अजूनकाही
संगीतक्षेत्रातील ऑस्कर समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारावर पुन्हा एकदा आपली लखलखीत मुद्रा उमटवत ब्रिटिश पॉपगायिका अॅडेल लॉरी ब्ल्यू अॅडकीनने पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक-दोन नव्हे तब्बल पाच पुरस्कार तिने यंदा पटकावले आहेत. गेली सात-आठ वर्षं ही गायिका युरोप-अमेरिकेत लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक गाठत आहे. तिच्या ‘ट्वेंटीफाइव्ह’ या अल्बमसाठी हे यंदाचे पाच पुरस्कार तिला मिळाले आहेत. यात ‘रेकॉर्ड ऑफ द इअर’ आणि ‘साँग ऑफ द इअर’ यांचाही समावेश आहे.
२०१२च्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये अॅडेलने असेच सहा पुरस्कार मिळवले होते. खरं म्हणजे तेव्हा ती पाच महिन्यापासून सार्वजनिक जीवनापासून दूर होती. कारण तिच्या स्वरयंत्रात दुखापत झाली होती. त्यामुळे तिने आपला दहा दिवसांचा अमेरिका दौराही रद्द केला होता. पण त्यानंतर तिने ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात गाऊन अमेरिकन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यावेळी तिच्या ‘ट्वेंटीवन’ या अल्बमसाठी तिला हे सहा पुरस्कार मिळाले होते.
थोडक्यात अलीकडच्या काळात अॅडेल पॉपगायिका म्हणून तुफान लोकप्रिय आहे. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी ‘टाइम’ या अमेरिकन साप्ताहिकाने २८ डिसेंबर २०१५ अंकाची कव्हर स्टोरी अॅडेल लॉरीविषयी केली होती. तिचं शीर्षक होतं, ‘अॅडेल इज म्युजिक्स पास्ट, प्रझेंट आणि फ्युचर’. तर तिचं उपशीर्षक होतं, ‘पॉप्स ओल्डेस्ट सोल रिटर्न्स टु द स्पॉटलाइट.’ यावरून अॅडेलच्या गारुडाचा साधारण अंदाज यावा. कारण ‘टाइम’सारखं अमेरिकाधार्जिणं साप्ताहिक अॅडेलची इतकी मुक्तकंठानं प्रशंसा करतं, यातच सारं काही आलं.
अॅडेल ही २९ वर्षांची, लंडनमध्ये जन्मलेली, एकेकाळी बरीच स्थूल असलेली पॉपगायिका-गीतकार सध्या युरोप-अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या म्युझिक अल्बम्सची तडाखेबंद विक्री होत आहे. २००६मध्ये १८व्या वर्षी तिचं एक गाणं तिच्या मित्रानं एका बेवसाइटवर टाकलं. ते प्रचंड लोकप्रिय झालं. पुढच्याच वर्षी तिला ब्रिट अवार्ड क्रिटिक्स चॉइस आणि बीबीसी साउंड ऑफ २००८ हे दोन मानाचे पुरस्कार मिळाले. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘नाइन्टीन’ हा तिचा पहिला अल्बम प्रकाशित झाला, तेव्हा त्याची तडाखेबंद विक्री झाली. युरोपमध्ये त्याने सात वेळा दहा लाखांच्या खपाचा आकडा ओलांडला, तर अमेरिकेत दोन वेळा. २०१५मध्ये तिचं पहिलं गायन अमेरिकेत झालं. २००९मध्ये तिला बेस्ट न्यू आर्टिस्ट आणि बेस्ट फिमेल पॉप व्होकल परफॉर्मन्स असे दोन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते.
२०११मध्ये ‘ट्वेन्टीवन’ हा तिचा दुसरा अल्बम प्रकाशित झाला. त्याचीही तडाखेबंद विक्री झाली. तब्बल सहा ग्रॅमी पुरस्कारासह अनेक मानाच्या पुरस्कारांची ती धनीण झाली. या अल्बमने सोळा वेळा दहा लाखांचा आकडा ओलांडला. तो युरोपातील सर्वांत जास्त विकला गेलेला, १९८५नंतर एवढा मोठा विक्रीचा विक्रम केलेला अल्बम ठरला. जगभर त्याच्या १३० लाख रेकॉर्ड विकल्या गेल्याने अॅडेल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहचली.
घटस्फोटीत आईसोबत लहानाची मोठी झालेल्या अॅडेलचा हा दुसरा अल्बम तिच्या पहिल्या ब्रेकअपनंतर आला होता. नातं संपल्यानंतरची भावना त्या अल्बममधून तिने मांडली होती. त्यातील ‘समवन लाइक यू’ हे गाणं तर युरोप-अमेरिकेतील आणि यू-ट्यूब वापरकर्त्यांच्या तोंडपाठ झालं होतं.
२०११मध्ये अॅडेल सायमन कोनेस्की या समाजसेवी संस्थाचालकाच्या प्रेमात पडली. गर्भवती राहिल्यानंतर तिने तीन वर्षं गाण्यातून ब्रेक घेऊन संपूर्ण वेळ बाळासाठी देण्याचं ठरवलं. त्या काळात तिच्या वाढलेल्या वजनावरून तिच्यावर बरीच टीकाही झाली. पण तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.
नोव्हेंबर २०१५मध्ये ‘ट्वेंटीफाइव्ह’ हा तिचा तिसरा अल्बम प्रकाशित झाला. ‘हॅलो’ हे त्यातील पहिलं गाणं २२ ऑक्टोबर रोजी यू-ट्यूबवर आलं. पुढच्या २४ तासांत ते २७० लाख लोकांनी ऐकलं. पहिल्या आठवड्यात या अल्बमच्या ८,००,००० इतक्या रेकॉर्ड विकल्या गेल्या. अमेरिकेत ३० लाखांहून अधिक विक्री झाली.
२०१३ साली आलेल्या ‘स्कायफॉल’ या जेम्स बाँडपटाचं शीर्षकगीतही अॅडेलने गायलं आहे. त्यासाठी तिला अॅकेडमी अॅवार्ड फॉर बेस्ट ओरिजनल साँग हा पुरस्कार मिळाला. आजवरच्या बाँडपटांपैकी हा पुरस्कार मिळवणारं हे केवळ पाचवं गाणं ठरलं.
अॅडेल सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय गायिका आहे. तिचं गाणं भारावून टाकत नाही, पण बांधून टाकतं. ठराविक काळानंतर लोकांना नवीन आवाज लागतो. गायकाचाही लागतो आणि वाद्यांचाही लागतो. हे दोन्हीही अॅडेलकडे आहे. ती स्वत:च गाणी लिहीत असल्याने तिच्या शब्दांत आणि आवाजात वेगळीच जान आहे. तिचा आवाज शकिरासारखा उचंबळून टाकत नाही, तो उन्मादकही नाही. पण तरीही तिची गाणी तरुणांना प्रचंड आवडतात. पुन्हा पुन्हा गुणगुणाविशी वाटतात.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment