गुलाबाला ‘गुलाब’ म्हटलं काय किंवा ‘काटेकोरांटी’ वा ‘कोबी’ म्हटलं काय, त्याचा सुगंध बदलत नाही. पण माणसांच्या बाबतीत मात्र असं सहसा होत नाही! (पूर्वार्ध)
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 09 July 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध Doctrine of Coverture ऑनमॅस्टिक्स Onomastics ऑर्थोनिम Anthroponym Orthonym स्युडोनिम Pseudonym

शब्दांचे वेध : पुष्प चाळिसावे

आजचे शब्द : Doctrine of Coverture, Onomastics, Anthroponym, Orthonym आणि Pseudonym

“What's in a name? That which we call a rose By any other name would smell as sweet.”

विल्यम शेक्सपिअरच्या रोमिओ अँड ज्युलिएट या प्रसिद्ध नाटकाच्या (दुसऱ्या अंकाच्या दुसऱ्या प्रवेशातलं) हे वाक्य ज्याला निदान ऐकून तरी माहीत नाही, अशी व्यक्ती विरळाच! या वाक्यात नाटककारानं एक चिरंतन सत्य शब्दबद्ध केलं आहे.

तसं पाहिलं तर हे खरंच आहे. गुलाबाला ‘गुलाब’ म्हटलं काय किंवा ‘काटेकोरांटी’ वा ‘कोबी’ म्हटलं काय, त्यामुळे त्याच्या फुलाचा सुगंध बदलणार नाही. वाघाला ज्या कोणी अगदी सर्वप्रथम ‘वाघ’ असं नाव दिलं होतं, त्यानं त्याऐवजी ‘बकरी’ हा शब्द वापरला असता आणि बकरीला ‘वाघ’ म्हटलं असतं तरी चाललं असतं, नाही का? त्या दोघांना त्यानं काही फरक पडला नसता!

पण माणसांच्या बाबतीत मात्र असं सहसा होत नाही. रोमिओला एकवेळ आपलं नाव बदललं गेलं तरी काही हरकत नव्हती (कारण तो म्हणतो- Call me but love, and I'll be new baptized; Henceforth I never will be Romeo), पण शंभरातल्या एखाद-दुसऱ्या माणसालाच हे इतक्या सहजतेनं मान्य होईल. बारशाच्या वेळी आपल्याला जे नाव देण्यात येतं (ज्याला व्यावहारिक नाम किंवा इंग्रजीत क्रिश्चन नेम, given name, असं म्हणतात), ते मरेपर्यंत सावलीप्रमाणे आपली सोबत करतं. अगदीच काही खास कारण नसेल तर लोक आपली नावं बदलत नाहीत. कारण लहानपणापासून आपण आपल्या नावावर प्रेम करायला शिकतो. आपलं नाव हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून गेलेलं असतं. ती आपली ‘पहछान’ असते. त्यातही तुमचं नाव जर काही तरी जगावेगळं किंवा अगदी युनिक म्हणजे एकमेवाद्वितीय असेल तर बघायलाच नको. एकाच नावाची अनेक माणसं असतात. त्यातल्या एकाला दुसऱ्यापासून वेगळं करायला वडिलांचं नाव, आडनाव यांसारख्या अन्य पर्यायांचा उपयोग करावा लागतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आडनाव किंवा फॅमिली नेमची प्रथा तशी अगदी प्राचीन नाही. गेल्या सात-आठशे वर्षांत तिचा उगम झाला आणि इंग्रजांच्या प्रभावामुळे ती आपल्याकडेही रूढ झाली. उत्तर आणि दक्षिण भारतातल्या अनेक समाजांत तर आजही आडनावं वापरलं जात नाही. जुन्या काळात एखाद्याचं स्वतःचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि शेवटी त्याची धंदा, जात, किंवा कधी तर धर्मसुद्धा नमूद करून त्याची ओळख पटवली जात असे. जेव्हा माणसांची गर्दी वाढली आणि शहरीकरण वेगानं होऊ लागलं, तेव्हा मात्र आडनावांचं महत्त्व लोकांना कळलं!

एका जमान्यात मराठी लोकांमध्ये मुलांना ‘दगडू’, ‘धोंडू’ अशीही नावं देण्याची पद्धत होती. त्यामुळे मुलाचं आयुष्य वाढतं असा समज होता. (आता तुम्ही तो विचारही करू शकत नाही, हे वेगळं!) पण यातल्या एखाद्या दगडूला आपल्या नावाचा अगदीच कंटाळा किंवा राग असला तरच तो ते बदलेल, अन्यथा ते तसंच कायम ठेवेल. ‘हागरू’ नावाचा एक इसम माझ्या मित्राच्या कारखान्यात कामाला होता. आपलं असं नाव ठेवलं म्हणून त्यानं आई-वडिलांवर राग धरला आणि नंतर ते नाव बदललं असतं, तर मी ते समजू शकलो असतो. (त्यानं तसं केलं नाही, हे सोडा!) पण ज्योतिष्यानं सांगितलं म्हणून भाग्योदयाच्या मोहानं किंवा खऱ्या नावाला ‘विक्रीमूल्य’ नाही म्हणून आपलं नाव बदलणारे किंवा स्पेलिंग बदलणारेही अनेक लोक आहेत. हॉलिवुड आणि बॉलिवुड सिनेजगतात अशी शेकडो उदाहरणं सापडतात. मधुबाला, मीनाकुमारी, संजीकुमारपासून तो अगदी परवा मरण पावलेल्या दिलीपकुमारपर्यंत कितीतरी अशी नावं आपल्या परिचयाची असतात.

लग्नानंतर विवाहित स्त्रीचं आडनाव बदलतं. जगातल्या बहुतेक सर्व समाजांमध्ये विवाहानंतर महिलेनं पतीचं आडनाव धारण करण्याची पद्धत आहे. लग्नानंतर स्त्रीचं अस्तित्व हे नवऱ्याच्या अस्तित्वात विलीन होतं, या (गैर)समजाच्या आधारावर हे असं पूर्वापार चालत आलेलं आहे. इंग्लिश समाजात (यात स्कॉटिश समाज येत नाही!) हा समज तिथं पूर्वापार चालत आलेल्या ‘कॉमन लॉ’ (न्यायालयांच्या जुन्या निवाड्यांवर किंवा पायंड्यांवर आधारित असलेली आणि त्यातून विकसित झालेली न्यायप्रणाली) नुसार प्रस्थापित झाला. यालाच ‘Doctrine of Coverture’ (किंवा couverture) म्हणतात. Coverture म्हणजे ‘covered by’ किंवा ‘झाकोळून जाणं, झाकलं जाणं’. त्यानुसार लग्नानंतर नवरा आणि बायको यांचं द्वैत संपून एक अद्वैत असं कायदेशीर एकक तयार होतं आणि त्यामुळे पत्नीला वेगळं अस्तित्व राहत नाही.

लग्नापूर्वीचे तिचे सर्व अधिकार, हक्क आणि तिच्यावर असलेल्या कायदेशीर जबाबदाऱ्या तिच्या पतीच्या अधिकारांत आणि जबाबदाऱ्यांत सामावल्या जातात. यात तिचं माहेरचं नावदेखील येत असे. (याच तरतुदीचा एक वेगळाच फायदा तेव्हाच्या नवऱ्यांना मिळत असे. तो असा की, कोणत्याही न्यायालयीन खटल्यात पती जर आरोपी/प्रतीवादी असला तर त्याची बायको त्याच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देऊ शकत नव्हती. कारण पती-पत्नी जर एकक असतील, तर पत्नीनं पतीविरुद्ध साक्ष देणं म्हणजे स्वतःविरुद्धच साक्ष देण्यासारखं!) त्या वेळच्या विवाहित स्त्रियांना ‘feme covert’ असं कायदेशीर नाव होतं.

याउलट, अविवाहित स्त्री (जिला ‘feme sole’ असं म्हणत) मात्र स्वतःचं नाव वापरू शकत असे, स्थावर वा जंगम मालमत्ता विकत घेऊ शकत असे, आणि करारमदारसुद्धा करण्याची तिला मुभा होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र स्त्रियांच्या वाढत्या विरोधापुढे झुकून या ‘Doctrine of Coverture’मध्ये तिथल्या संसदेनं खूप बदल केले आणि आता तर ते पूर्णपणे मोडीस निघालं आहे.

आपल्या मराठी लोकांमध्ये तर बायकोचं नुसतं आडनावच नाही, तर पहिलं (म्हणजे माहेरी मिळालेलं) नावदेखील बदलण्याची रीत होती. यामागे पुरुषप्रधान संस्कृती आणि सासरच्यांचा अहंकार ही कारणं होती. त्या विवाहित स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व, तिची वेगळी व्यक्ती म्हणून ओळख मिटवून टाकण्याचा कुटिल डाव यामागे होता. आता ही कुप्रथा बंद पडल्यात जमा आहे! अनेक महिला आजकाल ना आपलं पहिलं नाव बदलू देत, ना आडनाव. सुजाण नवरेही आता असा आग्रह धरत नाहीत. माहेरचं आडनाव सासरच्या आडनावाला जोडून दुबार (डबल-बॅरल) आडनावं आजकाल सर्रास तयार होऊ लागली आहेत, ही आनंदाचीच गोष्ट आहे. अर्थात यामुळे अजूनही जुनाट नियमांनुसारच चालणाऱ्या सरकारी किंवा कायदेविषयक प्रक्रियांमध्ये थोडी अडचण किंवा दप्तर-दिरंगाई होऊ शकते; पण कधी तरी हे सरसकट सर्वत्र स्वीकारलं जाईल, यात शंका नाही. हा वैचारिक उत्क्रांतीचा एक भाग आहे.

‘नावात काय आहे?’ याप्रमाणेच ‘नावात काय नाही?’ असाही उलट प्रश्न कधी कधी पडू शकतो. ‘नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा’ अशी आपल्याकडे म्हणच आहे! नावाच्या अर्थाशी विसंगत वर्तन करणाऱ्याला किंवा ज्याचा जीवनप्रवास नावाच्या अर्थाच्या विरुद्ध चालला आहे, त्याला उद्देशून हे शब्द वापरतात. शितावरून भाताची परीक्षा करता येते, तशी एखाद्याच्या नावावरून त्याची स्वभावपरीक्षा होऊ शकते का? पी. जी. वुडहाऊसच्या मते हे शक्य आहे. (अर्थात तो इंग्रजी नावांविषयी बोलत होता आणि तेही विनोदानं.) तो म्हणतो- “No good can come of association with anything labelled Gwladys or Ysobel or Ethyl or Mabelle or Kathryn. But particularly Gwladys.” (Very Good, Jeeves). यातला विनोदाचा भाग सोडला तरी हे सार्वत्रिक सत्य नक्कीच नाही. आपल्याकडच्या नावांमध्ये आणि पाश्चात्य नावांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. आपण जसं बोलतो, तसंच लिहितो आणि वाचतो. त्यांच्याकडे नावाचा उच्चार आणि त्याचं स्पेलिंग यांचा जवळपास संबंध नसतो. त्यामुळे ते ‘ग्लॅडिस’ला ‘Gwladys’ किंवा ‘Gladys’ असं लिहू शकतात. आपला ‘राम’ मात्र ‘राम’च राहतो आणि ‘कावेरी’ हीसुद्धा ‘कावेरी’च राहते. इंग्रजी पद्धतीनुसार ‘Rama’ किंवा ‘Cauveri’ असं लिहिलं तरी कोणताही भारतीय माणूस त्यांचा उच्चार ‘राम’ आणि ‘कावेरी’ असाच करतो!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या नावांची काही एखादी स्वतंत्र भाषा असू शकते का? एका भाषेतले नामविषयक नियम दुसऱ्या भाषेत तंतोतंत तसेच्या तसे लागू केले जाऊ शकतात का? मुळात असे काही नियम असतात का? एखाद्या नावाचा मूळ अर्थ सोडला तर त्यातून आणखी काही अभिप्रेत होतं का? नाव म्हणजे काय, ते का दिलं जातं, त्यातून काय अभिव्यक्त होतं, नावांची लोकप्रियता आणि लोकप्रियतेत घट, या आणि अशा अनेक प्रश्नांचा समाजशास्त्रीय नजरेतून अभ्यास करणारं एक वेगळं शास्त्र आहे. त्याला ‘onomastics’ किंवा ‘onomatology’ (ओ/ऑनमॅस्टिक्स किंवा ओ/ऑनमॅटॉलॉजी) असं नाव आहे. ग्रीक भाषेत ‘ónoma’ (ὄνομα) म्हणजे नाम/नाव. त्यापासून ‘onomastikós’ (ὀνομαστικός) असा शब्द तयार झाला. त्याचा अर्थ- नामविषयक किंवा नामाशी संबंधित. आणि त्यातूनच ‘onomastics’ हा शब्द बनला.

‘Onomastics’ हे शास्त्र फक्त वैयक्तिक (व्यक्तीवाचक) नावांचा अभ्यास करण्यासाठी आहे, असं नाही. सर्व वस्तूंना अथवा जागांना दिलेल्या नावांचाही त्यात अभ्यास केला जातो. यापैकी जागांना दिलेल्या किंवा भौगोलिक नावांना  ‘toponyms’ असं म्हणतात, हे मागच्या एका लेखात सांगितलंच आहे.

वैयक्तिक (personal) नावांना ‘anthroponyms’ अशी संज्ञा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या पहिल्या नावाला ‘दिलेलं नाव’ (given name), तर शेवटच्या नावाला ‘आडनाव’ (surname, family name) असं म्हणतात. ही सर्व विशेषनामं असतात. यांना इंग्रजीत ‘proper names’ असं म्हणतात. ज्या कोणत्याही विशेषनामाचा ‘onomastics’द्वारे अभ्यास करायचा आहे, त्याला ‘ऑर्थोनिम’ (orthonym) असं म्हटलं जातं. Ortho म्हणजे सरळ किंवा यथायोग्य. एखाद्या संकल्पनेसाठी एखाद्या भाषेत जे योग्य नाम वापरलं जातं, ते orthonym.

याचा आणखी एक अर्थ आहे. एखाद्या टोपणनावामागे दडलेल्या व्यक्तीचं खरं नाव हे ‘ऑर्थोनिम’ असतं. कवी ग्रेस किंवा कवी कुसुमाग्रजांच्या कविता वाचल्यावर यांची खरी नावं काय असतील हा प्रश्न समजा एखाद्या नवख्या वाचकाला पडला, तर तो ती शोधून काढतो. मग त्याला कळतं की, ग्रेसचं ऑर्थोनिम ‘माणिक गोडघाटे’ आणि कुसुमाग्रजांचं ऑर्थोनिम ‘वि. वा. शिरवाडकर’ असं होतं. अनेकदा ही खरी नावं मागे पडतात किंवा अगदी विस्मृतीत जातात. लोकांच्या लक्षात राहतात ती त्यांची टोपणनावं. यांना इंग्रजीत ‘स्युडोनिम’ (pseudonym) असा शब्द आहे. स्युडो म्हणजे खोटं, कृतक. मुद्दाम धारण केलेली ‘assumed’ नावं म्हणजे ‘pseudonym’.

आपलं खरं नाव लपवून दुसरं एखादं नाव धारण करून त्या चेहऱ्यानं जगासमोर येण्याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे आपला खरा चेहरा लोकांना दिसू नये, आपली खरी ओळख लोकांना पटू नये, असं काहींना वाटू शकतं. यात प्रसिद्धीची हाव नसलेले, लोकेषणा पसंत नसलेले, अज्ञात राहण्यात ज्यांना आनंद मिळतो, असे लोक येतात. किंवा काही लोक हौस म्हणून, गंमत म्हणूनही हा प्रयोग करून बघतात. त्यांना अभिव्यक्त व्हायचं तर असतं, पण खऱ्या नावाला प्रसिद्धी नको असते. लेखक जेव्हा या मार्गानं जातात, तेव्हा ते जे टोपणनाव घेतात, त्याला ‘पेन नेम’ (nom de plume, लेखणीचं नाव) असं म्हणतात. दुसरं म्हणजे राजकीय किंवा लष्करी कारणांसाठी ज्यांना अज्ञात राहून काम करायचं असतं, असे लोक आपली खरी ओळख लपवायला टोपणनावं धारण करतात. या प्रकारात जगभरातल्या क्रांतिकारी, सरकारविरोधी लढणारे बंडखोर, अशा लोकांचा समावेश होतो. हे लोक भूमिगत राहून आपलं काम करतात. सरकार दरबारी, पोलिसांच्या अहवाली त्यांची एकच ओळख असते- ती म्हणजे ही व्यक्ती

सरकारविरोधी आहे, अवांछनीय आहे. तिच्याबद्दल त्यांच्याकडे तोकडी माहिती असते. त्या व्यक्तीनं स्वतःला ज्या खोट्या नावाच्या बुरख्याखाली लपवून ठेवलं असतं, तेच फक्त सरकारी यंत्रणांना आणि क्वचित प्रसंगी इतरांनाही माहीत असतं.

या अशा प्रकारच्या ‘pseudonym’ ला ‘nom de guerre’ किंवा ‘नोम द गेआ/गेर’ (युद्धनाम)असं म्हटलं जातं. फ्रेंच भाषेत ‘guerre’ म्हणजे युद्ध. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला तिथल्या सामान्य सैनिकांना त्यांची एक विशिष्ट ओळख किंवा खूण म्हणून एखादं खोटं नाव धारण करावं लागत होतं. (अधिकारी लोक मात्र असं करत नसत.) यातूनच पुढे ही कल्पना जगभर पसरली. जगातल्या अनेक क्रांतिकारी नेत्यांनी अशी ‘युद्धनामं’ स्वतःला लावून घेतली होती आणि नंतर ती इतकी प्रसिद्ध झाली की, आज आपण त्यांना त्यांच्या खऱ्या नावांऐवजी त्यांच्या या टोपणनावांनीच जास्त ओळखतो. Vladimir Ilyich Ulyanov या माणसाचं युद्धनाम ‘लेनिन’ होतं. Lev Davidovich Bronsteinचा ‘लिऑन ट्रॉट्स्की’, Golda Mabovitchची ‘गोल्डा मायर’ आणि Josip Brozचा ‘टिटो’ असाच झाला. Saloth Sârचा ‘पोल पॉट’ झाला तोही असाच!

थोडक्यात, चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कामांसाठी लोक ‘स्युडोनिम्स’चा उपयोग करतात.

जेव्हा एखाद्याची खरी आणि खोटी अशी दोन्ही नावं लोकांना माहीत असतात, तेव्हा ‘एलिअस’ (alias) किंवा ‘उर्फ’ या शब्दाचा वापर करून त्याची दुहेरी ओळख करून दिली जाते. अमेरिकन लोक यासाठी ‘Also known As’ (AKA) असाही शब्दप्रयोग करतात. Mr Manik Godghate alias (किंवा AKA) Grace was a famous Marathi poet.

टोपण नावांइतकीच ‘उपनामं’ (cognomen) आणि ‘लाडाची नावं’ (pet names)सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जगभर वापरली जातात. बंगालीतल्या ‘डाक नाम’ आणि जपानमधल्या ‘बुगो’ (Bugō) नावांच्या वेगळ्याच कहाण्या आहेत. त्या वाचू या पुढच्या भागात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आजची पस्तुरी किंवा lagniappe.

आजची पस्तुरी एखाद्या शब्दाची नसून अजिबोगरीब नावांवरून तयार झालेल्या हजारो किस्स्यांपैकी एक आहे.

जॉर्ज एडवर्ड फोरमन नावाचा एक प्रसिद्ध अमेरिकन मुष्टीयोद्धा आहे. त्यानं पाच लग्नं केली. त्यातून त्याला एकूण बारा अपत्यं झाली- पाच मुलं, सात मुली. या जॉर्जचं स्वतःवर आणि त्याहीपेक्षा स्वतःच्या नावावर एवढं जास्त प्रेम आहे की, त्यानं आपल्या पाचही मुलांची नावं ‘जॉर्ज एडवर्ड फोरमन’ अशीच ठेवली. पहिल्याला तो ‘जॉर्ज ज्युनिअर’ म्हणतो,  दुसऱ्याला ‘जॉर्ज तिसरा’ (किंवा मंक), तिसऱ्याला ‘जॉर्ज चवथा’ (किंवा बिग व्हील), चवथ्याला ‘जॉर्ज पाचवा’ (किंवा रेड), आणि पाचव्याला ‘जॉर्ज सहावा’ (किंवा लिटल जोई). त्याच्या मुलांनाही बापाचा फारच लळा असला पाहिजे. कारण यातल्या एकानंही आपलं नाव बदललेलं नाही. आपल्याकडे यासारखं एखादं उदाहरण असल्यास निदान मला तरी ते ठाऊक नाही!

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......