लग्न जुळवावे, तसे ‘डीएनए’ जुळवले, पण पटेना हो…!
संकीर्ण - व्यंगनामा
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 19 July 2021
  • संकीर्ण व्यंगनामा सरसंघचालक Sarsanghchalak मोहन भागवत Mohan Bhagwat संघ RSS

आपल्या नेहमीच्या सर्वज्ञतेच्या थाटात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पाच जुलै रोजी बोलले काय अन आमचे आतूर झालेले कान साधी कुजबूजही ऐकू शकलेले नाहीत. कुजबूज सर्वाधिक प्रिय असलेले स्वयंसेवक आमच्यापासून दूर फटकू लागले. अहो, थांबा जरा! डॉक्टरसाहेब जे बोलले, त्यावर तुमचे मत काय, असा प्रश्न आमच्या तोंडून बाहेर पडताच स्वयंसेवकांनी ओठ घट्ट आवळून काय घेतले, डोळे काय विस्फारले अन कानावर हात काय ठेवले… आमच्या कानात अन मनात धस्स झाले. एरवी डॉ. भागवत बोलोत ना बोलोत, आमच्यासारख्या संघद्वेष्ट्यांना सतत धडे शिकवणाऱ्यांत सारे स्वयंसेवक अग्रेसर! ट्रोल करतील, इ-मेल पाठवतील, एसएमएसद्वारे धिक्कार करतील. आम्हाला पाकिस्तानात पाठवायला तर हमेशा तयार! मुसलमानांचे लाड, अल्पसंख्याकांचे लांगूलचालन, व्होटबॅंकेचे राजकारण आणि राष्ट्रदोह्यांची पाठराखण इत्यादी करण्याबाबत आमची यथेच्छ निंदा करतील. या आरोपांचा मारा इतका सारखा अन तोचतोच की, नक्कीच तो त्यांना कुठे तरी शिकवला गेलेला असावा असे वाटावे. आता कुठे हे सांगायला पाहिजे का? शाखांमध्ये हो!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तर असा शाखाशाखांमधून प्रत्येकाला दिला जाणारा डोस अचानक थांबवण्याचा आदेशच जणू मिळाल्यासारखे झाले. हिंदू व मुस्लीम एकाच डीएनएचे आहेत, असे जाहीर भाषण भागवतांनी करून टाकले. सोबतीला ते एकट्यादुकट्या मुसलमानांना ठेचून मारण्याच्या घटनांचा ‘छी: छी:’ म्हणून निषेध करून बसले. चालते व्हा, असे मुसलमानांना न सांगण्याबद्दल भागवतांनी बजावलेच. वरती असे सांगणारे सच्चे हिंदू नसतात, असा निर्वाळाही त्यांनी देऊन टाकला. थेट विज्ञानाचा आधार घेऊन एक प्रशिक्षित पशुवैद्यक माणूस सांगतोय म्हटल्यावर त्याचे ऐकावे की नाही? पण छे! भागवतांच्या भाषणाला तीन आठवडे उलटले. दोन-तीन सामान्य संघवाले, उपेक्षित हिंदुत्ववादी आणि निरुपयोगी प्रचारक सोडता ‘हार्डकोअर’मधून एकही शब्द बाहेर पडेना! सपशेल शांतता, निखालस निःशब्दता, थंड थोबाडे आणि ट्रोलचा वाळवंट!!

‘संघ बदलला, संघ बदलला, बघा. आम्ही म्हणतच होतो, एवढे मोठे संघटन स्वतःत बदल केल्याशिवाय वाढत नसते’ असे काही पुरोगामी ओरडत बाहेर पडतील, असेही आमच्या बावळट मनाला वाटले. पण तेही लबाड! त्यांच्यातूनही चारदोन आत्मघाती, विझू विझू झालेले अन डगरीवरचे उगवले. त्यांना अर्थात कोणी विचारत नसताना त्यांनी संघाला नको असलेले परिवर्तनाचे प्रमाणपत्र देऊन टाकले.

येऊनजाऊन संघाच्या दोन मुखपत्रांच्या संपादकांनी त्यांच्या नावे लेख लिहून भागवताख्यानाची नोंद आपल्या परीने घेतली. ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी डीएनएची सांगड धर्मांतराशी, नेहरूवादाशी, ब्रिटिशांच्या साम्राज्याशी, पाश्चात्त्य विचारांशी घालून मूळचा हिंदू-मुसलमान एकतेचा मुद्दा हळूच बाजूला टाकला. नऊ जुलैच्या या अंकानंतर ‘ऑर्गनायझर’ (१२ जुलै) या इंग्रजी मुखपत्राचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी हुशारी अशी केली- सरसंघचालक संघस्वयंसेवकांपुढे कुठे बोलले? ना ते हिंदू समाजापुढे बोलले. ते मुस्लीम बुद्धिमंतांसमोर एका पुस्तक प्रकाशनावेळी बोलले. हा कार्यक्रम ‘राष्ट्रीय मुस्लीम मंच’ नावाच्या एका फोरमने आखला होता, अशी त्यांची मखलाशी! या भाषणात भागवतांनी हिंदूराष्ट्राची संघाची भूमिकाही मांडली. जे भागवत मांडत होते, तेच गोळवलकर राष्ट्रधर्म-समाजधर्म-कुलधर्म हे व्यक्तिधर्मापेक्षा अग्रणी आहेत असे मांडत, असेही केतकरसाहेबांनी लिहिले.

पण हे दोघे उजव्यांग (म्हणजे रायटिस्ट) बुद्धिमंत वगळता, अन्यत्र हिरीरीने कुठे कोणी ‘चला, आता आपण बंधू बंधू’ म्हणत गळ्यात पडताना दिसले नाही, याचा फार घोर लागून राहिला आम्हाला. असे समाजवाद्यांसारखे कसे वागू शकतात संघवाले? सरळ वरिष्ठांना धुडकावून लावतात! इतके औद्धत्य! लगेच एखादा ‘राष्ट्रीय डीएनए मंच’ स्थापन करून गळाभेटींची इव्हेंट मॅनेजमेंट आखली जाईल, असे आम्हाला अपेक्षित होते. इतक्या वर्षांचे मोदींचे नेतृत्व मग काय उपयोगाचे! अवघा मीडिया उजव्यांग होऊन यांच्या तालावर नाचू लागला असतानासुद्धा ना रविवार पुरवण्यांत लेख, ना अग्रलेखांच्या शेजारी काही लिहिलेले! छे, छे, भयंकर भ्रमनिरास केला या स्वयंसेवकांनी, हो ना डॉ. भागवत! तुम्हाला शरमल्यासारखे होईल यांच्या अशा बेगुमान वर्तनाने. इतक्या वर्षांची शिस्त वरवरची होती की काय, असा संशय तुमच्या मनात डोकावल्यास वाईट वाटून घेऊ नका. चुकतो माणूस कधी कधी. नाही समजत त्याला आपल्याच भल्याचे!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बरे का भागवतजी, तुमचे भाषण झाल्याच्या चौथ्याच दिवशी माझा एक नवविवाहित मुस्लीम विद्यार्थी नवे घर भाड्याने घेण्यासाठी शोधाशोध करत होता. घर दाखवून झाल्यावर सारे घरमालक त्याला नाव विचारायचे. ‘अन्वर’ असे सांगितल्यावर ‘नंतर बघू, जमणार नाही’ वगैरे सांगायचे. त्याला आम्ही म्हटले, ‘लेका, डीएनएचा मुद्दा का नाही सांगितलास त्यांना? सरसंघचालकांच्या गळ्याची शपथ घेऊन तमाम घरमालकांना भाईचारा नसता का सुनवायचा! तुला साध्या हिंदू माणसाची घरे दिसली असावीत. पक्का संघवाला शोधून जायचे आणि डीएनएची आण घालून घराचा किराया किती द्यायचा एवढेच विचारायचे!’ बिचारा!! ‘डीएनएचा बंधुभाव’ त्याच्या डोक्यातच आला नव्हता.

मीडियातले उजव्यांग पत्रकार किती कमी पडले पाहा! त्यांनी भागवतांची बातमी छापली आणि जणू कोणी काही भलतेच विधान केले, अशा आविर्भावात फिरू लागले. अन्यथा त्यांची सवय म्हणा किंवा पाने भरण्याची युक्ती काय असते ठाऊक आहे? चार इकडच्या अन चार तिकडच्या लोकांना धरायचे. त्यांना बोलते करायचे. स्वागत झाले आणि चांगले झाले, अशा छापाच्या चौकटी देऊन बातम्या द्यायच्या. ‘सरसंघचालकांच्या राष्ट्रैक्याच्या डीएनएचे तोंडभरून स्वागत’ असा मथळा द्यायचा.

मग दुसऱ्या सरकारी बातमीच्या शोधाला बाहेर पडायचे किंवा आघाडीची बिघाडी कुठे फटीतून दिसते का, ते पाहत हिंडायचे. आढळले का काही कुठे तुम्हाला? आम्हाला तरी नाही बुवा. सरसंघचालकांची एवढी उपेक्षा कशी काय सहन करतात हे संघवाले, त्यांनाच ठाऊक! तरी सगळी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या भरपूर संघवाल्यांनी व्यापल्या आहेत. पण बातमी लावून धरण्याची सवय मोदी सरकारनेच मोडून टाकल्यावर काय करणार! त्यात भागवतांची बातमी प्लांटेड म्हणजे पेरलेली किंवा पेड न्यूज अशातली नव्हती. तरीही भागवतांना विटाळ सोसावा लागतो, हे अतीच झाले.

आता लक्षद्वीप बेटाचे काय करायचे? संघिष्ट नायब राज्यपालांनी रुजू झाल्या झाल्या तिथल्या बहुसंख्याक मुसलमानांवर काय काय बंधने घातली, ती आता उठवणार का? नाशिकचे ते पालकमान्य हिंदू-मुस्लीम लग्न हिंदुत्ववाद्यांनी उधळून लावले होते. ते लावायला डॉ. भागवत नाशकाला जातील का? खरोखर त्यांना आपण आपल्या विचारांना जागतो, ते सिद्ध करायची संधी आहे. डीएनएची लग्नाला आडकाठी नाही, हे त्यांनी तिथे दाखवून द्यावे. यापुढे अशी हिंदू-मुस्लीम डीएनए दाम्पत्ये भागवत आणि संघपरिवार यांनी मिळून वाढवत न्यावीत. केवढे महान कार्य होईल, केवढी राष्ट्रसेवा होईल, माहीत आहे का?

भागवतांचे आख्यान झाल्या झाल्या एक कट्टर स्वयंसेवक भेटले. आमच्या औरंगाबादी तहजीबनुसार ‘क्यों मियाँ, सब खैरियत?’ असे विचारताच स्वारी लालबुंद झाली. बरे झाले, हातात दंड नव्हता! म्हटले, एवढे रागवायला काय झाले? इतक्या वर्षांनी घरात नवा भाऊ जन्माला यावा अन तुम्ही शरमून तोंड लपवीत ये-जा करताहात, असे तर काही नाही. १९४७ ते २०२१ एवढे अंतर कापून काढत सरसंघचालकांनी एका फटक्यात बंधूभगिनीभाव जागृत केला, तर त्यात चीड येण्यासारखे काय?

आमच्या गावात एमआयएमचा खासदार चक्क एका हिंदुत्ववादी शिवसैनिकाला पराभूत करून आला. त्यामागे तुम्ही होता काय मग? अच्छा, म्हणजे भागवतांनी भाषण उशिराने केले; अंमलबजावणी तुम्ही त्याआधीच केली म्हणायचे तर! शिवसेनेला पाडायला तुम्ही छुपा पाठिंबा देत होता की, काय आपल्या त्या प्रिय बंधूला! पाहा बुवा, आता उत्तर प्रदेशात किमान २५ जणांना तरी तिकिटे द्यावी लागतील. भाजपचा एकही मुस्लीम विधानसभा सदस्य नाही, ना लोकसभेचा. तेव्हा एखादी डीएनए पार्टी तयार होऊन हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुकारा करत विधानसभेत तुम्हाला खुन्नस देऊ लागली, तर फजिती होईल….

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तर ते स्वयंसेवक छद्मी हास्य करत आम्हाला सांगू लागले- ‘अहो, तिकिटेच काय, आता तर शाखेतही आम्ही ‘त्यांना’ येऊ देणार आहोत.’

आम्ही म्हणालो, ‘वा! आम्हाला कळवा. आम्ही बातमीदार, छायाचित्रकार, टीव्हीवाले घेऊन येतो.’

तर म्हणाले कसे, ‘छे, छे! शाखेत जे कोणी येते, त्याची जात, धर्म, पैसा असे आम्ही काही पाहत नसतो! अशी वेगळी वागणूक संघ कधी कोणाला देत नसतो…’ एवढे बोलून ते एकदम गप बसले. मग म्हणाले, ‘असे संकट कोसळू नये म्हणून आम्ही ‘शाखा फ्रॉम होम’ चालू करणार आहोत. साप कोणी घरात येऊ देतो काय? येडेच आहात…’

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......