‘डोह : एक आकलन’ गंभीरपणे वाचायचे पुस्तक आहे. शिवाय हा श्रीनिवास कुलकर्णी यांच्या सर्व लेखनावरचा संदर्भग्रंथही आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
रवींद्र कुलकर्णी
  • श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि ‘डोह : एक आकलन’चे मुखपृष्ठ
  • Fri , 16 July 2021
  • ग्रंथनामा शिफारस श्रीनिवास विनायक कुलकर्णी Shrinivas Vinayak Kulkarni डोह Doh डोह : एक आकलन Doh - Ek Akalan

आजोळहून मिरजेला पोचायचे व तेथून सकाळी कोयना पकडली की, ती पंधरा-वीस मिनिटांतच भिलवडीला पोचलेली असायची. अजून सायंकाळपर्यंत गाडीचा प्रवास बाकी असे. जूनचा पहिला आठवडा उलटून गेलेला असे आणि शाळा सुरू व्हायला काहीच दिवस उरलेले असत. त्याचा ताण असे. गाडी थांबली की, हलक्या पावसाने भिजलेल्या भिलवडीच्या छप्पर नसलेल्या प्लॅटफॉर्मवर थोडी लगबग दिसे. कन्नड-मराठी वाक्ये कानावर येत आणि गाडी निघे. तिथे उतरून भिलवडी गावात जायचा प्रसंग कधी आला नाही. असे स्टेशन असलेल्या गावात काय घडत असेल, याचे कुतूहल वाटायचे. श्रीनिवास कुलकर्णी यांचे  ‘डोह’ वाचताना हे आठवते. ते प्रथम वाचले त्याला ३५ वर्षे झाली असावीत.

मौज प्रकाशनाचे ‘डोह - एक आकलन’ हे पुस्तक येणार आहे, असे ऐकले, तेव्हापासून या पुस्तकाच्या मागावर होतो. ते प्रकाशित होऊन वर्ष होऊन गेले. ठाणे-डोंबिवलीच्या दुकानात ते आत्ता पोहचत आहे. त्यांना इतके दिवस त्याबद्दल काही माहीतही नव्हते. एकाने ‘आणून देतो’ असे सांगून त्याचे नाव लिहून घेतले, पण केवळ वाट पहायला लावण्यापलीकडे काही घडले नाही. नेटवरून मागवले तर दोन दिवसांनी माझी ऑर्डेर त्यांनी रद्द करून टाकली. परवा फक्त ‘डोह’ मागितले तर दुकानदाराने विचारले, ‘छोटे का मोठे?’ तेव्हा ‘डोह - एक आकलन’ त्याच्याकडे आल्याचे कळले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आकलन माझ्या हातात आले, तेव्हा काही जिंकले असे न वाटता ‘सुटलो’ असे वाटले. मी काही कला शाखेचा विद्यार्थी नव्हतो. ‘सत्यकथो’त्तर असलेल्या पिढीतल्या मला आकलन वाचून ‘डोह’चा अनुभव घेण्यात आपण कुठे कमी पडलो नाही ना, याची मला खात्री करायची होती. किंवा तो अनुभव अधिक गहरा होतो का ते पहायचे होते.

‘डोह’ वाच असे मला कुणी सांगितले नव्हते. मी स्वत:हूनच त्याच्यापाशी पोचलो होतो. ‘प्रातिनिधिक लघुनिबंध संग्रह’ असे दणकट नाव असलेल्या छोटेखानी पुस्तकात ‘आम्ही वानरांच्या फौजा’ हा निबंध मी प्रथम वाचला. त्या पुस्तकातल्या केवळ या निबंधासाठी तब्बल दहा रुपये साठवून ते पुस्तक मी विकत घेतले. नंतर कॉलेज सुरू झाल्यावर ‘डोह’ हातात आले होते. चाळीतल्या खोलीच्या खिडकीत बसून दुपारी ते वाचत होतो, तेव्हा बाहेर धोधो पाऊस पडत होता.

आकलन वाचताना प्रथम लक्ष गेले, ते समीक्षालेख लिहिलेल्या लेखकांच्या नामावलीकडे. त्यातले अनेक साहित्यिक आता हयात नाहीत. त्यांनी ज्या मासिकांत हे लेख लिहिले होते, ती कधीच अंतर्धान पावली आहेत. या साऱ्यांची नावे नव्या कोऱ्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत वाचताना ढवळल्यासारखे होते. वा. ल. कुलकर्णी, दुर्गा भागवत, म. द. हातकणंगलेकर व सरोजिनी वैद्य अशा लेखकांनी ‘डोह’वर लिहिलेले वाचून आपल्याला भावलेले दर्जेदार काही होते, याचे आश्वासन मिळाल्यासारखे वाटले. यातले काही लेख ज्या वर्तमानपत्रांत आले होते, त्यांचे रूप आज पार बदलून गेले आहे. जर हे पुस्तक आले नसते, तर इतक्या समीक्षकांनी व लेखकांनी ‘डोह’वर लिहिले होते, हे कळण्याचा कोणताही मार्ग माझ्याकडे नव्हता. राजा ढाले यांनी ‘डोह’वर लिहिले होते हे सुखद वाटणारे आहे. जी. ए. कुलकर्णी, ग्रेस व व्यंकटेश माडगूळकर यांनीही श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखनाबद्दल काही लिहून ठेवायला हवे होते, असे वाटून गेले.

‘डोह’बद्दल तेवढ्याच ताकदीने लिहिणे हे अवघड आहे. द. भी. कुलकर्णी यांच्यासहित अनेकांना ते ‘ललितगद्य लिहिणारे बालकवी’ वाटतात. उमेश करंबेळकरांना त्यातले लेखन ‘निसर्गाचा दस्तऐवज’ वाटतो. त्यांनी आपल्या लेखात श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखात अढळणाऱ्या प्राणीसृष्टीवरच्या इतर अभ्यासपूर्ण माहिती ग्रंथांचा उल्लेख केला आहे. बहुतेकांनी त्यांच्या लेखातल्या माणसांकडेही लक्ष वेधले आहे. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखनातल्या एकेका अंगाकडे लक्ष वेधल्याने त्याचा एकत्रित अनुभव, जो ‘डोह’ वाचताना येतो, तो येथे अपेक्षित नाही. ‘डोह’ वाचताना अप्रशिक्षित वाचक ढिलेपणाने वाचत जातो. ‘जातिवंत जनावराच्या शरिराला स्पर्श करताच त्याच्या अंगभर पसरत जाणाऱ्या शहाऱ्यासारख्या वाऱ्याने डोहभर उमटवलेला शहरा मी पहिला होता,’ अशा वाक्याकडे सरोजिनी वैद्यासारख्या समीक्षकाने लक्ष वेधल्याशिवाय, ते वाक्य वाचले असले तरीही माझे लक्ष सहज गेले नसते. ‘म्हशीला काठी टोचली तर त्याच्याभोवतीची फक्त एक इंच कातडी थरथरते’, हे श्री. म. माट्यांचे निरीक्षणही मग मला आठवले. यातले समीक्षकही तगडे असल्याने ‘डोह’च्या स्तुतीत ते बुडून गेलेले नाहीत. सरोजिनी वैद्यांनी त्यातल्या अनुभवांच्या / प्रतिक्रियांच्या पुनारावृत्तीचा उल्लेख केला आहे.

समीक्षकांनी यातल्या ज्या सौंदर्यस्थाळांकडे लक्ष वेधलेले आहे, ती सारी एकमेकांच्या संदर्भात ‘डोह’मधल्या लेखनात आलेली असतात. त्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम खोल असतो. “कौलारओळीच्या शेवटला घासून थोड्या वरून देशपांड्यांच्या भिंतीची रेषा खालती उतरत येत असे. त्या रेषेच्या उतारावरून एक अंग भिजलेली लेकुरवाळी वानरी, पोटाला चिकटून राहिलेल्या पोरासह आमच्याकडे पहात गहूगहू खालती सरकत असे,” यात लेखकाला फक्त तिरपी भिंत असे म्हणता आले असते. पण लेखकात एक चित्रकारही लपलेला आहे. माधव अचवलांचा ‘रेषा’ नावाचा एक अप्रतिम लघुनिबंध ज्यांनी वाचला असेल, त्यांना हे वर्णन जाणतेपणी भावेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात श्रीनिवास कुलकर्णी यांच्या ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ व ‘कोरडी भिक्षा’ या इतर तीन पुस्तकांवरचे लेख आहेत. या भागात दुर्गा भागवत व वासंती मुझुमदार अशांचे लेख आहेत. ‘डोह’च्या मानाने इतर तीन पुस्तकांवर कमी लेखन झालेले आहे. ते साहजिक वाटते, कारण ‘डोह’च्या शैलीने लेखकाला एका उंचीवर नेवून ठेवले होते. त्यानंतर त्याच्यात फार बदल घडलेला नाही. जमिनीच्या वरच्या गूढाकडे झुकणाऱ्या अनुभवांची मुळे तिथल्या परिसरात खोलवर गेलेली आहेत. त्यांच्या लेखनाचे अनुकरण कोणाला करता येण्यासारखे नाही, असे दुर्गा भागवतांनी म्हटले आहे.

याच्या तिसऱ्या भागात श्रीनिवास कुलकर्णी यांच्यावरील लेख आहेत. लेखकाच्या अनेक लेखांतून त्याच्या वडिलांचे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहिलेले आहे. ही व्यक्ती स्वत: वडील म्हणून कशी आहे? याचे कुतूहल वाचकाला असते. ‘अण्णा आणि मी’ या आलोक कुलकर्णी यांनी लिहिलेली लेखात त्याचा अंदाज आपल्याला येतो, तर उमेश कुलकर्णी यांना त्यांच्यासारखे आपल्यालाही जीवन सहज घेता आले पाहिजे, असे वाटलेले आहे.

शेवटच्या भागात श्रीनिवास कुलकर्णी यांनी स्वत:चे जीवन, स्वत:च्या साहित्यविषयक प्रेरणा याबद्दलची रेडीओवर दिलेली भाषणे व लेख आहेत. त्यांच्या सर्व निबंधांत जीवनाविषयी एक उदासीन पण प्रसन्न आसक्ती दिसते, तीच या भागातही प्रत्ययाला येते. अडचणीच्या वेळीही कुठल्याही देवाची मी आठवण करत नाही, असा उल्लेख त्यांच्या ‘लेखकाची सखी’ या लेखात त्यांनी लिहिले आहे. यशवंतराव चव्हाणांशी त्यांचा स्नेह होता. पोएट बा. ग. बोरकर, इंदिरा संत ते विजय तेंडुलकर अशा अनेकांचा त्यांच्याकडे राबता असे. या सगळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कुणी हलक्या लेखणीच्या लेखकाने याबद्दल भरपूर लेख पाडले असते!

या पुस्तकात छायाचित्रे नाहीत. त्यांच्या घराची, परिसराची रेखाचित्रेही यात हवी होती. ‘किती हरवल्या जिवलग गोष्टी अशीच जुनी गोष्ट / मृगजळातल्या यक्ष घराला होती इथुनिच वाट’ अशा कवितेच्या ओळी लिहिणाऱ्या श्रीनिवास कुलकर्णी यांच्या कविता आम्हाला कशा वाचायला मिळणार? ‘मृगजळातल्या यक्षघराला’ या ओळी त्यांच्या कवितेतल्या आहेत, हे आकलन वाचल्यावर कळले. साहित्यिक वर्तुळात हे आधीपासून माहीत असेल. आम्ही आपले शोध घेत काही काळ फिरत राहिलो. आता त्या दोन ओळी ज्यात आहेत, त्या सहा ओळींच्या कवितेची ओढ आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तसेच त्यांनी काढलेल्या चित्रांचेही आहे. ती पहायची इच्छा आहे. अक्षरांकडेदेखील हा लेखक प्रथम चित्र म्हणून पाहायला सुरवात करतो. हे दोन्ही फॉर्म नंतर त्यांनी सोडले. त्यांच्या हस्ताक्षरांचे कौतुक यातल्या काही लेखात आलेले आहे. आम्हाला तेही पहायचे आहे. काव्यमयता, चित्रमयता हे सारे त्यांच्या गद्यलेखनात नंतर आलेले आहेत. अचानक २४व्या वर्षी त्यांनी गद्य लिहायला सुरुवात केली, असे घडलेले नाही. ज्या वहीत त्यांनी तब्बल शंभर पाने केवळ ‘उन’ या विषयावर लिहिली होती, मग ‘मनातल्या उन्हात’ लिहिताना दहा पाने नेमकी कशी झाली? त्याला किती वेळ लागला? याबद्दलही कुतूहल आहे. ‘पॅरिस रिव्ह्यू’सारख्या मासिकात लेखकांच्या जशा सविस्तर मुलाखती येतात, तशी मुलाखत हवी होती. या लेखकावर डॉक्युमेंट्री काढायला हवी, असेही मनात आले.

‘डोह : एक आकलन’ हार्डबाऊड आहे. त्याचा ले आउट, आकार याने ते गंभीरपणे वाचायचे पुस्तक आहे असे लगेच समजते. या संपूर्ण पुस्तकातला केवळ ‘डोहविषयी’ हा पद्मगंधात आलेला लेख मी वाचलेला होता. संपादकाच्या अपेक्षेप्रमाणे ‘डोह’वरच्या लेखनाबरोबर हा श्रीनिवास कुलकर्णी यांच्या सर्व लेखनावरचा हा संदर्भग्रंथ झाला आहे. तो उत्तम प्रकारे संपादित केल्याबद्दल विजया चौधरी यांचे मन:पूर्वक आभार. ‘डोह’मधल्या कोणत्या गोष्टींचा यातल्या लेखकांनी वेध घेतला आहे, हे त्यांनी ३० पानांच्या प्रस्तावनेत सांगितल्याने तिचा पुस्तकातले संदर्भ शोधायला फार उपयोग होतो.

..................................................................................................................................................................

‘डोह : एक आकलन’ - संपादन विजया चौधरी, मौज प्रकाशन गृह, मुंबई, पाने - २६४, मूल्य - ६०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5179/Doh-Ek-Akalan

..................................................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......