अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नोटाबंदीवर बोलणे बंद केले आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपवाले पैसे देत आहेत. इतके पैसे कुठून आले त्यांच्याकडे? नोटाबंदीनंतर भाजपकडे निवडणुकांसाठी इतका पैसा कुठून आला, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
राजसाहेब, सगळ्याच पक्षांकडे जिथून येतो, तिथूनच भाजपकडेही पैसा येणार ना? नोटाबंदीच्या आधीच्या महिन्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची खरोखरच पडताळणी झाली तर कळेल गुपित. शिवाय, भाजप सत्तेत आहे- त्यांच्याकडे नव्या नोटांमध्येही हवा तेवढा पैसा येणार, हे काही गुपितही नाही.
………………………………
२. गेल्या दोन वर्षांत महागाई खूप वाढली आहे. या महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन नियम काढणार आहेत. तुमच्याकडे किती सोने आहे याचा हिशोब आता तुम्हाला द्यावा लागणार आहे. महागाईने आता किती लोकांकडे सोने उरले आहे हो? आता या मोदी सरकारचा लोकांच्या घरातल्या सोन्यावर डोळा आहे. : खासदार सुप्रिया सुळे
चला, ताई आता साहेबांच्या तालमीत तयार व्हायला लागल्या म्हणायच्या. पण, त्या बोलतायत, त्यातलं एक वेगळंच तथ्य समजतंय का? नोटाबंदी झाली, तेव्हा महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला. आताही सरकारचा डोळा आहे तो सर्वसामान्यांच्या घरातल्या सोन्यावर. श्रीमंतांना आणि राजकारण्यांना असल्या नियमांची काही झळ बसत नसते, हेही त्यांनी न सांगताच सांगून टाकलंय.
………………………………
३. या वेळी देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार आहे. निवडणुकीनंतर येणाऱ्या वादळात अनेक मोठे दिग्गज नेस्तनाबूत होणार आहेत, असे विधान रामदेव बाबा यांनी केले होते. ते म्हणाले, २०१४ मध्ये मी एका पक्षाच्या बाजूने होतो. परंतु मी आता निष्पक्ष आहे.
रामदेव बाबांचं हे विधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह पाच राज्यांमधल्या भाजपच्या दिग्गजांना उद्देशून केलेलं आहे, असं विरोधकांना वाटतंय. केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी मात्र हे विधान भाजपच्या बाजूने असल्याचा दावा केलाय. योगाच्या माध्यमातून बाबांना येणाऱ्या काळात घडणाऱ्या घटनांची माहिती होते, असंही ते म्हणतात. या विधानांची संदिग्धता आणि कोणालाही आपल्या सोयीने कसलाही अर्थ काढता यावा, असा जो सैलपणा आहे, तो पाहता बाबांना भारताचे नॉस्ट्राडेमस म्हणायला काहीच हरकत नाही.
………………………………
४. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातून अमेरिकेत गेलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांविषयी घेतलेली प्रतिकूल भूमिका भारतातील माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी संधी ठरू शकते, असे मत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.
याला म्हणतात धंदेवाईक माणूस. तिकडे परदेशांत गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांचं काही व्हायचं ते होवो, इकडचा धंदा वाढणार याचा यांना आनंद. अमेरिकेतल्याप्रमाणे भारतात कडक कायदे, जाचक नियम आणि अटी नसल्यामुळे कमी पैशांत या कर्मचाऱ्यांना पिळून घेता येईल आणि वाट्टेल ते मार्ग वापरून सगळा उद्योग आपल्या 'मुठ्ठी में' करता येईल, याचा आनंद सर्वाधिक असणार, हे उघड आहे.
………………………………
५. नगर शहराजवळील पांगरमल येथील बनावट दारूच्या मृत्युकांडातील मृतांची संख्या वाढून सहावर गेली आहे. दोघांचा काल, मंगळवारी रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणाच्या शोधात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारातील उपाहारगृहातच बनावट दारूचा कारखाना आढळला.
या मंडळींनी 'दवादारू' या शब्दाचा अर्थ अगदी शब्दश: घेतलेला दिसतो आहे. सरकारी रुग्णालयांची आणि तिथल्या उपचारांची एकंदर स्थिती पाहता, वेदनाशमनासाठी रुग्णांना दवापेक्षा दारूचाच आधार अधिक वाटेल, याच उदात्त भावनेतून त्यांनी हा कारखाना उघडला असणार.
………………………………
६. उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या अव्यंग प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने एक फेब्रुवारीपासून मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष्य केले जाणार आहे. एक ते १३ फेब्रुवारी या कालावधीत तब्बल ८०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ६० जण सरकारी कर्मचारी आहेत. आता या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये संबंधित विभागांना पत्र पाठवून वरिष्ठांकरवी या कर्मचाऱ्यांना समज देण्याची विनंती करण्यात येणार आहे.
हे साफ चूक आहे. अपंगांना आताच्या सरकारी भाषेत काय म्हणतात? दिव्यांग. बरोबर ना. म्हणजे त्यांच्यात काही दिव्य शक्ती आहे, असा अर्थ घ्यायचा. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बाय डिफॉल्टच तशी दिव्य शक्ती असते, ते पदसिद्ध दिव्यांग म्हणजे दिव्य शक्तीप्राप्त अंगाने युक्त आहेत. मग त्यांनी या डब्यातून प्रवास केला तर बिघडतं काय?
………………………………
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment