माध्यमे – ३ : मनोरंजन - जुने आणि नवे
मनोरंजन क्षेत्राकडे परत येऊ. बारकाईने पाहिले तर तिथे कौटुंबिक मालिका, विनोदी मालिका, पौराणिक/ऐतिहासिक मालिका आणि अर्थातच ‘सीआयडी’सारख्या गुन्हेगारकथा या केवळ चार विषयांवरच सारे लक्ष केंद्रित केलेले आहे. या चार विषयांपलीकडे असतेच काय?, असा प्रश्न कदाचित या मनोरंजनाच्या आहारी गेलेल्यांना पडू शकेल. त्यासाठी थोडे मागे जाऊन ‘दूरदर्शन’ या सरकारी माध्यमाकडे पाहता येईल. खासगी माध्यमे नव्हती, तेव्हा टेलिव्हिजन मनोरंजनावर दूरदर्शनची एकहाती सत्ता होती. त्या वेळी त्यावरून सादर झालेल्या कार्यक्रमांकडे नजर टाकली, तर आजच्या तुलनेत त्यातील प्रचंड वैविध्य आणि गुणवत्ताही सहज दिसून येते.
सर्वांत पहिली मला आठवते ती ‘कथासागर’ नावाची मालिका. या मालिकेत देशोदेशींच्या प्रथितयश लेखकांच्या कथांवर आधारित एपिसोड्स सादर केले जात. टॉलस्टॉय, चेकोव्ह, ओ हेन्री, हॅन्स ख्रिश्चिअन अॅंडरसन वगैरे नावे आम्ही प्रथम यातच वाचली. याच धर्तीवर पुढे हिंदी, उर्दू नि बंगाली कथांवर आधारित ‘किरदार’ नावाची मालिका प्रसारित झाली. (ही यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.) शरतचंद्र चॅटर्जी, मुन्शी प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू, श्रीलाल शुक्ल वगैरे प्रसिद्ध भारतीय कादंबरीकारांच्या लेखनावर आधारित ‘श्रीकांत’, ‘शेषप्रश्न’, ‘नीम का पेड’ यांसारख्या मालिका चालू होत्या.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या चिंतनाचा सर्वांत संयत आविष्कार असलेल्या ‘गोरा’ या कादंबरीवर आधारित मालिकाही दूरदर्शनने सादर केली होती. (हीदेखील यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.) आर.के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारित ‘मालगुडी डेज’ प्रचंड लोकप्रिय ठरली. (जिला मी मराठी भाषेतील ‘मालगुडी डेज’ म्हणतो, त्या ‘सारे प्रवासी घडीचे’कडे मराठी निर्माता दिग्दर्शकांनी दुर्लक्षच केले आहे!) जेन ऑस्टिनच्या प्रसिद्ध ‘प्राईड अॅंड प्रिज्युडिस’वर आधारित ‘तृष्णा’ ही मालिका सादर झाली. रशियन लेखक अन्तोन चेकोव्हच्या कथांवर आधारित ‘चेकोव्ह की दुनिया’ दूरदर्शनने आमच्यासाठी आणली होती. ‘राग दरबारी’सारख्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबर्यांवरही मालिका तयार झाल्या होत्या.
एवढेच कशाला औद्योगिक घराण्यांतील राजकारणावर आधारित ‘शांती’ ही मालिकाही तिथेच प्रसारित झाली. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस एका सर्कसमधील लोकांच्या जीवनाभोवती फिरणारी ‘सर्कस’ नावाची मालिका प्रसारित झाली. आज ‘किंग खान’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेला शाहरुख खान त्यात मुख्य भूमिकेत होता. ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे ज्याचे वर्णन केले जाई, त्या काश्मीरच्या पार्श्वभूमीवरील ‘गुल गुलशन गुलफाम’सारखी मालिका प्रसारित होई.
महानगराच्या रस्त्याच्या एका कोपर्यावरचे सारे आयुष्य टिपणारी, अभिनिवेश वा कोणत्याही तत्त्वाची चौकट न घेता केवळ साक्षीभावाने टिपत जाणारी ‘नुक्कड’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. त्यातील कादरभाई या भूमिकेने प्रकाशझोतात आलेला अवतार गिल पुढे चित्रपटांतून चमकत राहिला. समीर खक्करचा खोपडी नावाचा दारुडा, अजय वढावकरने साकारलेला गणपत हवालदार, किरकोळ दुरुस्तीचे दुकान चालवणारा आणि ‘टीचरजी’वर जीव जडवून बसलेला दिलीप धवनने साकारलेला गुरू, जावेद खानचा करीम, पवन मल्होत्राचा हरी. सुरेश चटवालचा दुखिया, अशी पात्रे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली. जगण्याशी निगडित असलेले अगदी किरकोळ पातळीवरचे व्यवसाय करणारे, नव्या जगातले बलुतेदार म्हणता येतील, अशी ही माणसे. समाजव्यवस्थेच्या परिघावर राहणारी आणि तरीही तिचा पाया असणारी.
‘और भी ग़म है ज़माने में’ या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एका सामाजिक प्रश्नाचा उहापोह केला जाई. याचा अलीकडे सादर झालेला अवतार म्हणजे आमीर खान या प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने सादर केलेला ‘सत्यमेव जयते’. आमीर खान सादर करतो म्हणून लोक तो प्रथम पाहू लागले, हे खरे असले तर हा कार्यक्रम मात्र लोकप्रिय झाला, हे मान्य केले पाहिजे. या काळात चित्रपटही सामाजिक विषयांशी बांधीलकी राखून होते, त्यांची गाडी रोमान्स आणि हिंसा यांच्या डबक्यात अडकून पडलेली नव्हती. पुढे चित्रपटांनी शेक्सपिअरलाही अंडरवर्ल्डमध्ये नेऊन ठेवले आणि मालिका पाठ फिरवून पौराणिक-धार्मिक विषयांकडे पळत सुटल्या.
‘फूल खिलें है गुलशन गुलशन’ नावाचा कार्यक्रम पूर्वी चित्रपटांतून बालकलाकार म्हणून भूमिका केलेली तबस्सुम सादर करत असत. कलाकारांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये ‘कसं वाटतंय?’, ‘अमुक अनुभव कसा वाटला?’ सारखे उथळ वा पुस्तकी प्रश्न नसत. मार्मिक प्रश्न, हलकेफुलके किस्से यातून स्वत: तबस्सुमही त्या कार्यक्रमाच्या अविभाज्य भाग होऊन राहत. साबिरा मर्चंट यांचा ‘व्हॉट्स द गुड वर्ड’ आणि सिद्धार्थ बसू (पुढे ‘कौन बनेगा करोडपती’चे निर्माते) यांची ‘क्विझ टाईम’, ‘मास्टरमाइंड इंडिया’सारख्या मुलांसाठी असलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धाही दूरदर्शन आयोजित आणि प्रसारित करत असे. ‘यूटीव्ही डिजिटल’ या प्रसिद्ध चित्रपट वितरण संस्थेचे संस्थापक (आणि यू-मुम्बा या मुंबईच्या कबड्डी संघाचे मालक) रॉनी स्क्रूवाला हेही असाच एक कार्यक्रम सादर करत असत, असे स्मरते (दुर्दैवाने कार्यक्रमाचे नाव आठवत नाही).
प्रासंगिक विषयांवरील ‘वर्ल्ड धिस वीक’सारखा कार्यक्रम सादर होई. ज्यात रोजच्या बातम्यांमधील विषयांपलीकडे विविध क्षेत्रांतील घडामोडी अधोरेखित केल्या जात. पुढे माफक अभिनेता म्हणून ओळख निर्माण केलेला शेखर सुमन त्या त्या आठवड्यातील घडामोडींवर ‘मूव्हर्स अॅंड शेकर्स’ (नंतर ‘सिंपली शेखर’) नावाचा खुसखुशीत कार्यक्रम सादर करे.
जगातील बहुतेक प्रथितयश वाहिन्यांवरून आजही अशा स्वरूपाचे कार्यक्रम सादर होत असतात. उदाहरण द्यायचे तर ‘सीबीएस’ या अमेरिकन चॅनेलवर जॉन ऑलिव्हर ‘लास्ट वीक टुनाईट’सारखे कार्यक्रम आजही सादर करतात नि त्यांना त्यांचा असा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. भारतीय माध्यमांनी मात्र या प्रकाराकडे पाठ फिरवलेली आहे. अप्रासंगिक विषयांवर ‘सुरभि’ नावाने असाच कार्यक्रम सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे सादर करत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
चलच्चित्रे अथवा अॅनिमेशनच्या जगात केवळ लाडू खाऊन ढिशूम करणार्या बालिश हीरोंपेक्षा कैकपट अधिक चांगल्या मालिका सादर झाल्या. यात भारतीय परंपरेतील ‘पंचतंत्र’ होते, लुईस कॅरल या लेखकाची जगभर लोकप्रिय झालेली ‘अॅलिस इन वंडरलॅंड’ होती, एव्हरग्रीन ‘जंगल बुक’ होती, बहुसंख्येला आज आठवणारही नाही, अशी योहाना स्पायरी या स्विस लेखिकेच्या कादंबरीवर जपानी अॅनिमेटर्सनी बनवलेली ‘हायडी, द गर्ल ऑफ आल्प्स’ ही एका पोरक्या मुलीची कथाही होती. फिल्म्स डिव्हिजनने निर्माण केलेल्या ‘अनेकता में एकता’सारख्या बोधपटांचाही त्यात समावेश होता. प्रबोधन ही आपली जबाबदारी मानत असलेले ते माध्यम ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ किंवा ‘सारा भारत ये कहें’सारखी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी गाणी प्रसारित करत असे.
त्याच संकल्पनेच्या रुजवणुकीसाठी पं. नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ ही मालिका प्रसारित होत होती. ऐतिहासिक पात्रांना घेऊन छाती पिटणार्या आजच्या मालिकांशी त्या मालिकेच्या पटकथेशी तुलना करून पाहता येईल. मूळ पुस्तक केवळ आधार म्हणून घेत संपूर्ण भारतभरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा पट अभ्यासून ती पटकथा साकार झाली होती. कथा, गीत, संगीत, इतिहास, पुराणकथा या सार्यांना एका सूत्रात बांधणारी दुसरी कलाकृती माझ्या पाहण्यात नाही.
आता ‘राष्ट्रीय एकात्मता’ ही संकल्पना अस्तंगत होऊन तिची जागा ‘राष्ट्रभक्ती’ने घेतली आहे. बांधिलकीच्या भावनेपेक्षा समर्पणभावी निष्ठा अधिक महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे. यात निष्ठा ठेवणारा दुय्यम नि निष्ठाविषय श्रेष्ठ ठरत असतो, हे विसरून लोक ‘लोटांगण घालिता’ जगू लागले आहेत.
अगदी मराठी भाषेतही चिं.वि. जोशींच्या ‘चिमणराव’, ‘गुंड्याभाऊ’पासून फक्त मुलांसाठी असणार्या किलबिल, मध्यमवयीनांसाठी असणारा ‘गजरा’, शेतकर्यांसाठी ‘आमची माती आमची माणसं’, थ्रिलर प्रेमींसाठी ‘श्वेतांबरा’ अशा वेगवेगळ्या आवडीच्या, गटाच्या माणसांसाठी कार्यक्रम सादर केले जात. हे ‘हॉर्सेस फॉर कोर्सेस’ तत्त्व सोडून देऊन खासगी वाहिन्या आता ‘कोर्सेस फॉर मासेस’ या तत्त्वाला चिकटून राहू लागल्या आहेत.
अर्थात हे कार्यक्रम सादर होत असताना वर उल्लेख केलेल्या चार प्रकारांतील कार्यक्रम सादर होत नसत असे नाही. ‘बुनियाद’सारखी कौटुंबिक मालिका घराघरांत पोहोचलेली होती. ‘ये जो है ज़िंदगी’सारखी मालिका लोकांना हसवत होती. मराठीमध्ये ‘तिसरा डोळा किंवा ‘एक शून्य शून्य’सारख्या डिटेक्टिव अथवा उकलकथा चित्रित करणार्या मालिका सादर होत होत्या.
यादी आणखी लांबवता येईल. पण मुद्दा असा की, केवळ एक वाहिनी, तुटपुंज्या सरकारी साहाय्यावर, जाहिराती वगैरे तत्सम उत्पन्नाच्या आधाराशिवायही कार्यक्रमांच्या स्वरूपांचे, विषयांचे इतके अमाप वैविध्य राखू शकत होती. आज प्रचंड पैसा, जाहिरातीचे हुकमी उत्पन्न, तंत्रज्ञानाचा मोठा आधार, मोबाईलने प्रचंड वाढलेली ग्राहकसंख्या, कॉपी-कॅट मंडळींना इंटरनेटमुळे वेगाने उपलब्ध होणारा, त्यावर ‘मेड इन इंडिया’चा शिक्का मारून खपवता येणारा तयार माल... इतक्या सार्या संपन्नतेनंतरही मनोरंजनाचा दर्जा मात्र दिवसेंदिवस गुणात्मक बाजूने अधिकाधिक गरीब होत चालला आहे, ही विसंगती डोळ्यांत भरणारी आहे.
राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात शहाबानो प्रकरण घडल्यावर त्यांच्यावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप होऊ लागला आणि तोल सांभाळण्यासाठी म्हणून दुसर्या बाजूला झुकून त्यांनी हिंदू तुष्टीकरणासाठी ‘रामायण’, ‘महाभारत’ यांसारख्या मालिकांना उत्तेजन दिले. मराठी साहित्याच्या क्षेत्रात शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीने जे घडले, तेच या दोन मालिकांमुळे घडले. त्या कादंबरीच्या यशानंतर महाभारतातले सापडेल ते पात्र पकडून त्यावर कादंबर्या लिहिण्याची जशी लाटच आली, तशाच प्रकारे खासगी वाहिन्यांनी ‘रामायण’, ‘महाभारत’ यांचा धागा उचलून वाटचाल सुरू केली.
भारतीय चॅनेल माध्यम ‘गुणवत्तावादा’कडून ‘जमाववादी’ होण्याकडे वाटचाल सुरू झाली. दर्जेदार, अभिनव कार्यक्रमापेक्षा लोकानुनयी लेखनाचे, कार्यक्रमांचे रतीब घालणे सुरू झाले. पुढे हाताचे ठसे आणि अखेर आरोपीच्या कानफटात मारून घेतलेला कबुलीजबाब या दोनच हत्यारांवर केलेल्या तपासाच्या आधारे ‘सीआयडी’ या मालिकेने एक दशकांहून अधिक काळ धुमाकूळ घातला. पात्रांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव बदलत कथानक वाटेल, तसे फिरवत नेणारी एक मराठी मालिका तेच साध्य करून गेली. यातून सोकावलेले प्रेक्षकही आता आपल्याला हवे तेच दाखवायला हवे, असा आग्रह धरू लागले. त्यांना खुश करण्यासाठी कथानकाचे सातत्य, संगती वगैरे सरळ धाब्यावर बसवून लोकांना आवडेल, त्या दिशेला कथानक वळवणारे निर्माते नि वाहिन्यांनी बस्तान बसवले. मग मेलेले पात्र जिवंत होण्यासारखे चमत्कारही घडू लागले. भंपकपणा सार्वत्रिक होऊ लागला.
या नव्या नि जुन्या दोनही वाहिन्यांमध्ये अजिबात न दिसणारा एक विषय आहे, तो म्हणजे विज्ञान. विज्ञान आणि विज्ञान काल्पनिका (सायन्स फिक्शन) हा विषय भारतीय मनोरंजन माध्यमाला संपूर्ण वर्ज्य आहे असे दिसते. डॉ. जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली फार पूर्वी प्रसारित केलेल्या ‘ब्रह्मांड’ आणि प्रा. यशपाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक गिरीश कार्नाड सादर करत असलेल्या ‘टर्निंग पॉइंट’ या दोन दूरदर्शनवरील मालिकांचा अपवाद वगळला, तर विज्ञानाधारित चित्रपटांचा, मालिकांचा भारतीय मनोरंजन माध्यमात संपूर्ण अभाव आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
अर्थात यात आश्चर्य काहीच नाही. ‘खपते ते विकते’ या मंत्रानुसारच ते व्यवसाय करतात. मुळात भूतकालभोगी भारतीय समाजच विज्ञानाबद्दल सर्वस्वी उदासीन आहे. त्यांचा आवडता विषय आहे तो इतिहास. तो घडून गेलेल्या घटनांची जंत्री मांडत असल्याने विचारशून्य पाठांतराला सोयीचा. बरे सुदूर भूतकाळात काय घडले, यावर मतभेद व्यक्त करून आपण म्हणतो, तोच ‘खरा इतिहास’ असे म्हणत आपापल्या जाती-धर्माच्या, राजकारणाच्या सोयीचा इतिहास खपवणेही शक्य होते. बोनस म्हणून अस्मितेचे टेंभेही त्यातून आयते मिळत असल्याने आणखी लाडका. विज्ञानाची वस्तुनिष्ठता आपल्या बहुसंख्येला नकोशीच असते आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्या माध्यमांतूनही पडलेले दिसले तर नवल नाही. दूरदर्शनने ‘इंद्रधनुष’ नावाची विज्ञान-काल्पनिकाही सादर केली होती. त्यात जुजबी पातळीवरची का होईना पण कालप्रवासाची संकल्पना वापरली होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बालिश कार्यक्रम सादर केले जात असले तरी त्यांचे जगणे, त्यांचे भावविश्व केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या कार्यक्रमांचाही आता अभाव दिसतो. दूरदर्शनवर कॉलेजजीवनाकडे एका प्रिन्सिपलच्या नजरेतून पाहणारी ‘चुनौती’ नावाची मालिका सादर झाली होती. पण हा अपवाद म्हणायला हवा. भारतीय शास्त्रीय अथवा रागसंगीताचा अध्वर्यू मानला गेलेला अमीर खुस्रो आणि उर्दू शायरीचा बादशहा मानला गेलेला मिर्ज़ा ग़ालिब यांच्यावर संस्मरणीय अशा चरित्रमालिका प्रसारित होत असत. या विषयप्रकाराला हात घालण्याचे धाडस त्यानंतर कोणत्या चॅनेल-माध्यमांनी केले?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.
ramataram@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment