परिस्थितीने माणसावर लादलेले एकाकी मरण आणि नदीपात्रातून बेवारस अवस्थेत वाहत गेलेले असंख्य मृतदेह, या दोन गोष्टींच्या मध्ये आज जगाला घेरून असलेल्या मानवी शोकांतिकेचा भलामोठा व्रण आकार घेत चालला आहे...
पडघम - देशकारण
सैकत मजुमदार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 17 July 2021
  • पडघम देशकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

माणसाला ज्ञात असलेल्या जगातल्या बहुतेक सगळ्या धर्मांत नि मूल्यव्यवस्थांमध्ये मानवी शरीर हे मरणानंतर नवे रूप, नवे जीवन धारण करत असते, असे मानले जाते. अर्थात, मरणानंतरचे क्षणसुद्धा कुटुंबांना, समाजघटकांना आणि या घटकांना वेढून असलेल्या समाज समूहांना यातना देणारे असतात. यू. आर. अनंतमूर्ती यांची अभिजात म्हणता येईल अशी एक कादंबरी आहे. ‘संस्कार’ हे तिचे नाव. या कादंबरीचा नायक आहे, एक ईशनिंदक ब्राह्मण. नाराणप्पा हे त्याचे नाव. एक दिवस हा नाराणप्पा मरतो. त्याचे मरण, तो राहत असलेल्या ब्राह्मण वस्तीमध्ये विचित्र पेच निर्माण करते. कारण, या नाराणप्पाने हयात असताना ब्राह्मणांचे म्हणून असलेले सगळे नीतिनियम पायदळी तुडवले असतात. तसे करताना, त्याने मांसभक्षण केलेले असते. मद्य प्यालेले असते. मुस्लिमांसोबत मैत्री केलेली असते. खालच्या जातीतल्या स्त्रीशी संबंध ठेवलेला असतो. त्यामुळे त्याचे पार्थिव हे त्या कर्मठ गावासाठी एक भलेमोठे प्रश्नचिन्ह होऊन बसलेले असते. अशा प्रसंगी चंद्रीचा म्हणजेच नाराणप्पाच्या रखेलीचा मोहक नि मांसल देह आणि तिने नारणप्पाच्या अंतिम संस्कारांसाठी देऊ केलेले अंगावरचे मौल्यवान दागिने, गावातल्या जात्याभिमानी, पण स्त्रीदेहाला वखवखलेल्या ब्राह्मण पुरुषांच्या नजरेला चाळवत राहतात. या सगळ्या ताणतणावात एकीकडे रापत आणि कुजत चाललेला नारणप्पाचा मृतदेह भ्रष्ट ब्राह्मण्यवादी हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून पुढे येत राहतो...

ही आणखी एक दूरस्थ नि पुरातन गोष्ट. होमरच्या ‘इलियाड’मधली. प्रायम आपल्या मरण पावलेल्या मुलाचा अर्थात, हेक्टरचा मृतदेह परत मिळावा यासाठी अ‍ॅशिल्सकडे अक्षरशः भीक मागतो. या अ‍ॅशिल्सने युद्धामध्ये हेक्टरला ठार मारलेले असते. युद्धाच्याच नशेमध्ये त्याने ‘ट्रोजन हिरो’ म्हणून गणल्या गेलेल्या हेक्टरचा मृतदेह आपल्या रथाला बांधून त्याची गोलाकार धिंड काढलेली असते. अशात अपोलो हा सूर्यदेव मध्ये पडतो आणि आपल्या दैवीशक्तीने हेक्टरच्या पार्थिवास इतकुसेही खरचटणार नाही, याची तजवीज करतो. वृद्धत्वाने वाकलेला प्रायम अ‍ॅशिल्सला त्याच्या वृद्ध पित्याची आठवण करून देतो, जेणेकरून अ‍ॅशिल्सचे हृदय द्रवेल आणि दया येऊन तो हेक्टरचे पार्थिव ताब्यात देईल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

थोर ग्रीक शोकांतिकाकार म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या सोफोकल्सने लिहिलेले एक नाटक आहे, ‘अँटिगनी’. या नाटकात थिबीचे नागरी युद्ध समाप्तीकडे येत असताना राजा क्रिऑन असे फर्मान सोडतो की, बंडखोर पोलिनिसिसच्या पार्थिवाच्या अंतिमसंस्काराचा अधिकार नाकारला जावा आणि त्याचे पार्थिव गिधाडांना आणि भटक्या जनावरांसाठी खाद्य म्हणून सडत ठेवले जावे. या नाटकात नायिका असलेल्या अँटिगनीचा सारा संघर्ष राजा क्रिऑनच्या फर्मानास न जुमानता आपला भाऊ पोलिनिसिसवर सन्मानपूवर्क अंत्यसंस्कार केले जावे, यासाठी आणि यासाठीच असतो.

अंतिमतः धर्म कोणताही असू दे, संस्कृती कोणतीही असू दे लौकिक जग सोडून गेलेल्या देहास अखेरचा म्हणून मायेचा स्पर्श करणे, ही प्रेमाचे दर्शन घडवणारी एक उदात्त कृती असते.

दूरभाष हाच मृत्यू

अनेक लोक आप्तस्वकीयांपासून लाखो मैल दूर जगातल्या वेगवेगळ्या खंडात आपले आयुष्य घालवतात. या दूरस्थ अभागींनी पार्थिवाच्या अखेरच्या स्पर्शाला मुकणे म्हणजे नेमके काय असते, आपले रक्ताचे कोणी तरी हे जग सोडून जाते, तेव्हा एकाकी मरणाचा एखाद्यास अनुभव येणे, म्हणजे नेमके काय असते, याची मला पूर्ण कल्पना आहे.

तेव्हा मी वयाच्या विशीत होतो. अमेरिकेतल्या एका विद्यापीठात शिकत होतो. शिकत असताना अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत मी माझे आई-वडील गमावले. मरण पावले, तेव्हा दोघेही वयाच्या पन्नाशीत पोहोचले होते. त्यात पहिले गेले ते वडील. त्यांच्या मृत्यूची घटना माझ्यापर्यंत पोहोचली, ती आईने केलेल्या टेलिफोनद्वारे. वडिलांना आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट केल्याचे तिने मला फोनवर सांगितले होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसलेला होता. खरे तर ते आधीच गेले होते, पण कदाचित मी तिकडे दूर १२ हजार किलोमीटर अंतरावर असल्यामुळेच आईला त्या क्षणी मला खोटे सांगणे तसे सोपे होते. अर्थातच तसे त्या क्षणी तिने सांगण्याचा उद्देश मला मानसिक-भावनिक धक्का बसू नये हा होता. ज्यांच्यासाठी ती खोटे बोलली होती, त्यांच्याशी १५ वर्षापूर्वीच तिचे वैवाहिक संबंध संपुष्टात आले होते. पंधरा वर्षांच्या घटस्फोटानंतर वडील आणि तिला जोडणारा मी एकमेव दुवा उरलो होता. आईशी बोलणे झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी एका मित्राने मला इ-मेल पाठवले. त्यातून वडील गेल्याची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली.  

घेरून आलेले रितेपण

त्या वेळी वडिलांच्या मृत्यूशी स्वतःला जोडून घेताना अनेक कारणांमुळे मला खूप अवघड गेले. ती प्रक्रिया माझ्यासाठी खूप त्रासदायक ठरली. अगदीच प्रांजळपणे सांगायचे, तर एव्हाना त्यांनी दुसरा घरोबा केला होता. मी त्यांच्यापासून मनाने खूप दूर गेलो होतो. तसेही वडील जेव्हा गेले, तेव्हा मी हजारो मैल दूर होतो. त्या वेळचा वडिलांचा झालेला मृत्यू माझ्यासाठी एक रितेपणा घेऊन आला होता. हे रितेपण पार्थिवाचे होते. हे रितेपण अंत्यविधीच्या प्रक्रियेचे होते. आणि हे रितेपण दुःखाच्या अभिव्यक्तीचेही होते.

अमेरिकेच्या पश्चिमेला एका विद्यापीठ परिसरात राहत असताना, तेव्हा आसपास माझे दुःख समजून घेईल किंवा मला त्या जडावलेल्या क्षणांत साथ देईल, असे जवळचेसुद्धा कोणी नव्हते. त्यात वैयक्तिक नातेसंबंधातली माझी असलेली अडचण, वैयक्तिक स्तरावरही दुःख व्यक्त करण्यात अडसर ठरत होती.  

पण, भावनिक-मानसिक खळबळ माजवणाऱ्या त्या रात्री मी तापाने फणफणलो. अवघे शरीर थंड पडत चाललेय, असे वाटू लागले. मनाने स्वीकार करण्याआधी शरीरानेच बहुदा शोकाची मला जाणीव करून दिली. ही जाणीव मरणाच्या वास्तवाचा अभाव असण्यातून आली होती. हे मरण माझ्या रक्ताच्या माणसाचे मरण होते. मला वाटले, मनाने शोककेंद्री साऱ्या भावना रोखून धरत, शरीराला आजार देऊन मला हतप्रभ केले होते. पहिल्या फोनच्या वेळी वडील गेले, हे सत्य लपवताना आईचे बोल अडखळले होते. त्या वेळी मला कल्पनाही नव्हती. पण वडील गेल्याच्या तीन वर्षे आणि दोन दिवसांनी आई गेल्याच्या बातमीने मी अर्ध्या रात्री झोपेतून जागा झालो होतो. तिचे मरण माझ्यापर्यंत टेलिफोनमार्फतच पोहोचले. टेलिफोन येणे हेच माझ्यासाठी तिच्या मरणाचे सूचन होते. दोन-अडीच दिवस कोमामध्ये गेल्यानंतर तिला मेंदूस्त्राव झाला होता आणि त्यातच ती हे जग सोडून गेली होती.

अखेरच्या स्पर्शाला नकार

वडील गेले तेव्हा, अनेक कारणांनी मला रोखले होते. परंतु, या वेळी तरी मी आईच्या अखेरच्या दर्शनासाठी जाणार होतो का? या वेळी खरे तर मृत्यूचे वास्तव माझ्यासाठी पर्याय घेऊन आले होते. पण पर्याय असला तरीही, परिस्थिती मला मागे खेचत होती. तेव्हा न्यू यॉर्कमधल्या ट्विन टॉवर्सवर हल्ला झाला होता. एकटी अमेरिका नव्हे, सबंध जग हादरले होते. हादरलेल्या त्या जगात अमेरिकेतून बाहेर जाणे किंवा बाहेरून अमेरिकेत येणे, हे कधी नव्हे इतके दुस्तर बनले होते. त्या वेळी तर मी पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेलेला अत्यंत काटकसरीने दिवस ढकलणारा एक साधा विद्यार्थी होतो. अशा विद्यार्थ्यास न्यूजर्सी ते कोलकाता आणि पुन्हा कोलकाता ते न्यूजर्सी या परतीच्या विमानप्रवासाचे भाडे न परवडणारे होते. त्या अर्थाने, माझ्या पुढ्यात तेव्हा जाण्याचा पर्याय होता, पण शेवटी कशासाठी म्हणून मी जाणार होतो? आई माझ्या छोट्याशा कुटुंबातली शेवटची व्यक्ती होती. ती गेल्यानंतर पाठीमागे मला कोणीही भाऊ-बहीण नव्हते, जवळचे म्हणावे असे इतरही कोणी नव्हते. असेही कोणी नव्हते, ज्यांच्याजवळ मी माझे दुःख सांगू शकणार होतो. माझ्या मनातली वेदना बोलून दाखवू शकणार होतो. त्यामुळे जे काही वियोगाचे दुःख असणार होते, ते माझे एकट्याचे असणार होते. इतरांशी त्याचा तशा अर्थाने काहीही संबंध नसणार होता.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

म्हणूनही मी निर्णय घेतला. आपण कोलकात्याला जायचे नाही. आपण आईच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घ्यायचे नाही. त्या पार्थिवास अखेरचा स्पर्श करायचा नाही. त्या प्रसंगी माझा एक मित्र म्हणाला, ‘ज्याचे दुःख एकट्याचेच असणार होते, त्याने अखेरच्या स्पर्शासाठी कोलकात्याला जाणे, तिथे जे काही घडणार त्याचा स्वीकार करणे हे सारे स्वतःसाठी अधिकची शिक्षा मागण्यासारखे होते.’ माझी आई माझ्या उपस्थितीविनाच अखेरच्या प्रवासाला गेली होती. तिच्या वाट्याला आलेले मरण सर्वार्थाने एकाकी ठरले होते.

एकाकी नि बेवारस

पण, आजवर मला असेच वाटत होते की, हजारो मैल लांबचे अंतर किंवा खंडांना विलग करणारा समुद्रच तेवढा मरणाऱ्याला आप्तांपासून दूर ठेवतो. मात्र आपल्यापैकी अनेक जणांच्या हे ध्यानातच आले नाही की, मार्च २०२०नंतर आप्तांच्या अनुपस्थितीतले एकाकी मरण हे आता वेदनादायी वास्तव बनत चालले आहे. परिस्थितीने लादलेले बे-वारसीपण हेच मरणाचे दुसरे नाव ठरले आहे. या काळात तुमच्या- माझ्यापैकी जे जिवंत असल्याचे, आपल्या स्वतःच्या घरात सुरक्षित असल्याचे भाग्य अनुभवताहेत, अशांसाठी माणसांचे मरण हे टेलिव्हिजन किंवा मोबाइल फोनवरची एक प्रतिमा बनले आहे. यात एकाच गावात-एकाच शहरात राहूनही आप्तांच्या अखेरच्या क्षणांचे सोबती असणे दुरापास्त बनले आहे. मरणासन्न अवस्थेतल्यांना भेटायला जाणे, रक्ताची नाही, पण रक्ताच्या नात्याइतकीच जिव्हाळ्याच्या व्यक्तीसाठी दुःखवेगातून आक्रंदन करणे, मृतास यथोचित सन्मान देणारे अंत्यसंस्काराचे विधी करणे, हीदेखील अशक्य कोटीतली गोष्ट बनली आहे. 

मला तर वाटते, आपण युद्धादरम्यानच्या काळात जगत आहोत. युद्ध जसे आपल्या प्रियजनांना हिरावून घेते, त्यांचे पार्थिव मात्र आपल्याला सोपवण्यास विसरून जाते. युद्धभूमी ही अशी जागा असते, जिथे ओळख न पटलेले कितीतरी मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत पडून असतात. युद्धकाळातले अनुभवास येणारे मरणानंतरचे हे एकाकीपण, बेवारसपण आता आपल्या आभासी समाज जीवनापाशी येऊन भिडले आहे. अक्षरशः दररोज माझ्या ट्विटर आणि फेसबूक अकाउंटवर मृत पावलेल्या प्रियजनांचे फोटो मला पाहायला मिळत आहेत. पण, त्यातले बहुसंख्य चेहरे माझ्यासाठी स्मरणात न राहिलेले असे आहेत. त्यात एक चेहरा बालपणीच्या घराची आठवण करून देणाऱ्या गेल्या ऑक्टोबरमध्ये मरण पावलेल्या कोलकात्यामधल्या माझ्या मावशीचा आहे. एक चेहरा रस्त्यापलीकडे राहणाऱ्या माझ्या एकेकाळच्या दिल्लीतल्या घरमालकाचा आहे. एक चेहरा कोलकात्यामधल्या आमच्या घराजवळ असलेल्या चश्म्याच्या दुकान मालकाचा आहे. या सगळ्यांचे असणे-नसणे एका मोबाइलवरच्या संदेशापुरते, एका फोनकॉलपुरते मर्यादित झाले आहे.

प्रेमाची कृती

गेल्या मार्च २०२०मध्ये माझ्या मित्रपरिवारातला जवळचा एक जण महासाथीमुळे उद्भवलेल्या आजाराला बळी पडला. माझ्या निकटचा म्हणून मरण पावलेला तो पहिला माणूस. महासाथीने ग्रासलेल्या त्या पहिल्या काही दिवसांत मला मरण हे एखाद्या वाईट अफवेसमान भासू लागले होते. आता तर आप्तस्वकीयांना भेटणे, त्यांच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करणे ही दुर्मीळ बाब झाली आहे. अशा वेळी मरण पावलेल्यांपासून शेवटच्या क्षणांत दुरावलेल्यांचे शब्द तेवढे माझ्यापर्यंत पोहोचत राहतात. मला इथे असे जाणवते, आपण ज्यांना गमावलेय, त्यांना सदेह निरोप देता येणे कितीही यातनादायी असले, तरीही माणसाचा माणसाशी असलेला अनुबंध ध्यानात घेता गरजेचे असते. अखेरचा निरोप घेताना करावयाचे विधी गरजेचे असतात. अशा वेळी आपल्याला दिसते की, महासाथीला बळी पडलेल्यांचे कितीतरी बेवारस मृतदेह नद्यांच्या किनाऱ्यावर वाहत आलेले आहेत. मग आपल्याला प्रश्न पडतो, या मृतदेहांचा कोणी शोध घेत असेल का? बेवारसपणे प्रवाहात वाहत गेलेले पार्थिव मिळवताना कोणाच्या जीवाची घालमेल होत असेल का?

कारण, मरणाच्या शोकापलीकडे जाऊन पार्थिवाच्या समोर नसण्यातही खूप काही गमावल्याची भावना दडलेली असते. या गमावल्याच्या भावनेला त्या अर्थाने अंतही नसतो. पार्थिवाचे सोबत नसणे, म्हणजे मृत प्रियजनाची अखेरची प्रतिमा तुमच्यापासून हिरावून घेतल्यासारखे ठरते.

समोर पर्याय असूनही आईच्या अंत्यविधीला उपस्थित न राहण्याच्या शोकमग्न अवस्थेत घेतलेल्या एका निर्णयाचा हा अशा रीतीने मी गेली अनेक वर्षे खोलवर विचार करतो आहे...

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मानवी शरीराला आणि मनाला सतत दुसऱ्याची सोबत हवी असते. त्यासाठीच शरीर-मनाची धडपड सुरू असते. मरणानंतरच्या क्षणांतही शरीराला दुसऱ्याची सोबत आणि स्पर्श हवा असतो. म्हणूनच कदाचित अंत्यसंस्काराप्रसंगीचे विधी मोलाचे असतात. ते धर्मासाठी नव्हे, तर प्रेमाचे प्रतीक म्हणून महत्त्वाचे असतात. मृत पावलेल्या प्रिय व्यक्तीच्या अंगावर चंदनाचा लेप लावणे, पार्थिवास नवी वस्त्रे परिधान करणे, अगदी थंड पडलेल्या पार्थिवास स्पर्श करणे, या सगळ्या क्रिया प्रेमाचाच आविष्कार असतात.

या अक्षय्य जाणिवेसह जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझे मन मला सांगते की, परिस्थितीने माणसावर लादलेले एकाकी मरण आणि नदीपात्रातून बेवारस अवस्थेत वाहत गेलेले असंख्य मृतदेह, या दोन गोष्टींच्या मध्ये आज जगाला घेरून असलेल्या मानवी शोकांतिकेचा भलामोठा व्रण आकार घेत चालला आहे...

‘मुक्त-संवाद’च्या या पाक्षिच्या १५ जूलै २०२१च्या अंकातून साभार.

..................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख कोलकात्याहून प्रकाशित होणाऱ्या ‘द टेलिग्राफ’मध्ये २ जुलै २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. लेखक सैकत मजुमदार अशोका विद्यापीठामध्ये इंग्लिश आणि सृजनशील लेखन या विषयाचे प्राध्यापक आहेत. मूळ लेखासाठी पहा –

https://www.telegraphindia.com/opinion/death-as-a-long-distance-telephone-call/cid/1820888

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......