देवळालीच्या गुलाबी थंडीत रम्य संध्याकाळी गोबर्या गालांचा आणि बोलक्या डोळ्यांचा तरुण चेहर्यावर निर्व्याज हसू खेळवत मोठी मोठी स्वप्न रंगवायचा. पेशावरच्या छोट्याशा गल्लीत सुरू झालेला त्याचा स्वप्नांचा प्रवास आधी व्हाया देवळाली आणि मग व्हाया पुणे असा मुंबईच्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये येऊन नव्याने सुरू झाला. रुपेरी पडद्यावर तो विद्ध अंतकरणाने ‘टूटे हुए ख्वाबों ने हम को ये सिखाया हैं’ गायचा, त्या वेळी देशातील त्याच्या लाखो चाहत्यांच्या गळ्यात आवंढा दाटत असे. ‘कौन कंबख्त यहाँ बरदाश्त करने के लिए पिता हैं’ या त्याच्या कैफियतीवर लाखो उसासे निघायचे. ‘ई सब मेरा कुत्ते की तरह पीछा किये हैं धन्नो। मैं भूखो मर गया धन्नो। मैं घर से बेघर होई गया’ असं तो म्हणायचा, तेव्हा लाखो हृदयं विदीर्ण व्हायची!
मोहम्मद युसुफ खान ऊर्फ युसुफ खान सरवर खान पठाण ऊर्फ दिलीपकुमार या माणसाने अभिनयाची परिभाषा बदलली. त्याच्या आधीचे अभिनेते दिग्दर्शक सांगेल तेवढंच कॅमेर्यासमोर करत असताना दिलीपकुमार सेटवर प्रत्येक दृष्याआधी दिग्दर्शकासोबत केवळ भूमिकेबाबतच नव्हे, तर तांत्रिक बाबतीतही चर्चा करू लागला. चित्रपटसृष्टीसाठी ही बाब नवी होती. भारताला स्वातंत्र्य मिळता मिळता दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर या ताज्या दमाच्या अभिनेत्यांबरोबरच नव्या तरुण दिग्दर्शकांचीही पिढी निर्माण होत होती.
दिलीपकुमारला ब्रेक देणार्या ‘बॉम्बे टॉकीज’ची सर्वेसर्वा देविका राणीला कसलेच प्रश्न विचारायची मुभा नव्हती. पण सुरुवातीच्या तीन अपयशी चित्रपटांनंतर दिलीपकुमार ‘बॉम्बे टॉकीज’च्या करारातून मुक्त झाला. नेमक्या याच टप्प्यावर त्याला समवयस्क दिग्दर्शक मिळाले आणि त्याच्यातला अभिनेता खुलत गेला. केवळ स्वतःच्या भूमिकेपुरता विचार करण्यापेक्षा सिनेमाच्या तांत्रिक अंगांबाबतही तो दिग्दर्शकांकडून जाणून घेऊ लागला. कॅमेर्यातून डोकावून फ्रेम नेमकी कशी दिसणार आहे, कलाकार कुठे उभे राहणार आहेत, कॅमेरा मूव्हमेंट कशी असणार आहे, ती नेमकी तशीच का असणार आहे, आदी बाबींबाबत अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात चर्चा होणं, ही त्या काळी नवलाईची बाब होती.
त्याने परिश्रमपूर्वक स्वतःला माणूस म्हणून आणि अभिनेता म्हणून घडवलं. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नाही, प्रशिक्षण नाही, पारंपरिक अर्थाने उच्चशिक्षितही नाही, तरीही या माणसाने अभिनयाची स्वतःची चौकट तयार केली. नैसर्गिक अभिनयाचा वस्तुपाठ घालून दिला. आपल्या भूमिकेचा, व्यक्तिरेखेचा विचार करायचा असतो आणि तो सिनेमाच्या एकूण परिणामाच्या संदर्भात करायचा असतो, हे दिलीपकुमारने पहिल्यांदा शिकवलं.
सुरेंद्र, भारतभूषण, करण दिवाण आदी सुमार नट चेहर्यावरची माशीही न हलवता चांगल्या चांगल्या प्रसंगांची निव्वळ माती करत असताना भावनांचा उद्रेक काय असतो, ते दिलीपकुमारने दाखवलं. म्हणूनच ‘वो शादी के रास्ते चली गयी और मैं बरबादी के’ असं तो ‘देवदास’मध्ये म्हणतो, तेव्हा आपसूक आपल्याही गळ्यात आवंढा येतो. १९४७च्या ‘जुगनू’नंतर त्याचे पुढचे काही सिनेमे ओळीने हिट झाले. प्रेमविव्हल, भग्नहृदयी, अपयशी प्रेमिकाच्या भूमिका असलेल्या या शोकात्म सिनेमांनी त्याला ट्रॅजडी किंग बनवला.
‘यहाँ बदला वफा का बेवफाई के सिवा क्या हैं?’ या ओळीत त्याच्या पहिल्या दशकभराच्या कारकिर्दीचं सार सामावलेलं आहे. या भूमिकांचा त्याच्यावर व्यक्तिगत आयुष्यातही इतका परिणाम झाला की, तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला १९५५ साली लंडनमधील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. डब्ल्यू डी. निकोल यांच्याकडून उपचार घ्यावे लागले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पडद्यावरच्या एखाद्या प्रसंगात सहकलाकाराच्या तोंडी संवाद असतील आणि आपण नुसतंच उभं राहून रिएक्ट व्हायचं असेल, तर नेमका कशा पद्धतीनं अभिनय करायला पाहिजे, ते दिलीपकुमारने शिकवलं. वरवर साधी वाटणारी ही गोष्ट भल्याभल्यांना जमत नाही. अनेकांची भंबेरी उडते. अशोक कुमार इतका कसलेला अभिनेता, पण एखादा प्रसंग साकारत असताना सहकलाकाराचे संवाद असतील आणि आपल्याला नुसतंच उभं राहून रिएक्ट करायचं असेल, तर आपल्या हातांचं काय करायचं, हे त्याला समजत नसे.
अशोककुमारने यावर स्वतःचा एक तोडगा शोधून काढला. जवळपास प्रत्येक चित्रपटात अशोककुमारच्या हातात सिगरेट, सिगार, चिरुट असं काहीतरी दिसतं. त्यामुळे सहकलाकार संवाद म्हणत असताना याच्या हातांना मूव्हमेंट मिळाली आणि त्याचं अवघडलेपण गेलं. दिलीपकुमारने असल्या बाह्य साधनांचा आधार न घेता सोपा मार्ग अवलंबला. सहकलाकार संवाद म्हणत असताना एका बोटानं नाक खाजव, पाठ खाजव, कपाळावर बोट फिरव, असे उद्योग करून प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याची कला त्याने साधली.
दिलीपकुमारने आपल्या अभिनयशैलीचे ट्रॅक सहजपणे बदलले. त्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्या कारकीर्दीचे सरळसरळ तीन टप्पे पडतात. ५०च्या दशकातला ‘ट्रॅजडी किंग’, ६०-७०च्या दशकातले हलकेफुलके व ड्रॅमॅटिक सिनेमे आणि ८०च्या दशकातला सुडाने पेटलेला म्हातारा. ५०च्या दशकात ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध झाल्यावर आणि या भूमिकांचा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम होऊ लागल्यावर डॉ. डब्ल्यू डी. निकोलच्या सल्ल्यानुसार त्याने हलक्याफुलक्या भूमिका असलेले सिनेमे स्वीकारायला सुरुवात केली आणि या भूमिकाही लीलया साकारल्या. ‘आझाद’, ‘इन्सानियत’, ‘कोहिनूर’, ‘नया दौर’, ‘मधुमती’पासून ते ‘राम और श्याम’ पर्यंतचे त्याचे सिनेमे याच काळातले.
बिमल रॉयचा ‘देवदास’ त्याने पुढचा सिनेमा ‘मधुमती’ करायचा, या एकाच अटीवर केला होता. १९७६ नंतर त्याने पाच वर्षांचा ब्रेक घेतला. एक तर त्याचं वय चेहर्यावर दिसू लागलं होतं. प्रेक्षकांची आणि दिग्दर्शकांची पिढीही बदलत होती. धर्मेंद्र, जीतेंद्र, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन असे अनेक नवे नायक अवतीभवती सुपरहिट सिनेमे देत असताना साक्षात दिलीपकुमार चाचपडत होता. ‘दिल दिया दर्द लिया’, ‘लीडर’, ‘गोपी’, ‘बैराग’ आदी सिनेमे माना टाकत होते. ‘गंगा जमना’च्या यशामुळे आपल्याला सिनेमाच्या बाबतीत सगळ्यातलं सगळं कळतं, हे त्याच्या मनाने ठरवून टाकलं होतं. ‘गंगा जमना’चा दिग्दर्शक म्हणून अधिकृत नाव नितीन बोसचं लागलं असलं तरी लिखाणापासून दिग्दर्शनापर्यंत तो पूर्णतः दिलीपकुमारचा सिनेमा होता. ‘गंगा जमना’चं झालेलं अफाट कौतुक, बॉक्स ऑफिसवर त्याने मिळवलेलं यश आणि कार्लोव्ही वारीसारख्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिनेमाला मिळालेलं विशेष पारितोषिक यामुळे दिलीपकुमार बहकला.
इथून पुढच्या प्रत्येक सिनेमात त्याचा हस्तक्षेप कमालीचा वाढला. दिग्दर्शकाला सूचना करता करता तो सहकलाकारांनाही अभिनयाचे धडे देऊ लागला. के. आसिफ, मेहबूब खान, बिमल रॉयसारखे दिग्दर्शक राहिले नसल्यामुळे आणि नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांसाठी तो ‘युसुफसाब’ झालेला असल्यामुळे त्यांची दिलीपकुमार समोर फारसं बोलण्याची टाप नव्हती. परिणामी ‘गंगा जमना’नंतरचे दिलीपकुमारचे बरेचसे सिनेमे एकपात्री अभिनयाचा आविष्कार दाखवल्यागत होऊ लागले. त्याचे हातवारे वाढले, अभिनयात कृत्रिमपणा आला. अनावश्यक पॉजेस, भूमिकेची गरज नसताना जडजड उर्दू शब्दांचा अतिवापर आणि सिनेमाची प्रत्येक फ्रेम स्वतःभोवतीच फिरवत ठेवण्याचा अट्टहास यामुळे त्याचे सिनेमे प्रेक्षकांचा भ्रमनिरास करू लागले.
तरीही एखादा ‘संघर्ष’, एखादा ‘सगीना’, एखादा ‘राम और श्याम’, एखादा ‘दास्तान’ दिलीपकुमार नेमकी काय चीज आहे, ते दाखवून जाई. पण ‘दिल दिया दर्द लिया’, ‘लीडर’, ‘गोपी’, ‘बैराग’ आदींची वाट लागली आणि त्याच्या या दुसर्या इनिंगला ब्रेक लागला.
परंतु, दिलीपकुमार संपला असं वाटत असतानाच त्याने नखं काढली. सुरुवात मनोजकुमारच्या ‘क्रांती’ने झाली. आज हा सिनेमा कमालीचा बटबटीत आणि हास्यास्पद वाटतो, पण त्या वेळी प्रेक्षकांनी उचलून धरला. विशेष म्हणजे बदललेला दिलीपकुमार त्याच्या चाहत्यांसाठी सुखावह होता. प्रेक्षकांच्या नव्या पिढीशीही त्याची नाळ जोडली गेली. पण ८०च्या दशकात खर्या अर्थानं त्याचा सर्वोत्तम वापर केला, तो सुभाष घईने. ७०च्या दशकात अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’ने रुपेरी पडद्यावर असंतोषाचे वणवे पेटवल्यावर ८०च्या दशकात दिलीपकुमारच्या ‘अँग्री ओल्ड मॅन’ने अभिनयाचं रौद्र रूप दाखवलं. ‘शक्ती’, ‘विधाता’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ आदी चित्रपटांमधून त्याने पुन्हा बहार उडवून दिली. ‘शक्ती’ पाहिल्यानंतर म्हणे राजकपूरने त्याला पुष्पगुच्छ पाठवला होता आणि सोबत चिठ्ठी होती- ‘बादशाह हा नेहमी बादशाहच असतो!’
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
आमच्या पिढीची त्याच्याशी ओळख झाली ती या चित्रपटांमधून... या सिनेमांमधला दिलीपकुमार चरित्र भूमिकेत असूनही सिनेमाच्या केंद्रस्थानी होता. व्यावसायिक हिंदी सिनेमाच्या बाबतीत हा एक मोठाच बदल होता. तोवर इतक्या वयस्कर माणसाला कथेच्या केंद्रस्थानी ठेवून ‘बिग बजेट’ व्यावसायिक सिनेमा बनवण्याचा जुगार कुठलाही निर्माता-दिग्दर्शक खेळला नव्हता (हृषिकेश मुखर्जींच्या ‘बुढ्ढा मिल गया’चा अपवाद वगळता, पण हृषिदांच्या सिनेमांचं बजेट कमी असायचं). आणि त्यानंतरही अमिताभ बच्चन म्हातारा होईपर्यंत दुसर्या कुठल्याही अभिनेत्याच्या वाट्याला रुपेरी पडद्यावर इतक्या महत्त्वाच्या, मध्यवर्ती भूमिका मिळाल्या नाहीत. दिलीपकुमारचा करिष्माच इतका जबरदस्त होता.
त्यापूर्वी दिलीपकुमार आम्हाला भेटला तो शिरीष कणेकर, अभिजीत देसाई आदींच्या लेखांमधून. दिलीपकुमारच्या प्रेमात आकंठ बुडालेलं, भावनेने थबथबलेलं, गहिवरून आल्यागत, गदगदून जात लिहिलेलं त्यांचं लिखाण. आजची पिढी रुपेरी पडद्यावरील आपल्या हिरो किंवा हिरॉइनवर इतकं जीव ओवाळून टाकणारं प्रेम करते का किंवा करू शकेल का, याची शंकाच आहे. एक तर आजची पिढी इतकी भावनाप्रधान नाही. दुसरं म्हणजे आज तुमचे आवडते नायक-नायिका इतक्या विविध माध्यमांतून तुमच्या समोर येत असतात की, त्यांच्याविषयी फार आकर्षण, असोशी, ओढ राहत नाही. जिझं आजच्या सुपरस्टारचा सुपरहिट सिनेमाच तीन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवून नजरेआड होतो, तिथं त्या स्टारविषयी त्याच्या चाहत्यांच्या मनात भावनांचे कढ येत राहतील वगैरे गोष्टी फार संभवत नाहीत. शिवाय, आजची पिढी ‘सेंटिमेंटल फूल’ नाही.
दिलीपकुमारच्या वेळची गोष्ट मात्र वेगळी होती. एक तर त्या वेळी तुम्हाला तुमच्या लाडक्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला बघायचं असेल किंवा आवडलेली गाणी ऐकायची-पाहायची असतील तर थिएटर गाठण्यावाचून पर्याय नव्हता. टीव्हीचं आगमन व्हायचं होतं. रेडिओही घरोघरी नव्हते. त्या काळी रेडिओसाठीही लायसन्स लागायचं. सिनेमाविषयीची नियतकालिकंही फारशी नव्हती. मुळात सिनेमाकडे सुरुवातीपासून सवंग मनोरंजन म्हणून पाहिलं गेल्यामुळे मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रांमध्ये आजच्यासारख्या सिनेमाविषयक पुरवण्या, पेज थ्री यांचा सुळसुळाट नव्हता. त्यामुळे आपल्या आवडीच्या कलाकारांविषयी फारसं वाचायला मिळत नव्हतं. त्यांचं तिन्ही त्रिकाळ दर्शन होत नसे. स्वाभाविकपणे या दुराव्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांविषयी चाहत्यांच्या मनात एक प्रकारची ओढ, असोशी, जिव्हाळा असायचा. प्रेक्षकांनी आपली दुःखं घेऊन सिनेमागृहाच्या काळ्याकुट्ट अंधारात गुडूप होत दिलीपकुमारच्या दुःखाशी समरस होण्यात धन्यता मानली.
राजेश खन्नाला पहिला ‘सुपरस्टार’ म्हटलं जातं. पण त्याची लोकप्रियता आणि त्याचं स्टारडम क्षणभंगुर होतं. दिलीपकुमार तब्बल सहा दशकं आपलं ‘स्टारडम’ मिरवत पाय घट्ट रोवून उभा होता. त्यामागे त्याच्या कमाल अभिनयाची रेंज तर होतीच, पण शिस्तीचा वाटाही मोठा होता (दिलीपकुमारचा आपल्यावर प्रचंड प्रभाव असल्याचं सांगणारा अमिताभही याच शिस्तीच्या बळावर गेली पाच दशकं टेचात उभा आहे!).
नुसतं टॅलेंट असेल, पण त्याला शिस्तीची आणि डेडिकेशनची जोड नसेल, तर त्याचा राजेश खन्ना व्हायला वेळ लागत नाही. दिलीपकुमार नेमका इथेच वेगळा ठरला. सुरुवातीपासूनच सिनेमाच्या निवडीविषयी तो प्रचंड चोखंदळ राहिला. म्हणूनच सहा दशकांच्या कारकीर्दीत त्याने अवघे ६३ सिनेमे केले. एकावेळी एक सिनेमा करायचा, हे तत्त्व राबवणारा तो भारतातला पहिला आणि त्या काळातला एकमेव नट होता.
मेहबूब खानच्या ‘अंदाज’मध्ये तो गातो- ‘इस को मिटाना उस को बनाना इस नगरी की रीत रे…’ चित्रपटसृष्टीच्या बाबतीत हे अधिकच खरं आहे. इथे प्रत्येक शुक्रवारी नवा स्टार उदयाला येऊन जुना स्टार धुळीला मिळत असताना दिलीपकुमार तब्बल सहा दशकं आपलं स्टारडम आणि आब राखून होता, यातंच त्याचं मोठेपण सामावलेलं होतं.
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा -
.............................................................................................................................................
‘नेहरूंचा नायक दिलीपकुमार : आविष्कार भारतीयत्वाचा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5174/Nehruncha-Nayak-Dilip-Kumar
..................................................................................................................................................................
लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.
bhide.chintamani@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment