पुण्यातील ख्रिस्ती धर्मीयांची ऐतिहासिक, वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक प्रार्थनास्थळे
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • पंच हौद चर्च टॉवर, महाबळेश्वर येथील चर्च, सेंट पॅट्रिक कॅथेड्रल, सिटी चर्च आणि सेंट क्रिस्पिन्स होम
  • Tue , 06 July 2021
  • पडघम सांस्कृतिक चर्च धर्मगुरू पंच हौद चर्च Panch haud Church सेंट पॅट्रिक कॅथेड्रल St Patrick's Cathedral सिटी चर्च City Church सेंट क्रिस्पिन्स होम Crispin's Home

काही वर्षांपूर्वी पुण्यात कर्वे रोडवरच्या नळस्टॉपशेजारी भल्या पहाटे एका झाडावर बिबट्या दिसला. काही मिनिटांतच शहरभर ती बातमी पसरली. मराठी वृत्तवाहिन्यांचे त्या काळात नव्यानेच आगमन झाले होते. दोन-तीन तासांच्या धावपळीनंतर तो बिबट्या पकडण्यात आला. नंतर ज्या जागेत या जंगलातील पाहुण्याने ठाण मांडले होते, ते सेंट क्रिस्पिन होम एकदम प्रकाशझोतात आले. एक वाघ गुहेत गेल्याने त्याच्या मागोव्यावर गेलेल्या एका परदेशी व्यक्तीमुळे औरंगाबादजवळच्या अतीप्राचीन लेण्यांचा शोध लागला, असे म्हणतात. येथेही जवळपास तसेच झाले असे म्हणता येईल! त्या बिबट्यामुळे दीडशे वर्षे जुने असलेले एक छोटेसेच, पण आपल्या खास वास्तुशास्त्रीय शैलीमुळे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ‘सेंट क्रिस्पिन होम चर्च’ची पुणेकरांना माहिती झाली! 

अशी आपला वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय वारसा जपणारी दीड-दोनशे वर्षांची अनेक चर्चेस पुण्यात आहेत. पुणे कॅम्प, खडकी कॅम्प आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या जवळपासच्या परिसरांत काळ्या पाषाणांनी बांधलेली, गॉथिक बांधकाम शैलीतली ही चर्चेस इतिहासाच्या खुणा जपून आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पुणे शहरात आयुष्य घालवलेल्या अनेकांना मात्र आपल्या अवतीभोवती असलेल्या या चर्चेसबद्दल माहितीही नसते. पुणे हे एके काळी पेन्शनरांचे, दुचाकींचे आणि मारुतीच्या व गणपतींच्या देवळांचे शहर म्हणून ओळखले जात असे. तसेच पुणे हे ख्रिस्ती देवळांचेही म्हणजे चर्चेसचे शहर आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.  

या शहरातील चर्चेसच्या इतिहासाचा आढावा घेतल्यास अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे येतात. पुण्यात पेशव्यांच्या सैन्यात, तसेच इतर मराठा सरदारांच्या सैन्यात गोव्यातील, तसेच मूळचे पोर्तुगीज असलेले ख्रिस्ती अधिकारी आणि सैनिक होते. त्यांच्या आध्यात्मिक आणि धार्मिक गरजा पुरवण्यासाठी शांतीच्या आणि युद्धाच्या काळात चर्चकडून खास धर्मगुरू मागवला जाई. त्याला ‘चॅप्लेन’ असे म्हणतात. (या परंपरेचाच भाग म्हणून आजही भारतीय सैन्यातही विविध धर्मांच्या धर्मगुरूंना विशिष्ट सेवेसाठी मानधन देऊन नेमले जाते!) 

त्याशिवाय ब्रिटिश सैन्यातील कॅथोलिक व प्रोटेस्टंट पंथीय सैनिक आणि अधिकाऱ्यांना प्रार्थना, बाप्तिस्मा, लग्न यांसारख्या सांक्रामेंतांसाठी चर्च आवश्यक असायचे. त्यामुळे चर्च बांधण्यासाठी राजसत्तेकडून जागा आणि आर्थिक मदतही देण्यात आली. त्यातून ही प्रार्थनामंदिरे उभी राहिली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट पंथियांची ऐंशीहून अधिक मुख्य चर्चेस आहेत. त्याशिवाय विविध पंथांची अलीकडच्या काळातली अनेक छोटी-मोठी चर्चेस आहेत ती वेगळी. पुण्यात क्वार्टरगेटपाशी असलेले इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च किंवा सिटी चर्च हे शहरातील आणि अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत जुने चर्च.

१७९०च्या सुमारास गोवा आर्चबिशपांनी पेशव्यांच्या सैन्यात असलेल्या गोवन कॅथॉलिक सैनिकांसाठी पुण्याला फादर व्हिन्सेंट ज्योकिम मिनिझेस हा धर्मगुरू पाठवला. १७९२ साली नाना पेठेत बांधलेल्या छोट्या चर्चसाठी पेशवे माधवराव दुसरे यांनी जागा दिली होती. सुरुवातीचे मातीच्या बांधकामाचे हे चर्च पाडून १८५२मध्ये आता वापरत असलेले नवे चर्च बांधण्यात आले. असे म्हणतात की, येथे पुणे शहराचे एक प्रवेशद्वार (क्वार्टर गेट) होते आणि शहराच्या या भागात असलेले हे इमॅक्युलेट कन्स्पेशन चर्च (निष्कलंक गर्भसंभव चर्च) नंतर सिटी चर्च या सुटसुटीत नावानेही ओळखले जाऊ लागले.

त्याची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे गोव्यात स्थायिक झालेल्या गोंयेंकार लोकांचे चर्च म्हणूनही ते ओळखले जाते. त्याच्या जवळच असलेल्या कब्रस्थानातील कुटुंबांच्या पिढीजात कबरी (फॅमिली ग्रेव्ह) आणि तिथल्या कृसांवरील मृतांच्या नावांकडे सहज एक नजर टाकली तरी ते लक्षात येते. एकाच कबरीमध्ये म्हणजे फॅमिली ग्रेव्हमध्ये काही वर्षांनंतर त्या कुटुंबातील इतर मृत व्यक्तींना म्हणजे पत्नी, पती, मुले वगैरेंना पुरले जाते. पुणे डायोसिसची १८८६ साली स्थापना झाल्यानंतरही पुण्यातील हे सिटी चर्च १९५३पर्यंत पोर्तुगीज इंडिया किंवा ‘इस्टाडो डा इंडिया’मधील गोवा आर्चडायोसिसच्या अंमलाखाली  होते!  

पुणे कॅम्पातील सोलापूर रोडवरील सेंट मेरीज चर्चचे १८२५मध्ये उद्‌घाटन झाले. त्यामुळे शहरातील ही सर्वांत जुनी चर्चची वास्तू ठरते. सिटी चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पंचहौद चर्च आणि खडकी येथील सेंट इग्नेशिअस चर्च यांचा पुण्यातील सर्वांत जुनी ख्रिस्ती देवळांमध्ये समावेश होतो. 

पुणे शहराचा ‘शून्य मैलाचा दगड’ किंवा ‘झिरो माईलस्टोन’ असणारे ब्रिटिशकालीन स्मारक जनरल पोस्ट ऑफिसशेजारी आहे. जवळच पुणे पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. या जीपीओच्या मागेच गोलाकार आकाराचे १८६७ साली काळ्या पाषाणातून उभे राहिलेले सेंट पॉल चर्च आहे. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी शेजारी असलेल्या सेंट मॅथ्यूज मराठी चर्चचा पायाभरणी समारंभ १८९३मध्ये झाला. दगडी बांधकाम असलेली ही सव्वाशे वर्षांची वास्तू अजूनही सुस्थितीत आहे.

पुणे शहरातील सनातनी आणि सुधारक मंडळींमध्ये समावेश असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती म. गो. रानडे, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे वगैरेंनी १४ ऑक्टोबर १८९० रोजी सेंट मेरीज कॉन्व्हेंट, पंचहौद चर्च येथे झालेल्या बैठकीत चहा-बिस्किटांचा आस्वाद घेतल्याचा आरोप झाला. त्यामुळे चौकशीसाठी शंकराचार्यांतर्फे ‘ग्रामण्य कमिशन’ नेमण्यात आले आणि लोकमान्य टिळकांना आपल्या ब्राह्मण ज्ञातीबंधूंचा बहिष्कार टाळण्यासाठी प्रायश्चित घ्यावे लागले होते. गुरुवार पेठेतील १८८५ साली बांधलेले, उंच मनोरा असलेले हे भव्य ‘पवित्र नाम देवालय’ किंवा ‘होली नेम कॅथेड्रल’ एके काळी पुणे शहराची ओळख किंवा स्कायलाईन होते. उंच मनोऱ्यातील लयबद्ध संगीत देणारी भलीमोठी घंटा असलेल्या चर्चने काही वर्षांपूर्वी आपला शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साजरा केला. 

पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटपाशी येशूसंघीय (जेसुईट) धर्मगुरूंनी येथे १८६२ साली  स्थापन केलेल्या सेंट झेव्हिअर्स चर्चने १५९ वर्षे पूर्ण केली आहेत. १९३५ साली सेंट झेव्हिअर्स चर्चचा विस्तार केला. याच काळात प्रख्यात चित्रकार ॲग्नेलो डी फोन्सेका यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्सच्या जीवनावर आधारीत काही चित्रे या चर्चमध्ये काढली. ही चित्रे आजही चांगल्या स्थितीत आहेत. चित्रकार अँजेलो डी फोन्सेका यांचे पुण्यातील शिवाजीनगर येथील ख्रिस्तप्रेम सेवा आश्रमात अनेक वर्षे वास्तव्य होते.  ख्रिस्ती आशयांवरची मात्र भारतीय शैलींतील चित्रे त्यांच्या चित्रांची खास वैशिष्टये. 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे १९४८ साली मतमाऊलीची म्हणजे मारियामातेची यात्रा सुरू करणारे फादर जेराल्ड बादर हे सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्चचे १९४९ ते १९५८ या काळात धर्मगुरू होते. जेसुईट धर्मगुरूंनी या सेंट झेव्हिअर्स चर्चशेजारी सेंट विन्सेंट स्कूलची स्थापना केली. आज या सेंट विन्सेंट स्कूलचा पुण्यातील सर्वांत जुन्या असलेल्या शाळांमध्ये समावेश होतो.

कॅथोलिक चर्चतर्फे नव्या पुणे धर्मप्रांताची १८८६ साली स्थापना करण्यात आली, तेव्हा सेंट झेव्हियर चर्चचे जेसुईट धर्मगुरू असलेल्या बर्नार्ड बाईदर-लिंडेन यांची १८८६ साली पुण्याचे पहिले बिशप म्हणून नियुक्ती झाली होती. सध्याचे बिशप थॉमस डाबरे हे या पुणे धर्मप्रांताचे (डायोसिसचे) सहावे बिशप आहेत.  

१८००च्या सुमारास पुण्यातील वानवडी येथील सरदार शिंदे यांच्या सैन्यातील कॅथोलिक सैनिकांसाठी मुंबईतून धर्मगुरू नेमण्यात येऊ लागला. १८३५ साली वानवडी येथे चॅपेल किंवा छोटे चर्च बांधण्यात आले, ब्रिटिश सरकारने १८५० साली दिलेल्या जागेवर चर्चची उभारणी झाली. हेच ते आताचे सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल, पुणे धर्मप्रांताचे म्हणजे बिशपांचे मुख्यालय. रेस कोर्ससमोर आणि एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डनपाशी असलेले सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल हे पुण्यातील एक सर्वांत जुने, महत्त्वाचे चर्च. अलीकडेच जिर्णोद्धार करण्यात आलेले हे कॅथेड्रल आता अधिकच प्रेक्षणीय बनले आहे.

सोलापूर बाजार रोडवरचे सेंट अँन्स चर्च हे पुण्यातील तसे नव्यानेच म्हणजे १९६३ साली बांधलेले चर्च मात्र अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाहेरून पाहिले तर ती वास्तू ख्रिस्ती प्रार्थनामंदिर आहे, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. याचे कारण म्हणजे हे चर्च दाक्षिणात्य पद्धतीने गोपूर शैलीत बांधलेले आहे. दर्शनी भागात कमळ कोरलेले आहे! कॅथोलिक चर्चमध्ये अर्थातच सांस्कृतिकरणाची अशी कितीतरी उदाहरणे आहेत. 

पुणे हे भारतीय कॅथोलिक चर्चच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्थान आहे. इथे अहमदनगर रोडवर रामवाडी येथे पेपल सेमिनरी आणि डी नोबिली कॉलेज या भावी धर्मगुरूंना प्रशिक्षण देणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था आहेत. तिथल्या भव्य इमारती, चर्चेस आणि कॅम्पस पाहण्यासारखा आहे. पोप जॉन पॉल दुसरे हे पहिल्यांदा १९८६ साली भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी रामवाडी मैदानावर लाखोंच्या उपस्थितीत मिस्साविधी केला होता आणि त्या वेळी पेपल सेमिनरीला भेट दिली होती. 

पुण्यातील चर्चविषयी लिहिताना पुण्याबाहेर असलेल्या मात्र पुण्यातून धार्मिक सेवा पुरवल्या जाणाऱ्या एका वैशिष्ट्यपूर्ण चर्चचाही उल्लेख व्हायला हवा. हे छोटसे, अगदी टुमदार होली क्रॉस चर्च महाबळेश्वर येथे आहे. १८३१ साली बांधलेले पुणे-मुंबई आणि वसई परिसर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील बांधलेले हे पहिलेवहिले चर्च. पावसाळ्यात येथे धोधो पाऊस कोसळत असताना हे चर्च चारपाच महिने ताडपत्री कापडाने पूर्ण आच्छादित असते आणि त्यानंतर वर्षातील पुणे शहरातील एखादे धर्मगुरू दर शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी मिस्साविधी करण्यासाठी पुण्याहून इथे येतात. विक-एंडच्या सुट्टीला येथे येणारे अनेक कॅथोलिक पर्यटक या उपासनाविधीला हजर असतात.             

पुण्यातील ख्रिस्ती समाज बहुभाषिक असल्याने अनेक चर्चेसमध्ये इंग्रजी, मराठी, तमीळ, कोकणी, मल्याळम वगैरे भाषांत उपासनाविधी होतात. काही चर्च मात्र केवळ मराठी भाषक ख्रिस्ती समाजासाठी आहेत आणि तेथील सर्व प्रार्थना, गायन आणि उपासनाविधी केवळ मराठी भाषेतच होतात. 

प्रामुख्याने मराठी भाषकांसाठी असलेल्या शहरातील प्रोटेस्टंट पंथीय चर्चेसमध्ये क्वार्टर गेट नजीकचे क्राईस्ट चर्च, सेंट मॅथ्यूज मराठी चर्च, खडकी येथील सेंट मेरीज चर्च, गुरुवार पेठेतील होली नेम कॅथेड्रल  किंवा पंचहौद चर्च, कसबा पेठेतील ब्रदर देशपांडे चर्च यांचा समावेश होतो.

संपूर्ण पुणे शहरात केवळ घोरपडी येथील सेंट जोसेफ चर्च येथेच तेलगु भाषेत मिस्साविधी होतो. कारण या भागातील बहुसंख्य भाविक तेलगूभाषक आहेत. पुष्कळदा या भाविकांसाठी रविवारच्या उपासनेसाठी शहरातील कुणी तेलगु-भाषक धर्मगुरू ‘प्रतिनियुक्त’ करावा लागतो.  

मूळचे केरळचे असलेल्या मल्याळम भाषक ख्रिस्ती समाजाचे प्रमाण पुण्यात आणि शेजारच्या पिंपरी चिंचवड शहरात लक्षणीय आहे. या समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील त्यांच्या कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चमधील प्रार्थना प्रामुख्याने मातृभाषेत मल्याळममध्येच होतात, तसे इथेही आहे. पुण्यातील मराठी भाषक ख्रिस्ती समाज इतका सुदैवी नाही, कारण येथील सर्वच चर्चमधील उपासनेत आता थोपवणे शक्य नाही इतके इंग्रजी भाषेचे आक्रमण झालेले आहे.   

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एक गोष्ट सांगायलाच हवी. प्रत्येक ख्रिस्ती भाविक (कॅथोलिक वा प्रोटेस्टंट) कुठल्या ना कुठल्या चर्चचा म्हणजे पॅरीश किंवा धर्मग्रामाचा सदस्य असायलाच हवा. ही व्यक्ती शहरातल्या इतर कुठल्याही चर्चला उपासनेसाठी जाऊ शकते, सदस्य नसलेल्या भाविकांना चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येण्यास कुठलीही आडकाठी नसते. मात्र नवजात मुलांचा बाप्तिस्मा, कम्युनियन, लग्नविधी आणि अंत्यविधी यासारखे सप्त स्नानसंस्कार (सांक्रामेंत) यासाठी चर्चकडे नोंदणी आणि नियमितपणे चर्च फी भरणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, मी चिंचवड शहरात राहतो, त्यामुळे मला चिंचवडच्या सेंट फ्रान्सिस झेव्हिअर चर्चचेच सदस्य होता येईल, शेजारच्या पिंपरीतील चर्चचे नाही.   

वास्तूशास्त्र, ऐतिहासिक वारसे, इतिहास किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक असणाऱ्या लोकांनी पुणे शहराच्या विविध भागांत दडून असलेल्या या मूल्यवान ऐतिहासिक स्मृतिस्थळांना भेट द्यायलाच हवी. जगातील कुठलेही ख्रिस्ती प्रार्थनास्थळ म्हणजे चर्च ही ख्रिस्ती भाविकांप्रमाणेच इतरधर्मियांनाही अगदी प्रार्थनेच्या वेळीही खुली असतात. जगभरातल्या ख्रिस्ती मंदिरांत शांतता पाळणे हा एक नियम असतो, त्याचे पालन व्हावे एवढीच किमान अपेक्षा असते. चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी फोटो काढण्याच्या निमित्ताने वा संभाषण करून इतरांना व्यत्यय येणार नाही, एवढी मात्र काळजी घायला हवी.  

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......