समाजवादी आणि गांधीवादी जीवनदृष्टी घेऊन राजकारण करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या, कर्तबगार, तऱ्हेवाईक, तसेच ‘यशस्वी’ माणसांचा घेतलेला हा शोध आहे
ग्रंथनामा - झलक
नागनाथ कोत्तापल्ले
  • ‘व्यक्तिरंग’ या पु्स्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 July 2021
  • ग्रंथनामा झलक व्यक्तिरंग Vyaktirang कुमार सप्तर्षी Kumar Saptarshi युक्रांद Yukrand एसेम जोशीS. M. Joshi जयप्रकाश नारायण Jayaprakash Narayan शरद पवार Sharad Pawar सत्याग्रही विचारधारा Satyagrahi Vichardhara नागनाथ कोत्तापल्ले Nagnath Kottapalle

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा एकवीस व्यक्तींची व्यक्तिचित्रे ‘व्यक्तिरंग’मध्ये लिहिली आहेत. नुकतेच हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

कुमार सप्तर्षी लेखन करतात, तेव्हा समाजामध्ये परिवर्तन व्हावे, समाज अधिक विज्ञाननिष्ठ विचार करणारा व्हावा, त्याचे वर्तन अधिकाधिक बुद्धिनिष्ठ व्हावे, असा एक हेतू त्यांच्या व त्यांच्यासारख्या डावीकडे झुकलेल्या राजकीय व्यक्तींच्या लेखनामागे असतो. १९६७मध्ये त्यांनी ‘युवक क्रांती दल’ या तरुणांच्या लढाऊ संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर अनेक लढे उभारले गेले. भारत सरकारच्या वतीने दलित विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते, ती वाढवून मिळावी, यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. या शिवाय विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचाराविरुद्ध युवक क्रांती दलाने अनेक लढे दिले व यशस्वी करून दाखवले. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर त्यांचा अधिक कटाक्ष असायचा. सत्तरनंतरच्या दशकात युवक क्रांती दलाचे कार्य अधिक व्यापक होत गेले. म. गांधी आणि समाजवाद यांच्यावर निष्ठा असणाऱ्या कुमार सप्तर्षींना आणीबाणीमध्ये अटक करून येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ज्या निवडणुका घेण्यात आल्या, त्यामध्ये ते अहमदनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

आज ते गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आहेत. ‘सत्याग्रही विचारधारा’ हे मासिक चालवतात. तसेच विविध स्वरूपाचे वैचारिक लेखनही त्यांनी केले आहे. ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ हे त्यांचे आत्मचरित्र बहुचर्चित आहे. आता ते ‘व्यक्तिरंग’ हा व्यक्तिचित्रणपर लेखांचा संग्रह घेऊन वाचकांच्या भेटीस येत आहेत.

कुमार सप्तर्षी यांनी व्यवस्थेविरुद्ध कायम संघर्षाची भूमिका घेतली. सत्तेच्या विरोधाचे काम केले आहे. सत्ता हस्तगत करण्यापेक्षाही जनतेचे प्रश्न सुटावेत, यासाठी ते कायम धडपडताना दिसतात. विशिष्ट अशी भूमिका असल्याशिवाय हे शक्य होत नाही. समाजवादी मूल्यनिष्ठा हीच त्यांची भूमिका आहे. आपण सत्तेच्या जवळ नाही, याचे त्यांना मुळीच दुःख नाही. उलट जनतेच्या सुखदुःखाशी आपण बांधून घेतले आहे, याचे समाधान त्यांना आहे. ‘व्यक्तिरंग’मध्ये ते सूचकपणे प्रकट होतानाही दिसते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कुमार सप्तर्षी यांच्या जीवनात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या एकवीस व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांचे चित्रण ‘व्यक्तिरंग’मध्ये आले आहे. त्यातील काही व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर काही व्यक्ती प्रसंगपरत्वे त्यांच्या आयुष्यात आल्या. त्यापैकी काही त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाने कुमार सप्तर्षी यांच्यावर ठसा उमटवून गेल्या आहेत. ‘लोकनायक जयप्रकाश नारायण’ आणि ‘साथी एस.एम जोशी’ तर त्यांना गुरुस्थानी आहेत.

कर्पुरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडिस, प्रधान मास्तर यासारख्या समाजवादी विचार मानणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राम मनोहर लोहियांनी तर कुमार सप्तर्षी यांना ‘ब्राह्मण्या’च्या बाहेर आणण्याचे मोठे काम केले आहे. विनायकराव कुलकर्णी यांनी त्यांच्यापुढे जगण्याचा आदर्श ठेवलाय. तसेच ज्ञानसाधना कशी करावी, याचाही आदर्श ठेवला. त्यामुळे कुमार सप्तर्षी यांना त्यांच्याबद्दल विलक्षण ममत्व वाटते.

म. गांधी यांच्या विचारांवर नितांत निष्ठा असलेले चोपड्याचे मगनभाऊ पुढे त्यांचे आप्त झाले. परंतु आप्त असण्यापेक्षाही एक निष्ठावंत गांधीवादी म्हणून कुमार सप्तर्षी त्यांच्याकडे पाहतात. राजकारणात असूनही राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवणारे दादा धर्माधिकारी कुमार सप्तर्षींना जवळचे वाटतात, ते त्यांच्या गांधीवादी आचरणामुळे.

संतसाहित्याचा वारसा लाभलेले, संतत्वाकडे वाटचाल करणारे बाळासाहेब भारदे काँग्रेस पक्षामध्ये होते. काँग्रेसमधील उच्च सत्तापदावरही ते होते. तरीही ते कुमार सप्तर्षींच्या जवळचे आहेत. त्याचे कारण पुन्हा ते निष्ठावान गांधीवादी आहेत, हेच आहे. बाळासाहेब भारदे त्यांचे आप्त आहेत. परंतु ते आप्त आहेत म्हणून कुमार सप्तर्षी त्यांना जवळचे आहेत, असे नाही, तर गांधीवादी जीवननिष्ठा हा दोघांना जवळ आणणारा समान धागा आहे.

मनस्वी कलावंत असणारे आणि नाटक सिनेमात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारे निळू फुले नुसते समाजवादी विचारांचे होते असे नाही, तर समाजवादी पक्षातील कृतिशील कार्यकर्ते होते. योगायोगाने कुमार सप्तर्षी आणि निळू फुले जवळ आलेले असले तरी त्यांचे संबंध विकसित झाले, घनिष्ठ झाले ते समाजवादी विचारांवरील निष्ठेमुळे.

या साऱ्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे पाहताना लक्षात येते की, एकवीसपैकी अकरा व्यक्ती या समाजवादी आहेत किंवा गांधीवादी तरी आहेत. थोडे अलंकारिक भाषेत सांगायचे तर त्यांच्या काळजात रुतून बसलेली ही सारी माणसे आहेत.

चरित्र, आठवणी, व्यक्तिरेखापर लेखन वाचत असताना असे लक्षात येते की, अशा प्रकारचे लेखन ज्या कुणासंबंधी लिहिले जात असते, त्याचे व्यक्तिमत्त्व ते साकार करतेच; पण प्रत्यक्ष लेखन करणाऱ्या लेखकाचे व्यक्तिमत्त्वही - पुष्कळदा तर आत्मचरित्रही त्यातून प्रकट होत जाते. त्या न्यायाने येथे संवेदनशील असणारे, अन्यायासंबंधी चीड असणारे, व्यवस्था परिवर्तनासाठी कायम संघर्षाला कटिबद्ध असणारे कुमार सप्तर्षीही व्यक्त होतात.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना आदर्श मानले, त्यांच्याबद्दल आदर बाळगायचा, पण त्यांचे भक्त व्हायचे नाही, जे पटत नाही ते प्रकट केलेच पाहिजे, ही वृत्तीही कुमार सप्तर्षी यांच्या ठायी आहे. ही सारी व्यक्तिचित्रे वाचताना ते लक्षात येते, चित्रकार जसे सेल्फ पोर्ट्रेट काढतात, तशीच काहीशी प्रक्रिया अशा प्रकारच्या लेखनात होते. येथे एकवीस महत्त्वाची व्यक्तिचित्रे तर वाचायला मिळतातच, पण कुमार सप्तर्षी यांचे बाविसावे सेल्फ पोर्ट्रेटही पहावयास मिळते. हा अधिकचा फायदा आहे. समाजवादी आणि गांधीवादी जीवनदृष्टी घेऊन राजकारण करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या, कर्तबगार, तऱ्हेवाईक तसेच ‘यशस्वी’ माणसांचा घेतलेला हा शोध आहे.

२.

सेवाभाव हे समाजजीवनातील महत्त्वाचे मूल्य आहे. परंतु सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे मात्र फारच थोडी असतात. अशी माणसे आपल्या सेवाभावाने समाजाचे रंगरूप बदलण्याचा प्रयत्न करतात. याउलट सेवाभाव जागवून व्यवस्था बळकट करणारेही असतात. विशेषतः धार्मिक परिवेषात वावरणारे लोक जेव्हा सेवाभावाबद्दल बोलत असतात, तेव्हा त्यांना प्रस्थापित व्यवस्था अधिक बळकट करावयाची असते. अशा सेवाभावी व्यक्तींबद्दल कुमार सप्तर्षी यांना फारशी आस्था नाही. अपवाद फक्त भैय्यूजी महाराजांचा. त्यांचे भक्त त्यांना ईश्वराचा अवतार मानत. पण भैय्यूजींमधील सत्त्वशील ‘माणसाची’ सप्तर्षी त्यांच्यावरील लेखात ओळख करून देतात. धर्मनिरपेक्ष भूमिका मांडून भारतीय संविधानाला पवित्र ग्रंथ मानणारे भैय्यूजी सत्तेतील ढोंगापुढे कसे हतबल झाले, याचे विवेचन लेखात झाले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

धर्माचा बडिवार न माजविता जेथे सेवाभाव जागविला जातो, तेथे कुमार सप्तर्षी विनम्र होतात. अशा दोन व्यक्ती म्हणजे महारोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे आणि सुरक्षित मातृत्व प्राप्त झाले पाहिजे, निराधार महिला-मुलांना आधार मिळाला पाहिजे यासाठी ‘मातृसेवा संघ’ उभारणाऱ्या कमलाताई होस्पेट. या दोघांच्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा ‘विदर्भातील बाबा आणि आजी’ हा लेख सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तिमत्त्वे उभे करणारा आहे.

तुम्ही विरोधी पक्षात असला तरी सत्ताधारी पक्षातील काही लोकांशी संबंध येतोच. तसा तो कुमार सप्तर्षी यांचाही आला. त्यातून यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकराव चव्हाण आणि शरद पवार ही व्यक्तिचित्रे साकार झाली आहेत. बाळासाहेब भारदेही काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसमधील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांबरोबरच स्वच्छ अंतःकरणाचे पण तऱ्हेवाईक राजकारणी जांबुवंतराव धोटे यांचे व्यक्तिचित्रही कुमार सप्तर्षी यांनी मोठ्या आस्थेवाईक पद्धतीने चित्रित केले आहे. या साऱ्या व्यक्तिचित्रांमधून त्या त्या व्यक्तिमत्त्वाचे विविध रंग, त्यांचे माणूसपण प्रकट होतेच, पण महाराष्ट्राच्या, भारताच्या राजकीय जीवनाचा व्यापक पटही उलगडत जातो. अर्थात येथे केवळ माहिती, घटना, प्रसंग, आकडेवारी इ. रुक्ष तपशील नाहीत. तर त्या व्यक्तिमत्त्वातील माणूसपण केंद्रस्थानी ठेवून व्यक्तिचित्र उभे केले गेले आहे. त्यामुळे ही सारीच व्यक्तिचित्रे कमालीची वाचनीय झाली आहेत.

कर्पुरी ठाकूर यांची पहिली भेट कुमार सप्तर्षी सांगतात ती बाळासाहेब देसाई यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर. १९६७मध्ये बिहारच्या दुष्काळात मदत कार्य करण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनानुसार पुण्याहून काही युवक गेले होते. त्या वेळी महामायाबाबू मुख्यमंत्री असले तरी सारा कारभार कर्पुरी ठाकूरच सांभाळत असत. कर्पुरीजींना भेटण्यासाठी बाहेर असंख्य माणसे उभी असताना ते कुमार सप्तर्षी आणि त्यांच्या बरोबरीच्या युवकांना बोलावतात. दिलखुलास स्वागत करतात. तेथे असलेल्या अधिकार्यांशी ओळख करून देतात. हे स्वागत इतके मनमोकळे असते की, ‘‘आता ते त्या अधिकाऱ्यांना आमच्या पायावर डोके ठेवायला सांगतात की काय असे वाटले’’, असा मिष्किल शेराही कुमार सप्तर्षी मारतात. कर्पुरी ठाकूर यांचे मोकळेढाकळे असणे, सर्वसामान्यांबद्दल प्रेम असणे, या साऱ्या गोष्टी कुमार सप्तर्षी प्रकट करतात. समाजवादी म्हणवणे आणि समाजवादी असणे यातील फरक कर्पुरी ठाकूर यांना पाहिल्यानंतरच कळतो, असेही त्यांना वाटते.

लोकनायक जयप्रकाश नारायण हे कुमार सप्तर्षी यांचे श्रद्धास्थान. तरुणांबद्दल प्रेम, माणसाबद्दलचा जिव्हाळा, मानवतेवरील गाढ श्रद्धा, जेलच्या भिंतीवरून उडी मारण्याचे धाडस आणि दृढ निर्धार, हे जयप्रकाश नारायण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष. कुमार सप्तर्षींना जयप्रकाश नारायण कसे दिसले, जाणवले, ते तर ते सांगतातच; पण त्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा निर्देश करून त्यांचे भारतीय राजकारणातील स्थानही अधोरेखित करतात.

जयप्रकाश नारायण यांनी कुमार सप्तर्षींच्या जीवनावर जसा अमिट ठसा उमटवलेला आहे, त्याप्रमाणेच एस. एम. जोशी यांचेही मोठे संस्कार कुमार सप्तर्षी यांच्यावर आहेत. किंबहुना एस्सेम आणि कुमार सप्तर्षी यांच्यामध्ये अधिक भावनिक संबंध निर्माण झाले. कुमार सप्तर्षी एस.एम. जोशी खासदार असताना त्यांच्याबरोबर दिल्लीला होते. पुढे पुलोद सरकारच्या काळात, आणीबाणीनंतर ज्या घडामोडी झाल्या, त्या काळात ते एस.एम. बरोबर होते. स्वातंत्र्य आंदोलनात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात एस. एम. जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

एस. एम. जोशी यांचे व्यक्तिमत्त्व पाहात असताना महाराष्ट्रातील जातीय राजकारणाचा पोत उलगडत जातो. एस.एम. जोशी जात मानत नसत, पण जातीचा फटका त्यांना बसला. स्वातंत्र्योत्तर राजकारणाने घेतलेले विपरीत वळण एस.एम. जोशी यांचे व्यक्तिमत्त्व पाहू लागले की, कळायला लागते. ज्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला त्यांचा नंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्याच एका शिष्याने काँग्रेसमध्ये जाऊन पराभव केला. तो प्रचारामध्ये काही बोलत नसे, फक्त एस.एम. जोशी ब्राह्मण आहेत, असे सांगायचा. ही घटना आणि पराभव एस.एम. जोशी यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी मराठा राजकारणाचा धसका घेतला. पुलोदच्या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. परंतु त्यांच्या मनातील भीतीने उचल खाल्ली असे कुमार सप्तर्षी नोंदवतात. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले. शरद पवारांना मराठा असण्याचा फायदा झाला. परंतु शरद पवार अजिबात जातीयवादी नाहीत, हेही कुमार सप्तर्षी नोंदवतात. विशेष म्हणजे म. गांधीचा खून झाला आणि महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेष शिगेला पोहोचला असताना महाराष्ट्राने एस.एम. जोशी यांचे नेतृत्व मान्य केले होते. मग महाराष्ट्र निर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जाती तीव्र झाल्या असे म्हणता येईल का?

मतभेद झाले तरी समजून घेण्याची उदारता एस.एम. जोशी यांच्याकडे होती. नेहमी ‘पोलिटिकली करेक्ट’ राहणारे एस.एम. जोशी १९८० साली मात्र जनता दलाबरोबर गेले. ज्या जनता दलात रा. स्व. संघ वृत्तीचे लोक होते. येथे त्यांची चूक झाली. तरीही एस.एम. जोशी या ‘सामाजिक पित्याचे’ ॠण फेडता येणे शक्य नाही. फक्त त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणे आपल्या हातात असते, अशी कृतज्ञतेची भावना कुमार सप्तर्षी व्यक्त करतात.

जीवनाच्या प्रत्येक अंगाचे मूलभूत चिंतन मांडणारे डॉ. राम मनोहर लोहिया ‘कृतिशील विद्रोही विचारवंत’ या व्यक्तिचित्रातून दिसतात. राम मनोहर लोहिया जर्मनीतून शिकून आलले होते. जर्मनीमध्ये त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी ‘म. गांधी यांची दांडी यात्रा’ या विषयावर पीएच.डी. मिळवली होती. जर्मनीतील त्यांच्या शिक्षणाला एक वेगळा अर्थ आहे. लोकशाही पोकळ झाली की, हिटलरचा जन्म होत असतो, हे त्यांनी तेथे पाहिले होते. त्यामुळे अहिंसक जनआंदोलन हेच भारतीय क्रांतीचे एकमेव साधन असू शकते असे ते मानत. सत्तेचे विकेंद्रीकरण केले नाही तर हुकूमशाहीचा उदय होतो, असेही ते सांगत. ते विद्रोही होते. हा विद्रोह स्वतःपासून असला पाहिजे असे ते मानत. विद्रोहातून ते व्यवस्था विरोधी (अँटी इस्टॅब्लिशमेंट) झाले. त्यांच्याकडे खूप लोक आकर्षित झाले. त्यांच्यामुळेच लोकसभा ही सामान्यांच्या प्रश्नांचे चर्चा करणारे ठिकाण असते, हे सर्वसामान्यांना माहीत झाले. लोहियांच्या प्रभावातूनच ‘युक्रांद’मध्ये ‘स्त्री मुक्ती’ हा विषय समाविष्ट झाला असे कुमार सप्तर्षी यांनी लिहिले आहे.

व्यवस्थाविरोधी विचार करणारे हे समाजवादी विचारवंत नेते हळूहळू अँटी काँग्रेस होत गेले. पुढे पुढे तर ओबीसी संघटनांसंबंधी बोलू लागले. भारतीय राजकारणात जातीयवादाला इथूनच सुरुवात झाली. तरीही त्यांनी मांडलेल्या मूलभूत विचारांमुळे भारतीय राजकारणाच्या पटावर डॉ. लोहिया यांचे स्थान अढळ आहे, असे कुमार सप्तर्षी यांना वाटते.

साथी जॉर्ज फर्नांडिस यांना कुमार सप्तर्षी यांनी ‘झंझावाती समाजवादी योद्धा’ म्हटले आहे. त्यांची सारी कारकीर्द पाहता हे विशेषण किती सार्थ आहे, ते लक्षात येते. जॉर्ज फर्नांडिस यांनी संप पुकारला की, तो यशस्वीच होत असे. त्यांच्याकडे संघटनकौशल्य तर होतेच, पण चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे ते ठामपणे उभे राहात. रस्त्यावर उतरून लढा देणारा हा माणूस पुढे पुढे घसरत गेला. हिंदू राष्ट्र निर्मितीला जॉर्जनी हातभार लावला हे कुमार सप्तर्षी यांचे मत कटू असले तरी सत्य आहे. हा पराक्रमी माणूस शत्रू पक्षाला कसा मिळाला हे कायम गुलदस्त्यात राहणार आहे, असे ते शेवटी म्हणतात.

स्वातंत्र्य आंदोलनात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या पण पुढे समाजवादी पक्षातर्फे चालविल्या जाणाऱ्या ट्रेड युनियनमध्ये अल्पशा मानधनावर आयुष्य काढणाऱ्या विनायकराव कुलकर्णी यांचे व्यक्तिचित्र मोठे चटका लावणारे आहे. अपुऱ्या मानधनात स्वाभिमानाने जगायचे, तेव्हा बचतीचे प्रयोग केले पाहिजेत, हे ठरवून ते स्वयंपाकात बचतीचे प्रयोग करत असत. विनायकराव कुलकर्णी सतत ज्ञानाची आराधना करताना दिसतात. आणीबाणीनंतर जनता पक्षात जाताना जनसंघाचा संभाव्य धोका ओळखण्याची कुवत फक्त त्यांच्यातच होती. भणंग आयुष्य जगत ज्ञानसाधना करणारे आणि दूरदृष्टी प्राप्त झालेले विनायकराव आधुनिक ॠषीच होत, हे त्यांचे व्यक्तिचित्र वाचताना प्रत्ययाला येते.

समाजवादी चळवळ जशी कुमार सप्तर्षी यांना आपली वाटते, त्याप्रमाणेच म. गांधींही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या, चळवळीच्या आणि चिंतनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे सत्तेपासून दूर राहून म.गांधी प्रणित जीवनप्रणाली आपलीशी करणारे आचार्य दादा धर्माधिकारी, काँग्रेसमध्ये राहून, विविध सत्तापदे उपभोगूनही गांधीवादी राहणारे बाळासाहेब भारदे आणि म.गांधी यांच्या शब्दाखातर आयुष्य पणाला लावणारे चोपडयाचे मगनभाऊ यांची व्यक्तिचित्रेही कुमार सप्तर्षी यांनी मोठ्या आस्थेने रंगवलेली आहेत.

काँग्रेसमधील काही भावलेल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रेही त्यांनी रेखाटलेली आहेत. वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे त्यांना भावलेली आहेत. विशेषतः शंकरराव चव्हाण यांचा साधेपणा, निर्मेाही वृत्ती आणि काटेकोर शिस्त हे गुण कुमार सप्तर्षी यांना महत्त्वाचे वाटतात. एवढेच नाही तर नव्याने आमदार झाल्यानंतर सभागृहात कसे काम करावे याचे शंकरराव चव्हाण यांनी कुमार सप्तर्षी यांना केलेले मार्गदर्शन मोलाचे होते. आपल्या पक्षातील लोक कसे स्वार्थी आहेत, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती व त्यामुळे ते स्वपक्षीयांशी कठोरपणे वागत असत. त्याबद्दल कुमार सप्तर्षी मार्मिकपणे लिहितात की, ‘‘इतका अँटी काँग्रेस असणारा काँग्रेसचा मुख्यमंत्री मी प्रथमतःच पहात होतो.’’

बाबरी मशिद पाडली गेली, तेव्हा शंकरराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री होते. पंतप्रधान असणाऱ्या नरसिंहरावांना शंकररावांनी मशिदीच्या संरक्षणाचा सल्ला दिला होता. परंतु नरसिंहराव मात्र काही करायला तयार नव्हते. तेव्हा शंकरराव चव्हाण यांनी नरसिंहरावांबरोबरचे संबंध तोडून टाकले. त्या वेळी त्यांचा जो तडफडाट झाला, त्याचे कुमार सप्तर्षी यांनी केलेले चित्रण वाचताना शंकरराव चव्हाण, हे किती मोठे होते, ते लक्षात येते. याच प्रसंगात शरद पवार फारसे जबाबदारीने वागले नाहीत, असेही कुमार सप्तर्षी यांनी लिहिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळ नक्षत्राप्रमाणे चमकून गेलेल्या, तऱ्हेवाईक स्वभावाच्या जांबुवंतराव धोटे यांच्याबद्दल कुमार सप्तर्षी मोठ्या मिष्किल भाषेत लिहितात. उदा. विदर्भातल्या लोकांनी त्यांना देवत्व बहाल केले होते. त्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना मारतही असत. विशेष म्हणजे कार्यकर्ते हा मार प्रसाद म्हणून स्वीकारत. परंतु त्यांनी आपल्यापुढे एम. जी.रामचंद्रन यांचा आदर्श ठेवला आणि राजकारणातून ते संपूनच गेले. जांबुवंतरावाना त्यांच्या साऱ्या मर्यादांसह अत्यंत सहानुभूतीने समजून घेण्याचा प्रयत्न सप्तर्षी करतात. त्यातून एक अविस्मरणीय, अफलातून व्यक्तिचित्र निर्माण झाले आहे, यात मात्र काही शंका नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या शरद पवारांना समजून घेणे अवघड असल्याची नोंद कुमार सप्तर्षी करतात. कुमार सप्तर्षी आणि शरद पवार समकालीन. पुण्यात एकाच काळात शिकलेले. एकमेकांना ओळखणारे. किंबहुना कुमार सप्तर्षी त्यांना आपले मित्र मानतात. तरीही शरद पवार कळणे अवघड आहे, असे कुमार सप्तर्षींना वाटते. कारण मोठे गुंतागुंतीचे आहे. शरद पवार जन्माने मराठा असल्याचा फायदा त्यांना मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. तरीही ते केवळ मराठ्यांचे पुढारी नाहीत. त्यात त्यांना स्वारस्य नाही. प्रारंभापासून त्यांचे सारे मित्र आणि विश्वासू सहकारी मराठेतर आहेत.

अल्पवयात ते विधानसभेत पोहोचले. पुलोद सरकारच्या काळात अत्यंत तरुण असताना मुख्यमंत्री झाले. पुढे भारतीय राजकारणात गेले. केंद्रात विविध मंत्रालयांचे कामकाज सांभाळले. तरी त्यांच्याबद्दल विश्वासार्हता नाही. त्यांना कुठलीही तात्त्विक भूमिका नाही, जेथे जेथे जी भूमिका उपयोगी असेल, तेथे तेथे ती भूमिका ते घेतात, अशी काहीशी कटू निरीक्षणे कुमार सप्तर्षी नोंदवितात. ते प्रारंभापासून चतुर आहेत, त्यांचा डावपेचांवरच अधिक विश्वास असतो, पुष्कळदा त्यांची मनःस्थिती द्विधा असते. मोक्याच्या वेळी नको ती भूमिका ते घेतात, असा प्रतिकूल अभिप्रायही कुमार सप्तर्षी व्यक्त करतात. तरीही प्रश्न असा निर्माण होतो की, शरद पवार कुमार सप्तर्षींना महत्त्वाचे का वाटतात? त्याचे कारणही लेखाच्या शेवटी त्यांनी दिले आहे. ते म्हणजे शरद पवारांवर आईकडून झालेले पुरोगामी संस्कार. त्यांच्या आई जातीच्या पलीकडे जावून विचार करणाऱ्या होत्या. एक क्षण असा येतो की, शरद पवारांवरील पुरोगामी संस्कार उफाळून येतात आणि ते ‘पोलिटिकली करेक्ट’ भूमिका घेऊ शकतात. जातिधर्माच्या, संकुचित स्वार्थाच्या पलीकडे जाऊ शकतात, म्हणूनच शरद पवार महत्त्वाचे ठरतात.

ही सारी राजकारणातील माणसे पाहताना दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे भारतीय - विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा, त्यातील चढ-उतारांचा, काळाला कलाटणी देणाऱ्या घटनांचा मोठा पट ‘व्यक्तिरंग’मध्ये उलगडत जातो. व्यक्ती वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकाच कालपटावर वावरत असल्यामुळे स्वातंत्र्यानंतरचा पन्नासएक वर्षांचा कालपट साक्षात होत जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणाचा खालावत जाणारा दर्जा आणि त्यातून निर्माण होणारी ‘राजकीय संस्कृती’ही सूचित होत जाते. कुठल्याही देशाची राजकीय संस्कृती कशी आहे, यावरून त्या त्या देशाच्या एकूण स्थितिगतीचा अंदाज बांधता येतो. भारताची आजची राजकीय संस्कृती भारताचे हिणकस रूप प्रकट करणारीच आहे, असे म्हणता येते. म्हणजे राजकारणाची अवनती किती खालच्या पातळीवर गेली आहे, ते सहज लक्षात येते.

३.

चळवळ आणि राजकारणाबाहेरील केवळ तीन व्यक्तिचित्रे ‘व्यक्तिरंग’मध्ये आलेली आहेत. त्यापैकी एक कुमार सप्तर्षी यांच्या वडिलांचे आहे. बालपणात अचानक पोरके झालेले, स्वतःच्या कष्टातून जीवन उभारणारे, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ शकलो नाही याची आयुष्यभर खंत बाळगणारे, प्रामाणिकपणे जगणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना अजिबात फिरकू न देणारे, शिक्षणावर विश्वास असणारे आणि शेवटपर्यंत ज्ञानोत्सुक असणारे कुमार सप्तर्षी यांचे वडील ‘आमचे दादा’ या व्यक्तिचित्रात काहीशा तटस्थपणेच कुमार सप्तर्षी रेखाटतात. किंबहुना तटस्थपणामुळेच हे व्यक्तिमत्त्व उभे राहू शकले आहे.

मध्यमवर्गीय मूल्ये मानणारा परंतु ऐट मात्र सरंजामदारी असणारा कुमार सप्तर्षी यांचा मित्र गोपाळ मिरीकर अत्यंत प्रामाणिक. कुठल्याही लाभाशिवाय प्रीती करणारा. म्हणून असा मित्र लाभणे हे भाग्यच. चांगला मित्र आयुष्यातील अटीतटीच्या प्रसंगी योग्य सल्ला देतो. तसा मध्यावधी निवडणुकीच्या वेळी रा. स्व. संघाच्या लोकांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केल्यामुळे व आपण तेवढ्या खालच्या पातळीवर उतरू शकत नसल्यामुळे (किंवा उतरणे योग्य नसल्यामुळे) निवडणुकीस उभे राहू नये, असा सल्ला गोपाळ मिरीकरांनी दिला होता व तो कुमार सप्तर्षी यांनी पाळला होता, असे दिसते.

बिहारच्या दुष्काळात सापडलेल्या सुखदेवचे रेखाटलेले व्यक्तिचित्रही अतिशय वाचनीय झाले आहे. विशेषतः बिहारची जमीनदारी, तेथील दारिद्रय, तेथील अज्ञान इ. गोष्टींच्या पार्श्वभूमीवर निरागस सुखदेव आतून स्पर्शून जातो.

स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींची चित्रणे कुमार सप्तर्षी यांनी ‘व्यक्तिरंग’मध्ये साकार केलेली आहेत. परंतु स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक लोकोत्तर व्यक्तींचे संदर्भही वर्णनाच्या ओघात येऊन जातात आणि इतिहासातील सुटलेले दुवे ध्वनित होत जातात.

व्यक्तीच्या सत्त्वापर्यंत पोहोचणे म्हणजे खरे तर त्या त्या व्यक्तीच्या माणूसपणापर्यंत पोहोचणे असते. माणसाचा माणूस म्हणून तळ गाठता आला की, लेखनामध्ये जिवंतपणा येतो. चैतन्य येते. या साऱ्या गोष्टी कुमार सप्तर्षी यांच्याकडे आहेत. म्हणूनच ही सारी व्यक्तिचित्रे विलक्षण जिवंत झाली आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कुमार सप्तर्षी ‘व्यक्तिरंग’मध्ये समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, भारतीय राज्यघटनेतील पायाभूत तत्त्वे इ. मूल्यांची चर्चा करतात. त्याप्रमाणेच भारतीय समाजजीवनाला लागलेले काही रोगही सांगतात. उदा. भारतात असलेल्या जात आणि धर्मासंबंधीच्या खुळचट कल्पना. किंबहुना या दोन गोष्टींमुळे हा देश क्रमाने दुःस्थितीकडे वाटचाल करतो आहे. जात, धर्म, राज्य घटनेतील पायाभूत तत्त्वे आणि समाजवाद, समाजवादी चळवळ, समाजवादी चळवळीचे प्रभावहीन होत जाणे, त्या मागची कारणे यांची चर्चा, या व्यक्तींच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. तसेच रा. स्व. संघ आणि हिंदुत्ववादी राजकारणाचे स्वरूप यांचे चिंतनही आले आहे. असे करताना जीवनातील श्रेष्ठतर मूल्ये आणि मानवी नाते संबंधांबद्दलही कुमार सप्तर्षी लिहीत जातात.

लोकोत्तर व कर्तबगार व्यक्तींच्या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने जात, धर्म, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजिक न्याय, समाजवादी राजकारण, हिंदुत्ववाद्यांचे देशाला विषमतेकडे आणि दुःस्थितीकडे नेणारे धोरण या साऱ्यांची चर्चा ‘व्यक्तिरंग’मध्ये येते.

एकंदरित जीवनाविषयी, राजकारणाविषयी, माणसांविषयी, विविध मूल्यांविषयी नवे भान देऊन वाचकांना चिंतनप्रवृत्त करण्याचे सामर्थ्य कुमार सप्तर्षी यांच्या लेखनामध्ये आहे. त्यामुळे एक उत्तम वाङ्मयीन आविष्कार म्हणून जसे ‘व्यक्तिरंग’चे महत्त्व आहे, त्याप्रमाणेच गेल्या पन्नास-साठ वर्षांतील भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणूनही या पुस्तकाचे महत्त्व वादातीत आहे.

‘व्यक्तिरंग (मी पाहिलेले)’ – डॉ. कुमार सप्तर्षी

कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,

मूल्य – ३५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......