पंढरीचे अभंग, विठ्ठलाची उराउरी भेट, तुकाराम आणि मी… (उत्तरार्ध)
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास जोशी
  • तुकाराममहाराज, तुकारामगाथा आणि विठ्ठल
  • Tue , 20 July 2021
  • पडघम सांस्कृतिक तुकोबा Tukoba तुकाराम महाराज Tukaram Maharaj तुकोबाची अभंगगाथा Tukobachi Abhanggatha विठोबा Vithoba विठ्ठल Vithhal

आज आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने तुकाराममहाराजांच्या पंढरीच्या १४ अभंगांविषयीचा हा विशेष लेख. या लेखाचा पूर्वार्ध काल प्रकाशित झाला होता...

..................................................................................................................................................................

‘पंढरीचे अभंग, विठ्ठलाची उराउरी भेट, तुकाराम आणि मी…’ या लेखाच्या पूर्वार्धासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/article_detail/5324

..................................................................................................................................................................

७)

पंढरिये माझें माहेर साजणी। ओंविये (त्या) कांडणी गाऊं गीतीं।।

राही रखुमाई सत्यभामा माता। पांडुरंग पिता माहियेर।।

उद्धव अक्रूर व्यास अंबऋषि। भाई नारदासी गौरवीन।।

गरुड बंधु लडिवाळ पुंडलिक। यांचे कवतुक वाटे मज।।

मज बहु गोत संत आणि महंत। नित्य आठविती ओंवियेसी।।

निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया। जिवलग माझिया नामदेवा।।

नागो जगमित्र नरहरि सोनारा। रोहिदास कबिरा सोईरिया।।

परिसा भागवता सुरदास सांवता। गाईन नेणता सकळांसी।।

चोखामेळा संत जिवाचे सोईरे। न पडे विसर यांचा घडी।।

जीवींच्या जीवना एका जनार्दना। पाठक हा कान्हा मिराबाई।।

अणीकही संत महानुभाव मुनि। सकळां चरणी जीव माझा।।

आनंदे ओंविया गाईन मी त्यांसी। जाती पंढरीसी वारकरी।।

तुका म्हणे माझा बळिया बापमाय। हर्षे नांदे सये घराचारी।।

(अभंग क्रमांक - १०१२)

पंढरी हे माझे माहेर आहे. आता आपण जात्यावर माझ्या माहेरच्या माणसांच्या ओव्या गाऊ. माझ्या माहेरी रखुमाबाई आणि सत्यभामा या माझ्या माता राहत आहेत आणि माझा पिता पांडुरंग राहात आहे.

उद्धव, अक्रूर, व्यास, अंबरीश आणि नारद हे माझे बंधुसुद्धा इथेच राहत आहेत आणि मी त्यांचा गौरव करत आहे. गरुड आणि माझा लाडका पुंडलिक हे माझे बंधू आहेत. आणि त्यांचे अतिशय कौतुक मला वाटत राहते आहे. संत-महंतांचा पुष्कळ गोतावळा मला आहे. त्यांच्यासाठी नित्यनियमाने मी ओव्या गात राहीन. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव आणि नामदेव हे माझे जिवलग आहेत. जगमित्र नागा, नरहरी सोनार, कबीर आणि रोहिदास हेसुद्धा माझे आवडते सोयरे आहेत. परिसा भागवत, सूरदास आणि सावता माळी यांचा अधिकार मी खऱ्या अर्थाने जाणत नाही, तरीपण, मी त्यांचे गोडवे गात राहतो. संत चोखामेळा हा माझ्या जिवाचा आवडता आहे. त्याचा विसर मला क्षणभरसुद्धा पडत नाही. एकनाथ आणि जनार्दन स्वामी हे माझ्या जिवाचे जीवन आहेत. त्याचप्रमाणे माझे आवडते पाठक कान्हा आणि मिराबाई आहेत. त्यांच्याशिवाय इतरही महानुभावी संत आणि मुनी इथे पंढरीत आहेत. या सर्वांच्या चरणी माझा जीव आहे. जे जे वारकरी पंढरीस जातात त्यांच्या ओव्या मी अत्यंत आनंदाने गातो. हा तुका म्हणतो आहे की, माझे आईबाप अत्यंत बलशाली आहेत आणि त्यांचे गुण गाऊन मी अत्यंत सुखाने घरात राहतो. माझा मायबाप पांडुरंग या प्रकाराने चराचराच्या प्रत्येक कणात राहतो आहे. या अर्थाने तो बलशाली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

म्हणजे या जगात अस्तित्व आहे आणि ते जाणता यावे म्हणून जाणीव आहे. शिवाय इथले प्रत्येक अस्तित्व आणि जाणीव स्वतःवर प्रेम करते आहे. म्हणजेच माणसात स्वतःवर आणि दुसऱ्यावर प्रेम करण्याची क्षमता आहे. म्हणजेच देव सर्वत्र आहे.

तुकोबा म्हणाले – ‘‘उद्धव, अक्रूर, अंबरीश ऋषी, आणि नारद या चौघांना ‘भक्तश्रेष्ठ’ का म्हणतात, हे तुला माहीत आहे काय? ज्ञानेश्वर आणि इतर श्रेष्ठ अशा संतांची भक्ती कशी आहे, याचा तू विचार केला आहेस काय? विष्णुवाहन गरुड आणि भक्त पुंडलिक हे तुझे भाऊ आहेत, असे तुला वाटावे इतकी त्यांच्या आणि तुझ्या भक्तीची नाळ जुळली आहे काय? सगळ्या जातीतील आणि सगळ्या देशातील भगवंत-भक्त आपले सोयरे आहेत असे तुला वाटते आहे काय?’’

मी मनात म्हटले, ‘‘काय सांगू बुवा, अंबरीश ऋषी वगैरे लोकांच्या गोष्टीसुद्धा मला नीटपणे माहीत नाहीत. नारद हा पाहिल्या दर्जाचा भक्त आहे, हेसुद्धा मला माहीत नव्हते. तो एक कळलाव्या प्राणी आहे, एवढेच मला वाटत होते. भक्तीची जातकुळी माहीत असणे सोडा, मला इतक्या संतांची नावेसुद्धा एका दमात घेता येणार नाहीत.’’

तुकोबा अत्यंत प्रेमाने मला म्हणाले की, ‘‘अरे बाबा, खरी पंढरी या लोकांच्या लिखाणात आणि गोष्टींमध्ये राहते. या लोकांनी लिहिलेले श्लोक, ओव्या, अभंग, टीका, दोहे, हे सर्व सतत आपल्या मनात झिरपत राहिले पाहिजे. उद्धव, अक्रूर, व्यास, अंबऋषी, नारद, पुंडलिक, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव, नामदेवा, जगमित्र नागो, नरहरी सोनार, रोहिदास, कबीर, परिसा भागवत, सूरदास, सावता माळी, चोखामेळा, एकनाथ, जनार्दन स्वामी, पाठक कान्हा, मीराबाई अशा सगळ्यांच्या भक्तीची एक एक खूण आपण आपल्या हृदयात कोरून ठेवायची असते.

एक लक्षात ठेव –भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी। ब्रह्मींची ठेवणी सकळ वस्तु।।

भक्तीच्या पोटी ब्रह्म, वेद, तर्क सगळे जन्म घेते. तू भक्ती केलीस की सगळी रत्ने तुला वश होतील.’’

मी तुकोबाच्या पायावर डोके ठेवले. भक्तीचा एवढा प्रगाढ अर्थ या माणसाला माहीत होता. या माणसाला अत्यंत तरल संवेदना होत्या, अत्यंत तरल भावना होत्या आणि त्याच वेळी अद्वैतातील गूढ आणि अतीगूढ संकल्पनासुद्धा माहीत होत्या. भारतभरातील सगळ्या भक्तांचे लिखाण आणि त्यातील प्रकट आणि गूढ अर्थ त्याला माहीत होते. हे सगळे शिक्षणाचा अधिकार नसताना या माणसाने सुमारे चारशे वर्षापूर्वीच्या भारतात साधले होते. एवढी प्रतिभा आणि एवढा प्रयत्नवाद माझ्या रक्तात नियतीने भरला होता का? विठ्ठल जरी भेटला तरी मी त्याला काय तोंड दाखवणार होतो?

८)

पंढरीची वारी आहे माझे घरी। आणीक न करी तीर्थव्रत।।

व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन अहिर्निशीं मुखी नाम।।

नाम विठोबाचे घेईन मी वाचे। बीज कल्पांतीचे तुका म्हणे।।

(अभंग क्रमांक - १५९९)

कुलपरंपरेने पंढरीची वारी करण्याचा संप्रदाय आमचे घरी आहे, म्हणून मी अन्य कोणतेही तीर्थव्रत करत नाही. मी एकादशी हे व्रत मात्र जरूर करेन आणि हरीच्या सन्निध राहून त्याचेच नाव मी रात्रंदिवस गात राहीन. हा तुका म्हणतो आहे की, जगाच्या कल्पांताच्या नंतरही जे उरणार आहे, ते बीजनाम म्हणजे विठोबाचे नाव मी निरंतर वाणीने घेईन. विठोबा हेच या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लायाचे बीज आहे, म्हणजेच विठोबा हे या विश्वाच्या चक्राचे कारण आहे; त्यामुळेच कल्पांतात या जगाचा लय झाला तरी ते कारण उरून राहाणार आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७

..................................................................................................................................................................

तुकोबा म्हणाले – ‘‘हे बघ, विठ्ठल म्हणजे साक्षात ब्रह्मन् आहे. सर्व जगाचे कारण आहे. बीज असते म्हणून झाड होते, त्याप्रमाणे विठ्ठल आहे म्हणून जग आहे. विठ्ठल सर्व कारणांचे कारण आहे, ही तत्त्वज्ञानात्मक भूमिका तुला माहीत आहे काय? या जगाचे जे कूट असे कारण आहे त्याला उराउरी भेटायची तत्त्वज्ञानात्मक आस तुला लागली आहे काय? त्या आद्य बीजाची भेट घेण्याची प्रखर इच्छा व्हावी, इतक्या प्रेमाने त्या बीजाची करामत तू पाहिली आहेस काय? त्या बीजातून उमलून आलेला या जगाचा वृक्ष तू प्रेममय भावनेने पाहिला आहेस काय?’’

तुकोबांनी मिश्किल नजरेने माझ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले – ‘‘का तू त्या वृक्षाला लागलेली सुखाची फळे ओरबडण्यात मग्न आहेस?’’

या जगात रमलेले, मायेच्या आहारी गेलेले मन काय काय करते, हे तुकोबा अत्यंत बारकाव्यांनिशी जाणत होते. शेवटी याच मनाशी रात्रंदिन झुंजून ते विठ्ठलापर्यंत पोहोचले होते.

९)

पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे।।

पुंडलिका दिला वर। करुणाकरें विठ्ठले।।

मूढ पापी जैसे तैसे। उतरी कासे लावूनि।।

तुका म्हणे खरे झाले। एका बोले संताच्या।।

(अभंग क्रमांक - २२१७)

जे लोक पंढरीची वारी करणारे आहेत, ते मोक्षाचे अधिकारी आहेत. कारण - जे जे कोणी माझ्याकडे येतील त्यांना मी संसारातून मुक्त करेन - असा वर दयावंत विठ्ठलाने पुंडलिकास दिलेला आहे. इथे येणारे लोक मूर्ख किंवा पापी असे असले तरी देव त्यांना आपल्या कासेला लावतो आणि भवनदीतून त्यांना पार नेतो.

तुकोबा म्हणाले- ‘‘हे बघ, तुम्ही मूर्ख आणि पापी जरी असलात तरी पंढरीची आस लागणे, विठ्ठलाची खरी आस लागणे ही एकच गोष्ट तुम्हाला मोक्षाचे अधिकारी बनवते. आस लागणे ही खरी आध्यात्म्याची सुरुवात असते. संतांचा एक जरी बोल तुमच्या खऱ्या अर्थाने मनात ठसला, तरी तो तुम्हाला हळूहळू विठ्ठलापर्यंत घेऊन जातो. फक्त यात गंमत अशी आहे की, संतांचे एकतरी वचन तुमच्या मनात ठसावे एवढे तुमचे मन मुक्त झाले आहे काय?’’

मी तुकोबांना म्हणालो – ‘‘बुवा, मन मुक्त होणे वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. सध्या मी मूर्ख आणि असंवेदनशील आहे ही दोन सत्ये मनापासून स्वीकारण्याच्या मागे मी लागलेलो आहे.’’

तुकोबाराय मनापासून हसले. म्हणाले, ‘‘तुझा मूर्खपणा तू स्वीकारलास की, पांडुरंगाची आस तुझ्या मनात आपोआप तयार होईल.’’

१०)

पंढरीसी जाय। तो विसरे बापमाय।।

अवघा होय पांडुरंग। राहे धरूनियां अंग।।

न लागे धनमान।  देहभावे उदासीन।।

तुका म्हणे मळ। नासी तात्काळ हें स्थळ।।

(अभंग क्रमांक - ४६४)

जो पंढरीस जातो तो आपल्या आईबाप वगैरे गणगोताला विसरतो. तो सर्वस्वी पांडुरंगस्वरूप होतो आणि त्याच स्थितीने राहतो. द्रव्य आणि सन्मान ह्यांची इच्छा त्याच्या मनात राहात नाही. कारण, तो देहाविषयी उदासीन होतो. हा तुका आपल्याला सांगत आहे की, पंढरपूर हे स्थळ त्रिगुणमळाचा तात्काळ नाश करणारे आहे.

मी हसून तुकोबांना म्हणालो – ‘‘हा थोडा सोपा अभंग आहे कळायला’’.

तुकोबा म्हणाले- ‘‘देहभाव जाणे म्हणजे काय? या क्षेत्री आल्यावर मळाचा नाश होतो, म्हणजे नक्की काय होते?’’

मी वेड्यासारखा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो.

तुकोबा म्हणाले – ‘‘देहभाव म्हणजे माझा देह म्हणजेच मी आहे हा विचार. या देहाच्या पलीकडचा असा कोणीतरी मी आहे, हे कळणे म्हणजे देहभाव जाणे. आपल्यावरील मळाचा नाश म्हणजे काय? कुठला मळ आहे हा? आपल्याला जगाचे आकर्षण वाटते आहे त्याचा? की सत्व, रज आणि तमो गुणाचा मळ?’’

मला काहीच कळले नाही.

ते ओळखून तुकोबा म्हणाले – ‘‘गाथा वाच, संतसाहित्य वाच, नाम घेत राहा. सगळी गूढे हळूहळू तुला सरल होत जातील. पहिल्यांदा निर्मळ काय आहे ते तुला कळू देत. मग तुला मळ म्हणजे काय ते लगेच कळेल.’’

विश्वव्यापी माया। तिने झाकुळली छाया।।

‘‘आपल्या अंगाबरोबर छाया असते, तशी ब्रह्माबरोबर माया असते. ती मल-स्वरूप असते का?’’ तुकोबांनी माझ्या गोंधळलेल्या डोळ्यात बघत विचारले.

एका क्षणानंतर त्यांचे डोळे शून्यात स्थिर झाले आणि आपल्याशीच बोलावे तसे ते म्हणाले – ‘‘एक लक्षात ठेव पंढरीच्या वाटेवर काहीही सोपे नाही. विश्वाचे कोडे सोपे कसे असेल?’’

मी म्हटले- ‘‘बुवा, तुम्ही भक्तीत विव्हल होता होता तत्त्वज्ञानाच्या कठीण कसावर कसे टिकून राहाता?’’

तुकोबा म्हणाले – ‘‘पंढरीला जायचे म्हणजे भक्ती आणि बुद्धी असे दोन पाय लागतात. आणि हे पाय कमवायला लागतात.’’

११)

पंढरीचा वास धन्य तेचि प्राणी। अमृताची वाणी दिव्य देह।।

मूढ मतिहीन दुष्ट अविचारी। ते होती पंढरी दयारूप।।

शांति क्षमा अंगी विरक्ती सकळ। नैराश्य निर्मळ नारी नर।।

तुका म्हणे नाही वर्ण अभिमान। अवघे जीवनमुक्त लोक।।

(अभंग क्रमांक - ३१५३)

ज्यांना पंढरीवास घडत आहे, ते प्राणी धन्य होत. त्यांची वाणी अमृतमय असते आणि देह दिव्य असतात. मूढ, नीच, दुष्ट स्वभावाचे, अविचारी असे सर्व लोक पंढरीमध्ये राहिल्याने दयारूप होतात. शांती, क्षमा, विरक्ती, असे सर्व आध्यात्मिक गुण त्यांच्या ठायी राहायला येतात. तेथील स्त्री-पुरुष निराशेने आणि निस्पृहपणामुळे अंतर्बाह्य निर्मळ झालेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात की, जे लोक पंढरीस वास्तव्य करतात त्यांच्यात देहाविषयीचा अभिमान दिसून येत नाही. ते सर्वजण जीवन मुक्त झालेले दिसतात.

तुकोबा म्हणाले – ‘‘पंढरी कशी आहे ते तुझ्या थोडेफार लक्षात आलेले असेल. तू या खऱ्या पंढरीला राहायला गेल्यावर शांती, क्षमा, विरक्ती असे दैवी गुण तुमच्यात राहायला येतात.

सोलीव ते सुख अतिसुखाहुनी। उभे ते अंगणी वैष्णवांच्या।।

वृंदावन सडे चौक रंग माळा। नाचे तो सोहळा देखोनिया।।

सुरुवातीला तुम्ही कितीही मूर्ख, नीच, दुष्ट आणि अविचारी असलात तरी पंढरीला आल्यावर तुम्ही दयारूप होता. एक सुंदर आणि निर्मळ नैराश्य तुमच्या ठायी राहायला येते. आशा तुम्हाला बांधून ठेवलेले असते. अध्यात्मातली निराशा तुम्ही या मायारूप जगताच्या बंधनांच्या पलीकडे गेल्यावर तुमच्या हाताला लागते. जीवनमुक्त लोक तुमच्या अवतीभवती सतत असल्यावर अजून काय होणार? जीवनमुक्तीतील स्वातंत्र्य एकदा लक्षात आल्यावर ऐहिक सुखांच्या बंधनात कोण राहणार?”

१२)

पंढरीस दुःख न मिळे ओखदा। प्रेमसुख सदा सर्वकाळ।।

पुंडलिके हाट भरियेली पेठ। अवघे वैकुंठ आणियेले।।

उदिमासी तुटी नाही कोणा हानि। घेऊनिया धणी लाभ घेती।।

पुरले देशासी भरले सिगेसी। अवघी पंचक्रोशी दुमदुमीत।।

तुका म्हणे संता लागलीसे धणी। बैसले राहोनी पंढरीस।।

(अभंग क्रमांक - ६५१)

