नय्यारा नूर यांनी कदाचित ‘त्या’ वेळेच्या आधीच थांबण्याचा निर्णय घेतला असेल… पण त्यामुळेच त्यांचा ‘दौर’ लक्षात राहण्याची जास्त शक्यता आहे
कला-संस्कृती - सतार ते रॉक
सतीश बेंडीगिरी
  • नय्यारा नूर (जन्म - ३ नोव्हेंबर १९५०, मृत्यू - २१ ऑगस्ट २०२२)
  • Sat , 17 July 2021
  • कला-संस्कृती सतार ते रॉक नय्यारा नूर Nayyara Noor लता मंगेशकर Lata Mangeshkar शहरयार झैदी Shehryar Zaidi फ़ैज़ अहमद फ़ैज़ Faiz Ahmad Faiz रॉबिन घोष Robin Ghosh

लाहोरमधल्या नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये १९६८ साली झालेल्या स्नेहसंमेलनात ‘झनक झनक पायल बाजे’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटासाठी लता मंगेशकरांनी गायलेले मीराबाईरचित ‘जो तुम तोडो पिया’ हे भजन एक विद्यार्थिनी गात होती. तिथल्याच इस्लामिया कॉलेजचे प्रोफेसर असरार - जे  स्वतः एक संगीतकार होते - यांनी त्या मुलीची प्रतिभा ओळखली आणि तिला चित्रपटात गाण्याची संधी दिली, अगदी तिने गाण्याचे रीतसर शिक्षण घेतलेले नसतानासुद्धा. मग रेडिओ पाकिस्तान आणि पीटीव्ही असा तिचा प्रवास झाला. ‘अक्कड बक्कड’, ‘टालमटोल’ या मालिकांसाठी ती गायिली. त्यातील ‘बरखा  के लाखों तीर,  दिल  पर  किस को सहूँ  मैं’ या तिच्या गाण्याने पाकिस्तानी संगीतकारांना भुरळ घातली.

त्या वेळी पार्श्वगायन क्षेत्रात फरीदा खानुम आणि नूरजहाँ यांचा दबदबा होती. पण तरीही १९७३ साली या मुलीला ‘घराना’ या पाकिस्तानी चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. तिची गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतर मात्र मेहदी हसन आणि अहमद रश्दी यांच्याबरोबर तिची जोडी जमली आणि पाकिस्तान चित्रपटसृष्टीला एक नवी गायिका मिळाली, तर फरीदा खानुम-नूरजहाँ यांना एक स्पर्धक तयार झाली. त्या गायिकेचं नाव आहे - नय्यारा  नूर.

फ़ैज़ अहमद फ़ैज़ या प्रख्यात कवीचा जावई, शोएब हाश्मी आणि इएमआय रेकॉर्डिंग कंपनी यांनी संयुक्तपणे ‘नय्यारा सिंग्ज फ़ैज़’ हा अल्बम प्रदर्शित केला. त्यातील ‘बरखा बरसे छत पर’ हे शहरयार झैदीसोबत गायिलेले फ़ैज़ यांचं एकमेव हिंदी गीत आणि हा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. नय्यारा नूर हे नाव घराघरांत पोहोचलं.

तिचा जन्म गुवाहाटी (आसाम)चा. तिचं कुटुंब मूळचं अमृतसरचं. १९५०मध्ये गुवाहाटीला स्थायिक झालेलं. १९५८च्या सुमारास नय्यारा कुटुंबासह पाकिस्तानात गेली आणि लाहोरमध्ये स्थायिक झाली. तिच्या वडिलांना गुवाहाटी इथल्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यासाठी १९९३पर्यंत थांबावं लागलं.

नय्यारा सांगते, “शालेय शिक्षण घेण्याबरोबरच संगीत ऐकणं आणि गाणी म्हणणं हाच मनोरंजनासाठी विरंगुळा होता. लहानपणी कानन देवी आणि कमला यांच्या भजनांनी, तसेच बेगम अख्तरच्या ग़ज़ल व ठुमरी यांनी प्रेरणा दिली. मी काननबाला आणि बेगम अख्तर ऐकतच मोठी झाले, पण लता मंगेशकर आमच्या सगळ्यांची ‘ऑल टाईम फेवरीट’!”

ती पुढे सांगते, “या गाण्याच्या ओढीनेच मला माझा नवरा मिळवून दिला… शहरयार झैदी. ते आंतर-महाविद्यालयीन संगीत स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा माझे प्रतिस्पर्धी असायचे आणि नेहमी मला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मिळायची, तर त्यांना दुसऱ्या क्रमांकाची. ते हेली कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधित्व करायचे. एकदा बेगम अख्तरची रेकॉर्ड शोधताना दुकानात आमची गाठ पडली. एकच रेकॉर्ड आणि आम्ही दोन गिऱ्हाईक! ‘आपण लग्न करू आणि एकच रेकॉर्ड ऐकू!’ त्यांनी प्रस्ताव मांडला. थोड्या दिवसांनी आम्ही लग्न केलं!”

शहरयार झैदी यांनी टीव्हीवर सहाय्यक अभिनेता तसेच मॉडेल म्हणून आतापर्यंत बरेच यश मिळवले आहे. त्यांचा मोठा मुलगा नाद-ए-अली पार्श्वगायक आहे, तर धाकटा मुलगा जाफर झैदी ‘काविश’ या म्युझिक बँडचा मुख्य गायक आहे.

नय्याराने टेलिव्हिजनसाठी अरशद मेहमूद आणि जावेद अल्लादित्ता यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जी गाणी गायिली आहेत, ती त्यांची स्वतःची आवडती गाणी आणि ग़ज़ला आहेत. ‘तानसेन’ या मालिकेचं संगीत असो किंवा शीर्षकगीत… ‘चलो उस  कोह पर’, ‘मुझे विदा करो’ किंवा गझल ‘ऐ जस्बा-ए दिल गर में चाहूँ’ किंवा गीत ‘फिर सावन रुत की पवन चली’ ही गाणी त्यांच्या सतत ओठावर असतात. नय्याराने गायिलेल्या पीटीव्हीच्या ‘धूप किनारे’ या मालिकेचं फ़ैज़ अहमद फ़ैज़लिखित शीर्षकगीत ‘रात यूँ दिल मैं, तेरी खोई हुई याद’, ‘यह धुप किनारा, श्याम ढले, मिलते हैं दोनों वक़्त जहाँ’ या ग़ज़ला पाकिस्तानसह भारतातही लोकप्रिय झाल्या.

सुलतान अर्शद या संगीतकारानं ‘पहली नजर’ या राज कपूरच्या चित्रपटातील ‘उनका इशारा जान से प्यारा’ हे अनिल विश्वास यांनी संगीत दिलेलं गाणं नय्यारा यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं आणि अनिल विश्वास यांना ऐकवलं. अनिलदा यांचा विश्वासच बसेना, इतक्या गोड आवाजात नय्याराने हे गाणं म्हटलं होलं. ‘ही चाळीसच्या दशकात असती तर किती बरं झालं असतं!’, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

‘यादों के सायें’ या गाजलेल्या अल्बममध्ये न्यू थिएटरच्या चित्रपटातील काही गाणी नय्याराने सादर केली, जी ४०च्या दशकात काननबालाच्या आवाजात रेकॉर्ड केलेली होती आणि तीही फक्त ७८ आरपीएम रेकॉर्डवर उपलब्ध होती. रेकॉर्डची प्रत अगदीच खराब होती आणि काही शब्द तर कळतच  नव्हते. नय्याराने हिंदीचं उत्तम ज्ञान असलेल्या काही लोकांकडे जाऊन शब्द जाणून घेतले आणि त्यानंतर रेकॉर्डिंग केलं.

‘आईना’ (१९७७) या पाकिस्तानी चित्रपटासाठी रॉबिन घोष यांनी एका लोकप्रिय बंगाली ट्यूनवर आधारलेलं ‘रूठे हो तुम, तुमको कैसे मनाऊ पिया’ हे गाणं नय्यर यांच्या आवडीच्या पहिल्या दहा गाण्यांपैकी एक. ती म्हणते, “रॉबिनसाहेब बांगलादेशात गेले नसते तर मी त्यांच्या चित्रपटांसाठी गाणं चालूच ठेवलं असतं.” आपल्याकडे ओ. पी. नय्यर यांना लताचा आवाज पसंत नव्हता, तसंच पाकिस्तानात रॉबिन घोष यांना नूरजहाँचा आवाज आवडत नसे.

नूरने अलीकडच्या काळात गात नाही. त्याविषयी तिचं म्हणणं आहे - “प्रत्येकाला एक दिवस कुठे तरी थांबणं भागच आहे. थांबण्याची वेळ आली आहे, असं लोकांनी सांगण्यापेक्षा आपणच ती वेळ ओळखावी आणि शिखरावर असतानाच निवृत्ती घ्यावी.’ असं असलं तरीही तिच्या चाहत्यांना मात्र तिनं गावं असंच वाटतं.

कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात कधीतरी ‘थांबा’ येतोच, तो ओळखणं महत्त्वाचं आणि शहाणपणाचंही असतं. नय्यारा नूर यांनी कदाचित ‘त्या’ वेळेच्या आधीच थांबण्याचा निर्णय घेतला असेल… पण त्यामुळेच त्यांचा ‘दौर’ लक्षात राहण्याची जास्त शक्यता आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नय्यारा नूर हिच्या काही गाजलेल्या ग़ज़ला -

१) हम के ठहरे अजनबी, २) तुम मेरे पास रहो, ३) तेरा साया जहाँ भी हो, ४) वो जो हम में तुम में, ५) ये हाथ सलामत है, ६) आ जाओ चलो आज, ७) आइये अर्ज़ गुज़ारें, ८) चलो फिर से मुस्करायें, ९) खैर हो तेरी लैलायोंकी, १०) उठो अब माटी से उठो

काही गाजलेली गाणी -

१) तू ही बता, पगली पवन (चित्रपट : फूल मेरे गुलशन का), २) इतना भी न चाहो मुझे (चित्रपट : परदा ना उठाओ), ३) आज गम है मुश्किल क्या (चित्रपट : मस्ताना), ४) टूट गया सपना (चित्रपट : सुबह का तारा), ५) बोल री गुड़िया बोल (चित्रपट : आस), ६) इक अजनाबी चेहरे (चित्रपट: 'बागी हसीना), ७) मेरा प्यार तुम हो (चित्रपट : फर्ज और ममता), ८) मौसम तो दीवाना है (चित्रपट : दो साथ), ९) तेरा प्यार बन के आए (चित्रपट : भूल), १०) जरा मेरी नब्ज देख कर (चित्रपट : अजनबी), ११) फूल बन जाउंगी (चित्रपट : किस्मत), १२) कुछ लोग मोहब्बत का सीला (चित्रपट : गुमराह)

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख