अजूनकाही
हार्पर ली या अमेरिकन लेखिकेची ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ ही प्रचंड गाजलेली कादंबरी. तीन कोटी प्रतींची विक्री झालेली. जगातील अनेक भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला. पुलित्झरपासून अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. गेली साठ वर्षं ती सतत चर्चेत असते अधूनमधून. थोडक्यात ‘अभिजात’ अशी ही कादंबरी आहे. या कादंबरीचा नुकताच मनोविकास प्रकाशनातर्फे मराठी अनुवादही प्रकाशित झाला आहे. या अनुवादाला अनुवादिका विद्यागौरी खरे यांनी लिहिलेलं हे मनोगत...
..................................................................................................................................................................
१९६८-६९मध्ये कधी तरी ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ पहिल्यांदा वाचली. हार्पर लीची ही कादंबरी इतकी आवडली की, ती पुन:पुन्हा वाचली. हे पुस्तक मराठीत यायला हवं असं फार वाटलं म्हणून १९७१मध्ये त्याचं भाषांतर करायला सुरुवात केली, पण काही काही कारणांनी त्यात खंड पडत गेला. तीन-चार पानांचं भाषांतर करायचं आणि ते वर्ष-वर्ष बाजूला ठेवायचं या गतीने हा प्रोजेक्ट चालला होता. १९७८मध्ये नागपूरला राहायला आल्यानंतर जरा स्थिरावल्यासारखं झालं. मुलांच्या शाळा, माझं कॉलेज नियमित सुरू झालं आणि मग गंभीरपणे ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’कडे वळले. तरी त्याला १९८२ साल उजाडलं. कादंबरीतील जेम आणि स्काऊटच्या वयाच्या आसपास असलेल्या माझ्या मुलांना जेव्हा दहा वर्षांपूर्वी केलेलं भाषांतर वाचून दाखवलं, तेव्हा त्यांना ते फार आवडलं. त्यामुळे उत्साह येऊन मी रोज नियमित काही पानांचं भाषांतर करायला सुरुवात केली. संध्याकाळी खेळून घरी आल्यानंतर पुढे काय झालं, हे ऐकायला मुलं उत्सुक असत. त्यामुळे झपाट्याने भाषांतर पूर्ण केलं.
याही घटनेला २७ वर्षं उलटून गेली. मध्यंतरी भाषांतर प्रकाशित करण्याचे अयशस्वी प्रयत्नही केले. परवानगी मागायला हार्पर लीशी पत्रव्यवहार केला, तर तिच्या एजंटने ‘आम्ही प्रकाशकाशीच बोलू’ असं ठामपणे सांगितलं. लिखाण तसंच पडून राहिलं. इतक्या वर्षांनी भाषांतर ज्यात लिहिलं, त्या वह्याही जीर्ण व्हायला लागल्या, तेव्हा ते सगळं कंपोज करून घ्यावं, अशा विचाराने त्याचं थोडंसं पुनर्लेखन करून लिखाण कंपोज करून घेतलं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
हा एवढा खटाटोप कशासाठी? माझ्या मुलांनी तर पुस्तक मूळ इंग्रजीतूनही वाचलं होतं; पण स्काऊट, जेम आणि अॅटिकस फिंच यांची ही गोष्ट सर्वांनी, विशेषत: मुलांनी वाचायलाच हवी, असं मला नेहमी वाटत आलं आहे. अनेक कारणांसाठी हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं. आपला समाज, आपले शेजारी यांचा विचार करायला शिकवणारं हे पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या, आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीनं पछाडलेल्या आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे.
अॅटिकस आणि त्याची मुलं यांच्यातील संबंध हा या पुस्तकाचा गाभा आहे. आईवेगळ्या मुलांना वाढवण्याचं काम अॅटिकस ज्या समजूतदारपणे आणि जबाबदारीने पार पाडतो, त्यामागे त्याची पूर्ण जीवनदृष्टी आहे. त्याचं सगळं जगणंच त्याच्या मुलांच्या संदर्भात आहे आणि त्याची प्रत्येक कृती त्या दृष्टिकोनातून तपासून घेतलेली आहे. एका अर्थाने त्याची मुलं त्याच्या सदसद्विवेकबुद्धीची राखणदार - त्याची conscience keepers आहेत. ‘मी जर चुकीचं वागलो तर माझ्या मुलांना तोंड दाखवायची मला लाज वाटेल,’ हा विचार त्याच्या मनात सतत आहे. म्हणूनच त्याच्या शिकवण्यातून आणि त्याच्या जगण्यातून त्याची मुलं शहाणी आणि जबाबदार होत जातात.
मुलांची संवेदनशीलता जपत असताना भोवतीच्या समाजातील अन्याय आणि कुरूपता त्यांच्यापासून लपवून ठेवायचा तो प्रयत्न करत नाही; पण त्याच वेळी त्याचं सावट त्यांच्या मनावर येऊ नये, त्यांचं व्यक्तिमत्त्व त्यामुळे कमकुवत होऊ नये, यासाठीही तो धडपडतो. मुख्य म्हणजे, बरी-वाईट कशीही असली तरी ही आपली माणसं आहेत, हे मुलांच्या मनावर तो सतत ठसवत राहतो. म्हणूनच कादंबरीच्या शेवटी अतिशय भीतिदायक अनुभवातून जाऊनसुद्धा स्काऊटच्या मनातील सुरक्षिततेच्या भावनेला जराही धक्का पोहोचत नाही.
कादंबरीतील तीनेक वर्षांच्या कालावधीत मुलांमध्ये होत गेलेले बदल जाणीवपूर्वक; पण त्यातील स्वाभाविकपणा जराही कृत्रिम होणार नाही, अशा कौशल्याने लेखिकेने टिपले आहेत. जेम आणि स्काऊटच्या मोठं होण्याला अॅटिकससारखाच त्यांच्या शेजाऱ्यांनीही हातभार लावला आहे. बू रॅडले आणि त्याच्या एकांतवासाबद्दल सुरुवातीला त्यांना वाटणारं चौकस कुतूहल हळूहळू बदलत जातं. त्याबद्दलची त्यांची समजही परिपक्व होत जाते. ‘मग बू का पळून जात नाही?’ या स्काऊटच्या प्रश्नावर डिल् म्हणतो, ‘त्याला पळून जायला कुठली जागाच नसेल म्हणून.’ आणि ‘माणसं एकमेकांशी अशी का वागतात?’ या चर्चेच्या शेवटी जेम उद्वेगाने म्हणतो, ‘बू रॅडलेने स्वत:ला घरात कोंडून घेतलंय याचं कारण मला वाटतं, त्याला बाहेर यावंसं वाटत नाही हेच आहे.’
सचोटी, प्रामाणिकपणा, निष्ठा, सभ्यता, शेजारधर्म हे सगळे गुण जेम आणि स्काऊटना त्यांच्या आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये दिसतात आणि तेच शेजारी प्रसंगी क्रूर, निष्ठुर, अमानुष होतानाही ते पाहतात. चांगुलपणाचा पराभव होताना पाहतात; पण दुष्टावाही जिंकत नाहीच, हेही त्यांच्या लक्षात येतं. या सगळ्या विसंगतींचा अर्थ लावायची त्यांची धडपड हेच त्यांचं मोठं होणं आहे.
हार्पर लीचं श्रेष्ठत्व यात आहे की, हे सूत्र ती कुठेच उघडपणे स्पष्ट करत नाही. ते नेहमीच सूक्ष्मपणे आणि ओझरत्या उल्लेखांतून व्यक्त होतं. जगण्याच्या प्रक्रियेत येणारे अनुभव इतके एकमेकात गुंतलेले असतात की, त्यातला एखादाच पैलू प्रकाशित करण्याने घटनेचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. हार्पर लीने ते टाळलं आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘टु किल अ मॉकिंगबर्ड’मध्ये लीने हाताळलेला दुसरा महत्त्वाचा विषय आहे वांशिक भेदभाव. अमेरिकेतील दक्षिणेकडच्या प्रांतांमध्ये वांशिक भेदभाव ही सातत्याने दिसणारी गोष्ट. हार्पर ली अलाबामा या दक्षिणेकडच्या राज्यात लहानाची मोठी झाली. कॉलेजमध्ये असल्यापासून वांशिक अन्यायाच्या विरोधात तिने लिखाण केले. १९६०मध्ये जेव्हा ‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ प्रसिद्ध झाली, तेव्हा अमेरिकेत नागरी हक्क चळवळ वेगाने वाढत होती. त्या संघर्षातले सर्व तणाव, काळज्या तितक्या तीव्रतेने जरी नाही, तरी बीजरूपात कादंबरीत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. या कादंबरीत वापरले गेलेले ‘निग्रो’, ‘निगर’ हे शब्द आता अमेरिकेत कोणी उच्चारतही नाही; पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते संभाषणात सहजतेने येत असत. इतकंच नव्हे, तर निग्रोही एखाद्याचा तुच्छतेने उल्लेख करताना ‘निगर’ म्हणत असत, जसं कॅल्पुर्निया लुलाला उद्देशून म्हणते.
टॉम रॉबिन्सनचा खटला हा अॅटिकसची सगळी नैतिक सचोटी पणाला लावणारा खटला आहे. काळ्या टॉमने गोऱ्या मेएलावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या बापाने आणि तिने केला आहे. काळ्या-गोऱ्यांच्या वादात काळ्या माणसाचा शब्द खरा असला, तरी कधीही मान्य केला जाणार नाही, हे कुरूप सत्य अॅटिकसला माहीत आहे. खटल्याचा निकाल टॉमच्या विरोधात जाणार, याची जाणीव असूनही तो टॉमच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. स्वत:चं सगळं वकिली कौशल्य पणाला लावून खटला लढवतो. बहुसंख्याकांच्या विरोधातली अॅटिकसची ती एकाकी लढत त्याच्या व्यक्तिमत्त्वातील कणखरपणा आणि करुणा, दोन्ही प्रकाशित करते. ‘टॉम जरी फासावर जाणार असला, तरी त्याच्या बाबतीतले सत्य जगाला ओरडून सांगितल्याशिवाय मी त्याला जाऊ देणार नाही’ हा अॅटिक्सचा निश्चय कोर्टातील त्याच्या समारोपाच्या भाषणात विशेषत्वाने जाणवतो.
मानवी समाजात घडणाऱ्या हिंसेची काही रूपं लीच्या कादंबरीमध्ये अधोरेखित झाली आहेत. कादंबरीच्या शीर्षकाचा अर्थच ‘निरागसतेची हत्या’ असा आहे. टॉमच्या हत्येची तुलना लहान मुलं खेळ म्हणून पक्ष्यांची जी क्रूर निरर्थक हत्या करतात, त्याच्याशी केली आहे.
‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ची गोष्ट आपल्याला सहा वर्षांची स्काऊट सांगते. तिच्या नजरेतून या घटना आपल्याला दिसतात; पण कथानकातील काही निरीक्षणं आणि भाष्यं मोठ्या झालेल्या स्काऊटच्या जाणिवेतूनही केली आहेत. गुंतागुंतीच्या घटनांकडे लहान मुलीच्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे त्या सरळ, थेटपणाने आपल्यापर्यंत पोहोचतात; पण इतक्या लहान मुलांना घटनेची व्यामिश्रता कशी कळेल, असाही प्रश्न पडू शकतो. एक तर क्लिष्ट वकिली भाषेची जेम आणि स्काऊट, दोघांनाही सवय आहे. ‘एंटेलमंट’सारख्या अवघड गोष्टीचीसुद्धा अॅटिकसने त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे, कोर्ट, कायदे, खटल्याची कामकाजं त्यांच्यासाठी नवीन नाहीत. त्यातलं त्यांना किती समजत असेल हा भाग वेगळा. किती तरी स्पष्टीकरणं स्काऊट निर्विकारपणे स्वीकारताना दिसते. ‘बलात्कार म्हणजे काय?’ या तिच्या प्रश्नाला अॅटिकस ‘एखाद्या स्त्रीचा तिच्या मनाविरुद्ध आणि जबरदस्तीने घेतलेला शारीरिक उपभोग,’ असं उत्तर देतो, तेव्हा तिची प्रतिक्रिया ‘हात्तिच्या, एवढंच ना!’ अशी असते. ती क्रिया किंवा त्याची भयानकता तिच्या समजशक्तीच्या पलीकडची आहे; पण वाचकांपर्यंत तो शब्द त्याच्या अर्थाच्या सर्व पातळ्यांसकट पोहोचतो. खरं तर कथनकर्तीचं वय हे या कादंबरीचं सामर्थ्य आहे. पूर्वानुभव, पूर्वग्रह यांची मोठ्या माणसांच्या जाणिवेत असणारी गर्दी इथे नाही. त्यामुळेच कथेला एक अनलंकृत सौंदर्य प्राप्त झालं आहे. पार्श्वभूमी आणि काही स्पष्टीकरणं देण्यासाठी मधूनमधून प्रौढ स्काऊटचा वापर वाचकाला जाणवणारही नाही, अशा कौशल्याने केला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
एखादी गोष्ट का करावी किंवा का करू नये, हे आपण आपल्या नैतिक विचारांच्या आधाराने ठरवतो. आपले अनुभव, आपल्या संबंधात आलेली माणसं, आपली विचार करण्याची प्रगल्भता यांच्या प्रभावाने आपली सदसद्विवेकबुद्धी घडत जाते. सहवासात आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या जगण्यातून जसं शिकवलं तसंच पुस्तकात भेटलेल्या काही व्यक्तिरेखांनीही शिकवलं.
अॅटिकसची गोष्ट ही कठीण परिस्थितीतही स्वत:च्या नैतिक विचारांशी निष्ठा बाळगणाऱ्या सामान्य माणसातील असामान्यत्वाची गोष्ट आहे. ‘बहुमताचा नियम सदसद्विवेकबुद्धीला लागू होत नाही सोना. ती वैयक्तिक बाब आहे,’ असं आपल्या मुलीला समजावून सांगणारा अॅटिकस फिंच माझ्याकरिता नेहमीच सुजाण पालकत्वाचा आणि नैतिकतेचा एक मापदंड राहिला आहे.
‘टु किल अ मॉकिंगबर्ड’ - हार्पर ली
अनु. विद्यागौरी खरे,
मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य - ३०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment