अजूनकाही
१. सैन्याने राजकारणापासून लांब राहावे असा सल्ला देताना पाकिस्तानी लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय लोकशाहीचे गुणगान केले. सरकार चालवणे हे सैन्याचे काम नाही, असे सांगत बाजवा यांनी भारतीय लोकशाहीमध्ये राजकारणापासून सैन्याला लांब ठेवण्यात यश कसे आले हे वाचा, असा सल्लाच सैन्यातील अधिकाऱ्यांना दिला.
बाजवा हे मवाळ आणि लोकशाहीवादी आहेत, त्यांच्या विधानांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दिलासा मिळाला आहे, याची खूप कौतुक ऐकायला येत आहेत. ते खरेही असेल. पण, त्यांची ही विधानं म्हणजे लष्करी चाकरी सुटल्यानंतर सक्रीय राजकारणात उतरून लोकशाही मार्गाने देशाची 'सेवा' करण्याचेच पूर्वसंकेत तर नाहीत ना? ते शरीफ यांच्यासाठी अधिक घातक नसेल का?
……………………..……………………..
२. मोदींचं नावच विरोधकांना पुरेसं आहे. काही लोकांना त्यांच्या नावानेच थरकाप होतो. माध्यमांनी आपल्या सभेची दखल घ्यावी यासाठी जाणूनबुजून प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात मोदींचं नाव घेतलं पाहिजे, असं म्हणणारे पक्षप्रमुख आपण पाहिले आहेत. मोदींना नुसतं टीव्हीवर पाहिलं की, ज्यांना दोन ‘ग्लुकॉन-डी’ची जास्त बिस्कीटं खावी लागतात, अशांना त्यांची चिंता असते. : भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार
मुंबईतली सोडा, महाराष्ट्रातली भाजप ही काही वर्षांपूर्वीपर्यंत ग्लुकॉन डीच्या याच बिस्किटांचे बशीत पडलेले तुकडे मिळाले तर चघळण्यात समाधान मानत होती. आता अचानक केंद्रीय सत्तेने फॅरेक्स बेबीसारखा गुटगुटीतपणा लाभला असला तरी महाराष्ट्रात आपण कुठून कुठून एन्ड्युरा मास मिळवलंय, ते विसरू नका. ओहोटी लागली की, पुन्हा त्याच बशीभोवती घोटाळावं लागेल आणि तेव्हा ते तुकडेही मिळतील याची खात्री नाही आता.
……………………..……………………..
३. उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना राष्ट्रीय लोक दलाच्या एका उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली असल्याने तो अजूनही उमेदवार आहे, पण आता तो भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्याच विरोधात प्रचार करतो आहे. कालपर्यंत हँडपंपासमोरचं बटण दाबून मला विजयी करा म्हणणारा हा उमेदवार आज कमळालाच मत द्या, हँडपंपाला म्हणजे स्वत:लाच हरवा, असं सांगतो आहे.
सत्ताकेंद्री लोकशाहीच्या सर्वात विकृत अवस्थेचं हे दर्शन आहे. म्हणजे आता लोकांची काय पंचाईत आहे पाहा. या माणसाच्या दलबदलूपणावर राग व्यक्त करण्यासाठी मतदारांनी भाजप उमेदवाराऐवजी यालाच निवडून दिलं तरी हा हँडपंपासह लगेच कमळात उडी मारेल, हे नक्की. याच्यावर राग म्हणून कमळावर शिक्का मारला तरी तोही याच्याच प्रचाराचा विजय!!!
……………………..……………………..
४. मुंबईत २५-३० वर्षांपासून शिवसेना नंबर एक पक्ष आहे. त्यामुळे काहीही झाले तरी भाजपा काही शिवसेनेची जागा घेऊ शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचणार नाही, पण सर्वाधिक जागांसह पहिल्या स्थानावर राहील, असं भाकीत त्यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुद्दे, विचार मराठी माणसाशी निगडित आहेत. पण, मुंबईमध्ये शिवसेनेने मराठी माणसाशी संबंधित मुद्यांची स्पेस व्यापल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही. : शरद पवार
मुंबईत शिवसेनेचा पहिला नंबर राहावा, अशी व्यवस्था दिल्लीत गांधी घराण्याची भांडी घासण्याची पाळी येऊ नये म्हणून काँग्रेसच्याच मराठी नेत्यांनी करून ठेवली होती, हे पवार सांगायला विसरलेले दिसतायत. महापालिका निवडणुकीनंतर सेनेला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही, तेव्हा 'मराठीहिता'साठी आपल्याकडेच यावं लागेल, असे संकेत साहेब देतायत तर. धन्य ते दोन जाणते राजे आणि त्याहून धन्य त्यांची अजाण जनता!!
……………………..……………………..
५. सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीफळ नेण्यास बंदी घालण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादकीयाच्या माध्यमातून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. माऊंट मेरीच्या जत्रेत भाविक मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या किंवा देवीस आवडणारी मेणाची साधने श्रद्धापूर्वक अर्पण करतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेणा’च्या प्रतिकृतीवर तेथे बंदी घालण्याची हिंमत आमचे प्रशासन दाखवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
यांची सगळी हयात या 'व्हॉट अबाउटिझम'मध्ये गेली. मशिदीवरचे भोंगे आणि रस्त्यावरचे नमाज बंद करण्यासाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याऐवजी मंदिरांवर भोंगे चढवून आणि महाआरत्या करून त्याच गोंगाटी आणि उच्छादी वेडगळपणाची नक्कल करण्यात धन्यता मानणारे हे शूरवीर. लोकांच्या वाट्टेल त्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या देवाला स्वत:च्या संरक्षणासाठी बेकायदा भिंती आणि पोलिसांचा बंदोबस्त कशाला लागतो, तो काढून घ्या आधी, असं हे कधी म्हणतील काय?
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment