चेहरे, चरित्र, अजेंडे एकसारखेच; वोट दिये, तो दिये किसे?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 15 February 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar भाजप BJP शिवसेना Shivsena उद्धव ठाकरे Udhhav Thackeray देवेंद्र फडणवीस Devendra Phadanvis राज ठाकरे Raj Thackeray शरद पवार Sharad Pawar नारायण राणे Narayan Rane जनता दल Janata Dal नीतीशकुमार NitishKumar कपिल पाटील Kapil Patil

‘किसी से’ बेहतर करू?

क्या फर्क पडता है?

‘किसी का’ बेहतर करू?

बहुत फर्क पडता है!

सध्या अनेक तरुण-तरुणींच्या व्हॉटसअॅपवरचं हे आवडतं स्टेटस आहे. राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या सत्ताबाजीकडे बघून या स्टेटसमधला मॅसेज अधिक महत्त्वाचा वाटतो. भाजप आणि सेना एकमेकांपेक्षा चांगला परफॉर्मन्स दाखवण्याच्या नादात आहेत. आम्हीच चांगले, आम्हीच प्रभावी, आम्हीच खरे, आम्हीच पारदर्शक, आम्हीच भ्रष्टाचारविरोधी, असा धोशा दोन्ही बाजूंनी सुरू आहे. पण जनतेचं काही चांगलं करू, त्यासाठी काही करता येईल का, हे दोन्ही पक्ष जवळपास विसरलेत की काय, अशी शंका यावी इतपत ही तू तू मैं मैं विकोपाला चालली आहे. युतीचं सरकार पडणार की काय, इतपत ही आरोपबाजी घसरत चालली आहे.

आपल्याला मिळालेली सत्ता जनतेचं काही बेहतर, भलं करण्यासाठी आहे असं हे पक्ष जवळपास प्रचार ज्वरात विसरूनच गेले आहेत. दोघांनी प्रचाराची पातळी खालच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांना कमी लेखण्याची एकही संधी दवडत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर उद्धव ठाकरे अर्धवटराव म्हणाले. आशीष शेलारांनी या लढाईला कौरव-पांडवांचं युद्ध म्हणून घोषित केलं. फडणवीसांनी हे धर्मयुद्ध आहे असं जाहीर करून अटीतटीची, निर्वाणीची भाषा केली. उद्धव यांनी पाणी पाजण्याची भाषा केली. इतर पक्षही मागे राहिले नाहीत. संजय निरुपम हा मूर्ख माणूस असल्याचं शरद पवारांनी घोषित केलं. निरुपम यांनी सेना-भाजप हे लबाड-ढोंगी लोक असल्याचा कांगावा केला. दोघे मिळून मुंबईकरांना कसं हातोहात फसवत आहेत, याचा पाढा त्यांनी वाचला. थोडक्यात प्रचार एकमेकांच्या औकातीपर्यंत खाली गेला आहे.

भाजप हा गुंडापुंडाचा पक्ष आहे अशी संभावना उद्धव ठाकरेंनी केली, तर सर्वांत अधिक गुंड सेनेत आहेत, हे फडणवीसांनी जाहीर केलं. शरद पवारांनी हे सरकार पाडलं पाहिजे, अशी इच्छा बोलून दाखवली. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतोय असं सेनेचे मंत्री उठता-बसता सांगताहेत. उद्धव ठाकरे दररोज ‘सरकार पाडू’चे इशारे देत आहेत. तिकडे राज ठाकरे सेना-भाजपच्या लढाईला दोन कोंबड्यांची झुंज म्हणताहेत. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंनी स्वत:ची मालमत्ता जाहीर करावी, असं आव्हान दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे सरकार गेलंच पाहिजे, असं दररोज म्हणताहेत. अजित पवार त्यांच्या खास शैलीत भाजपने शेतकऱ्यांचं वाटोळं केलं, हे सांगण्याची एकही संधी दवडत नाहीत. भाजप गुंडांना सुधरवणार आहे काय, असं म्हणत त्यांच्या दुटप्पीपणाची खिल्लीही त्यांनी उडवली आहे.

नारायण राणे यांचं वक्तव्यं या सगळ्यात अधिक विनोदी आणि वास्तवाचं विदारक दर्शन घडवणारं आहे. ते म्हणाले, ‘‘मी सेना-भाजपवाल्यांमध्ये काही काळ राहिलोय. त्यांना मी चांगला ओळखतो. कोण किती पैसे खातो, कसे खातो हे माझ्यापेक्षा कुणीही जास्त चांगलं ओळखू शकत नाही. यांची अंडी-पिल्ली मला जास्त माहीत आहेत. यातले कोण काळे, कोण गोरे माझ्याइतकं कुणीही चांगलं सांगू शकणार नाही.” राज ठाकरे यांनी मोदी मुंबईला कशी दुय्यम वागणूक देतात, मुंबई तोडण्याची त्यांची गुजराती नीती कशी आहे, भाजपवाल्यांकडे रग्गड पैसा कसा आहे, तो कुठून आलाय, असे वाभाडे काढले आहेत. सगळ्यात जास्त पैसे असलेला ‘डिफरंट पक्ष’ म्हणून त्यांनी भाजपचे कपडेच फाडले आहेत.

विविध पक्षांची, नेत्यांची वक्तव्यं, त्यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, आव्हानं, इशारे काय सांगतात? या लोकांना एकमेकांवर कुरघोडी करण्याचीच ईर्ष्या लागलीय. त्याने त्यांना झपाटलंय. मी दुसऱ्यापेक्षा बेहतर, प्रभावी कसा आहे, हे सिद्ध करण्याच्या बेधुंद नादात हे सर्व नेते गुरफटून गेले आहेत. जनतेचं भलं कशात आहे, हे नेते, त्यांचे पक्ष जवळपास विसरलेत की काय, अशी शंका यावी इतपत यावेळी प्रचाराची पातळी तळाला गेलीय. स्वत:च्या वक्तव्यांतून हे नेते आम्ही सारे एकाच माळेचे मणी आहोत, हे स्वत:हून दाखवून देत आहेत.

नेत्यांची प्रचाराची भाषणं ऐकून टीव्ही बघता बघता मतदार जनता यांच्यावर कातावत असेल काय, असा प्रश्न मनात येतो. हे असं का झालं असावं? या सगळ्या राजकीय नेत्यांना आपण जनतेसाठी कामं केलीत हे सांगण्यापेक्षा एकमेकांची उणीदुणी काढण्यात स्वारस्य का वाटत असावं? त्यांच्याजवळ स्वत: जनतेसाठी काही चांगलं काम केलंय हे सांगण्यासारखं नाही की काय, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभा राहतो आहे. कामं सांगण्यासारखी नाहीत म्हणून जाणूनबुजून हे नेते प्रचार भलत्या दिशेनं नेत नाहीत ना?

सरकार पडण्याच्या चर्चा झडत असताना या सरकारमधले एक मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे की, ‘कल्याण-डोंबिवलीत जसं आम्ही निवडून आल्यावर एक झालो, तसं मुंबईतही होऊ शकतं.’ म्हणजे एका बाजूला सत्तेसाठी परत एकत्र येण्याची भाषा, तर दुसरीकडे अगदी खालच्या पातळीवर उतरून चिखलफेक.

या आरोपबाजीच्या चिखलफेकीत किरीट सोमय्या यांनी तर खूप गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी बनावट कंपन्यांमध्ये मनी लँडरिंग केलं आहे. तसंच सेनेचे इतर नेतेही त्यात भागीदार आहेत. ज्या बनावट कंपन्यांतून मनी लँडरिंग झालंय, त्यातल्या दोन कंपन्यांशी छगन भुजबळांचाही संबंध आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सोमय्या ब्लॅकमेलर आहेत, अशी या आरोपांची संभावना केली आहे. पण या कंपन्यांतल्या मनी लँडरिंगविषयी ते मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे सोमय्या ब्लॅकमेलर आहेत, असं सांगून सेना नेत्यांना स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही. स्वत:वरच्या आरोपांना खणखणीत उत्तर द्यावं लागेल अन्यथा संशयाचं धुकं दूर होणार नाही, उलट दाटत जाईल. विशेष म्हणजे स्वत:ची संपत्ती जाहीर करण्याविषयीच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी सोयीस्कर मौन बाळगलं आहे, हे गंभीर आहे. एकमेकांच्या कुंडल्या मांडू अशा धमक्या दोन्ही बाजूंनी देण्यात आल्या आहेत.

जनतेचे प्रश्न प्रचारात आणण्याऐवजी हे राजकीय पक्ष प्रचार भलतीकडे का भरकटवत आहेत? जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव श्याम रजक यांनी याचं अचूक निदान केलं आहे. ते आमदार कपिल पाटील यांच्या लोकभारती या पक्षाचं जनता दल (यू)मध्ये विलीनकरण झालं, तेव्हा मुंबईत बोलत होते. रजक म्हणाले, ‘‘सेना-भाजपचं हे भांडण दोन सवतींचा झगडा आहे. ही खुर्ची तुला की मला यासाठीची लढाई आहे. जनतेचं त्यांना देणं-घेणं नाही. कारण या दोन्ही पक्षांचं वैचारिक स्कूल गोबेल्स आणि गोळवलकर यांचं आहे. सतत खोटं बोलून लोकांना असत्य हेच सत्य आहे, असं भासवायचं, तसा भ्रम तयार करायचा, गंडवागंडवी करायची, हा यांच्या राजकारणाचा फंडा आहे. हिटलरने ते जर्मनीत केलं, ते आता मोदी भारतात करताहेत.’’

भाजप-सेना महाराष्ट्रात तो प्रयोग राबवत आहेत. यांच्या या सत्ताबाजीत जनता कुठेच नाही. ती आश्चर्यचकित होऊन टीव्ही बघत आहेत. कारण त्यांच्या मनातली बात कुणीच बोलताना दिसत नाही. लोकभारती जनता दलात विलिन करताना कपिल पाटील म्हणाले ते महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, ‘राज्यात सर्व राजकीय पक्षांचे चेहरे, चरित्र आणि राजकीय अजेंडे एकसारखे झाले आहेत. ते लोकविरोधी आहेत.’

भाजप राष्ट्रवादाची बी टीम आहे. मोदी आणि शरद पवार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहेच. पवार-मोदी या गुरू-शिष्यांना उखडून फेका हे उद्धव ठाके यांनी शिवसैनिकांना आवाहनच केलं आहे. काँग्रेस-भाजप या दोघांची आर्थिक धोरणं तरी कुठे वेगळी आहेत? काँग्रेसची आर्थिक उदारीकरणाची सगळी धोरणं भाजपने इमानेइतबारे पुढे चालवली आहेत.

श्याम रजक, कपिल पाटील यांनी नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जनता ऐक्याच्या निर्धार केला आहे. राज्यातले सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचं चाल-चरित्र एक आहे. त्यांना नवा राजकीय पर्याय देण्यासाठी २२ एप्रिलला नीतीशकुमार यांची मुंबईमध्ये निर्धार परिषद होणार आहे. फॅसिस्ट आणि लोकविरोधी सत्ताबाजांना हटवून सामान्य माणसांचं लोकशाही समतावादी राजकारण अजेंड्यावर आणण्याचा निर्धार या निमित्तानं होणार आहे. राजकारण प्रवाही राहण्यासाठी अशा नव्या प्रयोगांची गरज असते. जे प्रस्थापित पक्षांना वैतागले त्यांना नीतीशकुमारांचा इंतज़ार असेल तर त्यात नवल नक्कीच नसेल.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......