थोरो आणि गांधीजींचे थोरपण कशात आहे, तर त्यांनी सत्तांना आणि समाजाला न जुमानता आपल्या मनाला जे पटते तेच केले...
ग्रंथनामा - झलक
जयंत कुलकर्णी
  • ‘हेन्री डेव्हिड थोरो : चरित्र व निबंध’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 July 2021
  • ग्रंथनामा झलक हेन्री डेव्हिड थोरो : चरित्र व निबंध हेन्री डेव्हिड थोरो Henry David Thoreau

‘हेन्री डेव्हिड थोरो : चरित्र व निबंध’ हे जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक नुकतेच मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. आज १२ जुलै, थोरोची जयंती. त्यानिमित्ताने या पुस्तकात जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेला हा एक लेख...

..................................................................................................................................................................

थोरो यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा गांधींच्या विचारांवर पडला होता, ही आता जगन्मान्य गोष्ट आहे. पण आजवर थोरोवर जे लेख किंवा पुस्तके लिहिली गेली आहेत, त्यात या विषयावर फारच त्रोटक लिहिले गेले आहे. पण गांधींना लढ्यात, सविनय कायदेभंग वापरण्याची प्रेरणा थोरो यांच्या ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’ या निबंधातून मिळाली, हे एवढे वाक्य लिहून बहुतेक करून हा विषय गुंडाळण्यात येतो. महात्मा गांधी १९०३ ते १९१४ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ‘इंडियन ओपिनियन’ नावाचे वृत्तपत्र चालवत होते. त्याचे अंक जेव्हा अभ्यासकांना अभ्यासासाठी उपलब्ध झाले, तेव्हा महात्माजींना थोरोंची माहिती होती आणि त्यांनी थोरोंचे निबंध व ‘वॉल्डन’ही वाचले होते, हे लक्षात येते.

महात्मा गांधींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे थोरोंचे आभार मानले होते, हे आता आपल्याला माहिती आहे. उदा. महात्मा गांधींनी जेव्हा अमेरिकन जनतेला उद्देशून लेख लिहिला, त्यात ते म्हणाले, “माझ्या अमेरिकन मित्रांनो! अमेरिकेने मला थोरोंच्या रूपाने एक गुरू दिला आहे. मी जो लढा उभारला आहे, त्याचे ठाम व वैचारिक पुष्टीकरण मला थोरो यांच्या ‘ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स’ या निबंधात मिळाले आणि मी दक्षिण आफ्रिकेत जे काही करत होते, ते काही चुकीचे नव्हते, याचा हा मोठा पुरावा आहे.”

त्याचप्रमाणे महात्मा गांधींनी अध्यक्ष रुझवेल्ट यांना लिहिलेल्या एका पत्रात लिहिले, “मला थोरो आणि एमर्सन यांच्या लिखाणाचा अतोनात फायदा झाला आहे.” त्यांच्याबरोबर रॉजर बाल्डविन अमेरिकेत प्रवास करत होता. तो म्हणतो, “गांधीजींच्या हातात ‘ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स’ या पुस्तकाशिवाय मला दुसरे पुस्तक दिसले नाही.” थोरोच्या विचारांचा एवढा प्रभाव पाहून बाल्डविन गांधीजींना म्हणाला, “पण थोरोचे विचार, मला जरा टोकाचे किंवा कधी कधी अतिरेकीच वाटतात.” यावर गांधींनी उत्तर दिले, “ते आजही आपल्या येथे लागू पडतात.” पुढे ते म्हणाले, “त्या निबंधात माझ्या राजकीय तत्त्वज्ञानाचे सार आहे. हे मी फक्त भारताच्या ब्रिटिशांविरुद्ध चाललेल्या लढ्याच्या संदर्भात बोलत नाही. पण या निबंधाने जनता आणि सरकार यांच्यातील संबंध कसे असावेत, यावरचे त्यांचे विचार आपल्याला कळतात.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

लंडनमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदे दरम्यान एका पत्रकाराने गांधीजींना विचारले, “आपण हेन्री डेव्हिड थोरो यांची पुस्तके वाचली आहेत का?” गांधीजींनी उत्तर दिले, “हो! मी १९०६मध्ये त्यांचे वॉल्डन हे पुस्तक वाचले आहे आणि त्याचा फार मोठा प्रभाव माझ्या विचारांवर पडला, हे नाकारण्यात अर्थ नाही. मी त्या पुस्तकातील काही विचार प्रत्यक्षात अंमलात आणले आणि जे माझे मित्र मला स्वातंत्र्यलढ्यात मदत करत होते, त्या सर्वांना मी हे पुस्तक वाचावे असा आग्रह केला. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर माझ्या या स्वातंत्र्य चळवळीचे नावच मुळी मी ऐंशी वर्षापूर्वी लिहिलेल्या थोरो यांच्या पुस्तकातून घेतले आहे.” थोडक्यात जे तत्त्वज्ञान भारतीय होते, ते गांधीजींना अमेरिकेतून मिळाले, कारण थोरो यांनी त्या तत्त्वज्ञानावर नवीन युगासाठी घासून पुसून झळाली आणली होती.

थोरो यांचे चरित्र ज्यांनी लिहिले, त्यांनी गांधीजींना एका पत्राद्वारे थोरो यांच्या विचारांचा त्यांच्यावर काय प्रभाव पडला असे विचारले. गांधीजींनी उत्तर दिले, “मी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत ‘इंडियन ओपिनियन’ या वर्तमानपत्राचा संपादक होतो, तेव्हा मी त्यांच्या या निबंधाचा काही भाग माझ्या वर्तमानपत्रात छापला होता. हा निबंध मला तरी त्या वेळी पटला आणि मग या लेखकाच्या अन्य लिखाणाविषयी मला उत्सुकता वाटू लागली. मग माझ्या हातात आले त्याचे एक पुस्तक ‘वॉल्डन’. मी हे पुस्तक आणि त्यांचे इतर निबंध वाचले आणि मला त्याचा फायदा झाला हे मी नमूद करतो.”

थोरो स्वतः जे करू शकत नसे, ते दुसऱ्याला शिकवायला जात नसे, हा त्याचा सगळ्यात मोठा गुण समजला पाहिजे. थोरोने खाली काय लिहिले आहे ते वाचलेत तर महात्मा गांधींनी जे त्यांच्या आचरणात आणले, ते या तत्त्वाला अनुसरून होते हे आपल्या लक्षात येईल. थोरो म्हणतो- “जर सत्ताधाऱ्यांनी अन्यायाने सभ्य माणसांना तुरुंगात टाकले, तर सभ्य माणसांची जागा ही तुरुंगातच असेल. जर कोणाला असे वाटत असेल की, एकदा तुरुंगात खितपत पडल्यावर त्याचा या जनमानसावर काय प्रभाव पडणार? त्यांचे काय म्हणणे आहे, हे सत्ताधाऱ्यांच्या कानावर ते घालू शकत नाहीत, म्हणून ते कदाचित निराश होतीलही. पण त्यांना हे समजले पाहिजे की, सत्य हे नेहमीच सत्ताधीशांच्या चुकांपेक्षा शक्तिमान असते आणि त्याचा तुरुंगवास हा सत्ताधीशांच्या अन्यायाविरुद्ध प्रखरतेने लढा देऊ शकतो.

तुमचे मत म्हणजे कागदाचा एक तुकडा नसतो, तर त्यामागे तुमचा प्रभाव असतो. तुमच्या या पूर्ण ताकदीनिशी हे मत मांडा. अल्पमत हे नेहमी बहुमतासमोर निष्प्रभ असते. कधीकधी त्याला अल्पमत म्हणणेही अवघड आहे, पण जर तुमच्या मतामागे तुमचा ठाम विचार असेल तर मात्र त्याचा प्रतिकार सत्ताधीशही करू शकत नाहीत. जर न्यायी लोकांना तुरुंगात टाकणे किंवा गुलामी आणि युद्धखोरीचा त्याग करणे, हे दोन पर्याय उपलब्ध असतील तर सत्ताधीश कुठला पर्याय निवडतील, हे सांगण्याची गरज नाही. हजारो माणसांनी जर कर न भरता तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवली, तर ते कृत्य काही हिंसाचारी आहे, असे म्हणता येत नाही. उलट तो अन्यायी कर भरणे हाच मोठा हिंसाचार होईल. कर भरून सत्ताधिशांना अत्याचार करण्यास मदत करणे, हाच मोठा हिंसाचार आहे, असे मी मानतो. कर न भरणे हा हिंसाचार होऊ शकत नाही.”

महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचे मूळ हे इथे आहे. हिंसाचार करू नका, तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, जेलभरो आंदोलन इ. इ. ही सगळी याची फळे आहेत. महात्मा गांधींच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात त्यांनी थोरोंचे निबंध वाचले आणि त्यांना त्याचे अप्रूप वाटले हे निश्‍चित. त्या काळात ते ‘एशियाटिक रजिस्ट्रेशन ॲक्ट’च्या विरोधात लढा देत होते. दक्षिण आफ्रिकेत हा एक अन्यायकारक असा कायदा संमत करण्यात आला होता. त्याला ‘काळा कायदा’ (ब्लॅक ॲक्ट) असे संबोधन होते. या कायद्यानुसार ट्रान्सव्हाल प्रांतातील आठ वर्षांवरील सर्व आशियाई माणसांना स्वतःची नोंदणी करण्याची सक्ती होती. गांधी म्हणतात, “या प्रकारचा कायदा स्वतंत्र नागरिकांसाठी लागू केलेला मी जगात दुसरीकडे पाहिलेला नाही.”

‘इंडियन ओपिनियन’ने या विरुद्ध जनमत एकवटण्यासाठी मदत केली होती. ११ सप्टेंबर १९०७ या दिवशी ट्रान्सव्हाल प्रांतातील १३००० भारतीयांच्या प्रतिनिधी मंडळाची जी बैठक झाली, त्यात चौथ्या ठरावात स्पष्ट जाहीर करण्यात आले की, हा कायदा जनता पाळणार नाही आणि त्याचे जे काही परिणाम असतील ते स्वेच्छेने भोगतील.” यात पुढे असेही म्हटले गेले की, प्रत्येक माणूस स्वतःच्या जबाबदारीवर या आंदोलनात भाग घेईल, दुसरा काय करतोय याकडे तो पाहणार नाही आणि प्राण गेले तरी तो प्रतिज्ञेपासून ढळणार नाही. हे सगळे वाचताना असे वाटतंय की, थोरोच बोलत आहेत की काय! ही जी बैठक झाली, त्याच्या आधी चार दिवस ‘इंडियन ओपिनियन’च्या आवृत्तीत थोरो यांनी लिहिलेले काही उतारे छापले गेले होते. त्यातील एक उतारा जो या पुस्तकात त्या निबंधात दिला आहे तो असा -

“सर्व यंत्रांमध्ये घर्षण होत असते. समाजामध्येही होत असते. आणि हे घर्षण कदाचित समाजातील वाईट गोष्टींना नैसर्गिकपणे ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असावे. त्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही, पण हे घर्षण जर प्रमाणाबाहेर वाढले आणि त्याची परिणती सभ्य आणि सामान्य जनतेवर अत्याचार होण्यात झाली, तर मात्र ते यंत्रच नको असे म्हणण्याची पाळी येईल. येथेही मी तेच म्हणतो- आम्हाला हे सत्ताधीश नकोच आहेत. या ‘एशियाटिक रजिस्ट्रेशन ॲक्ट’मध्ये  ब्रिटिश इंडियन लोकांसाठी हा जो कायदा बनवला गेला आहे, तो अन्यायी आहेच आणि निष्ठुरही आहे. थोरो यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास या यंत्रामध्ये (प्रशासनामध्ये) घर्षण आहे, पण त्यात जुलूम दडलेला आहे, जो आता कायदेशीर ठरणार आहे. हा कायदा त्या घर्षणाचे प्रतिनिधित्व करतो. या अशा जुलमाला विरोध करणे हे एक पुण्यकर्मच आहे...”

ज्या लेखात थोरोंच्या निबंधातील उतारे दिले आहेत, ते सर्व महात्माजींनी लिहिले आहेत असा दावा कोणी करणार नाही, पण त्यांनी ते लेख नजरेखालून घातले असणार हे निश्‍चित कारण ते एके ठिकाणी म्हणतात, “त्या काळात ‘इंडियन ओपिनियन’मधील माझ्या नजरेतून क्वचितच एखादा लेख सुटला असेल.”

महात्मा गांधींनी १९०६ सालीच ‘वॉल्डन’ वाचले होते, पण त्यांनी जो पहिला सत्याग्रह केला, त्याने त्यांचे विचार अधिक स्पष्ट आणि ठाम झाले. त्यांनी विचार करून या प्रशासकीय यंत्रापासून स्वतःला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांवर ‘वॉल्डन’चा बराच प्रभाव पडला, पण त्याचे प्रतिबिंब त्यांच्या वर्तमानपत्रातील लेखात पडत नव्हते. याचे मुख्य कारण होते की, गांधीजी आपले वृत्तपत्र ‘लंडन टाईम्स’च्या धर्तीवर चालवत असत. ज्यात वैयक्तिक आवडीनिवडींवर शक्यतो लिहिणे टाळले जायचे. अर्थात जेव्हा त्यांनी भारतात पाऊल ठेवले, तेव्हा त्यांनी हे सगळे शिष्टाचार सोडून दिले ती गोष्ट वेगळी. (आणि ते बरोबरच होते.) त्यामुळे स्वतःच्या तत्त्वांसाठी आणि मानवी हालअपेष्टांसाठी तुरुंगात जाणारे थोरो याविषयी मात्र ‘इंडियन ओपिनियन’मध्ये बरेच लिहिले जायचे.

या वृत्तपत्रात वाचकांना सतत थोरोंच्या वचनांची व ‘सविनय कायदेभंग’ या निबंधाची आठवण करून दिली जात असे. थोरो यांनी गुलामीच्या प्रथेला तीव्र विरोध केला. भारतीयांनाही ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होण्यासाठी विचारांचे पाठबळ पाहिजेच होते. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय नागरिक या काळ्या कायद्याच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आणि त्यांनी हा कायदा पाळण्यास ठाम नकार दिला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या कायदेभंगाला महात्मा गांधींना थोरो, टॉलस्टॉय, ख्रिस्त आणि ॲरिस्टॉटल यांच्या विचारांचे पाठबळ मिळाले. समथर्न मिळाले. ९ नोव्हेंबर १९०७ या दिवशी ‘इंडियन ओपिनियन’ने एक निबंध स्पर्धा जाहीर केली. विषय होता- ‘अहिंसात्मक विरोधाचे नीतिशास्त्र’. यात अटींमध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, निबंधामध्ये थोरो यांच्या ‘सविनय कायदेभंग’, टॉलस्टॉय यांच्या ‘स्वर्गाची महासत्ता तुमच्यातच सामावली आहे’ आणि सॉक्रेटिसची ‘क्षमायाचना’ या तीन निबंधांचा ऊहापोह असला पाहिजे. थोरो यांचा हा निबंध स्पर्धकांना छापील स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला होता.

अंतिम फेरीत फक्त चार निबंध पोहोचणार होते. या निबंधांची निवड होण्याआधीच गांधीजींना नावनोंदणी न केल्यामुळे अटक करण्यात आली. १० जानेवारीला त्यांना दोन महिन्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधीजींनी आठवणीत सांगितले आहे- “ज्या न्यायालयात मी वकील म्हणून उभा राहत होतो, त्याच न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहताना मला विचित्र वाटले खरे!” त्यानंतर त्यांनी थोरो यांचे एक वचन उद्धृत केले- “...पण मला आरोपी म्हणून उभे राहणे हा माझा बहुमान वाटत होता.”

तुरुंगवासात महात्मा गांधींनी टॉलस्टॉय, रस्किन, हक्स्ले, बेकन आणि भगवद्गीतेचे वाचन केले. थोरोप्रमाणेच त्यांच्यावरही या पुस्तकाचा प्रभाव पडला. लंडनमध्ये असताना भगवद्गीतेत हिंसेचे किंवा युद्धाचे समर्थन केले आहे, या मताचे त्यांनी खंडण केले होते. त्या बाबतीत त्यांचे म्हणणे होते, “या ग्रंथात युद्धाची पार्श्वभूमी वापरून माणसाच्या मनात चाललेल्या द्वंद्वाचा ऊहापोह केला आहे.”

थोरो यांनेही याच प्रकारचे मत त्यांच्या एका निबंधात मांडले आहे. निवड झालेल्या चार निबंधांचे वाचन झाले आणि ‘इंडियन ओपिनियन’मध्ये हे चार निबंध तुलनेने फारच उथळ होते, असा निर्वाळा देण्यात आला. त्यात विचारांचा सखोल अभ्यास जो अपेक्षित होता तो नव्हता, असे निवड समितीचे म्हणणे पडले. अखेरीस या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि ती नोंदणी तात्पुरती ऐच्छिक करण्यात आली आणि गांधीजींच्या वाचनातही खंड पडला.

पण सविनय कायदेभंगाच्या चळवळीने परत एकदा उचल खाल्ली, जेव्हा जनरल स्मटस्‌ याने कराराची कलमे पाळली नाहीत. हा कायदा रद्द करण्याचे आश्वासनही पाळले नाही. गांधीजींना हा विश्वासघात सहन झाला नाही व त्यांनी जनरल स्मटस्‌ला निर्वाणीचा इशारा दिला की, जर हा कायदा रद्द झाला नाही तर, ज्या भारतीय वंशाच्या लोकांनी एच्छिक नोंदणी केली होती, ते त्या नोंदणीपत्राचे जाहीररित्या दहन करतील. थोरो यांनी त्यांच्या काळात ‘मॅसॅच्युसेट्‌समधील गुलामगिरी’ या विषयावर फ्रॅमिंगहॅम येथे गुलामगिरीविरुद्ध झालेल्या एका सभेत भाषण दिले. त्यात अमेरिकेची घटना जाळण्यात आली, या दोन घटनांतील साम्य आपल्या लक्षात आले असेल.

१६ ऑगस्ट १९०८मध्ये ही नोंदणीपत्रके जाळण्यात आली आणि लगेच गांधीजींना अटक करण्यात आली. खटल्याचा निकाल लागून त्यांना १० ऑक्टोबरला फोकस्ट्रसच्या तुरुंगात धाडण्यात आले. ते दिवसभर काम करत असत, पण दर रविवारी ते थोरो यांच्या निबंधांचे वाचन करत. त्या बाबतीत ते म्हणतात, “हे निबंध वाचून मला जो लढा पुकारलाय, तो योग्य आहे याची खात्री पटली.”

देशासाठी आणि धर्मासाठी तुरूंगात जाण्यासाठी नशीब असावे लागते असे गांधीजीं म्हणत असत. ते म्हणत, “तुरुंगात जीवंत राहण्यासाठी आवश्‍यक ते अन्न पुरवले जाते. तुमचे कदाचित हाल होत असतील पण तुमच्या आत्म्याची या ऐहिक जंजाळातून सुटका होते.”

ट्रान्सव्हालच्या तुरुंगातील अनुभवाबद्दल गांधीजी म्हणतात, “सर्वोच्च आनंदाचा मार्ग हा देशासाठी आणि जनतेसाठी तुरुंगात जाणे हाच आहे.” या अनुभवाचे वर्णन करताना शेवटी ते म्हणतात, “कर भरला नाही म्हणून अमेरिकेच्या थोरो नावाच्या नागरिकाने १८४९ साली याच प्रकारचे विचार प्रकट केले आहेत. तुरुंगवासात तुरुंगाच्या जाडजूड दगडी भिंती आणि लोखंडी दरवाजे पाहताना हा माणूस स्वतःशी संवाद साधतो - माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे की, माझ्या आणि माझ्या गावकऱ्यांमध्ये एक दगडी भिंत आहे. ते कदाचित ती भिंत चढून किंवा दरवाजे तोडून माझ्यापर्यंत पोहोचूही शकतील, पण त्या अगोदर त्यांना अत्यंत अवघड अशी विचारांची भिंत फोडावी लागेल... मग ते माझ्यासारखे स्वतंत्र होतील... हे शासन एखाद्या एकट्या भेदरलेल्या स्त्रीप्रमाणे घाबरलेले आहे. शत्रू आणि मित्र यातील फरक करण्याची त्याची सारासार बुद्धी नष्ट झाली आहे. जो काही थोडाफार आदर माझ्या मनात या शासनाप्रती होता, तोही आता नष्ट झाला आहे… मला आता त्याची कीव येऊ लागली आहे.”

एका प्रतिष्ठित वकिलाचे एका क्रांतिकारी राजकीय पुढाऱ्यात झालेले रूपांतर आपण प्रत्यक्ष पाहिले आणि त्यात थोरो यांच्या विचारांचा सहभागही पाहिला.

सत्याग्रहाचा पहिला प्रयोग झाल्यावर थोरोंच्या विचारांकडे गांधीजींनी दुर्लक्ष केले नाही, उलट ते त्या विचारांची अधिक खोल मीमांसा करू लागले. ‘इंडियन ओपिनियन’मध्ये आलेल्या थोरोंच्या लेखनावरील लेखांनंतर त्यात मॅझिनीच्या लिखाणातील उतारे छापले गेले. या लेखाखाली जी टिप्पणी आली, त्यात खालील परिच्छेद सापडतो - शांततापूर्ण सत्याग्रहाच्या प्रारंभी थोरो यांच्या ‘ऑन ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स’ या लिखाणातील काही परिच्छेद या वृत्तपत्रात प्रकाशित केले होते. भारतीय सत्याग्रहींना ते अत्यंत आवडले असे समजते. गांधी त्या काळातही थोरो वाचत होतेच. १९०९पर्यंत गांधी म्हणू लागले, ‘रेल्वे, यंत्रे, आणि त्याने  जीवनपद्धतीत होणारे बदल हे भारतीयांच्या गुलामगिरीचे लक्षणच आहे.’

थोरो आणि टॉलस्टॉयही असेच प्रतिपादन करत. त्यांच्या विचारांचा प्रभाव गांधीजींच्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तकावर पडलेला आपल्याला जाणवतो. वसाहती स्थापन करून आपल्या देशातील सरकारांच्या तुंबड्या भरण्याच्या या पाश्‍चिमात्य सरकारांच्या वृत्तीवर गांधीजी सडकून टीका करीत. ‘इंडियन ओपिनियन’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या आवृत्तीत गांधीजी म्हणतात, ‘‘या पुस्तकात प्रदर्शित झालेली मते माझी आहेत, पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की, माझी ही मते टॉल्स्टॉय, थोरो, एमर्सन, रस्किन आणि इतर थोर लेखकांची पुस्तके वाचून प्रगल्भ झाली आहेत. शिवात माझ्या मतांवर थोर भारतीय तत्त्वज्ञानी मंडळींचा प्रभाव जास्त आहे, हे मी नाकारणार नाही (म्हणजे ‘भगवद्गीता’).” हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर एकाच वर्षाने त्याच वृत्तपत्रात थोरो यांच्या ‘लाईफ विदाऊट प्रिन्सिपल्स’ या पुस्तकातील काही परिच्छेद उद्धृत करण्यात आले होते.

गांधीजींना थोरो एक प्रामाणिक व वास्तवात वावरणारा माणूस वाटायचा, कारण तो जे शिकवायचा, ते तो स्वतः आचरणात आणायचा. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण’ ही म्हण थोरोला कधीच लागू पडली नाही. हे वाचल्यावर काही लोकांचा असा गैरसमज होईल की, गांधीजींनी काही मूलभूत विचार मांडलचे नाहीत. पण असे म्हणणे हास्यास्पद आहे, कारण ही पुस्तके वाचून गांधीजींना ते योग्य मार्गावर चालत आहेत याची खात्री पटली आणि ते अधिक आत्मविश्वासाने त्या मार्गावर मार्गक्रमण करू लागले...

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आणि खरे सांगायचे तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सविनय, शांततेच्या मार्गाने कायदेभंगाची चळवळ तोपर्यंत झाली नव्हती. शेवटी अनेक तत्त्वे मांडली जातात, अनेक विचार मांडले जातात, पण त्या तत्त्वांचा उपयोग देशासाठी किंवा माणसांसाठी करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे...

थोरो आणि गांधीजींचे थोरपण कशात आहे, तर त्यांनी सत्तांना आणि समाजाला न जुमानता आपल्या मनाला जे पटते (योग्य वाटते) तेच केले आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला...

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात माझ्या आवडत्या लेखकाचा असा अप्रत्यक्ष, पण अत्यंत महत्त्वाचा असा सहभाग होता, हे वाचून मला काय वाटले, हे मी सांगू शकत नाही. पण हिंदुस्तानातील समस्त सामान्य जनतेपर्यंत अहिंसक मार्गाने लढा उभारता येतो, असहकार पुकारून लढा उभारता येतो, हा थोरोचा विचार गांधीजींनी अत्यंत प्रभावीपणे पोहोचवला ज्याची फळे आज आपण उपभोगतो आहोत…

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......