१९९०च्या दशकाच्या मध्यापर्यंत जेव्हा तेंग सियाओ पिंग यांच्या सिद्धान्ताचा चीनने अवलंब केल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाले, तेव्हापासून माओ त्से तुंग यांच्या विचाराला चीनने तिलांजली दिली आहे काय, अशा चर्चा चालू आहेत. तेंग यांनी अवलंबलेला मार्ग हा पूर्णपणे वेगळा होता, यातही काही वाद नाही. आणि त्यातील बऱ्याच बाबी या माओ यांच्या आदर्शाविरुद्ध होत्या हेही सत्य आहे. परंतु हेही खरे आहे की, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बहुमताने कोणत्याही विरोधाशिवाय तेंग यांनी दाखवलेल्या मार्गाचा स्वीकार केला. पण ही नोंद घेण्यासारखी बाब आहे की, तेंग यांच्या काळात आणि त्यांच्यानंतरसुद्धा चिनी कम्युनिस्ट पक्षाने कधीच माओवादाला झिडकारले नाही. १९८०च्या दशकात माओवादाची समीक्षा जरूर केली गेली आणि त्यात ‘सांस्कृतिक क्रांती’वर टीकासुद्धा करण्यात आली. परंतु माओवादी वारशाला पक्षाने कायमच ठेवले आहे.
तेंग यांच्या मृत्यूनंतर चिनी कम्युनिस्ट पक्षाने ‘No two denials’चा सिद्धान्त मांडला. याचा अर्थ असा की, ते माओ यांच्या वारशालाही नाकारत नाहीत आणि तेंग यांनी दाखवलेला मार्गही सोडणार नाहीत. तेव्हापासून पक्षाच्या विचारपीठावर मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टालिन, माओ आणि तेंग यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. येथे या एका बाबीची तुलना करणे योग्य होईल की, जेव्हा सोव्हिएत युनियनमध्ये निकिता ख्रुश्चेव सत्तेत आल्याबरोबर त्यांनी कॉ. स्टॅलीन यांच्या वारशापासून सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाने स्वतःला केवळ वेगळेच केले नाही, तर स्टॅलिन यांचा संपूर्ण प्रभाव संपवण्याचे आणि त्यांच्या वारशाला लांछनास्पद ठरवण्याची एक प्रकारे मोहीमच चालवली होती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
माओच्या संबंधात चीनमध्ये असे काही घडले नाही. माओ आजही चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च पुढारी आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने हे समजून घेत आहे की, तेंग यांनी चीनच्या समृद्धीचा जो काही महाल उभा केला आहे, त्याची पाया माओ यांनीच घातलेला आहे. जर माओ यांच्या कार्यकाळात चीनमध्ये मानव विकासाच्या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करण्यात आली नसती, तर एक सुदृढ आणि शिक्षित युवकांची पिढी तयार झाली नसती आणि देशातील संसाधनांनासुद्धा पुन्हा नव्याने संघटित करता आले नसते. मग तेंग यांना चीनमध्ये औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानात विकास करण्याच्या योजनासुद्धा लागू करणे शक्य झाले नसते.
तेंग यांचे विकासासंबंधीचे धोरण काय होते, हे बरेचसे ‘सांस्कृतिक क्रांती’च्या अगोदरच स्पष्ट झाले होते. त्यामुळे माओ यांच्या मृत्यूनंतर चिनी कम्युनिस्ट पक्षाची धुरा त्यांच्या हातात आल्यानंतर ते त्यांच्या विकासाच्या धोरणाच्या दिशेने चीनला घेऊन गेले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु आज चार दशकांनंतर त्याकडे मागे वळून पाहिल्यानंतर काही बाबींचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, चीनमध्ये तेंग यांच्या सिद्धान्तावर झालेली सहमती आणि सोव्हिएत युनियनसह त्यांच्या गटांमधील साम्यवादी देशांचे कोसळणे, या जवळजवळ समकालीन घटना आहेत. सोव्हिएत गड विस्कळीत झाल्यानंतर संपूर्ण जगात नवीन परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा जगभरातून अशी चर्चा चालू होती की, चीनमधील कम्युनिस्ट शासन संपुष्टात येणे जवळजवळ निश्चित आहे. सोव्हिएत युनियनच्या गटातील देशातून समाजवादी व्यवस्थेच्या विरोधात जनतेच्या एका मोठ्या विभागामध्ये जो असंतोष खदखदत होता, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत तेथे उपभोगाचा स्तर अत्यंत खालच्या पातळीवर होता.
असे मानले जात होते की, तेथील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षामध्ये निर्माण झालेली नोकरशाही जनतेच्या भावनेपासून पूर्णपणे अलग पडली आहे. त्याचा परिणाम असा झाला की, जनतेचा एक मोठा विभाग पाश्चिमात्य जीवनशैलीकडे मोठ्या लालची नजरेने पाहत होता. यामुळे सोव्हिएत युनियनची आर्थिक व्यवस्था प्रत्यक्षात समतेवर आधारित आणि जनकल्याणाच्या भावनेने ओतप्रोत होती, तरीही त्याबाबत ती आपल्या जनतेचे आकर्षण संपवू लागली होती. हळूहळू सत्तेच्या कडक नियंत्रणाअंतर्गत लोकांच्या भावना भडकत राहिल्या आणि एका विशिष्ट वेळी त्याचा स्फोट झाला. या सगळ्या घटना चीनमध्येही घडू शकल्या असत्या.
जेव्हा सोव्हिएत युनियनचा गड उदध्वस्त झाला, तेव्हा समाजवाद की भांडवलशाही, याबद्दल जागतिक चर्चेत भांडवलशाहीचे पारडे जड ठरले. तेव्हा समाजवादाच्या बाजूने या चर्चेला गती देण्यासाठी अनुकूल परिस्थिती नव्हती. तसेच माओच्या काळासारखे समाजवादी विचारसरणीला निर्यात करण्यासाठी ही वेळ अनुकूल नव्हती. त्यामुळे चीनमध्ये तेंग यांनी घेतलेल्या मार्गाला सहजपणे सहमती मिळवण्यामध्ये ही परिस्थितीसुद्धा एक कारण असली पाहिजे, असा अंदाज लावणे चुकीचे ठरणार नाही.
तेंग यांनी जेव्हा देशाला श्रीमंत बनवण्याचे आणि आपल्या ताकदीला लपवून सध्याची वेळ मारून नेण्याचे सूत्र दिले, तेव्हा ही बाब चिनी कम्युनिस्ट पक्षाला आणि सर्वसामान्य जनतेला व्यावहारिक वाटली असली पाहिजे.
या नवीन सिद्धान्ताचा परिणाम असा झाला की विदेशी भांडवल आणि तंत्रज्ञानाला आमंत्रित करण्याची मोहीम सुरू झाली. या क्रमात त्यांना काही तडजोडीही कराव्या लागल्या. उदा. २००० साल येता-येता चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य बनण्यासाठी तयार झाला. तेव्हा या बाबीला पाश्चिमात्य जगाने भांडवलशाहीचा विजय झाल्याचे मानले.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
१९४९ साली झालेल्या क्रांतीनंतरच्या तीन दशकापर्यंत पाश्चिमात्त्य जगासाठी परका असलेला चीन हळूहळू तेथे गुंतवणुकीच्या मोठ्या आकर्षणाचे केंद्र बनायला लागला होता, ही बाब त्या वेळच्या निरीक्षकांनी नमूद केली आहे. १९९०च्या दशकातील उत्तरार्धापर्यंत अमेरिकन भांडवलदारांत चीनमध्ये जाऊन गुंतवणूक करण्याची स्पर्धा लागली होती. त्यांच्या लॉबीस्टच्या प्रभावाखाली चालणाऱ्या अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चीनी समर्थक धोरणे घेण्याची स्पर्धा लागली होती. जेव्हा अमेरिकेत हे घडत होते, तेव्हा साहजिकच त्यांच्या मागोमाग चालणारा युरोपसुद्धा या स्पर्धेपासून अलिप्त राहू शकला नाही.
पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या अभ्यासकांनी हे दाखवून दिले आहे की, जेव्हा तेथील राज्यकर्त्या वर्गाने ज्या देशाला दोस्त किंवा मग दुश्मन बनवले असेल, त्याप्रमाणे तेथील प्रसारमाध्यमे एखाद्या प्रामाणिक अनुयायाप्रमाणे त्यांच्या बाजूने किंवा मग विरोधात कृत्रिम सहमती किंवा असहमती निर्माण करण्याच्या कामी लागतात. २०००च्या जवळपासचे ‘दि इकॉनॉमिस्ट’, ‘फायनान्शियल टाईम्स’, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ यांसारख्या पाश्चिमात्य बहुराष्ट्रीय भांडवलदारांच्या वर्तमानपत्रांच्या अंकावर जर नजर टाकली तर आपल्या हे लक्षात येईल की, त्यातून चीनचे गुणगान करण्याची एक मोहीमच आखल्याचे आपणास दिसून येईल. ही मोहीम जोरात चालवली जाते. उदा. आज चीनच्या विरोधात झपाटल्याप्रमाणे विरोधी भावना व्यक्त केल्या जात आहेत.
आणि जेव्हा ही प्रसारमाध्यमे मोहीम चालवतात, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांवर आणि नंतर तिसऱ्या जगातील प्रसारमाध्यमांवरसुद्धा प्रभाव पडतो. तेंग यांच्या धोरणाने चीनमध्ये स्वस्त श्रम, अत्यंत चांगल्या मूलभूत सोयी सवलती, चीनची विस्तृत बाजारपेठ पाश्चिमात्य भांडवलदारांना उपलब्ध झाली होती. त्या काळात पाश्चिमात्य देशात चीनचे गौरवीकरण करण्याचा सपाटा चालू होता.
याचा चीनवर जो परिणाम झाला, त्याचाच अभ्यास करण्याचा या लेखमालेचा विचार आहे. परंतु त्यापूर्वी पाश्चिमात्य जगावर त्याचा काय परिणाम झाला, हे पाहणे उपयोगाचे होईल.
आज अमेरिका आणि काही प्रमाणात युरोपमध्ये ज्या ‘डी-इंडस्ट्रीयलायझेशन’ची चर्चा चालू आहे, ती खरं म्हणजे या दोन्ही ठिकाणी अवलंबलेल्या नवीन जागतिकीकरणाच्या धोरणामुळे तेथील भांडवलाचे चीनमध्ये पलायन झाले, त्याचा परिणाम आहे. अमेरिकेन भांडवलदारांना चीनच्या बाजारपेठेचा फायदा घेण्याची सूट देण्यासाठी सप्टेंबर २०००मध्ये ‘परमनंट नॉर्मल ट्रेड रिलेशन ॲक्ट’ (पीएनटीआर) संमत करण्यात आला. विशेषज्ञांनी ही बाब नमूद केली आहे की, त्यानंतरच्या दोन दशकांत अमेरिकेतील ४०,००० कारखाने बंद पडले आणि २०,००,००० रोजगारांच्या संधी समाप्त झाल्या आणि उर्वरितांची पगारवाढ गोठवली गेली.
दुसरीकडे अमेरिकन मोठ्या कंपन्यांच्या नफ्यामध्ये मात्र अरबो डॉलरची वाढ होत गेली. यामुळे अमेरिकन समाज आज एक असंतुष्ट समाज बनला आहे. २०१६मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधी वातावरण बनवून अशाच असंतोषाचा फायदा उचलला. परिणामी, अमेरिकन समाजात आज तीव्र प्रमाणात ध्रुवीकरण वाढत आहे. तेथील सर्वसाधारण लोक आपल्या वाईट परिस्थितीसाठी तेथील दोन्ही पक्षांना जबाबदार धरत आहेत. कारण भांडवलदारांच्या दबावाखाली १९९० ते २०१०पर्यंत डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही राजकीय पक्षांनी चीन समर्थक धोरणे अवलंबली होती.
या ‘डी-इंडस्ट्रीयलायझेशन’च्या परिणामी अमेरिका आणि युरोपियन समाजामध्ये आर्थिक विषमता गतीने वाढली आहे. तेथे परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, जेव्हा तेथे करोना साथीचा प्रादुर्भाव झाला आणि चीनवरून होणारा पुरवठा बंद झाला, तेव्हा साधे मास्क आणि पीपीई कीटसारख्या साधारण वस्तूसुद्धा सहजपणाने आपल्या जनतेला उपलब्ध करून देण्याच्या अवस्थेत हे देश नव्हते.
दुसरीकडे चीन जगाचा कारखानाच बनला आहे. तो जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ‘क्वांटम कम्प्युटिंग’सारख्या टेक्नॉलॉजीमध्ये तो सर्वांत पुढे आहे. एक मोठी लष्करी शक्ती म्हणून पुढे येत आहे. निश्चितच चीनमध्येसुद्धा आर्थिक विषमता वाढलेली आहे. परंतु त्याबरोबरच त्याच्या संपूर्ण समाजाचा जीवनस्तरसुद्धा उंचावला आहे. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या सर्वच सर्व्हेतून चिनी समाज मन आज एक संतुष्ट आणि आपल्या राज्यव्यवस्थेवर विश्वास असणारा समाज बनला असल्याचे नमूद केले आहे.
येथे हेही उल्लेखनीय आहे की, चीनमध्ये उत्पादनाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत असलेल्या जमिनीची मालकी अजूनही सरकारकडेच आहे. तेथे एक जबरदस्त सार्वजनिक क्षेत्र (पब्लिक सेक्टर) अस्तित्वात आहे. सशक्त पंचवार्षिक योजनांची पद्धत अस्तित्वात आहे. आर्थिक धोरणांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. हे नियंत्रण किती मर्यादेपर्यंत आहे, हे नुकत्याच घडलेल्या जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या आणि अलिबाबा कंपनीचे मालक जॅक मा यांच्यावर सरकारने केलेल्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. त्यानंतर जगभर अशा बातम्या पसरल्यात की, अलिबाबा आणि दुसऱ्या कंपन्या चिनी सरकारच्या योजनेनुसार संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार झाल्या आहेत. चीनचा कम्युनिस्ट पक्ष त्यालाच ‘चिनी पद्धतीचा समाजवाद’ (socialism with chinese characteristic) म्हणत आहे.
तेंग यांच्या आर्थिक सुधारणेच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करण्यात आले होते. तेव्हा आरोग्य क्षेत्राचाही मोठा भाग खाजगी क्षेत्रात गेला होता. शिक्षण क्षेत्रातसुद्धा खाजगी क्षेत्राचा हिस्सा वाढत होता. परंतु मागील काही दशकांमध्ये या धोरणात बराच बदल करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात पुन्हा एकदा सार्वजनिक क्षेत्राचा वाटा वाढला आहे. सार्वजनिक शिक्षण क्षेत्राचा पाया मजबूत झाला आहे. नुकत्याच करोना साथीच्या वेळेस सार्वजनिक क्षेत्राने या साथीशी मुकाबला करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचे दिसून आले आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
वास्तविक पाहता पाश्चिमात्य देश गेल्या एक दशकापासून चिनी अर्थव्यवस्थेच्या याच स्वरूपाशी संघर्ष करत आहेत. पाश्चिमात्य देशांची मुख्य तक्रार हीच आहे की, भांडवलाच्या जागतिकीकरणातून जी नवीन अर्थव्यवस्था निर्माण झाली, त्यामुळे त्यांच्या देशातून सामाजिक विषमता व भेदाभेद आणि त्यामुळे असंतोष वाढला आहे. परिणामी त्यांच्या राजकीय व्यवस्थेला आज एका मोठ्या आवाहनाचा सामना करावा लागत आहे. पण चीनमध्ये मात्र या नवीन अर्थव्यवस्थेमुळे तो श्रीमंत देश म्हणून पुढे आला आणि असे तेथे सामाजिक आणि मानवी विकासामध्ये प्रचंड सुधारणा होत होत हे सर्व घडले आहे. पाश्चिमात्य देश याला ‘अनुचित व्यापार व्यवहार’ असे म्हणत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, चीनने आपले सार्वजनिक क्षेत्र पूर्णपणे नष्ट करून टाकावे. परंतु चिनी कम्युनिस्ट पक्षाने असे करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
तेंग यांचा मार्ग योग्य होता की नव्हता, याबाबतच्या चर्चा चालू राहतील. परंतु सध्या तरी त्यांच्या मार्गानेच चीनला एक महाशक्ती बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे, हे स्पष्ट आहे. चीनने ही उपलब्धी ‘No two denials’ सिद्धान्ताला मानून प्राप्त केली आहे. परंतु चीनची आज जी काही व्यवस्था आहे, ती समाजवादी आहे काय? चीन खरोखरच अजूनही मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टालिन, माओ यांच्या मार्गावर चालत आहे का? ही एक विडंबनाच आहे की, एकेकाळी खुद्द चीनने सोव्हिएत युनियनवर ‘सामाजिक साम्राज्यवादी’ असल्याचा आरोप केला होता. आज त्याच्या स्वतःवरच ‘साम्राज्यवादी’ झाल्याचा आरोप लावला जात आहे. या आरोपात किती तथ्य आहे, या प्रश्नांचे विवेचन इथून पुढच्या लेखात आम्ही करणार आहोत.
मराठी अनुवाद – कॉ. भीमराव बनसोड
..................................................................................................................................................................
या लेखमालिकेतील आधीच्या लेखांसाठी पहा -
चीन : एका देशाच्या कायापालटाची अभूतपूर्व कथा
‘मागास’ चीनला ‘आधुनिक’ बनवण्याचा एक ‘ग्रँड प्रोजेक्ट’!
सोव्हिएत युनियनशी झालेल्या संबंधविच्छेदानंतर चीनने आपला वेगळा मार्ग पत्करला!
…आणि तेंग यांनी समाजवाद म्हणजे ‘गरिबीचे समान वाटप नाही’ हा आपल्या विचाराचा प्रमुख मुद्दा बनवला
..................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख ‘https://www.mediavigil.com’ या पोर्टलवर २३ जून २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment