ज्ञानेश्वरांच्या कालापासून ‘नंदभाषा’ महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. ती कोठून व कशी आली, इत्यादी माहिती अजून स्पष्ट झालेली नाही...
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 02 July 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध नंदभाषा Nandbhasha पिजीन बोली Pidgin language क्रिऑल भाषा creole language डोलड्रम्स Doldrums आयसोपलिओस्कॅटिसिटी Isopalaeoscaticity

शब्दांचे वेध : पुष्प एकोणचाळिसावे

आजचे शब्द : नंदभाषा, पिजीन बोली, डोलड्रम्स आणि आयसोपलिओस्कॅटिसिटी

सुरुवात एका प्रश्नानं करू या. तुकाराममहाराजांचा एक अभंग आहे -

उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥१॥

जिव्हाळ्याचा काठी उबाळ्याच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥

तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥२॥

तुका म्हणे ऐसी नोवर्‍याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥३॥

हा अभंग जर तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच देता येईल. आजचा प्रश्न असा आहे की, तुम्हाला आपल्या मराठी भाषेतल्या खाली नमूद केलेल्या काही शब्दांचे अर्थ सांगता येतील का? यातलाच एक शब्द तुकारामबुवांच्या या अभंगातही आहे.

केवली, अवारू, उधानु, पोकू, मुळु, शेली, पवित्र्, मंगी, तेवसू, लेवनू, अंगुळु, एकडू, रेघा, ठेपरू, चोपडू, तळी, तान, भुरकातानतळी, उधानुतानतळी, काटी, भुरकातानकाटी, बिटी, ढका, फाटा, अवारू फाटे, मंगी फाटे, तळी फाटे...

हे सगळे मराठीच शब्द आहेत. पण हजारातल्या एखाद-दुसऱ्या व्यक्तीलाच ते ठाऊक असतील. एक तर ते आपल्या रोजच्या वापरातले शब्द नाहीत आणि दुसरं म्हणजे ते प्रमाण मराठीतले नाहीत. ते आहेत मराठीच्या एक विशेष बोलीभाषेतले. तिला ‘नंदभाषा’ असं नाव आहे. ‘दाते शब्दकोशा’च्या पाचव्या खंडाच्या दीर्घ प्रस्तावनेत मराठीच्या सर्व (म्हणजे पन्नासच्यावर) बोलीभाषांचं सविस्तर वर्णन वाचायला मिळतं. त्यातली सगळ्यात शेवटची प्रविष्टी ‘नंदभाषा’ अशी आहे. तुम्हाआम्हाला तिची माहिती नसते, कारण ती एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’त या बोलीविषयी पुढील तपशील सापडतो- “नंद भाषा- ही एक व्यापारी लोकांची भाषा आहे. विसोबा खेचराचे कांहीं अभंग, महिपतीच्या विसोबा खेचरासंबंधाच्या कांहीं ओंव्या (भक्तिविजय अ. १८) व तुकारामाचे कांहीं क्षेपक अभंग यांत ही भाषा सांपडते. ज्ञानेश्वराच्या कालापासून आजपर्यंत म्हणजे सुमारें सहाशें वर्षे ही भाषा महाराष्ट्रांत अस्तित्वांत आहे. ही कोठून व कशी आली, हिला ‘नंद भाषा’ कां म्हणतात इत्यादि माहिती अजून स्पष्ट झाली नाहीं.”

‘दाते शब्दकोशा’तही अशीच माहिती आहे – ‘‘ही व्यापाऱ्यांची सांकेतिक भाषा असून यात संख्यावाचक शब्द व नाण्यांचे शब्द यांच्याबद्दलच संकेत आहेत. कारण व्यापाऱ्यांना वस्तूंची किंमत गुप्त ठेवताना हेच शब्द लागतात.’’ (प्रस्तावना, पाचवा खंड.)

मात्र नंद, नंदकी या शब्दाचा अर्थ सांगताना दाते जास्त खुलून लिहितात – “नंद, नंदकी —पुस्त्री. (संकेतिक) (नंदभाषा.) (व्यापाऱ्यांत, दुकानदारांत, रूढ). १ दलाल. -शर. २ दलालास द्यावयाचें वेतन; दलाली. थाकणें-ठेवणें-गुप्तपणें दलाली मिळविणें. भाषा-स्त्री. बाजारांत (दलालाच्या) नोकरांना, गिर्‍हाईकांना समजूं नये म्हणून व्यापारी लोक एक सांकेतिक भाषा उपयोगांत आणतात, तिला नंदभाषा असें म्हणतात. या भाषेंतील सांकेतिक संख्यावाचक शब्दांचे अर्थ पुढें दिल्याप्रमाणे आहेत. केवली = एक; अवारू = दोन; उधानु = तीन; पोकू = चार; मुळू = पांच; शेली = सहा; पवित्र = सात; मंगी = आठ; तेवसु, लेवनु = नऊ; अंगुळू = दहा; एकडू = अकरा; रेघी = बारा; तेपरू = तेरा; चोपडू = चौदा; तळी = पंधरा. तळी या शब्दांपूर्वीं अनुक्रमें एक, दोन, तीन, चार या अर्थाचे शब्द ‘तान’ या शब्दानें जोडून सोळा, सतरा, अठरा, एकोणीस हे शब्द बनतात. जसें- भुरका तान तळी = सोळा; अवारू तान तळी = सतरा; उधानु तान तळी = अठरा; पोकू तान तळी = एकोणीस; काठी = वीस. भुरका तान काठी = एकवीस; अवारू तान काठी = बावीस येणेंप्रमाणे. बिटी = शंभर; ढकार = हजार. नाण्यासंबंधीं शब्द असें- भुरका = एक रुपया; फाटा = आणा; अवारु फाटे = दोन आणे; मंगी फाटे = आठ आणे; तळी फाटे = पंधरा आणे; दुकार = एक आणा; चकार = दोन आणे; पकार = चार आणे; टाली = अर्धा रुपया, अधेली; ढोकळा = एक पैसा. या संकेतांत बरेच पाठभेदहि आहेत. वरील सांकेतिक शब्द योजून पुढील अभंग रचलेला आढळतो –

‘मुळू (५) वदनाचा उधानु (३) नेत्रांचा । अंगळू (१०) हातांचा स्वामि माझा ।१।

मुगुट जयाचा । केवळया (१) आगळी काठी । (२०) पवित्र (७) तळवटी । चरण ज्याचे ।२।

ढकार (१०००) वदनाचा आला वर्णावया । जिव्हा त्याच्या चिरल्या वर्णवेना ।३।

शेली (६) वेडावली पोकू (४) मौनावली । अंगुळूमंगी (१० + ८ = १८) थकली नकळे त्यासी ।४।

सद्भावें शरणा अवारू (२) जोडून । खेचरविसा म्हणे स्वामि माझा ।५।’ ”

थोडक्यात, ही एक सांकेतिक भाषा आहे. (विशेषतः) साड्यांच्या आणि दागिन्यांच्या दुकानातले कर्मचारी बरेचदा एकमेकांशी किंवा मालकाशी काही गूढ, अगम्य शब्दांत बोलताना तुम्ही कदाचित पाहिलं/ऐकलं असेल. ग्राहकाला आपलं बोलणं कळू नये हा या मागचा उद्देश असतो.

दुकानाची पायरी चढणाऱ्या गिऱ्हाईकाकडे नुसती एक नजर टाकली की, या मुरब्बी कर्मचारी लोकांना त्याची ‘औकात’ समजते. त्याच्या देहबोलीवरून ते ओळखतात की, हा गडी नवाडा आहे की मुरलेला, तो कितपत पैसे खर्च करू शकतो, त्याला कितपत उल्लू बनवता येईल, वगैरे वगैरे. त्यानुसार ते कर्मचारी त्याच्याशी व्यवहार करतात. जुना, कमी किमतीचा किंवा कनिष्ठ दर्जाचा माल ते अतिशय गोड बोलून आणि आग्रह करकरून त्या भोळ्या ग्राहकाच्या माथी मारतात. (जगभर सगळीकडे हे असं होतं. त्यामुळे आपले लोक काही वेगळं करत नाहीत, हेदेखील आहेच म्हणा!)

सगळेच नाही पण यातले अनेक मराठी व्यापारी ‘नंदभाषे’त बोलतात. ही भाषा आपल्या सुपीक मेंदू असलेल्या पूर्वजांच्या प्रखर बुद्धीची उपज आहे, हे नक्की.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भारताच्या अन्य भागांतही अशाच सारख्या अन्य व्यापारी बोली असतीलच. दुसऱ्या देशांतले व्यापारीसुद्धा या नंदभाषेसमानच आपापल्या सांकेतिक किंवा गूढ बोली बोलतात. या परदेशी गूढ बोलींना इंग्रजीत ‘pidgin’ भाषा असं म्हटलं जातं. ‘Pidgin’ या शब्दाचा उच्चार ‘पिडगिन’ किंवा ‘पिडजिन’ असा होत नसून तो ‘पिजन’/‘पिजीन’ असा होतो. त्याची मूळ परिभाषा अशी आहे- ‘An artificial language used for trade between speakers of different languages.’ या सगळ्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सध्याच्या संगणक, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या जमान्यातल्या या घडामोडी नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं.

शेकडो वर्षांपूर्वी व्यापारी लोक जेव्हा उंट आणि घोड्यांवर आपला माल लादून किंवा समुद्रमार्गानं आपल्या देशातून दुसऱ्या देशात विक्री आणि खरेदी करायला जात असत, तेव्हा त्यांना भाषेची अडचण तर नक्कीच येत असणार. उदाहरणार्थ, समरकंद, बसरा, बोखारा, किंवा बगदाद येथून सुरत किंवा दिल्लीला आलेल्या व्यापाऱ्याला गुजराती वा हिंदी माहीत असण्याची किंवा आपल्या लोकांना त्यांची भाषा येण्याची शक्यता जवळपास नसेलच. असेच तत्कालीन जगाच्या इतर व्यापारी पेठांमध्येदेखील घडलं असणार.

अशा वेळी आधी अगदी सुरुवातीला खाणाखुणांनी व्यवहार झाला असेल. मग हळूहळू परस्परांना कळतील असे काही संमिश्र शब्द तयार झाले असतील. त्यातूनच या ‘पिजन बोलीं’चा जन्म झाला. आणि पुढे तर त्यातून रीतसर काही स्वतंत्र भाषाही तयार झाल्या. ‘दुभाष’ (अनुवादक, interpreter) नावाची व्यावसायिक जमातही यातूनच जन्माला आली.

Pidgin बोलीची व्याख्या अशी आहे- “A pidgin or pidgin language, is a grammatically simplified means of communication that develops between two or more groups that do not have a language in common : typically, its vocabulary and grammar are limited and often drawn from several languages. It is most commonly employed in situations such as trade, or where both groups speak languages different from the language of the country in which they reside (but where there is no common language between the groups). Linguists do not typically consider pidgins as full or complete languages.

Fundamentally, a pidgin is a simplified means of linguistic communication, as it is constructed impromptu, or by convention, between individuals or groups of people. A pidgin is not the native language of any speech community, but is instead learned as a second language.” (विकीपिडिया)

एखाद्या विशिष्ट समूहाशी किंवा भूभागाशी संबंधित बोलीला ‘patois’ (पात्वा) किंवा ‘argot’ (आ(र)गट) असंही म्हटलं जातं. ही jargonपेक्षा वेगळी असते. पूर्वी जार्गनलादेखील एक प्रकारची ‘पिजीन बोली’ मानलं जात असे. पण आज या बाबतीत फरक केला जातो. एकतर बहुतेक Jargon प्रमाणभाषेत असतं. यात एखाद्या व्यवसायाशी निगडित तांत्रिक शब्द असतात. पण पात्वा किंवा आ(र)गट यांना दर्जानं दुय्यम समजलं जातं आणि त्यांचा वापर सरसकट सगळेच करत नाहीत. ते एखाद्या अतिशय छोट्या समूहापुरते किंवा जागेपुरते मर्यादित असतात. बोलीभाषा त्या मानानं व्यापक प्रमाणात वापरली जाते. उदाहरणार्थ, चोर, डाकू यांची आपली स्वतःची एक खास ‘पात्वा’ किंवा ‘आ(र)गट’ बोली असते. पूर्वीचे ठग लोक अशीच एक खास बोली बोलायचे. इतरांना ती कळत नव्हती.

‘नंदभाषा’ काय किंवा ‘पिजीन’ काय, या अशाच खास बोली आहेत. अशा अनेक भाषा जगभरात आढळून येतात. आधी सांगितल्याप्रमाणे यातल्या काही पिजीनमधून स्वतंत्र भाषाही कालांतरानं विकसित झालेल्या आहेत. दोन वेगळ्या भाषा एकमेकांच्या संपर्कात येऊन त्यांच्या संकरातून तयार झालेल्या या अशा स्वतंत्र भाषांना ‘creole’ (क्रिऑल) भाषा म्हणतात.

आफ्रिकेच्या काही भागांत बोलली जाणारी ‘स्वाहिली भाषा’ याचं एक उदाहरण आहे. पापुआ न्यू गिनी या देशात स्थानिक पिजीनपासून तयार झालेली ‘Tok Pisin’ (टॉक पिसीन) ही क्रिऑल भाषा बोलली जाते. ही त्या देशाची अधिकृत भाषा आहे. ‘Talk’ व ‘Pidgin’ या दोन इंग्रजी शब्दांवरून हे नाव तयार झालं.

पूर्वी फक्त ‘चिनी पिजीन’लाच खरी आणि एकमेव ‘पिजीन’ मानायचे. आज जगभरच्या अशा किती तरी ‘पिजीन बोलीं’ना अधिकृत मान्यता मिळाली आहे. यात फक्त चेन्नई (मद्रास)मध्ये बोलल्या जाणाऱ्या खास ‘Madras Bashai’ (मद्रास भाषाई) आणि आसामच्या दिमा हसाओ नावाच्या जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या ‘Haflong Hindi’ (हफ़लौंग हिंदी) या दोन पिजीनचाही समावेश आहे.

‘हफ़लौंग हिंदी’मध्ये हिंदीसोबत आसामी, बंगाली, दिमासा, आणि झेमे नागा या भाषांमधून घेतलेले शब्द आहेत. ‘हफ़लौंग’ हे तिथलं जिल्ह्याचं मुख्य गाव आहे. मद्रास भाषाईमध्ये तामिळशिवाय तेलुगु, मल्याळम, बर्मीज (ब्रह्मदेशी), हिंदुस्तानी आणि (भारतीय) इंग्रजी याही भाषांतले शब्द आहेत.

या भारतीय पिजीनच्या यादीत आणखी तीन बोलीभाषांचा उल्लेख असायला हवा, असं मला वाटतं. भारतात एके काळी अँग्लो इंडियन समाजाचे लोक खूप मोठ्या प्रमाणात राहत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यातले अनेक जण परदेशांत कायमचे रहायला गेले. ते लोक एका खास प्रकारे बोलत असत. आज भारतात राहणाऱ्या अँग्लो इंडियन लोकांनाही ही खास बोली येते. इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि स्थानिक भाषा यांच्या संकरातून ही ‘अँग्लो इंडियन बोली’ तयार झाली होती. ती पिजीनच आहे.

या शिवाय दुसरी आहे ती आपल्या मुंबईची खास बोली. ‘तू क्या करेला?, खायेला क्या?, फलाने का गेम बजा देंगा, अपुनसे नड मत’ यांसारख्या खास लहेजाच्या आणि खास शब्दसंग्रह असलेल्या स्थानिक ‘पात्वा’ला ‘बंबईया पिजीन’च म्हणायला हवं. तिसरी म्हणजे नंदभाषा.

‘Pidgin’ या शब्दाची व्युत्पत्ती गंमतीची आहे. असं म्हणतात की, चिनी लोकांना इंग्रजीतला ‘business’ हा शब्द नीट उच्चारता येत नव्हता. ते ज्या प्रकारे हा उच्चार करत, तो बाकीच्यांना ‘पिजीन’ असा ऐकू येत असे. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केव्हा तरी हा शब्द इंग्रजीत रूढ झाला. काही लोक म्हणतात की, संदेशवाहक कबुतरांवरून (Carrier Pigeons, कॅरिअर पिजन/पिजीन) हा शब्द बनला. पण ही खोटी व्युत्पत्ती आहे.

अशी आहे या भाषिक कबुतरांची किंवा पिजिनांची कथा.

..................................................................................................................................................................

आजचा पस्तुरी - lagniappe शब्द आहे : आयसोपलिओस्कॅटिसिटी (Isopalaeoscaticity)

यालाच चांगल्या भाषेत ‘नथिंग न्यू’ किंवा ‘द सेम ओल्ड थिंग’ असं म्हणतात. हीच ‘थिंग’ अनौपचारिक ‘स्लॅंग’ भाषेत ‘शिट’ होते.  ‘द सेम ओल्ड शिट’. म्हणजेच कोणत्याही नाविन्याचा अभाव असलेलं तेच तेच चाकोरीबद्ध कंटाळवाणं जीवन. ज्यात काहीही वेगळं घडत नाही. अ‌ॅडव्हेंचर नाही, रोमान्स नाही, थ्रिल नाही, एक्साईटमेंट नाही, कोणतेही चढ-उतार नाहीत. रुटीन, डल, अर्थहीन जगणं. यासाठी इंग्रजीत ‘tedium’ (टिडियम), ‘monotony’ (मोनोटोनी), ‘humdrum’ (हमड्रम), ‘chore’ (चोअर), ‘grind’ (ग्राइंड), ‘drudgery’ (ड्रजरी), असे अनेक समानार्थी शब्द आहेत. पण त्या ‘शिट’मध्ये जी झोंब आहे, जी अस्वस्थता आहे, नैराश्याचं जे प्रतिबिंब आहे, ते या इतर ‘सभ्य’ शब्दांत सापडत नाही.

काल जे घडलं तेच परवाही घडलं होतं, आजही तेच घडतंय, उद्याही तसंच घडेल. खरं म्हणजे काहीच घडणार नाही. मी सकाळी उठून तयार होईन, घाईघाईत दोन घास खाऊन लोकल किंवा बस पकडेन, ऑफिसला जाईन, त्याच सहकाऱ्यांशी त्याच गप्पा करेन, नियमित पगार मिळतो म्हणून येडझव्यासारखं काही तरी येडझवं काम करेन किंवा तसा बहाणा करेन. संध्याकाळी घरी परत येऊन टीव्हीवरच्या त्याच त्याच मूर्खपणाच्या मालिकारूपी रडकथा बघेन, आणि जेवून झोपून जाईन. बायकोचा मूड आताशा कधीच नसतो. त्यामुळे सेक्स करण्यात पूर्वी जो अर्धा-पाऊण तास निघून जात होता, तोही विरंगुळा आता मिळत नाही.

हे झालं टिपिकल प्रौढवयीन चाकरमान्या माणसाबद्दल. एखादी स्त्री नोकरी करत नसेल तरी तिलाही अशाच रुटीनला तोंड द्यावं लागतं. रांधा, वाढा, उष्टी काढा, मुलांची काळजी घ्या...

एखादा म्हातारा रिटायर्ड पेन्शनर, जुन्या काळातल्या लाल अलवणातल्या  - डोक्यावरचे केस काढलेल्या  - बालविधवा, पोरांनी वृद्धाश्रमांत फेकलेले अभागी आईबाप, तुरुंगात जन्मठेप भोगत पडलेले कैदी, नोकरीच्या शोधात वणवण भटकणारा आणि मोबाईल फोनवर गेम खेळत नाहीतर पॉर्न सिनेमे बघत टाईमपास करणारा नवयुवक - या सगळ्यांची एकच व्यथा असते : नो चेंज. नथिंग न्यू. डॉक्टरांच्या भाषेत, त्यांच्या मेडिकल रिपोर्टवर ‘NAD’ (Nothing Abnormal detected) असं लिहिलेलं असतं. कसलाही बदल नाही, बदलाव नाही, वेगळेपण नाही.

आयुष्याची मजा हरवून बसलेल्या किंवा ज्यांच्या आयुष्यात मजा नावाची गोष्ट कधी आलीच नाही, अशा लोकांना त्याच त्याच रुटीनचा कंटाळा येऊनही काही उपयोग नसतो. ‘गोदो येईल’, ‘गोदो येईल’ म्हणून ते निव्वळ ‘Waiting for Godot’ करत असतात. हा एक प्रकारचा ‘status quo’ असतो, एक प्रकारे हे ‘suspended animation’ असते. दर्यावर्दी लोकांच्या भाषेत त्यांच्या जीवनाचं तारू ‘doldrums’मध्ये अडकलेलं असतं.

‘Doldrums’ (डोलड्रम्स) म्हणजे विषुववृत्तीय सागरावरील असा भाग की जेथे वारा नसतो. या निर्वात प्रदेशात गेलेली शिडाची जहाजं तिथंच अडकून पडतात. कधी तरी वारा सुटेल आणि आपण या सक्तीच्या कारावासातून बाहेर पडू, या आशेवर ही जहाजं दिवसच्या दिवस तिथे ताटकळत उभी असतात. माणसाच्या आयुष्यात आलेल्या खिन्नतेला, डिप्रेशनला या ‘डोलड्रम्स’चीच उपमा देतात.

तुमच्या जीवनाची नौका जर अशा या मानसिक डोलड्रम्समध्ये फसली असेल, त्यातून बाहेर पडण्याचा उपाय सापडत नसेल, तर ‘What's happening?’ (काय चाललंय?) या कोणी विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही ‘बस, तोच नेहमीचा बकवास’ असं किंवा ‘The same old shit’ असंच उत्तर द्याल. बरोबर?

‘Shit’ म्हणजे विष्ठा. घाण. तीच जुनी कंटाळवाणी बोअरिंग घाण असलेलं बकवास रुटीन म्हणजे The same old (fucking) shit.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जेम्स हार्बेक नावाच्या प्रसिद्ध भाषापंडितानं या ‘The same old shit’च्या मानसिक अवस्थेसाठी ‘आयसोपलिओस्कॅटिसिटी’ उर्फ ‘Isopalaeoscaticity’ हा एक नवा शब्द तयार केला आहे. शब्दकोशांमध्ये त्याचा उल्लेख अजून तरी झालेला नाही, पण कधीतरी तो नक्की होईल. फार छान शब्द आहे हा.

या शब्दाची रचना त्यानं अशी केली आहे -

Iso- आयसो (ग्रीक ἴσος) म्हणजे ‘equal’, समान. पण पूर्वपद prefix म्हणून त्याचा वापर झाला तर त्याचा अर्थ ‘the same’  तेच, तसंच, असा होतो. Paleo (अमेरिकन स्पेलिंग) - किंवा palaeo (ब्रिटिश स्पेलिंग) – म्हणजे ‘old’ जुनं, पुरातन. (ग्रीक παλαιός). लॅटिनमार्गे हा शब्द इंग्रजीत आला. Palaeontology (जीवाश्मशास्त्र) हा शब्द कदाचित तुमच्या ओळखीचा असेल. Scat- (ग्रीक σκᾰ́τος) म्हणजे विष्ठा, मळ, गू, शेण. लॅटिनमार्गे हा शब्द इंग्रजीत आला. (‘Dung’ or ‘feces’ हे पर्यायी शब्द सभ्य आहेत. पण त्यासाठी ‘shit’ हाच खराखुरा सर्वमान्य इंग्रजी शब्द चलनात आहे.)  -icity (-ic आणि -ity)  हे एक सामान्य उत्तरपद suffix आहे. त्याचा अर्थ ‘असणं’, ‘अवस्था’ असा काहीसा होतो. याचंही मूळ ग्रीक भाषेतच आहे.

हार्बेकच्याच शब्दांत- That’s what it means, obviously. Iso ‘same’ palaeo ‘old’ scat ‘shit’ icity. Isopaleoscaticity (/ˌaɪ.soʊ.ˌpeɪ.li.oʊ.skæ.ˈtɪ.sɪ.ti/) is the condition or degree of being the same old shit. Yes, this is a new old word.

आहे ना हा एक अनोखा शब्द? धन्यवाद, जेम्स हार्बेक!

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......