पंढरीत औषधाला देखील दुःख मिळत नाही. इथे निरंतरपणे पांडुरंगाचे प्रेमसुख वास्तव्य करत आहे. पंढरपूरचा पेठबाजार पुंडलिकाने भरवला आहे. तेथे त्याने पूर्ण परमात्मा पांडुरंग वैकुंठासहित आणला आहे. या पेठेत धंद्याला तूटच येत नाही. कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. या ठिकाणी सर्व लाभाची पूर्ण प्राप्ती होते. या बाजारामध्ये पांडुरंग हा माल सर्व देशाला पुरेल असा शीग लागेपर्यंत भरला आहे. पंढरीची पंचक्रोशी त्या मालाने दुमदुमून गेली आहे. हा तुका म्हणत आहे की, सर्व संतांची तृप्ती होईल असा माल हाताला लागत असल्याने सर्व संत इथे बसून राहिलेले आहेत. तुकोबा म्हणाले मला धंदा-बुडव्या म्हणतात. मला व्यापारात खोट आली हे खरे आहे. पण मी त्या धंद्यात बुडालो कारण मला कधीच खोट न येणारा धंदा हवा होता, हे कुणी लक्षात घेत नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तुकोबा माझ्या डोळ्यात पाहत मला म्हणाले- ‘‘पृथ्वीवर तू कुठलाही धंदा कर, कितीही नफा कमव, शेवटी तुझे नुकसानच होणार आहे.’’

कारण - तुका म्हणे रूप नाही दर्पणात। संतोषाची मात दुसरी ते।।

तुकोबा म्हणाले – ‘‘आरशातले तुझे रूप खरे असते आणि खोटेही असते, त्याप्रमाणे या जगातील धंद्यातील नफा खरा असतो आणि खोटाही असतो. या असल्या धंद्यामध्ये संतोषाची मात नसते.’’

१३)

पंढरीचे भूत मोठे। आल्या गेल्या झडपी वाटे।।

बहु खेचरीचे रान। जातां वेडे होय मन।।

तेथें जाऊ नका कोणी। गेले नाही आले परतोनी।।

तुका पंढरीसी गेला। पुन्हां नाही जन्मा आला।।

(अभंग क्रमांक - ३११५)

सर्व भूतांहून एक श्रेष्ठ असे भूत आहे. ते पंढरीमध्ये नांदते आहे. त्या वाटेने कोणी आले गेले तर ते त्याला झपाटून टाकते. पंढरी नावाचे हे रान फार कडक भुतांचे आहे. या रानात गेले असता मनास वेड लागते. या रानात पूर्वी जे जे लोक गेले ते परत आले नाहीत. त्यामुळे या रानात जाऊ नका. हा तुका एकदा पंढरीला गेला, तो परत जन्माला आला नाही.

तुकोबा हसत म्हणाले, ‘‘हे विठ्ठल नावाचे पंढरीचे भूत हे सर्व भुतांमध्ये फार मोठे आहे. एकदा का याची आस लागली, एकदा का याने झपाटले - तर या जगात परत येताच येत नाही. मोक्षापर्यंत जावेच लागते. आई, बाप, लग्नाचा नवरा, लग्नाची बायको, मुले, मुली कोणी आपले नाही, हे आपल्या लक्षात येते. फक्त विठ्ठल हा एकच सोयरा म्हणून राहतो.’

तुकोबा एक क्षणभर थांबले आणि एकदम म्हणाले – ‘‘असे होणे चालणार आहे का तुला?’’

माझ्या मनात आले – ‘‘नाहीतरी ही सर्व नाती एकेदिवशी संपणारच आहेत. विठ्ठलाला कायमचा सोयरा म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे?’’

तुकोबा म्हणाले – ‘‘आता मी काय म्हणतो आहे ते तुझ्या लक्षात यायला लागले आहे.’’

म्हणून मी सांगत असतो -

१४)

पंढरीसी जा रे आलेनो संसारा। दीनाचा सोयरा पांडुरंग।।

वाट पाहे उभा भेटीची आवडी।

कृपाळु तांतडी उतावीळ।।

मागील परिहार पुढें नाही सीण।

जालिया दर्शन एक वेळा।।

तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती।

बैसला तो चित्तीं निवडेना।।

(अभंग क्रमांक - २३१९)

अरे, हा संसार करायला आलेल्या लोकांनो, तुम्ही पंढरीला जा. कारण जे दीन आणि दुःखी आहेत, त्यांच्यावर कृपा करणारा पांडुरंग तेथे आहे. तो मोठ्या प्रीतीने दीन जिवांची वाट पाहात उभा आहे. तो स्वभावाने कृपावंत असल्याने, तो दीन जनांची भेट घेण्यासाठी तो उतावळा झालेला आहे. त्याची एक वेळ भेट घेतल्याने मागे केलेली सर्व कर्मे नष्ट होतात आणि पुढे जन्म-मृत्यूचे दुःख होत नाही. जे त्याच्या जवळ आलेले आहेत, त्यांना तो त्याच्या स्वतःच्या जवळ ठेवतो. त्यांच्या चित्तात सततची बैठक करतो.

मी म्हणालो- ‘‘बुवा, देव माझ्या चित्तात सततची बैठक करेल की, नाही सांगता येत नाही. पण, तुमचे शब्द आजपासून माझ्या चित्तात सतत राहायला येतील.’’

मी त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घातले.

तुकोबा म्हणाले, ‘‘म्हणजे तू आज खऱ्या पंढरीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहेस. संतांच्या बरोबर, त्यांच्या शब्दांच्या बरोबर सतत राहा. कारण श्री विठ्ठल स्वतःच सतत संताच्या बरोबरच राहत असतो.’’

त्यांनी त्यांचा एक अभंग मला सांगितला -

संतसंगे याचा वास सर्वकाळ। संचला सकळ मूर्तिमंत।।

तुका म्हणे नाहीं झांकत परिमळ। चंदनाचे स्थळ चंदनचि।। (१५६०)

तुकोबा म्हणाले – ‘‘हा देव आहे की नाही, तो सदा सर्वकाळ संतांच्या बरोबरच राहायला असतो. त्यामुळे संतांच्या बरोबर राहणे म्हणजे देवाच्या बरोबर राहण्यासारखेच असते. कारण जिथे चंदन ठेवले जाते, ते स्थळ चंदनाच्या वासाने भारले जाऊन चंदनाचेच होऊन जाते.’’

एवढे बोलून तुकोबा पुन्हा पुस्तकात लुप्त झाले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

नंतर मी खूप वेळ मी विचार करत राहिलो - तुकोबांचे शब्द चंदनासारखे माझ्या मनात सतत दरवळत राहतील का? ही शब्दपंढरीची वारी, ही शब्दपंढरीची तपस्या, माझे चंदन करून टाकेल का?

टीपा -

१) वरील लेख मी ७ जुलै २०१९ रोजी थोड्या वेगळ्या स्वरूपात माझ्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला होता.

२) वरील लेखातील अभंगांचा भावार्थ विष्णुबुवा जोगमहाराज यांनी संपादित केलेल्या प्रतीप्रमाणे आहे. जोग महाराज यांचा जन्म १८६७चा आणि मृत्यू १९२०चा. त्यामुळे त्यांचा भावार्थ जुन्या मराठीत आहे. तो मी वाचकांच्या सोयीसाठी आधुनिक मराठीत आणला आहे.

३) लेखात वापरलेल्या संपूर्ण अभंगांचे क्रमांक जिथल्या तिथे दिलेले आहेत.

लेखातील इतर अभंगांचे क्रमांक खालील प्रमाणे -

भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी - अभंग क्रमांक - ७८८

विश्वव्यापी माया। तिने झाकुळली छाया- अभंग क्रमांक ३०६

सोलीव ते सुख अतिसुखाहुनी - अभंग क्रमांक ३०१

तुका म्हणे रूप नाही दर्पणात - अभंग क्रमांक - ८२२

संतसंगे याचा वास सर्वकाळ - अभंग क्रमांक - १५६०.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

क्षुल्लक देवदेवतांचा व त्यांच्या पूजेचा निषेध करणाऱ्या तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येईल काय?

बा विठ्ठला, ज्ञानियाचे ‘पसायदान’ जगण्याचे आणि तुकोबाचा अभंग अंगी बाणण्याचे बळ आम्हाला दे!

तुकाराम समजणे म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणे

ईदच्या दिवशी काय घडले! तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले!!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......