ असते, त्या वेळेलाच ती घटना घडते. घटना व काळ परस्परपूरक व सापेक्ष आहेत.
विश्व हे घटना-कारण-परिणाम यांच्या कार्यकारणभावाच्या काम करत असतं. कारण आणि परिणाम यांची निर्मिती म्हणजे विश्वात घडणारी कोणतीही घटना. कारण आणि परिणाम यांशिवाय घटिते शक्य नसतात. कार्यकारणाशिवाय परिणाम शक्य नसतो. हेच बुद्धाचं प्रतीत्य समुत्पन्नचक्र. बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या अंगाने लेखक चर्चा करीत असला, तरी गीता, ज्ञानेश्वर इथपासून आधुनिक विज्ञानाचा आधार लेखक आपल्या प्रतिपादनात घेतो. ‘ ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहन्ति पावक:’ हा गीतेतला श्लोक थर्मोडायनामिक्सचा, ऊर्जेचा नियम आहे’ असं लेखक सांगतो.
शेवटी लेखक म्हणतो की, ‘आपली काळजाणीव स्मृतींशी जोडलेली असते. प्रत्येक अस्तित्व हा एक इतिहास असतो. काळाची जाणीव, त्यात घडणाऱ्या घटना मानसिक संरचनेच्या मध्यभागी असतात. हाच आपल्यासाठी काळाचा प्रवाह असतो. वास्तवाची निर्मिती केवळ स्मृतीतून होत असते. स्मृती म्हणजे मागोवांचा समुच्चय. स्मृतीमुळे काळाचं आणि अस्तित्वाचं भान माणसाला होत असतं. स्मृती आणि वेदना मानवी अस्तित्वाचे स्रोत असतात. काळ हा स्मृती असतो तसेच दु:ख आणि वेदनाही’. हाच विचार बुद्धांनी मांडला. ज्या ज्या गोष्टीला आरंभ आहे, त्यांना अंतही आहे.
‘काळ अनंत आहे’ ते ‘काळ अस्तित्वातच नाही’ एवढ्या मोठ्या कॅनव्हॉसवर लेखक जे सांगू पाहत आहे, ते बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या परिप्रेक्ष्यात असलं, तरी व्यापक अर्थाने ते मानवतेच्या विशाल परिप्रेक्ष्यातलं आहे. धर्मजाणिवा, धारणा बाजूला ठेवून प्रत्येकाने अस्तित्वाच्या अनेक शक्यतांचा शोध घेण्यासाठी विश्वाचे नियम समजून घेणं आवश्यक आहे.
बुद्ध म्हणतात, ‘काळ हा दु:ख आहे’ या वास्तवाचं भान येणं, या अरिय वास्तवाला सामोरं जाणं, दु:खमुक्तीचा मार्ग प्रत्येकाने शोधणं हेच माणूस असण्याचं सार आहे. अंतिमत: प्रत्येक व्यक्तीला एक काळ, एक वास्तव, एक वर्तमान हे घटक मिळालेले आहेत. आपल्याला मिळालेल्या काळाचं, वास्तवाचं आणि वर्तमानाचं तो काय करतो, हे त्याच्या जगण्याचं मुख्य आणि मूलभूत तत्त्व असतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
कोणतंही दर्शन किंवा तत्त्वज्ञान हा मुळातच किचकट विषय असतो. त्यातल्या संदर्भांना पुष्टी मिळावी म्हणून पूर्वसूरींच्या पुस्तकांचा, संशोधनाचा संदर्भ असणे अनिवार्य असते. या ग्रंथातही लेखकाने असंख्य इंग्रजी संदर्भांबरोबरच जवळपास ३६ मराठी व १४ हिंदी संदर्भग्रंथांची नावे दिलेली आहेत. पुस्तकात उल्लेखिलेले तपशील, ग्रंथातील नेमका संदर्भ यांचे उल्लेख फूटनोटमध्येच असल्यावर त्या जुळणीचा वाचक, अभ्यासक व संशोधकांना तुलनात्मक फायदा झाला असता. असं असलं, तरी ही प्रदीर्घ सूची लेखकाने या कामासाठी घेतलेल्या परिश्रमाचं, व्यासंगाचं निदर्शक आहे.
नितीन भरत वाघ यांनी अफाट मेहनतीने, विश्लेषणात्मकतेने व अभ्यासपूर्णतेने बुद्ध आणि त्याचा धम्म याची उकल करता करता धम्माला विज्ञानाशी, क्वांटम थिअरीशी, आइनस्टाईन आदी वैज्ञानिकांच्या संशोधन व निरिक्षण यांच्याशी जोडून बुद्धांना आधुनिक वैज्ञानिकतेच्या अगदी निकट आणलंय.
आइनस्टाईन म्हणालाच आहे – “The religion of the future will be cosmic religion. It should transcend a personal God and avoid dogmas and theology.” महत्त्वाचं आहे तो आइनस्टाईन विश्वास म्हणतो – “If there is any religion that would cope with modern scientific needs, it would be Buddhism”.
‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ - नितिन भरत वाघ
आऱ्हान बुकस्मिथस्, नाशिक
मूल्य - १०० रुपये
..................................................................................................................................................................
राजीव जोशी
joshrajiv@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment