अजूनकाही
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला सात महिने उरलेले असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धानं निर्णायक वळण घेतलं आहे. योगी जर असेच अडून बसले तर मोदींची चांगलीच पंचाईत होणार आहे. देशाच्या राजकारणात मोदी यांना आव्हान देऊ शकणारा नेता सध्या तरी दृष्टीपथात नाही. या पार्श्वभूमीवर योगी यांनी मोदी यांना दिलेलं आव्हान किती टिकतं, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
येणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. २०१४च्या निवडणुकीत भाजपने त्यापैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. २०१९च्या निवडणुकीत हा आकडा ६२वर घसरला.
उत्तर प्रदेशात सध्या परिस्थिती भाजपला २०१४सारखी अनुकूल नाही. करोनाच्या दुसर्या लाटेचा फार मोठा फटका या राज्याला बसला आहे. दुसऱ्या लाटेत देशातले सर्वाधिक बळी उत्तर प्रदेशामधील आहेत. गंगेच्या पात्रातून वाहणारी करोनाबळींची असंख्य शवं, हा केवळ उत्तर प्रदेश किंवा देशच नाही, तर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय झाला होता. त्यात भारताची पुरेशी बदनामी झाली.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हाही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपसाठी एक अडचणीचा प्रमुख मुद्दा असेल. या आंदोलनात उत्तर प्रदेशातील शेतकरी सहभागी झालेले आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारच्या अख्यत्यारित असल्या तरी त्या संदर्भात योगी मुख्यमंत्री म्हणून ‘गाव जले, हनुमान बाहर’ या वृत्तीने वागल्याचा राग उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मनात आहे.
या पूर्वी कधी कायदा आणि सुव्यस्थेच्या आघाडीवर उत्तर प्रदेश राज्य कधीही शांत राहिलेलं नाही. या राज्यात सामाजिक शांतता ढळेल, अशा घटना सतत कुठे ना कुठे सुरू असतात. याशिवाय नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर समाजवादी पार्टीनं मजबूत आघाडी मिळवली आहे. अशा अनेक आव्हानांना येत्या निवडणुकीत तोंड द्यावं लागणार असतानाच योगी एखाद्या हट्टी योग्यासारखे वागत आहेत. थेट केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका राजकीय वर्तुळासह परिवारालाही चक्रावून टाकणारी आहे.
योगी यांच्या हट्टी भूमिकेमुळे उत्तर प्रदेशात प्रमाण शब्द मोदी-शहा यांचा, परिवाराचा का योगी यांचा, अशी परिस्थिती सध्या तरी आहे. परिवाराच्या पाठिंब्यावर मोदी यांना पर्याय म्हणून उभे राहत असल्याचं योगी यांनी तूर्तास तरी भासवलं आहे. ते खरं की खोटं, हे लवकरच दिसेल. पण त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या भाजपमध्ये ‘ऑल वेल’ नाही, असा संदेश गेलेला आहे. म्हणूनच कदाचित बहुधा संघपरिवारातील अनेकांनी उत्तर प्रदेशात धाव घेऊन योगी यांच्याशी चर्चा केलेली आहे. या चर्चेनंतरच उत्तर प्रदेशात अरविंदकुमार शर्मा प्रकरण घडलं.
शर्मा हे माजी सनदी अधिकारी. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या खास मर्जीतील नोकरशहांची जी टीम होती, त्यात एक शर्माही होते. पुढे मोदी त्यांना दिल्लीला घेऊन गेले. उत्तर प्रदेशातील सरकार आणि प्रशासनाला ‘वळण’ लागावं, शिवाय तेथील प्रशासन पुरेसं कार्यक्षम व्हावं, यासाठी शर्मा यांना निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशात उपमुख्यमंत्रीपद द्यावं, असा प्रस्ताव मोदी-शहा यांनी दिला असल्याचं सांगण्यात येतं. त्यासाठी त्यांनी नवी दिल्लीत योगी यांच्याशी प्रदीर्घ काळ सल्ला मसलतही केली.
सनदी सेवेचा राजीनामा देऊन शर्मा लखनौला डेरेदाखल झाले, पण त्यांच्या पदरात उपमुख्यमंत्रीपद नव्हे, तर पक्षाच्या प्रदेश शाखेचं उपाध्यक्षपद योगी यांनी सोपवलं. शर्मा यांना पाठवण्यामागे सरकार आणि प्रशासनावर अप्रत्यक्षपणे मोदी-शहा यांचा अंमल थेट निर्माण करणं आहे आणि त्यातून आपल्याला शह दिला जाणार आहे, हे ओळखून योगी यांनी त्यांचं वर्चस्व तूर्तास तरी अमान्य केलं आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘कडव्या आणि हिंस्त्र हिंदुत्ववादाचा (आणि मोदी यांच्यासाठी) पर्याय योगी आदित्यनाथ आहे, अशी कुजबूज मोहीम परिवारात कधीचीच सुरू झालेली आहे. ५ जून १९७२ रोजी जन्मलेले योगी आदित्यनाथ नाथपंथीय आहेत. ‘कट्टर हिंदुत्वावादी’ अशी त्यांची प्रतिमा आहे आणि त्याच प्रतिमेच्या आधारे मुख्यमंत्री होण्याआधी १९९८पासून सलग पाच वेळा लोकसभेवर विजयी झालेले आहेत. योगी गोरखपूरच्या गोरखनाथ मठाचे महंत असून ‘हिंदू युवा वाहिनी’ या कडव्या संघटनेमागे त्यांचीच प्रेरणा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकी भाजपने बंपर यश (म्हणजे विधानसभेच्या ४०३ पैकी ३१२ जागा) मिळवल्यावर परिवाराकडून अचानकपणे मुख्यमंत्रीपदासाठी योगी यांचं नाव समोर आलं आणि इतर सर्वांना मागे टाकत त्यांनी मुख्यमंत्रीपद पटकावलंही.
तेव्हापासूनच ‘योगी विरुद्ध मोदी’ असं शीतयुद्ध सुरू आहे. त्यांचा कारभार नोकरशाही केंद्रित आणि कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा आहे. उत्तर प्रदेश सरकार म्हणजे ‘सबकुछ योगी’ अशी परिस्थिती आहे. ‘सरकारी कामकाज करत असतानाही भगवी वस्त्र घालणारा योगी’ असं कौतुक हिंदुत्ववाद्यांना आहे, मात्र त्यांच्या कारभारावर पक्षाचे विधानसभेतले २००वर सदस्य नाराज असल्याचा मोदी समर्थकांचा दावा आहे. कारण गेल्या निवडणुकीतील विजय अमित शहा यांनी प्रदीर्घ काल राबवलेली रणनीती आणि मोदी यांचा करिष्मा, यामुळेच मिळालेला आहे, अशी त्यांची पक्की धारणा आहे. आणि शीतयुद्धामागे हाही एक मुद्दा आहे.
शिवाय जतिन प्रसाद यांना भाजपमध्ये ओढून आणि नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारत झुकतं माप देऊन मोदी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे, असं मोदी समर्थकांचं म्हणणं आहे. म्हणूनच येणारी विधानसभा निवडणूक मोदी यांच्या नावावरच लढवली जावी, अशी मोदी-शहा-नड्डा यांची इच्छा आहे.
मोदी गुजरातचे असले तरी २०१४ आणि १९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशातून विजयी झालेले आहेत. गेल्या दोन्हीही लोकसभा आणि २०१४नंतर देशात झालेल्या सर्व विधानसभा निवडणुका मोदी यांच्या नावावरच लढवल्या गेल्या आणि त्या सर्व निवडणुकांचे सूत्रधार अमित शहा होते. मात्र निवडणुकीच्या राजकारणात मोदी-शहा यांच्या वर्चस्वाला प्रथमच आव्हान देण्याचा प्रयत्न एखाद्या विरोधी पक्ष नेत्याकडून नव्हे तर भाजपच्याच योगी आदित्यनाथ यांच्याकडून होत आहे, हे उल्लेखनीय आहे.
मोदी-योगी तणाव कसा निवळतो, यावरच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचं भवितव्य अवलंबून आहे. पश्चिम बंगाल गमावल्यावर भाजपसाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि या राज्यात जर सपाटून मार पडला तर लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, याची जाणीव भाजपला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सध्याच्या घटकेला समाजवादी पार्टी विधानसभा निवडणुकीत लढत देईल, अशी स्थिती आहे. तरी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळे लढणार असल्याने यशाची भाजपला आशा वाटत असतानाच मोदी-योगी शीतयुद्ध टिपेला पोहोचलं आहे.
मात्र सध्याच्या घटकेला तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हट्टी योग्यासारखे वागत आहेत आणि हीच भाजपसमोरची मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. त्यांचा हट्ट मोदी-शहा कसा मोडून काढतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment