अधेमध्ये बातम्या छापते ते ‘वृत्तपत्र’, जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या देणारी ती ‘न्यूज-चॅनेल्स’ आणि जाहिरातींच्या अधेमध्ये मनोरंजन करणारी ती ‘मनोरंजन माध्यमे’…
पडघम - माध्यमनामा
मंदार काळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 12 July 2021
  • पडघम माध्यमनामा इंडियन आयडॉल Indian Idol न्यूजपेपर Newspaper टीव्ही वाहिन्या TV Channel वृत्तवाहिन्या News Channelटीआरपी TRP

माध्यमे – २ : ‘प्रॉफिटही भगवान हैं’

‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागील लेखात चॅनेल-माध्यमांवरील कार्यक्रमांच्या विषय नि स्वरूपासंदर्भातील धंदेवाईकतेवर भाष्य केले होते. टीआरपीच्या स्पर्धेत शक्यतो जे खपते, तेच विकण्याचे त्यांचे धोरण असते. पण हा काही केवळ दृश्य-माध्यमांचा दृष्टिकोन आहे असे म्हणता येणार नाही. अन्य माध्यमांचे धोरणही याच्याशी मिळतेजुळतेच असते.

काही काळापूर्वी एका वेबसाईटवर मी ‘चेकर्स’ हा खेळ खेळत असे. अगदी ‘तज्ज्ञ पातळी’वरून खेळणार्‍या संगणकालाही आपण सहज हरवत आहोत, असे काही सामन्यांतच लक्षात आले. संख्याशास्त्रीय दृष्टीने पाहू लागल्यावर ध्यानात आले की, प्रत्येक सामन्याचा सरासरी वेळ हा तीन ते चार मिनिटे इतकाच आहे. हा खेळ उपलब्ध करून देणार्‍या मंडळींनी बहुधा इंटरनेटवर या प्रकारचा खेळ खेळणार्‍यांच्या करणार्‍यांच्या सहनशक्तीचा अभ्यास करून हा कालावधी निश्चित केला असावा. (यू-ट्यूबर व्हिडिओ अपलोड करताना त्याचा कालावधी किती असावा, याचा विषय-वर्गवारीनुसार विचार केला जात असतो.) आणखी काही सामने वेगवेगळ्या प्रकारे खेळून पाहिल्यानंतर आलेली शंका खरी ठरली. असे का उत्तरही सापडले. खेळ चालू असताना दोन्ही समासांमध्ये जाहिरातींचे पट्टे उमटत होते. खेळाडू जितका वेळ त्या पानावर राहील, तितकी त्या वेबसाईटच्या मालकाला अर्थप्राप्ती होणार, असे गणित आहे. म्हणून अगदी सुमार खेळाडूंनाही संगणक महाशय लिंबूटिंबूसारखे जिंकू देत होते, तज्ज्ञच असल्याचा समज करून देत होते... अगदी ‘इंडियन आयडॉल’च्या संयोजकांप्रमाणेच.

सॅटेलाईट रेडिओ चॅनेल सुरू झाली, तेव्हा ‘फोन करा नि जिंका’ प्रकारच्या स्पर्धा सुरू झाल्या. यात विचारलेले प्रश्न इतके सामान्य असत की, ऐकणार्‍या बहुतेकांना त्याचे उत्तर ठाऊक असे. मग प्रथम कोण उत्तर देतो, याची अहमहमिका सुरू होई. पूर्वी असले प्रकार पोस्टकार्डाद्वारेही होत. नंतर ईमेलद्वारे होऊ लागले. आणि अखेर मोबाईलच्या आगमनानंतर एसएमएसद्वारे होऊ लागले. अशा छद्मस्पर्धांचा सुरुवातीचा उद्देश सोपा होता. बक्षिसाच्या लालसेने अधिकाधिक श्रोते, प्रेक्षक आपल्या कार्यक्रमाकडे आकृष्ट व्हावेत, असा कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा प्रयत्न होता. पुढे ‘डेटागिरी’चा बोलबाला सुरू झाल्यावर स्पर्धकांची माहिती जमा करणे आणि त्याआधारे मार्केटिंगचे जाळे विणणे, हा आणखी एक उद्देश त्याला जोडला गेला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पण माध्यमांचेच का, सामान्य माणसेही यात मागे नाहीत. मागच्या महापालिका निवडणुकीपूर्वी आमच्या प्रभागातील नगरसेवकाने मतदारसंघात फिरून ‘जनसंपर्क सहज ठेवता यावा’ म्हणून सर्व मतदारांचे मोबाईल क्रमांक जमा केले. यथावकाश उगवत्या सूर्याला नमस्कार करत त्याने पक्ष बदलला, पुन्हा निवडून आला. निकाल लागले आणि आमच्या मोबाईल्सवर नगरसेवकाला ‘निवडणूक निधी’(!) देणार्‍या स्थानिक दुकानांचे मार्केटिंग मेसेजेस येऊन धडकू लागले.

पूर्वी चित्रपटांमधून एखादी टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, एखाद्या पंख्याचा क्लोज-अप घेत त्याचे नाव स्पष्ट दिसेल, याची तजवीज केली जाई. या बदल्यात चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्याच उत्पादनाचा उत्पादक काही आर्थिक हातभार लावत असे. याला ‘एम्बेडेड मार्केटिंग’ म्हणजे ‘प्रच्छन्न प्रचार’ अशी संज्ञा तेव्हा वापरली जात असे. आता टीआरपीच्या जमान्यामध्ये या आर्थिक गणितामध्ये थेट कार्यकारणभावच प्रस्थापित झालेला आहे. चॅनेल-माध्यमे तर सोडाच, यू-ट्यूबवरील लहान-लहान वाहिन्याही स्थानिक उत्पादकांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरात करून आर्थिक लाभ पदरी पाडून घेत असतात. या प्रकाराने इतका धुमाकूळ घातला आहे की, चॅनेलवरील मालिकांतून, निवेदकांच्या निवेदनातून तर सोडाच, पण एखाद्या खेळाच्या थेट प्रक्षेपणाच्या वेळी समालोचन करणार्‍यांनाही प्रायोजकांच्या उत्पादनाच्या जाहिरातींचा एक-दोन ओळींची मजकूर उच्चारणे सक्तीचे असते. या जाहिरातींनी कार्यक्रमांचा इतका कब्जा घेतला आहे की, उलट दिशेने आता कार्यक्रमांनाच ‘एम्बेडेड प्रोग्राम’ म्हणायची वेळ आली आहे. माध्यमांमध्ये जाहिरात हे धोरण मागे पडून जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या छापते ते वृत्तपत्र, जाहिरातींच्या अधेमध्ये बातम्या देणारी ती न्यूज-चॅनेल्स, जाहिरातींच्या अधेमध्ये मनोरंजन करणारी ती मनोरंजन माध्यमे, अशा व्याख्या बदलून घ्यायला हव्या आहेत.

संगणकाच्या, इंटरनेटच्या जमान्यात थेट ग्राहकांकडून उत्पन्न मिळवण्यापेक्षा जाहिरातदारांकडून उत्पन्न मिळवण्यावर अधिक भर असतो. त्यामुळे बहुतेक चॅनेल अगदी बव्हंशी फुकट किंवा नगण्य मासिक वर्गणी प्रेक्षकांकडून घेत असतात. कार्यक्रमांदरम्यान अधेमध्ये ब्रेक घेऊन दाखवलेल्या, कार्यक्रम चालू असताना स्क्रीनच्या तळाला वा बाजूला स्तंभामध्ये, कार्यक्रमांमध्येच मिसळून दिलेल्या... अशा विविध प्रकारे जाहिरातींचा जो भडिमार होतो त्यांतूनच त्यांच्या उत्पन्नाचा बळकट स्रोत निर्माण होत असतो.  आणि या जाहिरातींचे दर निश्चित करण्यासाठी त्यांना या जाहिरातदारांना आपली ग्राहक-पोहोच किती आहे, हे सिद्ध करून दाखवावे लागते. आणि इथे मागील लेखात मांडलेले टीआरपीचे गणित कामी येते.

त्या लेखात म्हटल्याप्रमाणे चॅनेल-माध्यमे ही मूर्तिमंत धंदेवाईकता आहे. कुस्त्यांची दंगल लावावी, तशा चर्चांचे फड लावून, अनेक राजकीय, सामाजिक, क्वचित बौद्धिक मंडळींमध्ये टकरीच्या सांडांप्रमाणे झुंजवून अनेक मार्गांनी त्याचे दाम ते वसूल करत असतात. याव्यतिरिक्त विशिष्ट भूमिकेला झुकते माप देण्यासाठी त्या त्या बाजूच्या मंडळींकडून थेट अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात देणग्या स्वीकारतात... धंदा चोख करतात आणि ‘प्रामाणिकपणाच्या बैलाला ढोल’ म्हणतात. 

‘कोरोनिल’ या आपल्या औषधाने करोना बरा होतो, असा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. त्याचे बाजार-अवतरण करण्याच्या दिवशी ‘करोनावर जगातले एकमेव रामबाण औषध’ म्हणून बहुतेक भाट माध्यमांनी दिवसभर बातम्या वाजवल्या, चर्चा घडवल्या; बहुतेक वेळ बाबा आणि ‘कोरोनिल’चे खोके स्क्रीनवर झळकवले. पुढे उत्तराखंडच्या औषध प्रशासनाने केवळ प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून परवाना मागितला नि दिला गेला असल्याचे स्पष्ट केले. बाबांवर फसवणुकीचा खटला भरावा, अशी मागणी सुरू झाली. त्यावरही चॅनेलवाल्यांनी चर्चा घडवून आणल्या. आधीच्या बातम्या नि त्या चर्चा दोन्हींचे प्रायोजक होते ‘पतंजली आयुर्वेद’!

सर्वांत जुने माध्यम असलेल्या वृत्तपत्रांची स्थितीही फार वेगळी नाही. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्यापासून आसपासच्याच काय, हजारो मैल दूरवरच्या घडामोडी काही सेकंदात समोर येत असल्याने वृत्तपत्रांची मूळ गरज घटत चाललेली आहे. खर्चाचे वाढते प्रमाण, ग्राहक राखण्यासाठी त्या तुलनेत कमी ठेवावे लागणारे दर, या कात्रीत सापडलेली माध्यमे जाहिरात-उत्पन्नावर भर देतात, हे ओघाने आले.

पूर्वी पहिल्या पानावरील हेडलाईन ज्या बातमीला मिळे, ती बातमी आदल्या दिवशीची सर्वाधिक महत्त्वाची बातमी मानली जात असे. आता वृत्तपत्राचे पहिले पूर्ण पानच जाहिरातीने व्यापलेले असते. जाहिरात ही आदल्या दिवशीच्या सर्वांत महत्त्वाच्या बातमीहून निर्णायकरित्या मोठी ठरली आहे. आतील पानांवर पाहिले तर, अन्य जाहिराती, छोट्या जाहिराती, निविदा सूचना वा ताळेबंदांसारख्या बहुसंख्य वाचकांच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्टी, - पैसे घेऊन छापल्या आहेत, हे उघड गुपित असते अशा - राजकीय आणि व्यावसायिक ‘बातम्या’ वगळल्या, तर निखळ बातम्या वा वाचकांना उपयुक्त असा मजकूर जेमतेम दहा ते पंधरा टक्के इतकाच उरतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

इंग्रजी वृत्तपत्रांना संभाव्य ग्राहक अधिक असल्याने त्यांची स्थिती थोडी बरी असते. पण मराठीसारख्या स्थानिक भाषांतील वृत्तपत्रे आता केवळ जाहिरातींचे उत्पन्न मिळवण्यासाठी छापली जाणारी जाहिरातपत्रेच उरली आहेत. या दहा-पंधरा टक्क्यांत जागा भरण्यासाठी पहिला मान अग्रलेख लिहिण्याची हौस असलेल्या संपादकाला दिलेला. उरलेली जागा भरण्यासाठी वृत्तसंपादक मंडळींना फार प्रयत्न करावे लागत नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कृपेने हव्या त्या स्वरूपात बातम्या तयार मिळतात. आवश्यक तर संपादित करून त्या चौकटीत बसवल्या की काम होते.

एक प्रथितयश मराठी वृत्तपत्र इंग्रजी पुस्तकांच्या परीक्षणाला दीड-दोन हजार शब्दांची मुभा देते. एकाच पुरवणीत अशा दोन पुस्तकांची परीक्षणे छापते. याउलट मराठी पुस्तकांच्या परीक्षणांना पाचशे शब्दांची एखादी पत्रावळ कशीबशी मिळते. एका प्रकाशकाने त्यांच्या एका पुस्तकाचे परीक्षण प्रसिद्ध मराठी नियतकालिकाकडे पाठवले असता, ‘तुम्ही कुठे आम्हाला जाहिराती देता?’ असा उलट प्रश्न विचारून ते प्रसिद्ध करण्यास सरळ नकार देण्यात आला. म्हणजे त्यांच्याकडे छापली जाणारी परीक्षणे ‘पेड न्यूज’ची आवृत्ती म्हणता येईल. हे नियतकालिकही इंग्रजी पुस्तकांची परीक्षणे छापण्यातच धन्यता मानते.

हे धोरण का चालते, यावर विचार करताना मराठी पुस्तकांच्या प्रकाशकांकडेही नजर टाकायला हवी. तिथेही इंग्रजीतील गाजलेली, गाजत असलेली समकालीन पुस्तके शक्य तितक्या तातडीने अनुवादित करून बाजारात आणण्याची अहमहमिका चालू असते. त्या घाईत अनुवादाचा दर्जा भयाण असलेली पुस्तके हाती पडत असतात. पण त्यात ना प्रकाशकाला लाज, ना वाचकाला. वाचकांकडून होणारा जोड्यांचा कार्यक्रम टाळण्यासाठी काही अनुवादांवर तर अनुवादकाचे नावही नसते. याच्या मुळाशी मराठी भाषिकांचा न्यूनगंड आणि इंग्रजी बाजाराशी ‘कदम मिला के चलो’ची असलेली जमाव-दबावाने (peer pressure) निर्माण झालेली अपरिहार्यता असते.

‘बुकर’च्या स्पर्धेतील पुस्तक आपण वाचले असले पाहिजे हा अट्टाहास, पण इंग्रजी समजुतीचा नि म्हणून वाचनाचा वेग कूर्मगतीचा. यावर हा उपाय. हे कामचलाऊ अनुवादित पुस्तक वाचले तरी गोषवार्‍याने मूळ पुस्तक वाचल्याचा आव आणणे शक्य होते. वाचकाचे नि प्रकाशकाचे दोघांचे काम होते. याला वृत्तपत्र नि नियतकालिकेही हातभार लावून त्या नफ्याचे थोडे उदक आपल्याही हातावर सोडून घेतात, गुणवत्ता नि मराठी पुस्तके या दोन्हींला वार्‍यावर सोडून.

नफा वाढवण्यासाठी जाहिरातींचे उत्पन्न वाढवणे, हा जसा उपाय आहे, तसाच खर्च कमी करणे, हा दुसरा उपाय आहे. माध्यमांचे नोकर असलेल्यांचा पगार तर टाळता येत नसतो. मग तो शक्य तितका कमी ठेवणे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करवून घेणे, हा भांडवलशाहीतील नियम आहे. त्या पलीकडे तात्कालिक सहभागी व्यक्तींना - वृत्तपत्रांतील लेखक, चॅनेलवरील चर्चक वगैरे - शक्यतो मानधनच न देणे, या प्रकारांनी खर्चात काटछाट केली जाते.

चित्रपट, मासिक आदी अनेक क्षेत्रांत उतरलेल्या एका चॅनेलकडून त्यांच्या मासिकातील एका फीचरसाठी एका फोटोग्राफर मित्राला त्याचे फोटो वापरण्याची ‘विनंती’ करण्यात आली. तो व्यावसायिक फोटोग्राफर असल्याने त्याने मानधनाची चौकशी केली. त्यावर ‘तुम्हाला प्रसिद्धी मिळेल की!’ असे निर्लज्ज उत्तर त्याला मिळाले. आता आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याचे बर्‍यापैकी नाव आहे, अशा त्या मित्राला हे वीत-दीडवीत मराठी चॅनेल आणखी काय प्रसिद्धी देणार होते? त्याहूनही अस्वस्थ करणारी बाब म्हणजे प्रत्येक सेकंदाच्या बाष्कळ बडबडीला पैशात रूपांतरित करणारी ही धंदेवाईक मंडळी सर्जनशील कामाची मात्र एक दमडी देऊ इच्छित नाहीत! त्यांची संपूर्ण उपेक्षा करतात. तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो, ही उपकाराची भाषा करतात.

एका चॅनेलवरील दिवाळी अंकांवरील एका चर्चेत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रण होते. होकार दिल्यानंतर चॅनेलच्या बाजूने पुढचा आठवडाभर एकदम सामसूम. सकाळी नऊ वाजता होणार्‍या चर्चेच्या जेमतेम दीड तास आधी ती त्या चर्चेच्या सूत्रसंचालिकेचा फोन आला नि वट्ट पाच मिनिटे तुम्ही कशावर बोलणार वगैरे जुजबी चौकशी झाली. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा संपर्कच नाही. नियमितपणे चॅनेल्सवर जाणार्‍या आमच्या कार्यकर्त्या, कलाकार, अभ्यासक मित्रांनाही एक पैशाचे मानधन मिळाल्याचे ऐकिवात नाही. आणि बातम्या देण्यापासून, विविध ठिकाणी बाईट्स घेणे, दिवाळीसारख्या निमित्ताने खास कार्यक्रम करणे, वगैरे सगळे काही करणार्‍या यांच्या नोकरांना मात्र नियमित पगार. तेही बिचारे मूठभर पगारावर साहेब सांगेल ते निमूटपणे सगळे करतात. मी सहभागी झालेल्या चर्चेची सूत्रसंचालिका नंतर त्याच चॅनेलवर बातम्या देताना दिसली, किंबहुना तेच तिचे मुख्य काम आहे, हे नंतर समजले.

थोडक्यात ‘झाडू मारण्यापासून ते कलाकार वा चर्चक पकडून आणण्यापर्यंत सर्व कामे करण्याची तयारी असेल तर आमच्याकडे तुम्हाला रोजगार मिळेल’ अशी धमकीवजा ऑफर चॅनेल-मालक मंडळी देत असावीत!

अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ‘तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात. सोशल मीडियावर चार ओळी लिहिल्याने प्रशंसा झालेल्या, नि त्या अर्ध्या हळकुंडानेच पिवळ्याधम्मक होऊन बसलेल्यांची त्यांच्या दारी इतकी भाऊगर्दी आहे, की या माध्यमांना एक गेला दुसरा सहज मिळतो. ‘पेपरमध्ये आपले नाव आले’ या बालीश आनंदाने ऊर भरून येणार्‍यांना पैसे दिले नाही तरी चालतात. ‘दीड कॉलम भरून काढायला लेख पाहिजे’ किंवा ‘चर्चेत साडेतीन मिनिटे वाजवायला एक तोंड पाहिजे’ एवढ्याच धंदेवाईक अपेक्षा असलेल्यांना ‘कथा पुणे, मुंबई आणि सोलापूर इथे घडते. पात्ररचना विलोभनीय आहे’ वगैरे सखाराम गटणे पातळीवरचे परीक्षण लिहून देणारे समाजमाध्यमांतून सहज मिळत असल्याने काम भागते.

एका वृत्तपत्रांच्या पोर्टलने तर महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून ब्यूटी टिप्स, लाईफस्टाईल या सदरातले लेख लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. ही मुले अर्थातच आपले नाव पाहून धन्य होत असल्याने गुगलबाबाच्या मदतीने इंग्रजी लिखाण शोधून, अनुवादित करून दोन-अडीचशे शब्द सहज खरडून देत असतात. गण्या उतरला, गणपा चढला… तरी वृत्तपत्रांची, पोर्ट्ल्सची, नियतकालिकांची गाडी चालूच राहते. खर्च कमी करण्यासाठी पुस्तकविक्री क्षेत्रातील मंडळीही असेच मार्ग अवलंबत असतात. विक्रेते वितरकाचे तर वितरक प्रकाशकाचे पैसे शक्यतो देऊच नयेत, असा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम म्हणून वा त्या बतावणीखाली प्रकाशक लेखकाचे मानधन उंच शिंक्यावर टांगून ठेवतात.

आयटी इंडस्ट्रीत काम करत असताना एक्सेलपासून जावापर्यंत, बॅंकिंगपासून फार्मास्युटिकल्सपर्यंत सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअरवर तुम्हाला काम करता आले पाहिजे, हे सांगणारी मॅनेजर नावाची जमात पाहिली होती. त्या व्यवसायात ‘माणूस’ हीच क्रयवस्तू बनलेली आहे. त्यामुळे तिला अधिकाधिक ग्राहक मिळवायचे तर तिला बेडूक‍उड्यांपासून ट्रॅपीझवरच्या उड्यांपर्यंत सर्व जमले पाहिजे. पूर्वी गुलामांच्या बाजारात बाजारात उभा केलेल्या गुलामाचे दात, शारीरबळ वगैरे अजमावून त्याला विकत घेतल्यास कमीत कमी अन्न खाऊन जास्तीत जास्त काम करेल ना, हे पाहून एखादा धनको मालक चोख पैसे देऊन त्याला विकत घेई. अगदी तसेच ‘क्लाएंट’ म्हणवणारे नव्या भांडवलशाही व्यवस्थेतले मालक त्यांना पारखून घेतात आणि त्यांच्या सध्याच्या मालकांना, म्हणजे आयटी कंपनीला रोख पैसे देऊन काही काळापुरते विकत घेतात. गुलाम विक्रीयोग्य राहणे जुन्या मालकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही क्लाएंटला विकता येईल असेच गुलाम, असेच मजूर त्यांना हवे असतात. त्यामुळे ही मंडळी ‘तज्ज्ञ’ नावाच्या व्यवस्थेला धुळीला मिळवत कामचलाऊ कामगारांच्या आधारे वेतन-खर्च कमीत कमी ठेवून, आपल्या मालकांचा पैसा वाचवण्याचे नि नफा वाढवण्याचे काम करतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मालक मंडळीही चतुर असतात. ते या जमातीला निव्वळ वेतनापलीकडे नफ्याचा वाटा देऊ करतात. त्यामुळे ही मॅनेजमेंट नावाची सर्वस्वी अनुत्पादक कामे करणारी मंडळी ‘प्रॉफिट ही भगवान है’ म्हणत वाटेल ते करून तो वाढता राहील, याची खटपट करत असतात. त्यादरम्यान गुणवत्तेची ऐशीतैशी झाली तरी त्यांना त्याचे सोयरसुतक असण्याचे काहीच कारण नसते. त्यातूनच सर्जनशील व्यक्तीला ‘तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो, आणखी काय हवे?’ असा निलाजरा उलट प्रश्न विचारण्याचा कोडगेपणा जन्माला येतो. मग ज्या लेखक-कलाकार, कामगार यांना आपल्या गुणवत्तेबद्दल आत्मविश्वास आहे, अशी मंडळी दूर राहतात नि ही मॅनेजर मंडळी कामचलाऊ, हौशी मंडळींकरवी शक्यतो फुकट, नाहीच जमले तर नगण्य मानधन/वेतनावर कामे करवून घेत राहातात. अशा परिस्थितीत गुणवत्तेचे काय होत असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

..................................................................................................................................................................

मनोरंजन माध्यमे – १ : ‘खपते ते विकते’: ‘खपते ते विकते’ हे भांडवलशाहीतील माध्यमांचे एकमेव सूत्र आहे. ऑल इज फेअर इन (लव्ह, वॉर अँड) टीआरपी!

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......