उद्या आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने तुकाराममहाराजांच्या पंढरीच्या १४ अभंगांविषयीचा हा विशेष लेख. आज पूर्वार्ध. उद्या या लेखाचा उत्तरार्ध प्रकाशित होईल.
..................................................................................................................................................................
नक्की कुठल्या पंढरीला गेल्यावर आपण पांडुरंगाला भेटू शकतो? पंढरपूर नगरपालिकेच्या पंढरपुरात जाऊन विठ्ठल मिळतो काय? का संत लोकांची पंढरी वेगळी आहे? तुकाराम पंढरीला गेला आणि मी पंढरीला गेलो तर आम्ही एकाच पंढरीला गेलो, असे म्हणता येईल काय? पंढरी म्हणजे तुकारामासाठी काय होते, हे मला कधी समजेल काय? खरं तर पंढरी म्हणजे नक्की काय, हे मला कधी समजेल काय?
ते एक साधे गाव आहे का, ते एक तीर्थक्षेत्र आहे की, ती एक उन्नत मनोवस्था आहे? की मनाच्याही पलीकडे जाणारी कुठली एक अवस्था आहे?
पंढरपूरची गोष्ट अशी की, भक्त पुंडलिक पंढरपूरला राहत होता. त्याचे प्रेम बघून निर्गुण आणि निराकार अशा परब्रह्माने सगुण आणि साकार रूप घेतले आणि ते पंढरपूरला कमरेवर हात ठेवून, विठ्ठल हे नाव घेऊन उभे राहिले. त्याने पुंडलिकाला असेही आश्वासन दिले की, जो जो भक्त मला पंढरपुरात येऊन भेटेल, त्याला मी उराउरी भेट देईन.
त्यामुळे सगळे विठ्ठलभक्त पंढरीला जातात. पण, त्या सगळ्यांनाच विठ्ठल उराउरी भेटल्याचे दिसत नाही. मग पंढरीला गेलेल्या नक्की कोणत्या भक्तांना विठ्ठल भेटतो? नक्की कोणत्या भक्तांना तो आपल्या बरोबर आपल्या वैकुंठ या ‘लोकात’ जागा देतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
यातल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे मला मिळेनात, तेव्हा मी तुकोबाची अभंगगाथा उघडली आणि तुकोबारायांनाच हे प्रश्न विचारले. त्यांना म्हणालो की, तुकोबाराया या गाथेच्या पानांवर प्रकट होऊन तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे द्याल काय?
तुकोबा एकदम प्रकट झाले आणि म्हणाले – ‘का नाही?’
मी एकदम दचकलो.
ते म्हणाले– ‘दचकू नकोस. हा काही आध्यात्मिक अनुभव नाहीये. माझी गाथा वाचणाऱ्या प्रत्येक माणसाशी मी उत्तर होऊन बोलतो.’
ते म्हणाले – ‘पंढरीला जाऊनही तुला विठ्ठल उराउरी का भेटत नाही, या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर माझे पंढरीचे अभंग काढ. त्यांचे अर्थ लिहून काढ. एकदा तो अर्थ तू लक्षात घेतलास की, मी तुला त्या अर्थाच्या मागे लपलेला खरा अर्थ सांगतो. म्हणजे मग तुझ्या लक्षात येईल की, पंढरीला जाऊनही श्री विठ्ठल तुला उराउरी का भेटत नाहिये.’
तुकोबाराय पुढे म्हणाले – ‘अभंगगाथेच्या पानापानातून माझे खूप अभंग आहेत. त्यांचा अभ्यास कर. त्यातून हा तुका कुठल्या पंढरीला जात होता, कुठल्या भावना घेऊन जात होता, कुठली आस घेऊन जात होता, कुठले तप करून जात होता, हे तुझ्या लक्षात येईल. विठ्ठल-भक्तांनी कुठल्या पंढरीला, कसे येणे अपेक्षित आहे, हेसुद्धा तुझ्या लक्षात येईल.’
तुकोबा यानंतर क्षणभर स्तब्ध झाले. क्षणभर विचार करून ते म्हणाले– ‘विठ्ठलाची काय अपेक्षा आहे, हे लक्षात घेऊन पंढरीला जायचे असते. तू तुझ्या अपेक्षा मनात ठेवून पंढरीला जातोस. असे करणे व्यर्थ आहे. निष्कारण पायपीट करणे आहे.’
मी निमूटपणे एक एक अभंग शोधून वाचायला सुरुवात केली.
१)
पंढरीचा महिमा। देतां आणिक उपमा।।
ऐसा ठाव नाही कोठे। देव उभा उभी भेटे।।
आहेती सकळ। तीर्थें काळे देती फळ।
तुका म्हणे पेठ। भूमिवरी हे वैकुंठ।।
(अभंग क्रमांक - ८८)
मी एक चांगली वही केली. त्यात या अभंगाचा अर्थ लिहून काढला.
पंढरीच्या श्रेष्ठत्वास दुसरी उपमाच देता येत नाही. कारण या सारखे दुसरे ठिकाण त्रैलोक्यात नाही. येथे गेल्या गेल्या देव भेटतो. बाकीची सर्व तीर्थे कालांतराने फळ देणारी आहेत. ही पंढरी पेठ मात्र पृथ्वीवरील साक्षात वैकुंठच आहे.
अर्थ लिहून झाल्यावर मी म्हणालो बघा, ‘पंढरीला जाताच तात्काळ देव भेटतो’ असे तुम्ही लिहिले आहे.
त्यावर तुकोबा हसून म्हणाले – ‘पंढरीला गेल्या गेल्या विठोबा भक्तांना उराउरी भेटतात, हे खरे आहे. पण, तुला श्री विठ्ठल नक्की कुठल्या पंढरीत आहेत, हे माहीत आहे काय?’
मी गोंधळलो.
ते पुढे म्हणाले – ‘देव भेटणे म्हणजे नक्की काय ह्याचा तू विचार केला आहेस काय?’
मी विचार केला की, वरच्या कुठल्याच गोष्टीचा मी विचार केला नव्हता. मी पंढरीला जातो, तेव्हा विठ्ठलाने कृपा करावी आणि त्याने माझे ऐहिक आयुष्य संपन्न करावे, अशी एक धूसर अपेक्षा माझ्या मनात असते, असे मला जाणवले.
माझ्या मनातले विचार तुकोबांना दिसले असावेत.
ते म्हणाले – ‘तुझ्या क्षुद्र ऐहिक इच्छा पुरवायला विठ्ठल काही तुझा बटिक नाही. सगळा ऐहिक विचार सोडून तू त्याच्या नादी लागलास, कमरेचे सोडून तू त्याच्या नादी लागलास, तर तो तुझा योगक्षेम नक्की बघेल, पण त्याने तुझे चोचले का पुरवावेत?’
बोलताना तुकोबांचा आवाज एकदम गंभीर झाला. ते म्हणाले - एक लक्षात घे. देव उराउरी भेटल्यावर तो आपल्याला कधीही सोडत नाही. तो आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातो. मोक्षाला जाणे म्हणजे हे जग, या जगातली सगळी हालचाल कायमसाठी सोडून जाणे. तुला हे जग कायमसाठी सोडायला आवडेल काय?’
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७
..................................................................................................................................................................
मी मनातून शहारलो. आपली बायका-पोरे सोडून जायचे? सगळे मित्र आणि सुखदुःखाची झिंग सोडून जायचे? मनात आत कुठेतरी विठ्ठलाची असली भेट नको वाटली.
तुकोबा म्हणाले – ‘हे बघ, सगळे असे आहे. तुम्हा लोकांनाच विठ्ठलाची भेट नको असते, मग तो तरी तुम्हाला कशासाठी भेटेल?’
तुकोबा पुढे म्हणाले – ‘देव मला उभा उभी भेटणार आहे, अशी अपार श्रद्धा मनात असल्याशिवाय पंढरी पावत नाही. तुझ्या मनात अशी अपार श्रद्धा आहे काय?’
यावर मी काय बोलणार? ही श्रद्धा सोडा, हा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता.
मी निमूटपणे पुढच्या अभंगाकडे वळलो.
२)
पंढरीची वाट पाहें निरंतर।
निढाळावरी कर ठेवूनिया।।
जातियां निरोप पाठवी माहेरा।
का मज सासुरा सांडियेलें।।
पैल कोण दिसे गरुडाचे वारिके।
विठ्ठलासारिखे चतुर्भुज।।
तुका म्हणे धीर नाही माझ्या जीवा।
भेटशी केधवा पांडरूंगा।।
(अभंग क्रमांक - ९८१)
दूरचे दिसावे म्हणून कपाळावर हात धरून मी सतत पंढरीच्या दिशेला पाहत आहे. जे कोणी पंढरीला म्हणजे माझ्या माहेराला जात आहेत, त्यांच्याबरोबर मी निरोप पाठवत आहे की - हे विठ्ठला, तू मला अजूनपर्यंत सासूरवाडीला का ठेवले आहेस? मी पंढरीच्या दिशेला बघतो, तेव्हा त्या दिशेला मला विठ्ठलासारखे चार हात असलेले कोण बरे दिसत आहे? गरुडावर बसल्यासारखे कोण बरे दिसत आहे? हा तुका सतत मनाशी म्हणतो आहे की - हे पांडुरंगा तुम्ही मला कधी बरे भेट देणार आहात? तुमच्यावाचून मला अजिबात धीर धरवत नाहीये.
हा अर्थ लिहून झाल्यावर तुकोबा मला म्हणाले– ‘हे जग आपल्यासाठी एक परके ठिकाण आहे, असे तुला वाटते आहे काय? पांडुरंग म्हणजेच आपले माहेर आहे, असे तुला मनापासून वाटायला लागले आहे काय? त्याला बघण्यासाठी तू वेडापिसा झाला आहेस काय?’
‘पंढरीच्या दिशेच्या क्षितिजावर पांडुरंग उभा आहे, त्याचा गरुड उभा आहे, असे भास तुला होऊ लागले आहेत काय? असे भास व्हावेत, एवढी तुला विठ्ठलाची ओढ लागली आहे काय? तुला विठ्ठलाची अशी जीवघेणी आणि अपार आस लागली असेल, तर ती उरात घेऊन पंढरीला जा. तो तिथे तुझी वाट पाहात उभा असलेला तुला दिसेल.’
आता मी मनातून पूर्ण हादरून गेलो होतो. विठ्ठलाला भेटायची माझ्या मनातली संकल्पना किती उथळ होती!
३)
पंढरीस जाते निरोप आइका। वैकुंठनायका क्षेम सांगा।।
अनाथांचा नाथ हे तुझे वचन। धांवे नकों दीन गांजो देऊं।।
ग्रासिले भुजंगे सर्पे महाकाळे। न् दिसे हें जाळें उगवतां।।
कामक्रोध सुनी श्वापदे बहुतीं। वेढलों आवर्तीं मायेचिये।।
मृगजलनदी बुडविना तारी। आणूनियां वरी तळा नेते।।
तुका म्हणे तुवां धरिलें उदास। तरी पाहों वास कवणाची।।
(अभंग क्रमांक - १५३८)
हे पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांनो मी तुम्हाला निरोप सांगत आहे, तो ऐका. अवघ्या वैकुंठाचा जो स्वामी आहे, त्या पांडुरंगाला माझे क्षेम सांगा. त्याला सांगा की, ‘मी अनाथांचा वाली आहे’ हे तुझेच वचन आहे; तेव्हा तू दीन अशा तुझ्या सेवकांना तू दुःखी होऊ देऊ नकोस. महाकाळरूपी भुजंगाने आणि लोभरूपी सर्पाने मला ग्रासले आहे. या दोघांच्या पाशातून माझी सुटका होईल, असे मला वाटत नाहिये. कामक्रोधादि कुत्र्यांनी आणि अनेक विकार रूपी श्वापदांनी मला घेरले आहे. मी मायेच्या भोवऱ्यात सापडलो आहे. मृगजळासारखी असणारी ही प्रपंचनदी मला बुडवून टाकत नाहिये, हे खरे आहे, पण, ती मला तिच्या प्रवाहातील लाटांत खालीवर घुसळवत ठेवते आहे. (मी पुण्य केले की, ही नदी मला स्वर्गात नेते आहे आणि माझे पुण्य संपताच ही नदी मला मृत्यु लोकात परत आणते आहे. ही नदी मला मोक्ष मिळू देत नाही आहे.) हा तुका म्हणतो आहे की, हे पांडुरंग राया, तुम्ही आता माझ्या सारख्या दीनांची काळजी घेतली नाहीत तर आम्ही कोणाची वाट पाहावी?
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
तुकाराम पुस्तकातातून उठून माझ्या जवळ येऊन बसले. म्हणाले – ‘विठ्ठलाला आपले क्षेम कुशल सांगावे असे तुला तुझ्या उभ्या आयुष्यात एकदा तरी वाटले आहे काय? मित्रत्वाच्या नात्याने विठ्ठलाला आपली सुखदुःखे सांगावीत, असे तुला कधी वाटले आहे काय? विठ्ठलाशी इतके जवळचे नाते तुझ्या मनात तयार झाले आहे काय?’
मी नकारार्थी मान हलवली.
ते पाठीवर हात फिरवत म्हणाले – ‘बरं, एक सांग राजा, हे जग मर्त्य आहे, या गोष्टीचा तुला त्रास होतो आहे काय? तुला मृत्यूरूप भुजंग एके दिवशी गिळून टकणार आहे, या गोष्टीचा त्रास तुला होतो आहे काय? तेवढा संवेदनशील तू आहेस काय?’
मी मनात विचार केला की, इतर लोकांच्या मृत्यूचा माझ्या आयुष्यावर फारसा परिणामच होत नाहिये. कुणी गेले तर थोडा वेळ दुःख करून मी माझे सुखलोलुप आयुष्य परत सुरू करतो आहे. आणि माझ्या मृत्यूचा तर विचारच माझ्या मनात फिरकत नाहिये. मी अमर असल्याच्या कुठल्या तरी मूर्ख धुंदीत मी जगतो आहे.
ते पुढं म्हणाले – ‘मग निदान तुझ्यातील लोभाचा तरी तुला त्रास होत असेल?’
मी मनातल्या मनात खिन्न हसलो. किती लोभात लडबडतो आहे मी! मोठे घर, एसी, फॅन्स, गीझर्स, मोठ्या मोठ्या कार्स, मोठ्या हॉटेलात जाणे… कितीतरी गोष्टी!! या सगळ्यासाठी पैसा हवा म्हणून मी राबराब राबतो आहे.
तुकोबांच्या डोळ्यात करुणा उमटली. ते म्हणाले – ‘लोभ साधण्यासाठी तू जेवढा राबतो आहेस तेवढा पांडुरंग दिसण्यासाठी राबतो आहेस का?’
काय बोलणार मी यावर? मी मनात कबूल केले की, माझे सगळे आयुष्य लोभाने ग्रासलेले आहे. लोभ साधला नाही, पाहिजे ते सुख मिळाले नाही की मी क्रोधाच्या आहारी जातो आहे.
‘कामक्रोध सुनी श्वापदे बहुतीं। वेढलों आवर्तीं मायेचिये।।’
‘लोभ, क्रोध, काम हे सर्व मायेच्या जाळ्याचा एक भाग आहे, हे तरी तुला माहिती असेल’ – तुकोबा शांतपणे म्हणाले.
मी स्वतःशी म्हटले की, मी या सगळ्यात अडकलो आहे, हे मला धूसरपणे कळते आहे, पण मला त्याचा फार त्रास होत नाहीये. खरं तर मला आवडते ते सगळे!
मला वाटले आता तुकोबा मला रागावणार. पण ते अतिशय प्रेमाने म्हणाले - तुला ही माया आवडते आहे, तर तिचे जे काही सुख-दुःख आहे ते भोगत राहा. मात्र एक लक्षात ठेव, जोपर्यंत तू मायेच्या आहारी गेलेला आहेस, तोपर्यंत विठ्ठल तुला भेटणार नाही. मायेच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला विठ्ठल भेटतो. पंढरीला जाणे म्हणजे मायेच्या पलीकडे जाणे!’
सध्या ही प्रपंचनदी तुला तिच्या लाटांमध्ये घुसळते आहे, आणि ते अतीव दुःख तुला सुखासमान वाटते आहे, तर इथेच राहा. तुला या प्रपंच नदीचा त्रास व्हायला लागल्यावर आपण पाहू.
मी तुकोबाला आर्तपणे विचारले - ‘तुम्हाला मायेचा त्रास झाला आणि मला झाला नाही, असे का?’
तुकोबा प्रेमाने हसून म्हणाले– ‘त्याचे कारण असे आहे की, तुला सुख आणि आनंद यातील फरक माहिती नाहीये. सुख संपणारे असते. आनंद कधीही न संपणारा असतो. जगाचे अंतिम सत्य - श्री विठ्ठल - आपल्या हाती लागल्यावर आपल्याला आनंद होतो.’
तुकोबा हसून म्हणाले – ‘तुला यातले काहीही माहिती नाही. सुख आणि आनंद हे समानार्थी शब्द आहेत, असे तुला वाटते आहे.’
थोडावेळ थांबून म्हणाले – ‘ज्याला आनंदाची साधी संकल्पनासुद्धा माहिती नाही, त्याला माझ्या विठ्ठलाने का भेटावे? असो, काही घाई नाहिये, जेव्हा तुला या संसारातील दुःखे तर दुःखपूर्ण आहेतच, पण सुखे म्हणजे सुद्धा दुःखेच आहेत हे कळेल तेव्हा बघू.’
मी म्हटले – ‘सुखे म्हणजे दुःखेच कशी आहेत, हे तुम्ही मला कृपया सांगा. हे सारे माझ्या अकलेच्या बाहेरचे आहे.’
तुकोबा म्हणाले – ‘अरे, एकतर सुखे आपल्याला आनंदापासून दूर ठेवतात, विठोबापासून दूर ठेवतात, म्हणजे ती दुःखेच की नाहीत?
अरे राजा, सुखांमुळे इच्छा तयार होतात. इच्छा तयार झाल्या की, त्या पूर्ण करण्यासाठी आपण भली-बुरी कामे करतो. त्याचे चांगले-वाईट परिणाम होतात. म्हणजेच इच्छांमधून कर्म तयार होते. हे चक्र असेच सुरू राहते. अडकून पडतो आपण संसारात!
तुला कळेल हळूहळू की सुखे म्हणजे मूलतः दुःखेच कशी आहेत. या संसाराच्या दुःखमय स्वरूपामुळे माणसाला दैन्य येते. संसार दुःखपूर्ण आहे हे जाणवल्यामुळे ज्यांना दैन्य आलेले आहे, अशा दीन लोकांनाच फक्त पांडुरंग भेटतो. या जगातील सुखे तुम्हाला हवी वाटत असतील तर तुम्ही हीन आणि दीन नाही आहात. मग तुम्ही पंढरीला गेलात तरी विठ्ठलाने तुम्हाला का उचलून घ्यावे?’
४)
पंढरीसी जावे ऐंसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हां।।
न लगे त्याविण सुखाचा सोहळा। लागे मज ज्वाळा अग्नीचिया।।
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय। मग दुःख जाय सर्व माझें।।
(अभंग क्रमांक - ३०५६)
पंढरीस जावे असे माझ्या मनामध्ये आहे. माझी विठाबाई आई मला कधी भेटेल असे मला झाले आहे. त्या खेरीज मला सुखाची प्राप्ती होत नाही. माझ्या सर्वांगाला अग्नीच्या ज्वाळा लागल्या प्रमाणे दाह होत आहे. हा तुका म्हणतो आहे की - त्या विठोबाचे पाय पाहिल्यावर माझे सर्व दुःख नाहीसे होत आहे.
मी विचार केला की, तुकारामाएवढ्या संकल्पना मला माहीत नव्हत्या. सुख आणि आनंद हे एकसारखेच आहेत असे मी समजत होतो. तुकारामाएवढे एवढी भाषासुद्धा मला येत नव्हती. तुकारामाएवढे संवेदनशील मन माझ्याकडे नव्हते.
वरचा अभंग वाचून मी म्हणालो की, आई तर सर्वांनाच असते. जन्मदात्री राहिली नाही, तरी दुसरी कुणी आई प्रेम करतेच की, जन्माला आलेल्यावर. मग विठाई जननीचे प्रेम कशाला पाहिजे?
त्यावर तुकोबा म्हणाले – ‘ते सुख आणि आनंदातील फरकासारखेच आहे. इथली आई या जन्मापुरतीच आहे, विठाई जन्मोजन्मीची आई आहे. इथली आई तुमच्या सुख-दुःखाची उस्तवार करते, विठाई तुमच्या आनंदाची उस्तवार करते. इथली आई दुःखाच्या आगीतून तुम्हाला सोडवते आणि सुखी करते, विठाई मायेने लावलेल्या आगीतून तुम्हाला सोडवून आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था आणते.’
मी एकदम तुकोबांना म्हटले – ‘बुवा, कर्मसिद्धान्त खरा आहे काय? वाईट कर्मे दुःख तयार करतात, हे खरे आहे काय?’
तुकोबा म्हणाले – ‘एकदम खरे आहे’.
मी म्हणालो – ‘कशावरून?’
तुकोबा म्हणाले – ‘तू कधी रेल्वेने पुण्याहून सोलापूरला गेला आहेस काय?’
मी म्हणालो – ‘अनेक वेळा’.
तुकोबा म्हणाले – ‘मग रस्त्यात कुर्डुवाडीला जी इडली मिळते, ती त्या आधी दौंड स्टेशन वर मिळेल का?’
मी म्हणालो – ‘नाही’.
तुकोबा हसून म्हणाले– ‘तू या मार्गावर प्रवास सुरू कर. हळूहळू योग्य स्टेशने आली की, तुला सगळे सिद्धान्त सांगितले जातील. कर्मसिद्धान्त हा या विश्वाचा गुप्त असा सिद्धान्त आहे. तो कळायला थोडी तपस्या करावी लागते. तुझ्या तपस्येतील कुर्डुवाडी येऊ देत, कळेल तुला कर्मसिद्धांत!’
५)
पंढरी पंढरी। म्हणता पापाची बोहरी।।
धन्य धन्य जगी ठाव। होतो नामाचा उत्साव।।
रिद्धिसिद्धी लोटांगणी। प्रेमसुखाचिया खाणी।
अधिक अक्षराने एका। भूवैकुंठ म्हणे तुका।।
(अभंग क्रमांक - १०३५)
मी अर्थ लिहीत गेलो - कोणी पंढरीच्या नामाचा उच्चार करेल, त्याच्या सर्व पापांचे दहन होईल. सर्व जगतामध्ये पंढरी हे स्थळ धन्य आहे, असे मी तुम्हाला दोन दोन वेळा सांगतो आहे, कारण येथे नामाचा उत्सव सतत होत असतो. येथे जो मनुष्य राहतो, त्याला रिद्धी-सिद्धी अशा दोघीही लोटांगण घालतात. हा तुका तुम्हाला सांगतो आहे की, पंढरी हे या भूमीवरचे वैकुंठ आहे. आणि गंमत म्हणजे वैकुंठापेक्षा त्याच्यात एक अक्षर जास्त आहे. (पंढरीस भूवैकुंठ म्हणतात म्हणून).
अर्थ लिहून झाल्यावर तुकोबा म्हणाले – ‘एक लक्षात घे, पंढरीला जाणे म्हणजे नामाच्या उत्सवात राहणे. तू कधी नाम घेतले आहेस काय? विठ्ठलाच्या चिंतनात एकटा बसला आहेस काय? नाम-जपात तुझे मन बुडून गेले आहे काय? क्षणभर तरी तुझे मन विचारच्या पलीकडे गेले आहे काय?’
मी मनात म्हटले की – ‘मला एकटे बसताच येत नाही. सारखे कुणीतरी बोलायला लागते. कुणी माणूस नसेल तर गाणी लागतात, गाणी नसतील तर टीव्ही लागतो. टीव्ही नसेल तर कसले तरी वाचन लागते, ते ही नसेल तर फोनवर बोलायला लागते, ते ही नसेल तर सोशल मीडिया तरी असावाच लागतो.’
तुकोबा म्हणाले,“विठ्ठलाचे नाम तुला गोंधळापासून, विचारांच्या कोलाहलापासून, इच्छांच्या जंजाळापासून दूर ठेवते. त्यामुळे तुझे मन हळूहळू शांत होते.
तलावात लाटा असताना त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते काय? पाणी जसे जसे शांत होत जाते, तसे तसे चंद्राचे प्रतिबिंब त्यात हळूहळू दिसू लागते. त्याचप्रमाणे मन शांत होत गेले की, हळूहळू विठ्ठल तुम्हाला दिसू लागतो. विश्वाचे सगळे गुप्त ठेवले गेलेले कायदे तुम्हाला कळू लागतात.
मन शांत झाले की, तुम्ही चुकीच्या गोष्टी करत नाही. नाम आणि पंढरी तुमची पापे धुऊन टाकते ते असे. शांत मनाला विठ्ठल सापडतो. तो सापडला की, तुम्हाला प्रेमसुखाच्या अपार खाणी सापडतात.’
तुकोबा एकदम माझ्या डोळ्यात डोळा घालून म्हणाले की, ‘तुला विठ्ठलाची शांत कृपा हवी आहे का जीवनातली खळाळती आणि बेबंद सुखे?’
मी काही बोलायच्या आत माझ्या नाठाळ मनाने सुखांना कौल दिला. ते म्हणाले- ‘विठ्ठल तुला भेटत नाहिये तेच चांगले आहे. तू हॉटेलिंग वगैरे केल्याशिवाय राहू शकणार आहेस काय? इंद्रियांच्या सुखापासून दूर राहू शकणार आहेस काय?’
मन खरे बोलत होते. मला माझ्या सुखलोलुपतेचे सत्य सहन झाले नाही. मी मनाला म्हटले – ‘गप रे तू!’
तुकोबा शांतपणे हसले!!
मी म्हटले- ‘बुवा, मी उद्यापासून एक तास शांत बसेन.’
तुकोबा हसून म्हणाले – ‘पाच मिनिटांपासून सुरुवात कर. शांत बसणे सुखे भोगण्याएवढे सोपे नसते.’
६)
पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणवाहिनी।
तीर्थ हे चंद्रभागा महा पातक धुनी।।
उतरले वैकुंठ महासुख मेदिनीं।
जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा।
आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मीकांता।।
नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचा गजर।
सन्मुख गरुड पारीं उभा जोडोनिया कर।
मंडित चतुर्भुज कटीं मिरविती कर।।
हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारी।
नाचती प्रेमसुखे नर तेथींच्या नारी।
जीवन्मुक्त लोक नित्य पाहती हरी।।
आषाढी कार्तिकी हो गरुडटकयांचे भार।
गर्जती नामघोष महावैष्णववीर।
पापासी रीग नाही असुर कांपती सुर।।
हे सुख पुंडलिके कैसे आणिले बापें।
निर्गुण साकारले आम्हांलागी हे सोंपे।
म्हणोनी चरण धरोनी राहिला सुखे।।
(अभंग क्रमांक - ४१३५)
पंढरी हे धर्मक्षेत्र आहे आणि तेथील भूमी पुण्यरूप आहे. येथे दक्षिण दिशेने मुख करून भीमा वाहते आहे. ती चंद्राच्या कोरीचा आकार घेऊन वाहत आहे. हिच्यात जे स्नान करतात, त्यांच्या पातकांचा नाश होतो. असे हे श्रेष्ठ सुखाचे वैकुंठ या पृथ्वीवर अवतरले आहे.
हे अनाथांच्या नाथा पांडुरंगा, तुम्ही साक्षात लक्ष्मीचे पती आहात; मी तुमची आरती ओवाळीत आहे. इथे पंढरीत, नित्य नवा उत्सव होत असतो, महावाद्यांचे गजर होत असतात. इथे समोरच्या पारावार विष्णुवाहन गरुड स्वतः हात जोडून उभे असतात. इथे विठ्ठलराया तुम्ही स्वतः चतुर्भुज म्हणजे पत्नीसहित आहात आणि कमरेवर हात ठेवून उभे आहात.
इथे महाद्वारासमोर वैष्णव जन अत्यंत आनंदाने हरिनाम घेत असतात आणि कीर्तन करत असतात. इथे अनेक नर आणि नारी प्रेम सुखाने भजन आणि नर्तन करत असतात.
इथे सर्व लोक, ज्याचा कधीही नाश होत नाही, अशा अविनाशी हरीला सर्वकाळ पाहात असतात, म्हणून ते जिवंत असूनही जीवनमुक्त असतात.
इथे आषाढी आणि कार्तिकीला महा-वैष्णवांचे महा-समुदाय गरुडटके (गरुडचिन्हे असलेले ध्वज) आणि पताका घेऊन येतात.
जिथे असा नामाचा गजर होत असतो, तिथे पापाचा प्रवेश होत नाही. अशा भक्तीने भारलेल्या भक्तांना बघून सुर आणि असुर थरथर कापतात.
हे सर्व सुख पुंडलिकाने इथे पंढरीमध्ये आणले आहे. जे निराकार होते, ते इथे पुंडलिकाच्या प्रेमासाठी साकार होऊन इथे राहिले आहे. त्यामुळेच मी सुखाने त्याचे पाय धरून राहिलो आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
तुकोबा म्हणाले – ‘बघ, पंढरीला जाणे म्हणजे सतत अविनाशी विठ्ठलाच्या सोबतीने राहणे. सतत नव्या नव्या उत्सवांच्या आणि वैष्णवजनांच्या संगतीत राहणे. भगवंताचे नाम घेत भजन-नर्तन आणि कीर्तन करत राहणे. अशा वातावरणात कर्माचा आणि पापाचा प्रवेशच होऊ शकत नाही.
एखाद्या माकडाला जर दारू पाजली गेली, त्यात त्याला विंचू चावला, त्यात त्याला भूतबाधा झाली, तर ते किती गोंधळ घालेल? तसे मनाचे असते. विचार, विकार, इच्छा, वासना - सगळा सततचा गोंधळ! नामसंकीर्तनाने मनाचे हे हैराण माकड शांत होते. कीर्तन, नर्तन, अविनाशी विठोबाचे दर्शन, गरुडटके, फडफडत्या वैष्णव पताका, हरिनामाचा गजर - अशा सर्व वातावरणात मन हालचाल करायचे विसरून जाते. विठ्ठलाच्या पायाशी लीन होऊ लागते. सतत अभ्यास करणाऱ्या मुला मुलींच्या संगतीत राहिल्याने एखाद्या उनाड विद्यार्थ्यालासुद्धा अभ्यास आवडू लागतो, तसे आहे हे.’
तुकोबा एकदम हसले आणि म्हणाले - ‘मी विठ्ठलाला भेटायचा मार्ग तुला सांगतो आहे, पण एक विचार कर, असले कर्महीन आणि कर्तृत्वहीन आयुष्य तुला रुचेल काय? कर्म विरुद्ध विठ्ठल; कर्तृत्व विरुद्ध विठ्ठल - अशी ही निवड आहे. तुला विठ्ठलापेक्षा कर्म जास्त आवडत असेल तर त्याने तुला का भेटावे?’
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा
क्षुल्लक देवदेवतांचा व त्यांच्या पूजेचा निषेध करणाऱ्या तुकोबांना ‘पाखंडी’ म्हणता येईल काय?
बा विठ्ठला, ज्ञानियाचे ‘पसायदान’ जगण्याचे आणि तुकोबाचा अभंग अंगी बाणण्याचे बळ आम्हाला दे!
तुकाराम समजणे म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणे
ईदच्या दिवशी काय घडले! तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले!!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment